‘दलित पँथर’ ही दलितांची अस्मितादर्शक चळवळ तरुणाईच्या जागतिक उत्थापनाच्या पार्श्वभूमीवर जन्माला आली. सवर्ण समाजाच्या मस्तवाल आविष्काराला आव्हान देणारे हे दलितांचे उद्रेक एकूण सामाजिक उत्थापनात अल्पजीवी ठरले. त्यातील अनेक नामवंत पुढारीही आता काळाच्या पडद्याआड जात आहेत. त्यांना जर आपली एकजूट टिकवता आली असती तर दलित चळवळीला बेबंद सत्ताधाऱ्यांच्या वळचणीत जगण्याचा प्रसंग आला नसता आणि उच्चवर्णीय मानसिकतेलाही योग्य चाप बसला असता. अर्जुन डांगळे यांनी आपल्या या दस्तावेजात दलित पँथरची पाच वर्षे उभी करण्याचा प्रयत्न केला आहे.
दलित पँथर ही महाराष्ट्रातील सामाजिक-सांस्कृतिक-राजकीय प्रस्थापिताला हादरविणारी सत्तरीच्या दशकातली घटना होती, याबद्दल कोणाचेही दुमत असू नये. तिचा जन्म नक्की कोणत्या तारखेला झाला, तिचे जन्मदाते कोण, तिचे एकूण जीवनमान किती, तिने काय साधले याबद्दल वेगवेगळी मते असू शकतात. पण पँथरच्या स्फोटाची कंपने देशात आणि देशाबाहेरही पोहोचली आणि ती कितीही अल्पजीवी असली तरी आज तिच्या निर्मितीला पन्नास वर्षे झाल्यावरही तिचा संदर्भ संपत नाही, हे विधान अधोरेखित करावेच लागेल. अधोरेखित हा शब्द अर्जुन डांगळे यांच्या अलीकडेच लोकवाङ्मयने प्रकाशित केलेल्या पुस्तकातील शीर्षकाचा. ‘दलित पँथरः एक अधोरेखित सत्य’ हे त्यांच्या पुस्तकाचे नाव. याआधी पँथरवर बरेच लिहिले गेले आहे. तरीही त्यांना लिहिण्याची गरज का वाटली हे सांगताना ते म्हणतात- ‘सत्याचा अपलाप, अर्धसत्य, एकारलेपण असे काही दोष ‘दलित पँथर’चा कालपट मांडणाऱ्या लिखाणात दिसून आले.’ अर्थात, ते असे लिखाण करणाऱ्या सगळ्यांच्याच हेतूबद्दल शंका घेत नाहीत, जाणीवपूर्वक त्यांनी ते केले असा त्यांचा आरोप नाही. या चळवळीतला प्रथमपासून संबंधित असलेला एक लेखक-कार्यकर्ता म्हणून या त्रुटी दूर करुन पँथरच्या वाटचालीचा ‘वस्तुनिष्ठ आलेख’ नव्या पिढीसमोर मांडावा असा त्यांचा उद्देश या पुस्तकाच्या लिखाणामागे आहे. त्यांनी ज्यांच्या लिखाणातील त्रुटी अधोरेखित केल्या आहेत, तशा त्यांच्या या लिखाणाबाबतही पुढे त्यांच्यासारखाच चळवळीतील कोणी जुना कार्यकर्ता, अभ्यासक काही वेगळे अधोरेखित करेल. या प्रक्रियेचे डांगळे स्वागतच करतात. दलित साहित्य चळवळीचा आढावा, दलित पँथरच्या स्थापनेआधीची स्थिती, सत्तरच्या दशकातील अस्वस्थता, युवक आघाडीची वाटचाल, साधना प्रकरण, वरळीची दंगल, दलित पँथरच्या फाटाफुटीचे विविध टप्पे, पँथरची बरखास्ती, सत्याच्या अपलापाचा पंचनामा हे या पुस्तकातील विवेचनाचे प्रमुख घटक आहेत. लेखकाने पुस्तकात ज्या बाबी अधोरेखित केल्या आहेत, त्यातील काही बाबींची, त्यांच्या वैशिष्ट्यांची नोंद काही आवश्यक टिप्पणीसह परिचयादाखल मी या लेखात घेणार आहे. त्यांचा नीट आवाका येण्यासाठी मूळ पुस्तक वाचायला हवे, हे आधीच अधोरेखित करतो.
दलित पँथर ही घटना काही अचानक वीज पडल्यासारखी नाही. तशी ती दिसली तरी असे सामाजिक घटित स्वयंभू नसते. तो चमत्कार नसतो. त्याच्यामागे एक घटनाक्रम असतो, प्रचलित वास्तव असते, या वास्तवातील विचारविश्वाचे परस्परसंबंध उलगडता आले पाहिजेत, तरच त्याचे नीट आकलन होऊ शकते, अशी अर्जुन डांगळेंची भूमिका आहे. त्यासाठी बुद्धाचा ‘प्रतीत्य समुत्पाद’ म्हणजे कार्यकारणभाव किंवा मार्क्सच्या परिभाषेत ‘डायलेक्टिस’ मदत करते, असेही ते नोंदवतात. त्यांच्या या पुस्तकात त्यांनी याचा किती व कसा वापर केला, याबद्दल चर्चा होऊ शकेल. पण ही रीत त्यांनी मांडली ती सत्याच्या दिशेने प्रवास करायला खूप मदतकारक आहे, हे नक्की. पँथरच्या आधीची आंबेडकरोत्तर रिपब्लिकन पक्षातील फाटाफूट व प्रस्थापितता, बौद्ध तसेच दलित साहित्याच्या चळवळी, युवक आघाडीसारख्या संघटना, पँथरच्या नेत्यांची पार्श्वभूमी, त्यांच्यावर संस्कार करणारे वैचारिक प्रवाह, पँथरच्या युक्रांदसहित तमाम समाजवादी तसेच डाव्या संघटना, पक्ष, व्यक्ती या मित्रशक्ती यांची तपशीलवार नोंद डांगळेंनी या पुस्तकात केली आहे. एवढी, अगदी वस्तीवार कार्यकर्त्यांची नावे ते का देत आहेत, असे एखाद्याला वाटू शकेल. पण ते म्हणतात त्याप्रमाणे एखादी चळवळ स्वयंभू नसते. तिला ज्ञात-अज्ञात असंख्य हात कारण असतात. लाल निशाण पक्षाच्या लोकांनी मेगॅफोन वा हॉल दिला, ही तशी किरकोळ बाब. यापेक्षा मोठे सहाय्य इतर अनेकांनी केलेले आहे. पण या छोट्या छोट्या थेंबांचे चळवळीच्या तळ्याला मोल असते. वस्तुस्थिती आणि कृतज्ञता म्हणूनही ही नोंद या पुस्तकाचे केवळ लेखक म्हणून नव्हे, तर त्या चळवळीतले प्रथमपासूनचे एक नेते म्हणून डांगळे घेतात, हे मला वृत्तीच्या दृष्टीने महत्वाचे वाटते.
या पुस्तकाचे दुसरे एक वैशिष्ट्य म्हणजे यातली परिशिष्टे. पुस्तकाची २० प्रकरणे व तेवढीच म्हणजे २० परिशिष्टे. एवढी परिशिष्टे देण्यात काय औचित्य हे ही संख्या पाहून वाटू शकते. पण पुस्तक वाचताना त्यातील मुद्द्याचा पुरावा आणि त्याची संदर्भ चौकट कळायला या परिशिष्टांचा खूप उपयोग होतो. लेखकाच्या निवेदनाची वस्तुनिष्ठता तपासायलाही ते मदतनीस ठरतात. उदा. दलित पँथरच्या ज्या जाहीरनाम्यावरुन फुटीचे चर खोलवर गेले, ती मूळ नामदेव ढसाळकृत पँथरची भूमिका व त्यावर राजा ढाले यांची ‘जाहीरनामा की नामाजाहीर’ ही टीका, त्यावरचे ‘सत्यचित्र’ मध्ये प्रसिद्ध झालेले रमेश आवाड यांचे भाष्य जसे होते तसे परिशिष्टात वाचायला मिळते. मूळ पुस्तकात लेखक त्यातील जी अवतरणे देतो त्यावरच एरवी सामान्य वाचकाला अवलंबून राहावे लागले असते. सगळेच काही संदर्भ शोधायला ग्रंथालयात जात नाहीत. या संदर्भांची उपलब्धता असलेले ग्रंथालय जवळ असावे लागते, हा आणखी एक भाग. त्यामुळे वाचकाला असे आयते संदर्भ लेखकाने उपलब्ध करुन दिलेत, हे खूप चांगले झाले. वाचकाला आपली स्वतंत्र मते बनवायलाही त्यांची मदत होते.
दलित पँथरची स्थापना कधी व कोणी केली, हा तिच्या स्थापनेपासूनचा गेली पन्नास वर्षे चाललेला वाद आहे. पँथरच्या प्रमुख नेत्यांनी बहुधा यावरच आपली लेखणी, वाणी, कौशल्य व ताकद अधिक झिजवली आहे. जो नेता यावर लिहितो, तोच याचा कसा संस्थापक व धुरीण होता, हे थेट वा आडवळणाने सिद्ध करत असतो. कधी, कोणी स्थापन केली याचा शोध यथावकाश चालू राहावा, पण पँथरने काय साधले, काय बिघडवले, या साधले-बिघडले मधून पुढच्या चळवळीसाठी काय इशारे वा मार्ग मिळतात याची चर्चा प्रामुख्याने व्हायला हवी. ही चिकित्सा काही प्रमाणात डांगळेंनी केली आहे. मात्र त्यांनीही स्थापनेसंबंधीच्या तपशीलात (त्यांच्या हेतुनुसार सत्याचा अपलाप दूर करण्यासाठी) पुस्तकाची खूप पाने खर्च केली आहेत. श्रेयशोधाची छाया सबंध पुस्तकभर जाणवत राहते. लेखक स्वतः पँथरच्या स्थापनेपूर्वीपासून साहित्य चळवळीत सक्रिय आहेत. याच साहित्य चळवळीतून पँथरच्या निर्मितीची पार्श्वभूमी तयार झाली. प्रत्यक्ष पँथरच्या स्थापनेतले ते घटक राहिलेत. तथापि, इतिहास नोंदवणाऱ्या पँथरच्या नेत्यांनी जाणते-अजाणतेपणी लेखकाच्या योगदानाची योग्य ती नोंद घेतली नाही, म्हणून लेखकाला आपली बाजू या पुस्तकातून मांडावी लागली. अशी बाजू मांडणे गरजेचे होते. पण त्यासाठी इतके लिहिणे गरजेचे होते का, असे वाचकाला वाटू शकते. असो. डांगळेंचे एक वैशिष्ट्य नोंदवलेच पाहिजे. ते म्हणजे, मतभेद असलेल्या व्यक्तींचे म्हणणे त्यांच्याच शब्दात ते पूर्ण मांडतात. आपल्या सोयीनुसार त्यातील विधाने उचलत नाहीत, ही सत्यान्वेषणाची खरी रीत ते अवलंबतात. शिवाय त्यांच्याशी नीट न वागलेल्या, त्यांना मुद्दाम डावललेल्यांच्या योगदानाचीही ते योग्य ती नोंद घेतात. प्रशंसा करतात. पँथरच्या या प्रमुख नेत्यांचा एक गुण मानायला हवा. एकमेकांना शह-काटशह, कठोर टीका, आरोप एवढे केल्यावरही त्यांचे वैयक्तिक मैत्र, परस्परांच्या कौटुंबिक अडीअडचणीला धावून जाण्याची वृत्ती कायम राहिली. डांगळेंनी नामदेव ढसाळांच्या पत्नी मल्लिका अमरशेख यांचे याला पुष्टी देणारे विधान पुस्तकात नमूद केले आहे.
७२ ला जन्माला आलेल्या मूळ पँथरचा भराचा काळ अडीच वर्षांचा. ७७ ला ती बरखास्त झाली हे धरले तर पाच वर्षांचा. पुढे निराळ्या रुपात ती गटागटात चालू राहिली. मध्येच रिपब्लिकन ऐक्यात एकटवटली. पुन्हा विस्कटली. या काळात नेतृत्वाचे स्खलन, मूळ चित्त्याचे कागदी होणे, विकले जाणे हे रुप त्रासदायक आहे. मात्र पहिल्या भराच्या काळात तिचा दरारा, ताकद याला तोड नव्हती. विशी-तिशीतल्या या पँथर्सनी प्रस्थापिताला ललकारणे, अंगावर घेणे विलक्षण होते. दलित अत्याचाराच्या घटना जिथे होतील, तिथे धावून जाणे, जात-सत्तेच्या ताकदीने वरचढ असलेल्या अत्याच्याऱ्यांची गचांडी धरणे, त्यांना दहशत बसविणे हे आता स्वप्नवत वाटते. आर्थिक अभावग्रस्तता, मात्र बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेली ज्वलज्जहाल अस्मिता, प्रेरणा, व्यवस्थाबदलाचा वैचारिक पाया, प्रस्थापिताला नकार यातून हा जोश येत होता. शिवसेनेचा वाघ याच काळात डरकाळ्या फोडत होता. त्याची आयाळ धरण्याचे काम पँथर्सनी केले. परिशिष्टात नवाकाळमधील एक बातमी डांगळेंनी दिली आहे. त्यात नामदेव ढसाळांच्या बाळ ठाकरेंना एकेरी संबोधून केलेल्या भाषणाची नोंद आहे. ढसाळ म्हणतात – “याला अनेक जाहीर सभांतून मी आव्हाने दिली आहेत. हिंमत असेल तर मैदानात ये. परंतु बांबूला बांबू लावायची हिंमत नाही. तुला कशामुळे माज चढला होता मला माहीत आहे. ती गोठा विसरलेली वासरे आता इकडे परत आली आहेत. आता तुझ्या गमज्या बस झाल्या.”
पँथरच्या पूर्वी खूप बौद्ध मुले शिवसेनेकडे आकर्षिली गेली होती. शिवसैनिक बनली होती. ती आता शिवसेना सोडून पँथरमध्ये आलीत, हा संदर्भ इथे आहे. शिवसेनाप्रमुखांना या भाषेत ललकारणाऱ्या नामदेव ढसाळांचे पुढच्या काळातील त्यांच्याशी झालेले सख्य सुविदित आहे.
आपण प्रारंभीच्या जोशाबद्दल बोलतो आहोत. राजा ढाले तर वरताण होते. हिंदू देवदेवतांची, ग्रंथांची निर्भर्त्सना करणे हा त्यांचा नित्यक्रम होता. त्यांनी तर शिवाजी पार्कवर जाहीर गीतादहन केले. सामान्य पँथर्स कार्यकर्तेही आपल्या पातळीवर अशीच भाषा व वर्तन करत होते. पँथर्सची भाषा केवळ आक्रमक नव्हती, तर इतरांच्या श्रद्धांचा-मान्यतांचा अधिक्षेप करणारी होती. पण ती सहन केली जात होती. आज हे कठीण नव्हे; अशक्य बनले आहे. त्यावेळच्या अन्य पुरोगामी चळवळी, नेते, त्यांचा समाजातला नैतिक अधिकार, प्रस्थापिताचे प्रतिनिधी असूनही शासकांच्या मनातील लोकशाही मूल्यांची बूज याला कारण आहे. आज हे राहिलेले नाही.
स्वातंत्र्याच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त काढलेल्या साधनेच्या विशेषांकातल्या ‘काळा स्वातंत्र्यदिन’ या लेखात राजा ढालेंनी राष्ट्रध्वजाबद्दल वापरलेली प्रक्षुब्ध भाषा आणि त्यावरुन उठलेले वादळ याचा सविस्तर आढावा डांगळेंनी या पुस्तकात घेतला आहे. त्यासंबंधात हा लेख साधनेत छापणाऱ्या अनिल अवचटांचा लेखही परिशिष्टात दिला आहे. या प्रकरणात साधनेच्या विश्वस्तांनी माफी मागितली, पण त्याचबरोबर एस. एम. जोशींसारख्या मोठा नैतिक अधिकार असलेल्या नेत्याने समाजाला प्रश्नही केला- राजाने या लेखात नमूद केलेल्या दलितांवरील अत्याचाराबद्दल आपण जाब देणार आहोत की नाही?
७४ साली ५ फेब्रुवारीला पँथर व डाव्या संघटनांचा दलित-कामगार एकजुटीचा प्रचंड मोर्चा सचिवालयावर काढण्यात आला होता. या ऐतिहासिक मोर्च्याची नोंद डांगळेंनी पुस्तकात घेतली आहे. त्यातील परिशिष्टात या मोर्च्याचा नवाकाळ मध्ये आलेला सविस्तर वृत्तांत दिला आहे. त्यात कॉ. डांगेंनी सरकारबरोबरच न्यायालयालाही इशारा दिला होता – “न्याय देण्याबाबत दृष्टिकोन बदलला नाही तर या हायकोर्टाच्या इमारतीचा एक दगडही शिल्लक राहणार नाही!”
आजच्या कोर्टाने आणि शासनाने ही भाषा वापरणाऱ्या डांगेंना न्यायालयाच्या अवमानाचा आरोप लावून आत टाकले असते.
पँथरच्या आक्रमतेला अन्य पुरोगामी चळवळींचे आणि शासनाच्या सौम्यपणाचे हे कोंदण मिळाले होते, हे विसरता कामा नये. या व्यापक एकजुटीचे महत्व जाणण्यात तसेच ते व्हावे असे मनोमन वाटणाऱ्यांत नामदेव ढसाळ आघाडीवर होते. ते याच विराट मोर्च्यात म्हणतात – “या घाणेरड्या देशात आजचा सोन्याचा दिवस दिसत आहे. कारण वर्षानुवर्षे भिंत बांधून दूर ठेवलेले दोन भाऊ आज एकत्र येत आहेत. ही एकजूट अभेद्य आहे व या नालायक काँग्रेस सरकारला ती मोडता येणार नाही. मुंबईचे राज्य यापुढे श्रमिक व दलित यांच्या इच्छेप्रमाणे चालणार.”
या मोर्च्याच्या आधी वरळी दंगलीनंतर पँथरसहित सर्व डाव्या, समाजवादी युवक आघाड्यांचा २१ जानेवारी ७४ ला मोर्चा निघाला होता. त्या मोर्च्याचे वर्णन करुन डांगळे म्हणतात – “वर उल्लेखलेल्या दोन मोर्च्यांच्या वेळी जी भावना महाराष्ट्राच्या जनमानसात निर्माण झाली होती, तिच्यात जर सातत्य राहिले असते आणि ती गतिमान झाली असती तर महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळे वळण लागले असते आणि संयुक्त महाराष्ट्र समिती वेळी जे वातावरण होते तसे निर्माण झाले असते. पण वळण लागले ते वेगळेच.”
अर्जुन डांगळेंची ही खंत खरीच आहे.
नामदेव ढसाळांच्या एका सभेचा प्रसंग डांगळे नोंदवतात. ढसाळांचा भाषणातील मुद्दा होता – “आपल्याला देवधर्मासंबंधी टिंगल टवाळी करायची नाही. तर, आपला लढा हा भाकरीसाठी आहे!” त्यावेळी राजा ढाले यांच्या कार्यकर्त्यांनी चक्क भाकरी आणली आणि ते म्हणाले – “ही घ्या भाकर आणि भाषण थांबवा!”
जाहीरनामा प्रकरणानंतर राजा ढालेंनी नामदेव ढसाळांना पँथरमधून काढायचे ठरवले. काढलेही. मात्र त्याआधीच नामदेव ढसाळांनी राजा ढाले व ज. वि. पवारांना पँथरमधून काढून टाकल्याचे घोषित केले. ...हा पोरकटपणा, मस्ती की उद्दिष्टाविषयीची बेफिकिरी?
वैयक्तिक उपजीविका, संघटनात्मक कामासाठीचा खर्च यातून होणारी कुचंबणा हा मोठा प्रश्न असतो. त्याची सहसा बाहेर चर्चा होत नाही. तोही आयाम इथे असावा. पण त्याची सोडवणूक करण्याची रीत तयार न होणे हा संघटनात्मक कमजोरीचाच भाग झाला. चळवळीसाठीच्या निधीचा वापर हा सामुदायिक मुद्दा असतो. ‘ज्याच्या हाती ससा तो पारधी’ असे झाले की चळवळीच्या सामुदायिकतेचे काही खरे नसते. यातून येणाऱ्या ताणांना, विरोधांना मग अनेकदा वैचारिक मतभेदांचा मुलामा चढवला जातो.
पँथरच्या फुटीचे पहिले कारण मार्क्सला मानणारे व शुद्ध आंबेडकरवादी या पँथरमधील दोन प्रवाहांचे मतभेद हे सांगितले जाते. या मतभेदांच्या निरासाचा मंच काहीच नव्हता का? लोकशाही प्रक्रियेने चर्चा घडवून पर्यायी जाहीरनामा काढण्यासाठी संघटनात्मक निर्णयप्रक्रियेची काहीच रीत नव्हती का? नव्हती तर ती निर्माण का नाही केली? एवढे करुनही फूट झाली असती तर ते समजू शकते. ...वास्तविक हे मतभेद एवढेच कारण नव्हते. अन्य तेवढीच किंबहुना अधिक महत्वाची कारणे होती हम करे सो कार्यशैली, नेतृत्व व श्रेयासाठीची स्पर्धा, कुरघोडी आणि या आधी नमूद केलेला निधीचा ताबा. पँथरमधील ही ऐतिहासिक फूट काही एकच नव्हती. पुढेही सातत्याने फुटी होत राहिल्या. पुढे झालेल्या या पँथर वा रिपब्लिकन फुटींना काय मार्क्स-आंबेडकर विचारधारांविषयीचे मतभेद कारण आहेत? निवडणुकीतली युती कोणाशी करायची यावर होणाऱ्या फुटींचे आधार वैचारिक वा डावपेचात्मक भूमिकांपेक्षाही अन्यच राहिले आहेत.
प्रस्ताव, चर्चा, सहमती किंवा बहुमताने निर्णय, त्याप्रमाणे कृती, तिचे मापन, पुन्हा चर्चा, नव्या समजाने नवा निर्णय...ही लोकशाही प्रक्रिया आंबेडकरी नाही का? जे राजकारणातल्या हितसंबंधात गुंतलेले नाहीत, अशा आंबेडकरी समूहातल्या विद्वान, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते अशांच्यातल्या मतभेदांचाही निरास का होत नाही? अभिनिवेशाने प्रत्येकाने आपल्या फडातच दंड थोपटत राहण्याने पुढे जाता येत नाही. अर्जुन डांगळे याबाबत रास्तपणे म्हणतात – “वर्षानुवर्षे आपण त्याच विषयांवर चर्चा करतो आहोत. दलित शब्द वापरायचा की नाही? १४ ऑक्टोबर की विजयादशमी? विपश्यना करायची की नाही? ...हे विषय आपण कधी संपवणार आहोत की नाही?”
डांगळेंच्या मते चळवळीला आलेली स्थितीशीलता यास कारण आहे. पण चळवळ चैतन्यशील असतानाच्या अडचणीही आपण पाहिल्या. एकूणच पँथरच्या पन्नास वर्षांत आंबेडकरी चळवळीचा समज, गांभीर्य वाढले आहे, असे म्हणता येत नाही. देशभरचा दलितवर्ग बाबासाहेबांना आपला उद्धारकर्ता मानून जयभीमच्या घोषणा देत ताकदीने रस्त्यावर उतरताना दिसतो आहे. ही स्थिती आश्वासक आहे. पण तिच्याशी महाराष्ट्रातल्या आंबेडकरी चळवळीचा संबंध नाही. आज संविधान संपविणाऱ्या फॅसिस्ट शक्ती चढाईवर असताना हे सगळे निळे एल्गार एकवटले पाहिजेत. अन्य मित्रशक्तींच्या हातात हात घालून फॅसिस्टविरोधी तसेच व्यवस्थेच्या सम्यक परिवर्तनाचा लढा बुलंद केला पाहिजे. दलित पँथरच्या पन्नाशीनिमित्त तिचा जन्म साजरा करताना तिच्या घडण्या-बिघडण्याची विवेकी चिकित्सा समाजात करुन पुढची दिशा ठरवण्याची संधी घेतली पाहिजे.
या सर्व प्रवासाचे साक्षी, त्यातील बऱ्या-वाईटाचे जबाबदार घटक असलेल्या अर्जुन डांगळे यांच्या ‘दलित पँथरः अधोरेखित सत्य’ या पुस्तकातील संदर्भ या कामी नक्की उपयुक्त ठरतील.
- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com
(ललकारी, विशेषांक, मार्च-एप्रिल २०२२)
_________________
दलित पँथरः अधोरेखित सत्य
अर्जुन डांगळे
लोकवाङ्मय गृह प्रकाशन
किंमत : रु. ६००
_________________