परवा पुण्यात सुनीलच्या ( Sunil Gajakosh ) घरी Natchathiram Nagargiradhu हा सिनेमा Netflix वर पाहिला. मला हा सिनेमा आल्याचे ठाऊक नव्हते. त्याने सुचवले आणि आम्ही दोघांनी तो पाहिला. एक श्रीमंत अनुभव दिल्याबद्दल सुनीलला धन्यवाद.
तामिळ भाषा. इंग्रजी उपशीर्षके. संवादात सूचकता, विविध संदर्भ आणि खोल अर्थ असल्याने थांबून थांबून ते वाचत, समजून घेत, चर्चा करत पुढे जात राहिलो.
सिनेमातील नायिकेला तिचा सहकारी मित्र विचारतो - "तू कम्युनिस्ट आहेस?" ती उत्तरते - "आंबेडकरवादी."
आंबेडकरवादी परिप्रेक्ष्यातून जात, लिंग, आर्थिक आदी माणूसपण हिरावून घेणाऱ्या विविध विषमतांच्या विरोधातला विद्रोह, स्त्री-पुरुष संबंधातल्या रुढ मान्यतांना धडका, त्यांतील गुंतागुंत, व्यवस्थेतील अनेकविध ताण आणि या सर्वांतून प्रेम, मैत्री, समता यांचा जागर मांडणारा हा कलात्मक आविष्कार मनाचा तळ ढवळतो तसेच समृद्ध करतो.
आशय आणि रुपबंध यांच्या एकात्मतेचा हा विलक्षण प्रयोग अत्यंत प्रत्ययकारी आहे. रंगभूमीवरील प्रायोगिक नाटक आणि चित्रपट या दोन्हींच्या सामर्थ्यांचे यातील अद्वैत उच्च दर्जाचा कलात्मक अनुभव देतो. समाज परिवर्तनाच्या जाणीवा देणाऱ्या कलाकृती या प्रचारी असतात, त्या कलात्मक निकषांवर कमी पडतात, या आरोपाला मूठमाती देणारा हा चित्रपट आहे.
आंबेडकरी विचारविश्वाला (त्यात बुद्ध अविभाज्य आहे) केवळ दलित उठावाच्या सीमेत बद्घ करणाऱ्या नजरांना या सिनेमात मधून मधून येणाऱ्या अथांग अवकाशातील तारकापुंज दिपवल्याशिवाय तसेच त्यातून आकस्मिक होणारे उल्कापात चकित केल्याशिवाय राहणार नाहीत. बुद्धमार्गी आंबेडकरी विचारविश्व अवघी मानवता कवेत घेते, याची साक्ष देणारा हा सिनेमा आहे.
आंबेडकर आणि बुद्ध यांच्या प्रतिमा व विचार ज्योती प्रच्छन्न नव्हे, तर उघडपणे हाती घेऊन प्रस्थापित सिनेविश्वात आपले अव्वल स्थान पक्के करणाऱ्या आणि आंतरराष्ट्रीय सिनेमा क्षेत्रालाही दखल घ्यायला लावण्याची क्षमता असणारा पा. रंजित हा तरुण दिग्दर्शक खरोखर थोर आहे. त्याला खूप खूप शुभेच्छा!!