गडचिरोलीत गोंड आदिवासी गावांतून हिंडत असताना आढळलेली ‘महाप्रजापती महात्मा राजा रावण मडावी’ असे लिहिलेली रावणाची प्रतिमा मी फेसबुकवर टाकली होती. त्यावर अनेक प्रतिक्रिया आल्या. त्यावर मी सविस्तर याबाबत लिहावे, असेही काहींनी सुचवले. वास्तविक अशा लेखनासाठी काही संदर्भ, अभ्यास गरजेचा आहे. तूर्त, आता जेवढे वाचले, ऐकले आहे त्याआधारे माझा अभिप्राय नोंदवतो. अभ्यासक त्यात दुरुस्त्या, भर घालू शकतात. ते खोडून काढू शकतात. याबाबतचे म्हणणे अधिक समग्र व्हायला त्याची मदतच होईल.
एकतर हा फोटो टाकल्यावर त्यातील चेहरा महाभारत मालिकेतल्या नटाचा आणि धडाचा भाग शिवाजी महाराजांचा असल्याची नोंद करुन “हा कुठचा रावण, हा तर अरविंद त्रिवेदी!” असे काहींनी उद्गार काढले आहेत. त्यातील काहींना “हा फोटो जसा होता, तसा मी इथे टाकला” असे उत्तर दिले. पण हे उद्गार काढणाऱ्यांनी हे लक्षात घ्यायला हवे, मुद्दा रावणाचा खरा फोटो कोणता हे सिद्ध करण्याचा नसून अन्यत्र रावणाचे दहन होत असताना या भागातले आदिवासी त्याला आपला महान राजा मानून त्याची मिरवणूक काढतात, हा होता. रावणाचा किंवा रामाचा किंवा सीतेचा किंवा लक्ष्मणाचा-खरेतर फोटो काढायचा शोध लागलेला नव्हता त्या काळातल्या कोणाचाही खरा फोटो कोणाकडे आहे? जे प्रचलित फोटो, चित्रे आहेत, त्यातील अधिकृत कोणती मानायची? आज ठाऊक असलेल्या व्यक्तीचा म्हणजे अरविंद त्रिवेदीचा चेहरा नसता तर रावणाचा हा फोटो चालला असता? लोक आपल्याला वाटते त्याप्रमाणे शक्कल लढवून आपल्या आराध्यांच्या प्रतिमा तयार करतात. त्यांची ती सर्जनशीलता मानून त्यातून काय म्हणायचे आहे, यावर लक्ष देणे अधिक गरजेचे आहे. रामलीलेत राम-सीतेची भूमिका करणाऱ्या पात्रांच्या लोक पाया पडतात, त्यावेळी ते त्या व्यक्तींना नव्हे, तर त्यांनी भूमिका वठवलेल्या आराध्यांना नमन करतात. तसेच हे समजून घ्यायला हवे.
रावण राक्षस आणि खलनायक असताना आणि त्याचे दहन करणे हीच रीत असताना रावणाला नायक करण्याचा हा प्रकार काहींना आक्षेपार्ह वाटतो, तर काहींना आश्चर्य वाटते.
वास्तविक, आपल्याकडे भारतीय संस्कृतीतील संघर्षाबाबत खूप लिहिले व बोलले गेले आहे, जाते आहे. त्याची काहीही कल्पना नसल्याने हे आश्चर्य वाटते. ज्यांचा आक्षेप असतो, त्यांच्यातल्या काहींना हे ठाऊक नसते आणि ज्यांना ते ठाऊक असते त्यांच्यातल्या काहींना ते मान्य नसते. पचत नसते.
भारतीय संस्कृती एकसाची नाही, हे नीट लक्षात घ्यायला हवे. फार मोठा समुदाय आज हिंदू या संज्ञेने ओळखला जातो. तथापि, वेद, महाभारत, रामायण, मनुस्मृती आदि हिंदू मानत असलेल्या प्राचीन ग्रंथांत हिंदू ही ओळख आढळत नाही. ती नंतर आलेली आहे. ती कशी हा मुद्दा आता गौण आहे. इथे हे समजून घेऊ की आज हिंदू म्हणून जे ओळखले जातात त्यांच्यातही धारणांचे-मान्यतांचे प्रचंड वैविध्य आहे. ज्या मान्यतांना मुख्य प्रवाही मानले जाते, त्या मान्यता प्रतिष्ठा, संपत्ती, सत्ता असलेल्या अभिजनांच्या आहेत. ज्यांच्याकडे लिहिण्याची, ते जपून ठेवण्याची आणि पुढे नेण्याची ताकद होती त्यांनी लिहिलेला इतिहास हाच इतिहास होतो. हा इतिहास अर्थातच या अभिजनांच्या सोयीचा असतो. बहुजन असूनही ज्यांच्याकडे ही ताकद नव्हती, त्यांचा इतिहास आता उघडकीस आणण्याचे प्रयास सुरु आहेत. बहुजनांतले शिक्षित तसेच अभिजनांतले न्यायाचे पक्षपाती ही सत्यशोधाची मोहीम गेली दीड शतके चालवत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून ते आजच्या काळात महाराष्ट्रातील आ. ह. साळुंखे-प्रा. अरुण कांबळेपर्यंत अनेकांनी भारतातील या प्रकारच्या सांस्कृतिक संघर्षाचा वेध घेतला आहे. त्यातून बहुजनांतल्या विविध समूहांना आत्मबल मिळू लागले. आपल्या धडावर आपलेच डोके हवेचे भान येऊ लागले. दुय्यमत्व दिलेल्या अथवा त्याज्य मानलेल्या त्यांच्या धारणा, मान्यता, सांस्कृतिक वैशिष्ट्ये यांचा आविष्कार ते खुलेपणाने करु लागले. मुख्य प्रवाही मानलेल्या मान्यतांना आव्हान देऊ लागले.
दंडकारण्यातल्या (आजचा महाराष्ट्रातील चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली ते मध्यप्रदेशातील बस्तर विभाग) आदिवासींनी रावणाला त्यांचा पूर्वज कल्पून महाप्रजापती राजा मानून त्याचा गौरव करण्याची घटना त्याच अर्थाने समजून घ्यायला हवी. अनेक अभ्यासकांनी रावण दंडकारण्यात असू शकतो, असे अनुमान काढले आहे. श्रीलंकेत रावण होता याचे काहीही उल्लेख तेथील सिंहलींच्या पुराकथांत, लोककथांत आढळत नाहीत. राम-रावण कथेशी संबंधित ज्या जागा पर्यटकांना तिथे दाखवल्या जातात, त्या पर्यटकांच्या धारणांचा व्यवसायासाठी खुबीने केलेला वापर आहे, असे जाणकार सांगतात.
रावणाला मानणे वा त्याला महात्मेपण देणे हे केवळ तो आपला पूर्वज आहे म्हणून नव्हे. तर त्यामागे या मानणाऱ्यांचे त्यांचे म्हणून एक ‘कथ्य (narrative)’ असते. रावण महापराक्रमी, विद्वान, विविध क्षेत्रांतला तज्ज्ञ होता. त्याची कळ लक्ष्मणाने प्रथम काढली. रावणाची बहीण शूर्पणखा हिचे नाक लक्ष्मणाने कापले. आपल्या बहिणीच्या विटंबनेचा सूड घ्यायला रावणाने सीतेचे हरण केले. पण तिला हात लावला नाही. हे त्यांचे म्हणणे. रामाचे-लक्ष्मणाचे म्हणणे प्रस्थापित रामायणात आलेच आहे. तेच खरे कशावरुन? संस्कृतमध्ये पंडितांनी लिहिले म्हणून? भक्तिभावाने वाचल्या जाणाऱ्या पोथ्यांत, भजनांत आहे म्हणून? बरे रामायण एक नाही. कथानकांतील भेदांच्या विविध आवृत्त्या असलेली शेकडो रामायणे आहेत. राम-सीता बहीण-भाऊ असलेलेही रामायण आहे.
रावणाला पुजले जाण्याची प्रथा गोंडांतच फक्त नाही. उत्तर प्रदेशात कानपूर, बिसरख, राजस्थानात मंडोर, मध्य प्रदेशात मंदसौर आणि विदिशा, आंध्र प्रदेशात काकीनाडा अशी भारताच्या वेगवेगळ्या भागात रावणाची देवळे आढळतात. उत्तराखंडमध्ये उत्तरकाशी येथे दुर्योधन आणि कर्णाची देवळे आहेत. ही देवळे बांधणारे आणि त्यांची पूजा करणारे लोक आजच्या ‘हिंदू’ संज्ञेतच मोडतात.
हे लोक खलनायक दुर्योधनाला का मानतात? त्यांचे म्हणणे तो जातपात मानत नव्हता. कर्ण या सूतपुत्राला त्याने आपला बंधुसमान मित्र मानला. पहिला पांडव म्हणून तसेच सर्वात शूर असूनही कर्णाचा अधिकार हिरावला गेला होता. बिनलग्नाचे अपत्य म्हणून कुंतीने त्याला जन्मतः त्यागले होते. ती कथा आपल्याला ठाऊक आहे. कर्णावरील या अन्यायाच्या विरोधात असलेले तसेच त्याला आणखी काही कारणाने मानणारे लोक त्याचे देऊळ बांधतात.
महिषासुर दिवस जवाहरलाल नेहरु विद्यापीठात साजरा केल्याबद्दल स्मृती इराणी यांनी संसदेत दुर्गावतार धारण केलेला आपण पाहिला आहे. महिषासुराचा गौरव म्हणजे दुर्गेचा अपमान. दुर्गेचा अपमान म्हणजे राष्ट्रद्रोह असा त्यांचा निष्कर्ष होता. वास्तविक जेएनयूमध्ये हा दिवस बऱ्याच वर्षांपासून साजरा होतो, हे एकेकाळचे ‘कठोर आंबेडकरवादी’ सनदी अधिकारी आणि तत्कालीन भाजपचे खासदार (आता काँग्रेसी झालेले) उदित राज यांनीच जाहीर केले. ते स्वतः अशा कार्यक्रमात वक्ता म्हणून पूर्वी सहभागी झालेले होते. महिषासुराचा बलिदान दिवस म्हणून साजरा करण्यात आदिवासी तसेच अन्य प्रगतीशील विद्यार्थ्यांचा त्यात पुढाकार असे.
बंगालमध्ये एकीकडे महिषासुरमर्दिनीचे देखावे आणि दुर्गोत्सवाची धुमधाम असताना त्याच बंगालातील संथाळ आदिवासी समुदाय महिषासुराची आराधना करत असतात. आम्ही महिषासुराचे वंशज आहोत, असे ते सांगतात. दुर्गोत्सव साजरा करणाऱ्यांच्या लेखी महिषासुर हा लोकांना त्रास देणारा दैत्य. त्याचा वध करुन दुर्गेने लोकांना या दैत्याच्या जाचातून वाचवले. संथाळांचे म्हणणे उलट आहे. त्यांच्या मते आमचा राजा महिषासुर हा कल्याणकारी राजा होता. त्याचे हे कल्याणकारीपण सहन न झालेल्यांनी दुर्गा या एका सुंदर युवतीला महिषासुराकडे पाठवले. तिने त्याला वश केले. त्याच्याशी लग्न केले आणि नवव्या दिवशी महिषासुराचा खून केला. ज्या बंगालात भद्र लोक. त्याच बंगालात संथाळ. दोघेही भारतीय. दोहोंची कथ्ये वेगळी. …कोणते खरे?
बळी आणि वामनाची कथा अशीच. बळीचे महानपण सहन न झालेल्या देवांनी त्याचा काटा काढण्यासाठी विष्णूला वामनाचा अवतार घेऊन पाठवले. वामन हा बटु. बालक. दानशूर बळीराजाकडे तो दान मागतो. बळी माग म्हणतो. बटु वामन केवळ तीन पावले जमीन मागतो. राजाने दिली म्हणताच तो हिमालयाएवढा उंच होतो. पहिल्या पावलात पृथ्वी, दुसऱ्या पावलात स्वर्ग व्यापतो. “तिसरे पाऊल कुठे टाकू?” असे वामनाने विचारल्यावर “माझ्या मस्तकावर ठेव.” असे राजा म्हणतो. वामन तसे करतो आणि बळीला पाताळात गाडतो. ही प्रचलित कथा. महाराष्ट्रात बळीची थोरवी विदित करणारे ‘इडा पीडा टळो, बळीचे राज्य येवो’ असे लोकवचन आहे. केरळमध्ये आणखी एक पुढची आवृत्ती आहे. पाताळात गेलेला महाबली मुळातच कल्याणकारी राजा. तो दरवर्षी आपल्या प्रिय जनतेची ख्यालीखुशाली विचारायला पृथ्वीवर येतो. दहा दिवस त्यांच्यासोबत राहतो. आनंदोत्सव साजरा करतो. मग पुन्हा पाताळात जातो. हे दहा दिवस दिवाळीसारखे केरळमधील सर्वधर्मीय जनता साजरा करते. तो सण आहे ‘ओणम’.
अशा अजून कित्येक प्रस्थापित मान्यतांना आव्हान देणाऱ्या मान्यता भारतीय संस्कृतीत आढळतील. मुद्दा आहे, याकडे आपण आता कसे बघणार हा. या प्रश्नाला सरळ सोपे उत्तर आहे – आहे तसे स्वीकारा. ज्याला जे करायचे आहे, म्हणायचे आहे ते म्हणू द्या. कोणी कोणाला अडवू नका.
संविधानाने विश्वास, श्रद्धा, उपासना यांचे स्वातंत्र्य दिलेच आहे. जुन्या काळापासून हे चालत आहे. त्यावेळी जर खूप काही प्रश्न तयार झाले नाहीत. लोकांनी या सगळ्या आस्था-मान्यतांचे सहअस्तित्व स्वीकारले, तर आता संविधानाने अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य दिलेले असताना हे प्रश्न का यावेत?
पौराणिक तसेच श्रद्धा-आस्थांचा मामला कोणतीही अभ्यास समिती नेमून सुटणारा नाही. दुर्गा श्रेष्ठ की महिषासुर? बळी श्रेष्ठ की वामन? राम श्रेष्ठ की रावण? ...या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी वस्तुनिष्ठ असे कोणते आणि कसे ऐतिहासिक संशोधन करणार? ते निर्विवाद कसे असू शकेल? या काही ऐतिहासिक व्यक्ती नव्हेत. कधीकाळी असल्याच तरी त्यांच्या प्रतिमा कितीतरी परिवर्तने होत लोकमानसातून वाहत आल्या आहेत. ऐतिहासिक व्यक्तींच्या मापनाबद्दल संशोधकांत एकमत होत नाही, तिथे पुराकथांतील या मंडळींच्याविषयी कसे होणार?
आहे तसे स्वीकारणे. टीका व चिकित्सेला पूर्ण वाव ठेवून परस्परांच्या कथ्यांचा आदर करणे, त्याबद्दल सहिष्णू राहणे हाच उपाय आहे.
या बाबतीत बंगालातील भद्र लोकांनी टाकलेले एक पाऊल मला स्वागतार्ह वाटते. काही वर्षांपूर्वी मी एक बातमी वाचली होती. आता ती माझ्याकडे नाही. मला आठवते त्याप्रमाणे भद्र लोकांनी दुर्गोत्सवाच्या मंडपात संथाळांच्या भजन मंडळाला आमंत्रित केले होते. संथाळांनी तिथे महिषासुराची भजने गायली होती.
हे असेच घडले असेल वा अजूनही घडत असेल तर तो आदर्श नमुना आहे. तुम्ही तुमचे म्हणणे मांडा. आम्ही आमचे म्हणणे मांडतो. या मांडण्यात कोणी कोणाचा अपमान केला अशी भावना करुन घ्यायची नाही. ऐकणाऱ्या लोकांनी त्यातले काय घ्यायचे, काय सोडायचे हे त्यांचे स्वातंत्र्य राहील.
अलीकडे रावणाची पूजा करणाऱ्या आदिवासी समूहांत एक विभाग रावणाच्या अन्यत्र होणाऱ्या दहनालाच विरोध करतो आहे. छत्तीसगडपासून महाराष्ट्राच्या चंद्रपूर आदि भागांतील काही आदिवासी संघटना त्यासाठी मोर्चे काढत आहेत. त्यातल्या काहींचे म्हणणे – “तुम्ही रामाला मानता जरुर माना. रावणाला मानत नाही. नका माणू. आमचा त्याला विरोध नाही. पण आम्ही ज्याला देव मानतो त्या रावणाचे तुम्ही दहन करता हे आम्ही सहन करणार नाही.”
मला हे बरोबर वाटत नाही. तुम्ही रावणाला भजा. ते रामाला भजतील. रावणाचे दहन ही त्यांची परंपरा आहे. तिला विरोध करणे योग्य नाही. आदर आणि सहिष्णुता ही दोन मूल्ये महत्वाची आहेत. दुसऱ्याच्या मताचा आदर करा. किमान ते सहन करा. गोहत्येच्या विरोधात असलेले गांधीजी त्याच्या कायद्याच्या बाजूने नव्हते. ‘मी गायीला पवित्र मानतो, पण ते दुसऱ्या कोणाचे तरी अन्न आहे. त्याला मी विरोध करणे बरोबर नाही,’ अशी त्यांची भूमिका होती.
बहुप्रवाही, विचारबाहुल्य असलेल्या आणि संविधानाने त्यातील सामाजिक विषमतांसारख्या जखमांवर इलाज केलेल्या भारतीय संस्कृतीचे एकसाचीकरण करणे म्हणजे भारताचे व्यक्तित्व दुभंगवणे होय. त्या बाबतीत जबरदस्ती करण्याने भारताचे भारतपणच राहणार नाही.
| ता. क. |
सांस्कृतिक एकसाचीकरणाचा आग्रह धरणाऱ्या कडव्या हिंदुत्ववाद्यांचा आणि त्यांच्या भाजप या राजकीय साधनाचा भारत हिंदुराष्ट्र करणे हे अंतिम लक्ष्य आहे. आजतरी हिंदुत्वाचा ज्वर पसरवून त्याद्वारे बहुसंख्याकांची मते मिळवून ते लोकशाही मार्गाने सत्तेवर आलेत. ही सत्ता मिळवताना त्यांना साथीला त्यांचे म्हणणे पूर्णतः मान्य असलेले लोकच हवेत असे नसते. विविध व्यक्ती आणि काही समूहही त्यांच्या लघुदृष्टीच्या तात्कालिक स्वार्थासाठी भाजपला सामील होतात. येन केन प्रकारेन त्यांना गळाला लावण्याचा उद्योग भाजप करत असतो. साम, दाम, दंड, भेद ही त्यांच्या हिंदुत्वाची (कपट) नीती आहे. त्यामुळे अनेक विसंगती ते कवेत घेऊ शकतात.
गडचिरोलीच्या ज्या गोंड-कंवर आदिवासी गावांतून आम्ही हिंडत होतो, तिथे बिरसा मुंडाच्या प्रतिमा व जयघोषाबरोबरच आणि रावणपूजेबरोबरच ‘जय श्रीराम’ चे अस्तित्व भिंतींवर दिसते. गडचिरोली-चंद्रपूरच्या आदिवासी बहुल भागात निवडून आलेले आदिवासी समाजातले नगरसेवक, आमदार, खासदार हे मुख्यतः भाजपचे आहेत. चंद्रपूरला रावणदहनाविरोधात मोर्चा काढण्यात भाजपच्या नगरसेविकेचा पुढाकार होता. तिला भाजपच्या जयश्रीरामची अडचण आली नाही आणि भाजपला तिच्या रावणदहनाच्या विरोधाचा त्रास झाला नाही.
भाजपच्या तळ्यावर वाघ व बकरी असे एकत्र पाणी पितात.
न्यायाधीशांच्या निवडीत सरकारला अधिकार हवा म्हणून सध्या सर्वोच्च न्यायालयाच्या मागे हात धुवून लागलेले केंद्रीय विधी मंत्री किरण रिजिजू भाजपचेच एक मुस्लिम नेते मुख्तार अब्बास नकवी यांच्या विधानावर काय म्हणाले ते समजून घेणे रोचक आहे. नकवी म्हणाले – “गोमांस खाणाऱ्यांना पाकिस्तानला पाठवा.” त्यावर रिजिजू म्हणाले – “ईशान्य भारतात बीफ खाण्याचा रिवाज आहे. मी बीफ खातो. त्यावर कोणीही बंधन घालू शकत नाही.”
दोन वेगळे बोलणाऱ्यांना भाजप सामावून घेते. एवढेच नव्हे, तर भाजपच्या गोहत्याविरोधी कायद्याच्या मुख्य भूमिकेच्या विरोधी असलेले रिजिजू त्यांचे सन्मान्य मंत्री राहतात. मेघालयाच्या अलिकडेच झालेल्या निवडणुकांच्या धामधुमीत तेथील भाजपच्या प्रदेशाध्यक्षांना गोहत्याविरोधी कायद्याबद्दल विचारले असता तेही तेच म्हणाले - “गोमांस हा आमच्या संस्कृतीचा भाग आहे. त्यावर कोणीही बंधन घालू शकत नाही.”
आज काहीही करुन सत्ता. त्यासाठी वैचारिक विरोधकांनाही स्वार्थपूर्तीचे गाजर दाखवून सामावणे. त्यांच्या विरोधी सूरांना सोयिस्करपणे सहन करणे. बाजूच्या नसलेल्या वैचारिक विरोधकांना हेच केल्याबद्दल अर्बन नक्षली किंवा तुकडे तुकडे गँग किंवा फुरोगामी ही बिरुदे व सोबत तुरुंग, ईडीच्या कारवाया बहाल होतात. हेच बोलणाऱ्या मात्र भाजपच्या तंबूत दाखल होणाऱ्यांना सर्व माफ. उलट आर्थिक तसेच सत्तेची बक्षीसे मिळतात. उद्या कत्तलखान्यातच रवाना करायचे आहेत. तोवर माजण्याची उसंत या बोकडांना भाजप देते आहे. कदाचित व्यक्तिगत त्यांची कत्तल न करता त्यांना सोन्याचा चारा असलेल्या पिंजऱ्यात ठेवले जाईल. मात्र ते ज्यांचे प्रतिनिधीत्व करत आहेत, त्या समूहांची मात्र कत्तल अपरिहार्य असेल.
भाजपच्या अशा ‘विरोधविकासाची’ आज तरी चलती आहे.
- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com
(६ मार्च २०२३)