Monday, October 23, 2023

दुर्गा नारीशक्तीचे अधिमान्य प्रतीक कसे?


वर्तमानपत्रे, अन्य माध्यमे तसेच अनेक संस्था नवरात्रीच्या काळात दुर्गेच्या नावाने नारीशक्तीचा जागर करतात. समाजात ज्या महिलांनी विशेष काम वा कर्तबगारी केली आहे, त्यांना आजच्या काळातील दुर्गा संबोधून पुरस्कार दिले जातात. काही लोक या नऊ दिवसात इतिहासातील लोकोपयोगी कार्य करणाऱ्या महिलांची माहिती व फोटो टाकून ‘नारीशक्ती’ला वंदन करतात.

असे पुरस्कार देणाऱ्या, नारीशक्तीला वंदन करणाऱ्यांच्या भावनांचा मला आदर आहे. त्यांचा हा उपक्रम धन्यवादास पात्र आहे. ज्या महिलांना हा पुरस्कार मिळतो, त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करुन त्यांचे मी अभिनंदन करत आलो आहे. नारीशक्तीला अभिवादन करणाऱ्या पोस्टना लाईक करत आलो आहे.

दुर्गेच्या नावाने पुरस्कार देणाऱ्या, तो घेणाऱ्या, नारीशक्तीचे जागरण करणाऱ्यांच्या भावना वा कर्तृत्वाविषयी मला आदर असला व तो मी व्यक्त करत आलो असलो, तरी हे सर्व करण्यासाठी दुर्गा हे प्रतीक आवश्यक आहे का, हा मला प्रश्न आहे.

दुर्गा ही देवी आहे. तिला मानणाऱ्यांच्या मनात तिचे अस्तित्व आहे. ती ऐतिहासिक नाही. ज्यांच्या ऐतिहासिकतेविषयी पुरावे नाहीत, त्यांचा कल्पित पराक्रम हा मानदंड कसा होऊ शकतो? ज्यांना आता पुरस्कार दिले जातात, त्या महिला हाडा-मासाच्या माणूस आहेत. त्यांच्या अस्तित्वाचे आणि कर्तृत्वाचे प्रत्यक्ष दाखले आहेत. त्यांना ज्याच्या नावे पुरस्कार द्यायचे ती व्यक्ती त्यांच्याहून अधिक किमान त्यांच्याइतकी तरी कर्तृत्ववान आहे, याचे प्रत्यक्षसिद्ध प्रमाण गरजेचे नाही का?

जिजाऊंच्या नावे, अहिल्याबाईंच्या नावे किंवा सावित्रीबाईंच्या नावे जेव्हा पुरस्कार वा सन्मान दिले जातात त्यावेळी या महान महिलांची ऐतिहासिकता वादातीत असते. त्या अस्तित्वाचे पुरावे नसलेल्या देवता नाहीत. त्या माणूस होत्या. अशी माणसे जे कर्तृत्व करतात, ते दुसरी माणसे करुच शकतात. खूप कष्ट, चिकाटी, हिंमत या जोरावर आपल्या कुवती वाढवत नेणे हे शक्य कोटीतले असते. जर त्यांनी हे केले तर मलाही माणूस म्हणून हे शक्य आहे, ही वास्तवात येऊ शकणारी प्रेरणा मला मिळते. देवता (कल्पितात) जे करतात ते मनुष्ययोनीतल्या माणसाला कसे जमणार? आजची महिला सावित्रीबाई फुलेंच्या आदर्शांवर पाऊल टाकून आपल्या सभोवतालच्या दीन-दलित महिलांच्या उत्थानासाठी झटू शकते. पण दुर्गेच्या अलौकिक शक्तीचे अनुकरण मर्त्य मानव असलेल्या केवळ दोन भुजांच्या महिलेने कसे करावे?

तेही असो. पुराणे, दंतकथा यातील काही पात्रे ऐतिहासिकता नसली तरी त्यांच्या शक्ती-गुणांच्या मान्यतांमधून त्यांच्या काहीएक आदर्श व्यक्तित्वाची प्रतिमा लोकमानसात रुजलेली असते. त्या प्रतिमेस स्मरुन मर्त्य मानवांत त्या गुणांचा परिपोष व्हावा म्हणून पुरस्कार-सन्मान दिले जातात. काही उपक्रम चालवले जातात. एकलव्याच्या नावाने असे पुरस्कार, उपक्रम असतात. गुरुविना स्वयंबळावर प्रचंड कष्टाने प्रतिकूल स्थितीशी झुंजत पुढे जाण्याची प्रेरणा त्यात अनुस्यूत असते. ऐतिहासिक नसली तरी एकलव्याची ही प्रतिमा वादातीत आहे. शिवाय ती मानवी कुवतीच्या अवकाशात आहे. पौराणिक असला तरी एकलव्य अलौकिक देवता नाही.

द्रोणाचार्य हेही अलौकिक देवता नव्हेत. त्यांच्या नावे पुरस्कार दिले जातात. आपल्या मुलाला - अश्वत्थाम्याला पीठाचे दूध करुन देण्याइतपत गरीबी असलेला तत्त्वाने जाणारा पांडवांचा हा गुरु. शूरवीर घडविणारा शिक्षक म्हणून आजच्या गुरुंना द्रोणाचार्यांच्या नावे पुरस्कार दिले जातात.

पण एकलव्याप्रमाणे द्रोणाचार्यांची प्रतिमा निर्लेप नाही. अर्जुनाचे धनुर्विद्येतले श्रेष्ठत्व अबाधित राहावे म्हणून एकलव्याचा अंगठा गुरुदक्षिणेत ते मागतात. एकलव्य त्यांची प्रतिमा समोर ठेवून विद्येची आराधना करतो. द्रोणाचार्यांनी त्याला प्रत्यक्ष शिकवलेले नाही. तरीही द्रोणाचार्यांनी गुरुदक्षिणा मागणे आणि तीही कपटाने आपला शिष्योत्तम अर्जुन याला प्रतिस्पर्धी राहू नये म्हणून...हे आदर्श शिक्षकाचे लक्षण कसे?

म्हणजेच, ज्या पुराकथांतल्या, अनैतिहासिक मात्र लोकमानसात विशिष्ट गुणांच्या समुच्चयात रुजलेल्या व्यक्तित्वांच्या नावे पुरस्कार देणे यातून कोणाचे नुकसान होत नाही. कोणाच्या भावनांना धक्का पोहोचत नाही. मात्र त्या व्यक्तींच्या प्रतिमा निर्लेप हव्या. त्यात वाद असू नयेत. म्हणून एकलव्यासारख्या प्रतिमा चालू शकतात. मात्र द्रोणाचार्य चालू शकणार नाही.

थोडी अडचण आहे. या आजच्या परिभाषेत हिंदू पुराकथांतल्या प्रतिमा आहेत. लोकही तसेच मानतात. त्यामुळे त्या भारतीय वा अखिल मानवी आहेत, असे खेचण्यात, सार्वत्रिक समजण्यात काही मतलब नाही. अन्य धर्मीयांच्याही अशा पुराकथा असू शकतात. मी म्हणेन त्यांतूनही अशा वादातीत प्रतिमा निवडाव्यात. त्यांच्या नावे कोणत्याही धर्माच्या वा निधर्मी व्यक्तींना पुरस्कार देण्यात काही वावगे दिसत नाही. त्यातूनही परधर्मातील अशा प्रतिमांचा स्वीकार हाच अधर्म असे कोणी मानत असेल तर त्यांना असे पुरस्कार नाकारण्याचे स्वातंत्र्य आहेच. ते कोणी घेतले तर त्याचा आदर व्हावा.

केवळ इहवादी नव्हे, तर पुराकथांतील, दंतकथांतील व्यक्तित्वं प्रेरक प्रतीके म्हणून स्वीकारली आणि ती सर्वमान्य असली तर मला तशी अडचण नाही.

पण सर्वांनी स्वीकारावे वा स्वीकारायला मोठी अडचण नाही असे दुर्गा हे वादातीत प्रतीक नाही. दुर्गेने महिषासुर दैत्याचा वध केला. दैत्य हे मानवाला त्रास देणारे असतात. त्यांचा नाश करुन मानवांना त्यांच्या त्रासातून मुक्ती देण्याचे काम देव किंवा देवता करतात, हे गृहितक इथे आहे. पण ते सर्वमान्य नाही. ज्या बंगालात भद्र समाज या मान्यतेने दुर्गोत्सव करतो, त्याच बंगालात लक्षणीय संख्येने असलेला संथाळ हा आदिवासी समुदाय महिषासुराला आपला पूर्वज मानतो. तो त्यांचा कल्याणकारी राजा. हा आदिवासी राजा उच्चवर्णीय भद्र मंडळींना जड झाला. त्याचा काटा काढायला त्यांनी दुर्गा नावाच्या सुंदर युवतीला पाठवले. तिने महिषासुराला वश केले. त्याच्याशी लग्न केले आणि कपटाने त्याचा नवव्या दिवशी खून केला. ही संथाळांची मान्यता.

मान्यतांच्या या दोन्ही आवृत्त्या ऐतिहासिक पुरावे नसलेल्या व्यक्तींबद्दलच्या आहेत. त्यातील खरे-खोटेपणाचा निकाल आज आपण लावू शकत नाही. पण आजच्या दोन समुदायांच्या हितसंबंधांचे प्रकटीकरण करणाऱ्या धारणांचे रुप त्यांनी घेतले आहे. कारण वैदिक-अवैदिक, ब्राम्हणी-अब्राम्हणी हे सांस्कृतिक संघर्ष ऐतिहासिक आहेत. त्यात विजयी झालेल्या ताकतवर अभिजनांनी जे लिहून ठेवले तेच प्रमाण कशावरुन? दुर्गा नायिका आणि महिषासुर खलनायक हे भद्र लोक सांगतात म्हणून सार्वत्रिक सत्य कसे होऊ शकेल? जे लिहिले गेले, ज्याला अलौकिकत्वाचे मुखवटे चढवले गेले त्यांचे स्रोत तत्कालीन वास्तवात असणार. त्यावेळच्या संघर्षातील मानवी व्यक्तींना देवता किंवा राक्षस बनवले गेले. नायक वा खलनायक केले गेले. प्रबलांचा हितसंबंध जपणारे नायक किंवा देवता आणि पराजितांचे हितसंबंध जपणारे खलनायक किंवा राक्षस ठरवले गेले. प्रबलांनी लिहिलेल्या इतिहासात हे असेच होणार.

अशावेळी एखाद्या वर्तमानपत्राने किंवा संस्थेने दुर्गेच्या नावाने कर्तृत्ववान संथाळ महिलेला पुरस्कार जाहीर केला तर तो तिने कसा घ्यायचा? आपल्या शत्रूलाच भजणे किंवा प्रेरक वा शूरत्वाचे प्रतीक मानणे ही तिला अवमानणा वाटणार नाही का? हा सन्मान नव्हे तर आपल्या जखमांवर मीठ चोळणारी मानखंडनाच वाटेल. आताच्या भद्र लोकांनी निर्विष मनाने तो दिला म्हणून त्यांचा आदर करावा, सहिष्णू होऊन तो स्वीकारावा असे या संथाळ महिलेने ठरवले तर अलाहिदा. तो तिचा मोठेपणा. दुर्गेचा विचार न करता पुरस्कार देणाऱ्या भद्र लोकांच्या हेतूचा, भावनेचा ती त्यातून आदर करेल. तो तिचा अपवादा‍त्मक वैयक्तिक निर्णय असेल. तिच्या समुदायाला तो पसंत पडेल असे नाही.

भद्र लोकांनी भद्र लोकांनाच असा पुरस्कार देणे हे होऊ शकते. त्यात इतरांची मानखंडना होण्याचा प्रश्न नाही. त्या त्या समुदायाच्या संघटना असतात. त्यांनी आपल्या अंतर्गत (जातिसंस्थांप्रमाणे) असे पुरस्कार ठेवायला कुणाची हरकत नसावी. मुद्दा येतो जी वर्तमानपत्रे, ज्या संस्था किंवा शासनाचे विभाग हे सर्वांचे प्रतिनिधीत्व करतात त्यांनी अशा वादातीत नसलेल्या देवतास्वरुपी प्रतीकांच्या नावे पुरस्कार द्यावेत का हा.

त्याचे उत्तर देऊ नये हेच आहे.

असे केल्याने भद्र किंवा अभिजन संस्कृती हीच प्रमाण संस्कृती मान्य करणे, तिला अधिमान्यता देणे आणि तीच सगळ्यांनी स्वीकारावे हे अधोरेखित होते.

महिषासुराची जयंती करणे हा दुर्गेचा अपमान आणि म्हणून तो देशद्रोह वाटणारे लोक आपल्याकडे आहेत. त्यांच्या म्हणण्याला दुर्गा हे नारीशक्तीचे प्रतीक म्हणून वृत्तपत्रे, माध्यमे, शासकीय विभागांनी वापरण्यातून मान्यता मिळते.

महिषासुराची जयंती हा आदिवासींमधला जुना प्रघात आहे. तो कोणी आधुनिक पुरोगामी, विद्रोहींनी सुरु केलेला नाही. या नवरात्रात रावणाच्या दहनाला मनाई करा अशी मागणी महाराष्ट्र, छत्तीसगड, झारखंड आदि पट्ट्यातील गोंड समाजातून होते आहे. ते रावणाला आपला राजा मानतात. त्यांनाही कोणी पुरोगामी वा विद्रोहींनी फितवलेले नाही.

तेव्हा, एक मनोमन आपण कबूल करुया आणि स्वतःला पटवूया की हा देश फक्त आपला नाही. आपल्या मान्यता याच राष्ट्रीय मान्यता समजू नये आणि त्यांचा तसा प्रचार करु नये. कोट्यवधींची संख्या असलेल्या अन्य समुदायांच्या वेगवेगळ्या मान्यता आहेत. त्यांना त्या धारण करण्याचा, दुसऱ्याला अडथळा होणार नाही अशा रीतीने त्यांचे अनुसरण-अनुपालन करण्याचा अधिकार आहे. संविधानाने या अधिकाराला मान्यता व त्याच्या रक्षणाची हमी दिली आहे.

रावणदहनाला मनाई करणाऱ्यांना माझा पाठिंबा नाही. रावणदहन ही प्रचलित परंपरा आहे. ज्यांना ती हवी ते चालू ठेवतील. रावणाची पूजा करणाऱ्यांना, त्याची महती गाणाऱ्यांना तसे करण्याचे स्वातंत्र्य आहे. कोणी कोणाला मनाई करु नये. मुख्य म्हणजे तो राष्ट्रीय वा सार्वत्रिक मापदंड करु नये.

केरळात ओणम हा बळीराजाच्या सन्मानाचा उत्सव आहे. या बळीराजाला देवांनी वामनाचा अवतार घेऊन पाताळात गाडला. इथे वामन हा देव म्हणून श्रेष्ठ आणि बळीराजा हा दैत्य म्हणून वध्य असे कसे होईल? केरळमधील जनतेला ते कसे पटेल?

भारत हा बहुसांस्कृतिक देश आहे. आजवर तो टिकला त्याचे कारण त्याची सर्वसमावेशकता. संविधानाने आपण तिच्यावर शिक्कामोर्तब केले. एवढेच नव्हे; जे धर्म, भाषा आदि विविध प्रकारे अल्पसंख्य आहेत, त्यांना त्यांचे सांस्कृतिक व्यवहार मुक्तपणे करण्याचा अवकाश कायद्याने दिला.

कायद्याच्या पलीकडे समाजाची मानसिकता नावाचा घटक आहे. या समाजाने विशेषतः जे प्रभावी प्रवाह समजले जातात त्यांनी तुलनेने क्षीण प्रवाहांना सुरक्षित वाटेल, सन्मान वाटेल असा उक्ती आणि व्यवहार करणे नितांत गरजेचे आहे. तरच हा देश आपल्या सगळ्यांचा आहे, असे इथल्या सगळ्यांना वाटेल आणि ‘भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत’ ही प्रतिज्ञा सार्थ होईल.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

_________________

२३ ऑक्टोबर २०२३