Tuesday, November 26, 2024

संविधान सभेतल्या शलाका (भाग १ - प्रस्तावना)


मुंबई आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरुन दर मंगळवारी स. ९ वा. प्रसारित होणाऱ्या ‘संविधान सभेतल्या शलाका’ या १६ भागांच्या मालिकेचा पहिला भाग आज संविधान दिनी २६ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रसारित झाला. त्याचे हे मूळ टिपण.                
देशाचं स्वातंत्र्य असो अथवा देशाची राज्यघटना बनवणाऱ्या संविधानसभेचं कामकाज. यातल्या सहभागींप्रति कृतज्ञता व्यक्त करताना सर्रासपणे पुरुषांचाच उल्लेख केला जातो. इंग्रजीत ‘फाऊंडिंग फादर्स’ असेच बोलले जाते. – यात ‘मदर्स’ चा उल्लेख का होत नाही? …हा प्रश्न सहसा कोणाला पडत नाही. स्वातंत्र्याच्या संग्रामात लढणारे किंवा संविधान बनवणारे फक्त ‘पिता’ नव्हते. त्यात ‘माता’ही होत्या. कमी होत्या. पण नगण्य नव्हत्या. त्यांची संख्या आणि कामगिरी ही दखल न घेण्याइतकी सामान्य नव्हती. खरं तर त्या स्वयंतेजानं लकाकणाऱ्या शलाका होत्या. स्त्रियांची कामगिरी अशी डोळ्याआड होण्यामागे कारण असते ती आपल्या समाजातली पुरुषप्रधान व्यवस्था. पितृसत्ताकता. पुरुष हा कर्ता. स्त्री केवळ साधन किंवा सहाय्यक. पुरुषी वर्चस्वाच्या या संस्काराचा स्त्रियांवरही प्रभाव असतो. हिंदी सिनेमातल्या आईचा हा डायलॉग आपण अनेकदा ऐकलेला आहे. ती मुलाला म्हणते – ‘वो तेरे बच्चे की मा बननेवाली है.’ बच्चा खरंतर दोघांचा. त्यातही ते बाळ आकार घेणार, नऊ महिने सांभाळलं जाणार आईच्या उदरात. पुढंही त्याला दूध पाजणार, काळजी घेणार आई. त्याचा मालक मात्र पिता. बाळाला नाव लागणार त्याचंच. आई केवळ साधन. बाळाला जन्म देणारं. या पुरुषी वर्चस्वाच्या दृष्टीमुळेच जगभरच्या स्त्रियांचे श्रम, पराक्रम कायम धूसर राहिलेत. ज्यांचा अपवादाने उल्लेख होतो, त्यांना ‘मर्दानी’ ठरवलं जातं. ‘खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी’ हे गीत आपण ऐकलंच आहे. झाशीच्या राणीचा पराक्रम तिचा स्वतःचा, एका ‘स्त्री’चा होता. तिला ‘मर्दानी’ ठरवलं की सर्वसामान्य स्त्रीच्या आवाक्यातली ही बाब नाही, स्त्रीचा हा गुण असू शकत नाही, अपवादानेच पुरुषी ताकदीच्या स्त्रिया असतात, हा संस्कार घट्ट होतो.

या संस्काराशी लहानपणापासून झगडत आपलं स्वत्व टिकवणाऱ्या आणि पुरुषांच्या बरोबरीनं राजकीय क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या ‘फाऊंडींग मदर्स’ अनेक आहेत. त्यातल्या संविधानसभेत सदस्य म्हणून निवडून आलेल्या १५ जणी होत्या. त्यांचं जीवन, विचार आणि कार्य आपण यापुढच्या भागांतून समजून घेणार आहोत. स्वातंत्र्य चळवळीतल्या आपल्या महान मातांच्या आठवणींचा हा जागर या कार्यक्रमात १५ जणींपुरताच मर्यादित असणार आहे, याची श्रोत्यांनी नोंद घ्यावी.

या १५ जणींची नावं अशी आहेतः केरळच्या पालघाट जिल्ह्यातल्या अम्मू स्वामिनाथन, कोचिनच्या दाक्षायणी वेलायुधन, पंजाबच्या मलेरकोटला इथल्या बेगम ऐजाज रसूल, आंध्रच्या दुर्गाबाई देशमुख, बडोद्याच्या हंसा जीवराज मेहता, लखनौच्या कमला चौधरी आणि राजकुमारी अमृत कौर, गोलपाडा- आसामच्या लीला रॉय, पूर्व बंगालातल्या (म्हणजे आजच्या बांगला देशातल्या) मालती चौधरी, अलाहाबादच्या पूर्णिमा बॅनर्जी आणि विजयालक्ष्मी पंडित, मालदा-प. बंगालच्या रेणुका रे, हैदराबादच्या सरोजिनी नायडू, अंबाला-हरयाणाच्या सुचेता कृपलानी, तिरुवनंतपुरम-केरळच्या अॅनी मस्कारेन. ...अशा या पंधरा जणी.

भारताच्या संविधानसभेत एकूण सदस्य होते २९९. त्यांत या १५ जणी. म्हणजे पाच टक्के. म्हणजे अल्पसंख्य. समाजात निम्म्या असलेल्या महिला देशाच्या भविष्याचा आराखडा निश्चित करण्याच्या या सर्वोच्च प्रक्रियेत अगदी अल्प. हा स्त्रियांना दुय्यम लेखणाऱ्या आपल्या सामाजिक व्यवस्थेचाच परिणाम. यांमध्ये अनुसूचित जाती, मुस्लिम आणि ख्रिस्ती या गटातून प्रत्येकी एक. अनुसूचित जमातीपैकी एकही नाही. बाकी कथित उच्चवर्णीय हिंदू. संविधान सभेच्या महत्वाच्या सर्व समित्यांत त्यांना संधी मिळाली असं झालं नाही. घटनेच्या मसुदा समितीत तर एकही स्त्री नव्हती. देशाच्या विविध भागांतून त्या निवडून आल्या होत्या. बहुतेकजणी सुखवस्तू घरातल्या आणि प्रभावशाली, राजकारणी पुरुषांच्या नातेवाईक होत्या. पण कठपुतळ्या नव्हत्या. त्या स्वयंप्रज्ञ होत्या. उच्चशिक्षित होत्या. पारंपरिक बंधनांना किंवा वहिवाटीला तसेच स्वतःच्या जात-धर्म-वर्गथरातल्या संकेतांना ठोकरण्याची त्यांच्यात हिंमत होती. त्यांची स्वतःची अशी देशाच्या भवितव्याविषयी मतं होती. समाजात नेत्या म्हणून त्यांना मान्यता होती. पारतंत्र्याविरोधात लढताना त्यांनी तुरुंगवास भोगलेला होता. संविधान सभेत येण्यापूर्वी, संविधान सभेत असताना आणि त्यानंतरही त्यांनी कर्तृत्व गाजवलेलं आहे. कोणी मुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्री तर कोणी राज्यपाल झालेल्या आहेत. कोणी आंतरराष्ट्रीय स्तरावर युनोसारख्या संस्थांत कामगिरी केलेली आहे.

प्रत्येकीविषयी स्वतंत्रपणे अधिक विस्तारानं आपण पुढं बोलणारच आहोत. एक झलक म्हणून त्यातल्या काहींचा अल्पसा परिचय इथं करुन घेऊ.

दाक्षायणी वेलायुधन या संविधान सभेतल्या एकमेव अनुसूचित जातीच्या महिला सदस्य. केरळातील पुलाया या अनुसूचित जातीत जन्मलेल्या. या जातीतल्या स्त्रियांना चोळी घालायला मनाई होती. तो दंडनीय अपराध होता. दलितपणाचे भोग भोगलेल्या दाक्षायणी वेलायुधन दलितांच्या नेत्या होत्या. तथापि, दलितांच्या विकासासाठी स्वतंत्र मतदारसंघ, संयुक्त मतदारसंघ वा विशिष्ट टक्के राखीव जागा हा मार्ग त्यांना मंजूर नव्हता. त्यांच्या मते जोवर दलित आर्थिकदृष्ट्या गुलाम आहेत तोवर या तऱ्हेच्या मार्गांचा काहीही उपयोग होणार नाही. सामाजिक दुर्बलता घालविणारे तसेच नैतिक संरक्षण कवच देणारे संरचनात्मक बदल त्यासाठी त्यांना गरजेचे वाटत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गांधीजी या दोहोंच्या समर्थक असलेल्या दाक्षायणींचा बाबासाहेबांशी इथे मतभेद होता. अन्य बाबतीत त्या बाबासाहेबांच्या बाजूनं उभ्या राहिलेल्या दिसतात.

बेगम ऐजाज रसूलही स्वतः मुस्लिम लीगच्या प्रतिनिधी असतानाही अल्पसंख्यांकांच्या स्वतंत्र मतदारसंघाच्या विरोधात होत्या. त्यांच्या मते हे आत्मघातकी पाऊल आहे. त्यामुळे अल्पसंख्याक बहुसंख्याकांपासून कायमस्वरुपी अलग पडतील. जिनांच्या पाकिस्तानच्या कल्पनेशी त्या सहमत नव्हत्या. राज्यघटनेत ‘गाव की व्यक्ती’ एकक मानायचं, यावरुन घमासान चर्चा झाली. बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘खेडे म्हणजे स्थानिकतावाद, अज्ञान, संकुचितता आणि जातीय, धार्मिक असहिष्णुतेचे डबके’ या विधानावरुन वातावरण तापलं. अनेकांनी बाबासाहेबांवर यावेळी कठोर टीका केली. त्यावेळी बाबासाहेबांना बेगम रसूल यांनी संपूर्ण पाठिंबा दिला. भारतीय संघराज्याचं गाव नव्हे तर व्यक्ती हे एकक हवं, या मताच्या त्या पुरस्कर्त्या होत्या. वैयक्तिक पातळीवर जमीनदार कुटुंबातल्या असतानाही जमीनदारी निर्मूलनाच्या बाजूनं त्या लढल्या.

स्वतंत्र बाण्याच्या या महिला सदस्य स्त्रियांच्या राजकीय आरक्षणाला विरोध करतात. हंसा मेहता संविधान सभेत म्हणतात, “आम्ही कधीच कोणत्या अग्रहक्कांची मागणी केलेली नाही. आम्हाला सामाजिक, आर्थिक तसेच राजकीय न्याय हवा आहे. आम्हाला अशी समानता अभिप्रेत आहे ज्याचा परस्पर आदर, सामंजस्य हा पाया असेल.” रेणुका रे यांनी या म्हणण्याला पाठिंबा दिला. हिंदू कोड बिलाच्या चर्चेवेळी दुर्गाबाई देशमुख, हंसा मेहता आणि राजकुमारी अमृत कौर यांनी समान नागरी कायद्याची बाजू लावून धरली. या कायद्यानं सर्व क्षेत्रात स्त्रियांना समानता मिळायला मदत होईल, असा त्यांचा दावा होता. हंसा मेहता युनोच्या मानवी अधिकारांच्या सार्वत्रिक घोषणापत्र समितीच्या सहअध्यक्ष होत्या. त्यावेळी घोषणापत्रात ‘all men’ ऐवजी ‘all human beings’ या दुरुस्तीत त्यांचं मोठं योगदान झालं. केवळ पुरुष का? स्त्रिया किंवा अन्य लिंगांचीही माणसं त्यात आहेत, हे संबोधनातूनच स्पष्ट व्हावं. म्हणून ‘सर्व पुरुष’ ऐवजी ‘अखिल मानवजात’ ही त्यांची सूचना होती.

मूलभूत अधिकारांच्या उपसमितीतील चर्चेत मिनू मसानी यांनी ‘केवळ धर्म वेगळे ही बाब नागरिकांसाठी लग्नात अडथळा होता कामा नये’ हा मुद्दा स्विस घटनेतल्या कलमाचा आधार देऊन मांडला. यावर मतदान झालं. डॉ. आंबेडकर, हंसा मेहता, राजकुमारी कौर यांनी पाठिंबा दिला. मात्र ५:४ मतांनी या सूचनेचा पराभव झाला. आपल्या समितीच्या कक्षेबाहेरचा हा मुद्दा आहे, हे विरोधकांनी दिलेलं कारण होतं. पुढं १९५४ साली विशेष विवाह कायदा आल्यावर या उणीवेची बरीचशी भरपाई झाली. धर्म न बदलता लग्न करण्याचा मार्ग मोकळा झाला.

या सर्वांनी त्यांच्या काळात जे म्हटलं वा केलं त्यातला हेतू आज गैरलागू झालेला नाही. तथापि, त्यांचे बदलाच्या गतीचे जे होरे होते, ते सगळेच प्रत्यक्षात आले नाहीत. उदा. महिलांना राजकीय आरक्षणाची गरज तेव्हा त्यांना वाटली नाही. स्वबळावर तसेच सहकारी पुरुषांच्या विवेकबुद्धीने महिलांचे न्याय्य राजकीय प्रतिनिधीत्व साकारेल असं त्यांना वाटलं. स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी होऊन गेली. यावर्षी २६ नोव्हेंबर २०२४ रोजी संविधानाच्या मंजुरीची पंच्याहत्तरी पूर्ण होईल. तरीही या पाऊण शतकात महिलांच्या राज्य किंवा केंद्राच्या कायदेमंडळात महिलांची संख्या निम्मी सोडा, पावही झालेली नाही. १९५१ सालच्या पहिल्या लोकसभेत ५ टक्के महिला होत्या. सतराव्या लोकसभेपर्यंत ही संख्या साडे १४ टक्क्यांवर गेली. त्यावेळी ७८ महिला खासदार लोकसभेत होत्या. चालू १८ व्या लोकसभेत त्यांची संख्या ४ ने कमी होऊन ७४ झाली आहे. साहजिकच टक्केवारीही १४ टक्क्यांच्या खाली आली. राज्यांच्या विधानसभेतही महिलांचं सरासरी प्रतिनिधीत्व ९ टक्के इतकं नगण्य आहे. इतर देशांशी तुलना करता ही स्थिती अधिक बोचरी होते. द. आफ्रिकेत ४६ टक्के, इंग्लंडमध्ये ३५ टक्के तर अमेरिकेत २९ टक्के महिला मध्यवर्ती सभागृहात आहेत. म्हणूनच राजकीय पक्षांच्या वा जनतेच्या विवेकबुद्धीवर सोडून भागत नाही. यासाठीच १९९६ साली लोकसभा व विधानसभेत महिलांना ३३ टक्के आरक्षणाचं विधेयक आणलं गेलं. नगण्य अपवाद वगळता राजकारणातील पुरुषी विरोधानं ते गेली २६ वर्षं बाजूला पडलं होतं. मागच्या लोकसभेच्या अखेरीस केंद्र सरकारच्या पुढाकारानं ते मंजूर झालं. मात्र त्याची अंमलबजावणी लगेच होणार नाही. नवी जनगणना आणि मतदारसंघांची फेररचना झाल्यावर हा निर्णय अमलात येईल. यास बराच अवकाश लागू शकतो. अर्थात, दोन तपांहून अधिक काळ अंधारकोठडीत पडलेल्या या मुद्द्याला काही काळानं का होईना प्रकाशाची तिरीप दिसेल हा दिलासा तरी मिळाला.

आज जे वर्तमान आपण पाहतो आहे, ते आपल्या पूर्वसुरींच्या खांद्यावर बसून. त्यांच्या खटपटींमुळेच हे वर्तमान उजाडलं आहे. ते निष्कंटक नाही. त्यात अनेक आव्हानं आहेत. ती पेलण्यासाठी आपल्या आधीच्या पिढ्यांनी काढलेले मार्ग, योजलेले उपाय आपल्याला आज मार्गदर्शक ठरु शकतात. म्हणूनच संविधानसभेतल्या या आपल्या आया, आज्या, मावश्यांच्या आठवणी जागवणं, त्यांचे अनुभव समजून घेणं मोलाचं ठरेल. या अनुभवांतून मिळालेल्या बोधाचा प्रचार-प्रसार करणं आणि त्या विचारप्रकाशात आपण प्रस्थान ठेवणं ही त्यांना खरीखुरी आदरांजलीही असेल.

एक नोंद देणं गरजेचं आहे. या तसेच पुढील सर्व भागांतील माहिती विविध स्रोतांतून घेतली आहे. तथापि, ज्यांचा सर्वाधिक उपयोग झाला अशा दोन पुस्तकांचा साभार उल्लेख करत आहे – १) द फिफ्टीन – लेखक : अँजेलिका अरिबाम आणि आकाश सत्यवली, हॅचेट इंडिया प्रकाशन. २) फाऊंडिंग मदर्स ऑफ द इंडियन रिपब्लिक – लेखक : अच्युत चेतन, केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस प्रकाशन

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

Monday, November 18, 2024

लोकशाहीत विरोधी पक्षाची गरज


जनतेच्या बहुमताच्या कौलाने सरकार बनले की त्याला विनाअडथळा काम करू द्यावे, विरोधकांनी प्रश्न विचारून अडचणी आणू नयेत, असा एक निरागस समज असतो. वास्तविक हा गैरसमज आहे. जनता ही अंतिम सत्ताधारी असे आपण संसदीय लोकशाहीत मानतो. ही जनता कोणा एकाला शत प्रतिशत मत देत नाही. निवडणुकीत उभ्या असलेल्या उमेदवारांत तिची मते विभागली जातात. त्यातल्या ज्याला इतरांच्या तुलनेत एक मत जरी अधिक पडले तरी तो निवडून येतो. याला ‘फर्स्ट पास्ट द पोस्ट’ पद्धत असे म्हणतात. इतरांना त्याच्यापेक्षा कमी मते मिळाल्याने केवळ ३० टक्के किंवा त्याहून कमी मते मिळाली तरी या पद्धतीत उमेदवार विजयी होतो. इथे ७० टक्के किंवा त्याहून अधिक मते वास्तविक त्याच्या विरोधात आहेत. अशा वेळी या ७० टक्के लोकांच्या मताचे मोल काय? दुसरे म्हणजे, जे निवडून येतात त्यांच्यात ज्या पक्ष वा आघाडीचे प्रतिनिधी बहुसंख्य असतात ते सरकार बनवतात. अशा वेळी जनतेनेच निवडून दिलेल्यांपैकी जे प्रतिनिधी विरोधात बसतात, त्यांच्या मताला, पर्यायाने त्यांना निवडून दिलेल्या जनतेला काही महत्त्व आहे की नाही?

निश्चित आहे. म्हणून तर एखादा कायदा करायचा असतो त्या वेळी ज्यांच्याविषयी तो कायदा असतो, त्यांच्याशी विचारविनिमय करून विधेयक बनवायचे असते. हे विधेयक सभागृहात मांडल्यावर सर्व लोकप्रतिनिधींना त्यावर अभ्यास करून मत मांडण्यासाठी काही दिवसांचा अवधी द्यायचा असतो. नंतर त्यावर चर्चा, सहमतीचा प्रयत्न करायचा असतो. ही सहमती नाही झाली तर संसदेतील प्रतिनिधींची सर्वपक्षीय संयुक्त चिकित्सा समिती बनवून तिच्याकडे हे विधेयक सोपवले जाते. या समितीच्या अहवालानंतर पुन्हा सभागृहात चर्चा व मग मतदान होते. बहुमतवाल्या पक्षाचे सरकार असल्याने सरकारी पक्ष या मतदानात विजयी होणार हे उघड आहे. पण हे प्रारंभीच न करता, हा वेळखाऊ उपद्व्याप का केला जातो? ...तर ज्या भारताच्या लोकांसाठी हा कायदा बनणार असतो, त्यातल्या जास्तीत जास्त लोकांची सहमती मिळावी म्हणून.

पण यातला बराचसा भाग सांविधानिक नैतिकतेचा आहे. ज्यांना तांत्रिकदृष्ट्या प्रचंड बहुमत मिळाले आहे आणि जे संसदीय लोकशाहीच्या रक्षणाला नैतिकदृष्ट्याच बांधील नाहीत ते बहुमताच्या जोरावर कोणतीही चर्चा न करता कायदे मंजूर करतात, हे आपण भाजपच्या गेल्या दोन राजवटींत अनुभवले आहे. या १८ व्या लोकसभेत विरोधकांची संख्या वाढली. भाजपला सत्तेसाठी अन्य पक्षांची मदत घ्यावी लागली. म्हणून तर ‘वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक’ संयुक्त संसदीय समितीकडे चर्चेसाठी गेले. याही वेळी भाजपला एकहाती बहुमत असते तर शेतकऱ्यांचे कायदे किंवा अन्य विधेयकांप्रमाणे बहुधा तेही विनाचर्चा मंजूर झाले असते.

केवळ संसदीय संरचना म्हणून नव्हे, तर लोकशाहीच्या रक्षणासाठी विरोधी पक्षांची गरज किती अनिवार्य आहे, हे बहुमतवाल्या पक्षाने तसेच जनतेने घटनात्मक नैतिकता म्हणून आपल्या मनात रुजवणे नितांत गरजेचे आहे. स्वातंत्र्य चळवळीत आणि त्यानंतर संविधान सभेत तसेच पुढेही यावर गंभीरपणे बोलले गेले आहे. त्यातल्या काहींची इथे नोंद घेऊ.

इंग्रजांनी सत्ता राजांकडून घेतली असली तरी स्वतंत्र भारताची सत्ता जनतेलाच सुपूर्द होणार हे स्पष्ट होते. त्यामुळे ही सत्ता काय प्रकारची असेल व त्यासाठी जनतेला कसे सिद्ध करायचे याच्या चर्चा स्वातंत्र्य चळवळीत होत असत. १९२५ साली ‘यंग इंडिया’त महात्मा गांधींनी ‘सत्तेचे नियमन आणि नियंत्रण करण्याची क्षमता वृद्धिंगत करणारे शिक्षण जनतेला देण्याची गरज’ अधोरेखित केली. संविधानसभेत सक्षम विरोधी पक्षाच्या आवश्यकतेविषयी अनेकदा मांडले गेले. नेहरूंनी मांडलेल्या उद्दिष्टांच्या ठरावावर चर्चा करताना १७ डिसेंबर १९४६ रोजी मिनू मसानी म्हणतात, ‘लोकशाहीचा अर्थ एका पक्षाने सर्वंकष सत्ता ताब्यात घेऊन विरोधी पक्षांना दडपणे आणि त्यांना मुक्तपणे काम करू देण्याचे स्वातंत्र्य तसेच समान संधी नाकारणे नव्हे.’ २९ एप्रिल १९४७ रोजी मूलभूत अधिकारांच्या चर्चेत भाग घेताना सोमनाथ लाहिरी या अधिकारांमुळे देशात मुक्त वातावरणाला तसेच राजकीय विरोधकांच्या वाढीला अवसर मिळायला हवा, असे सांगून पुढे त्याची अधिक स्पष्टता करताना म्हणतात - ‘राजकीय विरोधकांना त्यांची मते व्यक्त करण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य हवे. त्यांना त्यांचे स्वत:चे निष्कर्ष काढण्याची मुभा हवी. त्यांच्या बोलण्यावर कोणताही लगाम नको. ‘या सरकारची मला घृणा येते’ हे ते थेट बोलू शकले पाहिजेत. अन्यथा ते विरोधक कसे राहतील? विरोधकांचा आवाज दाबण्यातून लोकशाही विकसित होऊ शकणार नाही.’

झेड. एच. लारी ८ नोव्हेंबर १९४८ रोजी संविधान सभेतल्या चर्चेत विरोधी पक्षनेत्याच्या पदाला घटनात्मक मान्यता देण्याची मागणी करतात. द. आफ्रिका, इंग्लंड तसेच इतरही देशांत अशी मान्यता असून त्यास तिथे पगारही मिळतो, हे निदर्शनास आणून आपल्याकडेही विरोधी पक्षनेत्याला असा पगार दिला जावा, अशी सूचना करतात. ते पुढे म्हणतात - ‘मसुदा समितीच्या दुरुस्त्यांमध्ये राष्ट्रपतींना सल्ला देण्यासाठी नेमलेल्या सल्लागार समितीत विरोधी पक्षनेता या पदाची दखल घेतली गेली आहे. तथापि, हे पद केंद्र आणि राज्यांमध्येही असायला हवे.’ पुढे २० मे १९४९ रोजी मसुदा संविधानाच्या अनुच्छेद ८६ मध्ये विरोधी पक्षनेत्याला पगार देण्याची नोंद असावी, अशी दुरुस्ती ते सुचवतात. टी. टी. कृष्णम्माचारी आणि अनंतशयनम अय्यंगार यांना लारींची विरोधी पक्षनेत्याची गरज तत्त्वत: मान्य होती. मात्र घटनेत त्याची तरतूद करू नये. भविष्यात संसदेने त्याबद्दल कायदा करावा, अशी सूचना ते करतात. डॉ. आंबेडकर या सूचनेशी सहमती व्यक्त करतात. घटनेत हा मुद्दा येत नाही. मात्र पुढे १९७७ साली संसद विरोधी पक्षनेत्याच्या या मुद्द्याबद्दल कायदा करते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संसदीय लोकशाहीच्या यशासाठी आवश्यक बाबींचे संविधान सभेत तसेच अन्यत्र बरेच चिंतन केलेले आढळते. त्यांनी भारतीय जनतेला लिहिलेल्या खुल्या पत्रात याबाबतचे तपशिलात विवेचन आहे. संविधानाच्या घडणीदरम्यान हे सारे विचार त्यांच्या डोक्यात असणार हे लक्षात घेऊन त्यातल्या काहींची नोंद घेणे सयुक्तिक होईल. ते म्हणतात, ‘ज्या प्रश्नावर कायदेमंडळांना निर्णय घ्यायचा असतो, त्या प्रश्नाच्या दोन्ही बाजू लोकांपुढे जाणे जरुरीचे आहे. त्यासाठी ओघानेच दोन पक्षांची आवश्यकता असते. एकच पक्ष दोन्ही बाजू निसर्गत:च मांडू शकत नाही. एकपक्षीय कारभार म्हणजे निव्वळ हुकूमशाही होय. हुकूमशाही टाळण्यासाठी दुसरा पक्ष जरुरीचा आहे. ही मूलभूत बाब आहे.’ लोकशाहीचे महत्त्वाचे अंग म्हणजे अभिव्यक्तिस्वातंत्र्य. त्याच्या रक्षणासाठी विरोधी पक्षाची आवश्यकता बाबासाहेब पुढीलप्रमाणे नमूद करतात - ‘विरोधी पक्ष असतो त्या वेळी भाषणस्वातंत्र्य व आचारस्वातंत्र्य यांचा लाभ होतो. विरोधी पक्ष नसल्यावर लोकांचे हे मूलभूत अधिकार धोक्यात येतात. कारण मग यांची पायमल्ली करणाऱ्या सत्तारूढ पक्षाला जाब विचारायला कोणी नसते.’

माध्यमांची तटस्थता विरोधी पक्षासाठी निकडीची असते. माध्यमे सरकारधार्जिणी कशी बनतात, विरोधी पक्षाच्या टीकेला योग्य स्थान कसे देत नाहीत, याबाबतची खंत नोंदवताना डॉ. आंबेडकर म्हणतात - ‘सत्ताधारी पक्षाला आपल्या धोरणाचे व राज्यकारभाराचे समर्थन आणि त्या पक्षात नसलेल्या लोकांच्या शंकांचे निरसन सततपणे करावे लागते. दुर्दैवाने आपल्या देशातील बहुतेक वर्तमानपत्रे, सरकारी जाहिरातीच्या उत्पन्नासाठी म्हणा किंवा अन्य कारणासाठी म्हणा, सरकारी पक्षाला उचलून धरतात. ...सत्तारूढ पक्षाच्या सदस्यांनी केलेल्या भाषणांची इतिवृत्ते रकानेच्या रकाने भरून ही वृत्तपत्रे प्रसिद्ध करतात. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केलेली भाषणे अगदी त्रोटकपणे शेवटच्या पानावर कोठेतरी छापली जातात.’

बाबासाहेबांची ही निरीक्षणे ७० वर्षांपूर्वीची आहेत. आजची स्थिती पाहता ती काहीच गंभीर वाटणार नाहीत. आज माध्यमांनी याबाबतची अवनत अवस्था गाठली आहे. अलीकडे तर त्यासाठी ‘गोदी मीडिया’ ही संज्ञाच प्रचलित झालेली आहे. अशा काळात संसदीय लोकशाहीच्या रक्षणासाठी विरोधी पक्षाचा अवकाश जपणे आणि तो अधिक अर्थपूर्ण होणे जास्तच निकडीचे आहे.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com 

(लोकसत्ता, १३ नोव्हेंबर २०२४)

फडणवीस, तुमचे पूर्वसुरी बरेच प्रामाणिक होते म्हणायचे!


राहुल गांधींनी सभेत दाखवलेल्या संविधानाच्या लाल रंगावरुन अर्बन नक्षलींशी त्यांचा संबंध जोडण्याचा देवेंद्र फडणवीसांनी अगदीच केविलवाणा प्रयत्न केला. कारण हे लाल रंगाचे संविधान खुद्द नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याही हातात असल्याचे फोटो आहेत. EBC प्रकाशनाने काढलेली ही लाल मुखपृष्ठाची छोटेखानी संविधानाची प्रत (पॉकेट बुक) बऱ्याच वर्षांपासून प्रचलित आहे. कायदा, संविधान या क्षेत्रांशी संबंधित लोक सहज हाताळता यावी, म्हणून ही प्रत जवळ बाळगत असतात. देवेंद्र फडणवीसांनी विशेष गुणवत्तेसह कायद्यात पदवी घेतली असतानाही त्यांना याची माहिती नसावी, हे पटत नाही. म्हणजेच ते खोटे बोलत आहेत. मुद्दाम खोटे बोलत आहेत. भ्रम पसरवण्यासाठी ओढूनताणून राहुल गांधींचा नक्षलवाद्यांशी संबंध जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. संविधानाचा अपमान केल्याची आवई उठवून बाबासाहेबांना मानणाऱ्या जनतेला आपल्याकडे वळवण्याचा अश्लाघ्य व निष्फळ प्रयत्न करत आहेत. वास्तविक फडणवीस आणि त्यांच्या भाजप-संघपरिवारालाच आजचे हे संविधान मुळापासून बदलायचे आहे आणि लोकशाहीविरोधी हिंदू राष्ट्र आणायचे आहे, हे उघड आहे. भाजपशी संबंधित लोक मधून मधून हे बोलतही असतात. पण अधिकृत भूमिका म्हणून तसे थेट बोलणे आज विविध कारणांनी सोयीचे नसल्याने आणि नुकताच लोकसभा निवडणुकांत संविधानाच्या नावाने फटका खाल्ल्याने फडणवीस तसेच भाजपचे बडे नेते ते बोलत नाहीत. त्याऐवजी आम्हीच संविधानाचे रक्षक असल्याचा आणि विरोधकच संविधान बदलू पाहत आहेत, असा उलटा कांगावा ते करत आहेत.
फडणवीसांचे पूर्वसुरी बरेच प्रामाणिक होते म्हणायचे. त्यांनी आपला संविधानाला, तिरंग्याला असलेला विरोध जाहीरपणे मांडला आहे. उदाहरणार्थ हे काही नमुने :
.....
‘या संविधानाबाबतची सर्वात वाईट गोष्ट म्हणजे यात काहीही भारतीय नाही. …यात प्राचीन भारतीय सांविधानिक नियम, संस्था, संज्ञा, परिभाषा यांचा मागमूसही नाही. …प्राचीन भारतातील अतुल्य अशा सांविधानिक विकासक्रमांचा यात उल्लेख नाही. स्पार्टाचा लायकर्गस किंवा पर्शियाचा सोलोन यांच्या कितीतरी आधी मनूचे नियम लिहिले गेले आहेत. आजही मनुस्मृतीतले हे नियम जगात प्रशंसिले जातात आणि भारतीय हिंदूंना उत्स्फूर्तपणे त्यांच्या अनुपालनास व अनुसरणास उद्युक्त करतात. पण आपल्या घटना पंडितांच्या दृष्टीने त्यांस काहीही मोल नाही.’ (ऑर्गनायझर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र, ३० नोव्हेंबर १९४९)
म्हणजेच या लोकांना बाबासाहेब आंबेडकरांची नव्हे, तर मनुस्मृतीची घटना हवी आहे.
.....
घटना समितीत तिरंग्याचा निर्णय झाल्यावर आपल्या 'ऑर्गनायझर' या मुखपत्राच्या १४ ऑगस्ट १९४७ च्या संपादकीयात संघाने आपला अभिप्राय नोंदवला होताः 'जे लोक नशिबाने सत्तेवर आले आहेत, ते भलेही आपल्या हाती तिरंगा सोपवतील; पण हिंदू त्याचा ना कधी सन्मान करतील ना कधी त्याला स्वीकारतील. ३ हा आकडा मूळातच अशुभ आहे आणि ज्या ध्वजात ३ रंग आहेत, तो खूप वाईट मानसशास्त्रीय परिणाम घडवेल आणि देशाला नुकसानकारक ठरेल.'

हे म्हणणारे लोकच आज तिरंगा यात्रा काढतात. अजब आहे.
.....
जे हिंदू कोड बिल मंजूर झाले नाही म्हणू डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, त्या हिंदू कोड बिलाचा संघ विरोधक होता. त्यांचे म्हणणे पहा - “या सुधारणांत काहीही भारतीय नाही. विवाह व घटस्फोटाच्या प्रश्नांची सोडवणूक अमेरिका आणि ब्रिटिश नमुन्यांप्रमाणे आपल्या देशात होऊ शकत नाही. हिंदू संस्कृतीप्रमाणे विवाह हा संस्कार आहे. तो मृत्युनंतरही बदलता येत नाही. केव्हाही बदलावा असा तो ‘करार’ नाही.” गोळवलकर पुढे म्हणतात, “अर्थात, देशातील काही भागात हिंदू समाजातल्या काही खालच्या जातींत घटस्फोटाला मान्यता आहे व रीतीप्रमाणे त्यांच्यात घटस्फोट होतातही. पण त्यांची ही रीत आदर्श मानून सर्वांनी तिचे अनुकरण करावे असे होऊ शकत नाही.” (ऑर्गनायझर, ६ सप्टेंबर १९४९)
खालच्या-वरच्या जातींचे भेद नमूद करुन वरच्या जातींच्या रीती-प्रथाच हिंदू धर्मात प्रमाण असणार हे त्यांनी जाहीर केले आहे. आपसातील हेव्यादाव्यांमुळे भाजपकडे कललेल्या हिंदूंतील कथित तळच्या जातींनी हे नीट लक्षात घ्यायला हवे. हिंदू राष्ट्र नक्की कोणाचे हे त्यातून त्यांच्या लक्षात येईल.
पुढच्या एका संपादकीयात ऑर्गनायझरने या बिलाचा कठोर निषेध केला आहे. आंबेडकर व नेहरु हे या बिलाचे शिल्पकार आहेत म्हणून त्यांचा ‘ऋषी आंबेडकर व महर्षी नेहरु’ असा उपहासही केला आहे.
.....
राज्य पुनर्रचना आयोगाच्या अहवालाच्या निमित्ताने १९५६ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन सरसंघचालक गोळवलकर गुरुजी एक लेख लिहितात. त्यात त्यांनी भारताच्या संघराज्य पद्धतीवर टीका करुन एकात्मिक राजवटीचा पुरस्कार केला. त्यासाठी आजचे संविधान बदलण्याची ते सूचना करतात. ती अशी - '...आपण संविधानातील सांघिक रचनेची चर्चा कायमची बंद करायला हवी. भारताच्या अंतर्गत असलेल्या अनेक स्वायत्त अथवा अर्धस्वायत्त राज्यांचे अस्तित्व संपवायला हवे आणि एक देश, एक शासन, एक विधिमंडळ, एक कार्यपालिका घोषित करायला हवी. संविधानाची फेरतपासणी आणि पुनर्लेखन व्हायला हवे.'
.....
....या पाताळयंत्री मंडळींचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न कधीही प्रत्यक्षात येता कामा नये व का त्याबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर कटाक्षाने नमूद करतात – ‘'हिंदू राष्ट्र जर खरोखर प्रत्यक्षात आले तर देशासाठी ते एक भयानक संकट असेल यात काही शंका नाही. कारण या हिंदू राष्ट्रामुळे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता धोक्यात येईल. याप्रकारे लोकशाहीशी त्याचा मेळ बसत नाही. वाटेल ती किंमत देऊन हिंदू राष्ट्राला रोखले पाहिजे.' (पाकिस्तान अथवा भारताची फाळणी, १९४६, पान ३५८)
देश कसा आणि कोणत्या मूल्यांवर चालणार याची पायाभूत सूत्रे संविधानात आहेत. त्यात प्रगतीशील बदल काय व्हायला हवे, यावर चर्चा जरुर व्हावी. पण ते मागे नेण्याचे प्रयत्न कदापि सहन करता कामा नये. भाजपची केंद्रात किंवा राज्यात कोठेही ताकद वाढणे म्हणजे संविधानावर टांगती तलवार असणे हे लक्षात घ्यायला हवे.
भाजप आणि संघपरिवाराच्या भूलभुलैयात अडकू नका. आपण स्वार्थापोटी किंवा स्वायत्त राजकारणापोटी स्वतंत्र उभे राहिलेल्यांना मतदान करुन मतांच्या विभागणीतून कळत नकळत भाजपला मदतनीस होता कामा नये. लोकसभेत त्यांचा निर्णायक पराभव जरी झाला नाही, तरी त्यांचा सुसाट वारु आपण बऱ्याच प्रमाणात रोखू शकलो. महाराष्ट्रात या विधानसभेत त्यांना पूर्ण पराभूत करायचे आहे. निवडणुकांत ही मंडळी वाट्टेल त्या थराला जाऊन आपल्या मतांची फोडाफोडी करणार आहेत. त्यापासून सावध राहून एकही मत वाया जाऊ न देता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना तसेच अन्य मित्रपक्षांच्या महाविकास आघाडीलाच मते जातील याची खात्री आणि दक्षता बाळगण्याची गरज आहे.
महाविकास आघाडीच्या घटक पक्षांविषयी, त्यातल्या नेत्यांविषयी आपल्या अनेक रास्त तक्रारी असू शकतात. त्याबद्दलचा संघर्ष पुढे राहीलच. पण काँग्रेसच्या शासनकाळात लोकशाही अधिकारांचा आग्रह धरुन झगडता येत होते, हे आठवा. भाजपच्या सत्तेचे दोन कालखंड आपण पाहिलेत. त्यांच्या काळात घटनात्मक मार्गांनी संघर्ष करणाऱ्यांना, अभिव्यक्ती स्वातंत्र्य बजावणाऱ्यांना काय रीतीने दडपले जाते, तुरुंगात टाकले जाते, अर्बन नक्षली ठरवले जाते, संपवले जाते हे आपण अनुभवले आहे.
म्हणूनच संविधानाचा मार्ग शाबूत ठेवायला आज संविधानाच्या मार्गाने यांना हरवा.
- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com