Sunday, March 1, 2020

CAA विरोधी लढ्यातली आव्हाने


'आंदोलन' मधील माझ्या मासिक सदरासाठीचा हा लेख आता छापून आला असला तरी प्रत्यक्षात तो दिल्ली दंगलीच्या आधी लिहिलेला आहे. त्यामुळे ते संदर्भ या लेखात आढळणार नाहीत.
____________

सुधारित नागरिकत्व कायदा (CAA), राष्ट्रीय लोसंख्या नोंदणी (NPR) व राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (NRC) यांच्या विरोधातील तसेच काही बाजूने झालेल्या देशभरच्या आंदोलनांनी प्रसार माध्यमांचा मोठा भाग बराच काळ काबीज केला आहे. सरकारकडून विरोधातली आंदोलने चेपण्यासाठी पोलिसी बळाचा, अत्याचाराचा, प्रक्षोभक भाषेचा बेछूट वापर झाला. होतो आहे. पण त्याने न दबता ही आंदोलने पुन्हा पुन्हा उसळी घेत आहेत. दिल्लीतील शाहीन बाग व त्यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबई बागसारखी मुस्लिम महिलांची ठिय्या आंदोलने प्रचंड चिवटपणे सुरु आहेत. मुख्यतः मुस्लिम, त्यांना पाठिंबा देणारे काही सुटे पुरोगामी, भाजपविरोधी राजकीय पक्ष, मोठ्या शहरांतले सर्वधर्मीय उच्चशिक्षित, उच्चस्तरीय विद्यार्थी या आंदोलनांचे आधार आहेत. काही राज्य सरकारांनी CAA, NPR, NRC अमलात न आणण्याचे ठरावही त्यांच्या विधानसभांत केले आहेत. आंदोलक व सरकार दोहोंपैकी कोणीही मागे हटायला तयार नाहीत. लोकशाहीची बूज राखून विरोधकांशी संवाद करण्याचे काहीच चिन्ह केंद्र सरकारकडून दिसत नाही. उलट दबंगपणे ते पुढचे पुढचे निर्णय जाहीर करत निघाले आहे. या आंदोलनातील घटकांचा चिवटपणा, जिद्द याला तोड नाही. पण सरकारला भारी पडण्याइतकी त्याची ताकद राहील का, हा प्रश्न आहे. कारण बहुसंख्य समाजविभाग या आंदोलनापासून अजून दूरच आहेत. एकतर सरकार चालवणाऱ्या पक्षाच्या विचारप्रभावाखाली ते आहेत किंवा त्यातल्या अनेकांपर्यंत हा प्रश्न व्यवस्थित पोहोचलेलाच नाही. आंदोलकांतही सक्षम नेतृत्व, लढ्याचे तातडीचे व लांब पल्ल्याचे डावपेच यांत बराच उणेपणा आहे. अशावेळी या आंदोलनातील सहभागींनी या आंदोलनापुढील आव्हानांची नोंद व चिकित्सा करणे गरजेचे आहे. या लेखात मी माझ्यापरीने तसा प्रयत्न करत आहे. 

भारताच्या धर्मनिरपेक्षतेची घडण

या आंदोलनातील एक मोठे आव्हान म्हणजे भारतातील आजच्या पिढीचा भारताच्या धर्मनिरपेक्ष घडणीविषयीचा अपुरा समज. सर्व समाजालाच त्याविषयी नीट समजावून सांगावे लागणार आहे. 

गांधीजी स्वतःला सनातनी हिंदू म्हणवत. पण देवळात न जाता सर्वधर्मीय प्रार्थना करत. पाकिस्तान धर्मावर आधारित तयार होताना, या सनातनी हिंदूने ‘भारत हा केवळ बहुसंख्याक हिंदूंचा नव्हे, तर सर्व भारतवासीयांचा-मग ते कोणत्याही धर्माचे असोत’ हे प्राणपणाने सांगितले. ...त्यासाठी प्राणही दिले. या सनातनी हिंदूची ही धर्मनिरपेक्षता न मानवणाऱ्या एका हिंदूनेच त्यांचा प्राण घेतला. 

देशाची घटना लिहिण्याचे काम सुरु झाले, त्यावेळी देशाला स्वातंत्र्य नक्की कधी मिळणार हे ठाऊक नव्हते. हे काम चालू असतानाच देश स्वतंत्र झाला. फाळणी झाली. दोन देश तयार झाले. या पार्श्वभूमीवर घटना समितीत अल्पसंख्याकांबाबत काय तरतुदी करावयाच्या याची चर्चा सुरु झाली. हिंदू महासभेचे एक सदस्य उठून म्हणाले, “आधी पाकिस्तान त्यांच्या देशातील अल्पसंख्याकांबद्दल काय धोरण घेते ते पाहू. मग आपले ठरवू.” बाबासाहेब ताडकन उठले आणि म्हणाले- “आपण एक स्वतंत्र देश आहोत. आपल्या देशातील अल्पसंख्याकांबाबतचे धोरण पाकिस्तान तिथल्या अल्पसंख्याकांबाबत काय धोरण घेते त्यावर अवलंबून असणार नाही.” पुढे ते असेही म्हणाले, “तेथील अल्पसंख्याकांबद्दलच्या पाकिस्तानच्या व्यवहाराबाबतचा तोडगा हा राजकीय शिष्टाईचा भाग आहे.” 

जिनांनी धर्मावर आधारित पाकिस्तान करण्याची मागणी लावून धरली. ती मिळवली. याला मौलाना अबुल कलाम आझादांसारख्या मुस्लिम नेत्यांचा पूर्ण विरोध होता. ज्यांना जिनांची भूमिका मान्य होती असे किंवा वेगवेगळ्या कारणांनी अपरिहार्यता असलेले मुसलमान पाकिस्तानला गेले. बहुसंख्य मुसलमान इथेच राहिले. त्यांचा देश इतर भारतवासीयांप्रमाणे भारतच आहे. पाकिस्तान धर्माच्या आधारावर झाला, पण घटना समितीत भारत सेक्युलर असणार हे फाळणी आधीच ठरले होते. त्याची सेक्युलर ही भूमिका फाळणीमुळे बदलण्याचा प्रश्न नव्हता. 

हे सेक्युलरपण जपण्याचे, जोपासण्याचे काम पंतप्रधान नेहरुंनी पुढे १७ वर्षे म्हणजेच मरेपर्यंत केले. खुद्द राष्ट्रपती राजेंद्र प्रसादांना त्यांनी सोमनाथच्या मूर्तिप्रतिष्ठापनेत सहभागी न होण्याची पत्र लिहून विनंती केली. सरकारमधील माणसांना वैयक्तिक आस्थेचा अधिकार असला तरी सरकारी पदावर असताना अशा धार्मिक कार्यक्रमांतील सहभाग बरोबर नाही. राष्ट्रपतींसारख्यांच्या अशा कृतीतून चुकीची वहिवाट तयार होईल, ही त्यांची चिंता होती. राजेंद्र प्रसादांनी त्यांचे म्हणणे ऐकले नाही. त्यांचीही काही भूमिका होती. मात्र पुढे ही वहिवाट झाली. नेहरुंची भीती खरी ठरली. 

हिंदू कोड बिलाच्यावेळी आंबेडकर व नेहरु दोघांनाही कर्मठ हिंदूंकडून शिव्याशाप मिळत होते. काँग्रेस अंतर्गतही राजेंद्र प्रसादांसारख्यांचा विरोध होता. हिंदू महासभेच्या नेत्याने तर ‘अशा सुधारणा हिंदूंतच का, मुसलमानांत का करत नाही?’ असे सभागृहातच विचारले. नेहरुंचे उत्तर होते – ज्यांच्यात शक्य आहे त्यांच्यात सुधारणा करत आहोत. नुकतीच फाळणी झाली आहे. मुस्लिमांच्या मनात एक प्रकारची असुरक्षितता आहे. अशावेळी या सुधारणा करणे शक्य नाही. 

हा धागा सुटल्याचे परिणाम 

पुढे काँग्रेसचा हा धागा सुटला. नेहरुंप्रमाणे इंदिरा गांधीही हिंदू कट्टपंथीयांच्या पूर्ण विरोधात व धर्मनिरपेक्षतेच्या ठाम बाजूने होत्या. पण पक्ष व देशांतर्गत अस्वस्थतेच्या चक्रात मुस्लिमांतल्या सुधारणा हे त्यांचे व्यवधान राहिले नाही. राजीव गांधींच्या भूमिकेबद्दलही अशी शंका नसली तरी प्रत्यक्ष व्यवहारातले झोक (शहाबानो व अयोध्येतील बाबरी मशिदीत ठेवलेल्या राममूर्तीचे टाळे उघडणे) हिंदू-मुस्लिम दोहोंकडच्या प्रतिगाम्यांच्या पथ्यावर पडले. यथावकाश मशिदीवर भोंगे लागले. 

बिगर काँग्रेसी लोकशाहीवादी सरकारांच्या काळातही हे लांगूलचालन चालू राहिले. उमेदवारांच्या याद्या इमाम बुखारीला दाखवून मान्यता घेण्याच्या व्ही.पी. सिंगांच्या व्यवहाराचे समर्थन ‘राजकीय अपरिहार्यता’ म्हणून पुरोगामी समाजवाद्यांनी केलेले आहे. व्ही. पी. सिंगांचे सरकार तर एका बाजूने डाव्यांच्या आणि दुसऱ्या बाजूने भाजपच्या पाठिंब्यावर टिकले होते. त्याआधीचा जनसंघासहितचा केंद्रातला जनता पार्टीचा आणि महाराष्ट्रातला पुलोद प्रयोग आपण जाणतोच. गैरकाँग्रेसवादाच्या धोरणापायी झालेली ही सबगोलंकारी एकजूट भाजपला वाढायला मदतनीस ठरली. उजव्या शक्तींना तिने ताकद दिली. 

बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या राजकीय-सामाजिक लढाईत कधीही जाती-धर्माच्या बेरजांचे डावपेच अवलंबले नाहीत. त्यांनी केलेल्या जुटी तत्त्वाधारित होत्या. त्यांच्या अनुयायांतल्या काहींनी मात्र दलित मुक्तीसाठी दलित-मुस्लिम एकजूट प्रचारली. ही एकजूट दोहोंकडच्या शोषितांची नव्हती अथवा मुस्लिमांतल्या सुधारणावाद्यांना दिलेली ती साथ नव्हती. सुधारणांना विरोध असणाऱ्या कर्मठ मुस्लिमांशी ही दोस्ती होती. 

बहुसंख्य सामान्य मुस्लिमाचे काहीही हित साधल्या न गेलेल्या या दोस्ती, अपरिहार्यतांनी हिंदू कट्टरपंथीयांना ताकद मिळाली. स्वातंत्र्य चळवळ व सामाजिक सुधारणांची चळवळ या दोहोंतून विकसित झालेले, पुढे घटनेत पायाभूत महत्व पावलेले आणि नेहरुंनी दीर्घकाळ जोपासलेले धर्मनिरपेक्षतेचे मूल्य जायबंदी झाले. 

आमच्या या ढिल्या व्यवहाराने आणि हिंदू कट्टरपंथीयांच्या नित्याच्या खऱ्याखोट्या मजबूत प्रचाराने बहुजातीय बहुसंख्य हिंदू समाज मुस्लिमांप्रति विषाक्त बनू लागला. आम्हाला कायम गृहीत धरतात, शहाणपणा आम्हालाच शिकवतात, फक्त आमच्याच देवा-धर्मावर टीका करतात, मुस्लिमांतल्या गैरबाबींबाबत मूग गिळून बसतात या भावनेची मनावरची पुटं जाड होत गेली. 

गंगा जल फिरवून, विटा गोळा करुन हिंदू कट्टरपंथीयांनी बाबरी मशीद उद्ध्वस्त केली. दंगली झाल्या. मनाबरोबरच हिंदू-मुस्लिमांच्या वस्त्यांचेही ध्रुवीकरण झाले. बुरखा, हिजाब, तोकडे पायजमे, दाढ्या, टोप्या वाढू लागले. 

ब्रिटिशांच्या विरोधात न लढलेल्यांचे, प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष त्यांना पाठिंबा दिलेल्यांचे, एकेकाळी वळचणीला टाकले गेलेले वंशज राजकीय सत्तासोपान पायरी दर पायरी चढत आज राक्षसी बहुमताने सत्तेवर आले आहेत. अनेक कथित पुरोगामी, आंबेडकरी, समाजवादी त्यांचे सालगडी झालेले आहेत. 

....या सगळ्याच्या परिणामी आज बहुसंख्य हिंदू मुस्लिमद्वेषी झाला आहे. आंबेडकरी विभागातही हा मुस्लिमद्वेष प्रचंड आहे. CAA विरोधी आंदोलनात तिरंगा, संविधान व आंबेडकर-गांधींच्या प्रतिमा घेऊन उतरण्याचा नवा व स्वागतार्ह पायंडा मुस्लिम समाजात पडला आहे. पण त्यामुळे लगेच या मुस्लिमद्वेषाला उतार पडेल, असे नाही. 

आज CAA, NPR व NRC हा मुद्दा केवळ मुस्लिमांचा आहे, हीच भावना बहुसंख्याक हिंदूंच्या मनात आहे. आंबेडकरी समूहही त्याला अपवाद नाही. तो तसा जात्याच लोकशाहीविरोधी हिंदूराष्ट्राच्या विरोधात आहे. पण CAA च्या मार्फत हिंदू राष्ट्राचे आगमन होते आहे, हे त्याला आकळत नाही. या मुद्दयांवर प्रबोधन करण्याचे प्रयत्न एकतर होत नाहीत. जे होतात ते खूपच तोकडे आहेत. 

मुस्लिमांतही या मुद्द्यांची नीट स्पष्टता आहे असे नाही. ‘CAA ला भारतीय मुस्लिम का विरोध करतात ते मला कळत नाही’ या राज ठाकरेंच्या प्रश्नाला मुस्लिम आंदोलनातील अनेक लोकही नीट उत्तर देऊ शकणार नाहीत. मात्र मुस्लिमांना या कायद्याच्या तपशिलाची गरज नाही. त्यांना त्याचे मर्म कळले आहे. हे मर्म आहे मुस्लिमांना दुय्यम नागरिक बनवण्याचे. मोदी सत्तेत आल्यापासून त्यांनी जे अनुभवले आहे, त्यातून त्यांचे हे मर्म पक्के झाले आहे. आपल्या या देशातील स्वतंत्र, बरोबरीच्या अस्तित्वावरच घाला आहे, हे त्यांना कळून चुकले आहे. म्हणूनच ते आज CAA च्या विरोधात प्राणपणाने लढत आहेत. 

हा लढा आपलाही आहे, देशाची पायाभूत मूल्ये टिकवण्याचा, संविधान वाचवण्याचा मुद्दा आहे, ही भावना बहुसंख्याक समाजातील काही व्यक्तींची आहे. सुट्या सुट्या लोकांची आहे. सबंध समाजापर्यंत ती पोहोचविणारे अधिकारी नेतृत्व आज नाही. 

देशातल्या प्रमुख शहरांतल्या विद्यापीठांतील विद्यार्थ्यांचा या लढ्याला जोरदार पाठिंबा आहे. ते अधिकतर उच्चवर्णीय, उच्चस्तरीय तसेच पुरोगामी चळवळींशी संबंधित विद्यार्थी आहेत. स्वतंत्र अवकाशाची चव चाखलेल्या या विद्यार्थ्यांना निदर्शने केली म्हणून पोलीस कॅम्पसमध्ये घुसून बेदम मारतात हे कल्पनेच्या पलीकडे अवमानकारक वाटले आहे. त्यांच्या लढ्याला त्यामुळे एक विलक्षण धार आहे. आधुनिक मूल्यांची त्यांची समजही दांडगी आहे. 

आंदोलनापासून बहुसंख्य अलिप्त

मात्र यांच्या पलीकडचे सामान्य थरातील, छोट्या शहरांतील महाविद्यालयीन विद्यार्थी अजूनही अलिप्त आहेत. खुद्द मुंबईत गेटवेला आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांत काही ठरावीक शिक्षणसंस्थांतीलच विद्यार्थी होते. सर्व महाविद्यालयांतील विद्यार्थी अथवा सामान्य थरांतील विद्यार्थी यात दिसत नव्हते. त्यांच्याशी बोलल्यावर त्यातल्या अनेकांना हे नक्की काय चालले आहे, हे ठाऊक नसल्याचे जाणवते. तर अनेकांच्या मनात तोच समाजात असलेला मुस्लिमद्वेषाचा फुत्कार आढळतो. हे विद्यार्थी बहुसंख्य आहेत. आंदोलनात जाणीवेने व जिगरीने उतरलेले विद्यार्थी अल्प आहेत. 

दिल्लीच्या शाहीन बागेच्या धर्तीवर नागपाड्याला चाललेले मुंबई बाग आंदोलन केवळ मुस्लिम महिलांचे राहू नये, अन्य समाजातील महिलांनी त्यात सहभागी व्हावे, याला तसा प्रतिसाद मिळत नाही. पुरोगामी, आंबेडकरी, डावे कार्यकर्ते व्यक्तिगत पातळीवर मधूनमधून भेटी देत असतात. भाषणे करत असतात. पण त्यांच्या संघटनांतले लोक अथवा त्यांच्या समाजातील लोक या महिलांसोबत येऊन बसत आहेत, असे चित्र दिसत नाही. यातले काही प्रयत्न करत असतात. पण त्यांच्या संघटनांतून विरोध नसला तरी पाठिंबा मिळत नाही. काहीतरी आपपरभाव तिथे आहे हे नक्की. 

बहुसंख्याक समाजाला CAA द्वारे केवळ मुस्लिमांना वगळणे हा आपल्या देशाच्या सेक्युलॅरिझमच्या मूलाधारावर आघात आहे, हे कळत नाही. पटत नाही. सावरकर काय म्हणाले हे यातील सगळ्यांना सांगता येणार नाही. पण त्यांचे पितृभू, पुण्यभू हे भारतीयत्वाचे निकष त्यांना आतून पटतात. हिंदूंना त्यांच्याच देशात अधिकार नाही मिळणार तर कुठे, ही भावना त्यांच्यात प्रबळ आहे. कोणी कोणाला मारु नये हे पटते. सगळ्यांनी गुण्यागोविंदाने पण आपापल्या मापात राहावे ही त्यांची इच्छा असते. म्हणजेच घटनेतल्या समतेऐवजी संघाची समरसता अधिक भावते. 

सामाजिक व आर्थिक दुबळ्यांवर NRC आघात करणार असे आम्ही दलित, भटक्या, आदिवासी समूहांत प्रचारतो. त्यांना आसाममध्ये काय झाले, ते वर्णन करुन सांगतो. आमच्यावर विश्वास ठेवून, यांच्या म्हणण्यात काही तथ्य असेल म्हणून यातले काही आमच्या आंदोलनात येतात. पण आसाममध्ये नक्की काय झाले याचा प्रत्यक्ष अनुभव त्यांना नाही. बरे आसामप्रमाणेच इथे होईल कशावरुन? NRC देशभर कधी व कसे करणार हे कुठे सरकारने जाहीर केले आहे. आसामप्रमाणे करतील असे आमचे अनुमान आहे. आसाममधील अनुभवातून तेही शिकणारच की! 

कागदाविना गरिबाचे अडते

अमित शहांनी CAA ची क्रोनॉलॉजी सांगितल्यानंतर कागदाच्या शोधासाठी अनेक मुस्लिम गरीब आणि काही अन्य समाजातल्या मजूर, कारागिरांनीही कागद मिळवण्यासाठी आपल्या गावच्या तसेच सरकारी कार्यालयांच्या चकरा सुरु केल्या आहेत. सरकारी कार्यालयांतील या कामांची गर्दी वाढू लागल्याचे आकडे येऊ लागले आहेत. आता हे कागद सरळ नाही मिळाले तर पैसे देऊन मिळवले जाणार. 

CAA, NPR, NRC विरोधातील आमच्या आंदोलनात एक घोषणा दिली जाते - ‘कागज नहीं दिखाएंगे!’ 

मला प्रश्न पडतो, आमचे हे म्हणणे ऐकणार कोण? 

घोषणेला प्रतिसाद देणारे लोक तरी त्याप्रमाणे वागतील का? वागू शकतील का? ...मला शंका आहे. 

ज्यांच्याकडे विविध प्रकारचे कागद आहेत, असे काही निवडक शिक्षित मध्यवर्गीय कार्यकर्ते जरुर ऐकतील. एकटे पडले तरी लढतील. त्यांचा विवेक ते शाबूत ठेवतील. फेसबुकवर त्यांच्या या एकाकी झगडण्याच्या कहाण्या नोंदवत राहतील. त्यांच्या या झुंजीला माझा सलाम राहील. पण चळवळीत सहभागी सामान्य माणसे असे करतील वा करु शकतील असे वाटत नाही. 

कागदाविना गरिबाचे खरोखर अडते. त्याला कोणी गणतीत धरत नाही. त्याला प्रायव्हसीच्या अधिकारापेक्षा माझी गणना करा ही मुख्य गरज वाटते. विविध योजनांसाठी, पोलिसांसाठी, जगण्यासाठी, मी रहिवाशी आहे, मी अस्तित्वात आहे यासाठीच्या पुराव्यासाठी त्याला ही गणना हवी असते. ‘आधार’ वेळी हेच झाले. काही डाव्या पुरोगाम्यांनी आधार नको, तो आमच्या खाजगीपणावर आघात आहे, सरकार या माहितीचा उपयोग आपल्या विरोधात करेल वगैरे प्रचार केला. या प्रचाराचा या गोरगरीब समूहावर काही परिणाम झाला नाही. त्याने लायनी लावून आधार मिळवले. 

अशावेळी NPR होईल तेव्हा माहिती देऊ नका, हे आवाहन कितपत ऐकले जाईल ही शंका आहे. मे महिन्यात आपल्याकडे ही पाहणी सुरु होईल. शिवाय ती जनगणनेच्या पहिल्या टप्प्यासोबत म्हणजे घर मोजणीसोबत होईल. जनगणना तर गरजेची आहे. ती करु नये असे आपण म्हणणार नाही. शिवाय त्यासाठीची माहिती देणे आपल्यावर कायद्याने बंधनकारक आहे. जनगणनेच्या माहितीबरोबर NPR ची माहिती घेतली जाईल त्यावेळी या दोहोंतला फरक सामान्यांना कळणार कसा? नोंदणी करणाऱ्यांनी हा फरक सांगावा, असे आपण म्हणू. पण प्रत्यक्षात तसे होणार नाही, हे आपल्यालाही कळते. 

NPR मधून बहुसंख्य लोक (त्यात दलित, पीडित, गरीब विभाग, मुस्लिम आले) सहीसलामत पुढच्या टप्प्यावर जाणार आहेत. जनगणना आणि NPR करतेवेळी कागद मागितलाच जाणार नाही. म्हणजे कागद नहीं दिखाएंगेची अंमलबजावणी करण्याचा या टप्प्यावर प्रश्नच येणार नाही. संशयित म्हणून जे अडकतील ते लायनीत स्वतःला सिद्ध करायला उभे राहतील. त्यावेळी कागद लागतील. जे लटकतील ते अल्प असतील. त्यांची धाकधूक ‘कोणताही कागद देतो, पण मला सोडवा’ अशी राहील की बाणेदारपणे ते म्हणतील- काहीही होवो. कागज नहीं दिखाएंगे! 

अशावेळी ‘कागज नहीं दिखाएंगे’ हे आपले मध्यवर्गीय कार्यकर्त्यांचे एकाकी चित्कार राहण्याचीच शक्यता अधिक आहे. मध्यमवर्गातले जाणते लोक बाणेदारपणे ‘काहीही होवो’ला तयार राहतील. ‘आधार’ न काढता यातले काही लोक अजूनही टिकून आहेतच. अर्थात त्यांचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी त्यांच्याकडे अन्य कागद आहेत. शिवाय त्यांच्याकडे कायदेशीर लढाईची ताकदही आहे. 

राज्याने अंमलबजावणीस नकार देण्यासाठी प्रयत्न 

आपले CAA विरोधी आंदोलन बहुसंख्य समाज ढवळून निघण्याच्या अवस्थेत आलेले नाही. त्यासाठीचे व्यापक संघटनही आज आपले नाही. सुट्या मंडळींची प्रसंगोपात आघाडी आपण करत असतो. त्या आघाडीतही समाजाच्या विविध सोडा, केवळ गरीब समूहांच्यापर्यंतही पोहोचण्याची क्षमता नाही. 

राहिला आधार लोकशाहीवादी भाजपविरोधी पक्षांचा. त्यांच्यातही माहितीची निरक्षरता प्रचंड आहे. अल्पसंख्याकांच्या मुद्द्यावर तत्त्वाचा प्रश्न म्हणून अजिबात तडजोड न करणारे आंबेडकर, नेहरू या पक्षांत आज नाहीत. पण तरीही ते राजकीय पक्ष असल्याने त्यांची हालचाल बिगर राजकीय संघटनांच्या प्रमाणात अधिक परिणामकारक ठरते. CAA, NPR, NRC न राबवण्याचे ठराव काही राज्यांनी केले आहेत. त्याला नक्कीच मोल आहे. या बाबी राज्य सरकारांच्या सहकार्याशिवाय करायच्या तर केवळ केंद्र सरकारच्या अखत्यारितील कर्मचारीच कामाला लावावे लागतील. ते किती पुरे पडतील ही शंका आहे. दुसरा मार्ग सरकार बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा. या मुद्द्यावर ६-७ राज्ये बरखास्त करण्याचे पाऊन केंद्र सरकार उचलेल का याची मला शंका आहे. त्यांना संघराज्यीय प्रणाली, सांविधानिक नैतिकता वगैरेचे काहीच पडलेले नाही हे खरे. पण एवढे धैर्य ते लगेच करतील असे वाटत नाही. अन्य मार्गांनी धार्मिक, जातीय तणाव वाढविण्याचे त्यांचे प्रयत्न राहतील. 

म्हणून महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादींनी सरकारवर दबाव आणून या बाबी आम्ही करणार नाही, असा ठराव संमत करण्यासाठी आपण मोर्चेबांधणी करायला हवी. शिवसेनेने केंद्रात CAA च्या बाजूने मत दिले आहे. पण त्यावरुन त्यांना अडवण्याऐवजी NPR आम्ही करणार नाही, एवढ्याला तरी त्यांनी राजी व्हावे यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. 

दीर्घ पल्ल्याची लढाई 

यापलीकडे, आपली ताकद लक्षात घेता, ती वाढवत अजून आपण काय करु शकतो याचा विचार करायला हवा. 

हरण्याची खात्री असली तरी लढत राहावेच लागेल. हरल्यावर पुन्हा उठू. आपल्या अनुभवातून पुढच्यांना प्रेरणा आणि वाट गवसेल. प्रबोधन करत (विद्यापीठांतील संघर्षरत विद्यार्थ्यांसारख्या पुढे येणाऱ्या विविध घटकांचा) पाठिंबा जमवत लढावे लागेल. ती तयारी आपली हवी. कागद न दाखवण्याचा निर्णय ज्यांना हवा त्यांनी फेसबुकवर जाहीर करावा. ते स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. पण आपला विवेक फेसबुकवरच्या या कृतीसोबत शांतवू नये. लोकांत उतरुन प्रबोधन व संघर्ष करावा लागेल. लोक ऐकत नाहीत म्हणून लगेच माघार घेऊ नये. दीर्घ पल्ल्याच्या लढाईची तयारी आपल्या मनात हवी. 

केजरीवाल विजयी झाले. शहा-मोदी कंपनीला ही सणसणीत चपराक बसली. पण या विजयाने वर उपस्थित केलेले मुद्दे वा भय संपलेले नाही. ते प्रश्नच केजरीवालांनी उपस्थित केले नव्हते. उलट त्यांना बगल दिली होती. तो त्यांचा डावपेच की त्यावर त्यांच्या कार्यकर्त्यांच्याच भूमिकांचा प्रश्न आहे, हे पुढे कळेल. तूर्त हे प्रश्न मार्गी लागलेले नाहीत. कारण ते बोललेच गेले नाहीत. ‘राज्यात केजरी-केंद्रात मोदी’ हा फॉर्म्युला दिल्लीतल्या जनतेने याआधी अवलंबला आहे. तो पुढेही येऊ शकतो. 

वाढती महागाई, बेरोजगारी आदि आर्थिक-भौतिक प्रश्न सांस्कृतिक-वैचारिक प्रश्नांना भले खाली दाबतील. त्यातून तयार होणाऱ्या असंतोषापायी अजून काही सरकारे भाजपच्या हातून जातील. पण त्यामुळे हिंदू कट्टरपंथीयांच्या मुद्द्यांप्रति जनता निराभास झाली आहे, असा समज करुन घेणे धोक्याचे ठरेल. कोणत्याही क्षणी हे दबलेले निखारे ज्वाळांत परिवर्तित होऊ शकतात. त्यांचा निरास करण्याचा कार्यक्रम स्वतंत्रपणे करतच राहावा लागेल. – अगदी केंद्रातले भाजपचे राज्य गेले तरीही! नेहरु-गांधी-आंबेडकर-मौलाना आझाद यांच्या काळातील सेक्युलर कथ्य (नरेटिव्ह) आज बहुसंख्य समाजमानसात दुबळे झाले आहे, हे मनात पुन्हा पुन्हा अधोरेखित करुया. 

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

(आंदोलन, मार्च २०२०)

Friday, February 28, 2020

घाणीचेच खत होईल!



अपुऱ्या झोपेच्या ग्लानीत सकाळी दरवाजा उघडला. दाराला अडकवलेल्या पिशवीत दूध होते. पेपरही आला होता. म्हणजे आपल्याकडे कर्फ्यू नाही. दंगलीची दहशत नाही. ..किती छान! ..काय काय स्वप्नं पडत होती रात्री! टी. व्ही. वरील दिल्लीच्या त्या बातम्या, जाळपोळीची ती भयंकर दृष्ये, ज्यांची मुले मारली गेली त्या आयांचा आकांत, निर्ममपणे तुटून पडलेला जमाव वा पोलीस, खाली याचना करणारा रक्तबंबाळ युवक, हॉस्पिटलच्या शवागारासमोर प्रेते ताब्यात मिळण्यासाठी उभी असलेली उद्ध्वस्त चेहऱ्याची भिन्नधर्मीय माणसे. वस्त्यांत अल्पसंख्य परधर्मीयांना आधार देणारी, वाचवणारीही माणसे कुठे कुठे होती; माणुसकीच्या एकाकी पणत्यांसारखी!
रात्री जेवताना हे सारे पाहत होतो. घास अडकत होता. टी. व्ही. बंद केला. जेवण उरकले. घरचे सगळे नीट परतलेत याची खात्री केली. आडवा झालो.
बराच वेळ झोप येईना. बाबरी मशीद कोसळवल्यानंतरची ९२-९३ च्या हिंसाचारातली शिवाजी नगर, धारावीतली दृष्ये समोर फेर धरु लागली. गल्लीतला रक्ताचा सडा, पोलीस स्टेशनबाहेर गायब झालेल्या नवऱ्याचा-मुलाचा तपास लागतो का हे पाहण्यासाठी छोट्या लेकरांना घेऊन बसलेल्या हताश बाया. ज्यांची घरेदारे खाक झाली, त्यांचे त्या राखेत पिशाच्च होऊन काही सापडते का म्हणून चिवडत बसणे, ज्याचे सगळे कुटुंबच मारुन टाकले होते, त्या १२ वर्षाच्या मुलाचे भकास, कोरडे डोळे. ...धारावी, शिवाजी नगर या आम्हा कार्यकर्त्यांच्या नेहमीच्या पायाखालच्या वस्त्या यावेळी भ्रमंती करताना मात्र जी.एंच्या कथेतले अपरिचित नगर झाल्या होत्या.
आता रात्री जी.एंच्याच ‘इस्किलार’ कथेतला ‘अरिबा’ माझ्या पोटातून कुरतडत पाठीतून बाहेर पडत होता. मी त्या कैद्याप्रमाणे किंचाळत, आक्रंदत होतो. धडपडून जागा झालो. ...हुश्श! ते स्वप्न होते. मी ठीक होतो. घरातलेही शांत झोपले होते. परत झोपलो. पण पुन्हा त्याच मालिकेचा पुढचा भाग सुरु. अर्धवट झोपेत असताना बेल वाजली. कामवाल्या बाई आल्या. सकाळ झाली होती. उजाडले होते. दाराला लटकलेल्या पिशवीतले दूध, पेपर घेतला. आमच्याकडे सगळे शांत होते.
सवयीप्रमाणे कामाला लागण्याआधी किमान हेडलाईन पाहाव्या म्हणू पेपर उघडला. लोकसत्तेची पहिल्या पानावरची पहिली बातमी होती – ‘साहित्यप्रेमींसाठी आज ‘अभिजात’ काव्योत्सव!’ यात सादर व्हावयाच्या कवितांची यादी बातमीत होती. विंदांची ‘माझ्या मना बन दगड’ ही कविताही त्यात होती.
विंदा माझे आवडते कवी. आतून घुसळवणारे, त्याचबरोबर दिलासा आणि आधार देणारे. कारुण्याचे आवंढे गिळायला लावून अन्यायाविरोधातल्या संवेदना झडझडून जाग्या करणारे. हा अन्याय दूर करायला प्रेरित करणारे. पुन्हा पुन्हा वाचत राहाव्यात, स्मरणात येत राहाव्यात अशा त्यांच्या कवितांतली ही एक – ‘माझ्या मना बन दगड!’
या कवितेतल्या या काही पंक्तीः
ऐन रात्री होतील भास
छातीमधे अडेल श्वास,
विसर यांना दाब कढ
माझ्या मना बन दगड!
हा रस्ता अटळ आहे !
ऐकू नको हा आक्रोश
तुझ्या गळ्याला पडेल शोष
कानांवरती हात धर
त्यांतूनही येतील स्वर
म्हणून म्हणतो ओत शिसे
संभाळ, संभाळ, लागेल पिसे!
रडणाऱ्या रडशील किती?
झुरणाऱ्या झुरशील किती?
पिचणाऱ्या पिचशील किती?
ऐकू नको असला टाहो
माझ्या मना दगड हो!
हा रस्ता अटळ आहे !
येथेच असतात निशाचर
जागोजाग रस्त्यावर
असतात नाचत काळोखात;
हसतात विचकून काळे दात
आणि म्हणतात, कर हिंमत
आत्मा विक उचल किंमत!
माणूस मिथ्या, सोने सत्य
स्मरा त्याला स्मरा नित्य!
भिशील ऐकून असले वेद
बन दगड नको खेद!
बन दगड आजपासून
काय अडेल तुझ्यावाचून
गालावरचे खारे पाणी
पिऊन काय जगेल कोणी?
काय तुझे हे निःश्वास
मरणाऱ्याला देतील श्वास?
आणिक दुःख छातीफोडे
देईल त्यांना सुख थोडे?
आहे तेवढे दुःखच फार
माझ्या मना कर विचार
कर विचार हास रगड
माझ्या मना बन दगड
...इथपर्यंत ठीक वाटते. मी काही करु शकत नाही. ही दृष्ये सहन करायला शिकायला हवे. माझे काही जात नाही. दूध आले. पेपर आला. दिनक्रम सुरु झाला. पण पुढच्या ओळी या संदेशाशी मेळ खात नाहीत. त्या काही निराळे सांगतात. काही वेगळे होईल असे सांगतात. त्या वाचूया.
हा रस्ता अटळ आहे !
अटळ आहे घाण सारी
अटळ आहे ही शिसारी
एक वेळ अशी येईल
घाणीचेच खत होईल
अन्यायाची सारी शिते
उठतील पुन्हा, होतील भुते
या सोन्याचे बनतील सूळ
सुळी जाईल सारे कूळ
ऐका टापा! ऐका आवाज!
लाल धूळ उडते आज
त्याच्यामागून येईल स्वार
या दगडावर लावील धार!
इतके यश तुला रगड
माझ्या मना बन दगड
...म्हणजे आशा आहे. या घाणीचे खत होईल. लाल धूळ उडू लागेल. त्यामागून स्वार येईल. तो अन्याय दूर करील. सगळे नीट होईल.
यात मी काय करायचे? अशा स्वाराची वाट पाहायची? ..हे ‘यदा यदाही धर्मस्य’ झाले. कोणा लोकोत्तर महामानवाची अन्यायाच्या परिमार्जनासाठी वाट पाहायची.
विंदांना हे खचितच म्हणायचे नाही. लाल धूळ उडवण्यात मला सामील व्हायचे आहे. अन्यायाचे खत करण्यात मला सहभाग द्यायचा आहे. यातूनच समाजमन म्हणजेच तो धार लावणारा स्वार तयार होणार आहे.
मग दिल्लीच्या आक्रोशाचे विस्मरण व्हायला, माझ्या मना बन दगड ऐकून माझ्या अस्वस्थतेचे विरेचन करायला, मन ताजेतवाने व्हायला आज मी कविता ऐकायला अभिजात काव्योत्सवाला जाऊ? …की लाल धूळ उडवण्यासाठीच्या प्रयत्नांतला एक लाखांश हिस्सा उचलायला लोकांत जाऊ?
वास्तविक असा पर्यायांत विचार करणे आवश्यक आहे का? मी दोन्ही करु शकत नाही का? आधी लोकांत जाऊ, तिकडून नंतर काव्योत्सवात जाऊ! शक्य आहे, लोकांत गेल्यावर कदाचित वेळ होणार नाही तिकडे जायला. पण डोक्यात ठेवेन. प्रयत्न तर नक्कीच करेन!
- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com
(द वायर मराठी, २७ फेबरुवारी २०२०)

Tuesday, February 4, 2020

संविधानातील क्रांतिसौंदर्याचे अवगाहन

शालेय पुस्तकातील विशेषतः वरच्या इयत्तांतील अभ्यासाला असलेल्या कविता काही फार प्रिय नसत. कारण एकच, त्यावर परीक्षेला प्रश्न असत. त्यावेळीही ज्या कवितांनी आतून हलवले होते, त्यातील एक होती - ‘कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही; सदरहू पीक आम्ही आसवांवर काढले आहे.’ यशवंत मनोहर हे कवीचे नाव त्यावेळी मनावर कोरले गेले, ते कायमच. नंतर उत्सुकतेने ही कविता असलेला कवितासंग्रह ‘उत्थानगुंफा’ वाचला. पुढे मनोहर सरांचे काही सुटे सुटे वाचले. त्या सगळ्यातून एका तीक्ष्ण वेदनेवरील आघातातून उसळणाऱ्या आणि अवघ्या मानवतेला आवाहन करणाऱ्या कारंज्यांचे ऊर्जा देणारे तुषार अनुभवत गेलो. त्यांचे भाषेचे, शब्दांच्या नवनिर्मितीचे सामर्थ्य मोहविणारे आहे. ज्याला वैचारिक म्हणू असे लिहितानाही हा भाषेचा डौल आशयाचा दिमाख वाढविणाऱ्या मखरासारखा त्यात सतत विद्यमान असतो. डॉ. यशवंत मनोहर यांच्या अलिकडेच आलेल्या हर्मिस प्रकाशनाने काढलेल्या ‘भारताचे क्रांतिसंविधान’ या संविधानावरील लेखांच्या संग्रहातही आपल्याला या वैशिष्ट्याची प्रचिती येते. 

‘बंधो! वावर पडीक कसे दिसते? 
इथे तर संविधान पेरले होते! 
पेरले ते उगवले नाही 
की उगवले ते जगवले नाही?’ 

‘अग्नीचा आदिबंध’मधील या मनोहर सरांच्या कवितेच्या ओळी समाजमाध्यमांवर फिरत फिरत माझ्यापर्यंत पोहोचल्या. खूप भावल्या. मी त्या अनेकांना शेअर केल्या. आणि आता हे पुस्तक वाचले. कवितेतल्या भावनेचा विस्तृत उद्गार, तिच्यातील प्रश्नाचा शोध म्हणजे हे पुस्तक आहे. भावकवितेच्या चालीवर म्हणायचे तर हा संविधानातील मूल्यांचा भावशोध आहे. त्यातील काही मुद्द्यांचा परिचय, काहीशी आनुषंगिक चर्चा मी पुढे करणार आहे. 

आपल्या राज्यघटनेच्या कवेत फक्त भारत नाही. भारतीय संविधानाच्या इच्छेचा आशय जाती, धर्म, वर्ग असे तुकडे न झालेला एकसंध पृथ्वीवरील एकसंध माणूस म्हणजेच ‘एलिनेशनमुक्त’ माणूस असल्याचे मनोहर सर पहिल्याच लेखात घोषित करतात. जगातील सर्वच मानवांशी सहकार्याचे संविधानातील ‘अधिष्ठानभूत तत्त्व बंधुता आणि भगिनीता’ हेच असल्याचे ते इथे नमूद करतात. 

पुढच्या लेखात समान नागरी कायद्याची चर्चा आहे. शोषित स्त्रीपुरुषांचा तो स्वातंत्र्यसिद्धांत असल्याचे शीर्षकातच नोंदवतात. समान नागरी कायदा न होणे हा सांस्कृतिक कट आहे, पर्सनल लॉ हे मूलतत्त्ववादच असतात अशी विधाने लेखक करतात. ‘पर्सनल लॉ जतन करायचा असेल तर कोणत्याही सामाजिक सुधारणा घडवून आणणे शक्य होणार नाही.’ या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान सभेतील भाषणातील अवतरणही आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ ते देतात. हिंदू कोड बिल हे समान नागरी कायद्याच्या दिशेने टाकलेले पाऊल होते, ही ऐतिहासिक नोंदही देतात. 

आधुनिक समाजजीवन, राज्यकारभार संचालित करणारे संविधान ज्यावेळी नव्हते, त्यावेळी धर्म ही बाब पार पाडत होता. धर्माचे एक अंग आध्यात्मिक तर दुसरे समाजजीवनाचे संचालन असे होते. आता घटनेचे राज्य आल्यावर दुसऱ्या बाबीची म्हणजेच समाज जीवन नियमित करण्याची जबाबदारी धर्माची असता कामा नये. आध्यात्मिक बाब ही व्यक्तीच्या श्रद्धा व उपासनेच्या स्वातंत्र्याच्या अखत्यारित येते. ज्याप्रमाणे फौजदारी व दिवाणी कायदे सर्वांना समान आहेत, त्याप्रमाणे घटस्फोट, वारसा आदि कौटुंबिक बाबींचे कायदे सर्वांना सारखे का असू नयेत? तो काही धार्मिक श्रद्धेचा भाग नव्हे. हा मुद्दा तर्काला धरुनच आहे व त्या दिशेनेच पुढची पावले सरकार व समाजाची पडली पाहिजेत, हे निःसंशय. मात्र एकूण आजचे वातावरण लक्षात घेता, धार्मिक उन्माद राजकारणासाठी वापरण्याचे काम सर्वच धर्मातील हितसंबंधी करत असताना या दिशेकडचे मार्गक्रमण कसे राहणार आहे, हा डावपेचाचा मुद्दा लक्षात घेणे गरजेचे आहे. पुरोगामी आशयाचा समान नागरी कायद्याचा मुद्दा हिंदू कट्टरपंथी समाजातल्या धार्मिक ध्रुवीकरणासाठी वापरत असताना ही सावधानता पाळणे गरजेचे आहे, असे अनेक पुरोगामी विचारवंत तसेच स्त्रीवादी नोंदवत आहेत. खुद्द हिंदू कोड बिलाच्या वेळी, हा मुद्दा तुम्ही मुसलमानांसाठी लागू का करत नाही, असा प्रश्न सभागृहात हिदू महासभेच्या नेत्यांनी नेहरुंना केलाच होता. फाळणीच्या पार्श्वभूमीवर असुरक्षित झालेल्या मुस्लिम समाजाला या मुद्द्याने आणखी असुरक्षित करणे त्यावेळी योग्य नव्हते. मात्र यथावकाश त्यांच्या व एकूणच सर्व धार्मिक समूहांच्या बाबत तो मुद्दा पुढे आणावाच लागेल, अशी नेहरुंची भूमिका होती. 

त्रिवार तलाकबाबतच्या कायद्यावेळी भाजपने हाच ध्रुवीकरणाचा डाव साधल्याचे आपण पाहतो. मुस्लिम समुदायांतून ही मागणी ५०० सह्यांच्या मोहिमेद्वारे केली गेल्याच्या घटनेची नोंद मनोहर सर या लेखात करतात. तथापि, हमीद दलवाईंप्रमाणे मुस्लिम समाजाला प्रगतीशील घडविण्यासाठीचे विशेष प्रयत्न तसे पुढे झाले नाहीत. जे झाले ते खूप क्षीण होते. नेहरुंनंतरच्या काँग्रेसी सत्ताधाऱ्यांकडून मुस्लिमांतील मागासपणाला दूर करण्याचे काही प्रयत्न झाले नाहीत. उलट मतांसाठी त्यातील धर्ममार्तंडांच्या दाढी कुरवाळण्याचेच काम झाले. शहाबानो प्रकरणासारखे इतिहासाचे पुढचे पाऊल मागे फिरवण्याचे पातकही त्यांनी केले. अन्य पुरोगामी प्रवाहांकडूनही मुस्लिमांतल्या प्रगतीशील प्रवाहाला बळ द्यायचे खास प्रयत्न झाले नाहीत. कैकदा हिंदू कट्टरपंथीयांच्या विरोधातील लढाईतले साथीदार म्हणून मुस्लिम कट्टर पंथीयांशीही सोबत केली गेली. 

या सगळ्याचा संकलित परिणाम आज संघपरिवाराची ताकद वाढण्यात झाला आहे. बहुसांस्कृतिक देशात असा एकच एक कायदा सर्वत्र लागू असणे योग्य आहे का, असाही काही जण प्रश्न उपस्थित करतात. समान नागरी कायद्याऐवजी लिंगभेदाला मुठमाती देणाऱ्या दुरुस्त्या वा उपाययोजना करत पुढे सरकावे असे त्यांना वाटते. 

पुरोगामी प्रवाहांतील या चर्चेच्या पार्श्वभूमीवर विशेष विवाह कायदा प्रचारणे व अमलात आणण्यासाठीचे प्रयत्न करणे हे आजचे प्राधान्याचे काम होऊ शकते, असे मला वाटते. आज हा कायदा पर्याय म्हणून आहे. तो सक्तीचा नाही. तरुण मंडळींना या कायद्याखाली विवाह करण्यासाठी अधिकाधिक प्रवृत्त करण्यातून समान नागरी कायद्यात अभिप्रेत आशयाची पूर्तता व्हायच्या दिशेने आपली पावले पडू शकतात. 

‘आम्ही भारताचे लोक’ या लेखात मनोहर सरांनी भारतीय, राष्ट्रीयत्व या मुद्द्यांचा वेध घेतला आहे. तो खूप महत्वाचा आहे. स्वातंत्र्य संग्राम, सामाजिक सुधारणांची चळवळ यांतून उत्क्रांत झालेली राष्ट्रीयत्वाची भूमिका संविधानात ग्रथित झाली. मात्र भारतीय समाजातील धर्म, जात, भाषा आदि भेदांनी हे राष्ट्रीयत्व, भारतीयत्व साकारायला खूप अडचण केली आहे. त्यामुळे आजही भारताच्या भौगोलिक सीमांच्या आतला निवासी म्हणजे भारतीय हीच व्याख्या बलशाली आहे. ते या लेखात ‘राष्ट्र म्हणजे समध्येयी लोकांचा समूह, राष्ट्र परस्परांना उन्नत करण्यासाठी झटणाऱ्या लोकांचा समूह!’ असे म्हणतात तीच योग्य व्याख्या आहे. त्यांच्या मते ‘‘भारताचे लोक’ म्हणजे संविधानातील समाजादर्श प्रत्यक्षात आणण्यासाठी जीव ओतून धडपडणाऱ्या निष्ठेचे, निर्धाराचे आणि कृती कार्यक्रमाचे नाव आहे.’ समाजातील सलोख्याची राख करणारे लोक संविधानाला अभिप्रेत भारताचे लोक असू शकत नाहीत असे ते निःसंदिग्धपणे नोंदवतात. पुढच्या एका लेखात ‘राष्ट्र हा मूल्यांचा, आदर्शांचा संच असतो.’ असे जे म्हटले आहे, ते अगदी योग्य आहे. 

भारतीय ही निवासींची ओळख केवळ नव्हे. संविधानातील मूल्यांच्या स्वीकार व आचाराने ती सिद्ध होते. ही मूल्ये जीवन समृद्ध व सुंदर करणारी आहेत. ही मूल्ये संविधानासारख्या मोठ्या, तांत्रिक विवरणात शोधायची कशी? त्यासाठी संविधानाची उद्देशिका आहे. त्यात अनेक शब्द आहेत; मात्र वाक्य एकच आहे. यातील शब्द म्हणजे मूल्ये आहेत. मनोहर सर उद्देशिकेचे वर्णन ‘भावकविता’ असे करतात. ते अगदी रास्त आहे. पुढे ते म्हणतात - ‘भारतीय संविधान म्हणजे संविधानाच्या उद्देशिकेचे विस्तारलेले क्षितीज आहे.’ हेही अगदी नेमके आहे. संविधानातली कलमे ही या मूल्यांवर आधारलेली आहेत. उदा. कलम २५ उद्देशिकेतली धर्मनिरपेक्षता सांगते. कलम १९ उद्देशिकेतल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे स्वरुप स्पष्ट करते. 

विषमतेचा पुरस्कार करणाऱ्या, वर्णवर्चस्ववादी व्यवस्थेला आधार देणाऱ्या यमनियमांच्या ग्रंथांची पत्रास आता संपली. आता घटनेचा अंमल सुरु झाला. याची नोंद देणारे बाबासाहेबांचे १९५० च्या जानेवारी महिन्यातले एक उद्गार मनोहर सर या पुस्तकात नोंदवतात- ‘आज जीवनातील सर्व गोष्टींवर राज्यघटनेचे प्रभुत्व पडत आहे. तिला सार्वभौमत्व आहे. मी हे जाहीर करु इच्छितो की मनूचा अधिकार आता संपला आहे.’ 

मनुस्मृतीचे दहन बाबासाहेबांनी १९२७ ला महाडला केले. तो मनाने नाकारलेला अंमल होता. आता कायद्याने तिला ठोकरले होते. मात्र या संविधानाच्या अपेक्षित क्रांतितत्त्वाला चरे पाडणाऱ्या कृती पुढच्या काळात घडू लागल्या. लोकशाही मार्गाने नवे संस्थानिक, नवी राजघराणी उदयास येऊ लागली. राजकारण आपल्या पुढच्या पिढ्यांची सोय करुन ठेवणारा धंदा करणाऱ्या या प्रक्रियेविषयी लेखक म्हणतात - ‘इतरांनी केवळ मतदार असावे आणि आपल्या पुढील सर्व पिढ्या राज्यकर्त्याच व्हाव्यात अशी लोकशाहीविरोधी शैली या दुष्ट प्रक्रियेतून जन्माला येते.’ ही मंडळी मतदारास त्याची खरी ताकद कळू देत नाहीत. ते म्हणतात – ‘त्याच्या मतदारपणाचेच अपहरण करुन ते विकत घेतले जाते. हा सर्व संविधानद्रोह आणि लोकशाही विकृत करणेच असते.’ यावर उपाय म्हणून ‘बुद्धिजीवी, विचारवंत साहित्यिक, समाजपरिवर्तनाच्या चळवळीतील निष्ठावंत कार्यकर्ते, कलावंत यांचे एखादे सेंद्रिय संघटन उभे व्हायला हवे,’ असे मनोहर सर सुचवतात. 

बुद्धिवादी, चारित्र्यसंपन्न आणि संविधाननिष्ठ माणसेच या देशात संविधानाला अभिप्रेत राजकारण करु शकतात, असे पुढे सर नमूद करतात. हा आदर्श जरुर असावा. तो लांब पल्ल्याचा आहे. पण आजच्या राजकारणातल्या प्रतिगामित्वाचा भ्रष्टाचार, घराणेशाही, मतदार विकत घेणे हा एक भाग व दुसरा भाग धर्माच्या आधारे राष्ट्रवादाचा उन्माद तयार करुन फॅसिस्ट राजवटीच्या दिशेने सरकणे हा आहे. हा दुसरा भाग आज जीवघेणा, संविधान संपवणारा आहे. अशावेळी वैयक्तिक चारित्र्य वा अन्य गुणांऐवजी तसेच अगदी घराणेशाहीशीही तडजोड करुन या शक्तींच्या विरोधात असणाऱ्यांची व्यापक एकजूट उभी करणे हे प्राधान्याचे काम राहणार आहे. 

धर्म आणि राजकारणाची फारकत असायला हवी, हा मुद्दा ‘धर्म आणि राजकारण’ या लेखात चर्चिला गेला आहे. त्यात मनोहर सर म्हणतात – ‘शासन सेक्युलर होण्यासाठी देशातील माणसे सेक्युलर झाली पाहिजेत. धर्मापासून राजकारणाची फारकत करण्यासाठी धर्मापासून देशातील माणसांची फारकत करता आली पाहिजे.’ 

माणसे इहवादी, वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणारी होणे ही चारित्र्यसंपन्नतेच्या मुद्द्याप्रमाणेच आदर्श अवस्था आहे. तिच्यासाठी प्रबोधन तसेच जीवनातील असुरक्षिततेच्या बाबींवर उपाय हे दीर्घकालीन काम आहे. आज बहुसंख्य लोक धार्मिक आहेत. त्यांना उपासनेचे स्वातंत्र्य संविधानाने दिलेले आहे. हे स्वातंत्र्य उपभोगताना त्यांनी दुसऱ्याच्या स्वातंत्र्याला आणि संविधानातील अन्य मूल्यांना हानी पोहोचविता कामा नये, हे संविधानाला अभिप्रेत आहे. दुसरे आणि मुख्य म्हणजे देशाचा कारभार कोणत्याही धार्मिक आस्थेवर चालणार नाही. तो इहवादी असेल, असे आपण ठरवलेले आहे. हे ठरवलेले मूल्य कटाक्षाने पाळणे, मनात रुजवणे हे आपल्या देशाच्या सेक्युलॅरिझमसाठी गरजेचे आहे. देशाच्या कारभारात तसेच सार्वजनिक जीवनात सेक्युलर व्यवहार करता येणे आणि वैयक्तिकरित्या इहवादी असणे यांत पहिलीची दुसरी बाब पूर्वअट असायलाच हवी असे मला वाटत नाही. सर पुढे ‘ भारतीय संविधान ही एक सेक्युलर संस्कृती आहे.’ असे म्हणतात, ते बरोबरच आहे. 

साहित्याचे प्रयोजन, साहित्यकाराची भूमिका या आपल्याकडे खूप चर्चेच्या बाबी आजही आहेत. साहित्यविषयक संमेलनांतील त्यांची या बाबतची मांडणी करणारेही काही लेख या संग्रहात आहेत. त्यात त्यांनी निःसंदिग्धपणे ‘प्रतिभेचा संबंध सामान्य माणसाच्या जीवनाशी तुटतो, तेव्हा प्रतिभा ‘आऊट ऑफ कव्हरेज एरिया’ फेकली जाऊ शकते.’ अशी आपली बाजू नोंदवली आहे. सांविधानिक मूल्यांचा आधार या प्रतिभांना असायला हवा, ही त्यांची अपेक्षा आहे. यापासून भरकटवणारे, गिळंकृत करणारे हितसंबंधी सापळे अवतीभोवती असतात. त्यांपासून सावध राहण्याचा साहित्यिकांना, कलावंतांना इशारा देताना ते म्हणतात- ‘संविधान निर्मात्याशी नाते जोडणाऱ्या बाणेदार प्रतिभांनी प्रस्थापितांचे सापळे ओळखायला हवेत.’ 

अशी बरीच चर्चा या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळते. संविधानातील तांत्रिक वा तात्त्विक मुद्द्यांच्या, त्या संबंधांतील विविध निकालांच्या तपशीलात न जाता संविधानातील क्रांतीचे मर्म प्रकट करणे, त्याकडे आपले लक्ष वेधणे, त्याच्या अमलासाठी लोकांना प्रवृत्त करणे हा या लेखांचा उद्देश दिसतो. संविधानाला मूळातूनच उखडले पाहिजे यासाठी प्रयत्नरत शक्तींच्या विरोधात संविधान केवळ पूज्य मानून त्याचा गौरव करणाऱ्या भक्तिसंप्रदायाला जमिनीवर उतरवणे, संविधानातील विचार-आशयाबाबत उदासीन असणाऱ्यांना त्या भूमिकेप्रत आणणे यासाठी हे पुस्तक खूप मदत करु शकेल. 

सिद्धार्थ गौतम ज्ञानप्राप्तीच्या मार्गावर असताना अन्नपाणी सोडून स्वतःला कष्टवतो, विकलांग करतो. पण त्याला यश मिळत नाही. अशा समयी सुजाता त्याला नेरंजना नदीच्या काठी गयेला ध्यानस्थ असताना महान योगी म्हणून खीर अर्पण करते. ती सेवन करुन सिद्धार्थ गौतम आपला मार्ग बदलतो. आरोग्यसंपन्न होऊन मानवतेच्या दुःखनिरोधाचा मार्ग शोधतो. सिद्धार्थ आता बुद्ध बनतो. या पुस्तकातील एका लेखाचा शेवट करताना ‘संविधान आपल्या विकलांग मानवी चारित्र्याला सुजाताची खीर देत आहे. ती टाळू नये.’ असे मनोहर सर आपल्याला बजावतात. त्याला धरुन मीही असे म्हणेन की, आपणसुद्धा या पुस्तकरुपी खीरीचे सेवन जरुर करावे. संविधानाप्रतीच्या समजाचे आपले आरोग्य काही अंशाने समृद्ध करायला ते नक्की मदत करेल. 

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

(आंदोलन, फेब्रुवारी २०२०) 

_________________________ 

भारताचे क्रांतिसंविधान 

डॉ. यशवंत मनोहर 

हर्मिस प्रकाशन 

पृष्ठेः ११४ | मूल्यः १४० रु. 

_________________________

Wednesday, January 1, 2020

हा दौर खतरनाक आहे!

दर महिन्याच्या सदरासाठीचा लेख लिहायला बसलोय. पण मन स्थिर नाही. आसाम जळतो आहे. कर्फ्यू लावला गेलाय. इंटरनेट वगैरे बंद केले गेलेय. ईशान्य भारतातील अन्य राज्यांतही असंतोष आहे. दिल्ली तसेच देशातील अन्य काही भागांत निदर्शने चालू आहेत. आम्हीही काल केले. पुढेही होणार आहेत. नागरिकत्व दुरुस्ती विधेयक बहुमताच्या जोरावर भाजपने दडपून मंजूर केले. आता राष्ट्रपतींनी त्याला मंजुरी दिली. म्हणजे तो आता कायदा झाला. पंजाब, केरळ, प. बंगाल अशा काही राज्यांनी आम्ही तो अमलात आणणार नाही, असे जाहीर केले आहे. मन या घटनांनी व्यापून गेलंय. हे सोडून काही दुसरा विषय संगतवार डोक्यात तयार होणे कठीण झाले आहे. यावर लिहावे, तर ते पंधरा दिवसांनी छापून येणार. म्हणजे तोवर आजची स्थिती तशीच असेल असे नाही. जे लिहू ते तोवर जुने झालेले असू शकते. मासिकाचे असेच असते. विषय थोडे सबुरीचे घ्यावे लागतात. अगदीच वेगवान घटनांना प्रतिसाद त्यात देता येत नाही. हैद्राबाद एनकाऊंटर झाले त्याच दिवशी एक लेख लिहिला. तो त्याच दिवशी काही तासांत एका ऑनलाईन न्यूज पोर्टलवर आला. तो त्याच दिवशी येण्याला महत्व होते. असे तातडीने व्यक्त व्हायला ब्लॉग, फेसबुक, व्हॉट्सअप ही माध्यमे हल्ली आहेतच. लेख द्यायचे बंधन नसते, तर आता लेख लिहायला बसलो नसतो. पण ठरल्याप्रमाणे सदरासाठी तो लिहावा तर लागणारच आहे. काय लिहावे?

मनाला व्यापणारी, चरत जाणारी एक व्य़था मनात हल्ली विद्यमान असते. आताही ती ठणकते आहे. ती म्हणजे हिंसेचा वाढता प्रकोप. आणि एका हिंसेला उत्तर म्हणून दुसऱ्या हिंसेला तयार होणारे समर्थन. याबद्दल जमेल तसे लिहितो. विस्कळीत होऊ नये असा प्रयत्न करतो. पण झाले तर समजून घ्यावे ही विनंती.

हिंसा पूर्वी नव्हती असे नाही. हिंसा अध्याहृत असलेल्या आदिम मानवाच्या अस्तित्वाचे प्राणी पातळीवरील संघर्ष वा साम्राज्यशाहीतली युद्धे, गुलामांशी वागणूक या काळाबद्दल मी बोलत नाही. राष्ट्र राज्य झाल्यानंतर, भारत स्वतंत्र झाल्यानंतर जे लोकांचे राज्य आले त्या काळाशी तुलना करतो आहे. या काळातही हिंसा झाल्या. विशेषतः फाळणी वा जातीय दंगली. खून, जाळून मारणे, गुंडांचे एनकाऊंटर वगैरे. पण आजच्या हिंसेची प्रत वेगळी आहे. प्रमाण वेगळे आहे. म्हणजे ते खूप वाढले आहे.

एखाद्या गुंडाचा त्रास सहनशीलतेच्या पार गेला म्हणून लोकांनी त्याला बेदम मारला आणि त्यात त्याचा जीव गेला, अशा घटना घडलेल्या आहेत. असे मारणे योग्य की अयोग्य यावर चर्चा होऊन ते अयोग्य असल्याचे निर्वाळेही दिले गेले आहेत. पण मुले पळवायला आल्याचा वहिम ठेवून झुंडीने एखाद्याला ठार करणे, गाईला मारल्याच्या, गाईचे मांस वाहून नेत असल्याच्या वा घरी ठेवले असल्याच्या संशयावरुन मुस्लिम-दलितांना ठार करणे, लव जिहादच्या नावाखाली वा जातीला बट्टा लावल्याच्या कारणाने आंतरजातीय-आंतरधर्मीय लग्न करणाऱ्या दोघांना वा त्यातल्या कथित खालच्या जातीच्याला मारुन टाकणे या घटना साथीसारख्या वाढल्या आहेत. त्यातील क्रौर्य भयानक झाले आहे.

अलिकडेच सोनई खटल्यातील गुन्हेगारांना फाशी झाल्याचा निकाल आला. या घटनेत सवर्ण मुलीच्या प्रेमात पडल्याचा राग येऊन तिच्या पालकांनी दलित मुलाला व त्याच्या साथीदारांना ठार मारुन त्यांचे तुकडे करुन संडासच्या टाकीत टाकले होते. हत्या केल्यावर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याचे तुकडे करुन बॅगेत भरणे हे सर्रास झाले आहे. बलात्कार करुन नंतर बलात्कारित मुलीचा खून करणे, जाळणे, तिच्या प्रेताचे तुकडे करणे हे नित्याचे झाले आहे. जवळपास रोज आणि कधीकधी एकाच दिवशी अनेक या प्रकारच्या बातम्या वर्तमानपत्रात येत असतात. एक बातमी वाचून आपण सुन्न होतो, तोवर दुसरी आदळते, काहीच अवधीत तिसरी आदळते. मग बधीर व्हायला होते.

हैद्राबादच्या क्रूर अत्याचारानंतर पकडले गेलेल्यांना चकमकीत पोलीस ठार करतात, याचा देशभर आनंद साजरा केला जातो. या पोलिसांवर लोक फुले उधळतात. ही घटना माझ्यासारख्याला खूप हलवून गेली. अत्याचाराची बातमी जेवढी त्रासदायक तेवढीच लोकांची ही उन्मादी मानसिकता अस्वस्थ करणारी, हादरवणारी होती. पुढचे आणखी त्रासदायक म्हणजे ही भावना व्यक्त करणाऱ्यांना फेसबुक-व्हॉट्सअपवर लोकांनी फाडून खाल्ले. तुमच्या आई-बहिणींवर-मुलींवर असा अत्याचार झाला असता तर तुम्ही काय केले असतेत, असे बरेच सभ्य आणि यापलीकडे कितीतरी पटीने असभ्य भाषेत लोक तुटून पडले. यांना ट्रोल मी म्हणत नाही. हे काही ठरवून ट्रोलिंग करणारे लोक नव्हते. आपल्या भावना, संताप प्रामाणिकपणे व्यक्त करणारे लोक होते. पण ज्यारीतीने ते तुटून पडत होते ते भयंकर होते. माझ्यासारखे मत असणाऱ्या महिलांवर तर हे लोक अगदी खालच्या पातळीवर झडप घालत होते. खरे म्हणजे शाब्दिक बलात्कारच करत होते. ह्या पुरुषांचा स्त्रियांकडे दुय्यमतेने बघण्याचा दृष्टिकोनच त्यातून व्यक्त होत होता.

न्यायाला होणारा विलंब, पोलिस तपासातला उशीर वा दिरंगाई हे प्रश्न खरे आहेत. पण त्यावरच्या रागापायी पोलिसांनी गुन्हेगारांना गोळ्या घालून थेट न्याय करण्याला समर्थन तयार होणे हे चिंताजनक आहे. निरपराधाला शिक्षा होऊ नये याची दक्षता म्हणून तसेच आधुनिक जगात आरोपीलाही मानवी अधिकार असतात याचा आदर राखून चालणाऱ्या न्यायप्रक्रियेविषयी लोकांना पुरेसा समज नसणे, आदर नसणे हेच यातून दिसते. जलद न्यायासाठीच्या उपायांसाठी झगडण्याऐवजी अशा झटपट न्यायाला लोक बळी पडत आहेत.

या रागाला जाति-धर्म व आर्थिक स्तराचे परिमाण ही आणखी चिंतेची बाब आहे. प्रतिक्रिया देणाऱ्या कथित उच्च जातीतल्या, वर्गातल्या लोकांच्या भाषेत दलित, मुस्लिम, गरीब आरोपींबाबत तुच्छता व विद्वेष यांचा विखार तीव्र असतो. खाजगीत बोलताना ‘हे असेच असतात’ हे सहज कानावर पडत असते. अत्याचाराविरोधात होणाऱ्या क्षोभाच्या तीव्रतेला बळीच्याही जाति-धर्म-वर्गाचे परिमाण असणे हे खूप अस्वस्थ करणारे आहे. आमच्या मुलींना या खालच्या जात-वर्गांतल्यांची हात लावायची हिंमत कशी होते, हा भाव तिथे असतो. तळच्या जाति-थरातल्या अत्याचाराच्या भक्ष्य झालेल्या मुलींबाबत व्यवस्था कशी वागते, याचे दर्शन ‘आर्टिकल १५’ सिनेमात आपण घेतलेले आहे. खैरलांजी, कोपर्डी, निर्भया या प्रकरणांतही आपल्याला हे फरक दिसले आहेत.

प्रश्न बिकट आहेत. त्याचबरोबर या प्रश्नांना प्रतिसाद देणाऱ्या समाजमनात खूप घाण, विष साठले आहे, साठते आहे, हेही भयंकर आहे. आजारी माणूस चिडचिडा होतो. आजारपणात त्याचे शरीर इतके हुळहुळे होते की जरा टोचले तरी त्याची वेदना त्याच्या मस्तकात जाते. सर्वच समाज असा झालेला दिसतो आहे. अपवाद गणण्यात मतलब नाही. हे हुळहुळेपण जाति-धर्म-वर्ग-लिंग निरपेक्ष आहे.

३७० कलम रद्द करणे, काश्मीरचे विभाजन करणे किंवा आताचे नागरिकत्व दुरुस्ती विधेयक संमत करणे या बाबी हे राष्ट्रहितच आहे, त्याबद्दल मतभेद कसा काय कोणी व्यक्त करु शकते. असे करणारे राष्ट्रद्रोहीच आहेत, असे पक्के मत भारताच्या मुख्य भूमीतल्या बहुसंख्याकांचे असते. वेगळे मत मांडणाऱ्यांवर मग ते गिधाडांसारखे तुटून पडतात. समग्रतेने पाहणे, इतरांचे वेगळे मत असू शकते हे कबूल करणे याची जाणीवच हरपलेली आहे.

गेल्या आठवड्यात विद्यापीठात प्राध्यापकांसमोर बोलायला गेलो होतो. वस्तुनिष्ठपणे विविध अंगांनी विषय मांडण्याचा मी प्रयत्न केला. मात्र त्यानंतरही बाबासाहेबांनी आरक्षण १० वर्षांसाठीच दिले होते, हा मुद्दा कायदा शिकविणाऱ्या एक प्राध्यापिका बाईंनी लावूनच धरला. १० वर्षांची मुदत ही नोकरी-शिक्षणातल्या राखीव जागांना नाही. ती राजकीय राखीव जागांसाठी आहे. कालच ती अजून दहा वर्षांसाठी वाढवली, हे त्यांना मी समजावण्याचा प्रयत्न करत होतो. पण त्यांचे कान बंद झाले होते. त्या एकतर्फी बोलत राहिल्या.

हिंसा ही हत्येतच असते असे नाही. ती विचारांत, त्यांच्या प्रकटीकरणातही असते. खरं म्हणजे सगळ्याच हत्यांना हिंसा म्हणणे बरोबर नाही. बुद्धाच्या हिंसा-अहिंसेच्या तत्त्वाचे विवेचन करताना ‘Need to kill’ आणि ‘Will to kill’ असा भेद केला जातो. मारण्याची गरज व मारण्याची इच्छा. जिच्याशी भांडण झाले तिचे कोंबडे अंगणात आले म्हणून त्याला रागाने धोंडा मारुन ठार करणे आणि जावई सासरी आल्यावर त्याला कोंबडे कापून शिजवून घालणे, या दोन्हींत हत्या आहे. पण दोन्ही हिंसा नाहीत. धोंडा मारून रागाने ठार केलेल्या घटनेत हिंसा आहे. तिथे मारण्याची इच्छा, तर जावयाला कोंबडे खायला घालण्यात मारण्याची गरज आहे. या गरजेत हिंसा नाही. म्हणजेच बुद्धाची हिंसा ही मानसिक बाब आहे. मनात विद्वेष असणे ही हिंसा आहे.

आज या मानसिक हिंसेचे पीक सर्वत्र तरारुन आले आहे. काहीही झाले तरी मोदींची तळी उचलून धरणे व विरोधी बोलणाऱ्यांवर तुटून पडणे ही लक्षणे असणाऱ्यांना मोदीभक्त ही संज्ञा रुढ झाली आहे. वास्तविक हा भक्त संप्रदाय आता सार्वत्रिक आहे. आपापल्या नेत्याची बाजू लावून धरण्यात आणि विरोधकांना शत्रू समजण्यात हे गैरमोदी भक्तगण मोदीभक्तांइतकेच कडवे असतात. ब्राम्हणी विचारांवर तुटून पडणारे अब्राम्हणी, अब्राम्हणी मधल्या जातींच्या विरोधात आंबेडकरी, आंबेडकरी कक्षेतले बामसेफी वंचितांवर, वंचित बामसेफींवर तुटून पडतात. या सर्वांत स्वतःला श्रेष्ठ व दुसऱ्याला कमी मानणारे ‘ब्राम्हण्य’ सामायिक आहे.

वंचितची घोडदौड सुरु असताना त्यांच्या चळवळीविषयी आदर बाळगून त्यांच्या निवडणुकांच्या डावपेचाविषयी भिन्न मत व्यक्त करणाऱ्या मित्रांनाही शत्रू मानले गेले. जो माझ्या बाजूने नाही, त्याला वेगळी बाजू नाहीच. तो थेट शत्रूच. ‘तुझे मत मला मान्य नाही, पण ते मांडायला जो विरोध करेल त्याला मी विरोध करेन’ या व्हॉल्टेअरच्या भूमिकेचे पुरस्कर्ते बाबासाहेब होते. हे विचार व अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य आंबेडकरी चळवळीतल्याच अनेकांना पचनी पडत नाही. ‘वैराने वैर मिटत नाही, ते अवैराने-प्रेमानेच मिटू शकते’ हे सांगणाऱ्या व त्यासाठी सम्यक वाचा, सम्यक विचार यांचा उपदेश करणाऱ्या बुद्धाला मानणारी ही मंडळी फेसबुकवर याच्या उलट वागताना दिसतात. यांची मने वैराने भरलेली, विद्वेषी भाषेत फुसफुसणारी. अपवाद आहेत. पण ते अपवाद. मुख्य लक्षण आज विद्वेषाचे आहे. ते सार्वत्रिक आहे. ते चळवळीला तसेच स्वतःच्या व्यक्तित्वाला घातक आहे.

डॉ. आंबेडकर, गांधीजी, नेहरु, पटेल, राजेंद्र प्रसाद, मौलाना कलाम आझाद या मंडळींनी आपसातले मतभेद राखत, व्यक्त करत, कधी त्यांवरुन संघर्ष करत समाजाला पुढे नेणाऱ्या सामायिक सहमतीच्या मुद्द्यांवर एकत्रित व्यवहार केला. भारतीय संविधान हा या सामायिक सहमतीच्या व्यवहाराचा आदर्श वस्तुपाठ आहे. यासाठी आपल्या उद्दिष्टाप्रतीची स्पष्टता व निष्ठा, पटत नसले तरी त्याचा आदर करण्याची वृत्ती, जे दुसऱ्यात चांगले आहे त्याचा गौरव करण्याची दानत यांची गरज असते. आज त्याची वानवा आहे.

प्रतिगामी मंडळींच्या हालचालींची, प्रचाराची व संघटित करण्याची गती आज प्रचंड आहे. पुरोगामी प्रवाह विस्कळीत आहे. घेऱ्यात आहे. तो समाज माध्यमांतून खूप बोलत असतो. पण ते आभासी असते. त्याबाहेरच्या समाजाशी त्याचा संवाद दुर्मिळ असतो. नागरिकत्व दुरुस्ती विधेयक तसेच देशात काय चालले आहे, याची फारच अल्प माहिती वस्तीतल्या बाया-पुरुषांना आज आहे. त्यांना त्याची प्रत्यक्ष झळ आज लागलेली नाही. मोर्च्यासाठी तीच मंडळी आपण मुख्यतः बाहेर काढत असतो. खलनायिकांच्या कारस्थानांनी ओतप्रोत भरलेल्या मालिकांत गुंग होणारा हा समूह बातम्या कमी पाहतो. त्यांचे विश्लेषण ऐकणे तर दूरच. वाचणारे पेपरही हल्ली वरवर वाचतात. मोबाईलमध्ये डोके-डोळे व्यस्त असणे हे आणखी एक मोठे आव्हान. अशावेळी त्याचे राजकीय शहाणपण वाढवण्यासाठी त्याच्या वस्तीत जाऊन त्याच्याशी संवाद साधणे, त्याला समजेल अशा रीतीने आजच्या स्थितीचे गुंते उलगडणे गरजेचे आहे. कर्कश मालिका, कर्कश डीजे, कर्कश गृहितके यांत सौम्य स्वर ऐकण्याची, समजण्याची या विभागाची कुवत वाढवणे गरजेचे आहे. हे आजचे राजकीय काम आहे. ते करता येते व त्याचा परिणाम चांगला होतो, हा आमचा मर्यादित क्षेत्रातला अनुभव आहे.

सध्याचा हा दौर खतरनाक आहे. तो तसाच राहील का? अर्थात नाही. पण तो आणखी खतरनाकही होऊ शकतो. तो तसा व्हायचा नसेल, तर आपल्याला हस्तक्षेप करावाच लागेल. समाज माध्यमांवरल्या आभासी नव्हे तर प्रत्यक्षातल्या जगात. याचा अर्थ समाज माध्यमे पूर्ण टाळावीत असे नाही. त्यांचा माहिती, विचार वितरणासाठी नक्की उपयोग आहे. पण चळवळीचे ते मुख्य रणक्षेत्र मानण्याची गफलत करु नये.

याचा काय परिणाम होईल? आताच वर नोंदवल्याप्रमाणे तो चांगला होतो असा आमचा व असे काम करणाऱ्यांचा मर्यादित अनुभव आहे. प्रयत्न व्यापक झाले तर परिणामाचीही व्याप्ती वाढू शकेल. काय होईल याची चर्चा थोड्या अवकाशाने करु. काय व्हायला हवे, याची स्पष्टता करुन त्या दिशेने चालायला तर लागू.

नव्या वर्षी. नव्या दृष्टीने. नव्या रीतीने.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

(आंदोलन, जानेवारी २०२०)

Saturday, December 7, 2019

उन्मादी समाजमन…आत्मघाताच्या वाटेवर!

असे समजू की हैद्राबादचे एनकाऊंटर अपरिहार्य असेल. पण त्यामुळे तात्काळ न्याय झाला या उन्मादी भावनेत बहुसंख्य समाज जाणे हे महाभयंकर आहे. गोरक्षकांनी गाईची हत्या केल्याचा वहीम ठेवून दलित-मुस्लिमांना ठार करणे, लव जिहादच्या नावाखाली वा खोट्या प्रतिष्ठेपायी आंतरजातीय-आंतरधर्मीय लग्न करणाऱ्यांना जिवे मारणे, मुले पळवतात या संशयाने एखाद्याला झुंडीने चेचून मारणे या वर्गवारीत मोडणारी वा त्यास अप्रत्यक्ष समर्थन देणारी ही लोकभावना आहे.
काहींनी तर बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांना दिली गेलेली ही उचित श्रद्धांजली आहे, असेही म्हटले आहे. कायद्याच्या समर्थकाच्या, संविधानाच्या शिल्पकाराच्या महापरिनिर्वाण दिनी कायदा व संविधान दोन्हीना फाटा देणाऱ्या या प्रतिक्रिया आहेत. त्या व्यक्त करुन आपण एकप्रकारे या महामानवाचा अपमान करतो आहोत, याचा विवेक सुटल्याचे हे लक्षण आहे. याच दिवशी ६ डिसेंबर १९९२ ला कट्टरपंथी हिंदुत्वाच्या उन्मादी प्रभावाखालील झुंडीने बाबरी मशीद पाडली. चर्चा वा न्यायालयीन प्रक्रिया धाब्यावर बसवून घटनात्मक मार्गांना न जुमानणारा हा हुमदांडगेपणा घटनाकार बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनाला काळिमा फासणाराच होता. त्याच प्रकारे बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी व्यक्त झालेली, वर उल्लेखलेली समाज भावना या महामानवाच्या विचारांना बट्टा लावणारीच आहे.
पोलीस तपास व न्यायिक प्रक्रिया लवकर होणे यासाठीच्या मागण्या, सूचना यांचा आग्रह धरणे बरोबर. पण त्यात विलंब होतो, म्हणून कायदा हातात घेऊन समाजाने वा पोलिसांनी अविलंब सजा देणे हे प्रगत, मानवी अधिकारांची बूज राखणाऱ्या, लोकशाही, कायद्याच्या राज्यात अजिबात समर्थनीय नाही. तो समूहाने केलेला वा पोलिसांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर करुन केलेला गुन्हाच असतो. विशेष म्हणजे, भारतासारख्या विषम समाजरचनेत दलित, अल्पसंख्याक, आर्थिक दुर्बल असेच लोक याचे भक्ष्य ठरतात, हे विसरता कामा नये.
ज्यांना पकडले गेले ते खरे गुन्हेगार नव्हते, पोलिसांनी लोकक्षोभ आवरण्यासाठी सत्ताधाऱ्यांच्या सल्ल्याने निरपराधांना अटक केले...अशा घटना आपण वाचलेल्या आहेत. अर्थात, हे फार उशीरा कळते. तोवर निरपराध नाहक आत अडकतात. बदनाम होतात. अनेकांचे आयुष्य त्यामध्ये बरबाद होते. म्हणूनच ज्यांना पकडले जाते ते कायद्याने आधी आरोपी असतात. त्यांना कायदेशीर लढाईची संधी दिली जाते. या लढाईनंतर, साक्षी-पुरावे होऊन गुन्हा शाबित झाला तर ते गुन्हेगार ठरतात. न्यायाच्या विविध पातळ्यांवर थेट राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करण्यापर्यंत ही कायदेशीर न्यायाची संधी आरोपीला दिली जाते. विवेकी माणसांनी घटना तयार केल्याने हे घडले. हा विवेक आज दुबळा होतो आहे. घटना बनवणाऱ्यांना तो मोडीत काढायला निघाला आहे.
एखादा गुन्हेगार म्हणून सिद्ध होतो. त्याला शिक्षा होते. आणि १५-२० वर्षांनी काही नवे पुरावे मिळाल्यावर कळते की तो निर्दोष होता. अशावेळी त्याने भोगलेल्या शिक्षेचे काय? त्याला फाशी देऊ नये, या म्हणण्यामागे हाही एक तर्क आहे. फाशी देऊन मोकळे झाल्यानंतर जर पुढे कळले तो निर्दोष होता, तर त्यास पुन्हा जिवंत कसे करणार? त्याला न्याय कसा देणार? जन्मठेप असली तर तो मुक्त तरी होऊ शकतो. म्हणून कठोरात कठोर शिक्षा सक्तमजुरी असलेली जन्मठेप हीच असावी, हा आधुनिक विवेकी विचार आहे. भगतसिंगांच्या फाशीनंतर आपले राष्ट्रीय नेते स्वतंत्र भारतात फाशीची शिक्षा नसावी या मताचे होते. बाबासाहेबही या मताचे होते. पण नथुरामने गांधीजींचा खून केल्याच्या पार्श्वभूमीवर फाशी नको या मनोभूमिकेत जनमानस आणणे कठीण झाल्याने आपल्याकडे फाशीची शिक्षा राहिली.
गुन्हा करणारा माणूस हा गुन्हेगारी मानसिकता तयार करणाऱ्या परिस्थितीचे अपत्य असतो. म्हणजेच तो गुन्ह्याची अंमलबजावणी करतो. पण त्याच्या नियोजनात समाजातील विषमता, दारिद्र्य, वंचना, भेदभाव आदि विविध घटक असतात. म्हणूनच गुन्हेगाराला त्याने इतरांना जसे संपवले तसा ‘जशास तसा’ न्याय हा आधुनिक जगातील शिक्षेचा हेतू नसतो. तर त्याला सुधारुन, त्याचे माणूसपण जागे करुन त्याला पुन्हा समाजात सोडणे हा हेतू असतो. (‘दो आँखें बारह हात’ हा सिनेमा आठवा.) ज्यांना समाजात सोडणे धोकादायक आहे, त्यांना मात्र कैदेतच ठेवावे लागते. संभाव्य गुन्हेगारांना गुन्ह्यापासून परावृत्त करणे हा शिक्षेचा एक हेतू असतो. पण तो फारसा यशस्वी ठरलेला नाही. जोवर गुन्हेगार तयार करणारी परिस्थिती बदलत नाही, तोवर हे गुन्हे घटत नाहीत, असाच जगातला अनुभव आहे. हैद्राबादच्या घटनेनंतर लगेचच उन्नाव व नंतर मालदा या ठिकाणी पीडितेला जाळून मारण्याच्या घडल्या आहेत. ज्या उजेडात येत नाहीत, अशा कितीतरी घटना असू शकतात, असतात, असे अभ्यासकांचे निरीक्षण आहे.
तेव्हा, आपला विवेक शाबूत ठेवूया. तात्काळ न्यायाच्या उन्मादी मोहातून बाहेर पडूया. कायद्याच्या प्रक्रियेतून आज असलेली कठोरात कठोर शिक्षा (आज ती फाशीची आहे) मिळावी, ती लवकरात लवकर मिळावी, यासाठी प्रयत्न करुया. विशेष प्रयत्न गुन्हेगार तयार होणार नाहीत, अशी स्थिती निर्माण करण्यासाठी करुया. ज्यांना लोकशाही, घटना मोडीत काढायची आहे, अशा राजकीय-सांस्कृतिक फॅसिस्टांच्या हुकुमशाहीला बळ मिळेल असा कोणताही प्रतिसाद आपल्या कळत नकळत त्यांना मिळू नये याची दक्षता घेऊया. ...उन्मादी भावनेला आवरुन आत्मघाताच्या वाटेवरुन तात्काळ मागे फिरुया.
... तीच घटना निर्मात्या बाबासाहेबांना खरी आदरांजली ठरेल.
______________

सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com
MARATHI.THEWIRE.IN
गुन्हेगाराला त्याने इतरांना जसे संपवले तसा ‘जशास तसा’ न्याय हा आधुनिक जगातील शिक्षेचा हेतू नसतो. तर त्याला सुधार...

Monday, December 2, 2019

लोकशाहीला असलेल्या धोक्यांबाबत बाबासाहेबांचा इशारा व आजचे वर्तमान

या २६ नोव्हेंबर २०१९ ला भारतीय संविधानाच्या निर्मितीला सत्तर वर्षे पूर्ण झाली. एखाद्या राष्ट्राच्या जीवनात सत्तर वर्षे हा काही मोठा काळ नव्हे; तसाच तो अगदी छोटाही नव्हे. राष्ट्रीय स्वातंत्र्याची चळवळ, यास समांतर असलेली सामाजिक सुधारणांची चळवळ तसेच देशोदेशीचे राजकीय-वैचारिक संग्राम यांतून अनेक आधुनिक मूल्ये उत्क्रांत व विकसित झाली. देशातील जनतेच्या वतीने घटनाकारांनी सखोल चर्चेअंती यांतील आपणास पोषक मूल्यांचा, रीतींचा समावेश भारतीय संविधानात केला. सत्तर वर्षांत याचे काय झाले, काय अडचणी आल्या, कोणती आव्हाने उभी राहिली, याचा आढावा व पुढे काय करावयाचे याची योजना आखण्यासाठी हा टप्पा जरुर महत्वाचा आहे. २०२४ ला संविधानाला पंच्याहत्तर वर्षे पूर्ण होतील. आपण घेतलेल्या आढाव्यातून पुढे येणाऱ्या उपक्रमांच्या अंमलबजावणीस ही आगामी पाच वर्षे उपयुक्त ठरु शकतात. त्यादृष्टीने काही संकल्प जाहीर करता येतील. (माझा संबंध असलेल्या संविधान संवर्धन समिती या संघटनेने ‘हर घर-संविधान साक्षर’ असा संकल्प २६ नोव्हेंबरला संविधान दिनानिमित्त काढलेल्या संविधान जागर यात्रेत जाहीर केला आहे.) 

हा आढावा विविधांगी असणार आहे. त्यातील एका अंशाला मी इथे स्पर्श करत आहे. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा या डिसेंबर महिन्याच्या ६ तारखेला महापरिनिर्वाण दिन आहे. त्यानिमित्त लोकशाहीच्या यशस्वितेच्या ज्या अटी बाबासाहेबांनी नमूद केल्या आहेत, त्यातील काहींचा आजच्या संदर्भात विचार करुया. 

बाबासाहेबांचे म्हणणे नमूद करण्यापूर्वी लोकशाहीबाबतच्या काही ठळक मिळकतींची नोंद घेणे क्रमप्राप्त आहे. भारत हा जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा देश आहे. जात, धर्म, भाषा, प्रदेश यांची प्रचंड विविधता असलेल्या या खंडप्राय देशात लोकशाही प्रक्रिया टिकेल का, असा जागतिक पातळीवरील भल्या भल्यांना प्रश्न होता. त्यातल्या कित्येकांना तर विभिन्नता, त्यामुळे होणारे संघर्ष, निरक्षरता यांमुळे हा देश विखंडित होईल याची खात्री वाटत होती. पाकिस्तानच्या फुटीमुळे तर त्यांच्या या दाव्याला जोरदार पुष्टी मिळाली. पण तसे झाले नाही. आपल्या देशातूनच तुटलेला, धर्माच्या आधारावर उभा राहिलेला पाकिस्तान फुटला. पण विविध धर्मांचे सहअस्तित्व राखून भारत एक राहिला. बहुसंख्य निरक्षरांच्या या देशात आजवरच्या सोळा लोकसभा रीतसर मतदानातून आकाराला आल्या आहेत. अतिरेक्यांचे, नक्षलवाद्यांचे हल्ले, धमक्या यांना पार करुन त्या त्या भागात लोक मताधिकार बजावताना आढळतात. या भारतीय जनतेने अनेक मातबर पक्षांची सरकारे बदलली. पुन्हा निवडून आणली. पाकिस्तानसह आपल्या भोवतीच्या नवमुक्त देशांत अशी सलग लोकशाही नांदताना दिसत नाही. अनेक ठिकाणी लष्कराचा हस्तक्षेप, अराजक, निर्नायकीचा प्रवास दिसतो. 

भारतीय लोकशाहीचे हे निश्चित बलस्थान आहे. त्याच्या कारणांचा शोध हे अनेक इतिहासकारांना आव्हान वाटते. ते आपापल्या परीने त्यास भिडण्याचा प्रयत्नही करत असतात. त्यांचा शोध समजून घेणे हे खूप रोचक व महत्वाचे आहे. पण तो आता या लेखाचा विषय नाही. लोकशाहीची ही मिळकत गृहीत धरुन, ही लोकशाही अधिक अर्थपूर्ण होण्याच्या दृष्टीने, टिकण्याच्या व वर्धिष्णू होण्याच्या दिशेने बाबासाहेबांच्या मांडणीचा आजचा संदर्भ पाहणे ही या लेखाची सीमा आहे. 

लोकशाहीच्या यशस्वितेसाठीसाठीची पहिली अट बाबासाहेब नोंदवतात, ती म्हणजे समाजव्यवस्थेत विषमता नसली पाहिजे. ते म्हणतात, ‘सर्व हक्क व सत्तेचे केंद्रीकरण ज्यांचे ठायी झाले आहे असा वर्ग एका बाजूला व सर्व प्रकारचे भार वाहण्याचे काम करणारा वर्ग दुसऱ्या बाजूला अशी विभागणी असू नये. अशी विषमता, अशी अन्यायकारक विभागणी व त्यावर आधारलेली समाजरचना यांमध्ये हिंसात्मक क्रांतीची बीजे असतात आणि मग त्यांचे परिमार्जन करणे लोकशाहीला अशक्य होते.’ 

बाबासाहेब क्रांतीच्या बाजूने होते. पण हिंसात्मक क्रांतीच्या बाजूने नव्हते. खऱ्याखुऱ्या समाजसत्तावादी लोकशाहीसाठी अशी क्रांती अपरिहार्य आहे, असे काहींचे म्हणणे असले, तरी बाबासाहेब संसदीय पद्धतीने रक्तविहिन क्रांती आणू इच्छित होते. त्यांनी लोकशाहीची व्याख्याच तशी केली आहे. ते म्हणतात – ‘लोकांच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनात क्रांतिकारक बदल रक्तविरहित मार्गांनी घडवून आणणारी शासनपद्धती म्हणजे लोकशाही होय.’ 

संसदीय निवडणूक पद्धत आज रुळली आहे. एकूण विकासक्रमात गरिबांची टक्केवारी कमी होणे, उपासमार कमी होणे, साधनसुविधा तयार होणे हे बदल घडलेत. पण समाजातील सर्वांच्या वाट्याला संतुलित विकास आलेला नाही. बाबासाहेब म्हणतात ती विषमता, संसाधनांची अन्यायकारक विभागणी प्रचंड वाढली आहे. अंबानींचे घर २७ माळ्यांचे आणि त्याच्या काही किलोमीटरवर तीन माळ्यांच्या कुडाच्या झोपड्या. शिवाय त्यांना शिक्का अनधिकृततेचा. त्यामुळे कुठल्याही क्षणी त्यांवर बुलडोझर फिरतो आणि त्या झोपड्यांच्या अवशेषांच्या ढिगाऱ्यावर उघडी-वाघडी कच्ची-बच्ची वळवळत, काही वेचत राहतात. त्यांवरच त्यांच्या आया चुली पेटवतात. त्याही पुढे विझून जातात. ही दोन टोके अपवादात्मक नाहीत. या दरम्यान तीव्रतेच्या टोकांची धार कमीअधिक असलेले विषमतेचे कडे व दऱ्या यांचा प्रदेश विपुल विस्तीर्ण आहे. 

एकेकाळी विविध आर्थिक स्तरांतील मुले किमान एकाच शाळेत आढळत. आता ऐपतीप्रमाणे शाळा. त्यातून तयार होणारे भावी नागरिक, देशाचे आधारस्तंभ वेगवेगळ्या कुवतीचे, उंचीचे, जाडीचे असणार. या शाळांतील, महाविद्यालयांतील शिक्षकांच्या वेतनात प्रचंड तफावत. काहींचे पगार लाखांचे तर काहींचे जेमतेम दहा-बारा हजार. ते वाढण्याचे, नोकरी कायम होण्याची काहीही शाश्वती नाही. ‘समान कामाला समान दाम’ कुठच्या कुठे फुंकून टाकणारे हे कंत्राटीकरण आता सार्वत्रिक आहे. 

उदाहरणे अनेक देता येतील. शेती, मजुरी, सेवाक्षेत्र या सर्व ग्रामीण-शहरी विभागांत विषमतेचे, अशाश्वत उत्पन्नाचे क्षेत्र हे मुख्य झाले आहे. संघटित, किमान शाश्वतीचा रोजगार नगण्य झाला आहे. त्यातच आता मंदी, आर्थिक अरिष्टाचे सावट गडद होऊ लागले आहे. 

तथापि, बाबासाहेबांना लोकशाहीच्या भवितव्याच्या दृष्टीने चिंतित करणाऱ्या हिंसात्मक क्रांतीची चिन्हे कुठे दिसत नाहीत. विषमतेच्या वेदनेचे स्तर एक नाहीत. त्यात अनेक पातळ्या आहेत. त्यामुळे त्यांची एकजूट होत नाही. प्रभावशाली विभागांना जात, धर्म, स्थानिक हितसंबंध तसेच तुरळकपणे तळच्या स्तरांतील नेतृत्वक्षम व्यक्तिंकडे पाझरुन येणारे लाभ यांमुळे आव्हान मिळत नाही. या सर्वांना जाणतेपणाने संघटित करणाऱ्या संघटनाचा अभाव आहे. अशी अनेक कारणे या हिंसात्मक क्रांतीच्या दिशेने न जाण्यामागे असू शकतात. 

अशावेळी रक्तविहिन मार्गाने क्रांतिकारक बदल घडवण्याचा मार्ग संसदीय प्रणालीत कसा शोधायचा? निवडणुकीला उभे राहण्याची कोणत्याही सामान्य कार्यकर्त्याची आज प्राज्ञा नाही. माकपच्या डहाणूतल्या उमेदवारासारखी उदाहरणे हा अपवाद आहे. करोडोंचा खर्च आमदारकीच्या निवडणुकीत होतो. लोकसभेचा तर त्याहून कैक पटीने. 

निवडणुकीच्या पद्धतीत बदल मागायचा? ...आताची एक मत जास्त मिळाले तरी निवडून येण्याची (first past the post) पद्धत बदलून त्या जागी प्रमाणशीर पद्धत आणा, ही काहींची मागणी आहे. पक्षाला लोकांनी मते द्यावीत. ज्या प्रमाणात मते मिळतील, त्या प्रमाणात पक्षांचे प्रतिनिधी कायदेमंडळात जातील. छोट्यात छोट्या पक्षालाही प्रतिनिधीत्व मिळण्याची संभाव्यता त्यातून वाढते. यावर अधिक व व्यवहार्य विचार व्हायला हवा. घटना समितीत हा विषय आला, त्यावेळी खुद्द बाबासाहेबांनी याला विरोध केला होता. तत्कालीन भारतीय समाजस्थितीला ही पद्धत अनुरुप नाही. त्यामानाने आताची रुढ असलेली first past the post ही पद्धत अधिक सोपी व सुटसुटीत आहे. दलित-आदिवासी या अल्पसंख्याकांच्या हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी राखीव जागांची जोड तिला आहे, असे त्यांचे समर्थन होते. त्यावेळची घटना समितीतील चर्चा व बाबासाहेबांचे म्हणणे नीट समजून घेऊन आता ७० वर्षांच्या निवडणूक प्रक्रियेनंतर नव्याने विचार करणे अप्रस्तुत नक्कीच नाही. ही चर्चा व्हायला लागेल. इतरही पर्याय चर्चेसाठी पुढे आणावे लागतील. 

दरम्यान सत्ताधाऱ्यांवर दबाव आणणारे लोकशाही मार्गाने करावयाचे जनतेचे लढे, ‘तिचे राजकीय जाणतेपण वाढवत’ करणे चालू ठेवायला हवे. ‘राजकीय जाणतेपण वाढवत’ हे अति महत्वाचे आहे. त्यात आपण कष्टकऱ्यांचे पक्षपाती, लोकशाहीवादी कमी पडलो आहोत, हा इतिहास आहे. 

लोकशाहीच्या यशासाठी ज्या पुढच्या अटी बाबासाहेब नोंदवतात त्यात एक आहे, वैधानिक व कारभारविषयक क्षेत्रांत पाळावयाची समता. ‘कायद्यापुढे सर्व समान’ या तत्त्वाला ते इथे खूप महत्व देतात. वर चर्चिलेली समाजातली विषमता कायद्यापुढे सर्व समान या तत्त्वाला बाधा आणते. सत्ता, संपत्ती, पैसा ज्याच्याकडे आहे, त्याच्याशी पोलिसांचे वागणे आणि यापासून वंचित असलेल्याशी पोलिसांचे वागणे यातला फरक आपण रोज पाहतो. ज्याच्याकडे न्यायालयीन लढाई लढायला पैसे नाहीत, असे कितीतरी आरोपी जामिनाअभावी तुरुंगात खितपत पडलेले असतात. शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये असे म्हणतात. गरीब ती चढूच शकत नाही, अशी स्थिती आहे. कायदेशीर मोफत सल्ला, सरकारी वकील वगैरे बाबी फार परिणामकारक नाहीत. गरिबांची संघटना असेल तर यात काही अंतर पुढे जाता येते. शिवाय तो सामुदायिक प्रश्न असावा लागतो. अर्थात यात संघटनेलाही न्यायालयीन लढाईचा खर्च या गरिबांतून वा हितचिंतकांकडून उभारावा लागतोच. भ्रष्टाचाराविरुद्धची कायदेशीर लढाई लढताना तारखा, काही कागदपत्रे मिळवण्यासाठी खुद्द कोर्टातल्या कर्मचाऱ्यांना लाच द्यावी लागते. कामाच्या महत्वानुसार या लाचेच्या रकमेची जाडी ठरते. 

अनधिकृत झोपडपट्टीचा वर उल्लेख केला आहे. मुंबईत मजुरीसाठी येणारा गरीब या अनधिकृत झोपड्यांत राहतो. तो मुंबईला भार होतो. त्याला हाकलण्याच्या मोहिमा निघतात. मात्र नोकरी-व्यवसायासाठी येणारा साधन संपदेवाला भार होत नाही. तो अपार्टमेंट्समध्ये भाड्याने राहतो. यथावकाश स्वतःचा फ्लॅट घेतो. तो प्रतिष्ठित मुंबईकर बनतो. मुंबई बेटावर अगदी समुद्रात भराव घालून किती माणसे कोंबणार याला मर्यादा आहे. मुंबई फुटायच्या मार्गावर आहे. पण तिची ही अवस्था गरिबांनी केली की इथल्या सत्ताधारी, पैसेवाल्या नियोजनकर्त्यांनी? मुंबईसारख्या शहरांचे फेरनियोजन व्हायलाच हवे. पण ते कायद्याने सर्वांना समान लेखून. इथल्या गरिबांप्रती न्याय करुन. याबाबतचे भान निर्माण करण्यासाठी कष्टकऱ्यांत काम करणाऱ्या लोकशाहीवादी संघटनांनी मुंबईतल्या सर्व थरांतल्यांशी संवाद साधावा लागेल. सर्वांप्रती न्याय करणारे शहररचनेचे नवे प्रारुप मांडावे लागेल. त्यावर जनसमर्थन उभारावे लागेल. एकाच विभागाचे प्रश्न लढवून हे साधणार नाही. आपला लढा एकाकीच राहणार. 

बाबासाहेब लोकशाही यशस्वी होणासाठी पुढचा मुद्दा मांडतात तो संविधानात्मक नीतीचा. ते म्हणतात, ‘आपली राज्यघटना ही कायदेशीर तरतुदींचा व तत्त्वांचा नुसता सांगाडा आहे. ह्या सांगाड्याला आवश्यक असलेले रक्तमांस संविधानात्मक नीतिमत्तेच्या पालनातच मिळेल.’ अशा नीतिमत्तेचे उदाहरण म्हणून अमेरिकन जनतेला देवासमान असलेले अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष वॉशिंग्टन यांना दुसऱ्यांदा अध्यक्ष होण्याची लोकांनी गळ घातली त्यावेळी ते काय उत्तरले याची नोंद बाबासाहेब अशी करतात, ‘..आपल्याला वंशपरत्वे चालणारी राजेशाही, वंशपरंपरेने येणारा राजा किंवा हुकूमशहा नको होता म्हणूनच आपण ही घटना बनविली. इंग्लिश राजाशी तुम्ही या हेतूनेच प्रेरित होऊन संबंध तोडले आहेत. मग माझी पूजा करुन मला जर तुम्ही वर्षानुवर्षे अध्यक्ष बनवू लागलात तर तुमच्या तत्त्वांचे काय होईल?’ ..लोकाग्रहास्तव वॉशिंग्टनला दुसऱ्यांदा अध्यक्ष व्हावे लागले. पण जेव्हा तिसऱ्यांदाही त्याला गळ घालण्यासाठी लोक त्याच्याकडे गेले तेव्हा त्याने त्यांना कठोरपणे झिडकारले, अशी माहिती बाबासाहेब पुढे देतात. 

स्वतंत्र भारतातला राजकीय इतिहास पूर्णपणे या तत्त्वावर उतरला आहे असे नाही. मात्र मोदींच्या काळात तर ही घटनात्मक नैतिकता पूर्णपणे उधळून टाकलेली दिसते. रिझर्व बॅंकेला धाब्यावर बसवून नोटबंदीचा निर्णय घेणे, विरोधी पक्षनेता, सरन्यायाधीश यांच्याशी काहीही सल्लामसलत न करता पंतप्रधानांनी नको असलेल्या सीबीआय प्रमुखांची मध्यरात्री उचलबांगडी करणे, आधारला राज्यसभेच्या मंजुरीच्या अटीला बगल देण्यासाठी त्यावर वित्तविधेयकाचा बुरखा चढवणे...अशी कैक उदाहरणे सांगता येतील. या क्रमातली नुकतीच घडलेली निलाजरी घटना म्हणजे मोदी-अमित शहा दुकलीच्या गतिमान कारस्थानी कारवायांनी एका रात्रीत आलेले महाराष्ट्रातील फडणवीस-अजित पवार यांचे सरकार. ते औटघटकेचे ठरुन या दुकलीची आणि भाजपची अब्रू गेली हे चांगलेच झाले. तथापि, सत्तेच्या घोडाबाजाराला घाबरुन प्रत्येक पक्षाला आपल्या निवडून आलेल्या आमदाराला ऐषारामी हॉटेलात कैद करुन ठेवावे लागणे काय दर्शवते? अशा या आमदारांची त्यांच्या पक्षाप्रति तसेच निवडून दिलेल्या लोकांप्रति नैतिकता काय?..हेही खूप गंभीर प्रश्न आहेत. 

सर्वात त्रासदायक, भयंकर व दूरगामी परिणाम करणारे संविधानात्मक नीतिमत्तेच्या उल्लंघनाचे उदाहरण म्हणजे काश्मीरबाबतचा निर्णय. ३७० कलम रद्द करणे तसेच काश्मिरचे विभाजन करुन त्याचे दोन केंद्रशासित प्रदेश करणे हे निर्णय कोरड्या, क्रूर तांत्रिकतेने घेतले गेले. या निर्णयांचा प्रस्ताव काश्मिरच्या विधानसभेकडून केंद्राकडे यायला हवा आणि मग तो संसदेत संमत व्हायला हवा, अशी अट आहे. काश्मिरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करुन तिथली विधानसभा बरखास्त केली गेली. केंद्राला हवा तो प्रस्ताव काश्मिरच्या राज्यपालांनी काश्मिरच्या वतीने केंद्राला पाठवला. ते काश्मिरच्या जनतेचे मत असे धरण्यात आले. त्याआधारे अमित शहांनी एके दिवशी सकाळी राज्यसभेत विधेयक मांडले. कोणतेही विधेयक मांडल्यानंतर ते सर्व सदस्यांना वितरित करुन अभ्यास करण्यासाठी वेळ दिला जातो. त्यानंतर काही दिवसांनी ते चर्चेला घेतले जाते. तिथे त्यावर सहमती नाही झाली तर संसदीय चिकित्सा समिती नेमली जाते. तिच्या शिफारशींनंतर पुन्हा चर्चा होते आणि मग मतदान होते. ही रीत धुडकावून, विरोधकांतील काहींना साम-दामाकरवी आधीच आपल्या बाजूला वळवले असल्याने, विधेयक मांडलेल्या दिवशीच हुमदांडगेपणाने ते मंजूर करवून घेतले. लोकसभेत तर भाजपला राक्षसी बहुमत आहे. तिथेही एका दिवसात ते मंजूर झाले. हे करत असताना काश्मिरचे नेते स्थानबद्ध होते. जनता पोलिस पहाऱ्यात होती. अजूनही आहे. ज्यांच्या हितासाठी हा निर्णय घेतला आहे असे मोदी-शहा म्हणतात, ती जनता बंदीवान करुन, तिला न विचारता तिचे हित परस्पर हे ठरवतात कसे? 

....काश्मिरबाबतचा हा निर्णय घटनात्मक नीतीच्या चिंधड्या उडवणारा आहे. घटनाच उध्वस्त करणारा आहे. काश्मीर बाहेरची बहुसंख्य भारतीय जनता राष्ट्रवादाच्या उन्मादात ही घटनात्मक नैतिकता पायदळी तुडवण्यात आज सहभागी आहे. तिला शहाणे करणे, घटनात्मक संकेतांचे, मूल्यांचे, नैतिकतेचे भान देणे याकडे लोकशाहीवादी पक्ष, संघटना, व्यक्ती यांचे कमालीचे दुर्लक्ष झाले. त्याचा हा घोर परिणाम आज भोगावा लागतो आहे. 

लोकशाही यशस्वी होण्यासाठीची जी पुढची अट बाबासाहेब नोंदवतात तिलाही तिलांजली देण्याचे पातक मोदी-शहा कसे करत आहेत, ते या काश्मिरच्याच उदाहरणातून दिसते. बाबासाहेब म्हणतात, ‘लोकशाहीच्या नावाखाली अल्पसंख्याकांची (अल्पमतवाल्यांची) गळचेपी होता कामा नये. अल्पसंख्याकांना सुरक्षितता वाटली पाहिजे. बहुसंख्याक मंडळी कारभार करत असली तरी आपल्याला इजा पोहोचणार नाही. आपल्यावर अन्याय होणार नाही याची हमी अल्पसंख्याकांना मिळाली पाहिजे.’ 

काश्मिरमधले मुस्लिम अल्पसंख्य आज सुरक्षितता अनुभवत आहेत? संघपरिवारातील सैतानांकरवी गोरक्षणाच्या नावाखाली, घरवापसीच्या मोहिमांद्वारे मुस्लिमांचा जो छळवाद होतो आहे, त्यांना चेचून ठार केले जाते आहे..यातून त्यांना कोणत्या सुरक्षेची हमी मिळते आहे? 

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला ३७.४ टक्के मते मिळाली. त्यातली सर्वसाधारणपणे ३५ टक्के मते (सर्व जातीय) हिंदूंची आहेत. सत्तेवर येण्यासाठी मुस्लिमांच्या मतांची मुदलातच त्यांना गरज उरलेली नाही. घटनात्मक नैतिकतेची बूज ही तर फार दूरची गोष्ट झाली. हिंदुराष्ट्रात मुस्लीम दुय्यम ही अवस्था आता आलीच आहे. बाबरी मशिदीच्या निकालाचे तर्क, आधार काहीही असोत; हिंदुराष्ट्रात मुस्लिमांचे दुय्यम नागरिकत्व या संघस्वप्नास सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने मदतच झाली आहे. 

‘कायदा पाळला जाण्याइतपत सामाजिक नीती समाजात निर्माण झाली असल्याची खात्री कायदे करणाऱ्यांना मिळाली पाहिजे’ अशी लोकशाही रक्षणाची पुढची अट बाबासाहेब सांगतात. ज्यांचा संविधानाला आणि त्यातल्या सर्व आधुनिक मूल्यांना विरोध होता, तेच संविधानाची खोटी शपथ घेऊन सत्तेवर आले असताना बाबासाहेबांची ही अपेक्षा फिजूल आहे. हिताचे असोत-नसोत, ते ठरवतील ते कायदे जनतेने पाळलेच पाहिजेत, ही सत्ताधाऱ्यांची धमकी आहे. स्वतःहून कायदे पाळण्याच्या सामाजिक नीतीच्या आवाहनाची पूर्वअट समाजाच्या सहमतीने, घटना मानणाऱ्या तिच्या खऱ्याखुऱ्या प्रतिनिधींनी ते कायदे केलेले असणे ही आहे. तीच धुडकावून लावली जात असताना बाबासाहेबांची वरील अपेक्षा आज निरर्थक ठरते. 

लोकशाही यशस्वी होण्यासाठीच्या अटींतला शेवटचा मुद्दा ते नोंदवतात तो विवेकी लोकमताचा. ते म्हणतात, ‘अन्याय कोणावरही होत असो, अन्याय दिसला रे दिसला की जागृत होऊन उठणारी शक्ती म्हणजे समष्टीची सद्सद्विवेकबुद्धी. सार्वजनिक विवेकबुद्धी याचा अर्थच असा की, जिच्या प्रादुर्भावामुळे समाजातील प्रत्येक माणूस मग तो अन्यायाचा बळी असो वा नसो, अन्यायाच्या परिमार्जनार्थ पीडितांना साथ द्यायला उभा राहतो.’ 

एकतर सरकार व त्याचे वैचारिक तसेच सामाजिक आधार मागास, सांप्रदायिक विचार-मनोवृत्तीचे आणि एकूण आत्मकेंद्रित्वाचा समाजातला उभार यांतून आज जात-धर्माच्या नावाने संकीर्ण वृत्ती बळावली आहे. तीत या सार्वजनिक विवेकबुद्धीचा बळी जातो आहे. फाळणीच्या वेळीही विवेकबुद्धी धोक्यात आली होती. पण नेहरु, गांधी, मौलाना आझाद नावाची शहाणी नेतृत्वं समाजावर प्रभाव गाजवत होती. बाबासाहेबांसारखे महामानव हे शहाणपण संविधानात आणि समाजात रुजवत होते. त्यांच्या शब्दाला समाजात किंमत होती. आज अशा नेतृत्वांची पूर्ण वानवा आहे. म्हणूनच आजचा धोका अधिक भयंकर आहे. 

भारतीय समाज त्याच्या अंगभूत सुज्ञतेतून अनेक पेचांतून मार्ग काढत आला आहे. नवी नेतृत्वं क्रमात तयार झाली आहेत. त्यावर भरवसा ठेवतोच आहे मी. पण आजची स्थिती बाबासाहेबांनी अपेक्षिलेल्या लोकशाही रक्षणाच्या दृष्टीने अजिबात आश्वासक नाही. उलट त्यांनी नमूद केलेले लोकशाहीला असलेले धोके अधिकच तरारुन पुढे आले आहेत. 

ही स्थिती कबूल करु. तरच त्यावर काही विचार करु शकू. 

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

(आंदोलन, डिसेंबर २०१९)