मोदींना वेळ तर द्या. त्यांच्यावर टीका करायची घाई का? ते वाईटच करणार आहेत कशावरुन? हा तुमचा पूर्वग्रह नाही का?... यारीतीचे प्रश्न आम्हा मोदींच्या टीकाकारांना विचारले जातात.
हे प्रश्न स्वाभाविक आहेत. पण रास्त नाहीत.
मोदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ प्रचारक होते. त्या कामाचा एक भाग म्हणूनच ते राजकारणात आले. आताही भाजपच्या अडवाणी, सुषमा स्वराज आदिंना बाजूला सारुन संघानेच भाजपचे नेतृत्व करण्यासाठी त्यांना निवडले आहे. आधी जनसंघ व नंतरचा भाजप ही संघाची राजकीय साधने आहेत. संघाचा आदेश प्रमाण मानणाऱ्या भाजपने किंवा मोदींनी संघपरिवाराच्या विचारांतला अमूक भाग आम्ही नाकारतो व अमूक स्वीकारतो, असे म्हटलेले नाही. म्हणजे संघाची उद्दिष्टपूर्ती करण्यासाठीच मोदी पंतप्रधान झाले आहेत.
जर माझा संघाच्या विचारांना पूर्ण विरोध असेल, तर त्यांचा कडवा सैनिक मोदी (व ते ज्याचे नेतृत्व करतात तो भाजप) यांच्या हातात देशाची सूत्रे असता कामा नयेत, अशीच माझी इच्छा राहणार. अर्थात भाजप लोकशाही प्रक्रियेतून निवडून आला आहे, तो लोकशाहीच्या प्रक्रियेतूनच पराभूत झाला पाहिजे, हे मी मानतो. त्यासाठी जनमत तयार करणे हा मोदींच्या टीकाकारांना लोकशाहीनेच दिलेला अधिकार आहे.
मोदींच्या नेतृत्वाखालचे सरकार जे निर्णय घेईल, ते सगळे वाईटच असतील, असे अजिबात नाही. उलट, आधीच्या सरकारपेक्षा त्यांच्या कारकीर्दीत अधिक वेगाने विकास होण्याचीही शक्यता आहे. ज्या योजना आधीच्या सरकारने आणल्या, परंतु, त्यांची अंमलबजावणी नीट झाली नाही, त्या अधिक परिणामकारकपणेही अमलात येऊ शकतात.
मग तरीही आम्ही टीकाच करणार का? या बाबतीत टीका करण्याचा प्रश्नच नाही. उलट जे चांगले झाले त्याला चांगलेच म्हणणार. छत्तीसगडमध्ये रेशनची योजना ज्या परिणामकारकपणे राबवली जात आहे, त्याचा मी प्रशंसक आहे. तसे लेखही मी लिहिले आहेत. ज्यांच्या पुढाकाराने हे घडले ते मुख्यमंत्री रमणसिंग भाजपचे आहेत, ही बाब अशी प्रशंसा करताना मला अडचणीची वाटली नाही.
मात्र, विकास हा देशाच्या प्रगतीचा एकमेव मापदंड नाही. या विकासाचे न्याय्य वाटप, देशाची एकात्मता-अखंडता, जनतेतील बंधुता, सर्वधर्मसमभाव, सामाजिक न्याय व सद्भाव, अल्पसंख्याकांची सुरक्षितता, स्त्रियांना समान अधिकार, लोकशाहीचा विस्तार, उपेक्षितांना झुकते माप, पुरोगामी इतिहास व परंपरांचा आदर, आंतरराष्ट्रीय शांतता व साहचर्य इ. सारख्या मूल्यांची जोपासना देशात कशी होते यावर देशाची खरी संपन्नता अवलंबून आहे. संघाची विचारधारा अशा संपन्नतेला अडथळा आहे, अशी माझी धारणा आहे. आणि अशा विचारधारेचे मोदी जोवर वाहक आहेत, तोवर त्यांच्या विकासाच्या पावलांचे स्वागत करुनही मी त्यांचा विरोधक राहणार.
- सुरेश सावंत
No comments:
Post a Comment