९०-९१ साल असावे. मी डॉ. माधव चव्हाणांबरोबर (सध्या'प्रथम'चे प्रमुख) साक्षरतेच्या आंदोलनात काम करत होतो. साक्षरतेसाठीचे संसाधन केंद्र ते जिथे शिकवत त्या माटुंग्याच्या UDCTत भीम रास्करांच्या नेतृत्वाखाली चालत होते. या केंद्राचा मीही एक भाग होतो.
एके दिवशी तेथील फोन खणखणला. मी उचलला. माझ्या 'हॅलो..' नंतर पलीकडून शांत, हळुवार स्वर आले, "मी वसंत गोवारीकर बोलतोय. माधव आहे का?" मी उडालोच. साक्षात वसंतराव गोवारीकर! तेही दिल्लीहून! तेव्हा दिल्लीचा फोन म्हणजे ट्रंक कॉल. भरभक्कम बिल व्हायचे. बोलणाऱ्या दोहोंपैकी कोणावर तरी त्याचा भार येणार. अशा ट्रंक कॉलचे मला नेहमीच दडपण यायचे. त्यात एका प्रचंड मोठ्या माणसाबरोबर मी बोलत होतो. त्यांची ख्याती शालेय जीवनापासूनच ऐकत आलो होतो. यावेळी ते पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार व भारत सरकारच्य विज्ञान व तंत्रज्ञान खात्याचे सचिव होते.
मी काही क्षण चाचरलो. पण गोवारीकरच इतक्या निवांतपणी व खास मराठीत बोलत होते की मीही सावरलो. माधव लेक्चरला की कुठे होता, ते सांगितले. त्यांनी माधवसाठी काहीतरी निरोप दिला.
खास मराठीत म्हणण्याचे कारण त्यात कोठेही इंग्रजी शब्द नव्हता. दिल्ली-परदेशी वावरलेली (आता तर कॉलेजला गेलेली बहुतेक सगळीच) माणसे मराठी असूनही मिंग्लिशमध्ये बोलताना दिसतात. गोवारीकरांच्या पिढीचेच बहुधा हे वैशिष्टय असावे. या व त्यांच्या आधीच्याही पिढीतील इंग्रजी शिक्षण घेतलेली-विशेषतः इंग्रजांच्या काळात शिक्षण घेतलेली मराठी माणसे एकावेळी एकाच भाषेत बोलताना मी पाहिली आहेत. इंग्रजीत बोलताना ती इंग्रजीतच बोलत. मराठीत बोलताना मराठीतच बोलत.
गोवारीकर व माधवचे संबंध तसे जुने. माधवचे वडील (लाल निशाण पक्षाचे) कॉ. यशवंतराव चव्हाण व गोवारीकर यांचा स्नेह-परिचय बहुधा कोल्हापूरच्या त्यांच्या लहानपणापासूनचा. गोवारीकरांच्या मुंबईत माधव (व बहुधा यशवंतरावांबरोबरही) दोन-तीन भेटी झाल्या. या भेटींत एकदा त्यांच्याबरोबर चेंबूरच्या आचार्य उद्यानाजवळील 'योगी' हॉटेलमध्ये जेवायला गेल्याचेही खास लक्षात आहे. हे खास लक्षात राहण्याचे कारण म्हणजे योगी हे आमच्यादृष्टीने तेव्हाचे मोठ्या लोकांचे हॉटेल. वस्तीत राहणारे आम्ही लहानपणापासून त्या हॉटेलच्या अवतीभोवती फिरत असू. पण आत जाणे हमारे बस की बात नव्हती. आता ते किंवा त्यासारखी हॉटेले तशी मोठी वाटत नाहीत. अशा हॉटेलांत जाणे आता अगदी सहज नाही, पण खूप कठीणही वाटत नाही. असो.
चेंबूरला आमचे साक्षरतेचे काम ज्या चेंबूर-गोवंडी परिसरात चालले होते, त्या परिसरातील देवनार डंपिंग ग्राऊंडवर कचऱ्यापासून इंधन की काहीतरी करण्याचा एक प्रयोग चालू होता. तसेच लोखंडे मार्ग, लुंबिनी बाग येथील वस्त्यांत गोल आकाराच्या पे अँड युज तत्वावरच्या शौचालयांचा प्रयोग चालू होता. या दोन्ही प्रयोगांशी गोवारीकरांचा जवळून संबंध होता. काय ते आता विसरलो. पण आम्हाला प्रत्यक्ष त्यांनीच ही ठिकाणे फिरुन दाखवली. या दोन्ही प्रयोगांत आम्ही लक्ष घालावे, असे त्यांचे म्हणणे होते. त्यापैकी, गोल आकाराची शौचालये आमच्या-कोरो साक्षरता समितीच्या स्थानिक युवक व महिला कार्यकर्त्यांनी चालवायला घेतली. चळवळीतील कार्यकर्त्यांसाठी तो आर्थिक आधारही झाला. पुढे या कार्यकर्त्यांचीच संस्था करुन त्यांनाच ती सोपवण्यात आली. २५ वर्षे होत आली. आजही ती उत्तम चालू आहेत.
या परिसरात फिरताना ही शौचालये दिसली की वसंतराव गोवारीकरांची हटकून आठवण येई. त्यांचे संयत, ऋजू व्यक्तित्व व 'खास'मराठीतून बोलणे आठवे. आता तर ते अधिकच आठवेल.
...वसंतराव तुम्हाला आदरांजली!
- सुरेश सावंत
1 comment:
माधव चव्हाणांनी माझ्या टिपणावर प्रतिक्रिया म्हणून डॉ. वसंत गोवारीकरांविषयी दिलेली अधिकची माहितीः
वसंतरावांचे कुटुंब माझ्या आजोबांच्या घरी भाडेकरू होते. १९४२ मध्ये आधुनिक चरखा तयार केल्याबद्दल त्यांना पारितोषिक मिळाले होते. पुढे कैक वर्षांनी अमोनियम परक्लोरेट तयार करण्याचे देशी तंत्रज्ञान साधून त्यांनी भारताचा रॉकेटयुगातला प्रवेश स्वतंत्र आणि स्वाधीन केला. मान्सून संबंधातले त्यांचे काम ज्ञात आहे तसे अमोनियम परक्लोरेट संबंधातले नाही.
कचऱ्यापासून इंधनाचे गोळे तयार करायचे आणि लोकांसाठी शौचालये सुरु करायची अशी एकात्मिक योजना राजीव गांधी ह्यांच्या मान्यतेने गोवारीकरांनी सुरु केली होती. राजीव गांधीनी त्यांना सांगितले होते, हा पथदर्शी कार्यक्रम असेल; पण तो मोठ्या प्रमाणावर मुंबईभर राबविला जाईल हे पहा. इतर पथदर्शी कार्यक्रम लहान राहून अस्तंगत होतात, तसे ह्याचे होऊ नये. गोवारीकर त्यावेळी विज्ञान तंत्रज्ञान सचिव होते. त्यांनी त्यांच्या खात्यातून पैसा सी एम सी (कॉम्प्युटर मेंटेनन्स कॉर्पोरेशन) कंपनीद्वारे मुंबईत उतरविला. इस्रोतील त्यांच्या जुन्या सहकाऱ्यांना मुंबईत आणले. मुंबईच्या कचऱ्याचे इंधन तयार करण्याचे तंत्रज्ञान गोवंडी जवळच्या कारखान्यात तयार केले. आपल्या लोकांनी (साक्षरता आंदोलनातील कार्यकर्त्यांनी) शौचालये सहकारी तत्वावर स्वयंपूर्ण केली. आता पुढच्या टप्प्यावर जायचा प्रश्न होता.
सी सुब्रमन्यन त्यावेळी राज्यपाल होते आणि पवार मुख्यमंत्री. तरीही ही योजना नोकरशाही अडथळे आणि राजकीय पाठबळाची कमतरता ह्यामुळे पुढे गेली नाही. गोवारीकरांना त्याचा प्रचंड राग आला होता. शासनावर अवलंबून न राहता चालणारी शौचालये राहिली. पण सुलभच्या भ्रष्टाचारी पद्धती आणि परिणामी तयार झालेले अडथळे ह्यामुळे वाढली नाही. तोपर्यंत राजीव गांधी जाऊन दोन वर्षे झाली होती.
१९९४ नंतर त्यांच्या भेटी झाल्या. पण त्यांच्या योजनांमध्ये सामील होणे मला शक्य नव्हते आणि शिक्षणाच्या कामात काही मोठे करण्याची त्यांची तयार नव्हती. पुढल्या दहा वर्षांत त्यांनी खतांचा ज्ञानकोश तयार केला. फार महत्वाचे आणि कठीण काम केले, ज्याची सर्वसामान्य जीवनात जाणीव होत नाही. त्यानंतर त्यांनी राजीव गांधी सायन्स मिशनचे काम महाराष्ट्रात अंगावर घेतले. पण लाल फीत आणि गोवारीकर हे समीकरण काही जमेना. त्यातच त्यांना आजारपण आले. त्यानंतर माझा त्यांचा संपर्क पूर्णपणे तुटला.
Post a Comment