याकूबची फाशी रोखण्याचे, स्थगित करण्याचे सर्व प्रयत्न असफल होऊन अखेर ३० जुलैला सकाळी त्याला फासावर चढवले गेले. याकूबची फाशी जाहीर झाल्यानंतर ज्या घमासान चर्चा प्रसारमाध्यमांवर व लोकांत सुरु झाल्या, त्याने मला खूप अस्वस्थ व्हायला झाले होते. भविष्यातील अशुभाच्या सावल्या माझ्याभोवती घोंगावू लागल्या होत्या. काही करुन ही फाशी टळावी, किमान पुढे जावी अशी मनोमन आस धरुन होतो. फाशीच्या आधीची ती रात्र अनेकांप्रमाणे मीही झोपेविना काढली. सर्वोच्च न्यायालयात चाललेल्या शेवटच्या सुनावणीच्या निकालाची मी धडधडत्या अंतःकरणाने वाट पाहत होतो.
५ वाजता निकाल लागला. शेवटची आस संपली. हतबल होऊन अंथरुणावर आडवा झालो. नागपूरच्या जेलमध्ये काय चालू असेल याचे चलत्चित्र माझ्या डोळ्यांसमोर सुरु झाले. माणूस मरतो. नैसर्गिकरित्या वा अपघाताने. पण त्याची नक्की तारीख, वेळ ठाऊक नसते. खून होतो, तेव्हा त्याचे काहीएक नियोजन असते. पण त्याचीही अगदी अचूक वेळ क्वचितच असू शकते. आणि असली तरी ती त्या खूनाच्या कारस्थान्यांना व प्रत्यक्ष खून करणाऱ्यांनाच ठाऊक असते. ज्याचा खून होणार आहे त्याला किंवा इतरांना ती ठाऊक असण्याचा प्रश्नच येत नाही. इथे मात्र अख्ख्या जगाला व ज्याचा मृत्यू होणार आहे त्यालाही मृत्यूच्या अंमलबजावणी करणाऱ्यांइतकीच वेळेची माहिती आहे. कितीही मोठा गुन्हेगार असला तरी तो एक माणूस आहे व एक माणूस आपल्यासमोर आता मरणार आहे व आपण काहीही करु शकत नाही. नुसतेच साक्षी राहणार आहोत. हे सगळे भयानक होते. कसाब किंवा अफजल गुरुप्रमाणे आपल्या नकळत हे झाले असते व झाल्यावर आपल्याला कळले असते, तर किती बरे झाले असते, असे राहून राहून वाटत होते. याकूबला फासावर दिल्याचे टीव्हीवर जाहीर झाले व निःश्वास टाकला. झाले. याकूब (मरायला नको होता तरीही) एकदाचा मेला.
अधीरता, धाकधूक संपली. पण अशुभाच्या सावल्या घोंगावत होत्याच. याकूबचा मृतदेह माहीमला त्याच्या कुटुंबाच्या मूळ घरी आणणार होते व तेथून मरीन लाईन्सच्या बडा कब्रस्तानमध्ये दफनासाठी नेणार होते. अशुभाचा अंदाज घेण्यासाठी मी माहीमला गेलो. पण मी पोहोचण्याच्या १० मिनिटे आधीच वरळी सीफेसमार्गे याकूबचे शव नेण्यात आले होते. आता होता तो जागोजाग पोलीस बंदोबस्त. विरळ लोक. विरळ वाहने. मी आमच्या रेशनिंग कृती समितीच्या तेथील कार्यकर्त्यांना भेटलो. त्यांच्यासोबत बोललो. त्यांच्यासोबत याकूबच्या घराच्या परिसरात हिंडलो आणि नंतर माहीम स्टेशनवरुन लोकल पकडून मरीन लाईन्सच्या बडा कब्रस्तानला गेलो. बडा कब्रस्तानमधून अंत्यविधी उरकून लोक शांतपणे बाहेर पडत होते. रस्त्यावर, स्टेशनवर दिसणाऱ्या या लोकांची संख्या लक्षणीय होती.
मी जाण्याच्या आधीच सगळे झाल्याने स्वानुभवावरुन काही अंदाज बांधणे कठीण होते. पण माहीमच्या आमच्या कार्यकर्त्यांशी जे बोलणे झाले त्यातून काही अंदाज घेणे शक्य झाले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे याकूबच्या घराच्या व माहीम चर्चपर्यंतच्या परिसरात हजारो लोक जमले होते. हे लोक फक्त माहीमचे नव्हते. खूप लोक बाहेरुन आले होते. ते ‘याकूब मेमन अमर रहे’च्या घोषणा देत होते. स्त्रिया अशा प्रसंगात कमी असतात. पण इथे स्त्रियाही लक्षणीय होत्या. त्याही घोषणा देत होत्या. आमच्या या कार्यकर्त्यांना हा माहौल नवीन होता. त्यांना वातावरणात खूप ताण व काहीशी भीतीही जाणवत होती. याकूब मेमनच्या घराजवळ राहणाऱ्या एका कार्यकर्तीशी बोललो. तिच्या म्हणण्यानुसार याकूब मेमन गुन्हेगार होता हे कोणाच्याही गावी नव्हते. मुस्लिम म्हणून त्याला लक्ष्य करण्यात आले, इतर समाजाच्या तुलनेत आम्हाला असेच लक्ष्य करण्यात येते, अशी रागाची भावना लोकांच्या मनात ठसठसते आहे. हे ठसठसणे काय रीतीने बाहेर येईल, याबाबत या कार्यकर्तीला भय वाटते.
मी हा अनुभव, माझी मनःस्थिती फेसबुकवर व व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर केली. काही प्रतिक्रिया लेखी, काही तोंडी आल्या. माझ्या भावनांशी सहानुभाव दर्शवणाऱ्या, चिंता प्रकट करणाऱ्या प्रतिक्रिया आल्याच. पण जास्त करुन २५७ लोक मारणाऱ्या एका गुन्हेगाराला फाशी दिल्याचे तुम्हाला का वाईट वाटावे?, अशांना फाशीशिवाय दुसरी काय शिक्षा योग्य होती?, गुन्हेगाराच्या बाजूने अमर रहेच्या घोषणा दिल्याच कशा जातात?, या घोषणा देणारे, फाशीची शिक्षा टळावी-स्थगित व्हावी म्हणून प्रयत्न करणारे हे देशद्रोही नव्हेत का?…या प्रश्नांचा भडिमार अधिक होता.
सगळ्यांशी नाही, पण जे जवळचे होते व जे तरुण होते, अशांशी जाणीवपूर्वक बोललो. त्यांचे म्हणणे समजून घेतले. माझे म्हणणे समजवण्याचा प्रयत्न केला. ते सगळे या लेखाच्या मर्यादेत नोंदवणे कठीण आहे. काही ठळक बाबी नोंदवण्याचा प्रयत्न करतो.
एक नक्की. जे गांधी-नेहरुंच्या व त्या नंतरच्या पिढीच्या वाट्याला आले, ९२-९३ ला आमच्या अनुभवाला आले, त्यापासून पुढच्या पिढीचीही सुटका नाही. हिंदू-मुस्लिम तेढीची ही भळभळती जखम घेऊन हा अश्वत्थामा अजून किती पिढ्या हिंडणार आहे, ठाऊक नाही.
आमच्या किशोर व तरुण अवस्थेत सामाजिक व लिंगभेद, आर्थिक विषमता व शोषण, विकासाचे न्याय्य वाटप या प्रश्नांना आम्ही सामोरे जात होतो. हेच आपल्या पिढीचे ध्येय राहणार असे मानून चाललो होतो. पण बघता बघता बाबरी मशीद-रामजन्मभूमीच्या प्रश्नाने वातावरण धुमसू लागले. इतर कामे बाजूला ठेवून धार्मिक सलोखा राखण्याचे काम आम्हाला प्रधान मानावे लागले. पुढच्या पिढीलाही ते करावे लागणार आहे. भौतिक प्रश्नांच्या लढाईबरोबरच किंबहुना अधिक या प्रश्नाकडे लक्ष द्यावे लागणार आहे.
आमच्या एका तरुण कार्यकर्तीला माझी ही चिंता जास्तीची वाटली. तिने मनाने सावरण्याचा मला सल्ला दिला. तिला मी लिहिले- ‘मी सावरलो आहे. स्थिर झालो आहे. पण ९२-९३ ला बाबरी मशीद कोसळल्यावर जो उत्पात झाला, त्यावेळी शब्दशः रक्ताची थारोळी ओलांडत व हंबरडे ऐकत धारावी-शिवाजी नगरमध्ये आम्ही कार्यकर्ते म्हणून हिंडत होतो, सांत्वनाचे लंगडे प्रयत्न करत होतो. मदत गोळा करत, वाटत होतो. बेपत्ता नवरे-मुलांना हवालदिल होऊन शोधणाऱ्या बायांना सहाय्य करत होतो. जळलेली घरं उभी करण्यासाठी आधार देत होतो. दोन्ही समाजांना हात जोडून आपापल्या घरी निर्धोक मनाने परतण्याचे आवाहन करत होतो…हे सगळं आठवतं. आणि त्याच्या आधीची लालकृष्ण अडवाणींची विष ओकत जाणारी रथयात्रा आठवते. बाळासाहेब ठाकरेंची जहरी भाषणे आठवतात. गोध्रानंतर अहमदाबादला आचार्य धर्मेंद्रचे सेक्युलर व कम्युनिस्टांना कापून काढण्याचे सभेतले आवाहन ऐकून सभेला हजर असलेल्या आमचा कसा थरकाप झाला होता ते आठवते. …असे खूप काही आठवत जाते आहे. तुम्हाला या आठवणी न मिळोत यासाठी आतडे काहीसे पिळवटते, हे खरे. पण त्यास नाईलाज आहे.’
याकूबच्या फाशीमुळे असे काही होईल, असे या तरुण मंडळींना वाटत नव्हते आणि तसे काही अजून झालेही नाही. मग ९२-९३ च्या पुनरावृत्तीची ही भीती आम्ही उगीचच घालतो, असे त्यांना वाटू शकते. दूधाने तोंड भाजलेले आम्ही ताकही फुंकून पितो, हे खरे. पण आताचे हे केवळ ताक आहे, असे मला वाटत नाही. सर्वसामान्यांना आपली रोजीरोटी मिळवण्यासाठी समाजात शांतता राहावी, असेच वाटत असते. जुने अनुभव शहाणपणाही देतात. पण मनात आत जे साचत जाते, त्याचा निचरा झाला नाही, तर त्याचा उद्रेक कधी ना कधी होणारच. श्रीकृष्ण आयोगाने ज्यांना दोषी ठरवले, त्या हिंदू नेत्यांवर ना भाजपने ना काँग्रेसच्या सरकारने काही कारवाई केली, गोध्रानंतरच्या खुनाखुनीला जबाबदार गुन्हेगारांना तुम्ही केवळ जन्मठेपच मागता, ओरिसात ख्रिश्चन बाप-मुलींना त्यांच्याच गाडीत निर्घृणपणे जिवंत जाळणाऱ्या दारासिंगची फाशी जन्मठेपेत रुपांतरित होते, राजीव गांधींच्या खुन्यांची फाशी लांबणीवर तर पडतेच, शिवाय शिक्षा माफ करण्याचाही राज्यसरकार प्रयत्न करते. मालेगाव स्फोटाचा खटला सौम्य करण्याचा सल्ला सरकारी वकिलांना सरकार देते. समझौता एक्सप्रेसमधील स्फोटाच्या गुन्हेगारांविरोधातले साक्षीपुरावे दुबळे केले जातात. हा दुजाभाव आमच्याशी केला जातो. आम्हाला या देशात समान अधिकार दिला जात नाही, ही भावना कधी ना कधी उफाळून येणारच. ९३ च्या बॉम्बस्फोटात अशाच भावनेचे बळी असलेले मुस्लिम तरुण बदला घेण्याच्या उद्देशाने सहभागी झाली होते. स्फोट घडवणारे दोषी आहेतच. पण स्फोटासाठी भावना भडकावणाऱ्या दारुचा पुरवठा करणाऱ्या रामजन्मभूमी आंदोलनाच्या नेत्यांचे काय करायचे? ते नामानिराळे राहिलेत. न्याय सगळ्यांना सारखा नाही, या मुस्लिम समाजाच्या भावनेचा याकूब प्रतीक झाला. त्याच्या अंत्यविधीला हजारोंची हजेरी त्यामुळेच होती. फाशीची तारीख जाहीर करुन, ती बरोबर त्याच्या वाढदिवसाचीच धरुन, त्यानिमित्ताने जोरदार चर्चा उसळतील याची तजवीज करुन भाजप सरकारने या प्रतीकनिर्मितीला जाणीवपूर्वक चालना दिली. मुस्लिमांना ओवेसीच आपला तारणहार वाटून ते त्याच्याभोवती केंद्रित व्हावेत व हिंदू सेक्युलर पक्ष-संघटनांना झिडकारुन भाजपभोवती गोळा व्हावेत, हा डाव यामागे असणार. संघपरिवाराचा इतिहास पाहता ही शंका निराधार नाही.
बुद्धिवादी पुरोगाम्यांनी फाशीची शिक्षाच नको ही चर्चा टीव्हीवर नको इतकी व अवेळी केली. तिच्या परिणामी तुम्ही याकूबचे समर्थक आहात, असा सामान्य हिंदूंना अर्थ लागला. फाशी ही आधुनिक जगात पूर्णपणे गैर आहे, असेच माझे म्हणणे आहे. आधुनिक जगात शिक्षा ही गुन्हेगार सुधारावा म्हणून, समाजाला त्याचा त्रास होऊ नये यासाठी त्याला वेगळे ठेवावे म्हणून दिली जाते. त्यात सूड किंवा बदल्याची भावना नसते. न्यायाधीश ही अनेक संस्कारांनी बद्ध असलेली व स्खलनशील माणसेच असतात. त्यांनी दिलेली शिक्षा भविष्यात कधीतरी चुकीची आहे, असे सिद्ध होऊ शकते. जन्मठेपेत कधीतरी हा न्याय शिक्षा भोगणाऱ्याच्या वाट्याला येऊ शकतो. फासावर दिल्यास त्याची या न्यायाची संधी पूर्णतः संपते. तसेच फाशीमुळे गुन्हे कमी झालेत, असा जगातील अनुभव नाही. म्हणूनच जगातील अनेकानेक देश फाशीच्या शिक्षेला पूर्णविराम देत आहेत. भारतानेही त्या दिशेने जायचे तत्त्वतः कबूल केले आहे. त्यामुळेही एक माणूस म्हणून याकूब मारला जाणार याचा मला विलक्षण त्रास झाला. पण आज फाशीची तरतूद आपल्याकडे आहे. याकूबचा गुन्हा हा फाशीला पात्र नसेल तर तो तसा का नाही किंवा फाशीला अजून स्थगिती मिळणे का गरजेचे आहे, इतर समाजाच्या गुन्हेगारांना व मुस्लिम समाजाच्या गुन्हेगारांना वेगळा न्याय का, हेच प्रश्न ऐरणीवर येणे निकडीचे होते. काळाचा संदर्भ खूप महत्वाचा असतो. भगतसिंग-सुखदेव-राजगुरु या त्रयींच्या फाशीनंतर फाशी ही शिक्षाच स्वतंत्र भारतात असणार नाही, असा १९३१ च्या कराची काँग्रेसमध्ये नेहरु-गांधी ठराव करतात. गोडसेने गांधींचा खून केल्यानंतर हा ठराव बाजूला सारला जातो व आंबेडकरांसारखी अनेक मंडळी विरोधात असतानाही १९४८ साली घटना समितीत फाशीची शिक्षा स्वीकारली जाते. राष्ट्रीय सहमतीत आपण पुढे गेलेले मागे येतो. तुम्ही गुन्हेगाराला पाठीशी घालता, मुस्लिम समाजाचा अनुनय करता, ही पुरोगाम्यांविषयीची हिंदू समाजात निर्माण होणारी, केली जाणारी भावना दूर करणे, हे मोठे आव्हान आहे.
दैनंदिन व्यवहार सुकर होण्यासाठी समाजात शांतता हवी. त्यासाठी सामाजिक सद्भाव हवा. या सद्भावासाठी अल्पसंख्याक समुदायाला सुरक्षित वाटेल ही बहुसंख्याकांची जबाबदारी असते. धर्मांधता, विद्वेष पसरवणारे, अतिरेकी कारवाया करणारे बहुसंख्याक असोत की अल्पसंख्याक दोहोंना समान विरोध हवा. कोणत्याही प्रकारे एकाचे लाड होत आहेत व दुसऱ्याशी दुजाभाव केला जातो आहे, ही भावना तयार होता कामा नये. दुबळ्यांना विकासासाठी सवलती देताना त्यामागचा तर्क इतरांना पटवून देत राहायला हवे. देशाची उभारणी व वाटचाल यासाठी दिशादिग्दर्शक असलेली संविधानाच्या सरनाम्यातील मूल्ये समाजात खोलवर रुजवणे हे आपले परमकर्तव्य असायला हवे. आपण लोकशाही म्हणून टिकलो आहोत, हे आपले मोठेपणच आहे. पण ही लोकशाही अर्थपूर्ण करण्याच्यादृष्टीने आपण सजग व कृतिशील आहोत, असे म्हणवत नाही. तसे झालो तरच अशुभाच्या सावल्या विरत जातील व मेल्यावरही समाजाला झपाटत राहणाऱ्या याकूबसारख्यांच्या भुतांना गती मिळेल.
– सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com
_____________________________________________
साभारः आंदोलन शाश्वत विकासासाठी, सप्टेंबर २०१५
No comments:
Post a Comment