Saturday, April 30, 2016

मला आनंद कसला व्हावा- 'माझा' धर्म स्वीकारल्याचा की पटलेला धर्म स्वीकारण्याच्या त्यांच्या धाडसाचा?

रोहित वेमुलाच्या आई व भावाने बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्यानंतर माझी एक जुनी पोस्ट आठवली. नव्या संदर्भात ती परत इथे टाकत आहे.
___________

मला आनंद कसला व्हावा- 'माझा' धर्म स्वीकारल्याचा की पटलेला धर्म स्वीकारण्याच्या त्यांच्या धाडसाचा?
___________

मला मध्यंतरी एक SMS आला.
'I am proud that I am Buddhist - Steve Jobs'
SMS पाठवणारा मित्र बौद्ध होता.
वाचले आणि मला आनंद झाला. अभिमानही वाटला.
असाच आनंद व अभिमान सुरेश भट व रुपाताई कुलकर्णींनी बौद्ध धर्म स्वीकारल्याचे कळले तेव्हा झाला होता.
पण आता मी सावध झालो. विचार करु लागलो...मला कसला आनंद झाला ? ...मला कसला अभिमान वाटला?
लक्षात आले - मीही बौद्ध आहे. स्टीव्ह जॉब्ससारख्या जागतिक कीर्तीच्या कर्तृत्ववान व्यक्तीने माझा धर्म स्वीकारला याचा हा आनंद व अभिमान होता.
समजा माझा नसलेला दुसरा धर्म स्टीव्ह जॉब्सने स्वीकारला असता तर माझ्या भावना अशा नसत्या. माझ्या बौद्ध मित्रानेही बहुधा तो SMS पाठवला नसता.
मी अजून विचार केला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात उपासना स्वातंत्र्य बहाल केले आहे. खरे तर भारतीयांना मिळालेला हा हक्क जगातल्या प्रत्येक व्यक्तीचा आहे. तो मानवी अधिकारच आहे. उपासना स्वातंत्र्य हे कळत्या वयात विचारपूर्वक उपभोगावयाची बाब आहे. मग माझ्या वडिलांचा धर्म केवळ मी त्यांच्या पोटी जन्माला आलो म्हणून माझा कसा काय होऊ शकतो ? जाणतेपणी मी विविध धर्मांचा समज घेतला व नंतर माझ्या वडिलांचा धर्म मला योग्य वाटला तर मी तो कायम ठेवेन; न पटला तर सोडेन व दुसरा पटलेला स्वीकारेन किंवा धर्महिन राहिन. खरे म्हणजे असेच व्हायला हवे. आधुनिक काळात 'जन्मजात धर्म' हा प्रकार असता कामा नये.
मला वाटते, स्टीव्ह जॉब्स आधुनिक आहे. त्याने 'जन्मजात धर्म' ही संकल्पना नाकारली व त्याला पटलेल्या धर्माचा जाणतेपणी स्वीकार केला. पूर्वजांकडून आलेली उपासना नाकारुन स्वतःला पटलेल्या उपासनेचे स्वातंत्र्य बजावणे ही मोठ्या धैर्याची गोष्ट असते. स्टीव्ह जॉब्स, सुरेश भट, रुपाताई कुलकर्णी आणि मुख्य म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हे धैर्य दाखवले.
स्टीव्ह जॉब्सने माझा धर्म स्वीकारला म्हणून नव्हे, तर त्याला पटलेला धर्म स्वीकारायचे धाडस दाखवले, याचा आनंद व अभिमान वाटायला हवा.
- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

Tuesday, April 19, 2016

सोहळ्याबरोबर चिकित्साही करुया


आज बाबासाहेबांची १२५ वी जयंती. आज सुरु होणारा दिमाखदार सोहळा पुढचा आठवडा-खरं म्हणजे मे महिन्याच्या अखेरीपर्यंत म्हणजे दीड महिने चालणार आहे. गेले दोन महिने प्रचंड उत्साहात तयारी चालू होती. कुठे १२५ फुटी भला थोरला कटआऊट, कुठे १२५ फुटी रांगोळी, झगमग रोषणाई, मिरवणुकीसाठी डीजेवाल्यांना ऑर्डर, आठडाभराच्या करमणुकीच्या कार्यक्रमांसाठी टीव्ही-सिनेमा फेम गायक-वाद्यवृंदांना सुपाऱ्या याची काय लगबग सुरु होती! आजपासून या तयारीचा, तयारी करणाऱ्यांच्या प्रचंड ऊर्जेचा आविष्कार सुरु होणार. या साऱ्यातून बाबासाहेब किती महान होते, हे सतत दुमदुमत राहणार. पण महान म्हणजे नक्की काय होते, त्यांची शिकवणूक समाज आज कशी अमलात आणतो आहे, आपल्यात कोणत्या उणिवा राहिल्या आहेत, कोणती नवी आव्हाने समोर आहेत, त्यांना बाबासाहेबांच्या विचारप्रणालीतून कसे तोंड द्यायचे...या बाबींचा आढावा, मूल्यांकन केले जाईल का? खात्रीने हो म्हणता येणार नाही. याला कारण आंबेडकरी चळवळीची वाताहत. दिशाहिनता. कधी नव्हे एवढी ही वाताहत आपल्या उद्धारकर्त्याच्या १२५ व्या जयंतीवेळी झालेली पाहायला मिळते आहे. वास्तविक, हीच वेळ आत्मचिकित्सेची मानायला हवी. कठोरपणे स्वतःला तपासायला हवे आणि पुढची दिशा व कार्यक्रम आखायला हवा. तरच बाबासाहेबांचा हा शतकोत्तर रौप्यमहोत्सव खऱ्या अर्थाने साजरा झाला, असे म्हणता येईल. सोहळा व चिकित्सा एकाचवेळी होऊ शकते. जे कोणी असे करु इच्छितात, त्यांच्यासाठी नमुन्यादाखल हे काही मुद्दे:
आंबेडकरी समूहात जे काही बदलते आहे, ते सर्वस्वी त्याचे वैशिष्ट्य नाही. भोवतालच्या समाजात जे वारे वाहते आहे, ते त्याच्याही काना-डोक्यात शिरत आहे. शिवाय काही बाबी खास त्याच्या स्वतःच्याही आहेत. गणपती-दहिहंडी-शिवजयंतीला जर २४ बेस डिजेच्या तालावर लोक बेहोश होत असतील, फटाक्यांची आतषबाजी, रोषणाईचा झगमगाट हेच उत्सवाच्या यशस्वीतेचे मानदंड ठरत असतील; तर मग आंबेडकर जयंतीही त्याच मानदंडांवर साजरी होणार. सगळंच आवाजी-झगमगाटी असेल, तर जयंतीही तशीच असणार. इतर जर कायदा उल्लंघत असतील, तर मग आम्ही का मागे सरायचे, ही बेफिकीरी येते. अजूनही दलित-आंबेडकरी समुदायाच्या वाट्याला अत्याचार, अवमान, दुजाभाव येत असल्याने या बेफिकीरीला विद्रोहाचाही एक आयाम असतो, हे विसरुन चालणार नाही.
पण त्यामुळे हे योग्य ठरत नाही. ते सिगरेट ओढतात-दारु पितात ते चालते; मग मी हे केले तर काय वावगे झाले, हे समर्थन गैर आहे. जे कोणालाच हितावह नाही, ते दुसरा करतो म्हणून आपण करण्याने आपल्याला हितावह ठरत नाही.
हे लिहिताना जुन्या काळी सगळं कसं आदर्श होतं आणि आताच सगळं ढासळत चाललं आहे, असा माझा आविर्भाव मुळीच नाही. आवाजाचे-रोषणाईचे तंत्र व आर्थिक क्षमता आजच्याच तेव्हा असत्या तर डीजे व थाटमाट तेव्हाही दिसणे अशक्य नव्हते. १३ एप्रिलच्या मध्यरात्री १२ वाजल्यानंतर १४ तारीख सुरु झाली की लाऊडस्पीकरचे भोंगे जे उद्धरली कोटी कुळे-भीमा तुझ्या जन्मामुळेगायला लागायचे त्याने बिगर आंबेडकरी माणसाची खाडकन झोपच उडायची. ती त्या रात्री तरी पुन्हा लागणे कठीण होते. आमच्या अंगावर रोमांच उभे राहत, ते आम्ही त्या समाजाचे होतो म्हणून. आम्ही कोणी, खास करुन मुले त्या रात्री झोपतच नसू. पताका लावणे, भिंतीवर बाबासाहेबांच्या प्रतिमा रंगवणे, मंडपात पाणी मारणे, फलकावर जयंतीचा कार्यक्रम लिहिणे यात आम्हाला परमानंद मिळायचा. आता ही अनेक कामे पैश्यांनी आऊटसोर्स केली जातात.
फरक पडला आहे, तो प्रेरणांत. विचारांत. जीवनबदलाची एक विलक्षण ऊर्जा आमच्या धमन्यांतून सळसळत असायची. बाबासाहेबांचा ईश्वराला, आत्म्याला, पर्यायाने पुनर्जन्माला, चमत्कारांना नकार, बुद्धाचे स्वतः माणूस असणे, माणसाला मध्यवर्ती कल्पिणे, स्वतःला मोक्षदाता नव्हे, तर मार्गदाता म्हणणे, भोवतालचा अंधकार दूर होण्यासाठी अत्त दीप भव (स्वतःच दीप हो) हा स्वावलंबनाचा संदेश देणे, शाळेत शिकत असलेल्या विज्ञानाशी बुद्धविचारांची सुसंगतता दिसणे, सब्बे सत्ता सुखि होन्तु च्या घोषात फक्त आपल्याच समाजाची नाही, तर अख्ख्या मानवतेच्या मांगल्याची कामना करणे...या सगळ्या भावना-जाणिवा त्या रात्री मनात एकवटायच्या. आम्ही खालचे, मागास नाही; तर बुद्ध-आंबेडकरी विचारांची एक प्रचंड श्रीमंती आमच्यात आहे, या जाणीवेने ती रात्र व पुढचे अनेक दिवस आम्ही तरंगत असू.
या प्रेरणा, जाणिवा आता आहेत, असे दिसत नाही. किमान सार्वत्रिक तरी नक्की नाहीत. अर्थात आमच्या वेदनांचा अनुभव वा त्यांची तीव्रता आताच्या मुलांमध्ये नाही, हेही कारण आहेच. पण नफा-नुकसानीच्या भाषेत बोलायचे, तर आर्थिक-भौतिक अभावग्रस्ततेत लक्षणीय घट झाली असली तरी जाणिवांचे दारिद्र्य हे खूप मोठे नुकसान आहे. बैलगाडीत बुद्ध-बाबासाहेब-फुल्यांच्या प्रतिमा व लेझिम अशा मिरवणुकांच्या जागी डीजेचा आवाजी, झगमगाटी बदल हे एकवेळ चालू शकेल. पण त्यावेळी होणाऱ्या व्याख्यानमाला आता अपवादानेच होतात. आंबेडकर, गांधी, मार्क्स यांतील मतभेद कोणते, मूर्तिपूजा नाकारणाऱ्या बुद्धाची मूर्ती बाबासाहेबांनी स्वीकारण्यामागचे कारण काय, देवाची पूजा आणि बुद्धाची पूजा यातला फरक, अगरबत्ती, मेणबत्ती, फुले यांचे प्रतीकात्मक अर्थ, मंगळसूत्र घालायचे की नाही, कुंकू लावायचे की नाही...अशा चर्चांनी तेव्हा रात्री उजाडायच्या. बोलणारे बोलायचे. बाकीचे रस घेऊन ऐकत असायचे. आताच्या मुलांना हे प्रश्न ग्रासतात, असे दिसत नाही. स्मार्ट फोनवर बाबासाहेबांची पूजा बांधणारे अविवेकी संदेश, फोटो मात्र शेअर होत असतात. विभूतिपूजेच्या विरोधात असलेल्या बाबासाहेबांची गर्व से कहोचालीवर यथासांग डिजिटल पूजा होत असते. एक जीवनप्रणाली, जीवन व चळवळ उन्नत करण्याचे वैचारिक साधन याअर्थाने बाबासाहेबांनी बौद्ध हा धर्म नसून धम्म आहे, असे म्हटले होते. आज त्याला व्यवस्थित धर्माचे स्वरुप आले आहे. त्याच्याविषयी थोडे अधिक बोलू.
बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची दीक्षा १४ ऑक्टोबरला दिली आणि जेमतेम दीड महिन्यात ६ डिसेंबरला त्यांचे महापरिनिर्वाण झाले. बौद्ध धम्माच्या आचरणाविषयी त्यांना नीट आखणी करायला तसा वेळच मिळाला नाही. काही तयारी त्यांनी आधीपासून केली होती. त्यामुळे किमान बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ सिद्ध झाला. विधिंविषयी वगैरे काही भाषणांत उल्लेख केलेले होते. त्या सगळ्याबाबत बाबासाहेबांच्या नंतरच्या नेत्यांनी एकवाक्यतेने काही ठरवायला हवे होते. राजकीय बाबतीतला त्यांचा कर्मदरिद्रिपणा इथेही दिसतो. धार्मिक संस्था निघाल्या. पण त्याही बव्हंशी राजकीय पंखाखालीच राहिल्या. धार्मिक बाबतीत दिशादिग्दर्शन करणारी आंबेडकरी बौद्धांची मध्यवर्ती मान्यता असलेली एकच एक संस्था नाही.
बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाचे काही ठिकाणी ग्रंथ लावल्यासारखे पठन केले जाते. या ग्रंथाची पारायणे केलेले लोक मला भेटतात. पण या ग्रंथातला नेमका एक भाग वाचायचा विसरतात, तो म्हणजे परिचय. ग्रंथाच्या प्रारंभी असलेल्या या छोटेखानी परिचयात बाबासाहेब बौद्ध धम्माच्या प्रसारात ज्यामुळे अडथळा येतो असे काही मूलभूत प्रश्न उपस्थित करतात. त्या सगळ्यांचा इथे उल्लेख करत नाही. फक्त एकच करतो. तो म्हणजे भिख्खू संघाचा. त्यांच्या काळातील पारंपरिक भिख्खूंचे ऐषारामी राहणे त्यांना खटकत असे. भिख्खूंचे समाजापासून तुटणे हे बौद्ध धर्माच्या ऱ्हासाचे एक कारण ते समजत. ते भिख्खूंच्या भूमिकेविषयी साशंक होते. तो एक पूर्णपुरुष असेल तर समाजाला त्याचा काही उपयोग नाही, भिख्खू हा सामान्य माणसाचा मित्र, तत्त्वज्ञ व मार्गदर्शक असायला हवा, असे ते या परिचयात म्हणतात. त्यांच्या दृष्टीने तो एक पूर्णवेळ कार्यकर्ता आहे. तो उच्चासनावर बसणारा, विधी लावणारा पुरोहित नव्हे. बाबासाहेबांनी नागपूरला दीक्षासमारंभात महास्थवीर चंद्रमणींच्या हस्ते स्वतः पत्नीसह दीक्षा घेऊन परंपरेशी नाते जोडले. मात्र समोरच्या लाखोंच्या समुदायाला त्यांनी स्वतः दीक्षा दिली. चंद्रमणींच्या हस्तेच समाजाला दीक्षा दिली असती, तर दीक्षा किंवा कोणताही धार्मिक विधी करण्यासाठी भिख्खूचीच गरज असते, असे समाजाला वाटले असते व एक नवा चिवरधारी पुरोहित तयार झाला असता, असे बाबासाहेबांनी याचे स्पष्टीकरण दिले आहे. कोणीही उपासक कोणतेही विधी लावू शकतो. त्यासाठी भिख्खूची गरज नाही, हे सूत्र त्यांनी इथे समाजाला दिले. दीक्षा समारंभाला लाखो लोक होते. पण सगळा समाज काही तेथे नव्हता. त्याला कोण दीक्षा देणार? त्यासाठी दरेकाने दरेकाला दीक्षा द्यावी, असे त्यांनी सांगितले.  माझ्या वडिलांनी मुंबईच्या कामगार मैदानात झालेल्या दीक्षा समारंभात बॅरिस्टर भंडारेंच्या हस्ते दीक्षा घेतली.
आजही विधी लावण्याचे काम सामान्यांतलाच एकजण विधिकर्ता (बौद्धाचार्य असे चुकीचे नाव त्याला पडले आहे) म्हणून करतो. तथापि, थोडी अर्थसंपन्नता आलेला यजमान यासाठी भिख्खूला पाचारण करण्यात, त्याला उच्चासनावर बसवून, मंतरलेला धागा मनगटात बांधून विधी करण्यात प्रतिष्ठा मानताना दिसतो आहे. त्याचे अनुकरण मग सामान्य आर्थिक कुवतीचाही माणूस करताना आढळतो. बुद्धविचारांचे मार्गदर्शन, प्रवचन, प्रचार-प्रसार याच कामाला पूर्ण वाहून घेण्याऐवजी अशा विधी लावण्याच्या व त्यायोगे भरभक्कम दान प्राप्तीच्या कामांत भिख्खूंचे जथे सामील होताना दिसू लागले आहे. वंदामि भन्तेतील ज्येष्ठ मित्राला आदरार्थी करावयाच्या संबोधनात आता लीनता येऊ लागलेली आहे. यथावकाश भिख्खूंचे ऐषारामी मठ उभे राहिल्यास आश्चर्य वाटू नये. लग्न साधेपणाने करावयाचा बाबासाहेबांचा संदेशही उधळला जावू लागला आहे. थाटमाट व प्रतिष्ठेचे सगळे संकेत खास करुन मध्यम व उच्च मध्यमवर्गीय आंबेडकरी समुदायांत रुजायला सुरूवात झाली आहे. बुद्धाने प्रचारासाठी संस्कृतऐवजी पाली ही लोकभाषा निवडली. आज पाली लोकभाषा नाही. तरी विधिची सूक्ते पालीतच म्हटली जातात. त्यांचा मराठी अनुवाद करण्याचे प्रयत्न झालेच नाहीत असे नाही. पण काहीही कळले नाही तरी पालीत म्हणण्यालाच आज प्रतिष्ठा आहे.
प्रत्येक रिपब्लिकन गट म्हणतो माझा पक्ष बाबासाहेबांच्या खुल्या पत्रावर आधारित आहे. एकजातीय नव्हे, तर व्यापक समाजाचा, लोकशाही समाजवादाचा पुरस्कार करणाऱ्या रिपब्लिकन पक्षाची संकल्पना स्पष्ट करणारे बाबासाहेबांचे खुले पत्र (पहाः डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे – खंड २०) वाचण्याचा व त्याप्रमाणे आपले रिपब्लिकन गट वागत आहेत का, हे तपासण्याचे आपले काम आहे. आजवर नसेल झाले. पण आतातरी ते करुन आपली राजकीय चळवळ सबल करुया. सत्तालाभाच्या किरकोळ तुकड्यांसाठी प्रस्थापित पक्षांसमोर (काही तर घटना उध्वस्त करु पाहणाऱ्यांशी सोयरिक करुन) लाचार होणाऱ्या रिपब्लिकन नेतृत्वाला बाबासाहेबांच्या खुल्या पत्रातील कोणत्या मुद्द्याला धरुन तुम्ही ही सौदेबाजी करत आहात, असा जाब समाजाने आतातरी विचारायला हवा.
सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे लेखाची मर्यादा लक्षात घेता हे मुद्दे नमुन्यादाखल आहेत. समाज विचार करायला बसला तर असे अनेक मुद्दे नोंदवता येतील. शेवटी एकच आवाहन करतो. राज्यात, विशेषतः मराठवाड्यात भयंकर दुष्काळ पडला आहे. जयंतीच्या निधीचा १० टक्के हिस्सा आपण या दुष्काळ निवारणाच्या कामाला (किमान तेथील दलित वस्त्यांना तरी) देऊया. बाबासाहेबांनी संविधानाच्या प्रास्ताविकात खास भर देऊन नोंदवलेल्या बंधुता या तत्त्वाचा आम्ही अंगिकार करतो याचा महाराष्ट्राला परिचय देऊया.
-     सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

Monday, April 4, 2016

समन्वयाचा आग्रह नको; परस्परपूरकत्व शोधू


गांधी-आंबेडकर-मार्क्स हे त्रांगडे अजून काही सुटत नाही. उलट ते अधिकच तीव्र होते आहे की काय, असे वाटावे, असे पुरोगामी चळवळीतले सध्याचे वातावरण आहे. रोहित-कन्हैया प्रकरणाने तर आंबेडकर-मार्क्स वादाला नवी फोडणी बसली. या सगळ्या चळवळीकडे सजगपणे पाहणारा व त्यात सक्रीय सहभाग घेणारा एक कार्यकर्ता म्हणून या वादाकडे पाहताना मला काही केल्या कळत नाही की, आजच्या टप्प्यावर या वादाचे प्रयोजन काय? हे वाद ऐतिहासिक आहेत. ते तीव्र आहेत. त्यांचा निरास होण्याची सुतराम शक्यता नाही. मग तरीही या तिघांना एकत्र गुंफण्याचे कारण काय? हो. कारण आहे. या तिघांच्या उद्दिष्टांत सामायिक असणाऱ्या काही महत्वाच्या उद्दिष्टांना जोरदार धडका देणारी त्सुनामी सध्या उसळली आहे. जे सामायिक आहे, त्याच्या रक्षणासाठी या तिघांच्या वारसदारांनी एकजुटीत येणे ही काळाची गरज आहे. यात प्रत्येकाने आपल्या वैचारिक भूमिका पातळ करण्याचा, सोडण्याचा प्रश्न येत नाही. तसेच जे सामायिक आहे, त्यासाठी या तिघांच्या तत्त्वज्ञानाचा, वैचारिक भूमिकांचा समन्वय करत बसण्याचीही गरज नाही. गरज आहे ती केवळ परस्परपूरकता शोधण्याची. हा शोध मात्र प्रामाणिक व पारदर्शी असायला हवा. त्यात कोण कोणाला आपल्याकडे खेचते आहे, फशी पाडून आपल्या गोटात आणते आहे, असे वाटता कामा नये. खरं म्हणजे, आपल्याला खेचले जाते आहे, फशी पाडले जाते आहे, ही भावना आंबेडकरी कार्यकर्त्यांमध्येच प्रकर्षाने आहे. आणि ती निराधार नाही.

बाबासाहेबांचे भारताच्या राजकीय क्षितिजावर आगमन झाले, त्यावेळी गांधीजींचा सूर्य मध्यान्ही तळपत होता. बाबासाहेबांनी या सूर्याला आव्हान देणे, हे प्रचंड धाडसाचे व पराकोटीचे दडपण आणणारे होते. ते त्यांनी केले. वर्णाश्रमधर्माचे पाठीराखे महात्मा गांधी अस्पृश्यता नष्ट करुन हिंदूधर्म स्वच्छ करु पाहत होते. स्वातंत्र्य चळवळीतील आपल्या अन्य सहकाऱ्यांची प्राधान्यक्रमाविषयी नाराजी असतानाही अस्पृश्यताविरोधी जागरण हे राजकीय लढ्याचे अभिन्न अंग त्यांनी केले होते. त्यासाठी त्यांनी अपार कष्टही घेतले. बाबासाहेबांनी हिंदू धर्मावरच आघात चढवले. हिंदूधर्मातील जातिव्यवस्था नष्ट झाल्याशिवाय अस्पृश्यांना मुक्ती नाही, अशी त्यांची धारणा होती. म्हणूनच, सार्वजनिक तळी, मंदिरे खुली करण्याच्या सत्याग्रहांनंतर जोवर हिंदू धर्म आहे, तोवर जाती असणार, जाती असणार तोवर अस्पृश्यता असणार या निष्कर्षाला ते आले. हिंदूधर्म त्यागणे हाच त्यांना उपाय वाटला. त्यांनी आपल्या लाखो अनुयायांसहित बौद्ध धम्म स्वीकारला.

गांधी-आंबेडकरांतील या वादाचा त्यांच्या काळात त्यांनी निरास केला नाही, तो त्यांच्या मृत्युनंतर कसा करायचा? हे त्यांच्यातील वैचारिक मतभेद होते. ते आजही कबूल करावेच लागतील. त्यांच्या वारसदारांतही ते राहतील. ते तसेच व तेवढेच तीव्र राहतील असे नाही. गांधींची वर्णाश्रमधर्माची व जातिव्यवस्थेबाबतची मते आजच्या गांधीवाद्यांना मान्य आहेत, असे नव्हे. पण गांधीजींना अभिप्रेत उन्नत मूल्यांवर आधारलेला सनातन हिंदूधर्म हा कट्टर हिंदुत्वाची घोडदौड रोखण्यासाठी पर्याय आहे, असे त्यांना वाटू शकते. या दोन्ही बाबी आंबेडकरी कार्यकर्त्यांना अमान्य असू शकतात.

काही ऐतिहासिक बाबींचे मात्र आज मापन करुन कोण बरोबर कोण चूक हे ठरवता येणे कठीण असते. त्यातील एक पुणे करार. तेव्हा मी असतो तर कोणाच्या बाजूने उभा राहिलो असतो? अर्थात बाबासाहेबांच्या बाजूने. याचे कारण मी दलित आहे. आपल्या अवनत अवस्थेला राजकीय अधिकारांच्या सहाय्याने नष्ट करण्याची आता नाही तर कधीच नाही अशा कोटीतली ती संधी होती. ही संधी घेणे म्हणजे ब्रिटिशांचे पाठीराखे होणे नाही. आम्हालाही देश स्वतंत्र होणे हवे आहे. पण देशाला स्वतंत्र करण्यासाठी आम्ही पारतंत्र्यात राहणे आम्हाला मंजूर नाही.

पण मी सवर्ण व स्वातंत्र्य चळवळीतील एक कार्यकर्ता असतो तर? नक्कीच गांधीजींच्या बाजूने असतो. आधीच मुस्लिम लीगने मुस्लिमांना अलग करुन स्वातंत्र्य चळवळीत खिंडार पाडलेले असताना अस्पृश्यांसाठी  स्वतंत्र मतदारसंघाद्वारे हे दुसरे खिंडार पाडणे म्हणजे स्वातंत्र्याचा लढा कमजोर करणे होय, ही माझी भूमिका असती. अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघाऐवजी राखीव जागा देऊनही दलितांचे उत्थान साधता येईल. आणि देश स्वतंत्र झाल्यावर तर आपण हे सगळे करुच. आज आपली जूट टिकविणे कळीचे आहे. दलित म्हणून माझा जो अनुभव पारतंत्र्यातील इंग्रजांच्या कायद्याच्या राज्यात भोवतालच्या सवर्णांबाबत होता, तो पाहता याच सवर्णांच्या हातात सगळी सत्ता आल्यावर आमचे काय होईल, ही बाबासाहेबांच्या बाजूने उभे राहणाऱ्या माझी भीती होती.

अशा वातावरणात बाबासाहेब व गांधीजी या दोहोंच्या अनुयायांना परस्परांच्या नेत्यांविषयी चीड येणे हे अगदी स्वाभाविक आहे, हे मात्र काळाच्या या टप्प्यावर समजून घेणे शक्य आहे. गांधीजींसारख्या देशाचे आराध्य असलेल्या नेत्याचे उपोषणाद्वारे प्राण गेल्यास होणारा देशभरच्या दलितांवरील परिणाम लक्षात घेऊन बाबासाहेबांनी माघार घेणे, स्वतंत्र मतदारसंघांऐवजी राखीव जागा कबूल करणे यापेक्षा प्राप्त स्थितीत उत्तम निर्णय कोणता असू शकला असता, हे मला कळत नाही.

या निर्णयाविषयी बाबासाहेब म्हणतात- हिंदूंना करार आवडला नाही आणि अस्पृश्यांना तो अनुकूल नव्हता. असे असतानाही दोन्ही पक्षांनी पुणे कराराला मान्यता दिली.

ही दोन्ही बाजूंची माघार व सन्मान्य तडजोड असली तरी दलितांना हा पराभव वाटणे व त्यातही दलित म्हणून या पराभवाची वेदना अधिक जाणवणे हे स्वाभाविक आहे. काहींना हा पराभव आजही बोचत राहणे हेही मला समजू शकते. पण वर्तमानाच्या आजच्या टप्प्यावर त्यातच अडकून पडणे व गांधीजींना शिव्या देणे हे गैरवाजवी आहे. या शिव्या देण्यात हा करार करणाऱ्या बाबासाहेबांचाही आपण उपमर्द करतो, हे या मंडळींच्या लक्षात येत नाही. या बाबी ऐतिहासिक संदर्भात पाहणे नाकारल्याने मित्रशक्ती गमावून आपणच आपली ताकद खच्ची करत असतो.

गांधीजींशी बाबासाहेबांचे मतभेद काय होते, ते किती तीव्र होते, हे आपण पाहिले. पण देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हे स्वातंत्र्य काँग्रेसला मिळालेले नसून देशाला मिळाले आहे आणि म्हणून पहिल्या मंत्रिमंडळात देशातील विविध राजकीय प्रवाहांचे प्रतिनिधीत्व असायला हवे ही भूमिका घेण्यात गांधीजींचा पुढाकार होता. बाबासाहेबांचा या मंत्रिमंडळात समावेश करण्याची सूचना गांधीजींची होती, असे काही इतिहासकारांनी नोंदवले आहे. घटना समितीत बाबासाहेब निवडून आले तो मतदारसंघ पाकिस्तानात गेल्यावर दुसऱ्यांदा ते निवडून आले ते मुंबई इलाख्यातून. यासाठीचे सहकार्य काँग्रेसने दिले होते. मसुदा समितीच्या अध्यक्षपदी बाबासाहेब निवडले गेले. यामागेही गांधीजी होते, असेही हे इतिहासकार म्हणतात. लखलखीत गुणवत्तेमुळेच बाबासाहेबांना हा बहुमान मिळाला, हे उघडच आहे. तथापि, राष्ट्रीय हिताचा विचार करताना मतभेद आड येऊ देता कामा नये, या गांधीजींच्या भूमिकेचा यथोचित आदरही करायला हवा.

ज्या मूल्यांवर आधारित संविधान तयार करण्यासाठी बाबासाहेब हवे असे गांधीजींना वाटत होते, ती मूल्ये या दोघांची समान होती. संविधानाच्या प्रास्ताविकात नमूद झालेली ती हीच दोहोंची सामायिक मूल्ये. जर त्या काळात तीव्र मतभेद असतानाही या सामायिक मूल्यांसाठी ते एकमेकांना सहकार्य करत होते, एकत्र काम करत होते, तर आज ही मूल्ये धोक्यात आलेली असताना त्यांच्या वारसदारांनी परस्परांत तसेच सहकार्य का करु नये? बाबासाहेबांनी जर त्यावेळी गांधीजी किंवा नेहरु यांच्या सगळ्या भूमिका पटल्या तरच मी घटना लिहीन अशी अट ठेवली नाही किंवा गांधी-नेहरुंनी बाबासाहेबांकडून ठेवली नाही, तर आपण तरी ती आज का ठेवावी? ते जसे परस्परपूरक राहिले, तसेच आपणही राहू शकतो.

काठमांडूचे बाबासाहेबांचे भाषण बुद्ध आणि मार्क्स यात बाबासाहेबांनी मार्क्स व बुद्धाचे लक्ष्य एक असले तरी मार्ग वेगळे आहेत, मार्क्सचा मार्ग हिंसेचा आहे, बुद्धाचा अहिंसेचा आहे, म्हणून तो अधिक योग्य आहे, अशी मांडणी केली आहे. मूळ मार्क्सने काय म्हटले यापेक्षाही मार्क्सवादी क्रांत्यांतील रक्तरंजित व्यवहार बाबासाहेबांना आक्षेपार्ह वाटतो. देशातील कम्युनिस्टांनी जातीच्या लढ्याला दुय्यम लेखणे, जातिव्यवस्था ही फक्त श्रमाची नव्हे, तर श्रमिकांची विभागणी आहे हे लक्षात न घेणे यावर बाबासाहेबांचा आक्षेप आहे. ५२ च्या निवडणुकीतील मते कुजवा या डांगेंच्या आवाहनाने बाबासाहेबांच्या पराभवाला जो हातभार लागला, त्याने कम्युनिस्ट व बाबासाहेब यांच्यातली दरी अधिकच रुंदावली.

बाबासाहेब संसदीय लोकशाहीचे भोक्ते, तर कम्युनिस्टांनी आपद्धर्म म्हणून तीस मान्यता देणे (काही कम्युनिस्ट गटांना तर हा आपद्धर्मही मान्य नाही.) हा मोठा तात्त्विक मतभेद दोहोंत होता. आजही तो आहे. पण कम्युनिस्टांकडून आंबेडकरी जनतेशी संबंध जोडताना त्याबाबत स्पष्ट व पारदर्शक मांडणी होताना दिसत नाही. मतभेद स्पष्ट नोंदवून स्वतंत्र मजूर पक्षकाळातील बाबासाहेबांचे सर्व कष्टकऱ्यांना एकवटणाऱ्या आंदोलनाच्या स्मृती जागवून त्यावर एकत्र येणे म्हणजेच दोघांतले सामायिकत्व शोधणे होय. हे होत नसल्याने सतत संशयाचे भुंगे आंबेडकरी कार्यकर्त्यांचे मन कुरतडत राहतात.

बरे, यात काहीजण चलाखीने बाबासाहेब व गांधीजींच्या मतभेदाचा वापर करतात. गांधीजींची अहिंसा बाबासाहेबांना मान्य नव्हती, असे म्हणत वर्गशत्रूचा निःपात करताना हिंसा आवश्यकच असते, याला जणू बाबासाहेबांची संमतीच आहे, असे भासवतात. आपल्या प्रचारसाहित्यात बाबासाहेबांची एका हातात घटना व दुसऱ्या हाताचे बोट उंचावलेली प्रचलित प्रतिमा किंचित बिघडवतात. उंचावलेल्या बोटाच्या जागी वळलेली मूठ दाखवतात. यातून सनदशीर लोकशाहीऐवजी व्यवस्था उलथवणाऱ्या विद्रोहाचा संदेश बाबासाहेबच देत आहेत, असा आभास तयार होतो. यांच्या कलापथकाचा वेश निळा असतो, पण गाणी मात्र जहाल क्रांतीची असतात. कष्टकऱ्यांच्या, पिडितांच्या न्यायासाठी त्यागपूर्वक लढणाऱ्या या जहाल कम्युनिस्टांकडे आंबेडकरी समूहातील कोवळी तरुण मुले आकर्षित होत असतात. बाबासाहेबांच्या मूळ साहित्याचा परिचय नसल्याने व एकूण आंबेडकरी चळवळ विशीर्ण-विदीर्ण झालेली असल्याने या जहाल मंडळींबाबत समाजासाठी काही करु इच्छिणाऱ्या आंबेडकरी युवकांना आपलेपणा वाटणे स्वाभाविक आहे. या मुलांतील काहींचा प्रवास मग अधिक जहाल कारवायांकडे होतो. काही क्रमात जाणते होऊन तो मार्ग पकडतात. काहींना फसगत झाल्याचे उशीरा कळते. काही परततात. काहींचा परिस्थितीनेच परतीचा मार्ग बंद होतो. भल्या उद्दिष्टासाठी का होईना पण माणसाच्या माणूसपणाला कमी लेखून त्याला साधन म्हणून वापरण्याची ही रीत मला क्रूर व अनैतिक वाटते.

मार्क्स, गांधी, आंबेडकर ही माणसे होती. त्यांच्या मांडणीला कमीअधिक काळाच्या मर्यादा पडू शकतात. त्यांच्या मांडणीतील जे आता गैरलागू असेल ते सोडणे, उपयुक्त असेल ते टिकवणे व काहींचा विकास करणे यातूनच वर्तमान आव्हाने पेलण्याचा विचार व कार्यक्रम मिळू शकतो. ही ऐतिहासिक दृष्टी व संदर्भ हरवले की महामानवांना देवत्व व पावित्र्य येणे सुरु होते. त्यांच्या मांडणीवर कोणी टीका केली की त्यांचे अनुयायी (एव्हाना ते भक्त झालेले असतात) खवळून उठतात. गांधी या बाबत सुदैवी आहेत. त्यांच्यावर कोणीही कशीही टीका करु शकतो. त्यांचे विडंबन करु शकतो. मार्क्सही टीकेला-चिकित्सेला पात्र होतो, त्यामुळे तोही तसा भाग्यवान आहे. बाबासाहेब मात्र अत्यंत दुर्दैवी आहेत. विचारवंताला त्याच्या आयुष्यातच चांगला टीकाकार मिळणे, हे भाग्याचे असते, असे मानणाऱ्या बाबासाहेबांना हे भाग्य त्यांच्या समाजाने मिळू दिलेले नाही. पर्यायाने, त्यांच्या मांडणीचा विकास होऊ दिलेला नाही. संभाजी भगतांच्या गाण्याचा आधार घेऊन म्हणायचे तर भीम पुतळ्यात बंद केला बाई!’

रोहित वेमुलाच्या आत्महत्येनंतरची आंदोलने व कन्हैयाच्या संदर्भातली आंदोलने यात निळा-लाल सहकार्याची मांडणी होऊ लागल्यावर आंबेडकरी समुदायातील एका शिक्षित विभागात अस्वस्थता पसरु लागली. (उदित राज व आठवले हे आंबेडकरी बाण्याचे नेते भाजपला मिळाले व खासदार झाले यामुळे येणारी अस्वस्थता ही या तुलनेत अगदीच मामुली.) काहींना हे नेहमीप्रमाणे बामणी कारस्थान वाटले. त्यासाठी कन्हैयाच्या जातीचा खरा-खोटा शोध घेतला गेला. काहींना संघपरिवाराचा धोका लक्षात घेता कन्हैयाने दिलेले आव्हान आश्वासक  वाटले. पण त्याच्या घोषणेतील जयभीम-लाल सलाम ही संयुक्तता त्यांना रुचली नाही. कम्युनिझम हा निकामी (काहींच्या मते धोकेदायक) आहे, तो सोडून कन्हैया आंबेडकरवादाकडे येत असेल तरच आम्ही त्याचे स्वागत करु. इथे आंबेडकरवाद हीच जगाला तारणारी एकमेव विचारसरणी आहे, तिच्याकडेच सगळ्यांनी आले पाहिजे, अन्य पुरोगामी विचारधारांशी तिची जूट बांधणे हा बाबासाहेबांच्या विचारांशी द्रोह आहे, हे गृहीत आहे. खरं म्हणजे, आपले तेच श्रेष्ठ मानणारी ही भूमिका हाच आंबेडकरवादाशी द्रोह आहे.

ही अहंता व कर्मठपणा यापासून आजादी, मार्क्स, गांधी, आंबेडकर तसेच अन्य महामानव यांच्या वैचारिक समन्वयाचा आग्रह न धरता त्यांच्यातील परस्परपूरकत्व शोधणे व त्या पायावर व्यापक एकजुटीचा कार्यक्रम आखणे आणि आपल्या संविधानातील प्रगत मूल्यांना आव्हान देणाऱ्या शक्तींना पराभूत करणे हा संकल्प बाबासाहेबांच्या १२५ व्या जयंतीनिमित्ताने आपण करायला हवा. कन्हैया कशाकशापासून आजादी हवी आहे, त्याच्या घोषणा देतो आहे. ही आजादी प्रत्यक्षात आणण्यासाठीच्या वाटेवर असा हा संकल्प एक सशक्त पाऊल नक्की ठरेल.

-    सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com
__________________________________________
आंदोलन शाश्वत विकासासाठी, एप्रिल २०१६