Tuesday, April 19, 2016

सोहळ्याबरोबर चिकित्साही करुया


आज बाबासाहेबांची १२५ वी जयंती. आज सुरु होणारा दिमाखदार सोहळा पुढचा आठवडा-खरं म्हणजे मे महिन्याच्या अखेरीपर्यंत म्हणजे दीड महिने चालणार आहे. गेले दोन महिने प्रचंड उत्साहात तयारी चालू होती. कुठे १२५ फुटी भला थोरला कटआऊट, कुठे १२५ फुटी रांगोळी, झगमग रोषणाई, मिरवणुकीसाठी डीजेवाल्यांना ऑर्डर, आठडाभराच्या करमणुकीच्या कार्यक्रमांसाठी टीव्ही-सिनेमा फेम गायक-वाद्यवृंदांना सुपाऱ्या याची काय लगबग सुरु होती! आजपासून या तयारीचा, तयारी करणाऱ्यांच्या प्रचंड ऊर्जेचा आविष्कार सुरु होणार. या साऱ्यातून बाबासाहेब किती महान होते, हे सतत दुमदुमत राहणार. पण महान म्हणजे नक्की काय होते, त्यांची शिकवणूक समाज आज कशी अमलात आणतो आहे, आपल्यात कोणत्या उणिवा राहिल्या आहेत, कोणती नवी आव्हाने समोर आहेत, त्यांना बाबासाहेबांच्या विचारप्रणालीतून कसे तोंड द्यायचे...या बाबींचा आढावा, मूल्यांकन केले जाईल का? खात्रीने हो म्हणता येणार नाही. याला कारण आंबेडकरी चळवळीची वाताहत. दिशाहिनता. कधी नव्हे एवढी ही वाताहत आपल्या उद्धारकर्त्याच्या १२५ व्या जयंतीवेळी झालेली पाहायला मिळते आहे. वास्तविक, हीच वेळ आत्मचिकित्सेची मानायला हवी. कठोरपणे स्वतःला तपासायला हवे आणि पुढची दिशा व कार्यक्रम आखायला हवा. तरच बाबासाहेबांचा हा शतकोत्तर रौप्यमहोत्सव खऱ्या अर्थाने साजरा झाला, असे म्हणता येईल. सोहळा व चिकित्सा एकाचवेळी होऊ शकते. जे कोणी असे करु इच्छितात, त्यांच्यासाठी नमुन्यादाखल हे काही मुद्दे:
आंबेडकरी समूहात जे काही बदलते आहे, ते सर्वस्वी त्याचे वैशिष्ट्य नाही. भोवतालच्या समाजात जे वारे वाहते आहे, ते त्याच्याही काना-डोक्यात शिरत आहे. शिवाय काही बाबी खास त्याच्या स्वतःच्याही आहेत. गणपती-दहिहंडी-शिवजयंतीला जर २४ बेस डिजेच्या तालावर लोक बेहोश होत असतील, फटाक्यांची आतषबाजी, रोषणाईचा झगमगाट हेच उत्सवाच्या यशस्वीतेचे मानदंड ठरत असतील; तर मग आंबेडकर जयंतीही त्याच मानदंडांवर साजरी होणार. सगळंच आवाजी-झगमगाटी असेल, तर जयंतीही तशीच असणार. इतर जर कायदा उल्लंघत असतील, तर मग आम्ही का मागे सरायचे, ही बेफिकीरी येते. अजूनही दलित-आंबेडकरी समुदायाच्या वाट्याला अत्याचार, अवमान, दुजाभाव येत असल्याने या बेफिकीरीला विद्रोहाचाही एक आयाम असतो, हे विसरुन चालणार नाही.
पण त्यामुळे हे योग्य ठरत नाही. ते सिगरेट ओढतात-दारु पितात ते चालते; मग मी हे केले तर काय वावगे झाले, हे समर्थन गैर आहे. जे कोणालाच हितावह नाही, ते दुसरा करतो म्हणून आपण करण्याने आपल्याला हितावह ठरत नाही.
हे लिहिताना जुन्या काळी सगळं कसं आदर्श होतं आणि आताच सगळं ढासळत चाललं आहे, असा माझा आविर्भाव मुळीच नाही. आवाजाचे-रोषणाईचे तंत्र व आर्थिक क्षमता आजच्याच तेव्हा असत्या तर डीजे व थाटमाट तेव्हाही दिसणे अशक्य नव्हते. १३ एप्रिलच्या मध्यरात्री १२ वाजल्यानंतर १४ तारीख सुरु झाली की लाऊडस्पीकरचे भोंगे जे उद्धरली कोटी कुळे-भीमा तुझ्या जन्मामुळेगायला लागायचे त्याने बिगर आंबेडकरी माणसाची खाडकन झोपच उडायची. ती त्या रात्री तरी पुन्हा लागणे कठीण होते. आमच्या अंगावर रोमांच उभे राहत, ते आम्ही त्या समाजाचे होतो म्हणून. आम्ही कोणी, खास करुन मुले त्या रात्री झोपतच नसू. पताका लावणे, भिंतीवर बाबासाहेबांच्या प्रतिमा रंगवणे, मंडपात पाणी मारणे, फलकावर जयंतीचा कार्यक्रम लिहिणे यात आम्हाला परमानंद मिळायचा. आता ही अनेक कामे पैश्यांनी आऊटसोर्स केली जातात.
फरक पडला आहे, तो प्रेरणांत. विचारांत. जीवनबदलाची एक विलक्षण ऊर्जा आमच्या धमन्यांतून सळसळत असायची. बाबासाहेबांचा ईश्वराला, आत्म्याला, पर्यायाने पुनर्जन्माला, चमत्कारांना नकार, बुद्धाचे स्वतः माणूस असणे, माणसाला मध्यवर्ती कल्पिणे, स्वतःला मोक्षदाता नव्हे, तर मार्गदाता म्हणणे, भोवतालचा अंधकार दूर होण्यासाठी अत्त दीप भव (स्वतःच दीप हो) हा स्वावलंबनाचा संदेश देणे, शाळेत शिकत असलेल्या विज्ञानाशी बुद्धविचारांची सुसंगतता दिसणे, सब्बे सत्ता सुखि होन्तु च्या घोषात फक्त आपल्याच समाजाची नाही, तर अख्ख्या मानवतेच्या मांगल्याची कामना करणे...या सगळ्या भावना-जाणिवा त्या रात्री मनात एकवटायच्या. आम्ही खालचे, मागास नाही; तर बुद्ध-आंबेडकरी विचारांची एक प्रचंड श्रीमंती आमच्यात आहे, या जाणीवेने ती रात्र व पुढचे अनेक दिवस आम्ही तरंगत असू.
या प्रेरणा, जाणिवा आता आहेत, असे दिसत नाही. किमान सार्वत्रिक तरी नक्की नाहीत. अर्थात आमच्या वेदनांचा अनुभव वा त्यांची तीव्रता आताच्या मुलांमध्ये नाही, हेही कारण आहेच. पण नफा-नुकसानीच्या भाषेत बोलायचे, तर आर्थिक-भौतिक अभावग्रस्ततेत लक्षणीय घट झाली असली तरी जाणिवांचे दारिद्र्य हे खूप मोठे नुकसान आहे. बैलगाडीत बुद्ध-बाबासाहेब-फुल्यांच्या प्रतिमा व लेझिम अशा मिरवणुकांच्या जागी डीजेचा आवाजी, झगमगाटी बदल हे एकवेळ चालू शकेल. पण त्यावेळी होणाऱ्या व्याख्यानमाला आता अपवादानेच होतात. आंबेडकर, गांधी, मार्क्स यांतील मतभेद कोणते, मूर्तिपूजा नाकारणाऱ्या बुद्धाची मूर्ती बाबासाहेबांनी स्वीकारण्यामागचे कारण काय, देवाची पूजा आणि बुद्धाची पूजा यातला फरक, अगरबत्ती, मेणबत्ती, फुले यांचे प्रतीकात्मक अर्थ, मंगळसूत्र घालायचे की नाही, कुंकू लावायचे की नाही...अशा चर्चांनी तेव्हा रात्री उजाडायच्या. बोलणारे बोलायचे. बाकीचे रस घेऊन ऐकत असायचे. आताच्या मुलांना हे प्रश्न ग्रासतात, असे दिसत नाही. स्मार्ट फोनवर बाबासाहेबांची पूजा बांधणारे अविवेकी संदेश, फोटो मात्र शेअर होत असतात. विभूतिपूजेच्या विरोधात असलेल्या बाबासाहेबांची गर्व से कहोचालीवर यथासांग डिजिटल पूजा होत असते. एक जीवनप्रणाली, जीवन व चळवळ उन्नत करण्याचे वैचारिक साधन याअर्थाने बाबासाहेबांनी बौद्ध हा धर्म नसून धम्म आहे, असे म्हटले होते. आज त्याला व्यवस्थित धर्माचे स्वरुप आले आहे. त्याच्याविषयी थोडे अधिक बोलू.
बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची दीक्षा १४ ऑक्टोबरला दिली आणि जेमतेम दीड महिन्यात ६ डिसेंबरला त्यांचे महापरिनिर्वाण झाले. बौद्ध धम्माच्या आचरणाविषयी त्यांना नीट आखणी करायला तसा वेळच मिळाला नाही. काही तयारी त्यांनी आधीपासून केली होती. त्यामुळे किमान बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ सिद्ध झाला. विधिंविषयी वगैरे काही भाषणांत उल्लेख केलेले होते. त्या सगळ्याबाबत बाबासाहेबांच्या नंतरच्या नेत्यांनी एकवाक्यतेने काही ठरवायला हवे होते. राजकीय बाबतीतला त्यांचा कर्मदरिद्रिपणा इथेही दिसतो. धार्मिक संस्था निघाल्या. पण त्याही बव्हंशी राजकीय पंखाखालीच राहिल्या. धार्मिक बाबतीत दिशादिग्दर्शन करणारी आंबेडकरी बौद्धांची मध्यवर्ती मान्यता असलेली एकच एक संस्था नाही.
बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाचे काही ठिकाणी ग्रंथ लावल्यासारखे पठन केले जाते. या ग्रंथाची पारायणे केलेले लोक मला भेटतात. पण या ग्रंथातला नेमका एक भाग वाचायचा विसरतात, तो म्हणजे परिचय. ग्रंथाच्या प्रारंभी असलेल्या या छोटेखानी परिचयात बाबासाहेब बौद्ध धम्माच्या प्रसारात ज्यामुळे अडथळा येतो असे काही मूलभूत प्रश्न उपस्थित करतात. त्या सगळ्यांचा इथे उल्लेख करत नाही. फक्त एकच करतो. तो म्हणजे भिख्खू संघाचा. त्यांच्या काळातील पारंपरिक भिख्खूंचे ऐषारामी राहणे त्यांना खटकत असे. भिख्खूंचे समाजापासून तुटणे हे बौद्ध धर्माच्या ऱ्हासाचे एक कारण ते समजत. ते भिख्खूंच्या भूमिकेविषयी साशंक होते. तो एक पूर्णपुरुष असेल तर समाजाला त्याचा काही उपयोग नाही, भिख्खू हा सामान्य माणसाचा मित्र, तत्त्वज्ञ व मार्गदर्शक असायला हवा, असे ते या परिचयात म्हणतात. त्यांच्या दृष्टीने तो एक पूर्णवेळ कार्यकर्ता आहे. तो उच्चासनावर बसणारा, विधी लावणारा पुरोहित नव्हे. बाबासाहेबांनी नागपूरला दीक्षासमारंभात महास्थवीर चंद्रमणींच्या हस्ते स्वतः पत्नीसह दीक्षा घेऊन परंपरेशी नाते जोडले. मात्र समोरच्या लाखोंच्या समुदायाला त्यांनी स्वतः दीक्षा दिली. चंद्रमणींच्या हस्तेच समाजाला दीक्षा दिली असती, तर दीक्षा किंवा कोणताही धार्मिक विधी करण्यासाठी भिख्खूचीच गरज असते, असे समाजाला वाटले असते व एक नवा चिवरधारी पुरोहित तयार झाला असता, असे बाबासाहेबांनी याचे स्पष्टीकरण दिले आहे. कोणीही उपासक कोणतेही विधी लावू शकतो. त्यासाठी भिख्खूची गरज नाही, हे सूत्र त्यांनी इथे समाजाला दिले. दीक्षा समारंभाला लाखो लोक होते. पण सगळा समाज काही तेथे नव्हता. त्याला कोण दीक्षा देणार? त्यासाठी दरेकाने दरेकाला दीक्षा द्यावी, असे त्यांनी सांगितले.  माझ्या वडिलांनी मुंबईच्या कामगार मैदानात झालेल्या दीक्षा समारंभात बॅरिस्टर भंडारेंच्या हस्ते दीक्षा घेतली.
आजही विधी लावण्याचे काम सामान्यांतलाच एकजण विधिकर्ता (बौद्धाचार्य असे चुकीचे नाव त्याला पडले आहे) म्हणून करतो. तथापि, थोडी अर्थसंपन्नता आलेला यजमान यासाठी भिख्खूला पाचारण करण्यात, त्याला उच्चासनावर बसवून, मंतरलेला धागा मनगटात बांधून विधी करण्यात प्रतिष्ठा मानताना दिसतो आहे. त्याचे अनुकरण मग सामान्य आर्थिक कुवतीचाही माणूस करताना आढळतो. बुद्धविचारांचे मार्गदर्शन, प्रवचन, प्रचार-प्रसार याच कामाला पूर्ण वाहून घेण्याऐवजी अशा विधी लावण्याच्या व त्यायोगे भरभक्कम दान प्राप्तीच्या कामांत भिख्खूंचे जथे सामील होताना दिसू लागले आहे. वंदामि भन्तेतील ज्येष्ठ मित्राला आदरार्थी करावयाच्या संबोधनात आता लीनता येऊ लागलेली आहे. यथावकाश भिख्खूंचे ऐषारामी मठ उभे राहिल्यास आश्चर्य वाटू नये. लग्न साधेपणाने करावयाचा बाबासाहेबांचा संदेशही उधळला जावू लागला आहे. थाटमाट व प्रतिष्ठेचे सगळे संकेत खास करुन मध्यम व उच्च मध्यमवर्गीय आंबेडकरी समुदायांत रुजायला सुरूवात झाली आहे. बुद्धाने प्रचारासाठी संस्कृतऐवजी पाली ही लोकभाषा निवडली. आज पाली लोकभाषा नाही. तरी विधिची सूक्ते पालीतच म्हटली जातात. त्यांचा मराठी अनुवाद करण्याचे प्रयत्न झालेच नाहीत असे नाही. पण काहीही कळले नाही तरी पालीत म्हणण्यालाच आज प्रतिष्ठा आहे.
प्रत्येक रिपब्लिकन गट म्हणतो माझा पक्ष बाबासाहेबांच्या खुल्या पत्रावर आधारित आहे. एकजातीय नव्हे, तर व्यापक समाजाचा, लोकशाही समाजवादाचा पुरस्कार करणाऱ्या रिपब्लिकन पक्षाची संकल्पना स्पष्ट करणारे बाबासाहेबांचे खुले पत्र (पहाः डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे – खंड २०) वाचण्याचा व त्याप्रमाणे आपले रिपब्लिकन गट वागत आहेत का, हे तपासण्याचे आपले काम आहे. आजवर नसेल झाले. पण आतातरी ते करुन आपली राजकीय चळवळ सबल करुया. सत्तालाभाच्या किरकोळ तुकड्यांसाठी प्रस्थापित पक्षांसमोर (काही तर घटना उध्वस्त करु पाहणाऱ्यांशी सोयरिक करुन) लाचार होणाऱ्या रिपब्लिकन नेतृत्वाला बाबासाहेबांच्या खुल्या पत्रातील कोणत्या मुद्द्याला धरुन तुम्ही ही सौदेबाजी करत आहात, असा जाब समाजाने आतातरी विचारायला हवा.
सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे लेखाची मर्यादा लक्षात घेता हे मुद्दे नमुन्यादाखल आहेत. समाज विचार करायला बसला तर असे अनेक मुद्दे नोंदवता येतील. शेवटी एकच आवाहन करतो. राज्यात, विशेषतः मराठवाड्यात भयंकर दुष्काळ पडला आहे. जयंतीच्या निधीचा १० टक्के हिस्सा आपण या दुष्काळ निवारणाच्या कामाला (किमान तेथील दलित वस्त्यांना तरी) देऊया. बाबासाहेबांनी संविधानाच्या प्रास्ताविकात खास भर देऊन नोंदवलेल्या बंधुता या तत्त्वाचा आम्ही अंगिकार करतो याचा महाराष्ट्राला परिचय देऊया.
-     सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

No comments: