“ ‘सैराट’ वर काही लिहिलंस का? ...कधी लिहिणार आहेस? ...जरुर लिही.” ...मित्रमंडळींचे प्रश्न, सूचना चालू होती. फेसबुक-व्हॉट्सअपवर एवढं काही लिहिलं जात होतं-जात आहे की ते वाचून आपण लिहावे की न लिहावे हा हॅम्लेटी प्रश्न मनात अडकून बसला होता. जे लिहिलं जातं आहे, त्यातील काही मला पटतं, काही पटत नाही, काही अभिनिवेशी वाटतं, काही दोन्ही बाजूंनी जातीय वाटतं. आपण लिहायचं तर यातलंच काही, यातल्याच काहीवर लिहावं लागेल. नोंदवलं न गेलेलं असंही काही आहे, असं वाटतं. त्यावर बोलावं लागेल. थोडक्यात, मला न लिहून चालणार नाही. ‘फॅंड्री’च्या वेळी किती चटकन व भारावून लिहिलं होतं! मग त्याच दिग्दर्शकाचा, त्याच जाणिवांचा ‘सैराट’ अपवाद करुन कसे चालेल? तेव्हा, लिहायला सुरुवात करतो. थोडं स्वैर, थोडं संज्ञाप्रवाही होईल. पण चालवून घ्या.
‘सैराट’ आज ११ व्या दिवशी ४१ कोटींची कमाई करुन गेला आहे. (लेख छापून येताना १०० कोटींचा आकडा पार झाला आहे.) हा आकडा अजून बराच वाढेल असे दिसते. मराठी सिनेमाला अलिकडच्या काळात तिकिटबारीवर मिळालेला हा प्रतिसाद दुर्मिळच म्हणायला हवा. त्याबद्दल नागराज मंजुळे व त्यांची सगळी टीम यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
पण तिकिटबारीवरची कमाई हा सिनेमाच्या मापनाचा निकष नाही. अनेकांतला एक असेही नाही. तो अजिबातच नाही. सिनेमा हा व्यवसाय आहे हे लक्षात घेता पैश्यांच्या रुपात अशी कमाई होणे, हे सिनेमाचा खर्च वसूल होणे, नफा मिळणे यासाठी खूप महत्वाचे आहेच. हे व्यावसायिक गणित जमले नाही, तर पुढचा भला-बुरा जो काही असेल तो सिनेमा निघणेच मुश्कील होईल. तेव्हा, ती कमाई सैराटने केली हे नागराज आणि टीमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप चांगले झाले. याचे अर्थातच मला समाधान आहे.
चांगला सिनेमा कशाला म्हणायचे याच्या मापनासाठी सर्वसाधारणपणे हे निकष सांगितले जातातः चांगली पटकथा, नाविन्यपूर्ण अथवा वैशिष्ट्यपूर्ण कल्पना, चांगले कलावंत, चांगले छायांकन, त्यातून सूचित होणाऱ्या संदेशाची सखोलता, वास्तवाची सर्जनशील फेरमांडणी करताना वास्तवाशी असलेली तिची वाजवी अनुरुपता, नेपथ्य, ध्वनियोजना व या सगळ्याची चपखल रचना. (नार्निया, हातिमताई किंवा अन्य परिकथांसारख्या अद्भूतकथांचा आपण इथे विचार करत नाही आहोत. त्यांचे निकष काही बाबतीत निराळे आहेत. आपण सामाजिक, वास्तववादी सिनेमाचा विचार करत आहोत.)
नागराज यांचा या आधीचा ‘फॅंड्री’ हा सिनेमा या निकषांवर उतरणारा अत्युत्तम सिनेमा आहे. ‘सैराट’ त्या श्रेणीत मोडत नाही. म्हणूनच जे कोणी ‘फॅंड्री’ सारखा किंवा त्यापेक्षा उत्तम सिनेमा आपल्याला नागराज देणार ही अपेक्षा घेऊन सैराट पाहायला गेले होते, त्यांची निराशा होणे स्वाभाविक आहे. नागराजचा पूर्ण आकाराचा फॅंड्री हा पहिला व सैराट हा दुसरा सिनेमा. फॅंड्रीने ज्या अपेक्षा तयार केल्या होत्या त्यांच्या परिपूर्ततेची अपेक्षा विचक्षक प्रेक्षकांनी सैराटकडून करणे साहजिकच आहे.
हे झाले जाणत्या प्रेक्षकांचे. पण ते संख्येने अत्यंत अल्प आहेत. सर्वसाधारण प्रेक्षक असे विचक्षक नसतात. नव्याचे रसग्रहण करणारा प्रेक्षक तयार करावा लागतो. तसा तो करण्याचे सशक्त प्रयत्न आपल्याकडे झालेले नाहीत. त्यामुळे या सर्वसाधारण प्रेक्षकांचे चक्रधरांच्या हत्ती आणि आंधळ्यांच्या गोष्टीसारखे असते. प्रत्येकाचे त्याच्या रुची, सामाजिक जाणीवा व स्तर यांचे म्हणून वेगवेगळे निकष असतात. त्यांप्रमाणे ते सिनेमा अनुभवत, मापत असतात.
ज्या प्रतिक्रियेची दखल घेऊ नये असे आधी वाटले; पण नंतर ती देणाराही एक प्रवाह आहे असे लक्षात आल्याने तिच्याविषयी बोलणे गरजेचे आहे. ही प्रतिक्रिया देणारा बाप ‘तुमच्या मुलीने आर्चीसारखे शाळेच्या वयात केलेले चालेल का?’ असे विचारतो. हा सिनेमा शालेय वयातील मुला-मुलींच्या अनैतिक संबंधांना प्रोत्साहन देतो, असा या बापाचा आरोप आहे.
हा आरोप निराधार आहे. फसवा आहे. वयात येणाऱ्या मुला-मुलींमधले आकर्षण, त्यांच्यातली जवळीक ही नैसर्गिक आहे. जीवनाला रंगत आणणारा, फुलविणारा तो एक उत्सव आहे. त्याच्या स्वागताचीच भूमिका हवी. त्याचा निषेध, दमन करुन प्रश्न सुटणार नाही; या आधीही ते सुटले नाहीत. त्यांचे नियमन कसे करायचे याचे भान त्यांना द्यायला हवे. ही भीती वाटणाऱ्या पालकांनी आपल्या शाळा-कॉलेजे-वस्त्या-गाव आठवून पाहावेत. त्यांच्या वयाची इतर मुलेच नव्हे, तर हे पालक स्वतः त्यातली पात्रे होती, हे त्यांच्या लक्षात येईल. नागराजच्या सिनेमाने जे बोलता येत नाही असे एक दुखणे उफाळून येते ते म्हणजे, आमच्या पोरी या खालच्या जातीतल्यांच्या प्रेमात पडतात हे. हा प्रवाह केवळ मुला-मुलींनी कोणत्या वयात काय बंधने पाळायची एवढेच बोलत नाही, तर त्याचा मुला-मुलींनी प्रेमात पडताना जातिपातीची बंधने झुगारुन देण्याला, सामाजिक श्रेणींच्या विरोधात बंड करायला तीव्र विरोध असतो.
फॅंड्रीत जब्याला शालू प्रत्यक्षात भेटत नाही, तिला त्याच्या भावनांची खबरही नाही. तरीही फॅंड्रीला अशा पालकांचा विरोध होता. कारण एकूण मांडणीतून दिग्दर्शकाने जातिपातींच्या विरोधात समाजाला चेतवले आहे, हे त्यांना कळते. त्यामुळे त्यांचा संताप होतो. सैराटमध्ये तर प्रचंड विरोध असतानाही आर्ची-परश्याचे प्रत्यक्ष मीलन होते. दोन तरुण जीवांच्या प्रेमाच्या या उत्सवाला आग लावणाऱ्या सामाजिक विषमतेला दिग्दर्शक ललकारतो. ही ललकार सिनेमाला येणाऱ्या तुफान गर्दीपर्यंत पोहोचण्याची शक्यता तयार होते. याविषयीचा तो खरा पोटशूळ असतो.
सैराट ही काही थिल्लर प्रेमाची कथा नाही. जबाबदारी, निष्ठा व त्यासाठी प्राण पणाला लावणाऱ्या युगुलाची व त्यांना मदत करताना त्यांच्याइतकाच स्वतःचा जीव धोक्यात घालणाऱ्या त्यांच्या भिन्न धर्माच्या-भिन्न जातींच्या मित्रांची कथा आहे. त्यामुळे मुले बिघडणार नाहीत, तर अधिक जबाबदारच होतील.
नवी पिढी अधिक मोकळीक घेते आहे. ही मोकळीक वाढणार आहे. अशावेळी पालकांनी आपापल्या भागांतल्या शाळा-कॉलेजांमध्ये लैंगिक शिक्षण व जोडीदार-विवाहविषयक समुपदेशन हे उपक्रम कसे घेता येतील, याच्या प्रयत्नाला लागायला हवे.
ज्या मंडळींना हा सिनेमा भावला, त्यांत सामाजिक समतेच्या पुरस्कर्त्यांचा एक प्रवाह आहे. त्यांना आंतरजातीय विवाह, वरच्या जातीच्या सधन राजकारण्यांच्या दांडगाईविरोधात खंबीर व निडरपणे उभी राहणारी व तथाकथित खालच्या जात आणि आर्थिक स्थितीतल्या परश्याला निष्ठेने साथ देणारी, त्याच्यासाठी-त्याच्यासोबत हालअपेष्टा सोसणारी आर्ची (एक स्त्री), त्यांना साथ देणारे मित्र भावतात. या सर्वाची परिणती म्हणून आजही समाजात अत्यंत क्रौर्याने अशा युगुलाला संपवले जाण्याचे परिचित वास्तव त्यांना पुनःप्रत्ययाची वेदना देते. अस्वस्थ करते. प्रिन्स शिक्षकाच्याच कानाखाली वाजवतो, या प्रसंगाने काही मागास समाजातून आलेल्या प्राध्यापकांना तत्सम दांडगाईच्या अवमान-संतापजनक अनुभवांचे स्मरण होते. ग्रामीण महाराष्ट्रातील सरंजामी धनदांडग्यांच्या ताब्यातील शिक्षणसंस्थांमध्ये शिक्षक हे गुलाम असतात. ते मागास समाजातून आलेले असतील तर विचारुच नका.
या गटांच्या पलीकडचा बहुसंख्य प्रेक्षकवर्ग-ज्याच्यातील काहीजण दोन-तीनदा हाच सिनेमा पाहत आहेत, त्यांना यातले काय भावत असावे?
या गटात गावातील जातवार वस्त्यांचा, व्यवसायांचा परिचय असलेले प्रत्यक्ष गावात राहणारे, जातींचा, त्यांच्या श्रेणींचा सर्वसाधारण परिचय असलेले गावांजवळच्या छोट्या शहरात राहणारे, जातींची ढोबळ माहिती असणारे किंवा नसणारे असे मोठ्या शहरात राहणारे अशांचा समावेश होतो. मोठ्या शहरात राहणाऱ्या मुलांना आर्ची-परश्याची कहाणी गरीब-श्रीमंतांच्या भेदाची कहाणी वाटते. त्यांना जातीची बाजू लक्षात येतेच असे नाही. गाव व छोट्या शहरांतील मुलांना ती बऱ्यापैकी येते. गाव, छोटी शहरे व मोठी शहरे यातील सर्वच मुले, जी आता पूर्वीपेक्षा स्त्री-पुरुष संबंधांबाबत कमी-अधिक प्रमाणात मोकळी आहेत, त्यांना आर्ची-परश्याची प्रेमकथा स्वतःची वाटते. आपली प्रेयसी आर्चीसारखी बुलेटवरुन येणारी, मुलांना दम देणारी, पोलीस स्टेशनवर ‘मी परश्याचे अपहरण केले, त्याच्या घरच्यांना सोडा’ असे बजावणारी, मागे लागलेल्यांवर रिव्हॉल्वर चालवणारी, ‘झिंगाट’च्या ठेक्यावर स्त्री असल्याचा संकोच सोडून मुक्तपणे नाचणारी अशी हंटरवाली-स्वप्नसुंदरी असावी हे स्वप्नरंजनही इथे असते. मुलींना बुजरा, संकोची, गोड परश्या प्रचंड आवडतो. ‘याड लागलं’ गाण्याच्या पार्श्वभूमीवर परश्या झेपावत, थिरकत येतो तो सरळ पडद्यातून बाहेर येऊन या मुलींच्या काळजात घुसतो. आर्ची-परश्याच्या भेटींचे, चिठ्ठीची देवघेव करण्याचे प्रसंग या मुलामुलींच्या दिलाचा पुरजा-पुरजा करतात. प्रौढांनाही बित्या दिनांमध्ये भिजवून आणतात. सिनेमातली सगळीच गाणी या सगळ्यांनाच मोहविणारी-थिरकवणारी आहेत. ‘झिंग झिंग झिंगाट’ वर तर झिंगून गेल्यासारखी माणसे थिएटरातच नाचायला लागतात.
गाव व छोट्या शहरांतील माणसांना हा सिनेमा जवळचा वाटण्याची जी इतर काही कारणे आहेत, त्यातील एक म्हणजे यातील भाषा. अर्थात, हल्लीच्या अनेक सिनेमांत ग्रामीण महाराष्ट्राच्या विविध बोलींचा वापर होताना दिसतो. पूर्वी तो मुख्यतः कोल्हापुरीच असायचा. सोलापूर-करमाळा परिसरातील ही भाषा ज्या सन्मानाने व सहजतेने वावरत असते, त्याने केवळ याच परिसरातील नव्हे, तर अन्य भागातील ग्रामीण मराठी मंडळींनाही ती आपलेसे करते. त्यातील पात्रे, त्यांचे खेळ, उत्सव हे सगळे त्यांच्या जीवनाचा भाग आहेत. ज्या बारकाईने नागराजनी संवाद, भाषेचा लहेजा, स्वभावांचे कंगोरे, दृश्ये उभी केली आहेत, ती विलक्षण प्रभावी आहेत. वास्तवाची ही कलात्मक मांडणी ही नागराजची मोठी ताकद आहे. अभिनेता अभिनय कसा करतो, यावरच त्याचे मापन केले पाहिजे हे खरे. पण यातील जी पात्रे अभिनयात बाजी मारुन जातात ती आपल्यासारखीच सामान्य, गरीब, निम्न जातींतील आहेत, सिनेमा तंत्राची काहीही माहिती नसलेली, त्यातले कुठलेही प्रशिक्षण त्यांनी घेतलेले नाही, जन्मजात प्रतिभा नसलेली अशी आहेत. अशी माणसे अचानक पडद्यावर चमकू लागतात. यातून मीच पडद्यावर येतो आहे, असे येणे हे आपल्याही आवाक्यात आहे, हा विश्वास ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या बहुजनांच्यात तयार होतो.
व्यक्तिशः माझ्यावर या सिनेमाचा काय परिणाम झाला?
फॅंड्री पाहिल्यावर मी लिहिले होतेः
‘स्थळ-काळाचे तपशील वेगळे असले तरी 'जब्या'चे भावविश्व हेच आमचेही भावविश्व होते. किशोरवयातील त्याच्या मनात उमललेले हळुवार अंकुर, त्यांची मुग्ध कोवळिकता व नाजूक संवेदनांनी मनाचे आभाळ झंकारणे ही भावस्थिती आमचीही होती. तथाकथित खालची जात अन् या जातीला सावलीइतके अपरिहार्य बनून आलेले दारिद्र्य, वंचना यामुळे 'शालू' हे आम्हालाही अप्राप्य असे गुलबकावलीचे फूल होते. सामाजिक-आर्थिक विषमतेच्या या दाहक वास्तवाने आमच्या भावजीवनाच्या झालेल्या चिंधड्या आजही ठसठसत असतात. फॅन्ड्रीने तर त्यांवरची खपलीच ओरबाडून काढली.’
अशीच तसेच याच तीव्रतेची भावना यावेळी नव्हती. रोमॅंटिक भावनांचे स्मरणरंजन जरुर झाले. शाळेतले काही बाक व कटाक्ष आठवले. ज्यांच्याशी आपले जात व आर्थिक स्तरामुळे जमणार नव्हते, जमले नाही, ती वेदनेची तार झंकारुन गेली. आर्ची हे सुंदर, सुबक पात्र वाटले. रिंकूने हे पात्र ताकदीने उभे केले आहे. तिच्या ताकदीबद्दल प्रश्न नाही. पण ती दिग्दर्शकाच्या स्वप्नातली मूर्ती (जे नागराजनी जाहीरपणेच सांगितले आहे) आहे. हे सुंदर, सुबक स्वप्न म्हणून ठीक. पण त्याचा वास्तवातील माझ्या ‘आर्चीं’शी मेळ बसला नाही. आर्ची-परश्याच्या भेटींची रम्य निसर्गाच्या व संगीताच्या पार्श्वभूमीवरील भेटी ‘सिलसिला’च्या आसपासच्या भावना जागवून गेल्या. पण त्याही वास्तवाशी मेळ न खाणाऱ्या. मी जिला भेटत असे, त्या जागा अशा रम्य नव्हत्या. संगीतही नव्हते. जे काही असेल ते मनात. बाहेर हॉर्न, गर्दीचा कलकलाट.
आर्ची-परश्या पळून गेल्यावर त्यांना ज्या झोपडपट्टीत आश्रय मिळतो, त्या परिसरातील दृश्यांनी माझ्या बालपणीचे व तरुणपणीचे काही प्रसंग अंगावर चालून आले. ज्या घरात ती दोघं राहतात, त्यापेक्षा माझं घर वाईट स्थितीतलं होतं. कनिष्ठ मध्यवर्गातून पण घरात संडास-बाथरुम असलेल्या सवर्ण कुटुंबातून आलेल्या माझ्या पत्नीने त्या तशा घरातच संसार थाटला. आर्ची ज्या संडासात जाते, तशाच संडासात तिला जावे लागे. आर्चीच्या निमित्ताने जेव्हा ही आठवण झाली तेव्हा आत खड्डा पडला. बराच काळ ती ठसठस राहिली.
सिनेमाचा शेवट त्रास देऊन गेला. वर उल्लेख केलेल्या सामाजिक समतेच्या पुरस्कर्त्यांप्रमाणेच मलाही हत्याकांडाचे हे परिचित वास्तव हादरवून गेले. आज शहरातच नव्हे, तर गावांतही आंतरजातीय विवाह होण्याचे प्रमाण वाढते आहे. नाराजी, विरोध, मारहाण, पलायन आदि वाटांनी जाऊन निभणाऱ्यांची टक्केवारी मोठी आहे. अशा हत्याकांडांची टक्केवारी कमी आहे. (बातमी हत्याकांडाची होते. निभणाऱ्या विवाहांची नाही. त्यामुळे सकारात्मक बदलाचे प्रमाण ठळकपणे समोर येत नाही.) मिश्रविवाह हे भविष्य आहे. त्याला अटकाव आणण्याचे प्रयत्न हळूहळू थिटे पडणार आहेत. पण त्यामुळे अशा हत्याकांडांची दाहकता कमी होत नाही. समाजमनाला हलवून त्याच्या विवेकाला आवाहन करण्याची मोठी कामगिरी सिनेमाच्या या शेवटाने केली आहे.
झिंगाट गाण्यावर नाचणाऱ्यांचे हावभाव, शैली ही ‘शांताबाई’ गाण्यावर नाचणाऱ्यांची आठवण करुन देते. अजय-अतुलने ही गाणी खूप मेहनतीने, प्रतिभेने व खूप खर्चाने (हॉलिवूडमध्ये संगीतबद्ध करुन) केली आहेत. तथाकथित तळच्या विभागातून आलेल्या या मंडळींनी अशी झेप घेणे हे खूपच कौतुकास्पद आहे. त्यांची धून थिरकण्यासाठीच आहे. त्यामुळे लोक उत्तेजित होतात. नाचू लागतात. खूप लोकप्रिय होतात ही गाणी. पण म्हणून ते चांगले आहे, असे मला म्हणवत नाही. कथेची अपरिहार्यता म्हणून ते येते असे वाटत नाही. फॅंड्रीत एकही गाणे नव्हते. पण झीटीव्हीने त्याच्या प्रमोशनसाठी अजय-अतुलला गाणे करायला लावले. तो धंद्याचा भाग होता. इथे थेट सिनेमातच गाणी आली. हा नेहमीचा चालू मनोरंजनाचा व्यावसायिक फंडा व फॉर्म्युला आहे. ही व्यावसायिकतेसाठी नागराजनी केलेली तडजोड असावी. ती कमाईच्या व लोकप्रियतेच्या दृष्टीने खूपच यशस्वी ठरली आहे. यानंतरच्या सिनेमातही ती तशीच करावी, असा सिनेमासाठी पैसे लावणाऱ्यांचा तगादा नक्की राहणार.
नागराज पुढे काय करणार माहीत नाही. मानवतावादाशी बांधिलकी असलेल्या व आपल्या मुळांशी पक्का असलेल्या नागराजने अशी तडजोड केली तरी ती मर्यादा सोडून असेल असे वाटत नाही. शिवाय जसा या सिनेमातून त्याने जो सामाजिक संदेश, तोही प्रत्ययकारी पद्धतीने दिला आहे, तसा संदेश तो पुढेही देतच राहणार याची खात्री वाटते. हे जर शर्कराअवगुंठीत औषध असेल, तर ते समाजहिताला उपयुक्तच आहे. प्राप्त स्थितीत नेहमीच आदर्शाची अपेक्षा धरणे बरोबर होणार नाही.
अर्थात, हे चालू असताना मध्येच ‘फॅंड्री’ सारखा एखादा सिनेमा काढण्याचा नागराजनी प्रयत्न करावा, अशी विनंती जरुर राहील.
- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com
_________________________________
आंदोलन शाश्वत विकासासाठी, जून २०१६