Sunday, May 1, 2016

दोन भिक्खू एक तरुणी

दोन भिक्खू एक तरुणी
दोन भिक्खू प्रवास करत असतात. मध्ये नदी लागते. अचानक आलेल्या पावसाने नदीला नेहमीपेक्षा पाणी अधिक असते. कामासाठी या तीरावर आलेल्या एका तरुण मुलीला आपल्या घरी परतायचे असते. ती नदी ओलांडण्याचा प्रयत्न करत असते. पण तिला ते कठीण जात होते. ती या दोघा भिक्खूंना पाहून त्यांच्या जवळ येते. त्यांच्यातल्या तरुण भिक्खूला मदतीची विनंती करते. तो रागावतो. म्हणतो, “तुला दिसत नाही मी भिक्खू आहे? आम्ही स्त्रीसंगापासून दूर राहण्याची प्रतिज्ञा घेतलेली आहे.”
हा संवाद ऐकणारा वयस्क भिक्खू पुढे होतो व त्या मुलीला म्हणतो, “चल बस माझ्या पाठीवर.” ती बसते. तो पाण्यात शिरतो. तरुण भिक्खू अस्वस्थ. तोही पाठून चालतो. पलिकडच्या काठावर ते सुरक्षित पोहोचतात. वयस्क भिक्खूच्या पाठीवरुन ती मुलगी उतरते. सुहास्यवदनाने ती भिक्खूचे आभार मानते. तोही स्मितवदनाने तिला निरोप देतो. ती तिच्या मार्गाने जाते. हे दोन भिक्खू त्यांच्या मार्गाने चालू लागतात.
तरुण भिक्खू रस्ताभर मनातल्या मनात धुसफूसत असतो. अखेर ते आपल्या मठाजवळ पोहोचतात. तरुण भिक्खूला राहवत नाही व तो या ज्येष्ठ भिक्खूला प्रश्न करतो, “तुम्ही असं कसं केलंत? एका स्त्रीला तुम्ही आपल्या पाठीवर घेतलेत. हा नियमभंग नाही का?”
वयस्क भिक्खू त्याला शांतपणे सांगतो, “तिला नदी ओलांडण्यासाठी मदतीची गरज होती. मी तिला पाठीवर घेतलं व नदीच्या पलीकडे उतरवलं. अरे, माझ्या पाठीवरनं ती कधीच उतरली, तुझ्या डोक्यावर मात्र ती अजूनही बसलीय.”
कन्हैयाच्या मुंबई-पुण्याच्या जोरदार सभांनंतरही स्वतःला आंबेडकरी म्हणवणाऱ्या काही मंडळींकडून ज्या प्रतिक्रिया येत आहेत, त्या ऐकल्या-वाचल्यावर ही गोष्ट आठवली.
कन्हैया डांगे व आंबेडकरांच्या सहकार्याचा, स्वतंत्र मजूर पक्षाच्या कालखंडाचा उल्लेख करतो आहे. संविधानातील मूल्ये उध्वस्त करु पाहणाऱ्या कट्टरपंथी हिंदुत्ववाद्यांच्या विरोधातील लाल-निळ्याच्या वर्तमानातील सहकार्यासाठी तो ही पायाभरणी करतो आहे, हे उघड आहे. सभेला जमलेल्या या दोन्ही रंगांच्या समर्थकांकडून तसेच अन्य लोकशाहीवाद्यांकडून या भूमिकेला टाळ्यांच्या तुफान कडकडाटात प्रतिसाद मिळतो आहे.
यातला सकारात्मक व पुढे जाणारा भाग लक्षात न घेता, डांगे व आंबेडकरांच्या बाकी संबंधांबद्दल (म्हणजे ५२ च्या निवडणुकांतील बाबासाहेबांचा पराभव, मते कुजवा हे डांगेंचे विधान, बाबासाहेबांची मार्क्सवादावरील टीका इ.) कन्हैया काहीच बोलला नाही, तो सोयीचे तेवढेच बोलला ही या ‘आंबेडकरी’ मंडळींची कन्हैयाच्या सभांवरची पहिली व प्रधान प्रतिक्रिया आहे.
या सभा म्हणजे काही अकादमीय परिसंवाद नव्हेत. परिसंवादात विविध पैलूंची सखोल मांडणी-चिकित्सा अभिप्रेत असते. सध्या युद्धासाठी आमने-सामने ठाकलेल्या या दोन छावण्या आहेत. इथे मित्रांच्या सरासरी सहमतीची ताकद एकवटून ठाम बाजू घेऊन ती लढवणे हेच अपेक्षित असते. कन्हैयाच्याच शब्दांत सांगायचे तर ‘ब्राम्हणवाद-पूंजिवाद के खिलाफ’ लोकशाही, समाजवाद मानणाऱ्यांची आपली ही छावणी आहे. यात खरे तर ज्यांचा वारंवार उल्लेख होतो ते निळा व लाल हे दोनच रंग नाहीत. मुंबईच्या सभेत शेहला राशीद (जेएनयू विद्यार्थी संघटनेची उपाध्यक्ष व कन्हैयाची सहकारी) हिने बहुसंख्य वक्ते ‘जयभीम-लाल सलाम’ म्हणत असताना जाणीवपूर्वक सगळ्यांना ‘सतरंगी’ सलाम केला. या छावणीत केवळ आंबेडकरवादी व मार्क्सवादी नाहीत, तर अन्य पुरोगामी विचारांचेही लोक आहेत याचे भान ठेवा, असेच तिला सांगायचे होते. खासदार आदित्यनाथशी दोन हात केलेल्या अलाहाबाद विद्यापीठातील रिचा सिंगने बोलताना लोहियांचे जातिअंतासंबंधीचे एक विधान नोंदविले व भाषणाची अखेर जयभीम, लाल सलाम सोबत ‘जय समाजवाद’ने केली. आनंद पटवर्धनांनीही या सभेत जयभीम, लाल सलाम सोबत ‘जय जगत’ असे म्हटले.
हे आंदोलन केवळ मार्क्सवाद्यांचीच नव्हे तर आंबेडकरवाद्यांचीही-खरे म्हणजे कोणाही एका विचार-वादाची मक्तेदारी नव्हे; सर्व लोकशाहीवादी पुरोगामी प्रवाहांचा हा सप्तरंगी कारवा आहे, हेच यातून ठसवले जात होते.
कन्हैयाने लाल किल्ल्यावर निळा झेंडा लागणार की लाल झेंडा लागणार याचा आपल्या ढंगाने समाचार घेतला व आधी धोक्यात आलेला ‘तिरंगा’ वाचवूया मग निळा की लाल याचा विचार करु, असे सांगितले. शेहला राशीदने २०१९ ला ‘यूपीए ३’ येता कामा नये असे जोरात मांडले. ‘यूपीए ३’ याचा अर्थ काँग्रेसबरोबर आघाडी. ती तिला नको आहे. दोघे सहकारी असले तरी कन्हैया व तिच्यात ही मतभिन्नता असल्याचे दिसते आहे. कन्हैया काँग्रेसबाबत कठोर टीकेची भूमिका घेत नाही. इथेही त्याने या टीकेला उत्तर देताना ‘वेळ येईल तेव्हा मी काँग्रेसबाबतही बोलेन, पण आता वेळ आहे केंद्रातल्या ‘संघी’ सरकारची’ असे सांगून आपला प्राधान्यक्रम व डावपेचच घोषित केला. देशातील संस्कृतीबहुलता, विचारबहुलता टिकविणे कसे आवश्यक आहे, हे सांगताना त्याने मंचकावरील अन्य विद्यार्थी नेत्यांकडे निर्देश करुन ‘आमच्यातही मतभेद आहेत. असे मतभेद असणे हे लोकशाहीचेच लक्षण आहे व या मतभेदांसहित आम्ही एकत्र लढणार आहोत, प्रस्थापिताच्या विरोधातील सर्व रंगांची ही लढाई आहे’ हे जाणीवपूर्वक नमूद केले.
हे विद्यार्थी नेते विलक्षण जाणते आहेत. राज्यकर्त्यांचे-संघप्रणीत संघटनांचे जे काही अनुभव त्यांच्या वाट्याला आले व त्यात जे संघर्ष त्यांनी केले त्यातून त्यांची ही समज व करारीपणा वृद्धिंगत झाला असावा. त्यांच्या भाषणातील काही उल्लेख व विश्लेषण पद्धती पाहता राजकीय-वैचारिक पीठांच्या मांडवाखालूनही ते गेलेले असावेत असे दिसते. केवळ विद्यार्थीच नव्हे; तर दुष्काळग्रस्त, सफाई कामगार, स्त्रिया, महागाई, विकासाची दिशा, त्याचे वितरण, शिक्षण, वित्तीय अर्थव्यवस्थेचे आक्रमण, अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीचा परिणाम व या सगळ्याचा संविधानाच्या सरनाम्यातील मूल्यांशी संबंध अशी समग्र, अव्वल राजकीय मांडणी ते करत आहेत. राजकीय व्यवस्था बदलाची, नव्या पर्यायी व्यवस्थेची ही मांडणी आहे. त्याला सुस्पष्ट टोक आहे. कोण बाजूचे व कोण विरोधातले ही विभागणी स्पष्ट आहे. त्यात धूसरता नाही. सबगोलंकारीपण नाही. हे विद्यार्थी आपले हे आंदोलन विद्यापीठांतून रस्त्यावर नेऊ पाहत आहेत. ते ज्यावर आवाज उठवणार आहेत, त्या विविध प्रश्नांशी संबंधित समाज विभागांच्या स्वतंत्र परिषदा घेऊन या पर्यायांचे मसुदे तयार करण्याची त्यांची मनीषा आहे. याचाच एक भाग म्हणून कन्हैयाने विद्यापीठांत दलित विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्यायाला प्रतिबंध करणाऱ्या ‘रोहित अॅक्ट’ ची मागणी करुन मे महिन्यात ५ तारखेला होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अखिल भारतीय परिषदेत सहभागी होण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन केले.
हे सगळंच खूप नवं आहे. याच्या भवितव्याविषयी लगेच काही निष्कर्ष काढणे योग्य नाही. तथापि, या प्रक्रियेची जी बीजं दिसत आहेत, ती खूपच आश्वासक आहेत. त्यांची जोपासना, पुढचे वादळवारे, भूकंप, पूर, नेतृत्वांच्या मनुष्यस्वभावांचे फेरे, विरोधकांच्या चाली, मित्रांचा गाफीलपणा, प्रस्थापित पक्षांची राजकीय मोर्चेबांधणी इ. अनेक बाबींवर या अंकुरांच्या वेली कशा, कुठे जाणार आहेत ते ठरणार आहे.
ही मुलं निडर, हुशार, समजदार आहेत. ताजी आहेत. जुनी ओझी नाहीत. नव्याचा नव्याने विचार व आविष्कार करण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. ज्येष्ठांना ते बजावत आहेत- ‘तुम्ही सल्ला द्या, पण निर्णय आमचे आम्हाला घेऊ द्या. आम्ही तुमच्या इशाऱ्यावर चालणार नाही.’ या त्यांच्या भूमिकेने तर मला हर्षभरित व्हायला झाले आहे. (तसा मी अधिकचा भावूक आहे. पण ते सोडा.) नवी पिढी ही जुन्यांच्या खांद्यावर उभी असते. तिला अधिक पुढचे दिसणे हे स्वाभाविक आहे. आपला खांदा त्यांना लागेल तेव्हा देणे व अशी निर्णय घेणारी मुले आपल्याला लाभलीत, याचा रास्त अभिमान व कौतुक आम्हा ज्येष्ठांना असायला हवे. या मुलांना पोषक वातावरण खाली तयार व्हावे, यासाठी जे काही करता येणे शक्य आहे, ते आपापल्या पातळीवर करायला हवे, मदतीसाठी नेहमी तयार असावे, असे मला वाटते.
अशांचे मुक्तकंठाने स्वागत करायला हवे. त्यांच्या या एल्गाराविषयी संभ्रम तयार होईल, असे काहीही करता कामा नये. नीती व लढ्याचे डावपेच या दोहो बाजूंनी ते गैर होईल. बहुसंख्य आंबेडकरी जनतेला कन्हैयाचे आगमन स्वागतार्ह व आश्वासक वाटते आहे. त्याच्या जयभीम-लालसलामाला ते मनापासून प्रतिसाद देत आहेत. आंबेडकरी व डावे यांचा जात व वर्ग या बाबतीतला एकारलेपणा जाऊन कन्हैया दोहोंचा मेळ घालून पुढे जात असेल, तर जुन्या वादांचे या घडीला तरी काहीच प्रयोजन राहत नाही. त्या चर्चा यथावकाश चालू राहतील.
या सगळ्यात गांधीजी पुन्हा उपेक्षितच राहत आहेत, याची खंत मला आहे. शाहू-फुले-आंबेडकर-मार्क्स-बिरसा-पेरियार या रांगेत गांधी-नेहरु नावे घेणे पुरोगाम्यांच्यातल्या अनेकांना सोयीचे वाटत नाही. गांधीजींना त्याची सवय आहे. नेहरु तर काँग्रेसचे. त्यांच्याबद्दल चांगले बोलल्याचे श्रेय काँग्रेसला जाईल ही भीती. गंमत ही की काँग्रेसलाच नेहरु आपले आहेत, याचे फारसे स्मरण नाही. नेहरुंनी त्यांच्या परीने भारताचा शोध घेतला, नवा भारत घडवला. त्यांचीही काही तक्रार असायचे कारण नाही. नुकसान त्यांचे काहीच नाही. ती मृत माणसे आहेत. नुकसान जिवंत माणसांचे होणार आहे. आधुनिक मूल्यांवर भारत उभारण्यासाठी ज्यांनी जीवन वेचले त्यांच्याप्रतीची कृतज्ञता राखणे हे माणूसपणाचे लक्षण आहे. तथापि, पुढील लढ्यासाठीची दिशा व साधने जी त्यांनी दिली आहेत, ती नाकारणे हा कर्मदरिद्रीपणा आहे.
माझ्या एका लेखात ‘बाबासाहेबांचा पहिल्या मंत्रिमंडळात समावेश करण्याची सूचना गांधीजींची होती, असे काही इतिहासकारांनी नोंदवले आहे. घटना समितीत बाबासाहेब निवडून आले तो मतदारसंघ पाकिस्तानात गेल्यावर दुसऱ्यांदा ते निवडून आले ते मुंबई इलाख्यातून. यासाठीचे सहकार्य काँग्रेसने दिले होते. मसुदा समितीच्या अध्यक्षपदी बाबासाहेब निवडले गेले. यामागेही गांधीजी होते, असेही हे इतिहासकार म्हणतात.’ अशी विधाने आहेत. परस्पर समन्वयाचा आग्रह न धरता परस्पर पूरकता शोधण्याचे आवाहन हा या लेखाचा गाभा होता. त्याचे स्वागत करणाऱ्या प्रतिक्रिया पुष्कळ आल्या. पण आंबेडकरी विभागातील ज्या प्रवृत्तीचा मी उल्लेख केला, तिने मात्र हा इतिहास कसा खोटा आहे, हे व तेवढेच पटविण्याचाच आटोकाट प्रयत्न केला.
समजा राम गुहांसारख्या इतिहासतज्ज्ञांचे हे म्हणणे खोटे ठरले, तरी सध्याची आव्हाने परतवण्याच्या लढ्यात गांधीवाद्यांच्या मांडणीतली कोणती बाब अडचणीची ठरते की ज्यामुळे रोहित प्रकरणाने पेटविलेला व कन्हैयाने पुढे नेलेला हा लढा अवरुद्ध होतो आहे? मला तर या आंदोलनाच्या आजच्या टप्प्यावर अशी काहीच अडचण दिसत नाही. एकूणच गांधीवादी, मार्क्सवादी, नेहरुवादी आदींच्याबद्दल ज्यांना ती दिसत असेल, त्यांनी या चळवळीत सहभागी होऊन ती चर्चेला आणणे व त्याच्या निरासाचे मार्ग सुचविणे गरजेचे आहे. तरच ती टीका विधायक होईल. अन्यथा केवळ खवखवत राहण्याने उबळ शमल्याचे कृतक समाधान होईल, पण नीट उपचार न झाल्याने दुखणे विकोपाला जाईल. नव्याच्या स्वागताला अनुकूल असलेल्या समाजाला संभ्रमित करण्यात याने जे योगदान होईल ते होईल, पण स्वतःचे व्यक्ती म्हणून उमदेपण नेस्तनाबूत करायला हे नक्कीच फायदेमंद राहील.
बुद्धसंदेशाचे व्यावहारिक उपयोजन सांगणाऱ्या वरील कथेतून बोध घेऊया. ही किंतु-परंतुची, छिद्रान्वेषी ओझी उतरवूया. त्या वयस्क भिक्खूसारखे स्मितवदनाने जबाबदारी वाहूया. मोकळ्या मनाने चळवळीतील सहकाऱ्यांबरोबर मार्गक्रमण करुया.
बौद्ध वाङ्मयात असंख्य बोधकथा आहेत. या बुद्धजयंतीला एवढी एक पुरेशी आहे.
सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com
_________________________
आंदोलन शाश्वत विकासासाठी, मे २०१६

No comments: