मराठा आंदोलनामुळे विविध जातींत आपापल्या हिताच्या (वाट्याच्या) रक्षणार्थ जोरात हालचाली सुरु झालेल्या आहेत. लोक परस्परांच्या जाती विचारत आहेत किंवा अंदाज घेत आहेत. या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष विचारणांनी खंतावलेल्या माझ्या मित्रमंडळींच्या फेसबुकवरच्या पोस्ट्सनी मलाही सावध केले आहे. मला कोणी अजून तसे विचारलेले नाही. त्याचे एक कारण माझ्या पोस्ट्समध्ये अनेकदा माझ्या ओळखीचे संदर्भ असतात, त्यामुळे त्यांना मी कोण आहे हे आधीच ठाऊक असणार. किमान अंदाज तरी असणार. पण ज्यांनी त्या पोस्ट्स वाचल्या नसतील असे असंख्य असणार; ज्यांना मी कोण हे ठाऊक नसणार. सांप्रतकाळी त्यांचीही उत्सुकता जागी होणार. कोणी आपल्याला विचारावे व मग आपण सांगावे हे काही मला (माझ्या स्वाभिमानी मनाला) बरोबर वाटत नाही. त्यामुळे आपण आधीच आपली जात सांगावी, असे ठरवले आहे. काय आहे, सध्याच्या मूक, विराट, व्यक्त, अव्यक्त, प्रति इ. माहोलात मीही तसा घाबरलो आहे. उद्या काही झाले तर शेवटी जातच मदतीला येणार असे मलाही वाटू लागले आहे. कुसुमाग्रजांची कविता मला दिलासा देत नाही. त्यातील गांधीजींच्या पाठीशी सरकारी भिंत तरी आहे. माझ्या पाठीशी घरातलीही नाही. असणारही नाही.
तर मी बौद्ध. म्हणजे बौद्ध ही काही जात नाही. पण आम्हाला तसेच ओळखतात. कारण आम्ही आधीचे महार. म्हणजे दलित. म्हणजे ज्यांना ४० टक्के असले तरी प्रवेश मिळतो व अन्यांना ९० टक्के असले तरी मिळत नाही, ते. आम्ही बाबासाहेबांमुळे बौद्ध झालो. माझे वडिल नागपूरला दीक्षा घ्यायला जाऊ शकले नाहीत. त्यांनी भंडारेसाहेबांच्या हस्ते परळच्या कामगार मैदानात दीक्षा घेतली. माझे आई-वडिल दोघेही महार. एकाच जातीचे. त्यामुळे मी तसा जातिवंत. माझ्यात मिश्रण नाही. महाराष्ट्रातले आम्ही बौद्ध हे तसे सगळेच महार. अपवाद आहेत. पण जुजबी. सुरेश भट, रुपा कुलकर्णी-बोधी असेही काही बौद्ध आहेत. पण ते जातिवंत नाहीत. ते बामण. त्यांना पटला म्हणून त्यांनी बौद्ध धर्म घेतला. माझे तसे नाही. मी बौद्ध आई-बापांच्या पोटी जन्माला आलो म्हणून बौद्ध. मैत्री, करुणा वगैरे बुद्धाची तत्त्वे ठाऊक नसली तरी आमच्या रक्तातच ती आहेत. शिवाय बाबासाहेबांनी शोधलेल्या मुळांप्रमाणे आम्ही नागवंशीय. हे नागवंशीय बौद्ध होते. म्हणजे हजारो वर्षे मुरलेले पिढीजात विचार माझ्या रक्तात वाहत आहेत हे तुमच्या लक्षात येईल. म्हणजे प्रयोगशाळेत ते दिसणार नाहीत. ते इंद्रियगोचर नाहीत. देव कोठे इंद्रियगोचर आहे? त्याचे अस्तित्व कोणी सिद्ध करु शकतो काय? पण तरीही तो आहे हे ‘सनातन’ सत्य आहे. रक्ताची तपासणी प्रयोगशाळेत केलीत तर A, B, C, D , O असेच Negative-Positive काहीतरी दिसेल. त्यावर जाऊ नका. आम्ही मंडेलांच्या द. आफ्रिकेतल्या वर्णविद्वेषविरोधी आंदोलनाला पाठिंबा देताना इथल्या भेदभावांचा संदर्भ मनात धरुन पूर्वी घोषणा देत असू- ‘जब रंग लहू का एक है-मानव में क्यों भेद है?’ ..त्याचा इत्यर्थ आता इथे लक्षात घेण्याचे कारण नाही. संदर्भ बदलतो आहे.
तिकडे काळा-गोरा भेद ठळकपणे दिसतो. इथे तसे नाही. कोकण रेल्वेतून प्रवास करताना शेजारी किंवा समोर बसलेले ‘राणे-परब’ नाव विचारतात. मी ‘सावंत’ सांगतो. गप्पा सुरु होतात. त्यात ‘आपल्यात’ अनेकदा येत राहते. मी अस्वस्थ होतो. हे आपल्याला मराठा समजत आहेत. मी आडवळणाने ‘आमच्या बौद्धवाडीत’ असा उल्लेख येईल असे काहीतरी बोलतो. मग संबंध सरळ होतात. मग चर्चा जातीच्या बोगद्यातून बाहेर पडते व ‘आपल्या कोकणात'च्या प्रादेशिक पुलावर दौडू लागते.
हे कॉलेजमध्येही व्हायचे. विशेषतः मैत्रिणींत. त्यावेळीही गैरसमजातून येणाऱ्या नाजूक अडचणी टळाव्यात यासाठी ‘आमच्या बौद्धांत’ असे जाणीवपूर्वक नोंदवत असे. मग संबंध बरेचसे मोकळे होत असत. अर्थात, हे कळून-सवरुनही गुंते झालेच नाहीत असे नाही. ते सोडवताना ओढाताणीत काही जखमा झाल्या; ज्यांचे व्रण आजही आहेत. असो! (‘असो’ लिहिताना एक दीर्घ उसासा टाकला. पण तो तुम्हाला कसा दिसणार? असो.)
तर राणे-परब दिसायला आपल्यासारखेच. एवढंच कशाला मला एकदा भाषणानंतर ‘भाषेवरुन तुम्ही देशस्थ वाटता’ असेही एक ‘देशस्थ’ म्हणाल्याचे आठवते. ‘वाटत नाही तुम्ही दलित आहात ते’ हे ऐकून झालेले आहेच. म्हणजे कोकणस्थ सोडले तर अन्य ब्राम्हणही ओळखायला त्यांचा वर्ण उपयोगी पडत नाही. कोकणस्थांतही फसगत होते. उदा. प्रणोती शिंदे. सुशिलकुमार शिंदेंची मुलगी. घारी-गोरी. सुशिलकुमार शिंदे ढोर या दलित जातीचे. चांभारांतही काही प्रमाणात असा गोरेपणा आढळतो. त्यांनीही सांगितले तरच ते चांभार आहेत, हे कळणार.
ही अडचणच आहे. मराठा आंदोलनात मी गेलो तरी खपून जाणार. देशस्थांतही खपून जाणार. कारण भाषा व उच्चार. प्रणोती कोकणस्थांत खपून जाणार. खरं म्हणजे, कॉलेजमध्ये, स्टेशनवर, रस्त्यावर अगदी देवळात-देवळाबाहेर कोण कोणत्या जातीचा ओळखायचा कसा? दलित तरी कसा शोधायचा? सगळेच काही ‘लगान’मधले ‘कचऱ्या’च्या वेशभूषेत नसतात. जानवं घातलेला ‘मंगल पांडे’ ब्राम्हण आहे हे कळतं. पण जे जानवी घालत नाहीत किंवा ज्यांची जानवी शर्टाच्या आत असतात, असे ब्राम्हण ओळखायचे कसे? कोणी म्हणेल वागण्यावरुन. म्हणजे भेदभाव करणाऱ्या, दुसऱ्याला तुच्छ समजण्याच्या वृत्तीवरुन. अशी वृत्ती म्हणजे ब्राम्हण्य. बरोबर. पण त्यातही अडचण आहे. बाबासाहेबांनी ‘ब्राम्हण्य’ हे फक्त ब्राम्हणांतच नाही, तर ते ब्राम्हणेतरांत, बहिष्कृतांतही असते, असे म्हटले आहे. त्याचे काय करायचे?
मला एक दाट संशय आहे. मी लहानपणापासून गावी आणि मुंबईतही काही कुजबुजी ऐकायचो. त्यात सुताराची ही अमक्या गवळ्याला लागू आहे. ती बामणीन घरच्या कुणबी गड्याला जास्त मर्जीने वागवते इथपासून हा गुरवाचा मुलगा खऱ्याचा नाहीच, तो अमक्याचा आहे... असे बरेच काही या कुजबुजीत असायचे. म्हणजे ‘गारंबीचा बापू’ एकटाच नाही. आणि हे ठाऊक असलेले ‘विठोबा’ही कमी नाहीत. मला संशय इतरांवर आहेच. पण माझ्यावरही आहे. म्हणजे जिथवर मला खात्रीने अंदाज आहे, तिथवर मी माझ्या आई-बापाचा म्हणजे खऱ्याचा मुलगा आहे. म्हणजे मी समजतो. आई-बाप दोघेही महार, त्यामुळे वर म्हटल्याप्रमाणे जातिवंतही आहे. पण माझ्या आई-बापांच्या आधीच्या पिढ्यांचे काय? ते सगळेच खऱ्याचे आहेत, याची गॅरंटी काय? ...बोंबला! म्हणजे मीही तसा ओरिजिनल खऱ्याचा असेन याचीही गॅरंटी नाही. मग ‘जातिवंत’च काय करायचं? या तर्काने कुळांचं काय करायचं? ९६, ९२, ९४ किंवा शून्य कुळ मोजायचं कसं?
असो. मी एका पिढीत तरी जातिवंत आहे, असे गृहीत धरतो. सगळ्यांनीच धरा. नाहीतर कठीण होईल. मोर्चात जायचे की प्रतिमोर्चात? की कशातच जायचे नाही? या प्रश्नांनी तुमचा हॅम्लेट होईल.
माझ्यासमोर दुसरीच एक अडचण आहे. ती आमच्या पुढच्या पिढीची. त्याचे असे आहे. माझी बायको माळी. आमचे लग्न आंतरजातीय-आंतरधर्मीय. माझ्या व तिच्या माहितीप्रमाणे ती जातिवंत, खऱ्याची आहे. पण माझ्या मुलाचे काय? तो खऱ्याचा आहे, हे नक्की. म्हणजे माझी बायको दुजोरा देते म्हणून. शिवाय त्याच्या व माझ्या दिसण्यात काही साधर्म्य आहे, असे लोकही बोलतात. मात्र तो जातिवंत खात्रीने नाही. आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीत बायको जातिवंत असली तरी तिचा लोप होतो व मुलाला बापाचीच जात, धर्म, नाव-आडनाव लागते. या संस्कृतीचेच मीही पालन केल्याने माझ्या मुलाला माझा धर्म, नाव लागलेले आहे. त्याच्या बौद्ध व सावंत असण्यावर कोणीही माळी आणि खुद्द त्याची आईही आक्षेप घेऊ शकणार नाही. पण माझ्या मनाला ठाऊक आहे ना की तो जातिवंत नाही! मी जसा दोन्हीकडून बौद्ध आहे, तसा तो नाही. बरं तो बुलंदपणे ‘जयभीम’ही म्हणत नाही. म्हणजे तोही संस्कार करायला मी कमी पडलो. ‘डीकास्ट’ असल्यासारखा तो वागतो. वावरतो. मी घेतलेली राखीव जागांची (त्यावेळी एसएससीला ७७ टक्के मार्क्स व ओपनच्या मेरिटमध्ये दुसरा असतानाही कॉलेजने जाणीवपूर्वक SC च्या राखीव कोट्यात बसवल्यामुळे) सवलत त्याने घेतलेली नाही. ना शाळेत. ना कॉलेजमध्ये. त्यामुळे तो प्रतिमोर्च्यातही जाणे शक्य नाही. त्याला जातीचा अभिमानच नाही. आताच्या या माहोलात त्याचे कसे होणार ही चिंता आहे. त्याने जातीला धरुन राहायला हवे, हे त्याला कसे कळायचे? तो संस्कारित ‘जयभीमवाला’ नसल्याने बौद्ध त्याच्या बाजूने ठाम उभे राहतील याची खात्री नाही. आईची जात माळी म्हणून माळी त्याला जवळ करतील ही तर शक्यताच नाही. आमच्याही लग्नात किंचितसं ‘सैराट’ झालेलं. ते नसतं झालं तरीही फार फरक पडला नसता. मुलगी परक्या जातीत गेली की तिच्या जातीला कायमची अंतरतेच. जातीतच नवऱ्याघरी गेली तरी माहेरला अंतरते. इथे तर परजातीत गेल्याचा मुद्दा आहे.
ही चिंता माझ्या मुलाबाबतच नाही. आमच्या घरातल्या सगळ्यांबाबतच आहे. म्हणजे माझ्या मेहुण्याची बायको मराठा, मेहुणीचा नवरा तेली, माझ्या भावाची बायको....नको. जातींची आणखी नावे नको. माझं व अजून दोन-तीन घेतली बस झालं. घरचे झाले म्हणून काय झालं! सगळ्यांनाच अशा जाती उघड करणं आवडणार नाही. आमच्या घरातल्या या मुलांच्या जाती व नावे ज्याच्या त्याच्या वडिलांची लागलीत. पण ही मुले भावंडे म्हणून एकत्र वाढताना त्यांना जातींची ओळख कशी द्यायची? पण आता द्यायला लागणार. त्यांना बसवून तुम्ही भावंडे आहात, पण तुमच्या जाती वेगळ्या आहेत हे सांगावे लागणार. आपापल्या जातीला-धर्माला धरुन राहा, हे पटवावे लागणार. हे पटवून आपसात भावंडांप्रमाणे राहायला काही हरकत नाही हेही सांगायचे. त्यासाठी महात्मा फुल्यांचे अतरणही द्यायचे- ‘ख्रिस्त, महंमद, ब्राम्हणाशी, धरावे पोटाशी बंधुपरी|’
तर मी बौद्ध, म्हणजे पूर्वाश्रमीचा महार हे लक्षात घ्यावे व अशा पूर्वाश्रमीच्या महार असलेल्या बौद्धांनी माझी ओळख ठेवावी. कोणता महार याच्या आणखी खोलात गेलात तर माझी अडचण होईल. ते मलाही सांगणे कठीण आहे. खरं म्हणजे महारांतही पोटजाती असतात, हे मला ठाऊकच नव्हते. एकदा शरद पवारांशी बोलत असताना त्यांच्याकडून या जाती पहिल्यांदा कळल्या. (कृपया गैरसमज नको. इतक्या मोठ्या माणसाशी माझे संबंध आहेत, असे समजू नका. मी त्यांना ओळखतो. ते मला ओळखत नाहीत.) एका राजकीय स्वरुपाच्या बैठकीत आम्ही दोन कार्यकर्ते त्यांच्याशी बोलत होतो. २५ वर्षांपूर्वी. रिपब्लिकन ऐक्य वगैरे संदर्भ असावा. रिपब्लिकन पक्षावर बावणे महारांचेच वर्चस्व कसे राहिले, वगैरे त्यावेळी मला कळले. माझा अंदाज आहे मीही बावणे महारांपैकी असावा. पण आम्ही मध्य कोकणातले बावणे महार (आताचे बौद्ध), घाटावरच्या व तळकोकणातल्या बौद्धांना (ते बावणे महार असले तरी) कमी लेखतो. ते अजूनही ढोल वाजवतात, महारकीची कामं करतात, मोठ्याचं मांस खातात, म्हणून ते खरे बौद्ध नाहीत इ. कारणांनी.
मी थांबतो आता. हे असे जातीतच खोल खोल गेलो तर आणखी ‘विपश्यी-बिनविपश्यी’ अशी पिसं काढत बसावे लागेल. मलाच त्याचा नीट बोध होत नाही, तर तुम्हाला तरी कसा होणार.
तूर्त, मी बौद्ध, पूर्वीचा महार, फारतर बावणे महार एवढं लक्षात घ्या. जे माझ्या जातीचे नाहीत त्यांनी ही ओळख लक्षात घेऊन माझ्याशी आपले संबंध पुनर्निर्धारित करा. माझ्या जातीच्यांनीही तेवढेच लक्षात घ्या. मी पुरोगामी, डावा, समाजवाद्यांना जवळचा वगैरे कृपया बघू नका. पुरोगामी, डावा, समाजवादी या जाती नाहीत हे कृपया ध्यानात ठेवा. या छावण्यांतल्या प्रत्येकाला आपापल्या जाती आहेत. त्यातल्या काहींना त्यांचे महत्व कळत नाही. काहींना त्या सांगायच्या नाहीत. काहींना त्यांचे महत्व माझ्यासारखे अलिकडेच लक्षात आले आहे.
तेव्हा, माझ्या बौद्ध बांधवांनो (भगिनींना निर्णयप्रक्रियेत किंमत नसते हे मला माहीत असल्याने त्यांना संबोधत नाही), या आताच्या गलबल्यात तुमच्या या धम्मबांधवाला (अधिक उचितपणे सांगायचे तर जातबांधवाला) लक्षात ठेवा, गरज पडेल तेव्हा आधार द्या. मदतीला धावून या. शेवटी तुम्हीच माझे. मी तुमचाच.
जयभीम. (आता सोबत लाल सलामची भेसळ नाही.) फक्त जयभीम!
- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com
________________________________
पुरुष उवाच, दिवाळी २०१६