संक्षिप्त परिचयः
सुरेश सावंत
जन्मः १४ जानेवारी १९६५, मुंबई.
शिक्षणः एम. ए. (मराठी)
१९८४ ते १९८९ - शिक्षक म्हणून नोकरी
१९८९ पासून पूर्णवेळ कार्यकर्ता
आंबेडकरी तसेच स्त्रिया, कष्टकऱ्यांच्यात काम करणाऱ्या अनेक पुरोगामी संघटना व चळवळींत सहभाग. उदा. प्रागतिक विद्यार्थी संघ, बौद्ध युवा मंच, स्त्री मुक्ती संघटना, रेशनिंग कृती समिती, अन्न अधिकार अभियान, सम्यक संवाद, संविधान संवर्धन समिती इ.
सहभाग असलेल्या चळवळीसंबंधी तसेच अन्य सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय विषयांसंबधी लेखन व भाषणे.
अक्षर प्रकाशनातर्फे ‘गुंता व उकल’ हा लेखसंग्रह प्रसिद्ध.
____
ईमेलःsawant.suresh@gmail.com ; मोबाईल क्र.9892865937
ब्लॉगः www.sureshsawant.blogspot.com
फेसबुक खातेः https://www.facebook.com/suresh.sawant65
पत्ताः ३०४, कृष्णा अपार्टमेंट, सेक्टर १२ ए, कोपरखैरणे, नवी मुंबई - ४००७०९.
_____________
विस्तृत परिचयः
मुंबईत चेंबूरच्या लेबर कॅम्पशेजारच्या पी.एल. लोखंडे मार्गावरील झोपडपट्टीत बौद्ध कुटुंबात माझा जन्म झाला. हा परिसर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीच्या काही बालेकिल्ल्यांपैकी एक. बाबासाहेबांच्या इथे सभा झालेल्या. दलित पँथरची चळवळ जोरात होती त्यावेळी मी ९-१० वर्षांचा असेन. त्या झंझावातात आमच्या वयाची मुलेही घुसळून निघत होती. 'जयभीम के नारे पे-खून बहे तो बहने दो...' घोषणा सुरु झाल्या की रोम न् रोम शहारुन उठायचा. सगळं वातावरणच भारुन टाकणारं होतं. राजा ढालेंच्या 'साधने'तील लेखातील राष्ट्रध्वजासंबंधीच्या उल्लेखाचा आणि नामदेव ढसाळांच्या 'स्वातंत्र्य कुठच्या गाढवीचं नाव आहे' या कवितेचा इतका व बराच काळ प्रभाव होता, की गवई बंधूंच्या हत्येनंतर मी शाळेत स्वातंत्र्य दिनाला काळी फीत लावून गेलो आहे. कितीतरी काळ राष्ट्रगीत म्हणायला मी नकार देत असे. नवीन समज आल्यावर हा प्रकार मी थांबवला. पुढे पँथरच्या चिरफळ्या झाल्या. प्रारंभ राजा-नामदेवच्या वैचारिक भूमिकांतल्या मतभेदाने झाला. त्या मतभेदालाही एक उंची होती. मात्र मतभेदाची जागा नेत्यांच्या अहंतांनी, वैयक्तिक महत्त्वाकांक्षांनी व पुढे स्वार्थाने व परिणामी संधिसाधूपणाने घेतल्यानंतर आंबेडकरी चळवळीची दारुण वाताहत झाली. मी १५-१६ वर्षांचा होईपर्यंत पँथरची रया पार गेली होती.
या पार्श्वभूमीवर बुद्धाच्या 'अत्त दीप भव' म्हणजेच 'स्वयंप्रकाशित व्हा', स्वतःचा उद्धार स्वतःच करा, या तत्त्वाने 'प्रागतिक विद्यार्थी संघ' या संस्थेची १९८० साली स्थापना करुन आम्ही वस्तीत शैक्षणिक उपक्रम सुरु केले. आम्हा कार्यकर्त्यांत माझ्यासह बहुसंख्य १० वीचे तर काहीजण कॉलेजला जाणारे विद्यार्थी होते. यात अल्प प्रमाणात बौद्धेतर मुलेही होती. घरात अभ्यासाला जागा नाही, वीज नाही, घरात कोणी शिकलेले नाही. यावर उपाय म्हणून 'बुद्धविहारात' आम्ही एकत्रित अभ्यास करत होतो, आमच्यापेक्षा कमी इयत्तांच्या मुलांचे वर्ग घेत होतो. व्याख्यानमाला आयोजित करत होतो. या परस्परसहाय्याच्या उपक्रमाने आम्ही शिक्षणात बऱ्यापैकी यश संपादन केले. 'फूल होता है पहले बाग का, बाद में डाली का' या कवी नीरज यांच्या आमच्या हिंदीच्या पाठ्यपुस्तकातील कवितेच्या पंक्ती डोळ्यासमोर होत्या. व्यक्तिगत विकास हा समाजाच्या विकासात अंतर्भूत असतो, हे तत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बुद्ध, फुले यांच्याविषयी जे वाचत-ऐकत होतो, त्यातून आमच्या मनावर बिंबले होतेच.
७७ टक्के गुणांनी एस.एस.सी. पास झालो. वस्तीत पहिला आलो. एवढे गुण मिळविणाराही वस्तीत आतापर्यंत मीच होतो. पण पुढे शिकणे अवघड होते. मी लवकर कमवायला लागणे आवश्यक होते. वडील व आई दोघेही वयस्क. त्यात सतत आजारी असायचे. छोटा भाऊ प्राथमिक शाळेत शिकत होता. वडील गिरणी कामगार. आजारपणाने रजेवर होते. पुढच्या दीड-दोन वर्षात निवृत्त होणार होते. त्यांच्या रजेच्या काळातच दत्ता सामंतांचा अजूनही न संपलेला संप सुरु झाला आणि वर्षभरात संपकाळातच ते निवृत्त झाले. आता तर घरी कमावणारे कोणीच नव्हते. ११ वीला प्रवेश घेतला होता. पण भौतिक-भावनिक अस्वस्थतेत नियमितपणे कॉलेजला गेलो नाही. नापास झालो. पुढे डी. एड. केले. ती २ वर्षे अनेकांच्या, मुख्यतः शिक्षकांच्या मदतीवर काढली. (हे सर्व शिक्षक उच्चवर्णीय होते.) १९ व्या वर्षी नोकरीला लागलो. रस्त्यावर येऊ घातलेले घर थोडक्यात वाचले.
या दरम्यान आधुनिक व वैज्ञानिक दृष्टिकोण देणाऱ्या व आमचे जीवन आमूलाग्र बदलणाऱ्या बौद्ध धम्माचा प्रचार-प्रसार हीही माझ्या कामाची एक महत्वाची आघाडी राहिली. गावी कोकणात आम्ही ‘बौद्ध युवा मंच‘ या नावाची संघटना केली आणि अंधश्रद्धा व जुनाट रुढींविरुद्ध अनेक मोहिमा घेतल्या. बौद्धांतील प्रस्थापित कर्मठतेविरुद्धही संघर्ष छेडले.
शिक्षक म्हणून आधी पार्ल्याला माधवराव भागवत हायस्कूल व नंतर चेंबूरला स्वामी मुक्तानंद हायस्कूल (वसंतराव खानोलकरांची शाळा) येथे नोकरी केली. प्रागतिक विद्यार्थी संघ, शाळेतील अन्य उपक्रम इ. काम चालू असतानाच शाळेतील पर्यवेक्षिका रजनी लिमये यांच्यामुळे त्यांचे वडील लाल निशाण पक्षाचे कार्यकर्ते, स्वातंत्र्य सैनिक, माजी शिक्षक आमदार भाऊ फाटक यांच्याशी संपर्क आला. त्यांच्यामुळे स्त्री मुक्ती संघटनेत व पुढे लाल निशाण पक्षात कार्यरत झालो.
'संपर्क आला....कार्यरत झालो' या वरील ओळींतला प्रवास सहज नव्हता. भाऊ भेटले नसते, तर हा प्रवास बहुधा झालाच नसता. म्हणजे कम्युनिस्ट चळवळीत नसतो आलो. बुद्ध-फुले-आंबेडकरी चळवळीच्या परिसरात दीनदुबळ्यांच्या उत्कर्षासाठी आयुष्य वेचणे हे शालेय जीवनातच ठरले होते. त्यामुळे त्या कामात मी पूर्णवेळ कार्यकर्ता होण्याची शक्यता होतीच. समाजवादी, गांधीवादी व कम्युनिस्ट यांपासून सावध राहावे आणि त्यातही ते जर ब्राम्हण असले तर त्यांच्या वाऱ्यालाही उभे राहू नये, असा संस्कार व सामाजिक दहशतीच्या वातावरणात मी वाढलो होतो. आंबेडकरी चळवळीचे होत असलेले पतन व या दहशतीच्या अध्वर्यूंची नैतिक वाताहत अन्य पुरोगामी प्रवाह समजून घेण्याची निकड तयार करत होते. तथापि, ही दहशत मोडून त्यांच्याशी संग करण्याइतपत ती निकड तीव्र नव्हती. या स्थितीत भाऊंना भेटलो. नवे समजून घेणे; खरे म्हणजे अदमास घेणे-तपासणे हा हेतू या भेटीत अधिक होता. ही भेट व पुढील प्रक्रिया रोचक आहे. पण विस्तारभयास्तव अधिक लिहीत नाही. एवढेच सांगतो, भाऊंनी आधी साने गुरुजी, स्वातंत्र्य चळवळ व शेवटी मार्क्सवाद सांगितला. मी कोरा नव्हतो. काहीएक राजकीय-सामाजिक जाण असलेला, व्यवहार करत असलेला कार्यकर्ता होतो. भाऊंच्या या अभ्यासमंडळांनी मनात अनेक संघर्ष उभे केले. या संघर्षांतून जो समज तयार झाला, त्यामुळे माझ्या मूळ आराध्यांना - बुद्ध, बाबासाहेब आंबेडकर यांना - धक्का तर लागला नाहीच, उलट त्यांच्या प्रतिमा, त्यांचे योगदान माझ्या मनात अधिक रेखीव झाले. त्या सर्वांना एक व्यापक संदर्भचौकट प्राप्त झाली. या विश्वाचा कोणीही निर्माता वा नियंता नसून ते विकसित झाले आहे व होत राहणार हा भौतिकवाद बुद्धामुळे शालेय जीवनातच उमजला होता. परंतु, विरोधविकासवादाची संकल्पना, ऐतिहासिक दृष्टिकोण भाऊंनी सांगितलेल्या मार्क्सवादातून मिळाला. पुढच्या सर्व चिंतन, विश्लेषण व चळवळीतल्या व्यवहाराला याचे खूप सहाय्य झाले. आंबेडकरी कार्यकर्त्यांच्यात, आंबेडकरी वस्तीत राहत असताना त्याच वस्तीत नव्या जाणिवेने व डाव्या ओळखीने व्यवहार करणे हे संघर्षाचे, सोबती-सहकाऱ्यांशी अंतराय तयार करणारे होते. आंबेडकरी चळवळीतून डाव्या चळवळीकडे यापूर्वी जे आले त्यांचाही कमीअधिक तीव्रतेने हाच अनुभव राहिला आहे. त्यांनी जे सहन केले ते मलाही करणे भाग होते. ते मी केले. सोबत्यांशी-वस्तीशी संपूर्णतः तुटून न जाता तिथेच रुतून राहायला व विस्तार पावायला बुद्ध-बाबासाहेबांमुळे मिळालेली व्यवस्थाबदलाची जाज्ज्वल्य आकांक्षा, भाऊंकडून मिळालेला नवीन दृष्टिकोण आणि या दरम्यानच्या माझ्या मनातील सूक्ष्मातिसूक्ष्म तरंगांना हेरुन त्यांचा निरास करणारा भाऊंचा अत्यंत संवेदनक्षम प्रतिसाद व आधार मदतनीस ठरला.
शिक्षक म्हणून नोकरी करत असतानाच मी मराठी विषयात बीए व एमए केले. एम.ए.ला प्रथम वर्ग मिळाला. मुंबई विद्यापीठातील माझ्या नामवंत शिक्षकांचा मी राज्यात अथवा राज्याबाहेरच्या विद्यापीठांत-किमानपक्षी महाविद्यालयांत लेक्चरर व्हावे, असा आग्रह होता. पण तो नम्रपणे नाकारला. चळवळीत पूर्णवेळ काम करायचे होते. याच दरम्यान, चळवळीतल्या कार्यकर्तीशीच माझा आंतरजातीय (आंतरधर्मीय) विवाह झाला. माझे दलितपण व झोपडपट्टीत राहणे यामुळे विरोध वगैरे नित्याचे सोपस्कार अर्थातच पार पाडावे लागले. आम्ही दोघेही पूर्णवेळ कार्यकर्ते होण्याच्या लायकीचे होतो, तरीही माझे सामाजिक स्थान व इतर काही घटक लक्षात घेता, पूर्णवेळ कार्यकर्तेपण माझ्या वाट्याला आले. लग्न झाले तेव्हा पत्नी शिकत होती. मी पूर्णवेळ कार्यकर्ता झाल्यानंतर पुढे दोन वर्षांनी तिने नोकरी सुरु केली. हा दरम्यानचा काळ जिकीरीचा होता. घरच्यांना, वस्तीतल्या मित्रांना, नातेवाईकांना हे अजिबात रुचले नव्हते. मात्र, भाऊ व भाऊंच्या अभ्यासमंडळांतून जोडल्या गेलेल्या माझ्या सहकाऱ्यांच्या भक्कम आधाराने हा काळही तरुन गेला. आमच्या या सहकाऱ्यांची लग्नेही चळवळीत झालेली व त्यांच्यातही दोघांपैकी एक पूर्णवेळ कार्यकर्ता अशीच रचना होती. एखाद-दोन वर्षे मागे-पुढे असे आम्ही पूर्णवेळ कार्यकर्ते झालो होतो.
पहिली जबाबदारी मिळाली ती स्वातंत्र्य सैनिक नागनाथ नायकवडी यांच्या पुढाकाराने वाळव्यातून सुरु होणाऱ्या साप्ताहिकाचे ‘कार्यकारी संपादक’ म्हणून काम पाहण्याची. लाल निशाण पक्षाचे एस. के. लिमये, यशवंतराव चव्हाण व दत्ता देशमुख यांना नागनाथअण्णा व वाळवेकर मंडळी खूपच मानत. हुतात्मा किसन अहीर सहकारी साखर कारखान्याची मान्यता मिळविण्यात दत्तांचे तर मोठे सहाय्य झाले होते. वयाच्या २५ व्या वर्षी लग्न, त्याच वर्षी एम.ए., त्याच वर्षी फुलटायमर व त्याच वर्षी वाळव्यात गेलो. वाळवेकरांना माझी काहीही ओळख नव्हती. माझे पत्रकारितेतलेही काही कर्तृत्व नव्हते. मी 'दत्तांचा माणूस' हीच माझी त्यांना पुरेशी असलेली ओळख होती. दत्तांचा माणूस व माझी क्षमता या पलीकडच्या काही कारणांनी हा प्रयोग काही जमला नाही. पुरोगामी चळवळीचे मुखपत्र व्हावे अशी अपेक्षा असलेल्या या साप्ताहिकाचे काम अल्पकाळातच सोडून मला मुंबईस परतावे लागले. त्यानंतर काही काळ साक्षरता चळवळ व ट्रेड युनियन आणि पुढे प्रदीर्घ काळ रेशनच्या चळवळीत सक्रीय राहिलो. अन्य सामाजिक-सांस्कृतिक कामांशी संबंध होताच. भाऊंशी संबंध आलेल्या आम्हा मंडळींना जाणीवपूर्वक वस्तीपातळीच्या कामाशी जोडणे हे भाऊंचे खास वैशिष्ट्य होते. ट्रेन युनियन एके ट्रेड युनियन न करता आम्ही समाजाच्या विविध अंगांशी संवादी राहावे, असा त्यांचा आग्रह व खटपट असे.
ज्या रेशनच्या चळवळीशी माझा प्रदीर्घ संबंध राहिला तिच्याविषयी थोडेसे अधिक सांगायला हवे. १९८८ च्या सुमारास ‘रेशनिंग कृती समिती’ स्थापन झाली. ही समिती म्हणजे एक संघटना नाही. अनेक संस्था, संघटना, मंडळे यांची ती समन्वय समिती आहे. प्रारंभी मुंबई व क्रमात राज्यातील अन्य भागातील संघटनाही तिच्याशी जोडल्या गेल्या. आज राज्यात अनेक ठिकाणी ती सक्रीय असली तरी मुंबई हाच तिचा मुख्य आधार राहिला आहे. रेशनचा अधिकार सर्व गरजवंतांपर्यंत पोहोचावा यासाठी त्यांची जागृती, त्यांना संघटित करणे व प्रशासन-शासनाशी नव्या नियमांसाठी-धोरणांसाठी व त्यांच्या अंमलबजावणीसाठी संघर्ष असे तिचे काम राहिले आहे. या संघर्षादरम्यान रेशन नीट मिळावे यासाठीचे नवे नियम, ज्यांच्याकडे त्यांच्या अस्तित्वाचा काहीही कागदोपत्री पुरावा नाही, असे असंघटित कामगार, फुटपाथवर राहणारे, परित्यक्ता, हिजडे, वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रिया अशा दुबळ्या विभागांना रेशनकार्डे सुलभरित्या मिळावीत यासाठीचे नवे आदेश इ. अनेक बाबी मिळविण्यात आल्या. पुढे देश पातळीवरच्या ‘राईट टू फूड कँपेन’चा एक भाग म्हणून राज्य पातळीवर अन्नाच्या अधिकारासाठी जी 'अन्न अधिकार अभियान' नावाने आघाडी सुरु झाली, त्यास प्रारंभीचा आधार रेशनिंग कृती समितीच्या या कामामुळे प्राप्त झाला.
विविध मतप्रवाह असणाऱ्या संघटनांना सामावून घेऊन त्यांची व्यापक एकजूट सांभाळत १९८८ पासून आजवर टिकून राहणे हे रेशनिंग कृती समितीचे वैशिष्ट्य आहे. रेशनच्या प्रश्नावर आमचे मतभेद आहेत वा नेतृत्वाचे परस्परांत जमत नाही, म्हणून दोन किंवा तीन आघाड्या झाल्या नाहीत. रेशनच्या प्रश्नावर रेशनिंग कृती समिती व अधिक व्यापक अन्न अधिकाराच्या प्रश्नावर रेशनिंग कृती समितीच्या समावेशासहित अन्न अधिकार अभियान, ही रचना इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राचे वैशिष्ट्य राहिले आहे. हे वैशिष्ट्य तयार करण्यात, जोपासण्यात आम्हा भाऊंशी संबधित लाल निशाण पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आटोकाट प्रयत्न राहिले आहेत, हे आत्मस्तुतीचा दोष पत्करुनही सांगणे भाग आहे. अन्यथा वस्तुस्थितीचे वर्णन प्रामाणिक राहणार नाही. व्यक्तीचे यथोचित महत्व अधोरेखित करत असतानाच 'व्यक्ती जावो, संघ माझा कायदा' या लाल निशाण पक्षाच्या शिकवणुकीवर आम्ही ठाम राहिलो. जनसंघटना पक्षनिरपेक्षच असल्या पाहिजेत, तेथील निर्णय हे 'पॉलिटब्युरोने' नव्हे, तर त्या जनसंघटनेच्या सदस्यांनी खरोखरच्या लोकशाहीने घ्यायचे असतात, हे तत्त्व आम्ही कसोशीने पाळले. केवळ पुढारपणाचे शहाणपण नव्हे, तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या 'किमान समजावर आधारित सामायिक सहमतीचे तत्त्व' प्रश्नाधारित व्यापक आघाडीच्या निर्णयप्रक्रियेचा मूलाधार राहायला हवा, याबाबत आम्ही आग्रही होतो. खुद्द पक्षातील अन्य कॉम्रेड्सशीही या व्यवहाराबाबत संघर्षाच्या वेळा आल्या. रेशनिंग कृती समितीला लाल निशाण पक्षाचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष खूप सहाय्य झाले, पक्षाचे कार्यालय, अन्य साधने मुक्तपणे रेशनिंग कृती समितीने वापरली. पण आम्ही पक्षकार्यकर्त्यांनी तिला पक्षाची आघाडी होऊ दिली नाही.
रेशनिंग कृती समितीच्या स्थापनेपासून तिच्याशी माझा संबंध असला तरी प्रारंभी मिलिंद रानडे प्रामुख्याने तिचे काम पाहत होते. १९९४ पासून मी मुख्य जबाबदारी स्वीकारली. मिलिंद रानडे अन्य कामांत व्यग्र झाले. २००९ ला (सुमारे १५ वर्षांनी) मी तिची पूर्णवेळ जबाबदारी सोडली. सुकाणू समितीचा निमंत्रित सदस्य म्हणून सल्लामसलतीत असतो. बैठका-मोर्च्यांत असतो. महत्वाची आंदोलने वा कार्यक्रम असले तर अधिक लक्ष घालतो.
सतत घोड्यावर बसल्यासारखे जनसंघटनेच्या दैनंदिन कामात अखंड बुडून राहावे लागत असल्याने काही करावयाच्या बाबी राहून गेल्या होत्या. त्यात वाचन-लिखाणाबरोबरच काही अन्य क्षेत्रांचा समावेश होतो. ते मी सुरु केले. या दरम्यान राजकीय क्षेत्रात मोठी उलथापालथ होऊन मोदी-म्हणजेच संघाचे सरकार प्रचंड बहुमताने सत्तेवर आले. राजकीय वरदहस्ताने आत्मविश्वास दुणावलेल्या सांप्रदायिक फॅसिस्ट शक्ती मोकाट सुटल्या. संविधानाच्या चौकटीला हादरे बसू लागले. हा अनुभव आम्हाला नवीन नव्हता. गोध्राचा परिचय होताच. त्याचबरोबर कितीतरी आधी ९२-९३ ला बाबरीच्या विध्वंसनासाठी झालेली रथयात्रा व तदनंतरच्या दंगलींनी आम्हाला चांगलेच हादरवले होते. त्यावेळी आम्ही ‘राष्ट्रीय एकता समिती’ ही सर्व पुरोगामी, लोकशाही शक्तींना एकत्रित करुन संघटना उभी केली होती. फॅसिस्ट शक्तींच्या विरोधात वस्त्यावस्त्यांत प्रबोधन व दंगलीनंतर पुनर्वसनाचे काम यात अन्य सर्व कामे सोडून आम्हाला उतरावे लागले होते. तथापि, त्यात सहभागी पुरोगामी मंडळी पुढच्या काळात निवडणुकादी राजकीय व्यवधानांमुळे सक्रीय राहिली नाहीत. आम्ही बरीच वर्षे हे काम चालू ठेवले. पण यथावकाश आमच्याकडूनही हे काम थांबले. २०१४ च्या मोदींच्या राज्यारोहणानंतर त्या कामाचे खंडित होणे तीव्रतेने जाणवले.
मात्र आता राष्ट्रीय एकता समिती व तिचा त्यावेळचा अधिकार राहिलेला नव्हता. त्यात पुढाकाराने असलेले आम्ही आता जनसंघटनांच्या व्यवधानात अडकलो होतो. राजकीय कार्यकर्ते असलो तरी हा राजकीय संघर्ष अंगावर घेण्यासाठीची संघटनात्मक ताकद व प्रेरणा यांत विशविशितपणा आला होता. एकूणच पुरोगामी चळवळीची ती स्थिती होती. अशावेळी मी जिथे वाढलो त्या चेंबूर परिसरातील मुख्यतः आंबेडकरी चळवळीशी संबंधित कार्यकर्त्यांचा सहभाग असलेल्या ‘संविधान संवर्धन समिती’स आम्ही चालना दिली. विविध रिपब्लिकन गटांत विभागलेले कार्यकर्ते वैयक्तिक पातळीवर इथे एकत्र होते, ही जमेची बाब. ही संघटना तशी नऊ-दहा वर्षांपूर्वीची. पण आता संविधान धोक्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर ती अधिक सक्रीय झाली आहे. संविधानातील मूल्यांचा प्रचार-प्रसार, त्यासाठी शिबिरे, वस्त्यांत बैठका, विविध निमित्ताने दिवस साजरे करुन चर्चा-परिसंवाद घेणे, यात्रा असे उपक्रम सुरु आहेत. आंबेडकरी समूहाला विविध पुरोगामी शक्तींशी एकजुटीत आणण्याची खटपटही चालू असते. या कामात सध्या मी अधिक व्यग्र आहे. समविचारी संघटनांच्या सहकार्याने शाळा-कॉलेज तसेच वस्त्यांत होणाऱ्या संविधानातील मूल्यांच्या प्रचाराची सत्रे घेण्यात सहभाग घेत असतो.
‘आंदोलन’ मासिकात सदर तसेच अन्य काही अंक, वर्तमानपत्रांतून प्रासंगिक लेखन चालू आहे. यांपैकीच काही निवडक लेखांचे ‘गुंता आणि उकल’ हे पुस्तक ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या अक्षर प्रकाशनातर्फे अलीकडेच प्रकाशित झाले आहे.
‘सम्यक संवाद’ या समविचारी कार्यकर्त्यांच्या गटातर्फे चालविण्यात येणाऱ्या फिल्म क्लब, online नित्यकालिक, त्याचे फेसबुकपेज यात भागिदारी करत असतो. समाजमाध्यमांचा वापरही निवडक पद्धतीने करत असतो.
एकूण पुरोगामी चळवळीची पडझड हे आज मोठे आव्हान आहे. हे आव्हान तसेच संविधानाची चौकट उध्वस्त करु पाहणाऱ्या फॅसिस्ट शक्तींचा मुकाबला करण्यासाठी पुरोगामी शक्तींची व्यापक एकजूट, मतभेदांसह सहमतीच्या मुद्द्यावर एकत्र येण्यासाठीच्या शक्यता हाच हल्ली माझ्या मांडणीचा व कृतीचा मुख्य आशय राहिला आहे.
- सुरेश सावंत
(१ डिसेंबर २०२०)