हा प्रश्न आम्हालाच का विचारता? आम्ही नाही पुढे गेलो. कबूल. पण तुम्ही कोणी काय केले सांगा ना. डाव्यांनी काय केले? समाजवाद्यांनी, गांधीवाद्यांनी काय केले? ...अंगावर आले की कवचात शिरायचे व अशा प्रश्नांची नखे परजायची आमची जुनी सवय. त्याप्रमाणे प्रश्नाला भिडण्याऐवजी ते परतवण्याचा विचार मनात आधी आला. पण मनाला समजावले. आपण विवेकी आहोत. असे करुन चालणार नाही. सर्वांनीच ही चिकित्सा-सर्वसाधारण तसेच अंतर्गत-करायलाच हवी. मार्ग निघेल याची खात्री नाही. पण काही प्रमाणात पुढे सरकायला तरी त्याचा उपयोग होऊ शकेल. ही आशा नक्कीच वृथा नाही.
चिकित्सा म्हटले खरे. पण चिकित्सा म्हणजे काही सैद्धांतिक मांडणी असे गृहीत धरले जाते. तसे मी करणार नाही. करु शकतही नाही. त्या क्षेत्राचा मला तसा आवाका नाही. एक कार्यकर्ता-फारतर विचक्षक कार्यकर्ता या नात्याने मला जे दिसते, वाटते ते नोंदवतो.
पुढे जाण्याआधी पुरुषमुक्ती म्हणजे काय ते नक्की करायला हवे. नाहीतर गोंधळ होईल. स्त्रीमुक्ती म्हणजे काय ते कळते. स्त्रीला दुय्यम स्थान देणाऱ्या व्यवस्थेतून तिची मुक्तता. तिला पुरुषाबरोबरीने सर्व क्षेत्रांत वावरता येणे. स्त्री म्हणून निसर्गदत्त बाबी वगळल्यास माणूस म्हणून तिच्या वाट्याला कोणताही दुजाभाव न येणे. पुरुषमुक्ती म्हणजे याची विरोधी बाजू असा सर्वसाधारण समज असतो. होतो. केला जातो. स्त्रिया पुरुषांवर अन्याय करतात. त्यातून पुरुषांना मुक्त करणे असा तो समज. तो गैर आहे. पुरुषमुक्ती व स्त्रीमुक्ती एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. नाण्याला नाणेपण येण्यासाठी त्याच्या दोन्ही बाजू सुस्पष्ट असाव्या लागतात. तसेच स्त्रीमुक्तीसाठी पुरुषमुक्ती गरजेची आहे. ज्या पुरुष-पितृसत्ताक संस्कृतीचा पुरुष वाहक असतो, तो एकप्रकारे तिचा गुलाम, बंदिवान असतो. त्याच्या या बंदिवान मानसिकतेने स्त्रीच्या मुक्तीला कुंपणे पडत असतात. याचाच अर्थ, स्त्रीची मुक्ती ही पुरुषमुक्तीशिवाय संभवत नाही. खरंतर स्त्री व पुरुष या दोहोंना माणूस म्हणून भरारी घ्यायची असेल तर त्या दोहोंची मुक्तता आवश्यक आहे. वर्चस्ववादी मानसिकता व स्थान हे एक बंधनच असते. पण त्या स्थानावरच्यांना ते ध्यानात येत नाही. तो त्यांना लाभ वाटत असतो. त्यांचे हे समाधान वास्तवात कृतक असते. ‘गुलामाला तो गुलाम आहे याची जाणीव करुन द्या. तरच तो बंड करुन उठेल.’ हे अब्राहम लिंकनचे विधान बाबासाहेब आंबेडकर अस्पृश्यांच्या मुक्तीसाठी निदर्शनास आणतात हे आपल्याला ठाऊक आहे. तेच पुरुषमुक्तीलाही लागू आहे. आपण पुरुषवर्चस्ववादी विचारांचे बंदिवान आहोत हे त्याला कळले तर तो त्याविरोधात उभा राहील. तसा तो राहिला व लढला तरच स्त्री-पुरुषांच्या माणूसपणाचे सुंदर नाते खुलणार आहे.
अशा या पुरुषमुक्तीच्या वाटेवर बाबासाहेबांची चळवळ पुढे का जाऊ शकली नाही, याचा वेध आपल्याला घ्यायचा आहे. यात काही बाबी ज्या अन्य अनेक चळवळींना लागू आहेत त्या आंबेडकरी चळवळीलाही लागू पडतात. तर काही बाबींचा संबंध व संदर्भ खास आंबेडकरी चळवळ हाच आहे.
महामानव इतिहासाचे अपत्य असतात. याचा एक अर्थ असा की त्यांची भूमिका मानवमुक्तीची असली तरी त्यांना ज्या इतिहासाच्या व भूगोलाच्या तुकड्यावर वावरावे लागते तो त्यांच्या कामाचे प्राधान्यही निश्चित करत असतो. बाबासाहेब आंबेडकरांच्या एकूण भूमिकेचे अनेक पदर सध्या अभ्यासकांकडून उलगडले जात आहेत. त्यातून त्यांचे महानपण अधिकाधिक दृश्यमान होते आहे. तथापि, त्यांच्या आयुष्यात त्यांना प्राधान्याने अस्पृश्यमुक्तीतच अधिक वेळ व्यतीत करावा लागला ही वस्तुस्थिती आहे. ही अस्पृश्यमुक्ती मानवमुक्तीच्या विविध अंगांना भिडल्याशिवाय अर्थपूर्णरित्या प्रत्यक्षात येणे कठीण आहे हे त्यांना ठाऊक होते. जमेल तिथे त्या अंगांना स्पर्श करण्याचा ते प्रयत्न करताना आपल्याला आढळतात. स्त्रीमुक्तीबाबतची त्यांची मांडणी व हस्तक्षेप खूप तगडे आहेत. १९२७ चा चवदार तळ्याचा सत्याग्रह ते संविधानर्मितीची प्रक्रिया व १९५१ चे हिंदू कोड बिल तसेच या दरम्यानच्या अनेक भाषणांतून ही मांडणी व हस्तक्षेप बाबासाहेब करत आले आहेत. त्यातून त्यांनी आधुनिक स्त्रीवादाची चौकट प्रशस्त केली आहे. स्त्री-पुरुषांचा दर्जा समान, पती-पत्नी मित्र, स्त्रीला पिता-पतीच्या संपत्तीत हक्क, घटस्फोटाचा अधिकार, द्विभार्या प्रतिबंधाद्वारे पतीच्या श्रेष्ठत्वाला लगाम, कामाच्या ठिकाणी बाळंतपणाच्या रजेचा अधिकार, आंतरजातीय लग्नाचा पुरस्कार आदि भूमिकांनी बाबासाहेबांनी या चौकटीचा आशय संपन्न केला आहे.
प्रश्न आहे तो पुढे का गेला नाही? बाबासाहेबांची ऐतिहासिक थोरवी व त्यांच्या वाट्याला आलेला प्राधान्यक्रम लक्षात घेता हा प्रश्न बाबासाहेबांना विचारून चालत नाही. त्याची जबाबदारी संपूर्णपणे बाबासाहेबांनंतरच्या नेतृत्वावर येते. हे नेतृत्व त्यात अपयशी ठरले. म्हणजे त्यांनी प्रयत्न केले व प्रयत्नांती त्यांना अपयश आले असे नव्हे. त्यांनी प्रयत्नच केले नाहीत. याला एखादा प्रासंगिक वैयक्तिक अपवाद असूही शकतो. पण तोही संशयाचा फायदा देण्यासाठी. आंबेडकरोत्तर नेतृत्व सपशेल फेल गेले या विधानाला त्यामुळे काहीही उणेपणा येत नाही. आंबेडकरी विचार व चळवळीचा विकास सोडाच; तो जिथवर होता तेवढाही टिकवणे या मंडळींकडून झाले नाही. याला काही वस्तुनिष्ठ कारणे असू शकतात का? - काही संदर्भ असू शकतात. पण वैयक्तिक आकांक्षा व त्यासाठीची साठमारी हेच प्रमुख आहे. वैचारिक मतभेदांची पार्श्वभूमी पहिल्या पिढीतील रिपब्लिकन नेतृत्वाला तसेच पॅंथरच्या प्रारंभकाळातील युवानेत्यांना जरुर आहे. पण त्यांच्या टिकाऊ फुटीला, चळवळीच्या पतनाला व दिशाहिनतेला त्यांचे वैयक्तिक अहंभाव व स्खलनच मुख्यतः जबाबदार आहे. सत्ताधाऱ्यांनी आमीष दाखवले म्हणून आम्ही फुटलो किंवा सगळेच तसे करतात तर आम्ही का मागे राहायचे, शेवटी आपल्या लोकांची चार कामे करायची तर हे गरजेचे नव्हे काय... ही मानसिकता हे काही परिस्थितीजन्य कारण होऊ शकत नाही. तुमचा विवेक भ्रष्ट झाला असेच म्हणावे लागेल. एकूण पुरोगामी चळवळीलाच सुकाणू राहिले नाही, त्यामुळे ही विवेकभ्रष्टता अधिक गडद झाली हे खरे.
या विवेकभ्रष्टतेत बाबासाहेबांनी अधोरेखित केलेली मूल्ये धूसर झाली. पुढच्या पिढ्यांपर्यंत ती पोहोचण्यात अडथळा तयार झाला. ज्यांनी स्वतः बाबासाहेबांचे वाचन केले त्यांना ती कळू शकली. पण वर्तमानाशी त्यांचे नाते जोडण्यासाठी जे भाष्य करावे लागते त्यासाठीचा कालपट या वाचनातून फक्त कळत नाही. प्रत्यक्ष काम केलेल्या नेतृत्वाने आपल्या अनुभवांच्या सहाय्याने ऐतिहासिक संदर्भात तो उलगडावा लागतो. त्यादृष्टीने अभ्यासवर्ग, शिबिरे असे काही काही झाले नाही. जे झाले ते अभिनिवेशी व अन्य समाजविभागांप्रती द्वेष निर्माण करुन संकुचितता वाढवणारे. नेत्यांची आंबेडकर जयंतीला ‘असा झालाच नाही कुणी-असा होणार नाही कुणी’ या पलीकडे भाषणांची झेप जाईनाशी झाली. आता तर स्थानिक सत्ताधाऱ्यांच्या आश्रयाने होणाऱ्या जयंती सोहळ्यांत बाबासाहेबांबरोबर या आश्रयदात्यांची आरती ओवाळण्यातच सार्थकता मानली जाते. तरुण मुले तर ही आरती कधी संपते व डीजे लागतो त्याची वाट पाहत असतात.
बाबासाहेबांची चळवळ, देशाला मिळालेले स्वातंत्र्य, संविधान व जुन्या वारश्याची बूज राखत तत्कालीन राज्यकर्त्यांनी घेतलेल्या राखीव जागा, सवलती आदि धोरणांमुळे बौद्ध-दलित विभागांत शिक्षण व नोकऱ्यांचे प्रमाण वाढले. त्यातून आजही अल्पसंख्य असलेला पण ठळकपणे जाणवणारा एक सुस्थिर वर्ग तयार झाला. शिक्षण व चळवळीमुळे सांस्कृतिक भान आलेला प्रारंभी वस्त्यांत राहणारा व त्याचवेळी चळवळीत (सामाजिक-साहित्यिक) भाग घेणारा तरुण वर्ग आर्थिक वृद्धी व शासकीय गृहयोजनांच्या सहाय्याने हळू हळू वस्तीबाहेर पडू लागला. त्याच्या या स्थलांतराबरोबरच त्याचा वस्तीतील हितसंबंधही संपू लागला. चळवळ बोलण्या-लिहिण्यापुरती राहिली. त्याच्या पुढच्या पिढीत तर तेही राहिले नाही. आज त्याचे अस्तित्व जवळ जवळ वस्त्यांत दिसत नाही. पूर्वी होळी-गणपती हे सण कोणी केले तर ते करणाऱ्यांत एकप्रकारची अपराधी भावना असे. आता गणपती, नवरात्रौत्सव व आंबेडकर जयंती एकाच उत्साहाने साजरे केले जातात. आंबेडकरी विचार व हे सण साजरे करणे यात काही द्वैत आहे, हे नव्या पिढीच्या ध्यानीमनीच नसते. सुस्थित वर्ग या वस्तीतल्या मुलांशी संबंध ठेवत नाही. आपल्या भूतकाळाचा कोणत्याही प्रकारे स्पर्श त्यांना पुन्हा नको असतो. आपल्या मुलांना तर ते त्यापासून कोसो दूर ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. आपल्या या तथाकथित खालच्या जातीच्या वेदनांचे भांडवल गरजेनुसार वापरणे व त्याचवेळी वरच्या जात-वर्गात सामावण्याची अखंड धडपड यात हा वर्ग अडकलेला आहे. या प्रयत्नांत वरच्या जात-वर्गाची संस्कृतीही तो प्रतिष्ठेचे गमक म्हणून स्वीकारत असतो. या दांभिकतेच्या ताणात त्याच्या व्यक्तित्वाचे केवळ भजे होते. नव्या विचारांची व आचाराची तो काय खाक जोपासना करणार! उलट सगळी जुनी जळमटे नव्या वेषात त्याच्या मनाला, घरादाराला वेढू लागतात. नाही म्हणायला यातले काही व्हॉट्सअप-फेसबुकवर लढाया मारत असतात. पण तिथेच. वस्त्यांत-रस्त्यावर उतरायला त्यांची तयारी नसते. विद्यापीठांतल्या विद्वानांच्या उड्या कॅम्पसच्या आत. सेमिनारांच्या-पेपरांच्या कक्षेत. अन्य पुरोगामी प्रवाहांना ठेचून आंबेडकरवाद कसा श्रेष्ठ आहे हे पटवण्यातच त्यांच्या विद्वत्तेची इतिश्री होते.
एका बाजूला लक्षणीय संख्या असतानाही त्या तुलनेत राजकीय ताकद नसणे, नेतृत्वाचा आपसातील बेबनाव, सुस्थित शिक्षित वर्गाची दांभिकता, एकूण पुरोगामी चळवळीचे कमकुवत असणे, आर्थिक सुस्थिरतेचा प्रवास नव्या आर्थिक धोरणांनी लडखडणे, सामूहिकतेकडून जमावीकरण व वैयक्तिक परात्मता या वावटळीत सापडलेली आंबेडकरी चळवळ जात-वर्गीय लढ्याचेच भान हरपून बसली आहे. तिच्याकडून पुरुषमुक्तीच्या भानाची अपेक्षा हे जरा अतिच झाले.
- सुरेश सावंत,
sawant.suresh@gmail.com
__________________________________
पुरुषभान परिषद, धुळे, २२-२३ डिसेंबर २०१७
__________________________
आंबेडकरी चळवळीच्या वाहक समुदायाच्या ‘पुरुषभानते’चे हे काही नमुने
• पॅंथरच्या काळात आणि त्यानंतरही चळवळीतल्या कार्यकर्त्यांना अगदी मध्यरात्रीही शिजवून जेवायला घालण्याचे काम त्यांच्या आयांनी केले आहे. आणि पुरुष कार्यकर्त्यांनी तिला गृहीत धरले आहे. आई म्हणून तिच्यावर त्यांनी कितीही भावपूर्ण कविता केल्या असतील. पण रात्री उशीरा येऊन आई किंवा बहिणीला उठवून जेवायला वाढायला लावणे, सकाळी उशीरा उठल्यावर आई-बहिणींनी आंघोळीचे पाणी काढणे, समोर चहा ठेवणे या सेवा घेताना तो पारंपरिक पुरुषच असतो. स्त्रीमुक्तीच्या वल्गना करणारे हे पुरुष बहिणीच्या सार्वजनिक वावराबाबत नैतिक रक्षकच असतात. आमचे मोर्चे, सभा, जयंत्या यांत स्त्रियांची संख्या मोठी. पण वक्त्यांत व निर्णयप्रक्रियेत नगण्य. आमच्या गावी कोकणात भावकीच्या किंवा गावच्या मंडळाच्या बैठका बसतात तेव्हा स्त्रियाही असतात. पण त्या खळ्याच्या (अंगणाच्या) एका कोपऱ्यात. मुख्य गोलात सगळे पुरुष. विषय सावित्रीबाईंच्या जयंतीचा असला तरी हीच स्थिती.
• बौद्ध विवाह विधीमध्ये वधू-वरांच्या ज्या शपथा आल्या, त्यात स्त्रीचे पारंपरिक स्थान सुरक्षित ठेवायचा प्रयत्न आहे. त्यात पतीने पत्नीला अलंकारादि बाबींनी संतुष्ट ठेवायचे असते व पत्नीने पतीने कमवून आणलेल्या संपत्तीचे रक्षण व घरच्यांचा मान राखायचा असतो. हल्ली दोघेही कमावत असताना हे वचन वस्तुस्थितीशी विसंगत नव्हे काय? आणि घरच्यांचा मान राखायची जबाबदारी ही फक्त पत्नीची कशी काय? पती-पत्नी हे मित्र असावेत असे बाबासाहेब म्हणतात, शिवाय घटनेत दर्जाची व संधीची समानता स्त्री-पुरुष दोहोंना दिलेली आहे. तरीही लग्नातली ही शपथ या मूल्यांशी सुसंगत नाही, हे लोकांना कळत नाही. त्यांना त्यात काही वावगे आहे असे वाटत नाही.
• बाबासाहेबांनी कार्यकारणभावाने धर्मग्रंथांची व बुद्धाचीही चिकित्सा केली. आज त्यांचे अनुयायी याला रजा देत आहेत. मंगळसूत्र वास्तविक पुरुषप्रधानतेचे प्रतीक. प्रारंभीच्या काळात त्याला नकार देण्याइतकी प्रगल्भता नसणे स्वाभाविक होते. पण हळूहळू त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्याच्या त्यागापर्यंत समाजाची मानसिकता तयार करणे गेल्या ६२ वर्षांत का शक्य झाले नाही? याचे कारण आहे कार्यकारणभावाला, तत्त्वज्ञानाला रजा देऊन विचारशून्य कर्मकांडी मनःस्थितीला शरण जाणे. महिला याच्या पहिल्या भक्ष्य आहेत. मंगळसूत्राचा त्याग राहिला बाजूला, आजही ते झोकात बौद्ध स्त्रियांच्या गळ्यात (ऐपतीप्रमाणे तोळ्यांत) डोलत असते. एक बदल होतो आहे. आता लक्षणीय संख्येने विशेषतः शहरातील बौद्ध महिला पांढरे मंगळसूत्र घालू लागल्या आहेत. पांढऱ्या साड्या नेसतात. म्हणून बहुधा पांढरे मणी. आपण हिंदू नाही, म्हणून हिंदूंसारखे काळे मणी नको. आपण बौद्ध आहोत. म्हणजे वेगळे आहोत. म्हणून पांढरे मंगळसूत्र. यात काळ्याचे पांढरे झाल्याने मूळ ‘पुरुषप्रधानतेच्या मालकी’चे तत्त्व कुठे बदलते? ते तसेच राहते.
• बाबासाहेबांनी जातिनिर्मूलनाचा एक प्रभावी उपाय आंतरजातीय लग्न हा सांगितला आहे. बौद्धांनी आपल्या उद्धारकर्त्याचा हा उपदेश शिरोधार्य मानायला हवा. पण तसे होत नाही. एकतर जातीतच लग्नाची खटपट असते. झालेच आंतरजातीय तर तथाकथित वरच्या जातीची मुलगी आपल्याकडे आलेली चालते. पण आपली मुलगी तथाकथित उतरंडीत आपल्या खालच्या स्तरावरच्या मुलाच्या प्रेमात पडलेली बौद्धांना चालत नाही. एकूण मुलीने दुसऱ्या जातीत जाणेच फारसे रुचत नाही. बाबासाहेबांचे भारत बौद्धमय करण्याचे स्वप्न एका संख्येने मागे पडते, ही समजूत हेही त्यामागे एक कारण असते. दुसऱ्या जातीची मुलगी आली तर हे स्वप्न पूर्ण होण्याच्या दिशेने एका संख्येने पुढे तरी सरकता येते. भारत बौद्धमय करण्याच्या वैचारिक क्रांतीला माणसांवर बौद्धपणाचे ठप्पे लावण्याची ही प्रतिक्रांती गिळू पाहते आहे.
• लोकसभा व विधानसभांत ३३ टक्के आरक्षण महिलांना ठेवावे हे विधेयक गेली २० वर्षे प्रलंबित असणे ही एकूणच भारताला नामुष्कीची बाब आहे. पुरोगामी विचारांचा वारसा सांगणारी मंडळी याला विरोध करतात तो पुरुषी मानसिकतेतूनच. रिपब्लिकन नेत्यांकडूनही याला विरोध होतो. दलित महिलांना यात वाटा नाही. सवर्ण महिला तो ओढून नेतील असा समज ते पसरवतात व आपल्या महिला आघाड्यांनाच या विधेयकाच्या विरोधात उतरवतात. वास्तविक हे आरक्षण समांतर आहे. म्हणजे खुल्या व आरक्षित गटांना ते छेदणारे आहे. याचा अर्थ दलितांना आज ज्या राखीव जागा आहेत, त्यातील ३३ टक्के जागा दलित महिलांसाठी राखीव ठेवाव्या लागणार. त्या खुल्या गटातील महिलांना मिळणार नाहीत. दलित पुरुषांचा या विधेयकाला विरोध असण्यामागे आपल्यातल्या स्त्रियांना वाटा द्यावा लागेल हे खरे कारण आहे.
____________________________