आपण केवळ भारतात राहतो म्हणून ‘भारतीय’ आहोत, असे नाही. आपले भारतीयत्व संविधानाने निश्चित केले आहे. संविधान म्हणजे फक्त राज्यकारभाराची किंवा सामाजिक-सार्वजनिक सुव्यवस्थेची नियमावली वा सूत्रे नसून या नियमावली वा सूत्रांना विचार, मूल्ये यांचे कोंदण आहे आणि हा मूल्यविचारच आपले भारतीयत्व सिद्ध करतो. औपचारिक शिक्षण तसेच सर्वसामान्य सामाजिक-राजकीय वातावरणातून संविधान ही मुख्यतः नियमावली म्हणून आपल्या समोर येते. त्यातील विचार, भूमिका, मूल्ये समजून घेण्याचे आपल्याला अवधान राहत नाही. परिणामी आपली ओळखच आपल्याला नीट गवसत नाही. आपण भारतीय म्हणजे नक्की काय आहोत, दुसऱ्या भारतीयाशी माझे नाते काय आहे, आपल्या सर्वांना मिळून कुठे जायचे आहे, हे खूप धूसर राहते. हितसंबंधी मंडळी त्याचा फायदा घेत आपल्याला चकव्यात अडकवतात. अशावेळी ‘आपलं आयकार्ड’ या पुस्तकाने संविधानाचा मूलाधार असलेला मूल्यविचार, संकल्पना यांचा परिचय देऊन आपल्या भारतीयत्वाची ओळख आपल्यासमोर सुस्पष्ट करण्याचे, पर्यायाने हितसंबंधीयांच्या चकव्यातून बाहेर निघायला मदतनीस होण्याचे मोठे काम केले आहे. हे पुस्तक लिहिणाऱ्या राही श्रुती गणेश आणि श्रीरंजन आवटे या दोघांना तसेच हे पुस्तक काढणाऱ्या द युनिक फाऊंडेशनला त्याबद्दल खूप धन्यवाद द्यायला हवेत.
‘आपलं आयकार्ड’ या पुस्तकाची ही लेखक मंडळी आणखी एका महत्वाच्या कारणाने अधिकच्या धन्यवादास पात्र ठरतात. घटनेतला मूल्यविचार वेगवेगळ्या अंगांनी याआधीही अनेकांकडून मांडला गेला आहे. तथापि, घटनेबाबतचे पुस्तक असतानाही ते सुबोध, वाचनीय आणि उद्बोधक आहे. मूल्य, संकल्पना यांचे विवेचन करताना त्याच्या पुष्ट्यर्थ ते एखादे गाणे, कविता, चित्र आपल्यासमोर ठेवतात. काही सिनेमे बघायला सांगतात. त्यांचा क्यू आर कोडही देतात. तो मोबाईलवर स्कॅन करुन थेट यू ट्यूबवर पोहोचता येते व ते सिनेमे पाहता येतात. तसेच काही पुस्तके वाचायला सांगतात. मध्ये मध्ये चौकटी टाकतात. या चौकटीत एखादी मौलिक माहिती, वर्तमानातल्या घटना, आपल्याला विचार करायला लावणारे प्रश्न असतात. कलमांचे उल्लेख येतात. पण ते विवेचनाच्या अनुषंगाने. कलम व त्याचे स्वतंत्र विवेचन यातून येऊ शकणारी रुक्षता इथे टाळली आहे. या सर्वांतून वळसे घेत पण वाट न सोडता होणारा वाचनाचा प्रवास उल्हसित करणारा आहे. त्यामुळेच सर्वसामान्य माणूस, कार्यकर्ते, शालेय-महाविद्यालयीन तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी, शिक्षक या सर्वांना अत्यंत उपयुक्त व समृद्ध करणारे हे पुस्तक आहे. प्रत्येकाच्या संग्रही हे असलेच पाहिजे.
अनेक नामांकित मंडळींनी प्रशंसा केलेल्या या पुस्तकाच्या वर्ष संपण्याआधीच तीन आवृत्त्या निघाल्या. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने बी. ए. च्या पहिल्या वर्षाच्या राज्यशास्त्र विषयासाठी संदर्भ पुस्तक म्हणून याची निवड केली आहे. हे खूप आश्वासक आहे.
या पुस्तकातील आशयाबाबतचे काही मुद्दे, वैशिष्ट्ये थोडक्यात समजून घेऊ.
संविधानातला मूल्यविचार समजून घेण्यासाठी संपूर्ण संविधान वाचण्याची गरज नाही. ‘आम्ही भारताचे लोक’ या शब्दावलीने सुरु होणारी संविधानाची ८५ शब्दांची एका वाक्याची उद्देशिका अर्थ व संदर्भ लक्षात घेऊन वाचणे पुरेसे आहे. ही उद्देशिका संविधानाचा चबुतरा आहे. त्याचे सार आहे. भारतीयांचा संकल्प आहे. या पुस्तकात उद्देशिकेला ‘सामूहिक स्वप्नसंहिता’ म्हटले आहे ते अगदी उचित आहे. उद्देशिका समजणे म्हणजे संविधान समजणे होय. ही उद्देशिका अनेक ठिकाणी फ्रेम करुन लावलेली असल्याचे आपण पाहतो. शालेय पाठ्यपुस्तकांत ती सुरुवातीलाच छापलेली असते. शाळेत प्रार्थनेवेळी ती म्हणूनही घेतली जाते. अनेकांना ती तोंडपाठ असते. पण ती अर्थासह समजून घेण्याचे अवधान क्वचितच कोणी दाखवतात. ‘आपलं आयकार्ड’ हे पुस्तक नेमके तेच काम करते. घटनेच्या निर्मिती प्रक्रियेचा आरंभी थोडा परिचय देऊन ते प्रामुख्याने उद्देशिकेतल्या मूल्यांचे, संकल्पनांचे विश्लेषण करते. प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ नानी पालखीवाला यांनी ‘संविधानाची उद्देशिका आपलं आयकार्ड आहे’ असं म्हटल्याची आठवण सांगून ‘खरं तर या विधानाची सिद्धता व विस्तार म्हणजे हे पुस्तक आहे’ असं लेखकांनी मनोगतात नोंदवले आहे.
पहिले प्रकरण ‘आम्ही भारताचे लोक’ यात ब्रिटिशांचे आगमन व भारताचा जन्म, घटना निर्मितीची प्रक्रिया, उद्देशिकेची रचना, तिची वैशिष्ट्ये नमूद केली आहेत. पुढील प्रकरणे ही एकेका मूल्यसंकल्पनेचा विस्तृत परिचय आहे. उदा. स्वातंत्र्य, समानता, बंधुभाव/सहभाव, न्याय, लोकशाही, धर्मनिरपेक्षता, समाजवाद. शेवटच्या ‘भारतीय संविधान आणि आपण’ या प्रकरणात पुस्तकातील चर्चेचा समारोप करताना विज्ञाननिष्ठता, पायाभूत संरचना, प्रातिनिधिक व सहभागी लोकशाही, मूलभूत कर्तव्ये यांचा आढावा तसेच आपल्या जबाबदारीचे आवाहन आदी बाबींचा समावेश आहे.
उद्देशिकेतील प्रत्येक मूल्याला एका मर्यादेत स्वतंत्र अर्थ आहे, त्याचबरोबर अन्य मूल्यांशी त्याचे नाते आहे. या नात्यातून तो अर्थ अधिक नेमका होतो. त्यामुळे ही सगळीच मूल्ये एकमेकांत गुंफलेली आहेत. एका मूल्याची चर्चा करताना अपरिहार्यपणे अन्य मूल्यांचा संदर्भ येतोच. या सर्व प्रकरणांतल्या चर्चेतही आपल्याला ते आढळेल. एखाद्या मूल्याचा अर्थ सांगताना त्याच्या सोदाहरण स्पष्टीकरणापुरते ते राहत नाही. देश व जागतिक इतिहासातील त्याच्या घडणीचे, उत्क्रांतीचे स्रोत, त्याच्यासमोरची आजची आव्हाने, त्याच्या सामान्यांच्या जीवनातील अर्थाबाबतच्या शंका अशा विविधांगांनी लेखक त्याला आपल्यासमोर मूर्त करतात. वाचकाशी बोलत, त्याला प्रश्न करत, त्याच्या भोवतालच्या घटनांकडे निर्देश करत, चर्चेत त्याला सामावत ही प्रक्रिया चालू राहते.
‘स्वातंत्र्य’ या संकल्पनेचा संविधानाच्या उद्देशिकेतील अर्थ स्पष्ट करताना मार्टिन ल्यूथर किंग ज्युनिअर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, फातिमा शेख यांच्या चळवळींचे, त्यांच्या मांडणीचे संदर्भ लेखक देतात. आठवीतल्या अमर्त्यने स्वातंत्र्यदिनी केलेले भाषण स्वातंत्र्य या संज्ञेच्या अर्थच्छटा उलगडणारे आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाले. पण आईला बाहेर जाण्याचे स्वातंत्र्य नाही. काय शिकावे हे ठरवण्याचे स्वातंत्र्य स्वाधीनला नाही. दलित, वंचित, आदिवासींपर्यंत स्वातंत्र्य पोहोचलेले नाही. या उणिवा नोंदवलेल्या अमर्त्यच्या भाषणाचा शेवट ‘..मात्र १५ ऑगस्ट ४७ ला लाल किल्ल्यावर पडलेले स्वातंत्र्याचे किरण झोपडीझोपडीपर्यंत पोहोचण्याची शक्यता तयार झाली’ (पृ. २१-२२) हे सांगून होतो. ‘बंधनांचा अभाव व आपल्या क्षमतांना वाव मिळेल, अभिव्यक्त करता येईल असा अवकाश’ स्वातंत्र्यात अभिप्रेत असल्याचे लेखक नोंदवतात. पुढे कोणतीच बंधने गरजेची नाहीत का, याचीही चर्चा करतात. जिथे दोन व्यक्तींच्या किंवा व्यक्तिसमूहांच्या कार्यकक्षा धूसर होतात किंवा एकमेकींवर कुरघोडी करतात, तिथे बंधनांची गरज असल्याचे सांगतात. उदा. अभ्यास व ध्वनिक्षेपक. अभ्यास व्हायला ध्वनिक्षेपकाच्या आवाजावर निर्बंध गरजेचे आहेत. पण शनिशिंगणापूर, मशीद यांत स्त्रियांच्या प्रवेशावरील निर्बंध योग्य आहेत का?...या प्रश्नांचा विचार करायला ते वाचकांना प्रवृत्त करतात.
अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे खूप महत्वाचे स्वातंत्र्य संविधानाने आपल्याला दिले आहे. आज अवतीभोवतीच्या अनेक घटना या स्वातंत्र्याची गळचेपी करणाऱ्या दिसतात. अभिव्यक्ती स्वातंत्र्याला अडसर ठरणाऱ्यांत लोकभावना हा एक भाग आणि सरकार हा दुसरा भाग. बंगलोरच्या अनन्या या १७ वर्षाच्या मुलीने स्टेजवरुन अनेक देशांच्या झिंदाबादच्या घोषणा दिल्या, त्यात पाकिस्तान झिंदाबाद असे म्हटल्याने तिला लोकांनी बोलू दिले नाही आणि सरकारने राष्ट्रद्रोहाच्या आरोपाखाली तिला अटक केली. आरोपपत्र दाखल न झाल्याने तिची जामिनावर आता सुटका झाली आहे. अशा कैक घटना घडत आहेत. याबाबतच्या अनेक जुन्या खटल्यांत न्यायालयाने आरोपींना निर्दोष ठरवले आहे. निकाल देताना त्यांची ही कृती अभिव्यक्ती स्वांतंत्र्याचा भाग असल्याचे मानले आहे. आपल्या घटनाकारांना या स्वातंत्र्याबद्दल काय वाटत होते, त्याचे मर्म सांगणारे व्हॉल्टेअरच्या चरित्रलेखिकेचे एक वचन या पुस्तकाच्या लेखकांनी या मुद्द्याची चर्चा करताना उद्धृत केले आहे. ते असे- ‘मी तुझ्या मताशी पूर्णपणे असहमत असलो तरी तुला तुझं मत मांडण्याचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळावं यासाठी मी आमरण लढेन.’ (पृ. २८)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्यांचा तत्त्वत्रयी म्हणून उल्लेख करतात ती मूल्ये म्हणजे स्वातंत्र्य, समता व बंधुता. यातील कोणतेही एक नसण्याने इतर दोहोंना अपुरेपणा येतो. विविधता स्वागतार्ह असते. पण एखाद्या समूहाच्या वेगळेपणामुळे त्याचा दर्जा कमी लेखणे वा त्याला समान संधी नाकारणे ही विषमता असते. पुरुषसत्ताकता आणि जातिव्यवस्था या विषमतेला बळ देतात. समानता प्रकरणात ही चर्चा करताना विषमतेची अनेक चित्रे, उदाहरणे लेखक वाचकांसमोर ठेवतात. विषमतेच्या चलाख समर्थनांचा समाचार घेतात. समतेकडे पाहण्याच्या दोन दृष्टिकोणांचा इथे उल्लेख करतात. पुढे समाजवाद प्रकरणात त्याचा सविस्तर परामर्ष घेतात. हे दोन दृष्टिकोन म्हणजे उदारमतवाद व समाजवाद. उदारमतवाद संसाधनांची खाजगी मालकी, खुली स्पर्धा व त्याद्वारे संपत्तीचे निर्माण आणि त्यायोगे गरिबी निर्मूलन मानतो. तर विषम पायावर खुली स्पर्धा न्याय्य असू शकत नाही. संसाधनांची मालकी समाजाची हवी, लोक क्षमतेनुसार काम करतील व निर्माण होणाऱ्या उत्पादनाचे गरजेनुसार वितरण होईल, हा समाजवादी दृष्टिकोण आहे. आपल्या संविधानात समाजवादाची अभिजात व्याख्या नाही. तथापि, गरीब, पीडितांना न्याय हे विकासविषयक धोरणांचे प्राधान्य राहील, हे स्वीकारले गेले आहे. संविधान निर्मितीतली नेहरु, आंबेडकर ही कर्ती मंडळी समाजवादी धोरणाची पुरस्कर्ती होती, याची नोंद लेखकांनी पुस्तकात केली आहे.
बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेल्या तत्त्वत्रयीत ते बंधुता मूल्याला विशेष अधोरेखित करतात. बंधुता नसेल तर अन्य दोन मूल्यांच्या म्हणजे स्वातंत्र्य व समानता यांच्या रक्षणासाठी पोलीस ठेवावा लागेल, असे ते म्हणतात. सदासर्वदा पोलिसी संरक्षण दुरापास्त असते. त्यासाठी भारतीयांना परस्परांविषयी आपुलकी, मैत्रभाव वाटणे खूप गरजेचे आहे. आपल्या या पुस्तकाची लेखक मंडळी बंधुता या शब्दाला अधिक अर्थवाही व लिंगनिरपेक्ष पर्याय देतात, तो म्हणजे- सहभाव. ते म्हणतात, ‘सहकार्य, साहचर्य, सोबत, सहिष्णुता म्हणजेच सहभाव. आपल्या ‘अनेकतेची’ जाणीव असलेली एकता म्हणजे सहभाव.’ सहभाव या संज्ञेत मैत्री, करुणा असे सारे येते. बुद्धाची कल्याणमित्रता आणि मैत्री या तत्त्वांचा अर्कच भारतीय सहभावाला घडवतो, असे सांगून लेखक मंडळी प्रदीप आवटे यांच्या ‘धम्मधारा’ काव्यग्रंथातील काही आशयघन पंक्तींची नोंद करतात.
बंधुता म्हणजेच सहभाव या मुद्द्याची चर्चा आपल्याला खूप उन्नत करुन जाते. द. आफ्रिकेने आपल्या संविधानाचे ‘उबुंटू’ हे पायाभूत तत्त्व असल्याचे जाहीर केले आहे. उबुंटू तत्त्व म्हणजे- ‘माणसाचं माणूसपण हे त्याच्या इतर माणसांसोबत असल्यामुळेच असतं.’ नेल्सन मंडेलांनी या उबुंटूची ओळख जगाला करुन दिल्याचे लेखक सांगतात. या विवेचनाआधी एक खेळ त्यांनी चौकटीत नोंदवला आहे. मुलांची पळण्याची स्पर्धा असते. कोण आधी पोहोचून फळांची टोपली पटकावतो, ते पाहायचे असते. स्पर्धेची शिट्टी वाजल्यावर मुले सुटी सुटी नव्हे तर हातात हात घालून धावतात व सगळे मिळून टोपलीतली फळे खातात. ..खूप सुंदर उदाहरण आहे. लेखकांनी योजलेल्या शब्दांचा वापर करायचा तर आज ‘विखंडित’ होत चाललेल्या जगात या सहभावाची नितांत गरज आहे.
‘न्याय’ संकल्पनेची चर्चा करताना ‘समता आणि स्वातंत्र्य या दोन मूल्यांमधलं संतुलन म्हणजे न्याय’ असे लेखक म्हणतात. रॉल्स आणि मार्क्स या दोन तत्त्वेत्त्यांचे याबाबतचे म्हणणेही त्यांनी संक्षेपाने नोंदवले आहे. सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय या संविधानाच्या उद्देशिकेतील न्यायाच्या क्षेत्रांची चर्चा करुन न्यायसंस्थेबाबतही ते विवेचन करतात. केवळ तंट्यांचे निवारण नाही, तर व्यक्तीच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण करणे न्यायव्यवस्थेचे काम असते.
लोकशाही, धर्मनिरपेक्षता, समाजवाद या मूल्यांची, संकल्पनांची चर्चा अशीच बहुअंगी, सखोल व उद्बोधक आहे. आपल्या समाजात ‘धर्मनिरपेक्षते’च्या अर्थाबाबात असलेल्या संदिग्धतेची खूप चांगली उकल या पुस्तकात केलेली आहे. युरोपातील धर्मनिरपेक्षता आणि आपल्याकडील धर्मनिरपेक्षता यांतील फरक, धर्मनिरपेक्षतेचे विविध अर्थ, राज्यसंस्थांचे स्वरुप, मूलतत्त्ववाद, जमातवाद या संज्ञांची स्पष्टता येण्यासाठी पुस्तक वाचायलाच हवे.
पुस्तकाच्या शेवटाकडे येताना लेखकांनी संविधानकर्त्यांच्या प्रयत्नांविषयी बोलताना सुंदर प्रतिमा योजली आहे- ‘या देशातील विविधता, बहुलता टिकावी म्हणून त्यांनी आटोकाट प्रयत्न केले. विविध संस्कृती एकत्र राहाव्यात, त्यांच्या सह-अस्तित्वातून इद्रधनुषी आभाळ फटफटून यावं म्हणून त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.’ (पृ. १०१) या मुद्द्याला विंदांच्या ‘मिसिसिपीमध्ये | मिसळू दे गंगा’ या कवितेचा ते आधार देतात. ‘सर्वांनी एका समताधिष्ठित बहुलतेपाशी विसावा घ्यावा,’ ही विदांची अपेक्षा व्यक्त करणाऱ्या ‘रक्तारक्तातील | कोसळोत भिंती; मानवाचे अंती | एक गोत्र’ (पृ. १०२) या ओळी नोंदवतात.
अखेरीस, या पुस्तकावर जे अभिप्राय येत असतील, येतील त्यातून अनेक मुद्दे पुढच्या अशाच सुबोध विवेचनाची मागणी करणार आहेत. त्यांचा लेखकांनी जरुर विचार करावा. अशी अनेक पुस्तके येणे आज गरजेचे आहे. ती त्यांनी लिहावीत यासाठी राही व श्रीरंजन यांना मनःपूर्वक शुभेच्छा!
- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com
_______________________________
आपलं आयकार्ड
राही श्रुती गणेश | श्रीरंजन आवटे
प्रकाशकः द युनिक अकॅडमी पब्लिकेशन्स प्रा. लि.
पृष्ठेः १०४ | किंमतः १५० रु.
_______________________________
(हा लेख मुंबई विद्यापीठाच्या मानव्यविद्याशाखेच्या ‘संभाषण’ या मुक्त-प्रवेश नियतकालिकाच्या जुलै २०२० च्या अंकात प्रसिद्ध झाला आहे.)