Saturday, January 2, 2021

खूप सारं शिकवणारी ‘शिकणारी शाळा’




एकूण शिक्षण क्षेत्रातले आजचे बाजारुपण, दिशाहिनता, मराठी माध्यमांच्या शाळांना आलेली अवकळा, एकेकाळी ध्येयवादातून काढलेल्या पण आता परवडत नसतानाही या शाळा टिकवण्याची धडपड करणारे अपवाद वगळता काळाच्या बरोबर बदलायला हवेचा बहाणा करत स्वतःहून बाजारुपणाला शरण जाणारे प्रवाहपतित संस्थाचालक, शिक्षकांच्या प्रेरणेची व समजाची काळजी वाटावी अशी अवस्था, हे सर्व मुकाट बघत स्पर्धेत मूल टिकले पाहिजेच्या अजिजीपोटी प्रवेश शाळेत पण भरपूर फिया घेणाऱ्या क्लासेसवर अवलंबून राहणारे पालक आणि या सगळ्यात भरडून निघणारी, कोवळ्या वयातील हक्काच्या, नैसर्गिक निर्मळ आनंदाला मुकणारी मुले...हे आजचे नव नित्य म्हणजे न्यू नॉर्मल.

या स्थितीशी झुंजणारे हाताच्या बोटावर मोजता येणारे दुर्मिळ प्रयोग आपल्याला कुठे तरी दिसतात. पण ते प्रयोग असतात. त्यासाठी आयुष्य खर्ची घालणाऱ्यांच्या प्रति कृतज्ञता जरुर. मात्र सर्वसामान्य शहरात, वस्तीत, सर्वसामान्य अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या अटींत हे प्रयोग करणे हे दमछाक करणारे तर अनेकदा अव्यवहार्य ठरते. या दिशादर्शक प्रयोगांना सामावून, तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन, समाजातील अनेक संस्था, व्यक्तींचे सहाय्य घेऊन, आपल्या स्थापनेपासूनच्या इतिहासाशी, ध्येयाशी बांधीलच नव्हे, ते ध्येय अधिक विकसित करत, नव्या आव्हानांना पुरून उरणारी, शिक्षणाचा नित्य आनंदोत्सव करणारी सर्वसामान्य शाळा मुंबईच्या उपनगरात असू शकते हे अचंबित करणारे आहे. अचंबित करणारे पण अशक्य नाही. शाळा चालवणाऱ्यांना ती दृष्टी, ध्येयाची स्पष्टता व त्यावरची अढळ निष्ठा, स्वतःच्या वस्तुनिष्ठ मापनाची तयारी, सतत नवे शिकत राहण्यासाठीची सर्जनशील प्रयोगशील वृत्ती व चिकाटीचे प्रयत्न एवढे मात्र जरुर हवे. म्हणूनच ही शाळा हा अप्राप्य तारा नाही, तर जमिनीवरील प्रयत्नसाध्य नमुना ठरतो. त्यामुळेच वर उल्लेख केलेल्या न्यू नॉर्मलला छेद जाऊ शकतो असे आश्वासन त्यातून मिळते.

ही शाळा आहे गोरेगावची अ. भि. गोरेगावकर इंग्लिश स्कूल व तिला नंतर जोडलेले घटक डोसीबाई जीजीभॉय बालविहार व डोसीबाई जीजीभॉय प्राथमिक शाळा. ही शाळा मी अनेकदा पाहिली आहे. विविध सामाजिक कार्यक्रमांसाठी तिच्या आवारात बरेचदा जाणे होते. तिचे चालक माहीत असल्याने ती वेगळी असणार हे अपेक्षित होते. पण ती एवढी वेगळी असेल याचा खरोखरच अंदाज नव्हता. तो आला या शाळेवरची दोन पुस्तके वाचून. ‘शिकणारी शाळा ‘अभि’रंग’ व ‘शिकणारी शाळा बालरंग’ ही ती दोन पुस्तके. पुस्तकांचे संपादन केले आहे शाळेच्या माजी विद्यार्थिनी व आपल्याला पत्रकार व लेखिका म्हणून परिचित असलेल्या वैशाली रोडे यांनी तर ती प्रकाशित केली आहेत ग्रंथालीने. शाळेला पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने शाळेच्या वाटचालीचा परिचय करुन देणारी ही पुस्तके आहेत. शाळा चालवणारे विविध घटक संस्थाचालक, शिक्षक, माजी विद्यार्थी हे यातील प्रकरणांचे लेखक आहेत. ही लेखन प्रक्रिया बरीच सामुदायिकही आहे. त्याविषयी संपादकांनी सुरुवातीला लिहिले आहेच. अशी पुस्तके आशय दमदार असतानाही अनेकदा घटनांची जंत्री होते. तसे इथे झालेले नाही. त्याचे श्रेय संपादकांना द्यावे लागेल. ही पुस्तके रोचक व वाचनीय आहेत. कथा-कादंबरीसारखी आपण ती वाचत जातो. कधी संपली ते कळतही नाही. आपण ती जरुर वाचावीत. इथेच अजून एक सांगतो. दुसरे पुस्तक ‘शिकणारी शाळा बालरंग’ हे छोट्या मुलांच्या पालकांना आपल्या मुलांच्या शिक्षणात लक्ष घालण्यासाठी एक खूप उपयुक्त मार्गदर्शिका आहे. आपल्या संपर्कातील अशा पालकांना ते वाचण्यास जरुर प्रवृत्त करावे. ही दोन्ही पुस्तके सर्वसामान्य वाचकांना मूल्यसमृद्ध करतातच पण शिक्षक, पालक व कार्यकर्ते यांच्यासाठी ती हस्तपुस्तिकाही ठरु शकतात.

दोन्ही पुस्तके मिळून सुमारे पावणेसहाशे पानांतील आशय, तोही पाऊणशे वर्षांतल्या खूप साऱ्या घडामोडींवर, प्रयोगांवर बेतलेला एका सदरासाठीच्या लेखात संक्षेपाने नोंदवणे मला कठीण आहे. तथापि, या पुस्तकांतून आढळलेली, मला अधोरेखित करावीशी वाटलेली काही वैशिष्ट्ये, मुद्दे एक झलक म्हणून खाली नमूद करत आहे.

शाळेच्या संस्थेचे नाव ‘दि शिक्षण मंडळ, गोरेगाव’. तिचे विद्यमान अध्यक्ष व शाळेचे माजी विद्यार्थी विजय नाईक यांनी ‘शिकणारी शाळा ‘अभि’रंग’ या पुस्तकाच्या प्रारंभी केलेल्या निवेदनात शाळेच्या स्थापनेमागची प्रेरणा, भूमिका, जपलेली मूल्ये, आव्हाने विशद केली आहेत. त्यांची सुरुवातच अशी आहे – ‘पातकर गुरुजींनी शाळा सुरु केली ते वर्ष होतं १९४०. त्यानंतर दोन वर्षांत दि शिक्षण मंडळ, गोरेगावची अधिकृत नोंदणी झाली आणि १९४२ मध्ये ऑक्टोबरला अ. भि. गोरेगावकर इंग्लिश स्कूलच्या इमारतीचं उद्घाटन झालं. धेयवादाने प्रेरित झालेल्या गोरेगावकरांनी स्वतःच्या हातांनी, श्रमदानाने या इमारतीच्या विटा रचल्या होत्या. ही एकाकी आकस्मिक घटना नव्हती. तो काळ म्हणजे भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाचं निर्णायक आणि रोमहर्षक पर्व होतं.’

हे रोमहर्षक पर्व आकारास येण्याआधी बरेच संघर्ष होऊन गेले आहेत. त्यांची नोंद करताना महात्मा फुले यांनी १८८२ साली हंटर कमिशनसमोर तर नामदार गोखले यांनी १९११ साली प्रांतिक सरकारांसमोर ‘सरकारी खर्चाने सर्वांना समान व मोफत प्राथमिक शिक्षणाची’ केलेली मागणी, त्यास समाजातील वर्ण-वर्ग श्रेष्ठींकडून झालेला विरोध यांचे विवेचन ते करतात. पुढे महात्मा गांधींच्या प्रेरणेने १९३७ साली वर्ध्याला काँग्रेसने घेतलेली शिक्षण परिषद, तिच्यात ‘शालेय शिक्षण सार्वत्रिक, सक्तीचं, मोफत, स्वतंत्र बुद्धीला व वैज्ञानिक वृत्तीला वाव, त्याचबरोबर श्रम व प्रत्यक्ष कृतीला प्रतिष्ठा देणारं, मातृभाषेतून दिलं जाणारं’ असलं पाहिजे ही स्वीकारली गेलेली भूमिका यांची नोंद आहे. इंग्रजांच्या विरोधात लढ्याची धामधूम सुरु असतानाच देशाच्या भावी रचनेविषयीची स्वातंत्र्य चळवळीने जाहीर केलेली ही भूमिका अ. भि. गोरेगावकर इंग्लिश स्कूलच्या संस्थापनेमागची रोमांचकारी प्रेरणा व आणि पार्श्वभूमी असल्याचे विजय नाईक नमूद करतात.

नाईक नोंदवत असलेली ही प्रेरणा हे केवळ त्यांच्या इथले वैशिष्ट्य नाही. त्यांनीच म्हटल्याप्रमाणे ही एकाकी व आकस्मिक घटना नाही. स्वातंत्र्य आंदोलनाचं रोमहर्षक पर्व व पुढे देश-समाज उभारणीची प्रेरणा ही देशभर होती. अ. भि. गोरेगावकर स्कूलसारख्या शाळा व त्यामागचे ध्येयवादी लोक ही त्या काळाची निपज होती. याचा अर्थ तो काळ, त्यावेळचे श्रम, संसाधनांची उपलब्धता हे सहज सोपे होते असा नव्हे. शाळा उभारतानाचे पातकर गुरुजी व त्यानंतर प्रभू सर यांचे प्रयत्न, कष्ट प्रचंड होते. काळ मात्र प्रेरणादायी होता. हा काळ सरल्यानंतर त्याच प्रेरणेने दीर्घकाळ टिकलेल्या फार कमी शाळा आहेत. अ. भि. गोरेगावकर शाळेचे ते वैशिष्ट्य आहे. प्रेरणादायी काळ संपल्यानंतरही शाळेचे रसरशीतपण संपले नाही. भोवतालच्या प्रतिकूलतेतही ते तिने जोपासले, वाढवले. स्थापनेमागच्या मूल्यांवर ठाम राहून बदलत्या परिस्थितीशी तिने सामना केला. या सामन्यासाठीची नवी कौशल्ये ती सतत शिकत राहिली. काळाच्या प्रेरणेवर अवलंबून न राहता ती आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग बनवून ज्यांनी या शाळेचं नेतृत्व केलं त्या माणसांना म्हणूनच या प्रक्रियेत अनन्य महत्व आहे.

दयानंद प्रभू हे त्यात मुख्य. पातकर गुरुजींनंतर प्रदीर्घ काळ शाळेचे मुख्याध्यापक राहिलेल्या प्रभू सरांचे कर्तृत्व, शाळेसाठीचे कष्ट व मूल्यांप्रतिची दक्षता इतकी थोर की ‘प्रभू सरांची शाळा’ म्हणूनच ती ओळखली जाऊ लागली. ‘अभि’रंगमधील विविध प्रकरणांत त्यांच्याविषयी काही ना काही उल्लेख येत राहतो. पातकर गुरूजींनी रचलेल्या विटांचा पाया अधिक मजबूत करण्याचे पुढचे काम प्रभू सरांचे. त्यावरच पुढची इमारत उभी असल्याने त्यांचे स्मरण विविध ठिकाणी होणे हे अगदी स्वाभाविक आहे. प्रभू सरांनी असे काय केले, याची काही उदाहरणे बघू.

शिक्षणातील नव्या धारणा, नवे शोध अजून यायचे होते, अशा काळात प्रभू सरांनी भोवतालच्या शाळांमध्ये जे चाले, ती वहिवाट आपल्या शाळेत मोडली. एका इयत्तेच्या गुणवत्तेप्रमाणे तुकड्या असत. म्हणजे अ पासून फ पर्यंत तुकड्या असल्या तर सर्वात हुशार मुले अ मध्ये, त्या खालोखाल ब व सगळ्यात कमी गुण मिळालेली मुले फ मध्ये. ‘अभि’त ही रचना नव्हती. प्रत्येक तुकडीत विविध गुणवत्तेचे समान स्तर राहतील अशा रीतीने मुलांचे वाटप केले जाते. हुशार मुलांचे पालक यावरुन तक्रार करत. पण प्रभू सर नमले नाहीत. समाजातील वंचितांना सर्वांच्या बरोबरीने वागवण्याच्या तत्त्वावर ते ठाम राहिले. आपली भूमिका सांगूनही ज्यांना पटत नाही, त्यांना ते आपल्या मुलांना दुसऱ्या शाळेत घालावे, असा पर्याय देत.

घटनेतला सामाजिक न्याय आरक्षण रुपाने प्रत्यक्षात शाळेत यायला अजून अवकाश होता. त्या आधीच प्रभू सरांनी मागासवर्गीयांना १० टक्के जागा अग्रहक्काने मिळण्याचा नियम शाळेत लागू केला. महानगरपालिकेच्या शाळेतून जी मुले शाळेत येत त्यांच्यासाठीही अशीच १५ टक्क्यांची व्यवस्था सरांनी केली. म्हणजे एकूण राखीव जागा झाल्या २५ टक्के. यात जी बाब आजही मानसिक पातळीवर अनेकांना पचत नाही ती त्या काळात सरांनी केली. खुल्या स्पर्धेत टिकण्याइतकी गुणवत्ता असलेल्या आरक्षणपात्र विभागांतील उमेदवारांना जाणीवपूर्वक आरक्षित गटातच घालण्याची खटपट व्यवस्थापनाची असते. प्रभू सरांनी आपल्या शाळेत खुल्या गटात स्पर्धा करण्याची मुभा सर्वांना ठेवली. आरक्षित गटातली मुलेही गुणवत्तेनुसार खुल्या गटात निवडली जात. नंतर आरक्षणाची प्रक्रिया सुरु होई. स्त्री-पुरुष समानतेबद्दल सर दक्ष असत. नकळतपणे ‘द गर्ल इज क्राइंग’ म्हटले जाते. तिथे जाणीवपूर्वक ‘द बॉय इज क्राइंग’ म्हणत जा, असे सर सांगत.

प्रवेश व नोकरी गुणवत्तेवर, वशिल्याने नाही हा नियम सर्वसामान्यांसाठी असतो. पण समाजातले नामवंत, सत्ताधारी राजकारणी, संस्थेचे विश्वस्त हे त्यास अपवाद असतात, हा शिरस्ता सार्वत्रिक आहे. प्रभू सरांच्या शाळेत मात्र हे चालत नाही. मृणालताई गोरेंना आपल्या लेकीच्या प्रवेशासाठी रांगेतच उभे राहावे लागले. अनेक बडी मंडळींची नाराजी त्यासाठी शाळेने पत्करली आहे. हा वारसा आजही जपला जातो. शाळेचे माजी विद्यार्थी असलेल्या माजी मंत्र्यांच्या, तसेच शाळेला लाखो रुपये मदत केलेल्यांच्या शिफारशी शाळेने विनम्रपणे नाकारल्या आहेत. याचा ताण येतो हे आताचे विश्वस्त मोकळेपणाने कबूल करतात. पण आपल्या भूमिकेपासून ही मंडळी ढळत नाहीत. 

निवृत्त झाल्यावर प्रभू सरांनी शाळेच्या कामात लक्ष घालावे अशी त्यांना आम्ही विनंती केली. पण त्याला सरांनी ठाम नकार दिल्याचे संस्थेचे कार्याध्यक्ष गिरीश सामंत सांगतात. सरांचे म्हणणे ते नमूद करतात- “मी परत आलो तर मागाहून आलेल्यांवर दडपण येईल. काम करण्याचं स्वातंत्र्य ते घेऊ शकणार नाहीत. स्वतः धडपड करताना चुकले तर ते त्यातून शिकू शकतील.” खूप आग्रह केल्यावर ते संस्थेच्या सर्वसाधारण मंडळाचे सदस्य झाले. पण दैनंदिन कामकाजात लक्ष न घालण्यावर ते ठाम राहिले, असे सामंत पुढे नमूद करतात.

प्रेरणादायी वातावरणाचा भाग संपल्यावरही मूल्यांच्या जोपासणीसाठी एवढी कडवी झुंज सहजवृत्तीने देणारे प्रभू सर म्हणूनच शाळेच्या पुढच्या चालकांपुढे दीपस्तंभ ठरतात. गिरीश सामंत, विजय नाईक तसेच शाळेचे अन्य चालक यांना यातूनच ताकद मिळते. प्रभू सरांचे हे वारसदार तेवढेच मजबूत असल्याने शाळेची प्रभू सरांनंतरची वाटचाल तेवढ्याच ताकदीची, सृजनशील राहिली आहे. वारसदारांची वृत्ती कळावी, याचे एक उदाहरण देतो. विजय नाईकांच्या निवेदनाचा आधी उल्लेख केला आहे. त्यात ते आठवी-नववीत त्यांच्या वर्गात असलेल्या अर्जुन या दलित विद्यार्थ्याची व स्वतःची तुलना करतात. अर्जुनचे विषयांतले प्रावीण्य नमूद करतात. हा हुशार विद्यार्थी परिस्थितीपायी पुढे जात नाही. खूप वर्षांनी त्याला खंगलेल्या अवस्थेत ते पाहतात. त्यांचे मन विषण्ण होते. नंतर त्याचा अकाली मृत्यू होतो. आज ते व्यथित होऊन लिहितात – ‘अर्जुनची प्रतिभा उमलण्याआधीच का कोमेजून विकीर्ण झाली? ....माझ्या आणि त्याच्या बुद्धिमत्तेत कणभरही फरक नव्हता. फरक होता तो केवळ कौटुंबिक पार्श्वभूमीचा आणि जातीचा. हा प्रश्न, ही स्मृती अनेकदा मनाला टोचत राहते.’

नाईकांनी नोंदवलेली विषम स्थिती, असे अर्जुन आजही आहेत. वानवा आहे ती विजय नाईकांच्या मनाला लागलेली टोचणी सार्वत्रिक नसण्याची. हल्ली तर ती फारच दुर्लभ आहे. अशी टोचणी असलेली माणसे जेव्हा शाळेच्या चालकपदी असतात, तेव्हा ती टोचणी केवळ भावना राहत नाही. ती कृतीत परिवर्तित होते. प्रेरणादायी वातावरणात घडलेले पातकर गुरुजी, त्या काळाचेच उत्पादन असलेले, मात्र काळ बदलूनही त्याच मूल्यांवर ठाम राहिलेले प्रभू सर आणि आज प्रेरणादायी वातावरण पूर्ण विलयाला गेले असताना नाईकांसारख्या प्रभू सरांकडून वारसा घेतलेल्या त्यांच्या विद्यार्थ्यांचे संस्थेत असणे व आजही काही टोचण्याइतकी त्यांची संवेदना ताजी असणे हा या शाळेची पुढची वाटचाल न खोळंबता अधिक गतिमान होण्याचा पाया आहे, असे मला वाटते.

शाळेची आताची ओळख गिरीश सामंतांची शाळा अशीही केली जाते असा उल्लेख पुस्तकात एके ठिकाणी आहे. त्यांचे वडील प. बा. सामंत हे शाळा उभारणीच्या प्रारंभीच्या फळीतले. संस्था चालकांचे सुपुत्र म्हटले की हल्ली आपल्या डोळ्यासमोर एक वेगळी, नकारात्मक प्रतिमा येते. एकेकाळच्या ध्येयवादी संस्थाचालकांच्या पुत्र-पौत्रांची पुढे ती संस्था जहागीर झाल्याचे दृश्य आपल्याला नवे नाही. अशावेळी गिरीश सामंत वगैरे या संस्थेच्या चालकांची मुले आज जे करताना दिसतात, ते केवळ त्यांचे निरलस कार्यकर्तेपण असते. वृत्तपत्रांतून शिक्षणधोरणाविषयी जे ते लिहीत असतात किंवा या पुस्तकातही त्यांनी आव्हाने म्हणून तसेच इतरत्रही जे लिहिले आहे त्यातून आणि मुख्य म्हणजे इतरांच्या लिखाणातून त्यांच्या व्यवहाराचे, मार्गदर्शनाचे जे उल्लेख येतात, त्यातून शिक्षण क्षेत्रातले ते अभ्यासक कार्यकर्ते आहेत, हे पुढे येते. आणि असा कार्यकर्ता संस्थेचा कार्याध्यक्ष असणे ही खूप जमेची व महत्वाची बाब आहे. 

काय दृष्टीने व्यवस्थापन ही मंडळी करतात याची प्रचिती व्यवस्थापनाबद्दलच्या प्रकरणात त्यांनी जे लिहिलंय त्यावरुन येते. गिरीश सामंत लिहितात- ‘व्यवस्थापन हे केवळ योजना, कार्यालय किंवा कागदपत्रांचं नसतं; तर ते मानवी मनांचं, परस्परसंबंधांचं व्यवस्थापनही असतं. आपापले विचार आणि अनुभव घेऊन आलेल्या माणसांची मतभिन्नता मान्य करुन, एकमेकांची बलस्थानं आणि कमतरता लक्षात घेऊन, परस्परांना सतत माहिती देत-घेत आणि एकमेकांना विश्वासात घेऊन काम करणं आवश्यक ठरतं. तेच आम्ही करत गेलो.’ निर्णयप्रक्रियेविषयी पुढे ते लिहितात- ‘बहुमतापेक्षा आम्ही सहमतीने निर्णय घेणं महत्वाचं मानतो. त्यामुळे आतापर्यंत एकही ठराव मताला टाकण्याची वेळ आली नाही. तात्त्विक मुद्दे किंवा संस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या विषयांवर मतभिन्नता असली, तर ती दूर होईपर्यंत इथे निर्णय होत नाहीत किंवा ते इतरांवर लादले जात नाहीत.’

अशा संस्था चालवणाऱ्या कोणाला आपण हे वाचून दाखवले तर त्यांना हा लोकशाहीचा पराकोटीचा (म्हणजे नको इतका) आदर वाटेल किंवा अशाने संस्था चालतात का, गतीने निर्णय घ्यायला हे तत्त्व उपयोगाचं नाही, हे फारच आदर्श झाले, व्यवहारात हा आदर्श टिकत नाही...असे शहाणपणाचे व्यवहारी सल्लेही ते देतील. या दोन्ही पुस्तकांतून शाळेने जे घडवलं ते अमूर्त नाही. तो प्रत्यक्ष पुरावा आहे. हे घडवण्यामागे ही संस्थेतली लोकशाही, भिन्नमताचा नितांत आदर करणारी सहमतीची निर्णय प्रक्रिया खूप कामी आल्याचे दिसते. म्हणजेच तो केवळ आदर्श नव्हे, तर व्यवहाराची पूर्वअट आहे.

मला पायाभूत महत्वाची वाटणारी काही सूत्रे मी नोंदवली. पण शाळेने काय काय नवीन उपक्रम, प्रयोग केले, आलेल्या अडचणींवर कशी मात केली, यांविषयी काही लिहिले नाही. ते लिहिण्याचा खूप मोह मला होतो आहे. पण तो आवरतो. हे उपक्रम खूप कल्पक आहेत. ते उद्बोधक, रंजक व आपल्या पारंपरिक समजुतींना झटकाही देणारे आहेत. अडचणींवर काढलेले मार्ग खूप दमदार आहेत. आजच्या स्थितीत दिशादर्शक आहेत. त्यासाठी मूळ पुस्तकेच वाचायला हवीत. वाचून त्यावर चर्चा व्हायला किंवा घडवायला हव्यात. जे हरवते आहे ते कळायला, जिथे जे जेवढे आहे ते जपायला, नसल्यास निर्माण करायला या चर्चा खूप मदत करतील. एक माणूस म्हणून समृद्ध व्हायला तर नक्कीच उपयोग होईल.

ता. क. – थोडं वैयक्तिक. मी कधीकाळी शिक्षक होतो. पूर्णवेळ कार्यकर्ता होण्यासाठी नोकरी सोडली. त्या निर्णयाबद्दल तर्काच्या पातळीवर, कर्तव्याच्या निकषावर वेगळे मत नाही. पण मधून मधून ३२ वर्षांपूर्वीच्या त्या वातावरणात मी जात असतो हे खरे. माझ्या भोवती मुलांचे अन् माझे मुलांभोवती रुंजी घालणे, बागडणे, सहली, रिकाम्या तासाला मुलांनी मला ओढून वर्गावर नेणे, स्नेहसंमेलने, त्यातील कार्यक्रम बसविणे, विविध उपक्रम आखणे व अमलात आणणे, शाळेत सकाळपासून संध्याकाळपर्यंत माझे रमणे हे आठवत असते. या पुस्तकांनी जरा जोरातच खपली काढली. आता हे लिहितानाही भळभळ, वेदना आहे. आत खोलवर एक पोकळी जाणवते आहे. मोठं काही हरवल्याची भावना आहे. ...असो. आता लेख संपला आहे. लवकरच मीही वर्तमानात येईन.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

(आंदोलन, जानेवारी २०२१)

शिकणारी शाळा

‘अभि’रंग

संपादन

वैशाली रोडे

प्रकाशन

ग्रंथाली

पृष्ठे ३०४ | मूल्य ३५० रु.

___________________________


शिकणारी शाळा

बालरंग

संपादन

वैशाली रोडे

प्रकाशन

ग्रंथाली

पृष्ठे २६४ | मूल्य ३०० रु.

No comments: