Sunday, February 21, 2021

प्यार भरा दिल कभी न तोड़ो

'बेशक मंदिर-मस्जिद तोड़ो, बुल्लेशाह ये कहता, पर प्यार भरा दिल कभी न तोड़ो’ ...ही चंचलच्या आवाजातली १९७३ सालच्या बॉबी सिनेमातली अजरामर कव्वाली. तिची स्मृती जागवण्याचे कारण प्रेमाच्या या भावनेला ग्रहण लावण्याचे जोरदार प्रयत्न समाजात सध्या सुरु आहेत. आणि त्यातही गंभीर बाब म्हणजे ज्यांनी या भावनेच्या रक्षणाला उभे राहायचे अशा सरकारकडूनच या प्रयत्नांचे नेतृत्व होते आहे. ‘लव्ह जिहाद’ ही प्रेमद्रोही संकल्पना जन्माला घालून, प्रचारुन तिच्या विरोधात कायदे केले जात आहेत. ही कव्वाली बुल्लेशाह या १७ व्या शतकातल्या पंजाबातील सूफी संताच्या रचनेवर आधारलेली आहे. तीनशे वर्षांपूर्वी बुल्लेशाह प्रेमाची महती गात होते, त्याच्या आड येणाऱ्या धर्मरुढींविरोधात बंड पुकारत होते. त्या प्रेमाच्या रक्षणाची हमी देणाऱ्या संविधानाचा आज काळ आहे. मात्र संविधानमार्गाने व संविधानाचीच शपथ घेऊन सत्तेवर आलेली सरकारे त्यास न जुमानता संविधानावरच शस्त्र चालवत आहेत. हा प्रेमविरोधी माहोल असतानाही या महिन्यात प्रेमाचा दिवस-व्हॅलेंटाईन डे तरुणाईने जोरात साजरा केलाच. प्रेमाची भावना कितीही शक्तिनिशी दाबण्याचा प्रयत्न केला, तरी ती त्यातूनही उसळी मारुन वर येणारच. समाजात अजूनही पुराणमतवाद असू शकतो. तो जायला अजून अवकाश लागेल, हे कबूल. पण सरकारनेच पुराणमतवादाचा कैवार घ्यावा, हे अत्यंत गंभीर आहे.

उत्तर प्रदेश सरकारने २८ नोव्हेंबर २०२० रोजी ‘बेकायदेशीर धर्मांतर प्रतिबंधक आदेश’ या नावाने अध्यादेश काढला. वास्तविक ज्या काळात विधिमंडळाचे अधिवेशन चालू नसते व ते चालू होईपर्यंत वाट पाहणे शक्य नसते अशा तातडीच्या गरजेसाठी अध्यादेश काढला जातो. पुढे सहा महिन्यांत त्याला विधिमंडळाची मंजुरी घ्यावी लागते. विधिमंडळाच्या अधिवेशनाची वाट न पाहता हा अध्यादेश काढण्याची तातडी काय? मुसलमान तरुण आपला धर्म वाढविण्यासाठी हिंदू मुलींना भुरळ घालून फशी पाडतात, त्यांचे धर्मांतर करुन त्यांच्याशी लग्न करतात. अशा रीतीने हिंदूंची संख्या कमी होऊन मुसलमानांची संख्या वाढवण्याचा हा डाव आहे, हे एकप्रकारे धर्मयुद्ध आहे, जिहाद आहे, तो प्रेमाच्या नावाने केला जातो आहे, म्हणून तो ‘लव्ह जिहाद’ आहे...अशी ही समजूत वा गृहितक आहे. त्यास तातडीने प्रतिबंध करण्यासाठी हा कायदा आहे, असे तो करणारे राज्यकर्ते प्रचारत असतात. उत्तराखंडनेही असाच कायदा केला आहे.  मध्य प्रदेश, हरयाणा, कर्नाटक ही भाजपशासित राज्ये असे कायदे करण्याच्या वाटेवर आहेत.

वरचे हे गृहितक खरे आहे का? संसदेत विरोधकांकडून यावर प्रश्न विचारला गेला. त्याला गृहखात्याकडून उत्तर देण्यात आले – “एकाही केंद्रीय तपास यंत्रणेला लव्ह जिहादची एकही केस मिळालेली नाही.” मग हे अध्यादेश वा कायदे का? ‘सतावणूक करायला’ असेच म्हणावे लागेल. हिंदू कट्टरपंथीयांच्या मुसलमान समाजाविषयीची प्रतिमा मलीन करण्याच्या, त्यांना दुय्यम नागरिक ठरविण्याच्या मोहिमेचा हा भाग आहे.  या कायद्याखाली ज्या पहिल्या तक्रारी करण्यात आल्या, त्यातील एका जोडप्याचा घरच्यांच्या संमतीनेच विवाह ठरला होता. मुस्लिम व हिंदू असे दोन्ही पद्धतींनी ते लग्न होणार होते. आईबापांची, नातेवाईकांची तक्रार नसताना कोणा एका हिंदू युवा वाहिनीने केलेल्या तक्रारीमुळे पोलिसांनी या दोन प्रेमी जीवांना लग्नापासून अडवले व चौकशीच्या नावाखाली त्रास द्यायला सुरु केली. दुसऱ्या एका जोडप्याचे लग्न झाले, कोणा नातेवाईकाची तक्रार नव्हती. तरी त्यांच्याबाबत याच हिंदू युवा वाहिनीद्वारे आलेली तक्रार पोलिसांनी दाखल करुन घेतली. पन्नासहून अधिक लोकांवर आतापर्यंत तक्रारी दाखल झाल्यात.

संविधान याबाबत काय म्हणते ते पाहू.  घटनेच्या तिसऱ्या भागात असलेल्या मूलभूत अधिकारांच्या कलम १३, २१ व २५ यांचा इथे संबंध येतो. कलम २५ हे धर्मस्वातंत्र्याचे कलम म्हणते- ‘सदसदविवेकबुद्धीच्या स्वातंत्र्याला आणि धर्म मुक्तपणे प्रकट करण्याच्या, आचरण्याच्या व त्याचा प्रसार करण्याच्या अधिकाराला सर्व व्यक्ती सारख्याच हकदार आहेत.’ कलम २१ हे जगण्याच्या  अधिकाराचे कलम आहे. त्याने जीविताबरोबरच व्यक्तिगत स्वातंत्र्य प्रत्येक व्यक्तीला बहाल केले आहे. कलम १३ (२) नुसार ‘राज्य, या भागाने प्रदान केलेले हक्क हिरावून घेणारा किंवा त्यांचा संकोच करणारा कोणताही कायदा करणार नाही.’

भले लग्नासाठी धर्म बदलला असेल, तरी तो एका प्रौढ व्यक्तीने स्वेच्छेने घेतलेला निर्णय असतो. तो त्याचा घटनादत्त अधिकार आहे. तो हिरावून घेणारा हा लव्ह जिहादविरोधी कायदा म्हणूनच घटनाद्रोही आहे. तो सर्वोच्च न्यायालयात टिकणे कठीण आहे. पण तोवर मुसलमानांची सतावणूक करायचे साधन म्हणून तो वापरता येणार आहे.

इथे एक गोष्ट हिंदू स्त्रियांनी खास लक्षात घ्यायला हवी, ती म्हणजे स्त्रियांना पुरुषांच्या तुलनेत खरे-खोटे पारखायची अक्कल कमी असते, ती चंचल असते म्हणून तिला स्वातंत्र्य देऊ नये, ही मनुस्मृतीची शिकवण इथे शासन पाळते आहे. कोणावर प्रेम करावे याचा सारासार विचार करण्याची तिची कुवत नसते हे गृहीत धरुन असे कायदे शासन करते आहे. हा स्त्रियांचा घोर अपमान आहे. भले-बुरे कळण्याची क्षमता स्त्री व पुरुष दोघांना तेवढीच असते, हा दर्जा व संधीच्या समानतेचा घोष करणारी घटना आता आहे. मनुस्मृतीचे दहन संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९२७ सालीच केले होते, हे विसरुया नको.

धर्म हा आध्यात्मिक गरजेपुरता राहावा, घटना लागू झाल्यावर त्याने सामाजिक बाबींत खरे म्हणजे लक्ष घालू नये. मात्र अजूनही विवाह, वारसा याबाबत व्यक्तिगत कायदे आहेत. त्यांच्या वाट्याला जायचे नसेल तर ‘विशेष विवाह कायद्या’चा अवलंब करायला हवा. या कायद्याखाली लग्न करताना कोणालाही आपला धर्म बदलण्याची गरज नसते. लव्ह जिहादविरोधी कायदे करणाऱ्यांना धर्म बदलण्याचीच चिंता असेल तर त्यांनी एकप्रकारे समान नागरी कायदा असलेल्या या विशेष विवाह कायद्याचा प्रचार करायला हवा. एक महिन्याची नोटीस हा या कायद्यातील एक अडचणीचा भाग जरुर आहे. घरच्यांचा, समाजाचा विरोध असताना एक महिना थांबणे शक्य नसल्याने धार्मिक पद्धतीचा नाईलाजाने अवलंब आंतरधर्मीय प्रेमविवाह करणाऱ्यांना करावा लागतो. अलीकडेच अलाहाबाद  उच्च न्यायालयाने नोटीशीचा हा कालावधी गरजेचा नसल्याचे म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयानेही त्यावर आता  शिक्कामोर्तब करायला हवे. त्याचबरोबर आता झालेले हे प्रेमद्रोही, घटनाद्रोही कायदेही तातडीने रद्द करावे आणि पुढे असे कायदे करु पाहणाऱ्यांना जोरदार चाप लावावा.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

(पुण्यनगरी, २१ फेब्रुवारी २०२१)

Saturday, February 13, 2021

इश्क़ आज़ाद है



युरोपात रोमिओ-ज्युलिएट, मध्यपूर्वेत शिरीन-फरहाद किंवा लैला-मजनू, भारतात हीर-रांझा किंवा सोहनी-मेहवाल या प्रेमाच्या कहाण्या जगप्रसिद्ध आहेत. त्या अजरामर आहेत. जोवर दोन मानवी जीव असे प्रेम करत राहणार आहेत, तोवर या तसेच अशा असंख्य कहाण्या जिवंत राहणार आहेत. त्यांत नव्यांची भर पडत राहील. पण संपणार नाहीत. ज्यांची नावे दिली त्या शोकांतिका आहेत. समाजाची बंधने त्यांना रोखण्याचा सर्वशक्तीनिशी प्रयत्न करतात. पण त्यास या जोड्या हार जात नाहीत. मृत्युला कवटाळतात, मात्र एकमेकांपासून विलग होत नाहीत. हे प्रेमिक मरुन जिंकतात. बंधने घालणारी तख्ते हरतात. म्हणूनच या कहाण्यांना (त्या युगुलांचे लग्न होऊन सुखाचा संसार होत नाही या अर्थाने) विफल म्हणण्याची रीत असली, तरी त्या त्या अर्थाने सफल आहेत. या कहाण्या अपवाद नाहीत. आजही त्या जगात, देशात, आपल्या आसपास घडत आहेत. ‘प्यार की आंधी रुक न सकेगी, नफ़रत की दीवारों से’ या दुर्दम्य विश्वासाने, कुस्करुन टाकण्याची कराल ताकद असलेल्या शक्तींना ललकारत ‘ऐ मोहब्बत ज़िंदाबाद’चा नारा देताना त्या दिसतात.

हे खरे की सर्वच प्रेमिक एवढी हिंमत दाखवत नाहीत किंवा अन्य काही अपरिहार्यता असतात. जात, धर्म, आर्थिक स्तर यांच्या खोट्या प्रतिष्ठेपायी या प्रेमिकांना शारीरिकदृष्ट्या विलग केले जाते, काहींचे दुसरीकडे त्यांच्या इच्छेच्या विरोधात लग्न लावले जाते, या दडपणापुढे रुढ अर्थाने हे प्रेमिक मान तुकवतानाही दिसतात. सगळेच काही पळून जात नाहीत वा त्यांचे जीव संपवत नाहीत. पण मनाने या प्रेमिकांना तोडणे शक्य होत नाही. ज्यांचे पसंतीच्या जोडीदाराशी लग्न झालेले नसते, ज्यांचा संसारही नीट चाललेला असतो, नवा जोडीदार जीव लावणारा, जपणारा असतो; अशांच्याही मनाचे काही कोपरे अखेरपर्यंत ‘तो’ किंवा ‘ती’ने व्याप्त राहतात. म्हणून ती आताच्या जोडीदाराशी प्रतारणा वगैरे असत नाही. तसा त्यावर स्वतः किंवा इतरांनी शिक्का मारणे हा केवळ मूर्खपणा असतो. असा भूतकाळाचा हळवा कोपरा जपत वर्तमान नाते आनंदाने जगता येते. या नात्यातील दोन्ही घटकांत त्याबाबतच्या समजाची प्रगल्भता मात्र हवी.

शारीरिक संबंध हा प्रेमाचा एक महत्वाचा भाग असतो. पण तो म्हणजे प्रेम नसते. केवळ शारीरिक गरजेसाठी संबंध ठेवणारे जुन्या काळापासून आहेत. त्यात मनांची गुंतवणूक अजिबात वा फारशी नसते. लैंगिक बाजार अथवा राजांचे जनाने सोडले, तर अशा बिनलग्नाच्या संबंधांना नैतिक मान्यता नसे. अलिकडच्या पिढीत सरसकट नसले तरी केवळ शारीरिक गरजांच्या पूर्ततेसाठी एकत्र येणे हा एक नैतिक-अनैतिकतेला खिजगणतीत न धरणारा प्रवाह जोम धरतो आहे. लग्नाशिवाय ‘लिव्ह इन’ मध्ये राहणे यात धरायचे नाही. लग्न हा समाजासाठीचा वा कायदेशीर बाबींसाठीचा सोपस्कार असतो. तो महत्वाचा असू शकतो. पण ‘लिव्ह इन’ मध्येही परस्परांची मानसिक गुंतवणूक चिवट असलेली दिसते. त्यांनी एकमेकांना वरलेले असते. त्यांच्या नात्यावर समाजाने मोहोर उठवण्याची त्यांना गरज वाटत नाही. किंवा रीतसर लग्नासाठीच्या काही व्यावहारिक अडचणीही त्यांच्या असतात. आजच्या सामाजिक-सांस्कृतिक रचनेत लग्नानंतर परस्परांना गृहीत धरण्याची एक स्वाभाविक प्रक्रिया सुरु होते, ती काहींना नको असते. रीतसर संसार सुरु असणाऱ्यांचाही नकळत कुठेतरी कोणावर तरी ‘जीव जडतो.’ विवाहबाह्य संबंधांना लैंगिक स्वैराचार म्हणून मोडीत काढले जाते. मात्र त्यातही, कायदेशीर जोडीदाराकडे व्यक्त करता येत नाही, अशा काही अंतरीच्या गाठी मोकळ्या करण्याचे खूप आत्मीय मैत्र असू शकते. कधी ही मैत्रं एकापेक्षा अधिक असू शकतात. यातून गुंते तयार होतात, हे खरे. पण प्रौढपणे ते सोडवायला हवेत. त्यावर नैतिक-अनैतिकतेचे शिक्के मारण्याने त्यांची सोडवणूक होत नाही. एकमेकांवरचे प्रेम वेगळे आणि शारीरिक संबंध वेगळे असेही नाही. शारीरिक संबंधांना बहार यायला परस्परांवरचे प्रेम आवश्यक असते. समलिंगी संबंधांनाही हे सर्व लागू आहे.

या सर्व गुंत्यात प्रेमाची उत्कटता हा घटक मूलभूत असतो. तो आनुषंगिक नसतो. प्रिय व्यक्तीच्या आगमनाची प्रतीक्षा करणाऱ्या मनाची अवस्था ‘हकीकत’ सिनेमातील एका गाण्यात कैफी आजमींनी व्यक्त केली आहे. ते म्हणतात – ‘ज़रा सी आहट होती है तो दिल सोचता है कहीं ये वो तो नहीं, कहीं ये वो तो नहीं..’ प्रीतीच्या अनुभूतीचे महात्म्य वा किंमत अनंत मरणांशी कवी गोविंदाग्रज तोलतात. ‘क्षण एक पुरे प्रेमाचा। वर्षाव पडो मरणांचा’ या त्यांच्या ओळी प्रसिद्ध आहेत. याच कवितेत प्रीतीच्या अनुभूतीचे वर्णन करताना ते म्हणतात- ‘तरंगति झणी। गोड तरि जहरी। प्रीतीच्या नवथर लहरी’.

प्रीतीच्या या तरंगांचा, नवथर लहरींचा अनुभव ज्यांना येत नाही, त्यांच्याबाबत गालिब म्हणतो ते खरे – ‘..हाय कंबख्त तूने कभी पी ही नहीं.’

सुरुवातीला उल्लेख केलेल्या कहाण्यांतील प्रेमिकांची ही पुरेपूर अनुभूती आहे. म्हणूनच ते परस्परांसाठी प्राणही द्यायला तयार होतात. शमेच्या ओढीने तिच्याकडे झेपावणाऱ्या परवान्याचा मृत्यू अटळ असतो. पण त्यातच त्याचे जीवित साफल्य असते. या कहाण्यांतील प्रेमिकांचा प्रेमोत्सव हा असा काळाच्या दृष्टीने अल्प पण दिव्यानुभूती देणारा असतो. समाजाच्या विरोधापायी आपण एकत्र राहू शकणार नाही, या निर्णयाला आलेली युगुलं आत्महत्या करण्याच्या बातम्या येतात. काहींना पालकच संपवतात. त्यांचे ऑनर किलिंग करतात. खोट्या प्रतिष्ठेपायी खून हा प्रेमाचा ऑनर संपवण्याचा फोल प्रयत्न असतो. त्याने माणसे संपवली जातात. पण प्रेम आबादाच राहते. म्हणजेच या फक्त कहाण्या नाहीत. ते आजचे वास्तव आहे. प्रेमासाठी संपणे वा संपवले जाणे हा मानवी समाजाचा इतिहास आणि वर्तमानही आहे. ज्यांचे खून होतात, ते त्यांच्या हातात नसते. पण आत्महत्या करणे हे समर्थनीय नाही. त्यांनी व्यवस्थेशी झुंजावे हेच आपण म्हणू. इथे मुद्दा इतकाच की उत्कट प्रेम ही कहाणी वा भूतकाळ केवळ नाही, तर तो वर्तमान आहे आणि भविष्यही असणार आहे. मानव असेपर्यंत ते असणार आहे.

अशा या प्रेमाचा उत्सव करण्याऐवजी माणसे त्याला नाना मान्यतांच्या, संकेतांच्या, धर्म नियमांच्या बंधनांत अडकवायचा नाहक प्रयत्न करतात. नाहक यासाठी की आधी म्हटल्याप्रमाणे ही माणसे ‘माणसे’ मारतात. पण प्रेमाचा आदिम प्रवाह रोखू शकत नाहीत. ती प्रेम करणाऱ्यांबरोबरच स्वतःलाही हानी पोहोचवतात. स्वतःची आनंद घेणारी, उन्नत भावनांनी समृद्ध करणारी आपली इंद्रियेच नष्ट करतात.

या प्रेमाच्या विरोधकांनी जात, धर्म, संपत्ती, प्रतिष्ठा यापायी प्रेमाला कैद करण्याचा आटोकाट प्रयत्न करुनही ते उसळी घेताना दिसते. जाती-धर्माच्या बाहेर लग्न करणाऱ्यांचे एकूण प्रमाण खूप नाही. पण त्यांची संख्या तीव्र विरोध असतानाही वाढती आहे. ती कमी झालेली नाही. विरोध, मारहाण, मृत्यू ठाऊक असूनही प्रेमी युगुले हे धैर्य करतात, ही एक जैविक प्रेरणा आहे. ती नैसर्गिक आहे. तिला अडवायचे प्रयत्न कृत्रिम आहेत. निसर्ग नियमाच्या विरोधात आहेत. जिथे सरमिसळ आहे, अशी महाविद्यालये, नोकऱ्यांची ठिकाणे, राहत्या वसाहती इथे प्रेमात पडणारी मुले योगायोगाने एका जातीची असू शकतात. ती जात वा धर्म बघून प्रेमात पडत नाहीत. ती त्या माणसाच्या प्रेमात पडतात. हे अगदी नैसर्गिक आहे. जात, धर्म हे संदर्भ लग्नावेळी येतात. ते तेव्हातरी का यावेत? ते अनैसर्गिक आहेत. या प्रेमी युगुलाचे नाते जाहीर करण्यासाठीचा लग्न नावाचा विधी सामाजिक आहे. आजच्यासारखे संविधान नव्हते, त्या वेळी धर्माने आध्यात्मिक गरजेबरोबरच सामाजिक नियमन केले. त्यावेळी लग्न विधीत धर्माचा संबंध समजण्यासारखे होते. हा संबंध अडवण्याच्या पद्धतीने नाही, तर त्या नात्याच्या स्वागतासाठी हवा. त्याही वेळी परस्परांना साक्षी मानून देवाच्या मूर्तीला अभिवादन करुन एकमेकांच्या गळ्यांत हार घालून गांधर्व विवाह केले जात होते. आता संविधानाची कारकीर्द सुरु झाल्यावर धर्माने सामाजिक क्षेत्रातला आपला हस्तक्षेप बंद करुन आत्मिक मुक्तीच्या आपल्या मूळ कामावर लक्ष द्यायला हवे.

अलीकडेच डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर यांनी त्यांच्या स्वामी विवेकानंदांवरच्या एका लेखात विवेकानंदांना याची किती ठळक स्पष्टता होती, हे विवेकानंदांची काही अवतरणे देऊन नोंदवले आहे. त्यातील एक अवतरण असे आहे - ‘सामाजिक गोष्टींच्या बाबतीत धर्माने ढवळाढवळ केली, ही धर्माची सर्वात मोठी चूक आहे. सामाजिक नियमांचा कर्ता होण्याचा धर्माला काहीही अधिकार नाही. धर्माचा संबंध केवळ आत्म्याशी आहे, त्याने सामाजिक क्षेत्रात अजिबात ढवळाढवळ करू नये. आत्तापर्यंत जे अनर्थ घडले त्याचे एकमेव कारण- धर्माने सामाजिक बाबतीत ढवळाढवळ केली, हे आहे.’

लव्ह जिहाद व त्याबाबच्या कायद्याची चर्चा सध्या जोरात आहे. हा कायदा घटनेने दिलेल्या धर्मस्वातंत्र्याच्या आणि जोडीदार निवडीच्या स्वातंत्र्याच्या पूर्ण विरोधात आहे. कायदा, वास्तविक वटहुकूम उत्तर प्रदेश सरकारने काढला आहे. सहा महिन्यांत त्याला विधानसभेत मंजुरी घ्यावी लागेल. मध्य प्रदेश, हरयाणा, कर्नाटक ही भाजपशासित राज्येही आपल्या राज्यात असा कायदा करण्याच्या वाटेवर आहेत. ज्यावर विधिमंडळाच्या अधिवेशनापर्यंत थांबून चर्चा करुन कायदा करायला फुरसत नाही, अशा तातडीच्या बाबीसाठी वटहुकूम काढला जातो. या प्रकरणात एवढी काय तातडी होती? यामागे जे गृहीतक आहे ते असे - लव्ह जिहाद म्हणजे मुस्लिम तरुण हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात फशी पाडून त्यांचे धर्मांतर करुन लग्न करतात. इस्लाम धर्म वाढविण्यासाठीचा हा जिहाद म्हणजे धर्मयुद्ध आहे. याला वस्तुस्थितीचा काय आधार? तर काही नाही. संसदेतच या प्रश्नाला सरकारने लव्ह जिहादचा कोणताही पुरावा नाही असे उत्तर दिलेले आहे. तरी हा कायदा का? तर मुसलमानांना त्रास द्यायला. हिंदूंच्या राज्यात ते दुय्यम नागरिक आहेत, हे स्थापित करण्याच्या रणनीतीचा तो भाग आहे.

हा कायदा सर्वोच्च न्यायालयात टिकणार नाही. पण कोर्टाचा निकाल येईपर्यंत मुसलमानांना त्रास द्यायची संधी त्यामुळे मिळणार आहे. ती घ्यायला त्यांनी सुरु केले आहे. ज्यांच्याविरोधात पहिल्या तक्रारी करण्यात आल्या, त्यातील एक जोडप्याचा घरच्यांच्या संमतीनेच विवाह ठरला होता. मुस्लिम व हिंदू असे दोन्ही पद्धतींनी ते लग्न होणार होते. आईबापांची, नातेवाईकांची तक्रार नसताना कोणा एका हिंदू युवा वाहिनीने केलेल्या तक्रारीमुळे पोलिसांनी या दोन प्रेमी जीवांना लग्नापासून अडवले व चौकशीच्या नावाखाली त्रास द्यायला सुरु केली. दुसऱ्या एका जोडप्याचे लग्न झाले, कोणा नातेवाईकाची तक्रार नव्हती. तरी त्यांच्याबाबत याच हिंदू युवा वाहिनीद्वारे आलेली तक्रार पोलिसांनी दाखल करुन घेतली. सुमारे पन्नासेक लोकांवर आतापर्यंत तक्रारी दाखल झाल्यात. त्यात दोन मुलींनी तक्रार केल्याचेही वृत्तपत्रात आले आहे. त्याचे तपशील अजून समजायचे आहेत.

इथे हिंदू स्त्रियांच्या दृष्टीने अत्यंत नामुष्कीची बाब म्हणजे या कायद्यात हिंदू पुरुषांपेक्षा हिंदू स्त्रियांना अक्कल कमी आहे, मुस्लिम पुरुषांवर त्या विचार न करता भाळतात असे गृहीत आहे. मनुस्मृतीने हेच सांगितले होते. लहानपणी बापाने, तरुणपणी नवऱ्याने व म्हातारपणी मुलाने स्त्रीचे रक्षण करावे, तिला स्वातंत्र्य देऊ नये. म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तिचे दहन केले होते. पुढे याच महामानवाच्या नेतृत्वाखाली देशाला स्वातंत्र्य, समता, बंधुतेवर आधारित संविधानाच्या रुपाने नवी स्मृती दिली गेली. या नव्या स्मृतीच्या जागी जुनी मनुस्मृती आणण्याची मनोमन इच्छा असणाऱ्यांनी लव्ह जिहाद कायद्याच्या रुपाने छळवाद मांडला आहे.

घटनेने आवडणारा धर्म स्वीकारण्याचे, धर्मच न मानण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. जबरदस्तीने, आमिष दाखवून धर्मांतर करण्याची परवानगी घटना देत नाही. त्यासाठी काही राज्यांनी साठच्या दशकापासूनच कायदे केले आहेत. असे कायदे आपल्या राज्यात करण्याऐवजी वा जिथे ते आहेत तिथे त्याखाली तक्रारी करण्याऐवजी हा नवा कायदा आणण्याची काहीही आवश्यकता नाही.

भाजप समान नागरी कायद्याचा उद्घोष करत असतो. कोणत्याही धर्मातील, जातीतील वयाच्या अटीत बसणाऱ्या स्त्री-पुरुषांना आपले धर्म न बदलता या कायद्याप्रमाणे लग्न करता येते. या कायद्याचा आग्रह व प्रचार भाजप का करत नाही? हिंदू मुलीचा धर्मच बदलण्यावर आक्षेप असेल तर या कायद्याने त्या आक्षेपावर इलाज करता येतो. अन्य धर्मीयाशी लग्न करुनही ती हिंदू राहू शकते. पण या कायद्याच्या मसुद्यात नसलेला मूळ हेतू मुसलमानाशी हिंदू मुलीने लग्न करता कामा नये हा आहे. उद्या दलित जातींतील मुलांशी लग्न न करण्याबद्दलचाही कायदा करायला हे लोक धजावतील. नाहीतरी आता दलित जातीतील मुलगा असेल तर त्याचा एकट्याचा वा त्याच्याबरोबर त्याच्या प्रेमात पडलेल्या सवर्ण मुलीचाही खून करण्याच्या घटना भाजपशी संबंधित मंडळींकडून झालेल्या आहेतच. आधी मुसलमान, नंतर नंबर दलितांचा..!

स्वामी विवेकानंद हल्ली भाजप व संघपरिवाराने आंदण घेतले आहेत. त्याच विवेकानंदांची मूळ शिकवण धर्माचा सामाजिक बाबतीतील हस्तक्षेप संपवण्याची आहे, ती ते का पाळत नाहीत? स्वामी विवेकानंद असेही म्हणतात – ‘इतरांचे नुकसान होत नसेल तर आपण काय खावे, कोणते कपडे घालावेत, कोणाशी विवाह करावा, हे ठरवण्याचा अधिकार प्रत्येकाला हवा.’ या वचनाशी खरोखरच या लोकांची निष्ठा असती तर लव्ह जिहाद कायदा, गोमांस खाल्ल्याच्या, बाळगल्याच्या संशयावरुन दलित-मुस्लिमांना झुंडीने मारुन टाकण्याचे प्रकार घडलेच नसते.

आजच्या तरुणाईने या कारस्थानाच्या विरोधात जाणतेपणाने व खंबीरपणे उभे राहायला हवे. यात कोण कोणता पक्ष मानतो वा त्यास मत देतो हा नाही. तरुणाईच्या प्रेम करण्याच्या मोकळिकीला जेरबंद करणाऱ्या सर्वांच्या विरोधात युद्ध छेडले पाहिजे. ‘लव्ह’ चे रक्षण करण्यासाठी ‘जिहाद’ पुकारला पाहिजे. साहिर लुधियानवी आपल्या एका कव्वालीत म्हणतात – ‘इश्क़ आज़ाद है, हिंदू ना मुसलमान है इश्क़’.

प्रेम करण्याचा आमचा हक्क आहे. ते जबाबदारीने करण्याबद्दल, ते अधिक कसे फुलविता येईल याबद्दल जरुर सल्ले द्या. पण या प्रेमालाच जात-धर्माच्या नावाखाली कैद कराल, तर खबरदार..!

– हा इशारा या व्हॅलेंटाईन डेला जरा सणसणीतपणेच देऊया.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

(मिळून साऱ्याजणी, फेब्रुवारी २०२१)

Saturday, February 6, 2021

श्रेय कोणाला?

एम.ए. ला असताना माझे शिक्षक मला म्हणाले, “तू तुझ्या नोट्स इतरांना देऊ नको. थोड्या फरकाने क्रमांक हुकू शकतो.”

मी त्यांना म्हणालो, “सर, माझ्या नोट्स दुसऱ्याला दिल्याने काही माझे ज्ञान कमी होणार नाही. त्यामुळे माझ्या पुढे कोण जाते, त्याचे मला काही वाटत नाही.”

मला सल्ला देणारे सर कोणाही विद्यार्थ्याला नेहमीच स्वतःहून मदत करण्यास तत्पर असत. सगळ्यांशी त्यांची मैत्री असे. त्यांनी कोणाशी आपपरभाव केल्याचे माझ्या पाहण्यात आलेले नव्हते. तथापि, रीतीप्रमाणे पहिले येण्याला त्यांच्याही दृष्टीने एक विशेष महत्व असावे. त्यामुळेच हा सल्ला त्यांनी मला दिला असावा.

मला फर्स्ट क्लास मिळाला. पण नंबर हुकला. पण तो नोट्स ज्यांना दिल्या त्यांच्यामुळे नाही, तर दुसऱ्याच एका जिल्ह्याची मुलगी पहिली आली. तिचा माझा काहीही संबंध नव्हता. परिचय नव्हता. तिचे गुण माझ्यापेक्षा अधिक होते.

एम. ए. ला असणाऱ्या आम्हा नोकरी, कष्ट करुन शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची परस्परांना होणारी मदत केवळ परीक्षा उत्तम जावी एवढ्यापुरती नव्हती, तर ती समान आर्थिक-सामाजिक परिसरातल्या आम्हाला मानसिक उभारी देणारीही होती. एकूणच एकमेकांना अभ्यासात मदत करण्याचा माझा अनुभव लहानपणापासूनच खूप प्रेरक व ताकद देणारा आहे.

घरी अभ्यासाला जागा नाही, लाईट नाही, दारु पिऊन शिव्या-भांडणे सततची. माझ्या घरात तर अभ्यास म्हणजे काय हे न कळणारेच लोक त्यावेळी होते. “तुमची बडबड थांबवा, माझे वाचनात लक्ष लागत नाही,” असे म्हटल्यावर ते म्हणत, “तुला कोण त्रास देतोय. आम्ही आमचे बोलतोय. तू तुझा अभ्यास कर.” ते खरोखरच मला शारीरिक त्रास देत नसत, कोणतेही काम सांगत नसत. जेवणाचे ताट जागेवर मिळायचे. ते मी उचलायचे पण नाही. लागेल तो खर्च कर्ज-ओढाताण करुन करत. मी अभ्यास करुन खूप मोठा व्हावा, ही त्यांची इच्छा होती. त्यासाठी कितीही कष्ट करायची त्यांची तयारी असे. मी ओरडल्यावर ते गप्प राहत. मग शांतता होई. पण हे त्यांना पटले म्हणून नव्हे, तर मी म्हणतो म्हणून ते करत. माझ्या घरची हो टोकाची स्थिती धरली तरी एकूणात अभ्यास करुन मुले पुढे जायला हवीत, ही इच्छा पालकांची खूप असे. पण ते कसे करायचे याचे उपाय त्यांच्याकडे तसे नव्हते. काहींना कळले तरी करायची क्षमता नव्हती.

आमच्या वस्तीत दहावीला असताना आम्ही एक विद्यार्थ्यांची संघटना केली. ‘अत्त दीप भव’ (स्वयंप्रकाशित व्हा) हा बुद्धाचा संदेश तिचे ब्रीद. ‘स्वतःच दिवा व्हा, अंधार दूर होईल,’ म्हणजेच, स्वतःचा स्वतःच उद्धार करा, दुसरा कोणी तुमचा उद्धार करायला येणार नाही, हा त्याचा अर्थ. हा स्वावलंबनाचा मंत्र आम्हाला दिशा व ताकद देणारा ठरला. विभागातल्या एका मोठ्या बुद्धविहारात त्याच्या व्यवस्थापकांकडे आम्ही अभ्यासाला जागा मागितली. त्यांनी ती दिली. आम्ही दहावीचे विद्यार्थी एकत्र अभ्यास करु लागलो. ज्याचा जो विषय त्यातल्या त्यात चांगला, त्याने इतरांना तो शिकवायचा. त्याचवेळी आमची धाकटी भावंडेही तिथे अभ्यासाला येऊ लागली. आम्ही त्यांचे क्लासच सुरु केले. आमचा दहावीचा अभ्यास करत असतानाच पाचवी ते सातवीचे वर्ग चालविले. इतरही सामाजिक उपक्रम केले. हे सगळे करुन आमचा दहावीचा निकाल उत्तम लागला. दोन जण एकेका विषयात थोड्या गुणांनी गेले. बाकी सर्व उत्तीर्ण. मला तर सत्त्याहत्तर टक्के मिळाले. आमच्या वस्तीत इतके गुण मिळण्याची आणि इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थी दहावी उत्तीर्ण झाल्याची घटना पहिलीच. हे साल १९८१. एकत्र अभ्यास व मोठ्यांनी लहानांना शिकवण्याचा हा परिपाठच पुढे सुरु झाला. याच्याशी संबंधित मुले अभ्यासात पुढे गेलीच, पण चळवळीतही त्यांचा पुढाकार राहिला. आधी शिक्षण, मग सामाजिक काम असे काही आम्ही मानले नाही. दोन्ही एकाचवेळी सुरु होते. परस्परांच्या अनुभवांच्या देवाण-घेवाणीतून आमचे बाह्य जगाचे ज्ञानही वाढले. हा क्रम दोन दशके तरी चालला.

एकमेकांची सुख-दुःखे वाटून घेत चाललेले हे जगणे संपन्न होते. आम्हाला कधीच एकटे वाटले नाही. कोणाच्याही घरचे संकट सगळ्यांचे असे. त्यामुळे त्याने खचून जाणेही होत नसे. एकमेकांची एकमेकांना साथ पक्की होती. माझा अभ्यास मीच करणे, तो पुढे जाईल म्हणून त्याला न सांगणे हे केले असते तर आम्ही कोणीच पुढे गेलो नसतो. अनुभवांची सधनता आणि मनाचे सामर्थ्य व समाधानही मिळाले नसते.

याचे श्रेय कोणाला?

रुढ रीतीने माझे नाव घेतले जाते. पण प्रश्नाची ही चौकटच बरोबर नाही. माझा पुढाकार होता, हे खरे. पण हे करावे असे वाटणारा, संघटना स्थापन करण्याची कल्पना प्रथम मांडणारा मी नव्हतो. तो दुसरा होता. मला त्याचे म्हणणे पटले. मी साथ दिली. इतर समविचारी मित्रांना जमवू लागलो. त्यांच्यातले काही या आमच्या प्रथम कल्पना मांडणाऱ्या मित्राला नको होते. सगळे एकत्र आल्यावर पदाधिकारी निवडताना दुसऱ्यांचीच निवड झाली. त्यामुळे तो नाराज झाला आणि दूर गेला. मी समजावण्याचे, दुरावा सांधण्याचे बरेच प्रयत्न केले. पण जमले नाही. आता त्या प्रथम कल्पना मांडणाऱ्या मित्राचा संदर्भच कोणाला राहिला नाही. अनेक उपक्रमांशी माझे नाव जोडले जाते. त्यातल्या बऱ्याचशा उपक्रमांचा प्रारंभ मी एकट्याने केलेला नाही. अनेकांबरोबर मी एक होतो. काही उपक्रम सुरु करताना मी नव्हतोच. मी नंतर त्यात सहभागी झालो. या उपक्रमांच्या जोपासनेत मी टिकून, तटून राहिलो हे माझे वर्णन योग्य राहील. त्यातही अशा श्रम करणाऱ्यांत मी एकटा नव्हतो. त्यांचे प्रवक्तेपण करण्याची जबाबदारी माझ्याकडे आली, त्यामुळे मी बाहेरच्यांना इतरांपेक्षा अधिक ठाऊक झालो.

अशावेळी श्रेय कोणाला द्यायचे? अशा अधिक ठाऊक असणाऱ्यालाच ते सर्वसाधारणपणे दिले जाते. पुरस्कारही मग बहुधा अशालाच मिळतात. जो उपक्रम केवळ एकट्याने होत नसतो, त्यात भागिदारी करणाऱ्या सर्वांचीच दखल घ्यायला हवी. पण तेही संभवनीय असतेच असे नाही. एकेका टप्प्यावर अनेकांची भागिदारी झालेली असते. अनेक अनामिकही त्यात असतात. अशावेळी त्या संघटनेचीच नोंद घेणे, तिलाच श्रेय वा पुरस्कार मिळणे त्यातल्या त्यात बरोबर ठरते.

पण काही वेळा संघटनांचीही स्पर्धा लागते. अमूक काम किंवा अमूक कल्पना प्रथम कोणत्या संघटनेने पुढे आणली? ..या प्रश्नाने दोन व्यक्ती नाहीत, पण व्यक्तींचे गट परस्परांच्या विरोधात उभे राहतात. एकाच ध्येयाने चळवळ करणाऱ्यांतही हा अंतराय तयार होतो. व्यक्तींवरुन संघटना, संघटनांवरुन संघटनांच्या आघाड्या अशी एकके विस्तारत गेली, तरी ‘प्रथम कोणी’ यावरुन मने फाटण्याचा क्रमही विस्तारत जातो.

हे तेव्हाच थांबेल जेव्हा एक वास्तव आपण मनोमन कबूल करु. ते म्हणजे शून्यातून अचानक काहीही उभे राहत नाही. काहीच नव्हते आणि मी किंवा आमचा गटच त्याचा निर्माता आहे, हे खरे नसते. त्याने किंवा त्यांनी ‘शून्यातून सगळे उभे केले’ ही म्हणण्याची रीत झाली. त्यातून त्यांच्या कष्टाची, नवनिर्मितीची कल्पना येते. पण शून्यातून अंगठी काढणारे जादूगार प्रत्यक्षात कुठेच नसतात. काहीतरी आधी असते. त्याच्याआधारे नवे रचले, बांधले जाते. अनेक वैज्ञानिक शोध हे आधीच्या कुठल्या तरी शोधावर वा कोणीतरी काही प्रयोग केलेल्या सामग्रीच्या सहाय्याने, मार्गदर्शनाने लागत असतात. फसलेले प्रयोगही मदतनीस होतात. त्यात आणखी सुधारणा पुढे कोणीतरी करतो. चाकाचा शोध कोणी लावला? ठाऊक नाही. पण त्याच्या आधारे पुढे बैलगाड्या, रथ, यांत्रिक वाहने आली. आता आणखी थोड्या काळाने बिनचालकाची वाहने येणार आहेत. सामाजिक, वैचारिक क्षेत्रातही तेच असते. बुद्ध जगभर गाजतो. मात्र बुद्धाच्या विचारांची आणि धम्माची पाळेमुळे त्याच्या समकालीन निरीश्वरवादी, अज्ञेयवादी, भौतिकवादी चार्वाक तसेच जैनादी समकालीन प्रवाहांशी जुळलेली आहेत. ब्राम्हणी संस्कृतीच्या विरोधात ही श्रमण संस्कृतीची छावणी होती. बुद्धाने या समकालीन आणि त्याच्या आधीच्या विचारभूमीवर आपले तत्त्वज्ञान बांधले. नवी रचना केली. ही पृष्ठभूमी विसरल्याने हवेतच काही तयार झाले अशा निष्कर्षाला आपण येतो. केवळ समविचारी नव्हे, तर विरोधी विचारांचे अस्तित्वही त्यास सहाय्यभूत ठरते. त्याच्याशी होणाऱ्या विरोध, क्रिया-प्रतिक्रियांनी नव्या विचाराच्या रेषा अधिक सुस्पष्ट होत असतात. हेच पुढे बाबासाहेब आंबेडकरांबद्दलही. बुद्धापासूनची प्रगतीशील परंपरा, महात्मा फुल्यांचा विद्रोह, शाहू महाराजांसारख्यांचे सहाय्य, ज्या युरोप-अमेरिकेत बाबासाहेब शिकले, तेथील उदारमतवादी विचारवंतांचा प्रभाव, गांधीजींशी संघर्ष या सगळ्यातून बाबासाहेब घडले. एखादे अचंबित करणारे नाटक पाहताना त्याचे नेपथ्य, स्टेज, दिग्दर्शन, कपडे पट, संगीत हे सगळे त्या मागे असते हे विसरता कामा नये. नाहीतर हाडामासाच्या माणसांना आपण अलौकिक करतो. विभूती करतो. काहीच स्वयंभू नसते. स्वयंभू गणपती, स्वयंभू शिवलिंग ह्या वदंता असतात. त्यांचा कोणीतरी रचयिता असतो. म्हणजे दगडाला किंवा झाडाच्या खोडाला आलेला विशिष्ट देवतेचा, लिंगाचा आकार वारा, पाऊस अथवा वनस्पतीच्या वाढीची अंगभूत गती यांमुळे आलेला असतो.

मी एखादा लेख लिहितो, भाषण करतो म्हणजे त्यातील मुद्दे माझे असतात, याचा अर्थ काय? तर याआधी याच शब्दांत, त्याच वाक्यांतून कोणी ते मांडलेले नसतात. काही प्रमाणात त्याचा नव्या संदर्भातला अर्थ नवा असतो. पण हे मुद्दे किंवा त्याच्या आसपासचे मुद्दे किंवा ते मांडण्यासाठी उद्युक्त करणारे विरोधी मुद्दे वा परिस्थिती आधी अस्तित्वात असते. माझी त्यांच्याशी जी क्रिया-प्रतिक्रिया होते, त्यातून माझी मांडणी आकाराला येते. हे काहीच नसते तर मी काय लिहिले असते? हवेत इमले बनत नाहीत. त्यांना पाया लागतोच. कधी कधी गंमत म्हणा, अडचण म्हणा अशीही होते. एक मुद्दा मी नेहमी ‘मला वाटते’ असे म्हणत मांडत असे. नंतर बाबासाहेब आंबेडकरांचे स्वतंत्र मजूर पक्षावेळचे लिखाण वाचनात आले. तर त्यात तो मुद्दा जवळ जवळ तसा होता. आता बाबासाहेबांनी माझा मुद्दा चोरला असे मी म्हणू शकत नाही. कारण तो ऐंशी वर्षांपूर्वी बाबासाहेबांनी लिहिला आहे. आणि त्याचा लिखित पुरावा आहे. मी बाबासाहेबांचा मुद्दा चोरला नाही हे लोकांना सांगू शकत नाही, पण मला ठाऊक आहे. कारण मी आधी बाबासाहेबांचे हे लिखाण वाचलेच नव्हते. हे कसे होते? ज्या विचारप्रवाहाशी आपण संबंधित असतो, त्याचे खूप काही वाचत, ऐकत असतो त्यावेळी काहीतरी प्रकारे तो मुद्दा वाहत वाहत आपल्यापर्यंत आलेला असतो. आपण तो अभिव्यक्त करतो. ती अभिव्यक्ती निश्चित आपली असते. पण त्यातील विचारांची दौलत ही पूर्णपणे आपली नसते. एकदा तर माझ्या एका लेखातील काही शब्द, वाक्ये जशीच्या तशी एका मोठ्या नेत्याच्या नावाने प्रसिद्ध झालेल्या पुस्तिकेत मला आढळली. ती आधी माझी होती हा दावा मी करु शकतो. कारण एका वर्तमानपत्रात तो माझा लेख ही पुस्तिका येण्याच्या कितीतरी आधी छापून आला होता. याचा अर्थ त्या नेत्याला स्वतःचा विचार नाही, त्याने माझे मुद्दे घेतले असे म्हणणे वेडेपणाचे आहे. आमच्या लेखनांत समान बाबी आढळल्या हा योगायोग असू शकतो किंवा या नेत्याच्या विचारांचे शब्दांकन करुन ज्याने कोणी ती पुस्तिका लिहिली, त्याने अधिक स्पष्टतेसाठी माझ्या लेखातील बाबी त्याने आधी वाचलेल्या असल्याने थोड्या निष्काळजीपणाने जशाच्या तशा घेतल्या असतील.

पण चारचौघात किंवा मनातही हे ताणायचे किती? अजिबात नाही. सोडून द्यायचे. आपण ज्या नदीत उभे आहोत, तिचेच पाणी ओंजळीत घेऊन तिलाच त्याचे अर्ध्य देत आहोत, हे मनात ठसवायला हवे. मानवसमाज ज्ञाननिर्मिती करत आला, त्याचा एक घटक म्हणून आपण त्याच्याकडून काही घेतले, त्यावर काही नवे रचले व पुढच्यांसाठी पुन्हा ते त्याला अर्पण केले.

बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त आदल्या दिवशी ५ डिसेंबरला रात्री मशाली घेऊन घोषणा देत चैत्यभूमी अथवा स्थानिक ठिकाणच्या बाबासाहेबांच्या पुतळ्यापर्यंत जाण्याची रीत होती. या घोषणांनी व अशा गटांनी विस्कळीतपणे जाण्यात त्या दिवसाचे गांभीर्य राहत नसे. आम्ही आमच्या विभागात ‘श्रद्धांजली यात्रा’ हा प्रकार सुरु केला. वस्तीतील स्वतंत्रपणे जाणाऱ्या सर्व गटांना एकत्र केले. कोणत्याही एका संघटनेचा बॅनर नाही. दोन-दोनच्या रांगेत हातात मेणबत्ती घेऊन त्रिसरण म्हणत शांतपणे यात्रा निघाली. तिचा प्रभाव एवढा पडला की नंतर आम्हाला ती तशी संघटित करण्याची गरज पडली नाही. लोकांनी तिचा स्वीकार केला. मुंबईत-महाराष्ट्रात तिचे अनुकरण होऊ लागले. पुढे ती वहिवाट झाली.

ती आधी कोणी सुरु केली, आम्ही की आमच्याआधी कोणी, हा प्रश्न खरोखरच महत्वाचा आहे का? ज्याला ऐतिहासिक घटनाक्रम अभ्यासायचा असेल त्याने तो शोधावा. पण आम्ही कार्यकर्त्यांनी या प्रश्नात किती गुंतावे? बुद्ध उत्सव, भीम उत्सव असेच अजूनही महामानवांच्या नावाने होणारे उत्सव पहिले कोणी सुरु केले, या प्रश्नांचा छडा लावण्यात ताकद का आटवायची? याने काहीही साधले जात नाही, याचा नमुना हवा असला तर दलित पॅंथरची स्थापना कोणी केली याबाबतचे लेख, पुस्तिका वाचाव्या. जवळपास प्रत्येक पँथर नेता थेट वा शब्दांचे जाळे गुंफत गुंफत स्वतःपर्यंत पोहोचतो. हा शोध अभ्यासकांनी घ्यावा. पण पँथर कोणी स्थापन केली यापेक्षा तिने काय केले, काय साधले हे जाणणे चळवळीच्या पुढच्या दिशेसाठी अधिक हितावह नाही का?

पँथरचे काही प्रमुख नेते या प्रश्नाचा निर्विवाद निकाल लागण्याआधीच जग सोडून गेले. जे आहेत त्यांची वये पाहता त्यांच्या हयातीत तरी याचा अंतिम निकाल लागेल की नाही याची शंका आहे. शोकांतिका ही की वस्तीतल्या आताच्या पिढीसमोर आम्ही भाषणे करताना यांची नावे घेतली तर त्यातल्या अनेकांच्या डोळ्यांसमोर प्रश्नचिन्ह उभे राहते – हे कोण?

माझ्या राजकीय गुरुंनी पहिल्या भेटीत (तेव्हा ते माझे गुरु झालेले नव्हते) मला प्रश्न केला – “तू सामाजिक काम का करतोस?”

मी म्हणालो - “समाजाचे भले व्हावे. लोकांनी आपले नाव काढावे.”

त्यांनी पुढचा प्रश्न केला – “ तू आता जिथे राहतोस, तिथे पन्नास वर्षांपूर्वी कोण राहत होते ते तुला ठाऊक आहे का?”

मी उत्तरलो – “नाही.”

त्यांनी परत प्रश्न केला – “अजून पन्नास-शंभर वर्षांनी तुला ओळखणारे तिथे कोणी असेल का?”

मी दचकलो. मग आणखी त्यांनी पुढे विचारले – “इतिहासाच्या पुस्तकात सम्राट अशोकाला किती जागा आणि गांधीजींना किती जागा?”

मी म्हटले – “गांधीजींना अधिक. सम्राट अशोकाला कमी.” ते म्हणाले – “इतिहासात असेच होते. अजून दोनशे वर्षांनी गांधीजींची माहिती कदाचित एका परिच्छेदापुरतीच राहील. कारण नव्या इतिहासाला अधिक जागा द्यावी लागेल.”

यानंतर पुढच्या प्रश्नांची सरबत्ती सुरु झाली. त्यात मी राहतो ते चेंबूर कुठे? ..मुंबईत. मुंबई कशात? ..महाराष्ट्रात. महाराष्ट्र कशात?..भारत देशात. भारत कोणत्या खंडात?..आशिया खंडात. असे खंड किती? हे खंड मिळून पृथ्वीवर जमीन किती, पाणी किती? पृथ्वी ज्या सौरमालेत आहे, अशा अगणित सौरमालांची, तारकांची आकाशगंगा, अशा अगणित आकाशगंगांचे हे विश्व.

..असे होत होत शेवटी त्यांनी प्रश्न केला – “या विश्वात तुझे स्थान काय? किती काळ?”

विश्वाची भरारी करणारा मी जमिनीवर आपटला गेलो. आता माझ्यासमोर प्रश्न उभे राहिले ते मूलभूत होते. – विश्वाच्या पसाऱ्यात आपण तसे नगण्य आहोत. कालप्रवाहात एका अत्यंत अल्प अवकाशासाठी इथे आहोत. या काळातले आपले जगणे मौलिक कसे होऊ शकते? जे करायचे त्याचा नक्की हेतू काय?

जे गळून पडले ते प्रश्न होते - जे करु त्याने आपले नाव किती होणार? या कामाचे श्रेय आपल्याला मिळणार का?

हे प्रश्न गळून पडले हे पूर्णांशाने खरे नाही. त्यांचे महत्व कमी झाले फार तर. हे प्रश्न नकळत मधून मधून मनात ढुशी देतात. काही काळ रेंगाळतात. पण त्यांच्या अस्तित्वाचे प्रयोजनच मला सापडत नसल्याने ते मलूल पडतात. ढुशी व मलुलता हा क्रम मधून मधून चालतो, हे मात्र मला कबूल करावे लागेल.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

(आंदोलन, फेब्रुवारी २०२१)