Monday, May 3, 2021

सत्यमेव जयते..?


सम्राट अशोकाचा सारनाथचा सिंहस्तंभ आपण राजमुद्रा म्हणून स्वीकारला. या राजमुद्रेखाली ‘सत्यमेव जयते’ असे लिहिलेले आहे. तो मूळ सिंहस्तंभाचा भाग नाही. हे वचन मुण्डक उपनिषदातून घेतलेले आहे. ते आपले राष्ट्रीय बोधवाक्य आहे. ‘सत्यमेव जयते’ या संस्कृत वचनाचा अर्थ आहे - सत्याचाच विजय होतो. आम्ही भारतीय सत्याचा मार्ग अनुसरणारे आहोत, आमच्या शासनाचे मार्गक्रमणही याच सत्याच्या मार्गाने असणार आहे. लबाडी, खोटेपणा टिकत नाही. कितीही अडचणी आल्या तरी अखेर सत्यच टिकते. या सत्याच्या मार्गावरुन आपण ढळता कामा नये, असा या बोधवाक्याचा प्रचलित अर्थ आहे.

इथे सत्य म्हणजे सर्वोच्च सद्गुण, सदाचार असे आपण मानतो. यात माणुसकी, करुणा, सहिष्णुता, बंधु-भगिनीभाव, परस्पर सहकार्य, परदुःख निवारण्यासाठी प्रयत्न, सर्व मानवजातीच्या सुखाची कामना अशा तमाम गुणांचा, वृत्तींचा समावेश होतो. पण सत्याचा हाच एकमेव अर्थ आहे, असे आढळत नाही. उपनिषदे तसेच अन्य आध्यात्मिक दर्शनांनुसार सत्य याचा अर्थ या सृष्टीचे मूळ तत्त्व, जे अपरिवर्तनीय आहे, निश्चित आहे. हे सत् तत्त्व म्हणजे ब्रम्ह, परमात्मा असेही समजले जाते. ‘ब्रम्हं सत्य, जगत् मिथ्या’ हे सूत्र आपण ऐकलेले आहे. सत्याचा हा अर्थ घेतला तर आपल्या बोधवाक्याचे मग काही खरे नाही. जे इंद्रिय गोचर म्हणजे आपल्या इंद्रियांनी जे पाहता, स्पर्शता, ऐकता येते, ज्याचा गंध घेता येतो ते आपण वास्तव जग मानतो. वरील सूत्रात हे सर्व इंद्रियांनी आकळणारे वास्तव माया, भ्रम मानले गेले आहे. जे इंद्रिय गोचर नाही असे जे काही ते आहे ते ‘ब्रम्ह’ हे खरे सत्य, असे अध्यात्म पुरुषांनी, ग्रंथांनी ठरवून टाकले आहे. अनेक गुरु, महाराज, अध्यात्म निरुपणकार या ब्रम्ह वा परमसत्याचे पदर आपल्या प्रवचनांतून, कीर्तनांतून उलगडत असतात. त्याचा लौकिक जीवनाशी अन्वय लावत या परमसत्याच्या प्राप्तीतच जीवनाचे साफल्य असल्याचा निर्वाळा देतात.

बुद्धाने चार आर्यसत्ये प्रतिपादिल्याचे पारंपरिक बौद्ध तत्त्वज्ञानात आहे. जगात दुःख आहे, दुःखाला कारण आहे..वगैरे. आर्य म्हणजे महान, आदर्श. (आर्य लोक नव्हे.) आर्यसत्ये म्हणजे महान सत्ये. ही आर्यसत्ये बुद्धाच्या मूळ शिकवणुकीचा भाग आहे की नंतर त्यात घुसवलेला प्रक्षिप्त भाग आहे, अशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी याबाबत शंका घेतलेली आहे. ही आर्यसत्ये बुद्ध धम्माला निराशावादी बनवतात, असा त्यांचा आक्षेप आहे. आता त्या तपशीलात जायचे कारण नाही. काहीतरी मूळ, महान, चिरंतन असे तत्त्व म्हणजे सत्य ही सत्याची व्याख्या आपल्याला बुद्धाच्या या आर्यसत्यांच्या तत्त्वज्ञानात मिळते. तेवढ्याचीच नोंद आपण आता घेऊ. हे बुद्धाचे सत्य ब्रम्ह किंवा परमतत्त्वासारखे ज्याचे अस्तित्व इंद्रियांनी, लौकिक तर्काने सिद्ध करता येत नाही, असे नाही. ते स्पष्टपणे कळणारे आहे. त्यातील संदेशाचे बाबासाहेब करतात त्याप्रमाणे मापन वेगळे होऊ शकते, ती बाब वेगळी.

जैनादि तत्त्वज्ञानांत सत्याच्या आकलनाचा एकच एक थेट मार्ग मानला जात नाही. अनेक मार्गांनी सत्याच्या बोधाप्रतचा प्रवास करावा लागतो. ‘अनेकांतवाद’ असे त्याला म्हटले जाते. चक्रधरांची हत्ती व आंधळ्यांची कथा आपल्याला ठाऊक आहे. अनेकांतवाद समजायला ती आपण आठवूया. ज्याला जे हाताला लागेल, त्याला तो हत्ती समजतो व त्याप्रमाणे त्याचे हत्ती सुपासारखा, हत्ती खांबासारखा असे वर्णन करतो. जेवढे आकळते तो त्या हत्तीचा भाग जरुर; पण संपूर्ण हत्ती म्हणजे तो केवळ एक भाग नव्हे. तर या विविध भागांचा मिळून हत्ती होतो. सत्याचे समग्र आकलन असे विविध पैलू, आयाम लक्षात घेतल्याशिवाय होत नाही. केवळ जी बाजू आपल्याला कळते तीच आपण सत्य मानू नये. आणखी अनेक बाजू असू शकतात. त्या समजून घेऊन निष्कर्षाला यावे हे वस्तुनिष्ठ व्यावहारिक शहाणपण आपल्याला इथे सापडते.

हा खरा आधुनिक विज्ञानाच्या शोधाचा रास्त मार्ग आहे. सूर्य पृथ्वीभोवती फिरतो, ही डोळ्यांनी दिसणारी म्हणजे इंद्रिय गोचर बाब. ती इंद्रिय गोचर आहे, म्हणून सत्य आहे, असा दावा पुढचे शोध लागण्यापूर्वीच्या काळात केला जाई. पण वैज्ञानिक या एका निरीक्षणावर संतुष्ट होऊन गप्प राहिले नाहीत. त्यांनी अजून वेगवेगळ्या रीतीने तपासले (याला बराच काळ गेला, अनेक शास्त्रज्ञ दरम्यान होऊन गेले) आणि मग निष्कर्ष निघाला की सूर्याभोवती पृथ्वी फिरते. सत्याचा शोध हा असा फक्त जेवढे दिसते त्यावरुन घ्यायचा नसतो. अनेक अंगांनी, मार्गांनी सत्याच्या शोधाला निघायचे असते.

‘जसे आहे तसे म्हणजे सत्य’ अशी शब्दकोशातली व्याख्या आहे. इथेही जेवढे दिसते त्यावरुन सत्य ठरवायचे नसते. विविध मार्गांनी तपास करुन जे आढळते ते जसे आहे तसे स्वीकारणे म्हणजे सत्यवादीपण. जे सत्य समोर येते ते प्रिय असेल अथवा अप्रिय. ते सत्य आहे. स्वीकारलेच पाहिजे. या स्वीकारातूनच पुढच्या दिशा किंवा उपाय ठरवता येऊ शकतात.

सत्य म्हणजे आपल्या किंवा धर्मग्रंथांनी पवित्र ठरवलेल्या धारणा नव्हे. पण त्यासच सत्य म्हणावे असा आग्रह या धर्मग्रंथांचा असतो. ऋग्वेदातील पुरुषसूक्त (हेही प्रक्षिप्त असावे असे बोलले जाते) वर्णव्यवस्थेच्या उद्गमाचे चित्र रेखाटते. ब्रम्ह्याच्या मुखातून ब्राम्हण, बाहुंतून क्षत्रिय व जांघांतून शूद्र वगैरे. हेच सत्य मानून जेव्हा समाजव्यवस्था चालवली जाते वा तिचे समर्थन केले जाते, तेव्हा सत्याची ही आवृत्ती वास्तविक असत्य असते. पण धार्मिक श्रद्धा व विवेकबुद्धीच्या वापरास बंदी यामुळे ते असत्यच सत्याच्या दिमाखात वावरते. बहुसंख्य समाज हे सत्य मानतो, म्हणून जिला विवेकबुद्धी आहे व तिचा निर्वाळा हे असत्य आहे असा आहे, त्या व्यक्तीनेही ते मानावे का? समाजातील कथित अधिकारी वर्ग वा सबंध समाजाचा तो आग्रह असू शकतो. या आग्रहास सगळेच शरण जात नाहीत. आपले बरेच काही पणाला लावून ‘सत्यअसत्याशी मन केले ग्वाही-नाही मानिले बहुमता’ अशी ठाम भूमिका घेणारे तुकोबा असतातच. भेदाभेद करणारी जातिव्यवस्था, ब्राम्हणांचे वर्चस्व हे परमसत्य असल्याची अगदी त्यांच्या आप्तांची धारणा महात्मा फुले ठोकरतात. स्त्रीशूद्रातिशूद्रांना समान लेखणारे, मांग-महम्मद-ब्राम्हणांना एकाच मायेने पोटाशी धरणारे ‘सत्य’ ते ‘सर्वांचे आदिघर’, ‘सर्व धर्मांचे माहेर’ मानतात. या सत्याच्या प्रस्थापनेसाठी सत्यशोधक चळवळ उभारतात. महात्मा गांधी ईश्वराला सत्य नव्हे, तर सत्याला ईश्वर मानतात. सत्य सर्वांठायी आहे. प्रेम हा त्याचा आविष्कार आहे. सर्वांचे भले साधणाऱ्या, विरोधकाच्या माणुसकीला आवाहन करणाऱ्या सत्याला जागविण्यासाठी ते ‘सत्याग्रह’ करतात. अलिकडे दलाई लामांनी बुद्ध विचार आणि वैज्ञानिक सत्य यांत विरोध आढळल्यास मी विज्ञानाच्या बाजूने कौल देईन असे जाहीर विधान केले. बुद्धाच्या ‘एही पस्सिको’ (या आणि पहा) तत्त्वाशी आणि स्वानुभवाच्या, व्यवहाराच्या कसोटीवर माझे विचार तपासूनच ते स्वीकारा या भूमिकेशी दलाई लामांचे हे विधान सुसंगतच आहे.

संशोधकांचा भौतिक सत्याचा शोध किंवा सद्विचारांच्या सत्याचे संरक्षण या वरील प्रकारच्या बंडखोरींमुळे शक्य होते. सत्य स्वतःच्या ताकदीवर टिकते असे दिसत नाही. ‘सत्यमेव जयते’ किंवा ‘सत्याचाच अखेरीस विजय’ हे आपोआप होत नाही. पृथ्वी सपाट नसून ती गोल आहे, हे नंतर कळले. पण ती वस्तुस्थिती किंवा सत्य आधी, नंतर तसेच कायम होते. त्याच्यापर्यंत पोहोचण्याचे प्रयत्नच झाले नसते, विविध पुराव्यांनी ते सिद्ध केले गेले नसते, तर पृथ्वी गोल असूनही ती सपाट आहे, या बायबलच्या म्हणण्यालाच लोक सत्य मानत राहिले असते.

काही सत्ये ही सत्ये असतातच. पण आपल्यासमोर आलेल्या आयामांचाच केवळ अन्वय लावून निकाल दिला तर तो सत्याची बाजू घेणारा असेलच असे नाही. आपण सत्यवादी असू. पण सत्य त्यामुळे पुढे येईलच व आपण त्याचे रक्षण करु शकू असे नाही. आकिरा कुरोसोवाचा ‘राशोमॉन’ चित्रपट जगप्रसिद्ध आहे. त्यात खून झाला आहे. ते सत्य आहे. पण तो कोणी केला याच्या अनेक आवृत्त्या संबंधितांकडून मांडल्या जातात. त्या इतक्या प्रभावी असतात, की आता ऐकलेली आवृत्तीच सत्य वाटावी. हा सिनेमा आहे. पण प्रत्यक्ष व्यवहारात असे खून वकिली युक्तिवादांतून सिद्ध होतातच असे नाही किंवा भलताच निरपराध माणूस खुनी म्हणून लटकवला जातो. खूप नंतर कधीतरी योगायोगाने दुसऱ्या वस्तुस्थिती पुढे येतात व तो निरपराध असल्याचे कळते. तोवर तो मेलेला असतो, प्रदीर्घ शिक्षा त्याने भोगलेली असते, त्याचे कौटुंबिक जीवन, समाजातली त्याची प्रतिमा उद्ध्वस्त झालेली असते. अशा सत्य घटनांवर आधारित अनेक सिनेमे निघालेले आहेत. फाशीची शिक्षा देऊ नये या मागणीतला हाही एक मुद्दा असतो. कधीतरी नंतर जर नव्या पुराव्यांनी तो मनुष्य गुन्हेगार नाही असे कळले, तर त्याच्या प्रति न्याय करायला तो किमान जिवंत तरी हवा. फाशी दिलेली असल्यास या नंतरच्या पुराव्यास त्या माणसाच्या दृष्टीने काही अर्थ राहत नाही. म्हणून कठोरातल्या कठोर गुन्ह्यासही फाशी नव्हे, तर जन्मठेप हीच सर्वोच्च शिक्षा हवी असे काहींचे मत आहे.

वैचारिक मान्यतांच्या सत्याबाबत एक अडचण असते, ती म्हणजे ते सत्य निरपेक्ष, वस्तुनिष्ठ नसते. पृथ्वी गोल आहे, हे सिद्ध झाले की झाले. त्यावर मतभिन्नता राहण्याचा संभव नसतो. पण विशिष्ट विचारांना सत्य मानले जाते, त्यावेळी ते वादातीत नसते. समाजाच्या सुव्यवस्थित संचालनासाठी वर्णव्यवस्था-जातिव्यवस्था हवी. पण ती जन्मावर आधारित नको. कर्मावर ठरावी. ती श्रेणीबद्ध नसावी. ती समांतर असावी. या जातींजातींत विवाह तसेच भोजन आदि बाबींना प्रतिबंध नको. परस्परांच्यात समरसता असावी. आर्यसमाज तसेच अन्य काही प्रगतीशील हिंदू प्रवाहांची ही भूमिका होती. आर्य समाज वर्णव्यवस्था मानायचा. हे लोक सत्प्रवृत्त होते. त्यांच्या मनात विखार, द्वेष नव्हता. पीडितांबाबत त्यांच्या मनात कणव, करुणा होती. या मतप्रवाहाच्या विरोधात डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. त्यांना मुळात जातिव्यवस्था ही रचनाच मंजूर नव्हती. ती व तिला आधार देणाऱ्या धर्ममान्यतांवर त्यांनी कठोर आघात केले. समाजाच्या सुव्यवस्थित संचालनासाठी जगभर कामांची विभागणी आहे. ती वैयक्तिक निवडीवर आधारित आहे. त्यासाठी जातीची, वर्णाची संज्ञा कशाला हवी? समरसता अखेरीस जैसे थे रचनेला पुरस्कृत करते. म्हणून सर्व व्यक्तींना समान पायावर उभी करणारी, त्यांचे मोल एकच मानणारी समता प्रस्थापित करण्याचा ते चंग बांधतात. गांधीजी व आंबेडकर यांच्यात झालेला पुणे करार कोणाला खलनायक न ठरवता समजून घ्यायचा झाला, तर तो दोन सत्यांतला संघर्ष होता, असे म्हणायला लागेल. म्हणजेच ही सत्ये सापेक्ष आहेत. त्यांचा निकाल या दोन महामानवांच्या हयातीत तर लागला नाहीच. पण त्यांच्या हयातीनंतर आजही लागलेला नाही. या दोन सत्यांप्रति ठाम बाजू असणारे दोन्ही बाजूंचे सत्प्रवृत्त लोक आजही आहेत. कोणी कठोर बोलेल, तर कोणी सौम्य. पण सत्याच्या बाजू दोन किंवा सत्येच दोन नक्की. अजून खूप काळानंतर कदाचित यातले अधिक योग्य कोणते किंवा या दोहोंपेक्षाही तिसराच पर्याय अधिक योग्य ठरला असता असे काहीतरी पुढे येऊ शकते. कदाचित ते दोघांनाही मान्य होऊ शकते. इथे सत्य एकमेवाद्वितीय असे म्हणता येईल का? अखेरीस सत्याचा विजय होतो, असे म्हणता येईल का? दोहोंपैकी एकही सत्य टिकले नाही, तिसरेच पुढे आले, तर त्या तिसऱ्या सत्याचा विजय झाला असे तरी म्हणता येईल का? ...कारण पुढे जाऊन, ज्यावर सहमती झाल्याने मतभेद राहिले नाहीत, तरी दोहोंना विचार करायला लावणारा एखादा नवा आयाम समोर येऊ शकतो.

अहिंसक, द्वेषरहित आंदोलन करणाऱ्या लोकांबाबत आपण हे पाहिले. पण इथे हिटलर व त्याला साथ देणारे वंशविद्वेषाची शिकार झालेले जर्मन यांचा विचार कसा करायचा? ज्या क्रौर्याने हे लोक वागले, त्याचे त्यांचे म्हणून समर्थन होते. अर्थात ती वर्चस्ववादी मनोरुग्णता होती. त्याला कोणीच सत्य म्हणून मान्यता देणार नाही. या मंडळींचा पुढे पराभव झाला. नाझींत सहभागी झालेले जे कोणी आताआतापर्यंत शिल्लक होते, त्यांच्या पश्चातापाच्या कहाण्याही पुढे आल्या आहेत. इथे उशीरा का होईना, सत्याचा विजय झाला असे आपण म्हणू. अर्थात त्यासाठी प्रचंड किंमत द्यावी लागली. तरीही जय सत्याचाच झाला हे खरे. पण हे नेहमीच होईल वा होते असे नव्हे. समाजमनाची खरी-खोटी दुखरी बाजू, अवमानाची भावना चेतवून प्रचंड क्रौर्य करुन आयुष्यभर हुकुमशहा म्हणून जगणारेही आहेत. त्यांच्या पोलादी पकडीत अनेक निरपराध लोक राष्ट्राचे शत्रू म्हणून घोषित होऊन लोकपाठिंब्याने यमसदनाला धाडले गेले आहेत. इथे सत्याचा विजय किमान या सगळ्यांच्या हयातीत तरी होत नाही. विरोधकांना नेस्तनाबूत करणारे, त्यासाठी कोणत्याही मार्गांचा अवलंब करणारे उलट्या काळजाचे राजकारणी आपल्या देशात सध्या आहेतच. त्यांची मने इतकी निगरगट्ट आहेत की त्यांच्या स्वप्नातही या क्रूर कृत्यांच्या छाया त्यांना भेडसावत नाहीत. त्यामुळे असत्याने वागणे माणसाला अंतर्यामी खात राहते, अस्वस्थ करते हे सार्वत्रिक नाही. ते ज्यांची काळिजे नाजूक असतात, त्यांच्याबाबतीत खरे असते. सत्याच्या रक्षणासाठी या निगरगट्ट, निर्ममांशी करावयाचा संघर्ष व्यापक अर्थाने आंतरिक विवेकाला साद घालून करता येईल असे नव्हे. समाजाला ती हाक जरुर देता येईल. समाजाच्या मनोभूमिकेचा दबाव तयार करता येईल. पण या निष्ठूर, क्रूरकर्म्यांना जेरबंद करावयाचे अन्य मार्गही वापरावे लागतील.

व्यवस्था बदलाचे उपाय विश्वस्त, वर्गसंघर्ष, लोकतांत्रिक कायदे या दोन्ही-तिन्ही पद्धतींनी करण्याच्या भूमिका आपल्याकडे तसेच जगात आहेत. त्या अवलंबल्या गेल्या आहेत. त्याचे अगदी निर्णायक नसले तरी कमीअधिक अनुकूल परिणामही दिसतात. या विचारप्रणाल्यांनी कार्यरत लोक लोकहिताच्या त्यांना वाटणाऱ्या सत्याच्या स्थापनेसाठी जिद्दीने काम करताना दिसतात. त्यांच्यात मतभिन्नतेसह सामायिक सहमतीच्या मुद्द्यांवर सहकार्य व प्रसंगी संघर्ष हीच सत्याकडे जाण्याची रीत असू शकते. ती ‘सत्य रीत’ असू शकते. अनेक संघर्ष व मतभिन्नतेसह संविधानाची निर्मिती ही आंबेडकर, गांधी, नेहरु यांची सामायिक सहमतीची कृती होती. आपापल्या सत्याप्रत जाण्याचे त्यांचे संघर्ष व मतभेद संविधान निर्मितीनंतरही चालू होते.

हे एक किंवा अनेक जनहितकारी सत्ये आपण पाहिले त्याप्रमाणे आपसूक स्थापित वा विजयी होत नाहीत. त्यांच्या प्रस्थापनेसाठी तत्त्वज्ञान सिद्ध करावे लागते. त्याच्या प्रकाशात समाजविण समजून घ्यावी लागते. त्यातून झालेल्या बोधाप्रमाणे प्रबोधन, आंदोलन करावे लागते. संघटना बांधावी लागते. रणनीती आखावी लागते. तिची अंमलबजावणी करताना सतत दक्ष राहावे लागते. ‘सत्य’ चप्पल घालून तयार होईपर्यंत ‘खोटं’ गावभर हिंडून आलेलं असतं, हे आपलं ग्रामीण बोलीतलं शहाणपणही तेच सांगतं.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com
(आंदोलन, मे २०२१)

No comments: