काही काळापूर्वी उदयपूर येथे एका हिंदू शिंप्याची दोन मुस्लिम युवकांनी भर दिवसा त्याच्या दुकानात शिरुन अत्यंत निर्दयपणे हत्या केली. त्यांच्या समजाप्रमाणे पैगंबरांच्या अवमानाची त्यांनी दिलेली ती शिक्षा होती. नुपूर शर्मा या भाजपच्या प्रवक्त्यांनी पैगंबरांविषयी अवमानजनक काही विधाने जाहीरपणे टीव्हीवर केली होती. त्या विधानांना या शिंप्याने समाजमाध्यमांतून पाठिंबा देणारी पोस्ट टाकली होती. हा त्याचा गुन्हा. त्यासाठी शिक्षा शिरच्छेद. ती या मुस्लिम युवकांनी त्याला दिली.
अशी शिक्षा देण्याचा अधिकार यांना कोणी दिला? आपल्याकडे कायद्याचे राज्य आहे. संविधान आहे. या मुस्लिम युवकांनी त्या शिंप्याबद्दल पोलिसांत तक्रार करायला हवी होती. पोलीस तपास आणि नंतर न्यायालयाचा निकाल ही रीत आपण स्वीकारली आहे. ती नाकारुन स्वतः शिक्षा देणाऱ्या या मुस्लिम युवकांना हा अधिकार कोणत्या धर्मपीठाने बहाल केला होता? इस्लामचे असे एकच एक धर्मपीठ आहे का? वास्तविक कोणत्याच धर्माचे जगात एकच एक धर्मपीठ नाही. धर्माज्ञांचे विविध अर्थ लावणारे धर्मगुरु एकाच धर्मात जगभर आढळतात. म्हणजे या मुस्लिम युवकांनी स्वतः घेतलेल्या इस्लामच्या समजानुसार ही भीषण कृती केली.
आणि समजा असे एकच एक धर्मपीठ असते, तरी त्याच्या हुकुमाची तामिली करण्याचा अधिकार कायद्याच्या राज्यात धर्मपीठाला वा त्यांच्या अनुयायांना नाही. त्या देशातली कायदेशीर प्रक्रिया होऊनच शिक्षा होऊ शकते. फ्रान्समध्ये पैगंबरांची व्यंगचित्रे वर्गात दाखवणाऱ्या शिक्षकाचा अशाच माथेफिरू मुस्लिम युवकाने शिरच्छेद केला. तिथे फ्रान्सच्या कायद्याला धाब्यावर बसवले गेले. तालिबान्यांनी बामियानच्या हजारो वर्षांच्या भव्य आणि शिल्पकलेचा अजोड नमुना असलेल्या बुद्धाच्या मूर्तीला तोफा लावून उद्ध्वस्त केले. हे बुद्धाचे शिल्प तालिबान्यांच्या अमलाखालील भौगौलिक क्षेत्रात असले तरी तो जागतिक वारसा आहे. इस्लाम जन्माला येण्यापूर्वीपासून ते तिथे आहे. इस्लामध्ये मूर्तिपूजा निषिद्ध मानली गेली आहे. ती धारणा या तालिबान्यांच्या बेमुर्वत कृत्याचा आधार होती.
अरबस्तानातील टोळ्यांच्या विविध देवता व या देवतांच्या मूर्ती असत. त्यांवरुन त्यांचे आपसात वितुष्ट असे आणि परस्परांशी लढाया चालत. या विकृती व विनाशाचे कारण असलेल्या मूर्तिपूजेविरोधात पैगंबरांनी बंड केले. मूर्ती काढून त्या जागी एकतेच्या, बंधुतेच्या, शांतीच्या मूल्याची ग्वाही देणाऱ्या एकच एक निराकार अल्लाची स्थापना केली. त्या काळात हे निःसंशय पुरोगामी पाऊल होते. पण त्याचा आजच्या काळात चुकीचा अर्थ घेऊन, तोच खरा धर्म मानून इस्लाम कबूल न करणाऱ्यांच्या मूर्तींना, श्रद्धास्थानांना उखडणे याला म्हणतात धार्मिक मूलतत्त्ववाद. चिकित्सा व त्यानुसार नव्या काळात धर्ममतांचा विकास झाला नाही की मूलतत्त्ववाद फोफावतो. कट्टरता जोम धरते. यातून तो धर्मही प्रवाही राहत नाही. त्यात साचलेपण येते.
साचलेपणाचा आणि मूलतत्त्ववादाचा विकार हे काही फक्त इस्लामचेच वैशिष्ट्य नव्हे. प्रत्येक धर्माला कमी-अधिक प्रमाणात त्याने ग्रासले आहे. हिंदू हा रिलिजन या अर्थी एक देव, एक ग्रंथ, उपासनांची सर्वसाधारण एक रीत असा धर्म नसताना, प्रचंड वैविध्य सामावणारा, अनेकविध संप्रदायांचा एक संच असतानाही त्यात हल्ली मूलतत्त्ववादी बेछूट झाले आहेत. उत्तर प्रदेशात गोमांस घरात असल्याच्या संशयावरुन अखलाख या मुस्लिम इसमाची हत्या करणे, गुजरातेतल्या उना येथे गायींची हत्या करुन त्यांना वाहून नेण्याचा खोटा आरोप ठेवून दलित युवकांना अमानुष मारहाण करणे अशी कैक उदाहरणे गेल्या काही वर्षांत सतत पुढे येत आहेत. यात भारतासारख्या लोकशाही देशातला कायदा तर हातात घेतला जातो आहेच. त्याचबरोबर गायीचे पावित्र्य सर्वांवर थोपवण्याची जुलूम-जबरदस्तीही त्यात आहे. मुस्लिम माथेफिरुंच्या कृत्याने संतापलेल्या ख्रिश्चन माथेफिरुंनी अनेक सामान्य मुस्लिमांना त्रास दिला आहेच; तसेच मुस्लिम समजून पगडीधारी शिखांचे खून वा त्यांवर हल्ला केल्याच्या घटना कॅनडा, अमेरिका, ऑस्ट्रेलियात घडल्याच्या बातम्या आपण वाचल्या आहेत. म्यानमार आणि श्रीलंकेतले बौद्ध धर्माचे अनुयायी, बौद्ध भिख्खू अनुक्रमे रोहिंग्या मुस्लिमांशी आणि तामीळ हिंदूंशी काय क्रौर्याने वागतात, हेही आपण पाहिले आहे, पाहत आहोत. मैत्री, करुणा यांना मूठमाती देणाऱ्या या कर्मठ, कट्टर बौद्धांनी बौद्ध धर्मातल्या कोणत्या तत्त्वाचा आधार घेतला हेच कळत नाही. आम्ही बहुसंख्य, आमचे वर्चस्व चालणार, तुमची श्रद्धास्थाने, उपासना पद्धती आमच्याशी मेळ खात नाहीत, ही वर्चस्वशाली भावनाच या बौद्धांच्या कृत्याची आधारशिळा आहे.
इथे राजकीय वर्चस्वाचा मुद्दाही धर्मात गुंफला जातो. मूलतत्त्ववाद व कट्टरता हा धर्मातला रोग मोठा आहेच. पण त्याला राजकारणासाठी वापरले जाते, तेव्हा तो प्रचंड धोकादायक होतो. अफगाणिस्तानात तालिबानी सत्ता काबीज करतात, तेव्हा तिथल्या सर्व मागास प्रथांना ऊर्जितावस्था येते आणि लोकशाही, समतेच्या अधिकारांना पाताळात गाडले जाते. याच्या सर्वाधिक भक्ष्य स्त्रिया होतात. काही एका प्रमाणात असलेली मोकळीक पूर्ण लयाला जाते. महिला बुरख्यात कोंडल्या जातात. त्यांचे शिक्षण थांबते. इराणमध्ये हिजाब न घालण्याचे औद्धत्य करणाऱ्या मुस्लिम युवतीचा पोलीस कोठडीत मृत्यू होतो आणि त्याविरोधात महिला आणि पुरुष रस्त्यावर उतरतात. केस कापणे, हिजाब फेकून देणे या आंदोलनांनी शासनसत्तेवर कब्जा केलेल्या धर्मसत्तेला त्यांनी ललकारले आहे.
भारतात हिंदुत्व म्हणजेच भारतीयत्व असा गोलमोल शब्दच्छल करुन फॅसिस्ट हिंदू राष्ट्रनिर्मितीचे प्रयत्न जोरकस सुरु आहेत. मुळात हिंदू म्हणून समान मान्यता, समान रीती नाहीत. मात्र त्या तशा करण्याची भरकस कोशिश सुरु आहे. गाय ही हिंदूंमधल्या ज्या विभागाला पवित्र वाटते, त्या विभागाला आपली ही आस्था जपण्याचा अधिकार आहे. पण जे अन्य हिंदू वा अन्य धर्मीय वा निधर्मी गोमांस खातात, त्यांच्यावर ते न खाण्याची कायदेशीर जबरदस्ती कशासाठी? हिंदू अस्मिता रक्षणाचा वसा घेतलेल्या भाजपच्या नेतृत्वाखालच्या मणिपूर, अरुणाचल, गोवा या राज्यांत गोवध बंदीचा कायदा करण्याची त्यांची हिंमत नाही. ‘जे गोमांस खातात त्यांनी पाकिस्तानात जावे’ असे भाजपचे एक केंद्रिय म्हणतात. त्यावर भाजपचे दुसरे केंद्रिय मंत्री रिजीजू उत्तर देतात – ‘मी अरुणाचल प्रदेशचा आहे आणि मी गोमांस खातो. मला कोणी थांबवू शकेल का?’
स्वतःला सनातनी हिंदू म्हणणारे, गायीला पवित्र मानणारे महात्मा गांधी यांची याबद्दलची भूमिका महत्वाची आहे. ते म्हणतात – ‘हिंदू धर्माने हिंदूंना गोवध करण्यास मनाई केली आहे, संपूर्ण जगाला नाही. ही धार्मिक मनाई अंतःप्रेरणेने आलेली आहे. कोणाच्या सांगण्यावरुन ही बंदी आल्यास ती सक्ती ठरेल. अशी सक्ती धर्माला मान्य नाही. भारत हा केवळ हिंदूंचा देश नाही.’ अन्यत्र मांडलेले त्यांचे हे अजून एक मत – ‘हिंदुस्थानात गोवधबंदीचा कायदा करता येणार नाही. हिंदूंना गोहत्येस मनाई करण्यात आली आहे, याबद्दल मला शंका नाही. ...परंतु माझा धर्म हा संपूर्ण हिंदुस्थानातील जनतेचा धर्म कसा काय असेल? हिंदू नसणाऱ्यांसाठी तो जुलूम ठरेल.’
तरीही आपल्याकडे अजून केंद्राने नाही, पण वेगवेगळ्या राज्यांनी गोवधबंदीचे कायदे केले. त्यातून भाकड गायींचा प्रश्न तीव्र झाला आहे. अशा गायी शेतकऱ्यांना परवडत नाहीत. ते त्या मोकळ्या सोडून देतात. सरकारच्या गोशाळा अपुऱ्या आणि पुरेसा निधी नसलेल्या आहेत. रस्त्यावर भटकत राहणे, नाहीतर गोशाळांत कुपोषणाने, लंपीसारख्या दुर्धर आजारांनी मरुन जाणे हे या पवित्र गायींचे सध्याचे प्राक्तन आहे.
गायींना मारल्याच्या संशयाने माणसे मारणे हा या कायद्याचा आनुषंगिक पण अमानुष परिणाम आहे. कायदा हातात घेणाऱ्या गोरक्षकांना धर्माचे ठेकेदार आणि सरकार यांचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संरक्षण हा चिंतेचा व संतापाचा विषय आहे.
धर्माचा मूळ हेतू, सच्ची धार्मिकता या वातावरणात संभ्रमित होते. गळफटून जाते.
काही काळापूर्वी राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरवा, नाहीतर त्या मशिदीसमोर हनुमान चालीसा सुरु करु, असा इशारा दिला. त्यावरुन वातावरणात तणाव तयार झाला. मुस्लिमांत एक प्रकारची असुक्षितता आली. क्रियेला प्रतिक्रिया होऊन दंगली भडकल्या तर काय, ही रास्त चिंता होती. तथापि, महाराष्ट्रातल्या तत्कालीन मविआ सरकारने ही स्थिती चांगली हाताळली. पोलिसांनी मुस्लिम वस्त्त्यांत ठेवलेल्या बंदोबस्ताने मुस्लिम समाज आश्वस्त झाला होता. पुढे राज ठाकरेंनीही दोन-चार इशारे देण्यापलिकडे हे आंदोलन चालवले नाही. तूर्त, या मुद्द्यावर शांतता आहे.
इथे प्रश्न येतात दोन. एक, जुना. मशिदी असो वा मंदिरे यांवर भोंगे आले, ते लाऊड स्पीकरचा शोध लागल्यावर. त्या आधी अजान असो वा आरती ही बिन भोंग्याचीच व्हायची. मग आताच भोंगा हा धर्माचा भाग कसा काय झाला? तर तो तसा नाही. सोय म्हणून वा सार्वजनिक कार्यक्रम लाऊड स्पीकर लावूनच करायचा असतो, या सवयीपायी भोंगे आले. आता आले तर त्यांना नियम आहेत. वेळा, आवाजाचे प्रमाण कायदा वा न्यायालयाच्या आदेशाने नक्की झालेले आहे. अशावेळी नियमात न बसणाऱ्या भोंग्यांच्या विरोधात राज ठाकरे लोकांना पोलिसांत तक्रार करायला सांगू शकतात. तशी कार्यकर्त्यांकरवी मोहीम घेऊ शकतात. पण स्वतःच कायदा हातात घेण्यास कार्यकर्त्यांना उद्युक्त करणे हे गैर आहे. गुन्हा आहे.
प्रश्न दुसरा. हनुमान चालिसा ही शांतपणे ईश्वराशी एकरुप होत करावयाची प्रार्थना आहे. मन विशुद्ध, कपटभावरहित असल्याशिवाय आध्यात्मिक समाधान साधत नाही. मशिदीसमोर जाऊन घोषणा देणे गैर असले, तरी समजू शकते. पण तिथे जाऊन हनुमान चालीसा म्हणणे म्हणजे हनुमानाची आणि प्रार्थनेची चेष्टा नव्हे काय? मनात द्वेष, कोणाला तरी धडा शिकवायचा आहे, या भावनेतून ईश्वराशी तादात्म्यता येणार कशी?
म्हणजेच राजकीय हिशेब करण्यासाठी हा धर्माचा वापर आहे. हिंदूंना हे कळत कसे नाही? आपला धर्म आपण कोणाच्या तरी राजकीय लाभासाठी बिनदिक्कत कसा काय वापरु देतो? धर्माचा मूळ हेतू व प्रयोजन कसे काय हरवू देतो?
सच्चा धार्मिकांनी मौन पाळणे, तटस्थ राहणे गैर आहे. ते त्यांच्या खऱ्या धर्माचे नुकसान करतातच; शिवाय देशालाही विनाशाकडे ढकलतात. धर्म राजकारणाचे साधन होता कामा नये, राजकीय पक्षांनी धर्माचा वापर करता कामा नये, हे प्रार्थना स्थळांत, धार्मिक स्नेहसंमेलनात तसेच प्रसंगी रस्त्यावर उतरुन त्यांनी बजावले पाहिजे.
कट्टरतेत आपली सच्ची धार्मिकता हरवू नये यासाठी या धार्मिकांनी काही बाबी मनाशी नीट स्पष्ट करायला हव्या. वास्तविक आपल्या पूर्वसुरींनी त्याची स्पष्टता करुन ठेवली आहे.
आजच्या लोकशाही, धर्मनिरपेक्ष शासनप्रणाली स्वीकारलेल्या आधुनिक काळात संविधानाने व्यक्तीला धर्मस्वातंत्र्य दिले आहे. व्यक्तीला वाटेल त्या धर्माची तो उपासना करु शकतो. वाडवडिलांचा धर्म आहे म्हणून तोच मी मानला पाहिजे, हे बंधन त्यावर नाही. धर्मस्वातंत्र्यात धर्माला न मानण्याचेही स्वातंत्र्य आहे. सव्वा दोन हजार वर्षांपूर्वीचा सम्राट अशोक स्वतः बौद्ध होता. त्याचे वडिल बिंदुसार वैदिक, तर आजोबा चंद्रगुप्त जैन होते. म्हणजे एकाच घराण्यात वेगवेगळे धर्म पाळणारे लोक होते. सम्राट अशोक प्राचीन काळातला. आधुनिक काळातले महात्मा फुलेही कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला पटणारा धर्म स्वीकारण्याचे तत्त्व अधोरेखित करतात. त्यांचे याबाबतचे अवतरण असे:
‘भूमंडळावर महासत्पुरूषांनी म्हणून धर्मपुस्तके केली आहेत त्या सर्वांत त्या वेळेस अनुसरुन त्यांच्या समजुतीप्रमाणे काही ना काही सत्य आहे. यास्तव कोणत्याही कुटुंबातील एका मानव स्त्रीने बौद्धधर्मी पुस्तक वाचून तिच्या मर्जीप्रमाणे पाहिजे असल्यास तो धर्म स्वीकारावा. तिच्या पतीने बायबल वाचून त्याच्या मर्जीप्रमाणे वाटल्यास ख्रिस्ती व्हावे. व त्याच कुटुंबातील त्यांच्या कन्येने कुराण वाचून तिच्या मर्जीप्रमाणे पाहिजे असल्यास महंमदी धर्मी व्हावे आणि त्याच कुटुंबातील त्यांच्या पुत्राने सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक वाचून त्याच्या मर्जीप्रमाणे पाहिजे असल्यास सार्वजनिक सत्यधर्मी व्हावे. कोणी कोणाचा द्वेष न करिता सर्वांनी निर्मिकाच्या कुटुंबातील आहोत असे समजून प्रेमाने व गोडीगुलाबीने एकमेकांशी वर्तन करावे. म्हणजे ते आपल्या सर्वांच्या निर्माणकर्त्याच्या राज्यात धन्य होईल.’
बापाचा धर्म मुलांना जन्मतः मिळण्याची रीत व संस्कार आजही आहे. बापाचा आणि मुलांचा धर्म वेगळा असेल अशी कल्पनाही कोणी करत नाही. मात्र पावणेदोनशे वर्षांपूर्वी एका कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीच्या उपासनेच्या, आपल्याला पटतो तो धर्म स्वीकारण्याच्या स्वातंत्र्याचा पुकारा हा महान समाजक्रांतिकारक करतो. एवढेच नव्हे, असे वेगळे धर्म स्वीकारल्यानंतर कोणी कोणाचा द्वेष न करता एका कुटुंबातील आहोत हे समजून प्रेमाने नांदावे, असे आवाहन फुले करतात.
केवळ तांत्रिकदृष्ट्या धर्मांतरे करुन आपल्या धर्मातील लोकांची संख्या वाढवणे याला काहीही अर्थ नाही. धर्म हा मनाने पटावा लागतो, हे यातून आपल्या लक्षात येते. आंतरजातीय-आंतरधर्मीय लग्ने होण्याचे प्रमाण वाढते आहे. अशा लग्नांमध्ये आमच्या घरी येणाऱ्या सुनेने आमचाच धर्म पाळला पाहिजे हा आग्रह वृथा आहे. त्या नव्या मुलीला तिची उपासना करण्याचा मुक्त अधिकार व वाव दिल्यानेच ती आपल्या घरात अधिक समरस होऊ शकेल, हे लक्षात घ्यायला हवे. असे मिश्रविवाह खरे म्हणजे विशेष विवाह कायद्याखालीच व्हायला हवेत. या कायद्याखाली होणाऱ्या लग्नांत प्रत्येकाला आपले धर्म कायम ठेवता येतात.
औपचारिकदृष्ट्या धर्म स्वीकारणे किंवा खूप ग्रंथ, श्लोक, मंत्र ठाऊक असणे म्हणजे सच्ची धार्मिकता नव्हे. कबिरांचा प्रसिद्ध दोहा आपल्याला ठाऊक आहे. ‘पोथी पढ़ी पढ़ी, जग मुआ | पंडित भया न कोय | ढाई आखर प्रेम का पढ़े, सो पंडित होय |’ यातून कबीर प्रेम, मैत्री, बंधुता, सहभाव याने नाते अधिक दृढ होते, हे पटवून देतात. आधुनिक काळातले डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘माणूस आणि माणसाचे माणसाशी असलेले या जगातील नाते हा बुद्धाच्या धम्माचा केंद्रबिंदू होय.’ असे सांगतात.
म्हणजेच धर्म हा माणसासाठी आहे. धर्मासाठी माणूस नव्हे. साहजिकच खोटा भावनिक ज्वर तयार करुन धर्माच्या रक्षणासाठी माणसांना झुंजवण्याच्या कारस्थानाच्या विरोधात जनमत खऱ्या धार्मिकांनी तयार व संघटित करायला हवे.
भारत हा विविध धर्ममतांच्या संघर्षाचा, त्यांच्या परस्पर स्वीकाराचा आणि समावेशाचा देश आहे. त्यामुळे धर्मचिकित्सेला घाबरुन जाता कामा नये किंवा प्रक्षुब्धही होता कामा नये. उलट तिच्या स्वागताची भूमिका हवी. ही चिकित्सा गांभीर्यपूर्वक व्हायला हवी, परमताचा आदर राखून व्हायला हवी. अशा चिकित्सेनेच धर्ममत प्रवाही राहते. पुन्हा सम्राट अशोकाच्या एका वचनाचा उल्लेख इथे करुया. गिरनार येथील शिलालेखात तो म्हणतो – 'देवांचा प्रिय प्रियदर्शी राजा सर्व संप्रदायांना मान देतो. संन्यासी आणि गृहस्थाश्रमी या दोघांनाही मान देतो. ..स्वतःच्या संप्रदायाची स्तुती न करणे, परसंप्रदायाची अवास्तव निंदा न करणे..अन्य संप्रदायांचा सुद्धा वाजवी सत्कार केलाच पाहिजे..एकमेकांचे धर्म एकमेकांनी ऐकावेत व मानावेत..’
सम्राट अशोकाच्या या विचार-वारशामुळेच त्याची काही शिल्पे, चिन्हे आपण राष्ट्रीय चिन्हे म्हणून स्वीकारली. त्याच्या सारनाथच्या सिंहस्तंभाची प्रतिमा आज आपली राजमुद्रा आहे. त्यावरील धम्मचक्र आज अशोकचक्र म्हणून आपल्या राष्ट्रध्वजावर विराजमान आहे.
धर्माचा प्रवाह स्वच्छ करण्यासाठी आपल्या धर्मातील वैगुण्ये नष्ट करणे नितांत गरजेचे आहे. या वैगुण्यांवर कट्टरता पोसली जाते. मध्ययुगीन संतांनी ही धर्माची स्वच्छता हातचे न राखता केली. आपल्याला आधुनिक काळात ती कठीण का वाटावी?
जातिभेद हे मोठे वैगुण्य आहे. सर्व माणसांना एकसमान न मानता त्यांना उतरंडीच्या रचनेत बंदिस्त करणाऱ्या जाती संपल्याशिवाय माणूस माणसाशी खऱ्या अर्थाने जोडला जाणार नाही, हे चांभार या अस्पृश्य समाजात जन्मलेल्या रैदास किंवा रविदास यांनी नेमकेपणाने ओळखले होते. ते म्हणतात – ‘जाति-जाति में जाति है, जो केतन के पात| रैदास, मनुष ना जुड सके जब तक जाति न जात|’
केळीला (झाडाला) सोलत गेल्यास एक एक पात जाईल आणि अखेरीस काहीच हाती लागणार नाही. तसेच जातीच्या आत जाती आहेत. जोवर जात हा प्रकारच नष्ट होत नाही, तोवर माणूस एक होणे कठीण आहे, हे अगदी समर्पक रुपकाद्वारे ते समजावतात.
या सर्व संतांनी ईश्वर, अल्ला आणि भक्त यातील पुरोहित, मुल्ला, पाद्री या मध्यस्थांना नकार दिला आहे. हे मध्यस्थ धर्माचा गैर अर्थ पसरवण्यास कारण होतात. तसेच त्यांच्या हाती एकवटलेल्या धर्माच्या अधिकाराद्वारे ते सत्तेच्या राजकारणात सौदा करतात. त्यातील प्यादे बनतात. सच्चा धार्मिकांनी हे मध्यस्थ दूर सारले पाहिजेत. मध्ययुगीन संत कवी-कवयित्रींच्या कवनांतून ईश्वर व भक्ताचे नाते हे आई-मुलाचे, मित्राचे, प्रियकर-प्रेयसीचे मानले आहे. म्हणजेच हे खाजगी नाते आहे. ईश्वर व त्याची आराधना करणाऱ्या भक्तांतल्या या खाजगी नात्यात दुसऱ्या कोणी का हस्तक्षेप करावा, असे त्यांचे म्हणणे आहे. म्हणूनच ‘बेशक मंदिर-मस्जिद तोडो, पर प्यार भरा दिल ना तोडो’ असे बुल्लेशहांनी म्हटले आहे. तुकोबांनी विठोबाला माऊली म्हटले, जनाबाईंनी सखा म्हटले हे आपल्याला ठाऊक आहेच. जनाबाई आपल्याला जातं ओढू लागणाऱ्या या सख्याला ‘मायेच्या कार्ट्या, गेलं तुझं मढं’ अशा शिव्याही घालते. केवळ मध्ययुगात नव्हे, तर पुढे आधुनिक काळातही हा मध्यस्थ नाकारण्याची भूमिका गाडगेबाबा, तुकडोजी महाराज आदि संतांनी घेतली आहे. ‘सर्वसाक्षी जगत्पती| त्याला नकोच मध्यस्थी|’ हे महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाचे घोषवाक्य होते.
धर्मातील कर्मकांडांवर तर या सर्व संतांनी आणि महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पेरियार, प्रबोधनकार ठाकरे आदि सुधारकांनी जोरदार आघात केलेत. हे सर्व धर्मविरोधी अशी हाकाटी कोणी जाहीरपणे आज पिटत नाही. पण कर्मकांड, दांभिकता यांविरोधात यांच्यापेक्षा कितीतरी सौम्यपणे प्रचार-प्रसार करणाऱ्या दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांचे खून केले जातात. टीका म्हणजे धर्मद्रोह व पुढे जाऊन राष्ट्रद्रोह असे समीकरण समाजमनात तयार करण्याचे काम कट्टरपंथी अहर्निश करत असतात. त्याला ही अशी विषारी फळे येतात. सच्चा धार्मिकांसमोर या कट्टरतेला विरोध करताना समाजमन कर्मकांड विरोधी, सहिष्णू बनवण्याचे मोठे आव्हान आहे. ‘दया, क्षमा, शांती तेथे देवाची वसती’ हे तुकोबांचे वचन महाराष्ट्रातल्या सच्चा धार्मिकांना पटणे आणि लोकांना पटवणे कठीण आहे का? ‘मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव’ हे संत तुकडोजी महारांचे कवन किंवा गाडगेबाबांची कीर्तने ही मराठी मनात खोलवर रुजलेली आहेत. त्यांवर जर काही पुटं चढलेली असतील, तर ती झटकणे खरोखरच कठीण नाही.
…हे नाही केले, सच्ची धार्मिकता निष्क्रिय राहिली, तर ती कट्टरतेत हरवणारच.
- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com
(प्रजापत्र दीपावली २०२२)