Thursday, September 29, 2022

हिजाब काढणे व घालणे या दोहोंतील सक्तीच्या मी विरोधात


मुस्लिम मुली हिजाब घालतात तो त्यांचा अभिमानाचा मुद्दा माझ्या दृष्टीने नक्कीच नाही. तो पुरुषी वर्चस्वाचाच धर्मातला भाग आहे. तो जायला हवा, हेच माझे मत आहे. पण तो निर्णय त्या मुलींचा हवा. त्यासाठीचे प्रबोधन व संघर्ष त्या समाजांतर्गत व्हायला हवा. इराण मध्ये तो सुरु आहे. त्याचे मी स्वागत करतो. हिजाबच्या सक्तीपायी महसा अमिनी या इराणी युवतीचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला. त्या विरोधात इराणमध्ये तेथील प्रतिगामी राजवटीविरुद्ध जो प्रक्षोभ उसळला आहे, ते समाजाला पुढे नेणारे पाऊल आहे, असेच मला वाटते. माझा या आंदोलनाला पाठिंबा आहे.
तथापि, "जब मुस्लिम देश ईरान में हिजाब के खिलाफ उठ रही आवाज तो फिर हिंदुस्तान में इसके समर्थन में हंगामा क्यों?" हा प्रश्न उपस्थित करणारे एकतर सरळ मार्गी आहेत, अज्ञानी आहेत किंवा मतलबी. इराण व भारत येथील स्थिती एक नाही. दोन्ही समाजातले ताणेबाणे व वर्तमान अंतर्विरोध सारखे नाहीत.
इराणमध्ये एकाच धर्मातल्या कर्मठ व प्रगतीशील या दोन गटांत संघर्ष आहे. भारतात हिंदू कट्टरपंथी हा तिसरा आणि सर्वाधिक ताकदीचा घटक आहे. जो सर्वार्थाने प्रतिगामी आहे. सर्व प्रगतीशील मूल्यांचा तो शत्रू आहे. त्याचा शासन-प्रशासनावरही प्रभाव आहे. त्याचा शिक्षण संस्थांत मुलींनी हिजाब घालण्याला विरोध हा सेक्युलॅरिझम वरील विश्वासापायी नसून मुस्लिम द्वेषातून आहे. 'हे हिंदू राष्ट्र आहे. इथे मुस्लिमांनी मापात राहा', असे ते मुस्लिम मुलींच्या हिजाबला विरोध करण्याच्या मिषाने बजावत आहेत. मुस्लिम मुलींविषयी कणव वा न्याय ही त्यांची भावना नाही.
अशावेळी परधर्माचे कोणी मला जबरदस्तीने मी ज्याला (अज्ञान, रुढी याने का होईना) मानबिंदू मानते, ती बाब काढायला सांगत असेल तर मी त्या बाबत अधिकच आग्रही राहणार. कारण तो माझ्या व्यक्तिस्वातंत्र्यावर, पर्यायाने माझ्या अस्तित्वावरचा घाला आहे, असे मी मानते. कर्नाटकातल्या मुलींची ही मनःस्थिती समजून घ्यायला हवी.
त्यामुळे इतरांना हानी न पोहोचवणाऱ्या व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा पुरस्कार करणे ही भूमिका या स्थितीत योग्य राहील. यात हिजाब नाकारणाऱ्या इराण मधील मुस्लिम स्त्रिया आणि हिजाब हवा म्हणणाऱ्या भारतातील मुस्लिम मुली या दोहोंच्या व्यक्तिस्वातंत्र्याला पाठिंबा द्यावा लागेल. यात मला विसंगती दिसत नाही.
इराणमध्ये महिला एकाच शत्रूशी लढत आहेत. भारतात मुस्लिम आणि हिंदू या दोन्ही कट्टरपंथीयांशी एकाच वेळी लढायचे कसे? एकाला विरोध करताना दुसऱ्याला त्याचा फायदा होता कामा नये, यासाठीची रणनीती काय? कार्यक्रम काय? ...हा पेच सोडवण्याचे परिणामकारक मार्ग पुढे येईपर्यंत व्यक्तीच्या स्वातंत्र्याच्या मुद्द्याला धरुन दोन्ही देशांतील मुस्लिम महिलांना पाठिंबा देण्याची माझी भूमिका राहील. त्याचवेळी हितचिंतक म्हणून हळुवारपणे, जमेल तसे, जमेल तिथे, जमेल तेवढे, हिजाब घालणे ही गुलामी आहे, हेही नोंदवण्याचा प्रयत्न मी करत राहणार.
- सुरेश सावंत

No comments: