काल वर्षावासास प्रारंभ झाला. आमच्या बुद्धविहारात त्यानिमित्ताने कार्यक्रम होता. कार्यक्रम संपल्यावर मी राहत होतो त्या गल्लीतल्या एक महिला येऊन मला भेटल्या.
“तुम्ही येणार हे कळल्याने भेटायला आले. तुम्हाला काही सांगायचे आहे. हे बरोबर नाही. यावर काही तरी केलं पाहिजे.” त्या म्हणाल्या.
“हो. बोला ना. काय झालं?” मी म्हणालो.
त्या म्हणाल्या, “विश्व हिंदू परिषदेने आम्हाला वस्त्यांत ट्युशन्स घ्यायला सांगितले आहे. त्याचे आम्हाला महिन्याला ३ हजार रुपये देणार आहेत. या ट्युशन्सचा महत्वाचा भाग हा हिंदू प्रार्थना आणि त्यांचा प्रचार आहे. त्यासाठीच आम्ही तुम्हाला पैसे देणार आहोत, असे ते सांगतात. याबद्दल आपण काहीतरी करायला पाहिजे.”
माझी पहिली प्रतिक्रिया तातडीने अशी आली – “त्यांना त्यांचा प्रचार करण्याचा अधिकार घटनेने दिला आहे. तुम्ही त्यात भाग घ्यायचा की नाही, हे तुम्ही ठरवा.”
पुढे त्या म्हणाल्या – “मी हे करणार नाही. पण आपल्यातल्या (म्हणजे बौद्धांतल्या) अनेक बाया काहीतरी रोजगार मिळणार म्हणून त्यांच्या केंद्रावर जातात. तिथे ते लोक प्रशिक्षण देतात. त्यात या प्रार्थना कशा म्हणायच्या, काय शिकवायचे हे सांगतात. आमच्यातल्या काहींनी आम्ही आमच्या समाजात (बौद्ध समाजात) या हिंदू प्रार्थना घेणार नाही, फक्त शाळेचा अभ्यास शिकवू, असे सांगितले. त्यावर मग त्यांनी बौद्ध वंदनेचाही त्यात समावेश करा अशी सूट दिली. पण पैसे हवेत तर हे करावेच लागेल, असे बजावले.”
काहींनी नकार दिला. पण गरजवंत म्हणून अनेक बौद्ध महिला हे करत आहेत, याचा अंदाज या महिलेच्या बोलण्यातून आला.
या आमच्या गल्लीतल्या महिलेला आम्ही तातडीने विश्व हिंदू परिषदेच्या विरोधात काही करायला हवे, अशी अपेक्षा होती. मी त्यांना समजावले – “तुम्ही हे लक्षात आणून दिलेत हे चांगले झाले. पण त्यांना त्यांचा हा उपक्रम करण्याचा अधिकार आहे. आपण त्यात सहभागी होऊ नये. त्याचबरोबर आपण आपले पर्यायी वर्ग सुरु करायला हवे. त्याबद्दल काय करता येईल ते पाहू.”
............
मला याचे आश्चर्य वाटले नाही. त्यातल्या त्यात बरे वाटले ते अशा महिला जागृत आहेत, या बाबींची चीड त्यांना येते, यांच्या विरोधात काही करायला हवे, याची तातडी त्यांना वाटते याचे. कारण गेली कित्येक वर्षे आमच्या परिसरात ही कडवी हिंदुत्ववादी मंडळी जाळे विणत आहेत. बौद्धांचे बालेकिल्ले म्हणवणाऱ्या वस्त्यांतही त्यांनी शिरकाव केला आहे. आमच्या काही जुन्या पँथर्सची मुले आंबेडकर जयंती जोरदार करतात; त्याचवेळी बजरंग दलाच्या हनुमान जयंतीच्या फ्लेक्सवरही पदाधिकारी म्हणून त्यांच्या छब्या दिसतात.
पँथरच्या भराच्या काळात आणि त्यानंतरही बराच काळ आमच्या या बौद्ध वस्तीत होळी, गणपती, नवरात्र करण्याची कोणाची टाप नव्हती. हिंदू देवतांचे आणि चालीरीतींचे आमच्या घरांतले अस्तित्व समूळ नष्ट करणे हे आमचे परमकार्य असे. त्याची एक झिंग होती. २२ प्रतिज्ञा अमलात आणणे हे आमचे जीवनसाफल्य होते.
आता डीजे लावून आंबेडकर जयंतीच्या बेफाम मिरवणुका इथली तरुणाई संघटित करते. सगळे रस्ते, गल्ल्या निळ्या होतात. नेत्रदीपक रोषणाई आणि भीमगीतांनी सगळा माहोल उत्साहाने ओसंडत असतो. ..आणि मग काही काळाने आमच्या विहारासमोर साई भंडारा होतो. शेजारी नवरात्र चालतो. जवळपास गणपती बसतात. हे करणारे तरुण एकजात बौद्ध असतात.
मग एकेकाळी पँथरमधून आलेले आमचे नगरसेवक, नेते काय करतात? त्याला शुभेच्छा देणारे फ्लेक्स लावतात. गणपतीच्या मिरवणुकांचे स्वागत करतात. खाजगीत बोलताना या सगळ्याबद्दल नाराजी व्यक्त करतात. नाईलाजाने हे करावे लागते. निवडून यायचे तर लोक आपल्या बाजूने राहायला हवेत, अशी कबुली देतात.
या तरुणांना आपण बौद्ध असतानाही हे करतो याचे काहीही वैषम्य वाटत नाही. (आधीच्या पिढीत चोरुन लपून हिंदू आचरण करणाऱ्यांना ते वाटे.) आपण बौद्ध का झालो, हिंदू धर्म का सोडला, याची नीटशी समज त्यांच्यात दिसत नाही. त्यांच्या बाबतीत बौद्ध आणि हिंदू यातली सीमारेषा धूसर झालेली आहे. आपण हिंदूंमधलीच एक जात आहोत अशी काहीतरी त्यांची मानसिकता असावी. मुसलमानांविषयीचा विद्वेष पुरेपूर आहे. महिलांच्या बैठकांतही सलोख्याचा मुद्दा समजावताना ‘सर तुम्हाला माहीत नाही ती मुसलमानं कशी असतात ती..!’ असे त्यातली एखादी आदर राखून दुरुस्ती करते.
ही प्रक्रिया विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांचा थेट शिरकाव होण्याआधीपासून सुरु झालेली आहे. या कट्टरपंथी हिंदुत्ववादी संघटनांना या प्रक्रियेने मदत झाली. मुसलमान द्वेष हा त्याचा पाया असतो. बौद्ध-हिंदू-जैन-शिख सगळे आपण एक आहोत, इथले मूळ भारतीय आहोत. मुसलमान परकीय, आक्रमक आहेत. त्यांचा पाकिस्तान त्यांना दिला आहे. तरीही ते इथे वाटेकरी आहेत..वगैरे वगैरे पढवले जाते. शहरातील बौद्धांना अस्पृश्यता, जातीय अत्याचार यांचा ग्रामीण भागातल्या एवढा सामना करावा लागत नाही. त्यामुळे ती वेदना तीव्र नसते. तरुणाईला राष्ट्रवादी आवाहने, जोश शमवणाऱ्या मिरवणुका, त्यातल्या घोषणा, त्यांच्यातल्या पुढारपण करणाऱ्यांना दरमहा विशिष्ट रकमेची पाकिटे, व्यसन, पार्ट्या आणि हत्यारे हा या कट्टरपंथी हिंदुत्ववादी टोळ्यांचा नित्याचा कार्यक्रम असतो.
याबद्दल खटकत असणारे काही तरुणही भेटतात. पण त्यांची ताकद अगदी मर्यादित असते. कधी एकदा शिकून, नोकरी मिळवून या वस्तीच्या बाहेर पडतो, अशी त्यांची मनोवस्था असते.
.........
जीवन बदलण्याची आंबेडकरी प्रेरणा आणि त्याला आरक्षण, शिष्यवृत्त्या यांच्या साथीने वस्त्यांतून बाहेर पडलेले, शिक्षित होऊन, चांगल्या नोकऱ्यांत जाऊन मध्यमवर्गीय झालेले आम्ही लोक आता वस्तीशी नियमित संबंध ठेवत नाही. कधीमधी कार्यक्रमाला जातो. पण विहारात किंवा तत्सम जागेत. ती जयंती असते, वर्षावास असतो किंवा पँथरचा सुवर्णमहोत्सव किंवा विद्रोही वा आंबेडकरी साहित्य-संस्कृती संमेलन. वक्ते व श्रोते बहुतेक आम्ही बाहेरचेच असतो. अजूनही ही जाणीव असलेले वस्तीत राहणारे काही लोक येतात. पण ते सुटे सुटे. वस्तीतून समुदाय म्हणून लोक या कार्यक्रमांत मोठ्या संख्येने सहभागी नसतात. ज्या विहारात किंवा सभागृहात आम्ही कार्यक्रम घेतो, त्याच्या आसपासच्या गल्ल्यांत जाऊन दलित पँथर काय होते, राजा ढाले-नामदेव ढसाळ कोण होते, दलित किंवा आंबेडकरी प्रेरणेचे साहित्य म्हणजे काय, मुळात साहित्य म्हणजे काय हे नव्या पिढीला विचारायचे प्रयोग आम्ही केले तर खजिल करणारी उत्तरे मिळण्याची शक्यता आहे.
आम्ही मध्यमवर्गीय बौद्ध आणि आमचे प्रगतीशील चळवळीतले सवर्ण मित्र दलित अत्याचाराच्या विरोधात निदर्शने करतो. त्यालाही आम्ही सुटे सुटे असतो. आम्ही जिथून आलो, त्या वस्तीतले कोणी आमच्या सोबत नसतात. आम्ही त्यांना आणू शकत नाही. कारण आमचा त्यांच्याशी अजिबात किंवा फारसा संबंध नसतो.
बौद्ध मध्यमवर्गाचे हे आपल्या वस्तीतल्या समुदायापासून तुटणे, त्याला आपल्या प्रबोधित जाणिवांपासून अलग ठेवणे, तिथल्या मुला-महिलांच्या विकासाशी संबंध नसणे, त्यांना तिथल्या भाईंच्या आणि जातीच्या मतपेटीआधारे सत्तेशी सौदा करणाऱ्या बौद्ध राजकारण्यांच्या स्वाधीन करणे याचे काय करायचे?
सुरुवातीला नोंदविलेल्या ट्युशन्सच्या निमित्ताने हिंदुत्वाचा प्रचार करणाऱ्या विश्व हिंदू परिषदेच्या उपक्रमाबद्दल चीड येणाऱ्या महिलेला एकाकी ठेवायला आम्ही त्याच वस्तीतून आलेले बौद्ध मध्यमवर्गीय जबाबदार नाही का?
आमच्यातले काही जण केवळ फेसबुक-व्हॉट्सअपवर आवाज उठवत असतात. काही जण प्रासंगिक आंदोलनात सहभागी होतात. काही जण अजूनही वस्तीतल्या विहारांचे, संस्थांचे ट्रस्टी आहेत, ते कार्यक्रमांपुरते तिथे जातात. काहींची पूर्वीची वस्तीतली घरे भाड्याने दिलेली आहेत किंवा आता पुनर्विकासात तिथे इमारती होऊन मोठी प्रॉपर्टी होणार आहे म्हणून अपरिहार्यपणे संबंध ठेवतात. काहींचे जवळचे नातेवाईक अजूनही तिथेच असतात. नाईलाजाने काही नात्यातल्या कार्यक्रमांवेळी, अडचणींवेळी त्यांना भेटावे लागते. मर्तिकावेळी तर टाळणे कठीण जाते. काही जण एनजीओचे पगारी कार्यकर्ते असतात म्हणून तिथे प्रोजेक्ट राबवत असतात.
.......
आज बौद्धांतल्या मध्यमवर्गीयांनी ठरवले तर स्वतःच्या संसाधनांनी आपण जिथून आलो त्या वस्त्यांत विविध विकासाचे, जागृतीचे, लोकांना संघटित करण्याचे उपक्रम ते करु शकतात. ते आठवड्याला वस्तीत जाऊन मुलांचे वर्ग घेऊ शकतात. ज्यात शैक्षणिक आणि सामाजिक-राजकीय विचारांचे प्रबोधन असेल. नोकरी-व्यवसायाचे मार्गदर्शन असेल. पुढे जाऊन त्यांच्या आर्थिक-भौतिक-सामाजिक प्रश्नांवर ते लढले तर उत्तमच.
विश्व हिंदू परिषदेच्या ट्युशन्स म्हणून कळलेल्या या उपक्रमाचा गूगल करुन शोध घेतला. त्याचे नाव आहे – संस्कार शाळा. मला आमच्या गल्लीतल्या महिलेने तिला मुलांना शिकवण्यासाठी विश्व हिंदू परिषदेकडून मिळालेले जे हिंदू प्रार्थना, मंत्र, घोष शिकवण्याचे कागद दिले (ते सोबत जोडले आहेत), त्यातही शीर्षकस्थानी ‘संस्कारशाला : आचार पद्धति एवं प्रमुख विषय’ असे लिहिलेले आहे. देशभर त्यांनी त्या सुरु केल्या आहेत. स्थानिक प्रेरित, गरजू महिला-पुरुषांना ३ हजार किंवा अशीच काही रक्कम दरमहा देऊन ते मिशन म्हणून हा उपक्रम चालवतात. साधने, पैसे नंतर येतात, त्याआधी विशिष्ट ध्येयाची बांधिलकी मानलेले लोक लागतात. ते त्यांच्याकडे उदंड आहेत.
बौद्ध मध्यमवर्गाला आपल्या उद्देशाला आकार देणारे असे ‘संस्कार वर्ग’ संघटित करणे, त्यासाठी पैसे उभे करणे कठीण आहे का?
बौद्ध धम्माच्या प्रचार-प्रसाराचे उद्दिष्ट असणाऱ्या संघटनांनी आपल्या कामात हा ध्येयवाद आणणे आणि त्यानुसार उपक्रम व विषय ठरवून आपले काम अधिक अर्थपूर्ण करणे कठीण नाही.
बाबासाहेबांच्या काळात ‘समता सैनिक दला’ने केवळ आपल्याच नव्हे, तर अन्य प्रगतीशील शक्तींसहितच्या व्यापक आंदोलनात सुव्यवस्था आणि व्यत्यय आणणाऱ्यांचा योग्य तो बंदोबस्त करण्याची मोठी कामगिरी केली आहे. आज चैत्यभूमी, चवदार तळे, दीक्षाभूमी, भीमा कोरेगाव वा तत्सम ठिकाणी वा प्रसंगी मानवंदना देणे, काही व्यवस्था ठेवणे ही कामे समता सैनिक दल करत असते. ते महत्वाचे आहे. ते करावेच. पण त्यापलीकडे जाऊन बजरंग दली संघटनांना प्रत्युत्तर देणारे तरुणांचे गट संघटित करण्यात त्यांनी पुढाकार घेणे अशक्य नाही. काही ठिकाणी करुन पाहायला हवे.
बौद्ध मध्यमवर्ग अशारीतीने सक्रिय झाला तर वस्त्यांतून त्यांना ‘आपले लोक’ म्हणून जी मान्यता आजही मिळते, ती आणखी वाढेल. वस्तीतली तरुण मंडळी जोडली जातील. आपल्याला अपेक्षित उपक्रम संघटित करु लागतील.
मध्यमवर्गीय बौद्धांनी नव्या भानाने, नियमित सक्रिय होण्याने विश्व हिंदू परिषदेच्या संस्कार शाळेच्या विरोधात बोलणाऱ्या महिलेला ताकद मिळेल. ज्या गरजवंत म्हणून पैश्यासाठी नाईलाजाने हे वर्ग चालवतात अशा बौद्ध महिलांना तिथून बाहेर पडण्याची उभारी येईल.
बौद्ध मध्यमवर्ग हलत नाही तोवर माझे उत्तर काही एका अपेक्षेने आलेल्या त्या महिलेला एवढेच असेल का?– “त्यांना असे वर्ग घेण्याचा अधिकार घटनेने दिला आहे. तुम्हाला पटत नसेल, तर तुम्ही त्यात जाऊ नका.”
........
मी किंवा आमचे सहकारी एवढेच म्हणून थांबणार नाही. थांबलो नाही. वैयक्तिक आणि आमच्या संघटनेच्या मर्यादित आवाक्यात या दिशेने आम्ही काही ना काही हालचाल करत असतो. ती अधिक नेटकी करुन नेटाने चालू ठेवूच.
- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com | ४ जून २०२३
(जीवनमार्ग, ९ ते १५ जुलै २०२३)