Thursday, November 26, 2009

माझ्या मनात झालेले ‘मिरॅकल’

‘मिरॅकल इन रवांडा’.

90 मिनिटांचा मंचकावरील थरार. वंशसंहाराचा भीषण, बिभत्‍स कल्‍लोळ.

भयाच्‍या भयाण तांडवात आध्‍यात्मिक शांततेचा शोध- भय, संताप, सूड यांच्‍या पार जाणारा.

क्रौर्याची परिसीमा गाठून सर्वस्‍व उजाड करणा-या गुन्‍हेगारांना पिडितानेच दिलेली अखेरची क्षमा. विद्वेषाच्‍या समूळ उच्‍चाटनाचा शाश्‍वत मार्ग उजागर करणारी. अखिल मानवतेला कवेत घेणारी.

प्रेक्षक म्‍हणून माझ्या मनात भय, थरकाप, आक्रोश, अश्रू आणि अखेर उन्‍नत उन्‍मनावस्‍था...

मुंबई विद्यापीठातील नाट्यलेखिकांच्‍या आंतरराष्‍ट्रीय परिषदेतच्‍या समारोपावेळच्‍या या नाटकाने झालेल्‍या या उन्‍मनावस्‍थेतून अजूनही मी पुरता बाहेर पडू शकलेलो नाही. खरे तर बाहेर पडायची इच्‍छाही नाही. रोजचे व्‍यवहार चालू असले तरी आत इम्‍याक्‍युलीचे स्‍वगत, ईश्‍वराशी चाललेला तिचा संवाद चालू असतो. मध्‍येच कळ येते. कळवळायलाही होते. जखम भळभळते. श्‍वास वाढतात. गदगदून येते. डोळे ओथंबून येतात. ...तरीही खूप बरे वाटते. काहीतरी साचलेले मोकळे होते आहे, असे वाटते. अखिल मानवजातीच्‍या भविष्‍याची आश्‍वासकता श्‍वासांतून वाहू लागते.

या नाटकाबद्दल मला काय वाटते, हे लिहिणे त्‍या अर्थाने व्‍यक्तिगत झाले आहे. माझ्या जाणिवांचा, संवेदनांचा तो आविष्‍कार आहे. डायरी लिहिल्‍यासारखा. ते तटस्‍थ, वस्‍तुनिष्‍ठ वगैरे काही नाही. मला असे वाटले, एवढेच.

रवांडातील वंशसंहारावरची ही एकपात्री एकांकिका. लेस्‍ली लेविस स्‍वोर्ड ही लेखिका आणि तीच अभिनेत्री. कथा वास्‍तवात घडलेली. इम्‍याक्‍युली या मुलीच्‍या आयुष्‍यावर बेतलेली.

रवांडा हा आफ्रिका खंडातील एक छोटा देश. लोकसंख्‍या 73 लाख. तेथील दोन प्रमुख टोळ्या- हुतू व तुत्‍सी. हुतू बहुसंख्‍य म्‍हणजे 84 टक्‍के. तुत्‍सी 15 टक्‍के. 1 टक्‍का त्‍वा नावाची एक छोटी जमात. या दोन टोळ्यांना आधीचाच संघर्षाचा इतिहास. तुलनाच करायची तर जर्मनीत ज्‍यू व भारतात मुस्लिम तसे रवांडात तुत्‍सी. या तुत्‍सींविषयी हुतूंच्‍या मनात ख-या-खोट्या कल्‍पनांचे, अफवांचे जहर साचत आलेले. तुत्‍सी आपल्‍याला कमी प्रतीचे मानतात, त्‍यांच्‍या बायका आमच्‍या हुतू पुरुषांना नादी लावतात व त्‍यांना जीवनातून उठवतात. आमच्‍या सर्वनाशाला हे तुत्‍सी कारण होणार आहेत. त्‍यांचा योग्‍य बंदोबस्‍त करायलाच हवा. ही मानसिकता तयार होत चाललेली. सरकारमधील अनेकांच्‍या मनात हाच द्वेष भरुन राहिलेला व तो प्रकटपणे व्‍यक्‍तही होणारा. आकाशवाणीवरच्‍या बातम्‍यांत, कार्यक्रमांतूनही हा द्वेष पोसला जात होता.

अशात समेटाचा प्रयत्‍न करणा-या जुवेनाल हब्‍यारिमाना या रवांडाच्‍या राष्‍ट्राध्‍यक्षांचे विमान पाडले जाते व त्‍यांचा त्‍यात अंत होतो. 6 एप्रिल 1994 रोजीची ही घटना. हे कृत्‍य करणारे नक्‍की कोण, याबद्दल अजूनही वाद असला तरी त्‍यावेळी हे करणारे तुत्‍सीच आहेत असे गृहीत धरले जाते व संहाराचा आगडोंब उसळतो. पुढच्‍या तीन महिन्‍यातील तुत्‍सींची क्रूर, हाल हाल करुन कत्‍तल केली जाते. या कत्‍तल झालेल्‍यांत तुत्‍सींच्‍या सहानुभूतिदार हुतूंचाही समावेश आहे. ही कत्‍तल लहानपणापासून एकत्र राहिलेल्‍या शेजा-यांनी, गावातल्‍या जवळच्‍या परिचितांनीच प्रामुख्‍याने केलेल्‍या आहेत.

सरकारच्‍या अधिकृत आकडेवारीनुसार 1,174,000 लोक 100 दिवसांत मारले गेले. (10,000 लोक प्रतिदिनी, 400 लोक प्रतितास, 7 जण प्रतिमिनिट). अन्‍य स्रोतांच्‍यानुसार हा आकडा 8,00,000 आहे. 3,00,000 तुत्‍सी वाचले. हजारो स्त्रिया विधवा झाल्‍या. त्‍यातल्‍या पुष्‍कळांना बलात्‍काराला सामोरे जावे लागले होते. अनेक बलात्‍कार अशा विटंबना करुन झाले की ब-याच जणी त्‍याचवेळी मेल्‍या. जिवंत बलात्‍कारितांपैकी बहुतेकांना आता एड्सने वेढले आहे. 4 लाख मुले अनाथ झाली. ज्‍या शाळांमध्‍ये, चर्चमध्‍ये तुत्‍सी जीव वाचवण्‍यासाठी लपले होते, अशा अनेक शाळा, चर्चेस आता त्‍यांच्‍या सांगाड्यांची, कवट्यांची म्‍युझियम्‍स झाली आहेत.

या भयानक वेडाचाराला आळा घालण्‍याचा काहीच प्रयत्‍न देशात झाला नाही. उलट मारेक-यांना प्रोत्‍साहन देण्‍याचा, सर्वतोपरी शस्‍त्रांचे सहाय्य देण्‍याचा, तुत्‍सींचा ठावठिकाणा सांगायला सरकारी यंत्रणाच सज्‍ज होती. आकाशवाणीवरुन तुत्‍सी झुरळांना चिरडण्‍याचे आवाहनच केले जायचे. या रणकंदनावेळी जगाची, युनोचीही स्थिती जवळपास बघ्‍यासारखी होती. यावर नियंत्रण घालण्‍याचे परिणामकारक प्रयत्‍न बाहेरुनही झाले नाहीत. त्‍यातल्‍या त्‍यात उशीरा का होईना पण फ्रान्‍सच्‍या हस्‍तक्षेपानेच थोडाफार परिणाम साधला गेला. त्‍यांनी उभारलेल्‍या छावण्‍यांतून तुत्‍सी निर्वासितांना आधार मिळाला.

इबॅगिझा या तुत्‍सी कुटुंबातील इम्‍याक्‍युली ही 24 वर्षांची युवती. वंशसंहार सुरु झाल्‍यावर वडील तिला त्‍यांच्‍या एका हुतू मित्राकडे जाऊन लपायला सांगतात. ती तयार नसते. पण तरुण मुलींना दंगलखोर काय रीतीने वागवतात, हे बापाला ठाऊक असल्‍याने तो आग्रहच करतो व इम्‍याक्‍युली अखेर घरातून निघते. तिची लपण्‍याची जागा म्‍हणजे त्‍या घरातील एक पटकन लक्षात न येणारे ओले, कोंदट बाथरुम. 3 फूट रुंद व 4 फूट लांब एवढी ही अरुंद जागा. त्‍यात आधीच 7 जणी लपलेल्‍या. सगळ्या जणी एकावेळी खाली बसूही शकत नव्‍हत्‍या अशा या जागेत इम्‍याक्‍युली तब्‍बल 91 दिवस राहिली. बाथरुमच्‍या बाहेरचे जग या काळात तिने पाहिलेच नाही. बाहेर हुतू मारेकरी सुरे परजत आरोळ्या ठोकत असलेले ऐकू येई. ते कधी ती लपलेल्‍या घरावर थापा मारत, मालकाला दम देत, घर आतून तपासत. तिच्‍या नावाने ओरडत. पण त्‍यांना ते बाथरुम काही लक्षात येत नसे. अशा अवस्‍थेत मोठ्याने बोलायचे नाही, बाथरुममधल्‍या पाण्‍याचाही आवाज होऊ द्यायचा नाही, याची खबरदारी लपलेल्‍यांना घ्‍यावी लागे. घरमालकानेही स्‍वतः मृत्‍यूवर उदार होऊनच यांना आधार दिलेला असतो.

बाहेरच्‍या थापा, आपण सापडलो तर आपल्‍यावर बलात्‍कार होणार, आपण मारले जाणार या भयाने उसासणारी, थरकापणारी, हाडांचा सापळा झालेली इम्‍याक्‍युली हळू हळू ईश्‍वराशी संवाद साधू लागते. तिचे उसासे, थरकाप, भय, चीड एका निरव शांततेत परिवर्तीत होऊ लागते.

आणि याचवेळी फ्रान्‍सचा हस्‍तक्षेप झाल्‍याचे व त्‍यांनी छावण्‍या उघडल्‍याचे कळते व इम्‍याक्‍युली जवळच्‍या छावणीत जाण्‍याचा निर्णय घेते. हिंमतीने घराच्‍या बाहेर पडते. प्रदीर्घ काळ अवघडून राहिल्‍याने व ताकदच संपल्‍याने तिला प्रथम धड उभेच राहता येईना. हळू हळू ताकद एकवटून ती रांगत, धडपडत फ्रेंच छावणीत दाखल होते. सुटकेचा निःश्‍वास टाकते.

आता आपल्‍या घरच्‍यांची माहिती घेऊ लागते. तेथील रजिस्‍टरमधली नावे आतुरतेने वाचायला लागते. अन् वडील, आई, भाऊ एक एक करुन सगळे कुटुंबीय केवळ मारले नव्‍हे, तर क्रूरपणे ठार केले गेल्‍याचे तिला समजते. एका भयाण पोकळीच्‍या विवरात ती कोसळत जाते. तिच्‍या कुटुंबात ती आता एकटीच शिल्‍लक असते. तिचा ईश्‍वराशी चाललेला संवाद तिला बहुधा ताकद देऊन उभी करतो. तिच्‍या कुटुंबीयांना ठार मारलेल्‍याला बघायचे आहे का, म्‍हणून तिला विचारले जाते व त्‍या मारेक-यास तिच्‍या समोर आणले जाते. ती शारीरिक व मानसिक दृष्‍ट्या थकून गेलेली आहे, गळून गेलेली आहे. आता तिने काय करायचे ? त्‍यास काय म्‍हणायचे ?

...ती एवढेच म्‍हणते, ‘मी तुला क्षमा करते.’

वास्‍तव आणि नाटक इथे संपते. वास्‍तवातल्‍या इम्‍याक्‍युलीने ‘Left to Tell: Discovering God Amidst the Rwandan Holocaust (2006)’ हे पुस्‍तक लिहून हा सगळा घटनाक्रम नोंदवला आहे. लेस्‍लीने त्‍याचे ‘मिरॅकल इन रवांडा’ हे नाटक केले. ते करण्‍यासाठी ती स्‍वतः वास्‍तवातल्‍या इम्‍याक्‍युलीबरोबर रवांडात हिंडली. घटनाक्रमातली माणसे, स्‍थळे समजून घेतली. इम्‍याक्‍युलीच्‍या मनाशी, तिच्‍या जाणिवांशी, संवेदनांशी एकरुप झाली. ते ती जणू स्‍वतः जगली. नाटक तिने लिहिले व नाटकात तिनेच काम केले.

‘नाटक लिहिले’, ‘काम केले’ असे म्‍हणणे खरे म्‍हणजे बरोबरच नाही. ती लेस्‍ली राहिलीच नाही. संहितेत आणि प्रयोगात ती ‘इम्‍याक्‍युलीच’ होती. तिला कोणी बनावे लागलेच नाही. लेस्‍ली आणि इम्‍याक्‍युली या अभिन्‍न, एकच होत्‍या. रवांडातला अख्‍खा वंशसंहार त्‍याच्‍या अमानुष क्रौर्यासहित लेस्‍लीने रंगमंचावर एकटीने उभा केला. प्रत्‍यक्षातला इम्‍याक्‍युलीचा काळजीत पडलेला बाप, लपायला आधार देणारा हुतू घरमालक, आरोळ्या ठोकत धिंगाणा घालणारे हुतू मारेकरी, छावणीतला फ्रेंच सैनिक, तिच्‍या कुटुंबीयांचा मारेकरी या सर्वांना लेस्‍लीनेच आपल्‍या प्रचंड ताकदीच्‍या अभिनयाने सजीव केले. प्रेक्षकांना त्‍या सर्व थराराचा जिवंत प्रत्‍यय दिला.

लेस्‍ली हे नाटक घेऊन जगभर हिंडते आहे. त्‍याच्‍या तिकिटांतून येणा-या पैश्‍यांतला एक हिस्‍सा रवांडातल्‍या अनाथ मुलांच्‍या संगोपनासाठी खर्च होणार आहे (A portion of all ticket sales is donated to Orphans Of Rwanda), असे या नाटकाच्‍या वेबसाईटवरील आवाहनात छापलेले आहे. तिने स्‍वतः रवांडातील दोन मुले दत्‍तक घेतली आहेत.

एवढेच नव्‍हे, या नाटकाच्‍या वेबसाईटवर तिने असेही आवाहन केले आहे – ‘If your theater or organization is interested in bringing this incredible message of forgiveness to your area, please contact us!’

हा ‘क्षमाशीलतेचा’ संदेश तिला महत्‍वाचा वाटतो व त्‍याचा प्रसार जगभर ती करु पाहते आहे. विलक्षण ताकदीची अभिनेत्री अन् त्‍याहून मोठी ‘जग सुंदर, मानव्‍यपूर्ण करु इच्छिणारी’ कार्यकर्ती ! या कार्यकर्तीच्‍या कोंदणामुळे तिच्‍यातली अभिनेत्री खुलून दिसते.

नाटकाच्‍या शेवटी जो प्रचंड टाळ्यांचा कडकडाट प्रेक्षकांकडून झाला त्‍यास तिने ‘हसू आणि आसू’ भरल्‍या मुद्रेने प्रतिसाद दिला. केवळ कलाकार ती असती तर ‘हसू’ पुरेसे होते. शेवटी भेटायला गेलेल्‍या एका कार्यकर्तीशी बोलताना ‘नाटकाचा संदेश -क्षमेचा- खरेच लोकांपर्यंत पोहोचला का ?’ हा प्रश्‍न तिला विचारावासा वाटला.

कलेने निःसंशय संदेश द्यायचा असतो. अर्थात, तो प्रचारकी पद्धतीने नव्‍हे, तर त्‍याहून अधिक सशक्‍त, प्रत्‍ययकारी मार्गाने म्‍हणजे ‘कलात्‍मकतेने’. मानवी जीवनात सौंदर्य, समृद्धता निर्माण करणे, हेच तर कोणत्‍याही कलेचे अंतिम लक्ष्‍य असते.

नाटक पाहत असताना आपल्‍या देशांतील फाळणीपासून, गुजरातपर्यंतच्‍या हिंदू-मुस्लिम दंगली समोर येत होत्‍या. बाबरी मशिदीच्‍या विध्‍वंसानंतरची दंगल तर अगदी जवळून, म्‍हणजे तिच्‍यात वावरुनच अनुभवली होती. 93 च्‍या जानेवारीतील दंगलीत शिवाजी नगर, धारावीत मी पाहिलेली माणसे मला 94 च्‍या रवांडाच्‍या वंशसंहारात त्‍याच वृत्तीप्रवृत्‍तींसह आढळली.

रवांडातली इम्‍याक्‍युली अमेरिकेतील फिलिपिनी लेस्‍ली मुंबईच्‍या रंगमंचावर साकार करते आणि क्षमेनेच द्वेषाचे उच्‍चाटन होणार आहे, हा बुद्ध, ख्रिस्‍त, गांधी, मार्टिन ल्‍यूथर, मंडेला आदिंनी दिलेला अखिल मानवी संदेश देते. या त्‍याच्‍या ‘व्‍यापक मानव्‍या’च्‍या मध्‍यवर्तीत्‍वामुळेच मंचकावरील नाट्य माझ्याही मनात सुरु होते. इम्‍याक्‍युली, लेस्‍ली आणि मी वेगळ्या देशांचे नव्‍हतोच. आम्‍ही एकाच पृथ्‍वी ग्रहावरचे मानव वंशाचे सदस्‍य होतो.

जगात आजही फार फार वाईट वागणारे लोक आहेत. ते स्‍वतःच्‍याच मानवी वंशाच्‍या सदस्‍यांच्‍या कत्‍तली करत आहेत, दुस-यांना मारण्‍यासाठी स्‍वतःलाही बॉम्‍बने उडवत आहेत. आपल्‍याच मानवी वंशाच्‍या दुस-या व्‍यक्‍तीचा धर्म, जात, प्रदेश, देश, भाषा वेगळी आहे, म्‍हणून अपरंपार द्वेष करत आहेत. या सगळ्यामुळे मला असुरक्षित वाटते, माझे मित्र, माझी घरची माणसे यांच्‍या सुरक्षिततेबद्दल मला काळजी वाटते. केवळ लिंगाच्‍या फरकामुळे स्त्रियांशी होणारा विषम, अवमानकारक व्‍यवहार पाहिला की अस्‍वस्‍थ व्‍हायला होते. खूप मोठे लोक हा समाज, जग सुधारण्‍यासाठी प्रयत्‍न करुन गेले, तरी अजून जग पूर्ण मोकळा श्‍वास घेऊ शकत नाही. या जाणिवेने मी उदास होतो. हतबल झाल्‍यासारखेही वाटते.

...पण मग असे काही वाचले, पाहिले, ऐकले, केले की ‘मिरॅकल’ होते. मन उभारी धरते. रंध्रारंध्रातून ऊर्जा प्रसवायला लागते. मन शांत होते. वैश्विक अणू-रेणूंशी माझी तादात्‍म्‍यता साधली जाते. एकाकीपण दूर होते. वाईटापेक्षा जग चांगले करणा-यांचा प्रवाह अधिक ओजस्‍वी, तेजोपुंज व दमदार आहे, याची प्रचिती येते.

‘मिरॅकल इन रवांडा’ने हेच माझ्या बाबतीत केले.

म्‍हणूनच सुरुवातीला म्‍हटल्‍याप्रमाणे या नाटकाने झालेल्‍या या उन्‍मनावस्‍थेतून अजूनही मी पुरता बाहेर पडू शकलेलो नाही. खरे तर बाहेर पडायची इच्‍छाही नाही.

- सुरेश सावंत

No comments: