Wednesday, February 11, 2009

‘अब्राहम लिंकन ते ओबामा’

संदर्भासाठी म्‍हणून हा पत्रकाचा मसुदा इथे ठेवत आहेः


..................................................................................


'अब्राहम लिंकन ते ओबामा'


कुमार केतकर यांचे व्‍याख्‍यान


4 फेब्रुवारी 2009, सायं. 6.30 वा.


स्‍थळः धुरु हॉल, दादर रेल्‍वे स्‍टेशन जवळ, दादर (प)



प्रिय सहकारी,



अमेरिकेच्‍या अध्‍यक्षपदी बराक ओबामांनी विराजमान होणे, हे कुठच्‍यातरी एका देशाचे अध्‍यक्षपद त्‍या देशातील कोणा एका नेत्‍याला मिळणे एवढ्यापुरते सीमित नाही, हे आपण सगळेच जाणतो. गुलामगिरीच्‍या अनन्वित अत्‍याचाराखाली भरडलेल्‍या आणि आजच्‍या प्रगत अमेरिकेतही विषमतेचा भोग पूर्णपणे न संपलेल्‍या कृष्‍णवर्णीयांमधून कोणी एक ओबामा अमेरिकेच्‍या सर्वोच्‍चपदी पोहोचणे ही असामान्‍य घटना आहे. एवढेच नव्‍हे, तर ओबामांची निवडणुकीच्‍या काळातील भाषणे, निवडून आल्‍यानंतरचे आणि आता अध्‍यक्षपद स्‍वीकारानंतरचे भाषण यांमधून आधीच्‍या राजवटीच्‍या धोरणांपासून काही वेगळे, व्‍यापक अधिक आश्‍वासक असे जाहीर होत होते. ही आश्‍वासकता केवळ अमेरिकन काळ्या किंवा उदारमतवादी गो-या जनतेपुरती नव्‍हती. एकूण जागतिक समुदायालाच ते एक उन्‍नत आवाहन होते. बराक ओबामांच्‍या विजयाचा जल्‍लोष, शपथविधीला जमलेला 20 लाखांचा समुदाय, ओबामांच्‍या नावाचा जयघोष, या सगळ्याला प्रतिसाद देणारे ओबामांचे थेट काळीज थरारत नेणारे भाषण, जीव कानांत व डोळ्यांत आणून त्‍यांचे ते शब्‍द अंतरात साठवणारी आणि अश्रूंनी त्‍यांचे शिंपण करणारी तमाम अमेरिकन तसेच जागतिक जनता आपण दूरदर्शनवर सतत पाहत आलो आहोत. खरे म्‍हणजे आपणही त्‍यातलेच होतो. ते सर्व क्षण जगत होतो. आजही आपण त्‍या भारलेपणात आहोत.



या भारलेपणाचा नक्‍की अर्थ काय, गुलामगिरीच्‍या विरोधात लढणारे व ती कायद्याने नष्‍ट करणारे अब्राहम लिंकन, काळ्या-गो-यांच्‍या समानतेच्‍या स्‍वप्‍नासाठी संघर्ष करणारे मार्टिन ल्‍यूथर किंग यांनी नक्‍की काय केले, त्‍यांचे खून का झाले, आणि त्‍यांचा वारसदार म्‍हणून ओबामांना अमेरिकन जनतेने आपला प्रतिनिधी म्‍हणून कसे निवडले, त्‍यांच्‍या निवडीचा एकूण मानवतेशी आणि भारतीय म्‍हणून आपल्‍याशी संबंध काय....हे सर्व समजून घेणे रोमांचक, उद्बोधक तसेच दिशादर्शकही आहे.



यासाठीच 'अ‍ब्राहम लिंकन ते ओबामा' या विषयावर लोकसत्‍ताचे संपादक कुमार केतकर यांचे भाषण बुधवार दि. 4 फेब्रुवारी रोजी सायं. 6.30 वा. धुरू हॉल, दादर रेल्‍वे स्‍टेशनजवळ, दादर (प) येथे आयोजित करत आहोत.



आपण स्‍वतः हे भाषण ऐकण्‍यास यावे तसेच आपल्‍या सहकारी-मित्रांनाही निमंत्रित करावे, ही विनंती.


- राष्‍ट्रीय एकता समिती

No comments: