Saturday, February 21, 2009

आपल्‍या धडावर आपलेच डोके हवे या डोक्‍यात मानव्‍याच्‍या सुंदरतेचे स्‍वप्‍न हवे

हा लेख निवडक कार्यकर्त्‍यांच्‍या अंतर्गत चर्चेसाठी आहे, प्रसिद्धीसाठी नाही.


आपल्‍या धडावर आपलेच डोके हवे


या डोक्‍यात मानव्‍याच्‍या सुंदरतेचे स्‍वप्‍न हवे


'सम्राट'मध्‍ये कार्तिकी गायकवाडच्‍या विजयाची बातमी अजून कशी नाही आली ?'


'ती 'आपल्‍यातली' नाही म्‍हणून!'


'कशावरुन?'


'तिचे वडिल भजने म्‍हणतात.'


('सम्राट' हे बौद्धांमध्‍ये वाचले जाणारे एक प्रमुख वृत्‍तपत्र. 'आपल्‍यातली' याचा अर्थ बौद्ध. कारण प्रश्‍न विचारणारा मी आणि ज्‍याने उत्‍तर दिले तो असे आम्‍ही दोघेही 'बौद्ध'. बौद्ध झाल्‍यावर हिंदू धर्मातल्‍या देवादिकांची पूजा करणे अधिकृतपणे नाकारले गेल्‍याने ज्‍याअर्थी कार्तिकीचे वडिल हिंदू देवांची भजने म्‍हणतात, त्‍याअर्थी ते बौद्ध नसणार, असा माझ्या मित्राचा तर्क. प्रत्‍यक्षात असंख्‍य बौद्ध मंडळी आजही हिंदू देवतांची पूजा, नवससायास करताना सर्रास दिसतात.)


माझ्या प्रश्‍नाला दै. सम्राटचा वाचक असलेल्‍या माझ्या मित्राने दिलेले हे उत्‍तर बरोबर असेलच असे नाही. अनेक बातम्‍या द्यायच्‍या राहून जातात, तसेच ही बातमी राहूनही गेली असेल.


पण हेही खरे की, अभिजित सावंत, अभिजित कोसंबी आणि वैशाली माडेच्‍या वेळी फक्‍त बातम्‍याच नव्‍हे, तर एसएमएस करण्‍याचे आवाहन करणारी मोहीमच 'सम्राट'ने चालवली होती. या तिघांपैकी पहिले दोघे हे 'बौद्ध' होते, तर वैशाली बौद्ध असल्‍याचा एक लेखच सम्राटमध्‍ये आला होता. परंतु काहींचे म्‍हणणे ती बौद्ध नव्‍हती, ओबीसींपैकी कोणीतरी होती.


मग कार्तिकी गायकवाड कोण?


ती बौद्ध नसेलही, माळी, साळी, तेली..अशी ओबीसी असेल किंवा मराठाही असू शकेल. पण 'गायकवाड' आडनाव, तिचे, तिच्‍या वडिलांचे दिसणे, उच्‍चार पाहता ती 'ब्राम्‍हण' किंवा तत्‍सम उच्‍च जातींपैकी नक्‍कीच नसावी. म्‍हणजेच खात्रीने 'बहुजन' असावी.


इथवरची चर्चा वाचताना तुमच्‍यापैकी काहींना रागही आला असेल. तुम्‍ही मनात म्‍हणत असाल, कार्तिकी किंवा वैशाली किंवा दोन्‍ही अभिजित इतके उत्‍कृष्‍ट गायले, की त्‍यामुळे ते 'सा रे ग म प (हिंदी किंवा मराठी)' चे महाविजेते ठरले. त्‍यांची 'गुणवत्‍ता-मेरिटच' तसे होते! त्‍यांच्‍या जातींचा काय संबंध? अशी जातींची चर्चा करणे म्‍हणजे निव्‍वळ मागासपणा (एकप्रकारचा 'जातिवाद'च) नाही का?


असा राग येणा-या मोकळ्या, निरागस मनाचा, वृत्‍तीचा मला जरुर आदर आहे. सगळा समाज तसाच व्‍हावा, अशी माझी मनोमन इच्‍छा आहे. तथापि, ही निरागसता अजून बहुसंख्‍यांची झालेली नाही. त्‍यांच्‍या वागण्‍या-बोलण्‍यात, लग्‍ना‍सारख्‍या बाबींमध्‍ये, मतदानांमध्‍ये, आरक्षणाबाबत चर्चा करताना 'जात' हा घटक अपरिहार्य असतो. म्‍हणूनच कोणत्‍याही सामाजिक घटनेचे मापन करताना इतर अनेक घटकांबरोबर 'जात' हा घटक लक्षात घ्‍यावाच लागतो.


आता, इथेच पहा ना, याआधी गरीब-कष्‍टकरी, मागास समाजातून अभिजित सावंत, अभिजित कोसंबी किंवा वैशाली-कार्तिकी अशा पुढे आलेल्‍यांचे प्रमाण काय होते? कोणी म्‍हणेल, अशी टीव्‍ही चॅनेल्‍स आणि असे कार्यक्रम पूर्वी कोठे होते? बरोबर. पण संगीताचे, गायकीचे क्षेत्र यापूर्वी होतेच ना? त्‍यातील प्रस्‍थापित मंडळींची नावे तपासून पहा. त्‍यात ब्राम्‍हण समकक्ष जातींची नावे किती आणि बहुजनांतील नावे किती, ते आठवून पहा. साडेतीन-चार टक्‍क्‍यांच्‍या आसपास असलेल्‍या महाराष्‍ट्रातील ब्राम्‍हणांनी जवळपास शहाण्‍णव टक्‍के जागा व्‍यापलेल्‍या दिसतील. आजही हे प्रमाण खूप घसरलेले नाही. त्‍याला धक्‍के बसू लागले आहेत, हे मात्र खरे. ते जेव्‍हा, कोणत्‍याही आरक्षणाविना जातींच्‍या टक्‍केवारीइतकेच प्रत्‍येक क्षेत्रात दिसू लागेल, तेव्‍हाच, आपल्‍याला 'निरागस' राहणे परवडू शकेल. तोवर 'जातिग्रस्‍त' समाजातील 'जातवास्‍तवाचा' विचार अ‍ावश्‍यक असतो. जातिव्‍यवस्‍था नष्‍ट करु पाहणा-यांना तर हा विचार अपरिहार्यच आहे.


जातींना व्‍यवसाय होते, तोवर जाती टीचभर हलणेही शक्‍य नव्‍हते. जोवर चांभार चपलाच करणार, महार येसकरीच करणार, तेली तेलच काढणार, तोवर त्‍यांची ओळख त्‍यांच्‍या जातीनेच होत होती. (म्‍हणजे तो गणूतेल्‍याचा पोरगा, सोन्‍याकुंभाराचा गंग्‍या इ.) किंवा गावात आळ्यांप्रमाणे किंवा वाड्यांप्रमाणे वस्ती असेल तोवरही हे संबोधन राहणार. (उदा. मांगवाड्यातला चंदर). पुढे भांडवलशाहीने कारखाने-उद्योगांना जन्‍म दिला. त्‍यात काम करण्‍यासाठी गावातून माणसे शहरांत आली. काही कामे त्‍यांच्‍या परंपरागत व्‍यवसायांशी सबंधित राहिली (उदा. सफाई), तरी बहुसंख्‍य कामे ही जातिनिहाय व्‍यवसायांच्‍या बाहेरची होती. अनेक अस्‍पृश्‍य समाजातले लोक गिरणीत कामाला लागले. काही खाती त्‍यांना प्रारंभी वर्ज्‍य होती, तरी इतर अनेक खात्‍यांत स्‍पृश्‍य कामगारांबरोबर त्‍यांना एकत्र काम करावे लागे. त्‍या सगळ्यांची ओळख 'गिरणी कामगार' अशीच होती. ट्रामचे, रेल्‍वेचे डबे सगळ्यांना एकच होते. एका डब्‍यातले 'प्रवासी' जातीने वेगवेगळे असले तरी त्‍यांना परस्‍परांचा स्‍पर्श, सावली चाले. त्‍याला इलाजही नव्‍हता. शहरात जाती ब-याचशा निराकार दिसत, मात्र गावी गेल्‍यावर या जाती ठसठशीत होत. कारण प्रत्‍येकाच्‍या वाड्या वेगळ्या. आमच्‍या गावातला भिकू सुतार आणि माझे वडिल एकाच गिरणीत. मुंबईच्‍या आमच्‍या झोपडीत भिकू सुतार सहज चहा पीत असे. पण गावी गेल्‍यावर तो आमच्‍या घरी पाणी पीत नसेच, शिवाय त्‍याच्‍या घरी गेल्‍यावर माझ्या घरच्‍यांना वरुन पाणी देत असे.


आता पुढच्‍या पिढीत लक्षणीय बदल झाला आहे. आधीची पिढी दोन्‍हीकडे निरक्षरच होती, आताची पिढी शिक्षित आहे. कोकणातील काही गावांत तर ब्राम्‍हणांनंतर शिकलेल्‍यांचे प्रमाण हे बौद्धांमध्‍येच (म्‍हणजे पूर्वाश्रमीची महार ही अस्‍पृश्‍य जात) जास्‍त आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्‍या 'शिका, संघटित व्‍हा, संघर्ष करा' या मंत्राचा तसेच 'खेडी सोडून शहरांकडे चला' या आदेशाचा, जुना माणुसकीहीन धर्म त्‍यागून नव्‍या, उच्‍च नैतिकता व विज्ञान यांची सांगड असलेल्‍या 'बौद्ध' धर्माच्‍या स्‍वीकाराचा आणि खुद्द बाबासाहेबांच्‍या स्‍वतःच्‍या उच्‍चविद्याविभूषित प्रतिमेचा हा परिणाम आहे. जीवनबदलाची ही जबरदस्‍त प्रेरणा आणि राखीव जागा-सवलतींनी दिलेल्‍या संधी यांच्‍या संयोगाने विद्वत्‍ता, साहित्‍य, शासकीय अधिकार क्षेत्रांत (वकील, डॉक्‍टर, सनदी अधिकारी, प्राध्‍यापक, विचारवंत, लेखक, उच्‍च पोलीस अधिकारी इ.) बौद्ध समाजातील व्‍यक्‍ती लक्षणीयरीत्‍या चमकू लागल्‍या. 


प्रारंभी, बौद्धांची गती अन्‍य पूर्वाश्रमीच्‍या अस्‍पृश्‍य जाती आणि ब-याचशा ओबीसी जाती यांना साधता आली नाही, तरी आता त्‍याही जोरात मुसंडी मारु लागल्‍या आहेत. शेतिव्‍यवस्‍थेचे आणि जातनिहाय व्‍यवसायांचे कोलमडणे, भांडवली व्‍यवस्‍थेने विविधांगी व्‍यवसायांना जन्‍म देणे, शिक्षणाचा विस्‍तार होणे इ. कारणे यामागे आहेत. या जातींमध्‍ये अंतर्गत श्रेणी आजही आहेत. तथापि, प्रस्‍थापित सांस्‍कृतिक मानदंडाप्रमाणे ब्राम्‍हण समकक्ष जातींच्‍या दृष्‍टीने या सर्व जाती 'आनि-पानीवाल्‍या' आहेत. (म्‍हणजे ज्‍यांच्‍यातील बहुसंख्‍यांना पाणी किंवा आणितला 'णी' उच्‍चारता येत नाही, ते त्‍याचा 'नी' असा उच्‍चार करतात किंवा त्‍यांच्‍यातील मुली 'आले-गेले' ऐवजी 'आली-गेली' असे म्‍हणतात.) या सर्वांची ओळख सर्वसाधारणपणे 'बहुजन' अशी केली जाते.


अशा या 'बहुजनां' तल्‍या मुला-मुलींनी दूरदर्शनच्‍या वाहिन्‍यांनी संधी देताच तिकडे धाव घेतली. कोणत्‍याही कलेला, प्रतिभेला जातींचे रिंगण असतच नाही. तथापि, गाणी, नृत्‍य, वादन ही बहुजन वर्गाची जुनी परंपरा. मात्र त्‍यांची सांस्‍कृतिकदृष्‍ट्या वरच्‍या स्‍थानावर असलेल्‍या ब्राम्‍हण वर्गाने शास्‍त्रीय रचना, संहितीकरण केल्‍याने, त्‍यांतले रांगडेपण जाऊन त्‍यांत एक प्रतिष्ठित सफाईदारपणा आला. उच्‍चारांमध्‍ये प्रमाण भाषा आली. गाणी अनेक जण म्‍हणतच होते, आजही म्‍हणतात. परंतु, त्‍यांत कोणतातरी राग असतो, हे अनेकांना ठाऊक असतेच असे नाही. जे ते शिकतात, त्‍यांना ते राग कळतात. त्‍यांच्‍यात एक सफाईही त्‍यामुळे येते. आणि त्‍यामुळे त्‍यांना प्रतिष्‍ठाही मिळते. आजवर या औपचारिक शास्‍त्राचे कर्तेधर्ते मुख्‍यतः ब्राम्‍हण समकक्ष जातींतलेच लोक राहिले. तेच गुरु किंवा मार्गर्शक किंवा मान्‍यता देणारे राहिले. बहुजनांतल्‍या गाणा-यांना नुसते गाऊन चालत नाही, नुसते नाचून चालत नाही. ते गाणे, ते नृत्‍य प्रस्‍थापित निकषांवर उतरले पाहिजे. पूर्वी या निकषांच्‍या पात्रतेला उतरण्‍यासाठी बहुजनांना प्रत्‍यक्ष अथवा अप्रत्‍यक्ष प्रवेशच नाकारला जाई. आता बहुजनवर्गातील काहींचा शिक्षण, राजकीय ताकद यामुळे वरच्‍या थरांतील वावर वाढल्‍याने आणि दूरदर्शन वाहिन्‍यांच्‍या स्‍वतःच्‍या गरजेपोटी हा प्रवेश मिळू लागला आहे. त्‍यांतील स्‍पर्धक विजेतेही होऊ लागले आहेत.


वाहिन्‍यांची स्‍वतःची गरज याचा अर्थ, या वाहिन्‍या चालवणा-या भांडवलदारांचा नफा. या नृत्‍य, गाण्‍याच्‍या स्‍पर्धा जाहिरातींबरोबरच एसएमसएसवर आधारित असतात. हे एसएमएस तीन किंवा सहा रुपयांचे असतात. सामान्‍य एसएमएस मोफत किंवा तीस पैसे, पन्‍नास पैसे, एक रुपया असे असतात. हे जास्‍त दराचे जास्‍तीत जास्‍त एसएमएस मिळवणे म्‍हणजे अधिकाधिक नफा मिळवणे हा या वाहिन्‍यांच्‍या मालकांचा उद्देश असतो. प्रत्‍येक प्रेक्षक स्‍पर्धकाची जात बघून एसएमएस करतो असे नाही. तथापि, जातिग्रस्‍त समाजात अनेकांकडून जातही पाहिली जाते. ब्राम्‍हण स्‍पर्धकाला मिळणारे त्‍याच्‍या जातीचे एसएमएस आणि बहुजनांतल्‍या स्‍पर्धकाला मिळणारे एसएमएस यात संख्‍येचा विचार केला, तर बहुजनांतल्‍या स्‍पर्धकाला ते अधिक मिळण्‍याची शक्‍यता असते. ('शक्‍यता असते' असते, असे म्‍हटले आहे. याचा अर्थ, मिळतीलच असे नाही.) आता मोबाईल हे साधन कोणत्‍याही जाती-धर्माच्‍या तसेच गरिबातल्‍या गरीब माणसाला सहज उपलब्‍ध आहे. तंत्रज्ञानाने सामाजिक बदलाला कशी चालना मिळू शकते, त्‍याचे हे एक उदाहरण आहे. ब्राम्‍हणी मनोवृत्‍तीच्‍या कोणाही परीक्षकांना बहुजनांतल्‍या अशा एखाद्या स्‍पर्धकाला जाणूनबुजून वगळणे आता कठीण आहे. असे वगळले गेल्‍याचे बहुजन प्रेक्षकांना कळणे, त्‍या वाहिनीच्‍या प्रतिमेला आणि टीआरपीलाही (पर्यायाने नफ्याला) घातक असते. त्‍या वाहिनीच्‍या चालकांना (जरी ते उच्‍चवर्णीय असले तरी) ते परवडणारे नसल्‍याने ते असा प्रकार न घडण्‍याचीच दक्षता घेणार. मानवी विकासक्रमात सरंजामशाहीच्‍या पुढचा टप्‍पा असलेल्‍या भांडवली अर्थव्‍यवस्‍थेला जातींचे जुने संदर्भ सांभाळणे उपयोगाचे नसते.


वर 'ब्राम्‍हणी वृत्‍तीच्‍या परीक्षकांना' असे म्‍हटले आहे. याचा अर्थ, जे जातीच्‍या आधारावर भेदभाव करतात, असे. ('ब्राम्‍हण्‍य' व 'ब्राम्‍हण' हा फरक खुद्द बाबासाहेबांनीच केला आहे.) ब्राम्‍हण जातीचे सगळे परीक्षक असे वागतात, असे नाही. उलट आज परीक्षकांमध्‍ये ब्राम्‍हण समकक्ष जातींचे लोक अधिक प्रमाणात असतानाही त्‍यातले कित्‍येक जण बहुजनांतल्‍या प्रतिभावान मुलांचे मनापासून कौतुक करताना, त्‍यांना प्रोत्‍साहन देताना दिसतात. ते केवळ तोंडदेखले किंवा एसएमसएसच्‍या, वाहिनीच्‍या मालकांच्‍या दबावापोटी तसे वागतात, असे म्‍हणणे त्‍यांच्‍यावर अन्‍याय करण्‍यासारखे होईल. तसेच वर एके ठिकाणी सगळेच प्रेक्षक जाती बघून एसमएमस करत नाहीत, असेही म्‍हटले आहे. त्‍याचे कारण महाराष्‍ट्राला संतांची तसेच सामाजिक सुधारकांची एक मोठी परंपरा आहे. या परंपरेचे संस्‍कार आणि नवे तंत्रज्ञान व भांडवली व्‍यवस्‍थेचे, जागतिक बदलांचे गतिमान वातावरण यांचा परिणाम परीक्षक व प्रेक्षक दोहोंवरही असतोच. शिवाय काही चांगुलपणावर श्रद्धा असलेली, निरागस मने असतातच.


तथापि, तंत्रज्ञान, भांडवली व्‍यवस्‍था अशा भौतिक-आर्थिक बदलांची गती आणि मने बदलण्‍याची गती सारखी असत नाही. घरी आणलेल्‍या नव्‍या कॉम्‍प्‍युटरला हळद-कुंकू वाहून त्‍याची पूजा करणारे आढळतातच. जुने संस्‍कार हे सूर्य मावळल्‍यासारखे पटकन अदृश्‍य होत नाहीत. संधिप्रकाशासारखे ते आसमंतात बराच काळ रेंगाळत राहतात. सूर्य मावळला असल्‍याने या संध्‍याछाया अखेरीस अंधारात गुडूप होणार हे अटळ असते. मानवी जीवनात हा संधिप्रकाश लुप्‍त होणे हे अटळ असले तरी निसर्गाप्रमाणे त्‍याची वेळ ठरलेली नसते किंवा ते आपसूकही होत नसते. ही वेळ कमी जास्‍त होण्‍यात मानवी प्रयत्‍नांचा मोठा वाटा असतो. म्‍हणूनच तंत्रज्ञान व भांडवली अवस्‍थेने जातिव्‍यवस्‍थेचा आधार काढून घेतला असला तरी समाजप्रबोधन आवश्‍यक ठरते. संतांच्‍या प्रबोधन काळात गावगाडा हलण्‍याची काहीच शक्‍यता नव्‍हती, आता गावगाडा जवळपास कोलमडला आहे. अशावेळी प्रबोधनाचे जाणते, सम्‍यक प्रयत्‍न अथकपणे व्‍हायला हवेत. 


जाणते, सम्‍यक प्रयत्‍न म्‍हणजे काय, हे थोडे समजून घ्‍यायला हवे. इथे, वर एके ठिकाणी कंसात केलेला बाबासाहेबांचा ब्राम्‍हण्‍यासंबंधीचा उल्‍लेख अधिक विस्‍ताराने करतो. चवदार तळ्याच्‍या सत्‍याग्रह प्रसंगी ब्राम्‍हणेतर चळवळीतले नेते ब्राम्‍हणांना या सत्‍याग्रहात सोबत न घेण्‍याच्‍या अटीवर बाबासाहेबांना सहकार्य देण्‍यास तयार होते. बाबासाहेबांनी ही अट अमान्‍य केली. ती अमान्‍य करताना 'मी 'ब्राम्‍हण्‍या'च्‍या विरोधात असून ब्राम्‍हणांच्‍या नाही' असे म्‍हटले होते. पुढे एके ठिकाणी त्‍यांनी असे नमूद केले आहे की, 'मी ब्राम्‍हण्‍यग्रस्त ब्राम्‍हणांच्‍या, ब्राम्‍हण्‍यग्रस्‍त ब्राम्‍हणेतरांच्‍या आणि ब्राम्‍हण्‍यग्रस्‍त बहिष्‍कृतांच्‍या(म्‍हणजे दलितांच्‍या)ही विरोधात आहे.' 'ब्राम्‍हण्‍य' याचा अर्थ भेदभाव, विषमता जोपासणारी वृत्‍ती. ही वृत्‍ती कोणी विशिष्‍ट जातीत जन्‍माला आला आहे, म्‍हणून त्‍याच्‍यात असते आणि कोणी त्‍या जातीत जन्‍माला आला नाही, म्‍हणून त्‍याच्‍यात नसते, असे नाही. वृत्‍तीची जन्‍मजातता बाबासाहेबांनी नाकारली आहे. ब्राम्‍हण जातीत जन्‍माला आलेला तो प्रतिगामी आणि दलितांत जन्‍माला आलेला तो जन्‍मजात पुरोगामी, हे बाबासाहेबांच्‍या विचारसरणीत बसत नाही. (माझी आई मांगाकडे जेवू नको, असे आवर्जून मला बजावायची. आज बौद्ध मातंगांशी सहज सोयरिक करताना दिसत नाहीत. चांभार तर दलितांत स्‍वतःला उच्‍च समजतात. ब्राम्‍हण-बौद्ध लग्‍न त्‍या मानाने सहज होईल. पण चांभार-बौद्ध लग्‍न बरीच कठीण गोष्‍ट असते.) एकदा जात जन्‍माने येते, म्‍हणून वृत्‍तीही जन्‍मजात मानली की जाती नष्‍ट होण्‍याची शक्‍यताच संपुष्‍टात येते. मग जातिनिर्मूलनाच्‍या किंवा समतेच्‍या आंदोलनाला काही अर्थच उरत नाही.


संस्‍कार संधिप्रकाशासारखे रेंगाळत राहतात, ते सामान्‍यांच्‍या मनात. पण काहीजण त्‍यांचा आपल्‍या संकुचित स्‍वार्थासाठी वापर करतात. एकदा गवळी वाडीत वरुन पाणी देण्‍यावरुन आम्‍ही बौद्धवाडीतल्‍या तरुणांनी मुद्दाम पाणी मागून झगडा केला. पोलिसांत गेलो, वगैरे. त्‍यावेळी आमच्‍या वाडीतल्‍या एका म्‍हाता-याचे आणि गवळी वाडीतल्‍या एका म्‍हाता-याचे उद्गार मला अजून आठवतात. आमच्‍या बौद्धवाडीतल्‍या अनेक म्‍हाता-यांना आमचे हे झगडा करणे मंजूर नव्‍हते. गावातली शांतता आम्‍ही बिघडवतो, असे त्‍यांना वाटे. 'आपण आता बौद्ध झालो आहोत. पण तुम्‍हाला स्‍वाभिमान नाही. तुम्‍ही वरुन पाणी पिता म्‍हणून हे सवर्ण सोकावलेत' असे आम्‍ही त्‍यांना ऐकवत असू. त्‍यावर एक म्‍हातारा म्‍हणाला, 'अरे आपण आता बौद्ध आहोत. पण पूर्वीचे महारच ना! वरुन पाणी प्‍यायची रीतच आहे. ती लगेच कशी जाईल?' तर जिथे आम्‍ही झगडा केला, त्‍या गवळी वाडीतला एक म्‍हातारा म्‍हणाला, 'पोरांनो, आमच्‍याने हे वरुन पाणी देणे बंद होणार नाही. आम्‍ही त्‍याच रीतीत वाढलो. पण आमची पोरे बदलतील.'


तेव्‍हा आम्‍ही सगळे 'अँग्री यंग मॅन' होतो. कोकणात सवर्ण-दलित भेद असला तरी उर्वरित महाराष्‍ट्रासारखी येथील सवर्णांच्‍यात मुजोरी नाही. दलित वस्‍तीवर हल्‍ला, अत्‍याचार वगैरे प्रकार नाहीत. आमच्‍या गावात तर शिक्षण, नोकरी यात सवर्णांपेक्षा आम्‍ही बौद्धच पुढारलेले. मागासवर्गीय म्‍हणून वीज आणि रस्‍ता या सुविधा इतर अनेक वाड्या आमच्‍यापेक्षा मागास असतानाही नियमाप्रमाणे आमच्‍या वाडीत आधी आल्‍या. सामंजस्‍याने गावविकासाच्‍या व्‍यापक आंदोलनातूनच इथला समतेचा लढा पुढे जाऊ शकतो, हे आम्‍हाला तेव्‍हा कळत नव्‍हते.


उदाहरण जरा लांबले. तेव्‍हा मुद्दा हा की, वरील दोन्‍ही म्‍हाता-यांच्‍या मनात संस्‍कारांचा संधिप्रकाश रेंगाळत होता. त्‍यांच्‍या पुढची पिढी बदलणार होती. ती बदलते आहे. हे सगळे सामान्‍य लोक. त्‍यांच्‍याशी व्‍यवहार सरळ आहे. पण जे आपल्‍या स्‍वार्थासाठी जाणीवपूर्वक सामान्‍यांच्‍या मनातील या भावनेचा वापर करतात, त्‍यांच्‍याशी सामना कठीण आहे. मतांच्‍या दृष्‍टीने जात, धर्माचा वापर करणारे अधिक धोकेदायक असतात. ते सगळ्या जाति-धर्मांत असतात. अख्‍खे दलित नव्‍हे, तर केवळ बौद्ध आपल्‍या बाजूनेच राहावेत यासाठी हिंदू देवदेवतांचा अनावश्‍यक शिव्‍याशाप देऊन उद्धार करणारे, एखाद्या अत्‍याचारावर प्रतिक्रिया देताना 'होऊन जाऊ दे यादवी,' असे बेजबाबदार विधान करणारे बौद्ध नेते व विद्वान अनेक आहेत. सर्वसामान्‍य बौद्धांमध्‍ये आपली मान्‍यता टिकवण्‍याचा भावनिक आवाहने हा राजमार्ग असतो. त्‍यासाठी फारसे कष्‍ट पडत नाहीत. मंदिर, मराठी माणूस, जिहाद...हे असेच वास्‍तवातील ख-या-खोट्याला चलाखीने आपल्‍या शिडात भरण्‍याचे प्रकार आहेत.


'सम्‍यक' याचा अर्थ, आपल्‍या चळवळीचे अंतिम उद्दिष्‍ट व्‍यापक आहे, याची स्‍पष्‍टता असणे. बुद्धाचे 'सब्‍बे सत्‍ता सुखि होन्‍तु'(सर्व प्राणिमात्र सुखि होवोत), प्राचीन भारतीय परंपरेतील 'सर्वेपि सुखिन सन्‍तु' किंवा ज्ञानेश्‍वरांचे 'भूतां परस्‍परे जडो मैत्र जिवाचे' हे पसायदान ही व्‍यापक वैश्विक कल्‍याणाची स्‍वप्‍ने होती. या व्‍यापक ध्‍येयाच्‍या पूर्ततेसाठीच आपले छोटे छोटे झगडे असावे लागतात. एक अलिकडचे उदाहरण देतो. ओबामांच्‍या अध्‍यक्षपदाच्‍या शपथविधीनंतर दुस-याच दिवशी मार्टिन ल्‍यूथर किंगच्‍या मुलाने एक लेख लिहिला. आपले वडिल सारखे तुरुंगात जातात, यावरुन शाळेत या मुलाला इतर मुले चिडवत. म्‍हणून तो आईला एकदा त्‍याचे कारण विचारतो. आईने दिलेले उत्‍तर मोठे मार्मिक आणि उन्‍नत करणारे आहे. ती म्‍हणते- 'तुझे वडिल जग सुंदर करण्‍यासाठी तुरुंगात जातात.' 


काळ्यांना न्‍याय मिळावा, समानतेचा अधिकार मिळावा यासाठी लढणा-या मार्टिन ल्‍यूथर किंग यांचे स्‍वप्‍न केवळ काळ्यांच्‍या न्‍यायापुरते सीमित नाही. हा न्‍याय मिळवायचा आहे तो अखेर 'जग सुंदर करण्‍यासाठी' हे त्‍यांच्‍या मनात स्‍पष्‍ट होते. नेल्‍सन मंडेला 27 वर्षांच्‍या कारावासातून सुटल्‍यानंतर नव्‍या राज्‍यव्‍यवस्‍थेचे सूतोवाच करताना आपल्‍या काही कट्टर कार्यकर्त्यांना त्‍यांनी एक गोष्‍ट निक्षून सांगितल्‍याचे मी त्‍यावेळी वाचले होते. ते म्‍हणाले होते, 'आता गो-यांचे राज्‍य जाऊन काळ्यांचे येणार नाही. आता राज्‍य येणार ते दक्षिण आफ्रिकेतल्‍या जनतेचे.' ही जनता काळी-गोरी दोन्‍ही होती. पुढे राज्‍यकारभार सुरु झाल्‍यावर जुन्‍या गो-या राजवटीतला गृहमंत्री नव्‍या राजवटीतही कोणीतरी मंत्री किंवा अधिकारपदावर होता. या गृहमंत्र्याच्‍या आदेशाखातर अनेक काळे युवक आंदोलनात मारले गेले होते. अनेक काळ्यांना या गृहमंत्र्याबद्दल राग असणे स्‍वाभाविक होते. यावर उपाय म्‍हणून मंडेलांनी या गो-या गृहमंत्र्याला सांगितले, 'ज्‍या आयांची मुले तू मारलीस, त्‍या आयांचे पाय धुवून त्‍यांची माफी माग'. हा उपाय या गृहमंत्र्याने कचरत कचरत पण अखेर पार पाडला. हे सर्व दृश्‍य व मुलाखती दूरदर्शनच्‍या 'हिस्‍ट्री' चॅनेलवर मध्‍यंतरी दाखवल्‍या गेल्‍या. ते वातावरण सद्गदित करणारे होते. तो गृहमंत्री म्‍हणतो, 'प्रथम त्‍या आया कठोर होत्‍या. पण पाय धुतल्‍यानंतर त्‍याही रडल्‍या व मीही रडलो'. 


काळ्या-गो-यांतील जुनाट विद्वेष धुवून टाकण्‍याचे (परमनंटली डिलीट करण्‍याचे) सामर्थ्‍य केवळ अशा अश्रूंतच असू शकते. दूरदर्शनच्‍या त्‍या मुलाखतीत काळा-गोरा द्वेष समूळ नष्‍ट करण्‍याचा हा उपाय सुचवणा-या मंडेलांचे थोर द्रष्‍टेपण तो गोरा मंत्री पुन्‍हा पुन्‍हा भरल्‍या गळ्याने सांगत होता. गो-यांचे वर्चस्‍व नष्‍ट करण्‍याचा मार्ग काळ्यांचे वर्चस्‍व असू शकत नाही. समानता व द्वेषाच्‍या शृंखलेला पश्‍चातापाने, क्षमेने, प्रेमाने विराम देणे हाच असू शकतो. ओबामा हा काळा माणूस अध्‍यक्ष झाल्‍याबद्दल मार्टिन ल्‍यूथर किंगच्‍या मुलाने 'अमेरिकनां'बद्दल अभिमान व्‍यक्‍त केला आहे. ओबामाला मते देणा-या फक्‍त काळ्या किंवा समतावादी गो-यांबद्दल नव्‍हे. ओबामाने आपली काळी मूळे जपत, समानतेच्‍या, न्‍यायाच्‍या लढ्याच्‍या परंपरेचे स्‍मरण ठेवत या व्‍यापक 'अमेरिका'पणाला आवाहन केले. त्‍याच्‍या यशाचे एक महत्‍वाचे गमक ते आहे. भारतातील 'ओबामा' घडवताना जातींची संधिसाधू बेरीज नव्हे, तर व्‍यापक 'भारतीय' अवकाश कवेत घेण्‍याचे सामर्थ्‍य कमवावे लागेल. जाता जाता, 'मी प्रथम व अंतिमतः भारतीय आहे' हे बाबासाहेबांचे उद्गारही लक्षात ठेवूया.


आता मग आपण काय करायचे, पुरोगामी चळवळींनी काय करायचे आणि सम्राटने काय करायचे, हे जरा अधिक स्‍पष्‍ट होईल. सम्राटने दिल खोल के पहिल्‍या पानावर 'कार्तिकीदेवींचा विजय असो!' अशा मोठ्या हेडिंगची बातमी देऊन स्‍वागतपर अग्रलेख लिहायला हवा होता. अग्रलेखाचे शीर्षक हवे होते, 'आता कलेच्‍या प्रस्‍थापित मक्‍तेदारीवर अखेरचे घाव पडत आहेत'. आणि हो, त्‍या अग्रलेखात प्रथमेश लघाटे, आर्या आंबेकर, मुग्धा वैशंपायन आणि रोहित राऊत या महाराष्‍ट्राला वेड लावणा-या निरागस निर्झरांचे भरभरून कौतुक हवे होते'. असे करणे काही वेगळे, वहिवाटीला सोडून असे अजिबात नाही. हे म्‍हणजे, 'सम्राट' जे आराध्‍य पूजतो त्‍या बुद्धाच्‍या 'सब्‍बे सत्‍ता सुखि होन्‍तु' आणि ब्राम्‍हण्‍याची खरी व्‍याख्‍या करणा-या बाबासाहेबांच्‍या पावलांवर मार्गक्रमणा करणेच आहे.


प्रगतीशील चळवळींवर, विशेषतः प्रस्‍थापिताला पर्याय उभे करु पाहणा-या सांस्कृतिक चळवळींवर आणखी काही जबाबदारी येते. बहुजनांतली मुले आता आपल्‍या प्रतिभेने चमकणे हे वाढतच राहणार आहे. काळ त्‍यांना पोषकच आहे. पण ही मुले प्रस्‍थापितांच्‍या निकषांचीच वाट चोखाळणार हे ही स्‍वाभाविक आहे. 


अभिजित सावंत आमच्‍या कोकणातला बौद्ध. (मी कोकणातला आहे म्‍हणूनही असेल, पण कोकणातले लोक बाबासाहेबांचे अधिक कट्टर अनुयायी असतात, असे अनेक कोकणी बौद्ध म्‍हणतात, म्‍हणून 'कोकणातला' हा संदर्भ दिला. धर्मांतर झाल्‍या झाल्‍या आमच्‍या आईने महारपणाचे निदर्शक असलेल्‍या कोपरापर्यंतच्‍या चांदीच्‍या वाख्‍या वापरणे सोडले. माझ्या अनेक नातेवाईक स्त्रियांनी गुडघ्‍यापर्यंतचे लुगडे पूर्ण नेसायला सुरुवात केली. मोठ्याचे (बैल किंवा गाईचे) मांस खाणे सोडून दिले. हिंदू देवदेवतांचे फोटो घरांतून काढून टाकले आणि त्‍या जागी बाबासाहेब आणि बुद्धाच्‍या आणि महात्‍मा फुलेंच्‍या प्रतिमा लावल्‍या. असो.) अभिजित सावंतने इंडियन आयडॉल झाल्‍यावर मी कसा गणपतीचा भक्‍त आहे, वगैरे सांगितले. गणपतीच्‍या फोटोला हात जोडतानाही त्‍याला दाखवले गेले. त्‍याने कोठेही बाबासाहेब, बुद्ध यांविषयी आपल्‍या आयुष्‍याला वळण लावणारे म्‍हणून कृतज्ञता व्यक्त केल्‍याचे दिसले नाही. मग त्‍याच्‍या बौद्ध असण्‍याचा आम्‍हाला 'अभिमान' का वाटावा, असा माझ्या काही कोकणी बौद्ध मित्रांना प्रश्‍न पडला होता. 


मला वाटते, आपण हे टप्‍प्‍या-टप्‍प्‍याने समजून घ्‍यायला हवे. अभिजित सावंतचे गायकीचे कौशल्‍य वादातीत आहे. 'इंडियन आयडॉल' हा किताब त्‍याने रिझर्वेशन वा सवलतीच्‍या आधारे मिळवला, असेही कोणी म्‍हणू शकत नाही. याबद्दल रास्‍त अभिमान असलाच पाहिजे. तो नव्‍या पिढीतला आहे. या पिढीला अस्‍पृश्‍यतेचा अनुभव नाही, तसाच चळवळींचाही अनुभव नाही. त्‍याच्‍या आधीच्‍या पिढीने आपली प्रगतीशील पंरपरा जाणीवपूर्वक त्‍याच्‍यात मुरवायचा प्रयत्‍न करायला हवा होता. त्‍यात काहीतरी उणे राहिले असावे. मुख्‍य म्‍हणजे सम्‍यक विचार प्रसारणारी आंबेडकरी चळवळ आज बाहेर आहे, असे दिसत नाही. अभिमानाच्‍या गगनभेरींऐवजी अभिनिवेशाचा कर्कश्‍य कल्‍लोळ करण्‍यात ही चळवळ आज मग्‍न आहे. (याला अपवाद आहेत, पण ते किरकोळ. तो प्रवाह झालेला नाही.) अभिजित सावंत अभिमानाने आपण बौद्ध असल्‍याचे सांगत नसेल, तर त्‍यास त्‍याच्‍या कमजोरीपेक्षा आधीच्‍या पिढीचे अकर्तृत्‍व आणि आंबेडकरी चळवळीची अभिनिवेशी दिशाहीनता अधिक जबाबदार आहे. 


ही मुले जी गाणी गातात, त्‍या गाण्‍यांचे विषय, त्‍यांची रचना या आजच्‍या मान्‍यताप्राप्‍त रीतीच्‍याच असणार. विद्रोही परंपरेतील गाणी, रचनांचे या मुलांनी वाहक व्‍हायचे असल्‍यास त्‍यांचे तसे शिक्षण करावे लागेल. ती जबाबदारी आपली, पर्यायी प्रवाहाची मांडणी करणा-या किंवा आपला प्रवाह हाच मुख्‍य प्रवाह असल्‍याचा दावा करणा-या सांस्कृतिक चळवळींनी अशा कार्यशाळा घेऊन ही मुले तयार करण्‍याचे काम करायला हवे. मुले संस्‍कारक्षम असतात. त्‍यांच्‍यावर हे संस्‍कार करणे कठीण नाही. चळवळींकडे तशी दृष्‍टी, योजना, अवधान व सातत्‍य मात्र लागेल.


काहींना असेही वाटते, एसएमएसने निवड किंवा अशी स्‍पर्धा असणे हा बाजारुपणा आहे. काही सर्जक स्‍पर्धांचा अपवाद करता, हे मत योग्‍यही आहे. पण त्‍यापासून फटकून राहण्‍याऐवजी ज्‍या बाजारात आपल्‍याला आजवर प्रवेशच नव्‍हता, तो प्रवेशाचा अधिकार तिथे प्रस्‍थापित करणे, आपल्‍या अस्तित्‍वाची दखल घ्‍यायला लावणे, हे चळवळीचे एक पुढचेच पाऊल आहे. ते टाकत असताना दुसरीकडे असा बाजारुपणा नसलेले, निर्मळ सांस्‍कृतिक संचित उभे करायला आपला कोणीच हात धरलेला नाही. उलट या संचिताचे लेणे ल्‍यायलेली मुले या बाजारात उतरली, तर इतरांना ती दीपस्‍तंभासारखी दिशादिग्‍दर्शक ठरतील. त्‍यांचे प्रमाण वाढले, तर बहुधा 'प्रस्‍थापिता'चीच पुनर्मांडणी होईल. त्‍यातूनच 'मुख्‍य प्रवाह' प्रशस्‍त होईल.


आपले तिथे धडच नव्‍हते, ते 'धड' तिथे आता दिसते आहे. या धडावर आज आपले 'डोके' नाही. ते आपल्‍या मूल्‍यांचे वाहक असलेले डोके कार्यशाळा, शिबिरांनी तयार करुन त्‍या धडावर बसवूया. त्‍याचवेळी हीही खबरदारी घेऊया की, हे डोके संकुचित विशिष्‍ट गटाच्‍या न्‍यायाचाचे रुदन करणारे नसेल; तर त्‍यात 'जग सुंदर करु' पाहणारे 'सम्‍यक' स्‍वप्‍न भरारी घेत असेल.


- सुरेश सावंत


१२ फेब्रुवारी २००९


संपर्कः 9892865937, sureshsawant8@hotmail.com

No comments: