खैरलांजीच्या निकालापाठोपाठ रमाबाई कॉलनीतील गोळीबाराच्या खटल्याचा निकालही आश्वासक लागला. आंबेडकरी समुदायाच्या आपल्याला न्याय मिळत नाही, या वेदनेवर ही एक फुंकर होती.
रमाबाई कॉलनीत 11 जुलै 97 रोजी पोलिसांच्या गोळीबारात 10 माणसे हकनाक मेली. राजावाडी हॉस्पिटलमधील एका खोलीत ठेवलेली ती प्रेते आताही माझ्या डोळ्यासमोर आहेत. त्यात पुरुष, स्त्रिया आणि मुलेही होती. ते दृश्य विलक्षण अस्वस्थ करणारे होते. त्या निष्पाप जीवांच्या घरच्यांचा टाहो, आंबेडकरी चळवळीची विकलता आणि प्रगतीलशील चळवळींची विफलता यांचा संकलित परिणाम ही अस्वस्थता गडद करत होता. एका असहाय्यतेच्या भयानक, खोल दरीत आपण कोसळत आहोत, अशी मनःस्थिती झाली होती. पुढे 10 वर्षांनी 29 सप्टेंबर 2006 सालच्या खैरलांजीच्या निर्घृण हत्याकांडाचा अंगावर काटा आणणारा वृत्तांत कळल्यावरही हीच अवस्था मी अनुभवली. सगळ्या प्रसारमाध्यमांत बराच काळ गाजल्यामुळे या दोन घटना आपल्या सगळ्यांच्या ठळकपणे लक्षात आहेत. गवई बंधूंचे डोळे काढणे, पोचीराम कांबळेला जिवंत जाळणे याही घटना अशाच गाजलेल्या. पण खूप वर्षांपूर्वीच्या. अशी प्रसिद्धी न मिळणा-या दलित अत्याचाराच्या घटना आजही घडत आहेत. त्यांचे वर्णन ऐकले की तीच असहाय्यतेची भावना मन व्यापते.
ज्याने गोळीबार केला त्या मनोहर कदम या पोलीस अधिका-याला जन्मठेपेची शिक्षा न्यायालयाने ठोठावली. तब्बल 12 वर्षांनी. अगदी अलिकडेपर्यंत आरोपी मनोहर कदम पोलीस सेवेत होते. ज्यावेळी गोळीबार झाला तेव्हा, भाजप-सेनेचे युतीचे सरकार होते. गृहमंत्री असलेल्या गोपिनाथ मुंडेंनी मनोहर कदम यांच्या कृतीचे त्यावेळी जोरदार समर्थनच केले होते. त्यानंतर आलेल्या कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सरकारने मनोहर कदमना सेवेत कायम ठेवले. एवढेच नव्हे, तर बढतीही दिली. सत्तेच्या जवळ आणि विरोधात असलेल्या काही आंबेडकरी नेत्यांना रमाबाई कॉलनीतील जनतेने हत्याकांडानंतर आपल्या वस्तीतून धक्के मारुन हाकलले होते, तर उरलेले नेते जनतेच्या या उद्रेकाला घाबरुन तिकडे फिरकलेच नाहीत. पुढे हे नेते मधून मधून हा प्रश्न उच्चारत राहिले. पण कोणीही ठोसपणे त्याचा पाठपुरावा केला नाही. त्यांचे सत्ताकारणाचे नित्यकर्म कोठेच खोळंबले नाही. या नेत्यांना हाकलणारी जनताही पुढे नाराजीने, नाईलाजाने का होईना, पण याच नेत्यांच्या कळपात कोठे ना कोठे सामील होत राहिली. संघराज रुपवते, श्याम गायकवाड यांसारख्या काही मोजक्या मंडळींनी रमाबाईच्या खटल्याचा नियमित पाठपुरावा केला, त्यामुळेच खरे तर हा आश्वासक निकाल लागू शकला.
ज्याने गोळीबार केला त्या मनोहर कदम या पोलीस अधिका-याला जन्मठेपेची शिक्षा न्यायालयाने ठोठावली. तब्बल 12 वर्षांनी. अगदी अलिकडेपर्यंत आरोपी मनोहर कदम पोलीस सेवेत होते. ज्यावेळी गोळीबार झाला तेव्हा, भाजप-सेनेचे युतीचे सरकार होते. गृहमंत्री असलेल्या गोपिनाथ मुंडेंनी मनोहर कदम यांच्या कृतीचे त्यावेळी जोरदार समर्थनच केले होते. त्यानंतर आलेल्या कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सरकारने मनोहर कदमना सेवेत कायम ठेवले. एवढेच नव्हे, तर बढतीही दिली. सत्तेच्या जवळ आणि विरोधात असलेल्या काही आंबेडकरी नेत्यांना रमाबाई कॉलनीतील जनतेने हत्याकांडानंतर आपल्या वस्तीतून धक्के मारुन हाकलले होते, तर उरलेले नेते जनतेच्या या उद्रेकाला घाबरुन तिकडे फिरकलेच नाहीत. पुढे हे नेते मधून मधून हा प्रश्न उच्चारत राहिले. पण कोणीही ठोसपणे त्याचा पाठपुरावा केला नाही. त्यांचे सत्ताकारणाचे नित्यकर्म कोठेच खोळंबले नाही. या नेत्यांना हाकलणारी जनताही पुढे नाराजीने, नाईलाजाने का होईना, पण याच नेत्यांच्या कळपात कोठे ना कोठे सामील होत राहिली. संघराज रुपवते, श्याम गायकवाड यांसारख्या काही मोजक्या मंडळींनी रमाबाईच्या खटल्याचा नियमित पाठपुरावा केला, त्यामुळेच खरे तर हा आश्वासक निकाल लागू शकला.
आज निकालानंतरही माझी अस्वस्थता कायम आहे. एक शल्य आत डाचत राहते आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पार्टीच्या संकल्पनेविषयी एक खुले पत्र त्यांच्या अखेरच्या काळात लिहायला सुरुवात केली होती. त्यांच्या महापरिनिर्वाणामुळे त्या पत्रात ते समग्र मांडणी करु शकले नाहीत. लोकशाहीच्या रक्षणासाठी सत्ताधारी पक्षावर अंकुश ठेवण्यासाठी प्रबळ विरोधी पक्षाची नितांत आवश्यकता असते, या धारणेतून रिपब्लिकन पक्षाची जुळवाजुळव करण्याचा त्यांचा मानस होता. हा पक्ष अर्थातच एकजातीय नव्हता, तो सर्वसमावेशक असाच असणार होता. एस.एम. जोशी, लोहिया आदिंशी तशी त्यांनी बोलणीही सुरु केली होती. बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले आणि ही बोलणीही तिथेच थांबली. पुढे बाबासाहेबांच्या अनुयायांनी रिपब्लिकन पक्ष स्थापन केला. स्थापनेनंतर लगेचच त्याच्या चिरफळ्या झाल्या. आंबेडकरी चळवळीच्या पुढच्या दुरुस्त, नादुरुस्त रिपब्लिकन पक्ष, पँथर, मास मुव्हमेंट, ऐक्याच्या प्रयोगांनंतरचा पुनरुज्जीवित रिपब्लिकन पक्ष या सर्व संघटनात्मक आकृतिबंधांचे ‘चिरफळ्या’ हे व्यवच्छेदक लक्षण बनले. बाबासाहेबांची मूळ सर्वसमावेशक संकल्पना कधीच हवेत उडून गेली. या सर्व संघटनात्मक रुपांचे म्होरके हे बौद्धच राहिलेत. सवर्ण सोडाच, भटक्या, आदिवासी, अगदी दलितांतल्याही इतर जातींचे कोणी नेतृत्वात स्वीकारले गेले नाही. हे आपणा सर्वांना ठाऊक आहेच.
वर उल्लेख केलेल्या खुल्या पत्रात ‘संसदीय लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी आवश्यक गोष्टी’ सांगताना 7 वी गोष्ट नोंदवली आहे- विवेकी लोकमत. या मुद्द्याच्या विवेचनात बाबासाहेब म्हणतात,
‘अन्याय कोणावरही होत असो, अन्याय दिसला रे दिसला की, जागृत होऊन उठणारी शक्ती म्हणजे समष्टीची सद्सद्विवेक बुद्धी। सार्वजनिक विवेक बुद्धी याचा अर्थच असा की, जिच्या प्रादुर्भावामुळे समाजातील प्रत्येक माणूस, मग तो अन्यायाचा बळी असो अथवा नसो, अन्यायाच्या परिमार्जनार्थ पीडितांना साथ द्यायला उभा राहतो।’
हे लिहून आज अर्धे शतक लोटले आहे. लोकशाही ब-यापैकी स्थिरावली आहे. तिच्या कौतुकाच्या खाती अनेक गोष्टी जमा आहेत. तथापि, सामाजिक अत्याचाराबाबत, हत्याकांडावेळी संवेदना व्यक्त करताना निखळ, निरपेक्ष असतेच असे नाही. अत्याचारितांची जात, धर्म कळला की, एक अदृश्य पट्टा आपल्या संवेदनांच्या प्रकटीकरणाभोवती आवळला जातो. कळत किंवा नकळत. त्या समाजघटकांच्या उद्रेकांबद्दल, आंदोलनांबद्दल तर हे विशेषच होते. शिवसेनेची किंवा मनसेची तोडफोड आणि मुस्लिम किंवा आंबेडकरी समुदायाची तोडफोड यांत सर्वसामान्य सवर्ण माणूस एकच प्रतिक्रिया देत नाही. शिवसेनेची-मनसेची ‘तोडफोड’ ही गैर गोष्ट आहे, हे तो बोलतो. पण मुस्लिम आणि दलित यांच्या उद्रेकांविषयी तो आणखी पुढे बोलतो....‘ही जात किंवा हा धर्म असाच’. याचा अर्थ, व्यवहारात हा प्रत्येक सवर्ण दलितांच्या किंवा मुस्लिमांच्या विरोधातच उभा राहील किंवा त्यांना माणूस म्हणून मदत करणार नाही, असे नाही. त्याच्या मनावरील विकृत संस्कारांची जळमटे त्याच्या नकळतही अनेकदा बोलत असतात. पण ही जळमटेच अत्याचारितांच्या भोवती संरक्षणाचा कोट उभा राहण्यास अडथळा ठरतातही जळमटे झटकून बाबासाहेबांना अभिप्रेत ‘सार्वजनिक विवेक’ जागृत करण्याचे, त्यायोगे लोकशाही पूर्णतः यशस्वी करण्याचे प्रयास होताना ठळकपणे दिसत नाही. म्हणजे तशी चळवळ दिसत नाही. जे शल्य मला डाचते आहे, अस्वस्थ करते आहे ते हे.
मनोहर कदमना जन्मठेपेची शिक्षा झाली आणि दोन विभागांतून दोन प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. दलित विभागातून आनंद प्रकट करुन प्रतिक्रिया आली- ‘जातियवादी नराधमाला अखेर शिक्षा झाली’. सवर्णांतून औपचारिक प्रतिक्रिया सावधपणे, पण खाजगीत ‘कदम हा व्यवस्थेचा बळी, किंवा बळीचा बकरा झाला’ असे बोलले जाऊ लागले. ‘बळीचा बकरा’ म्हणणा-यांमध्ये या खटल्याचे तपशील, त्या घटनेची तीव्रता माहीत नसलेले-विसरलेलेही अनेक जण होते. जे दलितांच्या अजिबात विरोधात नाहीत किंबहुना बाजूचेही आहेत.
या दोन्ही प्रतिक्रियांचा मला त्रास झाला. जबाबदार व वस्तुनिष्ठ प्रतिक्रिया का असू नयेत ? ...हा तसा भाबडा प्रश्न आहे, हे मला कळते. पण अशा प्रतिक्रियांचा दिवस लवकर यावा, ही माझी मनोमन इच्छा (श्रद्धा म्हणा हवे तर) आहे.
भाजप-सेनेच्या सरकारचा वरदहस्त, मनोहर कदम यांचे मराठा असणे या बाबी त्यांना दलितांच्या विषयी आकस असेल, असे गृहीत धरायला पूरक आहेत. पण हे मनाचा फोटो काढण्यासारखे झाले. प्रत्यक्षात मनोहर कदम यांच्या मनात असे काहीही नसणे, केवळ एका प्रक्षुब्ध जमावाला रोखताना घेतलेला चुकीचा निर्णय असेही असू शकेल. या गोळीबारानंतर कदमांना जे दोन्ही सरकारांनी संरक्षण दिले, त्याबद्दल मात्र त्यांचे ‘मराठा’ असणे उपयुक्त ठरले, असे म्हणण्यास पुष्कळ आधार आहे.
टँकर जाळायला जमाव येत होता, म्हणून गोळीबार करावा लागला, ही कथा न्यायालयाने खोटी ठरवली. आधी अश्रुधूर, मेगॅफोनवरुन आवाहन आणि मग गोळीबार, तोही कमरेच्या खाली यांपैकी काहीही न करता कदमांनी सैरावैरा गोळीबार करण्याचा आदेश दिला. अशारीतीने कायद्याच्या रक्षणकर्त्यानेच कायदा हातात घेतल्याने ही जन्मठेपेची सजा सुनावली गेल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. हा निकाल देणारे न्यायाधीश कुलकर्णी हे ब्राम्हण व मदतकारक ठरलेली साक्ष देणारे मोरे हे मराठा पोलीस अधिकारी होते.
आंबेडकरी समुदायात पुन्हा चीड निर्माण व्हावी, अशा घटना पुढे घडू लागल्या. पोलीस महासंचालक श्री. विर्क, दंगलींना अटकाव करण्यासाठी मोहल्ला कमिट्यांचा भिवंडीत यशस्वी प्रयोग करणारे ज्येष्ठ पोलीस अधिकारी श्री. खोपडे यांसारख्या काही अधिका-यांनी मनोहर कदम हे ‘व्यवस्थेचे बळी’ आहेत, असे जाहीरपणे म्हटले. असे समजू की त्यांना तत्कालीन काही आतल्या गोष्टी माहीत असतील. त्यांच्या दृष्टीने कदम हे निरपराध असतील. पण कायदेशीर प्रक्रियेत ते त्यांना सहाय्य करु शकले असते. जाहीरपणे अशी प्रतिक्रिया देण्यातून (तेही सरकारचे अधिकारी म्हणून घटक असताना) आंबेडकरी समुदायाच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखेच झाले. हे मुद्दाम की अभावितपणे ? ...पुन्हा तोच मनाचा फोटो !
मनोहर कदमांना वरच्या न्यायालयाने-उच्च न्यायालयाने जामीन दिला. एवढेच नाही, तर त्यांनी न मागताही त्यांची शिक्षा तहकूब करायचा आदेश दिला. ‘केवळ स्वरक्षणाचा अधिकारच नव्हे, तर राज्य राखीव पोलीस दलाच्या कायद्यातील कलम 11 प्रमाणे ज्यावेळी जीविताला धोका असेल किंवा सरकारी अथवा खाजगी मालमत्तेचे नुकसान होण्याचा संभव असेल, अशावेळी पोलीस बळाचा वापर करु शकतात, जरी त्यामुळे काही मृत्यू होण्याची शक्यता असली तरी.’....असेही उच्च न्यायालयाने जामीन देताना नोंदवले आहे. कदमांच्या वकिलांनी निदर्शनास आणून दिलेल्या आणखी काही कलमांचा आधार कबूल करुन कदमांना उच्च न्यायालयात आपली बाजू लढविण्याला मजबूत पाया आहे, असेही उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
...मनोहर कदमांच्या ‘जन्मठेपेचे’ पुढे काय होणार, हे आता अनिश्चित झाले आहे, हे निश्चित. मात्र याचे खरे-खोटे राजकारण करणे हे पुढेही चालू राहणार.
या सगळ्यात एक मुद्दा अजिबात ऐरणीवर येत नाही. ज्यामुळे लोक प्रक्षोभित होऊन रस्त्यावर उतरले ती घटना विस्मरणात गेली आहे. बाबासाहेबांच्या पुतळ्याला चपलांचा हार घालून विटंबना करणारा कोण होता, हा प्रश्न आज अनुत्तरीतच आहे. विटंबना करणारा न सापडल्याने पोलिसांनी ती केस फाईल केली आहे. समाजात तेढ निर्माण व्हावी म्हणून जाणीवपूर्वक अशा घटना घडवणारे नेहमीप्रमाणे इथेही नामानिराळे राहण्यात यशस्वी ठरले. ‘ती कीड नष्ट करण्याचे प्रयत्न’ हे चळवळीचे मुख्य ध्येय या गदारोळात कुठच्या कुठे उडून गेले आहे. ही बाब मला अस्वस्थ करते आहे.
आंबेडकरी चळवळ कर्मवीर दादासाहेब गायकवाडांच्या भूमिहीनांच्या आंदोलनाचा व दलित पँथरच्या जाहीरनाम्याचा अपवाद वगळता कायम प्रतिक्रियात्मक आंदोलन करत राहिली. उसंत घेऊन लांब पल्ल्याची विचारपूर्वक बांधणी व कार्यक्रम तिला अंगिकारताच आला नाही. बाबासाहेबांच्या विचार व प्रतिमेचा तेजस्वी दीपस्तंभ समोर असतानाही हे झाले नाही. आंबेडकरी नेत्यांचा व्यक्तिवादी व्यवहार, अहंता, द्रष्टेपणाचा अभाव, संकुचित सत्ताकांक्षा यांच्या वावटळीत हा दीपस्तंभच झाकोळून गेला आहे. आंबेडकरी नेत्यांची ही सर्व वैशिष्ट्ये त्यांच्या अनुयायांतच नव्हे, तर त्यांच्या वरील लक्षणांच्या विरोधात बंड करणा-यांच्यातही नंतर आपोआप येतात. आपला समाज सत्ताधारी करायचा तर केवळ 7 टक्के बौद्ध समाज किंवा 13 टक्के दलित समाज आधाराला असून पुरेसा नाही, हे या सर्वांना पूर्णपणे कळते. बाबासाहेबांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष केला तरच हे शक्य आहे, हे त्यांना ठाऊक आहे. ‘खुले पत्र’ त्यांना पाठ आहे. पण लांब पल्ल्याच्या व्यापक लोकशाही प्रस्थापनेच्या सर्वसमावेशक लढ्यात ‘आपले’ काय होईल, कधी होईल, हा त्यांना सतावणारा खरा प्रश्न आहे. तेवढी सबुरी धरली तर आपले आयुष्यच संपून जाईल. त्यापेक्षा व्यापकतेची झूल पांघरुन जातींच्या बेरजा करण्याचे ‘स्वाभिमानी’ (चलाख) राजकारण हा काहींना शॉर्टकर्ट वाटतो, तर काहींना जातीयवादी शक्तींचा निःपात करण्यासाठी सत्ताधा-यांशी सहकार्य (म्हणजे स्वतःला आमदार, खासदार किंवा मंत्रिपद मिळवणे) ही ‘तात्विकता’ सोयीची वाटते.
या व्यवहारात कष्टक-यांच्या लढ्यात आघाडीवर राहू शकणारी आंबेडकरी तुकडी गारद होत आहे. हे केवळ आंबेडकरी नाही तर एकूण प्रगतीशील चळवळीचे प्रचंड नुकसान आहे. तथापि, प्रगतीशील चळवळीतील सवर्ण कार्यकर्त्यांकडून ही बाब दुरुस्त करण्याचे प्रयत्न त्या अगत्याने होताना दिसत नाहीत. महाराष्ट्रात जिथे दलितांवरच्या अत्याचाराचे प्रसंग घडतात, तिथे त्याच्या आसपासच्या शहरातील शिक्षित आंबेडकरी कार्यकर्ताच आवाज उठवताना दिसतो. या आंदोलनांना काही ठिकाणी सवर्ण कार्यकर्त्यांचा पाठिंबाही असतो. पण सवर्ण कार्यकर्त्यांनी किंवा त्यांचा सहभाग असलेल्या संघटनांनी या अत्याचाराच्या विरोधात पुढकाराने आवाज उठवला आहे, तो प्रश्न लावून धरला आहे, ज्या सवर्णांनी हा अत्याचार केला आहे, त्यांच्या विरोधात ‘पापक्षालनासाठी उपोषण’ सवर्ण कार्यकर्ते धरत आहेत, समता यात्रा काढत आहेत, असे चित्र प्रसारमाध्यमांतून पुढे येते आहे, असे होत नाही. असे झाले तर दलित समाज ही आमचीच मालमत्ता असे समजणा-या दलित नेत्यांना चाप लागेल तसेच व्यापक एकजुटीची मनापासून इच्छा असलेल्या परंतु अल्पसंख्य असलेल्या दलित कार्यकर्त्यांना ताकद मिळेल.
कष्टक-यांच्या व्यापक आर्थिक लढ्यातून आपोआप सांस्कृतिक प्रश्न सुटणार नाहीत. ते आनुषंगिकपणेही घेऊन चालणार नाही. ते स्वतंत्रपणे लढावे लागतील. आणि ते लढतो आहोत, हे दिसावेही लागेल. हे अवधान, अगत्य कष्टक-यांच्या लढ्यातील सवर्ण नेतृत्वाने दाखवणे हा संपूर्ण उपाय नसला, तरी योग्य दिशेने पुढे सरकण्याचे एक अत्यंत महत्वाचे पाऊल जरुर आहे.
ते पडले की माझ्या अस्वस्थतेलाही बहुधा उतार पडू लागेल।
- सुरेश सावंत
No comments:
Post a Comment