प्रिय राणी दुर्वे,
सप्रेम नमस्कार.
तुमचा 'नौतपा आणि फुआर'हा लेख ('लेख'हा शब्द तसा रुक्षच आहे,निसर्गचित्र, निसर्गशिल्प, शब्दशिल्प असे काही तरी मला म्हणायचे आहे) खूप आवडला. नित्याच्या वर्तमानपत्री वाचनाच्या 'नौतपा'नंतर अशी 'फुआर'क्वचितच चिंब करते.
तुम्ही उल्लेखिलेली मुंबईची कधीकाळची थंडी मीही लहानपणी अनुभवली आहे. 'मुंबईची संस्कृती सपाट व्यक्तिमत्वहीन होत गेली तसे तिथले ऋतूही व्यक्तिमत्व हरवत गेले की काय न कळे.'असे मलाही वाटते. मुंबईच्या बाहेर गेले की तिथल्या कडाक्याच्या उन्हाच्या झळा आणि गोठवणारी थंडी यांचेही विलक्षण अप्रूप, असोशी वाटते. त्या प्रदेशांना आपले एक खास 'व्यक्तित्व'असते, हेच बहुधा त्याचे कारण असावे.
अलिकडे दुर्मिळ झालेली चांगली मराठी कानावर आली, वाचायला मिळाली की अशीच 'फुआर'अनुभवास येते. तुमच्या भाषेचे लालित्य मोकळ्या माळावर अवचित गाठणा-या श्रावणसरींची आठवण देऊन गेले. विशेषतः शेवटून तिस-या परिच्छेदातील 'नौतपा संपेल, त्या दिवशी......अवघा ताप निवून जातो.'या ओळी अप्रतिम. रोमांचित करत अखेर उन्मनी अवस्था प्रदान करणा-या.
भाषेच्या समृद्धीसाठी इंग्रजीप्रमाणे नामांची क्रियापदे मराठीत का करु नयेत, उदा. 'ग्रंथ'वरुन 'ग्रंथणे', असे मत कुसुमाग्रजांनी व्यक्त केल्याचेकोठेतरी वाचले होते. तारांबळू, केकावणे, शांतवले...हे तुमचे शब्दप्रयोग समर्पक, अर्थवाही तसेच मराठीला श्रीमंत करणारे.
मी तसे तुमचे दोन-तीनच लेख वाचले आहेत. (अर्थात, ही माझी मर्यादा. एकूणच ललित लेखन वाचणे हा प्राधान्याचा भाग नसल्याने असेल.) तुमच्या इतर लेखनात अजून कितीतरी अशी सौंदर्यस्थळे असतील.
वातावरणातल्या अन् मनातल्याही 'नौतपा'ला काही काळ तुमची फुआर रिमझिमवून गेली. त्याबद्दल आपल्या लेखणीला धन्यवाद.
...अन् अर्थातच मनःपूर्वक शुभेच्छाही!
आपला,
सुरेश सावंत,एक वाचक
No comments:
Post a Comment