‘दरबार-ए-वतन मे जब इक दिन सब जानेवाले जाएंगे
कुछ अपनी सजा को पाएंगे, कुछ अपनी जजा ले जाएंगे’
फैज अहमद फैजच्या या ओळींनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पॉलिट ब्युरो सदस्य कॉ. सीताराम येचुरी यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला. मानवाच्या अधिक चांगल्या भवितव्यासाठी भांडवलशाहीचे उच्चाटन आणि समाजवादाची प्रस्थापना हाच खराखुरा पर्याय असल्याचे तसेच कोणत्याही सुधारणा भांडवलशाहीतील शोषण कमी करु शकत नाहीत, असे त्यांनी आपल्या भाषणात भर देऊन सांगितले. कामगार वर्गाचा वैचारिक तसेच राजकीय लढा त्यासाठी तीव्र करण्याची गरज असल्याचे आग्रही प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. 11व्या आंतरराष्ट्रीय कम्युनिस्ट व कामगार पक्षांच्या बैठकीत ते बोलत होते. 22 नोव्हेंबर 2009 रोजी दिल्लीच्या मावळंकर सभागृहात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
माकप तसेच भाकपच्या कार्यकर्त्यांनी खचाखच भरलेल्या या सभागृहात काही दुर्मिळ दृष्ये पाहावयास मिळाली. अमेरिका व क्युबा तसेच पॅलेस्टाईन व इस्राएलचे प्रतिनिधी परस्परांना गळाभेटी देत होते. कम्युनिस्ट हे जागतिक जनतेच्या नव्हे, तर सर्व प्रकारच्या शोषकांच्या विरोधात आहेत, हेच त्यातून व्यक्त होत होते. आंतरराष्ट्रीय कामगारवर्गाच्या भ्रातृभावाचे ते जणू प्रतीक होते.
क्युबा, अमेरिका, इस्राएल, पॅलेस्टाईन, पोर्तुगाल तसेच गीस या देशांच्या प्रतिनिधींनी थोडक्यात आपले विचार मांडले. ऑस्कर इस्राईल मार्टिनेझ या क्युबाच्या प्रतिनिधीने बैठकीच्या आयोजकांचे अभिनंदन करुन भाषणाला सुरुवात केली. ते म्हणाले, ‘समाजवादाच्या दिशेने, एक सम्यक व्यवस्था उभारणीच्या दिशेने क्युबाची दौड चालली आहे. सध्या लॅटिन अमेरिकेत अनुकूल वातावरण आहे. या वातावरणाचा उपयोग करुन तेथील पुरोगामी शक्तींना राजकीय, आर्थिक तसेच सामाजिक दृष्ट्या एकवटण्याचा क्युबा प्रयत्न करत आहे. साम्राज्यवाद्यांना अंगावर घेण्यासाठी त्यांच्याविरोधातील वैचारिक लढाई अधिक सशक्त करावी लागेल.’
स्कॉट मार्शल (अमेरिकन कम्युनिस्ट पक्ष) यांनी आपल्या भाषणात ते अमेरिकन जनतेचे मित्र आहेत; अमेरिकन साम्राज्यवाद्यांचे नव्हे, हे निक्षून सांगितले. समाजवादाची लढाई आपण नक्की जिंकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
फवाज (पॅलेस्टाईन कम्युनिस्ट पक्ष) यांनी पॅलेस्टाईनचा कब्जा करणा-यांना अमेरिकेची मदत असल्यानेच ते असा कब्जा चालू ठेवू शकले आहेत, असा आरोप करुन सर्व पुरोगामी शक्तींनी पॅलेस्टाईनच्या बाजूने उभे राहावे, भ्रातृभाव दाखवावा तसेच त्याच्या मुक्तीसाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.
यानंतर ‘साम्राज्यवाद मुर्दाबाद, पॅलेस्टाईनचा कब्जा मुर्दाबाद’ अशा घोषणा देत फतेन कमाल घट्टास या इस्राएली कम्युनिस्ट पक्षाच्या प्रतिनिधीने आम्ही पॅलेस्टाईनच्या मुक्तीच्या बाजूने आहोत, तसेच सिरिया व लेबॅनॉन यांच्याही मुक्तीच्या बाजूने आहोत, ते मुक्त होईपर्यंत आमची लढाई चालूच राहील, असे जाहीर केले. ते पुढे म्हणाले, ‘इस्राएली कम्युनिस्ट पक्ष हा एकमेव असा पक्ष आहे की, ज्यात ज्यू व अरब सदस्य एकत्र आहेत. या पक्षाचे 150 सदस्यीय संसदेत 3 प्रतिनिधी आहेत. त्यातले दोन ज्यू आणि आणि एक अरब आहे. कम्युनिस्ट पक्षाला अपेक्षित असलेले जनतेचे ऐक्य हेच तर आहे!’
ग्रीस आणि पोर्तुगालच्या प्रतिनिधींनीही कामगारवर्गाचा आंतरराष्ट्रीयवाद तसेच साम्राज्यवादाविरोधातील संघर्ष यांच्याप्रतीच्या निष्ठेचा पुनरुच्चार केला.
शेवटी माकपचे सरचिटणीस प्रकाश करात तसेच भाकपचे सरचिटणीस ए बी बर्धन यांचीही भाषणे झाली. समाजवादाचा अंत झाला, असे म्हणणा-यांनी इथे येऊन जगातल्या समाजवाद्यांची ही आगेकूच प्रत्यक्ष पहावी, असे आवाहन बर्धन यांनी त्यांना केले.
(पिपल्स डेमॉक्रसी, नोव्हेंबर 23-29, 2009 मधील वृत्तांताचा स्वैर अनुवाद)
No comments:
Post a Comment