Wednesday, August 4, 2010

सर्व जातीय ‘नव्‍या मनुवादा’ च्‍या विरोधातील लढा ही काळाची गरज


शिक्षणाची दिशा व दशा हा 4 ऑगस्‍टच्‍या लोकसत्‍तेतील विजय कदम यांचा लेख शिक्षणक्षेत्रातील नव्‍या मनुवादाच्‍या मर्मावर नेमकेपणाने बोट ठेवणारा आहे. ऐपतवाल्‍यांनाच उच्‍च शिक्षण व न परवडणा-यांना त्‍यांच्‍या लायकीचे निम्‍नस्‍तरीय शिक्षण ही नवी मनुवादी व्‍यवस्‍था जातीवर आधारित न राहता वर्गावर आधारित बनते आहे, हे कदमांचे म्‍हणणे अगदी रास्‍त आहे. दलित-बहुजनांच्‍या अवनतीचे अविद्या हे कारण सांगून त्‍यावर सक्‍तीच्‍या व मोफत शिक्षणाच्‍या उपायाची देशात सर्वप्रथम मागणी करणारे महात्‍मा फुले, समानतेसाठी विधायक विषमतेचे तत्त्व सर्वप्रथम राखीव जागा देऊन अंमलात आणणारा लोकराजा छ. शाहू महाराज आणि सामाजिक न्‍याय, लोकशाही प्रस्‍थापनेसाठीचे मूलभूत हत्‍यार शिक्षण आहे, हे स्‍वतःच्‍या उदाहरणातून तसेच राज्‍यात अनेक ठिकाणी शिक्षणसंस्‍थांची उभारणी करुन सिद्ध करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या प्रेरणेने व कृपेने शिक्षण घेऊन पुढे आलेल्‍या मंडळींनी शिक्षणक्षेत्रातील प्रतिगामी हल्‍ल्‍यांना प्रतिकार करावयास खरे म्‍हणजे अग्रभागी असावयास हवे होते. जातीच्‍या भाषेत बोलायचे झाल्‍यास त्‍यांच्‍याच जातीतील गरिबांना याचा मोठा फटका बसणार आहे. दुर्दैवाची गोष्‍ट अशी की, असा विरोध सोडाच, वरील महापुरुषांच्‍या तत्त्‍वांना तिलांजली देत, निर्लज्‍जपणे त्‍यांच्‍याच नावाने विनाअनुदानित शिक्षणसंस्‍थांचे साम्राज्‍य ही मंडळी उभी करत आहेत. देशातील तसेच देशाबाहेरच्‍या श्रीमंत पालकांच्‍या मुलांकडून लाखो रुपयांची लूट करणा-या या शिक्षणसंस्‍था ज्‍या भागात आज उभ्‍या आहेत, त्‍या स्‍थानिक तसेच संस्‍थाचालकाच्‍या जातीतील गरीब मुलांना आपल्‍या दारात उभेही करत नाहीत. मागोवा, युक्रांद, पँथर यातून व्‍यवस्‍था बदलावयास पुढे आलेल्‍या बहुजन-दलित युवकांतील अनेक जण आज मध्‍यम व उच्‍च मध्‍यमवर्गात सामील झाले आहेत. तेही कोणी या नव्‍या मनुवादाविरोधात बोंब मारताना दिसत नाहीत. (यास अपवाद आहेत, पण ते अगदी नगण्‍य.) त्‍याऐवजी आपली मुले आणि नातवंडांच्‍या मनावर अगं अगं म्‍हशी करत विकतचे शिक्षण घेऊन भरपूर पैसे मिळविण्‍याचा व्‍यवसाय करण्‍यातच जीवनाचे साफल्‍य असल्‍याचे बिंबवत आहेत. म्‍हणूनच या चळवळींच्‍या वारसदारांच्‍या एकीकृत रिपब्लिकन, बिगर एकीकृत रिपब्लिकन, बसप, जनता दल अ, ब, क, ड अथवा रिडालोस या राजकीय संघटनाही बोंब मारताना दिसत नाहीत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्‍हणत मी ब्राम्‍हण, ब्राम्‍हणेतर तसेच बहिष्‍कृत अशा सर्वांमधील ब्राम्‍हण्‍याच्‍या (विषमतापोषक प्रवृत्‍तीच्‍या) विरोधात आहे. बाबासाहेबांच्‍या या शिकवणुकीस अनुसरुन सर्व जातींतील ब्राम्‍हणांच्‍या नव्‍या मनुवादाविरोधात सर्व जातीतील सामान्‍य, गरिबांचा एकजुटीचा लढा उभा राहणे ही काळाची गरज आहे.

- सुरेश सावंत, sureshsawant8@hotmail

No comments: