Monday, December 26, 2011

अण्‍णा हजारेंच्‍या भारतीय संविधान उध्‍वस्‍त करु पाहणा-या जनलोकपाल आंदोलनाला विरोध करा


भ्रष्टाचाराला पायबंद बसण्‍यासाठी कठोरात कठोर कायदेशीर उपाययोजनेच्‍या मागणीला तसेच त्‍यासाठीच्‍या संवै‍धानिक चौकटीतील आंदोलनाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. तथापि, अण्‍णा हजारेंचे जनलोकपाल आंदोलन भ्रष्‍टाचाराविषयीच्‍या तीव्र लोकभावनांचा वापर करुन भारतीय घटनेच्‍या पायालाच उध्‍वस्‍त करु पाहत आहे तसेच संसदेच्‍या सार्वभौम अधिकाराला धुडकावून लावत आहे. म्‍हणून या आंदोलनाला आम्‍ही विरोध करत आहोत.

स्‍वातंत्र्य व सामाजिक परिवर्तनाच्‍या महान संग्रामातून साकारलेल्‍या भारतीय घटनेद्वारे जनहिताचे कायदे करण्‍याचा अधिकार जनतेने निवडून दिलेल्‍या संसद सदस्‍यांना दिलेला आहे. भारतातील कोणीही नागरिक अथवा संघटना त्‍यांना अपेक्षित असलेल्‍या कायद्याचा मसुदा सरकारला देऊ शकते, जनतेची व्‍यापक चळवळ उभारुन त्‍यासाठीचा दबावही तयार करु शकते. मात्र, आम्‍ही म्‍हणू तसाच कायदा झाला पाहिजे, अशी भूमिका घेऊ शकत नाही. सबंध भारतीय जनतेचे प्रतिनिधीत्‍व करणा-या संसदेत विवेकशील व सर्वांगीण चर्चेनंतर कायदा संमत होण्‍याची रीत पाळली गेली नाही, तर अशारीतीचा संसदबाह्य दबाव अराजकाला जन्‍म देऊ शकतो.

भारतीय संविधान संमत होण्‍याच्‍या पूर्वसंध्‍येला, 25 नोव्‍हेंबर1949 रोजी या संविधानाचे शिल्‍पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना समितीतील आपल्‍या शेवटच्‍या भाषणात भारतीय जनतेला जो कळकळीचा इशारा दिला तो किती रास्‍त व भविष्‍यवेधी होता, ते आज 62 वर्षांनंतरही आपल्‍या प्रत्‍ययास येते. ते म्‍हणतात, ‘...जेव्‍हा, संवैधानिक मार्ग उपलब्‍ध आहेत, तेव्‍हा या असंवैधानिक मार्गांचे समर्थन होऊ शकत नाही. हे मार्ग इतर काही नसून अराजकतेचे व्‍याकरण आहे आणि जितक्‍या लवकर आपण त्‍यांना दूर सारु तेवढे ते आपल्‍या हिताचे होईल.’ पुढे ते म्‍हणतात, ‘...विभूतिपूजा ही जगातील इतर कोणत्‍याही देशाच्‍या राजकारणात दिसणार नाही, इतक्‍या मोठ्या प्रमाणात भारतीय राजकारणात दिसते. धर्मातील भक्‍ती ही आत्‍म्‍याच्‍या मुक्‍तीचा मार्ग असू शकेल. परंतु, राजकारणात भक्‍ती किंवा व्‍यक्तिपूजा ही अधःपतन आणि अंतिमतः हुकूमशाहीकडे नेणारा हमखास मार्ग ठरतो.’

आज अण्‍णांच्‍या आंदोलनात हीच विभूतिपूजा दिसते. अण्‍णाच या देशाला खरा मार्ग दाखवू शकतात आणि म्‍हणून त्‍यांनी सुचविलेला जनलोकपाल हा आपल्‍या जीवनातील सर्व समस्‍यांवरचा तोडगा ठरु शकतो, अशा वि‍वेकहीन मनःस्थितीचे बळी अण्‍णांना पाठिंबा देणारे असंख्‍य सत्‍प्रवृत्‍त लोक झालेले आहेत. देशात भ्रष्‍टाचाराबरोबरच इतर अनेक महत्‍वाचे प्रश्न आहेत. या सर्व प्रश्‍नांसंबंधी राजकारणी मंडळींना धोरण घ्‍यावे लागते. निवडणुका या समग्र धोरणावर लढवाव्‍या लागतात. असे कोणतेही समग्र धोरण न मांडता केवळ एका ‘जनलोकपाला’च्‍या मुद्द्यावर निवडणुकांत विरोधी प्रचार करण्‍याचे अण्‍णांचे आवाहन लोकांची फसगत व संसदीय प्रणालीचा विश्‍वासघात करते. आजचे राजकारणी नालायक असतील, तर त्‍यांना बाजूला सारण्‍यासाठी आपल्‍याला पटणा-या राजकीय पक्षात सहभागी होऊन अथवा स्‍वतःचा राजकीय पक्ष स्‍थापून निवडणुकांच्‍या राजकारणात सिव्हिल सोसायटीने उतरायला हवे. काठावर बसून बेजबाबदार नैतिक दहशत निर्माण करणे, गैर आहे. ‘जे ठरेल ते आता रस्त्‍यावर’ ही अण्‍णा टीमची दर्पोक्‍ती बेजबाबदारपणाचा कळस आहे. त्‍यातून बहुसंख्‍याकांची हुकूमशाहीच तयार होऊ शकते. दलि‍त-आदिवासींना अथवा स्त्रियांना राखीव जागा, अल्‍पसंख्‍याकांसाठीच्‍या तरतुदी या बाबी रस्‍त्‍यावरच्‍या आंदोलनात ठरु शकल्‍या नसत्‍या. संसदेतील गंभीर व विवेकशील चर्चेतूनच हे निर्णय होऊ शकतात.

रामदेव बाबा, श्री रविशंकर यांचा अण्‍णांच्‍या आंदोलनात सक्रीय सहभाग आहे. अध्‍यात्‍मापोटी आकर्षित झालेल्‍या लोकांना हे गुरु जनआंदोलनाच्‍या अथवा राजकारणाच्‍या मुद्द्याकडे वळवून संविधानातील ‘सेक्‍युलॅरिझम’ या तत्‍त्‍वाला उध्‍वस्‍त करत आहेत. भारतीय घटना तयार होत असतानाच प्रत्‍येकाला एक मत, सेक्‍युलॅरिझम, दलित-अल्‍पसंख्‍याकांचे संरक्षण या तत्‍त्‍वांना विरोध करणा-या शक्‍ती देशात होत्‍या. त्‍या आपल्‍या उद्दिष्‍टपूर्तीसाठी संधी शोधत असतात. अण्‍णांच्‍या खांद्यावर बसून व अण्‍णांना पाठिंबा देणा-या सत्‍प्रवृत्‍तांच्‍या भावनांवर आरुढ होऊन या शक्‍ती देशाचा मूलाधार असलेल्‍या संविधानाला उखडून देशात अराजक माजविण्‍याचे कारस्‍थान करत आहेत. हे कारस्‍थान आपण यशस्‍वी होऊ देता कामा नये, असे सर्व सुबुद्ध भारतीय जनतेला आम्‍ही आवाहन करत आहोत.

आपले,


सुरेश सावंत, नीला लिमये, भारती शर्मा, मिलिंद रानडे, दत्‍ता बाळसराफ

1 comment:

Unknown said...

Very good, very well done. I support your steps and agitation.

Sunil Badurkar