दलित पॅंथरच्या वाताहतीनंतरची आमची पिढी. समाजबदलाच्या प्रेरणेने चळवळींच्या विविध प्रवाहांचा जो आमचा शोध सुरु होता, त्यातून आंबेडकरी चळवळीबरोबरच अन्य पुरोगामी चळवळींशी संपर्क येऊ लागला. त्यातील एक ‘स्त्री मुक्ती संघटना’. संघटनेत कार्यरत असताना एका सहकारी कार्यकर्त्या मुलीशी माझे लग्न ठरले. तिचा आर्थिक स्तर तुलनेने वरचा. म्हणजे मी झोपडपट्टीतील कुडाच्या घरात राहणारा; ती संडास-बाथरुम असलेल्या सिमेंटच्या भिंतींच्या घरात राहणारी. तथाकथित श्रेणीत तिची जात वरची. अशावेळी जो काही विरोध होतो, तो सगळा सहन करुन तिने घर सोडले. विशेष विवाह कायद्याखाली आम्ही लग्न करणार होतो. त्यासाठी नोटीसही दिली होती. पण तिचा आवश्यक तो महिन्याचा कालावधी पूर्ण व्हायचा होता. तिच्या वडिलांचा तीव्र विरोध होता. पण आईने आमचे नाते स्वीकारले होते. तिच्या आईचे म्हणणे होते, घराबाहेर राहायचे तर ताबडतोब लग्न करायचे. आईंच्या म्हणण्याचा आदर करायचा असे आम्ही ठरवले. पण तातडीने लग्न करायचे म्हणजे धार्मिक पद्धतीने करणे आले. ती हिंदू-मी बौद्ध. लग्न बौद्ध पद्धतीने होणार, हे मी गृहीतच धरले होते. सुवर्णाने-माझ्या होणाऱ्या पत्नीने त्याला रुकार दिला. वस्तीतल्या बुद्धविहारातच अगदी साधेपणाने लग्न लागले. आमच्या बौद्ध धम्म प्रसार चळवळीतल्या एका कार्यकर्त्या मित्रानेच ते लावले. आम्ही हळद, मुंडवळ्या, टोपी, जयमंगल अष्टगाथा याच्या विरोधात होतो. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर लग्नादी कार्यक्रमात बौद्ध धर्माचे म्हणून जे विधी लावणे सुरु होते, त्यात अनेक अवैज्ञानिक बाबी होत्या असे आमचे मत होते. लग्नविधीतील प्रत्येक गोष्ट ही वैज्ञानिक कसोटीवर उतरणारी असली पाहिजे, हा आमचा आग्रह असे. ही सुधारित पद्धतही आम्हीच रचली होती. हे लग्नही तसेच लागत होते.
सुवर्णा परधर्माची. म्हणून तिचे आधी धर्मांतर केले. त्यासाठी २२ प्रतिज्ञा तिच्याकडून वदवून घेतल्या. हा प्रकार ऐनवेळी झाला. लग्न बौद्ध पद्धतीने होणार हे तिने स्वीकारले होते, तरी हा धर्मांतराचा व २२ प्रतिज्ञांचा कार्यक्रम तिला आधी ठाऊक नव्हता. ‘मी ब्रह्मा, विष्णू, महेश, राम व कृष्ण यांना तसेच गौरी-गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देव-देवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही; …मनुष्यमात्राला असमान व नीच मानणार्या हिंदू धर्माचा मी त्याग करते व बौद्धधम्माचा स्वीकार करते’, ही प्रतिज्ञेतील विधाने म्हणताना तिची मनःस्थिती काय असेल, लग्नाला उपस्थित असलेल्या तिच्या कॉलेजमधल्या मित्रमैत्रिणींना काय वाटत असेल, यास माझ्या लेखी काहीच स्थान नव्हते. हिंदू धर्माचा त्याग करणे व जगातला सर्वश्रेष्ठ असा बौद्ध धर्म स्वीकारणे हीच पुरोगामीत्वाची अंतिम परिणती असायला हवी, असे मी मानत होतो.
सुवर्णा देव-धर्म मानत नाही. मग तिने असे धर्मांतर का करावे, हा तिच्या मित्रमैत्रिणींना पडलेला प्रश्न होता. हिंदू देवदेवतांबद्दलच्या प्रतिज्ञेतील अशा उल्लेखाने त्यातील अनेकजण नाराज झाल्याचे नंतर कळले. स्पष्ट बोलले नाहीत. पण पुरोगामी असलेला सुरेशही अखेर त्याच्या धर्माच्या बंधनातून सुटला नाहीच; हे पुरोगामी असेच दांभिक असतात, अशा निष्कर्षालाही काहीजण आले असावेत.
आपले चुकले, हे खूप उशीरा लक्षात आले. नक्की काय चुकले?
लग्न धार्मिक पद्धतीने करावे लागणार, हे उघड होते. अपरिहार्य होते. कायद्यानेच ती अडचण करुन ठेवली होती. पण ही नाईलाजाने करावी लागणारी औपचारिकता आहे. त्यासाठी जरुर तेवढाच विधी मी का नाही सुचवला? धर्मांतर, २२ प्रतिज्ञा यांची काय गरज होती? हे नसते केले तर कोणा बौद्ध धर्मपीठाने आक्षेप घेतला असता का? आणि अशा आक्षेपापुढे मी मान तुकवणाऱ्यांपैकी होतो का?
मी त्याही वेळी मान्यता असलेला एक कार्यकर्ता होतो. कोणते विधी करायचे व कोणते नाही, हे ठरवणाऱ्या बंडखोर तरुणांच्या गटाचा मी म्होरक्या होतो. मी सांगितले असते तेवढेच विधी झाले असते. माझ्या शब्दाला तेवढी किंमत तेव्हा नक्की होती. पण मी हे केले नाही किंवा जे केले, ते मला संयुक्तिकच वाटत होते. सामाजिक बाबतीत काय योग्य-काय अयोग्य याचा निर्णय करण्याचे जाणतेपण माझ्यात अधिक आहे, तेव्हा सुवर्णाने याबाबतीत मी सांगतो, तेच मानले पाहिजे, ही अहंता-पुरुषीपणा त्यावेळी माझ्यात होता, हेच यातून दिसते. ती हिंदू धर्माला, देवांना मानत नसेल, तरी बौद्ध व्हावे की नाही, २२ प्रतिज्ञा म्हणाव्या की नाही, हा सर्वस्वी तिचा निर्णय असायला हवा होता. बाबासाहेबांनी घटनेद्वारे दिलेल्या व्यक्तीच्या उपासना स्वातंत्र्याचा, निर्णय स्वातंत्र्याचा मी इथे आदर केला नाही, हे उघडच आहे.
ही चूक लक्षात आल्यावर मी जाहीर भाषणात तसेच लेख लिहून कबूल केली. पण ही चूकच ‘हौदसे’ होती. माझ्या कबुलीचे ‘बूँद’ ती भरुन काढणे अशक्य आहे.
– सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com
______________
(साभारः दिव्य मराठी-रसिक पुरवणी, १९ जुलै २०१५)
No comments:
Post a Comment