Sunday, August 2, 2015

अण्णाभाऊ 'विश्वव्यापी जनगणा' चे! (नाहीत एका जातीचे)

काल कॉ. गोविंद पानसरे अभिवादन समितीनेे काळाचौकी येथे आयोजित केलेल्या अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या कार्यक्रमावरुन परतत होतो. वाटेत डीजे लावलेली मिरवणूक दिसली. मिरवणूक कोणाची ते दुरुन कळत नव्हते. आज टिळकांचीही पुण्यतिथी. पुण्यतिथीला काय डीजे लावण्याची पद्धत नाही. शिवाय टिळकांची आमच्या भागात अशी मिरवणूक कोणी काढण्याची शक्यताही नाही. डीजे जोरात होता. कानाचे पडदे फाडणारा. पण लोक मात्र शंभराच्या आतच होते. जवळ गेल्यावर अण्णाभाऊंचा ट्रकवर उभा केलेला फोटो दिसला. या भागातच १४ एप्रिलला बाबासाहेबांच्या प्रतिमेची अशीच डीजे लावलेली मिरवणूक पाहिली होती. आवाज कानठळ्या बसवणारा व छातीचे ठोके वाढवणारा. पण त्याला लोक हजाराच्या वर होते. अण्णाभाऊंची मिरवणूक त्याच भागात असताना हे हजार लोक त्यात का नाही सहभागी झाले? म्हणजे या मिरवणुकीत फक्त मातंग समाजच असणार. आंबेडकर जयंती बौद्धांची. अण्णाभाऊंची जयंती मातंगांची. मातंग हे बौद्धांच्या तुलनेत संख्येने कमी. म्हणून त्यांची मिरवणूक छोटी.

जाती-धर्म-देश या भेदांच्या पल्याडच्या 'विश्वव्यापी जनगणा' ला आवाहन करणारे, 'एकजुटीच्या या रथावरती होऊन आरुढ हो बा पुढती' व 'जग बदल घालूनी घाव' हा बाबासाहेबांचा संदेश 'सांगून गेले मला भीमराव' या गीतातून देणारे अण्णाभाऊ असे केवळ त्यांच्या जातीत बंदिस्त व्हावेत?

अण्णाभाऊंच्या जयंतीवरुन आलो ती काळाचौकी ही बहुजन श्रमिक-कामगार वस्ती. काळाचौकीच्या कार्यक्रमातील बॅनरवर ते 'लोकशाहीर व कॉम्रेड' होते, या मिरवणुकीतील बॅनरवर ते केवळ 'लोकशाहीर' होते. अखिल जगातील शोषित-पीडितांच्या क्रांतीसाठी लढणाऱ्या या कॉम्रेडला आपल्या जातीव्यवस्थेने त्याच्या जातीत कोंबला. महार-मांगांची एकत्रित ओळख 'दलित'. पण बौद्ध आपल्याला मांगांशी जोडून घ्यायला तयार नाहीत व मांगही बौद्धांच्या कडक बाण्याने बिथरुन आपले 'हिंदू'पण अन्य सवर्णांच्या हिंदूपणाशी जोडण्यात सुरक्षितता शोधणारे. (याला अपवाद आहेत. पण बौद्ध व मातंगांचे मुख्य लक्षण आज हेच आहे.)

या मिरवणुकीत सहभागी झालेले मातंग, न (अथवा कमी प्रमाणात) सहभागी झालेले बौद्ध व ही मिरवणूक लांबून पाहणारे रस्त्यावरचे सवर्ण हे सगळे काळाचौकीच्या कार्यक्रमात 'श्रमिक' म्हणून एकत्र होते. तिथे त्यांच्या जातीच्या ओळखी गळून पडल्या होत्या. सर्व तऱ्हेच्या शोषणाला विराम देऊ पाहणारी 'माणसे', 'साथी', 'कॉम्रेड' या ओळखीने ते शाहीर कृष्णकांत जाधव वयाच्या ७६ व्या वर्षीही दमदारपणे गात असलेल्या दिवंगत शाहीर आत्माराम पाटलांच्या 'ज्ञातिविसर्जनाच्या लावणीला' साथ देत होते.

जातीचा कार्यक्रम संघटित करणे तुलनेने सोपे असते. पण हा अशा संकुचित अस्मितांना मोडून व्यापक मानव्याच्या ओळखीचा गजर करणारा कार्यक्रम संघटित करणे खूपच कष्टप्रद असते. तो करणाऱ्या कॉ. गोविंद पानसरे अभिवादन समितीच्या संयोजकांना मनःपूर्वक धन्यवाद.

- सुरेश सावंत

No comments: