Sunday, December 27, 2015

बाबासाहेबांच्या या मताविषयी भूमिका ठरवायला मला मदत हवी आहे

‘…केवळ बाह्य स्वरुपात नव्हे, तर प्रत्यक्षात लोकशाही अस्तित्वात यावी अशी जर आपली इच्छा असेल, तर त्यासाठी आपण काय करायला हवे? माझ्यामते पहिली गोष्ट जी केलीच पाहिजे ती अशी की, आपल्या सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी आपण संवैधानिक मार्गांचीच कास धरली पाहिजे. याचा अर्थ हा की, क्रांतीचा रक्तरंजित मार्ग आपण पूर्णत: दूर सारला पाहिजे. याचा अर्थ कायदेभंग, असहकार आणि सत्याग्रह या मार्गांना आपण दूर ठेवले पाहिजे. आर्थिक आणि सामाजिक उद्दिष्टपूर्तीसाठी संवैधानिक मार्गासारखा कोणताही मार्ग शिल्लक नव्हता, त्यावेळी असंवैधानिक मार्गाचा अवलंब करण्याचे समर्थन मोठ्या प्रमाणात केले जात होते. परंतु जेव्हा संवैधानिक मार्ग उपलब्ध आहेत तेव्हा या असंवैधानिक मार्गांचे समर्थन होऊ शकत नाही. हे मार्ग इतर काही नसून अराजकतेचे व्याकरण आहे आणि जितक्या लवकर आपण त्यांना दूर सारु तेवढे ते आपल्या हिताचे होईल.’

-डॉ. बाबासाहेब आंबेडकर

(संविधानसभेतील शेवटचे भाषण, २५ नोव्हेंबर १९४९)
________________________

याविषयी उपस्थित होणाऱ्या शंकाः

१) रक्तरंजित मार्ग दूर सारला पाहिजे, हे समजू शकतो. डाव्या पक्ष/संघटनांपैकी अनेकांनी आता संसदीय प्रणालीचा अंगिकार केला आहे. पण त्यातही काहींचे म्हणणे असते, लढायचे साधन हे सरकारी दमनयंत्रणा काय प्रकारे वागते, त्यावर ठरते. ती जर हिंसक पद्धतीने आंदोलने दडपणार असेल, तर त्याविरोधी लढण्याचा मार्ग अहिंसक ठेवता येईलच असे नाही. सध्याची शोषण व विषमतेवर आधारित व्यवस्था बदलण्यासाठी क्रांती हवी, हे बाबासाहेब नाकारत नाहीत. मग ही क्रांती संवैधानिक मार्गाने कशी करायची?

२) कायदेभंग, असहकार आणि सत्याग्रह हे गांधीजींनी व खुद्द बाबासाहेबांनी स्वतःच चवदार तळे, काळाराम मंदिर प्रवेश आदि लढ्यांवेळी वापरलेले मार्ग अहिंसक आहेत. तरीही असंवैधानिक म्हणून बाबासाहेब ते नाकारतात. आजही अनेक गोरगरीब, कष्टकऱ्यांच्या चळवळी सनदशीर मार्ग म्हणून या अहिंसक हत्यारांचा वापर करतात. तेही जर बाबासाहेब म्हणतात त्याप्रमाणे अराजकतेचे व्याकरण असेल, तर आपल्या हितासाठी आंदोलनांचे कोणते मार्ग या लोकांनी वापरायचे?

३) खुद्द आंबेडकरी समुदायातील मंडळी अत्याचार, बाबासाहेबांचा अवमान अशा प्रश्नांवर रस्त्यावर उतरुन तोडफोड, जाळपोळ करतात. तोंडाला काळे फासतात. बाबासाहेबांच्या या वारसदारांचे-अनुयायांचे लढ्याचे हे मार्ग बाबासाहेबांच्या संवैधानिक मार्गांत बसतात का? नसतील बसत, तर चळवळीचे आंबेडकरी मार्ग कोणते?

४) मागण्या मान्य करण्यासाठी आमरण उपोषण किंवा आत्मताडनाचे-आत्महिंसेचे मार्ग अनुसरणे हे सरकारला वेठीला धरणे नाही का?  त्या व्यक्तीच्या मरणाला घाबरुन सरकारने उपोषण करणाऱ्याचे ऐकायचे का?  समजा या व्यक्तीचे ऐकले व या व्यक्तीच्या विरोधी हितसंबंध असलेल्या दुसऱ्या व्यक्तीनेही तसेच आमरण उपोषण केले, तर सरकारने काय करायचे?

५) रस्त्यावर हजारो लोक उतरवून आताच्या आता निर्णय घ्या अन्यथा होणाऱ्या परिणामाला सामोरे जा, असे सरकारला धमकावणे, संवैधानिक मार्गांत बसते का?

६) ज्या समाजविभागाकडे संख्येची ताकद असेल, तो आपल्या मागण्यांसाठी रस्ता अडवेल, रेल्वे रोखेल व कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न तयार करुन सरकारला जेरीस आणून आपल्या मागण्या मान्य करायला लावेल. पण जो विभाग अल्पसंख्य असेल, दुबळा असेल त्याने आपल्या मागण्यांसाठी कोणता मार्ग अनुसरायचा? हे ‘बळी तो कान पिळी’ नव्हे काय? ही बहुसंख्याकशाही लोकशाहीत बसते का?

७) आंदोलनाचा एक भाग म्हणून विशिष्ट विभागाच्या प्रश्नांवर ‘जनसंसद’ आयोजित केली जाते. देशाच्या संसदेत देशभरातून निवडून आलेले प्रतिनिधी असतात. विविध हितसंबंधीयांच्या घमासान चर्चेतून तेथील कायद्याची प्रक्रिया पार पडते. जनसंसदेत एकाच हितसंबंधाचे निवडून न आलेले लोक असतात. अशावेळी तिला संसद म्हणणे योग्य आहे का? देशाची संसद झूठी आहे; आपली संसद हीच खरी आहे, असा तेथे जमलेल्या लोकांचा समज होणे योग्य आहे का? तिला ‘जनसुनवाई’ म्हणणेच अधिक उचित नव्हे काय?
 
...मी स्वतः वरील प्रकारांपासून पूर्ण अलिप्त नाही. कार्यकर्ता म्हणून ज्या चळवळींचा मी भाग आहे, तेथे वरीलपैकी अनेक मार्ग अनुसरले जातात. त्यात मी सहभागी होत असतो. नवीन मार्ग न सुचल्याने किंवा ते सहकाऱ्यांना न पटल्याने आहे त्या मार्गांना मी अनुमोदन देत राहतो. पण मनात असमाधान असते. मनात प्रश्न, शंका फेर धरत असतात. खाजगीरित्या मला पडणारे, चर्चेतून इतरांकडून उपस्थित होणारे हे काही प्रश्न व शंका खाजगीरित्या दूर होणे कठीण झाले म्हणून जाहीरपणे इथे मांडल्या आहेत. असे प्रश्न, शंका व त्यांची संभाव्य उत्तरे आपल्याही मनात असतील. त्या सर्वांविषयी आपली, आपल्याला माहिती असलेली इतरांची मते, लेख, संदर्भ खाली नोंदवलेत, मला मेल केलेत, तर बरे होईल. त्यांच्या आधारे मला तसेच माझ्यासारख्या अन्य लोकांनाही बाबासाहेबांच्या वरील वक्तव्यासंबंधी भूमिका ठरविण्यास सहाय्य होईल.

आपल्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेत,

सुरेश सावंत

sawant.suresh@gmail.com

२७ डिसेंबर २०१५

Wednesday, December 9, 2015

लसावि की मसावि? – ‘ससावि’च उचित!

व्यापक एकजुटीसाठी आपण आपल्यातला ‘लसावि’ काढला पाहिजे, असे वारंवार बोलले-लिहिले जाते. बोलणाऱ्याला-लिहिणाऱ्याला काय म्हणायचे आहे, ते मला कळते. पण लसाविशी त्याचा काय संबंध, हे लक्षात येत नाही. लसाविने जे व्यक्त होते, ते वक्त्याला खरं म्हणजे म्हणायचे नाही, असे वाटत राहते. त्याला जे म्हणायचे आहे, ते ‘मसावि’ म्हटल्याने अधिक योग्य प्रकारे व्यक्त होईल, असेही वाटत असते. पण अधिक विचार केल्यावर त्यानेही आपण मर्यादित होतो, असे वाटते. माझा गोंधळ होत राहतो. सहकारी-मित्रांशी याबाबत अनेकदा बोललो आहे. पण त्यामुळे त्यांच्याही डोक्याला ताण होतो, असे जाणवते. या शंकेला निःशेष भाग काही लागत नाही. एकतर आमच्यातील अनेकांचा लसावि-मसाविशी संबंध दहावी झाल्यावर संपला. आता चळवळीच्या चर्चेत असा अचानक उभा ठाकल्यावर गोंधळ होणारच. खाजगी, अनौपचारिक चर्चेतला हा प्रश्न लेखी स्वरुपात आपल्यासमोरही ठेवत आहे. अर्थात, तोही बुजत बुजत. आत्मविश्वासाने, ठामपणे वगैरे काही नाही. चळवळीबरोबर गणिताचीही जानपहचान असलेल्या वाचकांनी हा गोंधळ दूर करायला मदत करावी, अशी अपेक्षा आहे. प्रश्नच नीट मांडला नाही, असेही होईल. तर तोही दुरुस्त करावा.
शाळेत शिकलेले मला आठवते त्याप्रमाणे ‘ल.सा.वि.’ म्हणजे लघुतम सामाईक विभाज्य किंवा लहानात लहान सामाईक विभाज्य. विभाज्य म्हणजे ज्याला पूर्ण भाग जातो; बाकी उरत नाही असा भाज्य. सामाईक विभाज्य म्हणजे दोन किंवा अधिक संख्यांचा सामाईक असणारा विभाज्य. उदाहरणाने बघू. २०, ३० व ४० या ३ संख्यांचा लसावि म्हणजे या संख्यांनी ज्यांना निःशेष भाग जातो, अशा संख्यांतली सर्वात लहान संख्या आपल्याला शोधायची आहे. अवयव पद्धतीने (म्हणजे कसे ते आपल्या जवळच्या ५ वी- ६ वीच्या विद्यार्थ्यांना विचारावे; नाहीतर हा लेख म्हणजे गणिताचा पेपर होईल.) हे उदाहरण सोडवल्यावर आपल्या हाती येते ती १२० ही संख्या. १२० ही सगळ्यात लहान संख्या जिला २०, ३० व ४० या तिन्ही संख्यांनी निःशेष भाग जातो. वास्तविक, या तिन्ही संख्यांनी निःशेष भाग जाणाऱ्या याहून मोठ्या २४०, ४८० अशा अनेक संख्या आहेत.
या संख्या म्हणजे चळवळीतल्या विविध प्रवाहांची किंवा संघटनांची किंवा व्यक्तींची सहमतीची लक्ष्ये किंवा मुद्दे समजू. जिथवर आम्ही एकत्र काम करु शकतो, ज्यांवर आमचे मतभेद नाहीत, असे हे मुद्दे किंवा लक्ष्ये. जर २०, ३० व ४० या तिन्ही संघटनांची सहमती असलेली सामाईक लक्ष्ये अथवा मुद्दे १२०, २४०, ४८०…(सोयीसाठी संख्या वाढवूया नको) या तिन्ही संख्या असतील, तर जास्तीत जास्त सहमतीची ४८० का नाही स्वीकारायची? इथे किमान म्हणजे लघुतम असलेली १२० ही संख्या का स्वीकारायची? आम्ही विविध संघटना एकत्रितपणे जेव्हा मोर्च्याचे मागणीपत्र तयार करतो, जाहिरनामा तयार करतो, तेव्हा आमची सहमती असलेले जास्तीत जास्त म्हणजे कमाल मुद्दे घेतो. किमान घेत नाही. एकत्रित विचारविनिमयाने, लढ्यातील सहकार्याने पुढच्या काळात मतभेदांचा क्रमशः निरास व्हावा व हे सहमतीचे मुद्दे अधिक वाढावेत, असाच प्रयत्न असतो. …मग तरीही आपण आपल्यातला ‘लसावि’ काढायला हवा, असे का म्हणतो?
याचे उत्तर ‘मसावि’ची चर्चा करुन सापडते का ते पाहू.
कोणत्याही दोन अथवा अनेक संख्यांतील मोठ्यात मोठा सामाईक विभाजक म्हणजे मसावि होय. विभाजक म्हणजे ज्याने भाज्याला निःशेष भाग जातो, अशा संख्या. आकडे तेच घेऊ. २०, ३० व ४०. लसावित हे आकडे विभाजक होते, तर इथे ते भाज्य आहेत. यांचा मसावि काढताना आपल्यासमोर २, ५ व १० या तीन संख्या येतात. या तिन्हींनी वरील तिन्ही संख्यांना निःशेष भाग जातो. यांतील महत्तम असलेली १० ही संख्या आपण निवडतो. तो या आपल्या वरील तीन संख्यांचा मसावि असतो. १० पेक्षा कोणतीच मोठी संख्या मिळत नाही, जिच्याने या तिन्ही संख्यांना निःशेष भाग जातो.
समजा २, ५ व १० हे तिन्ही सामाईक अथवा सहमतीचे मुद्दे आहेत, अशावेळी १० हा सगळ्यात मोठा आकडा पकडणे अधिक योग्य नाही का? प्रत्यक्षात आपण तसेच करत असतो. मग आपल्यातला ‘मसावि’ काढायला हवा, असे आपण म्हणायला हवे. ‘लसावि’ पेक्षा ते अधिक योग्य ठरेल.
पण इथेही नंतर एक अडचण येते. चर्चेने, लढ्यातील सहकार्याने सहमतीचे मुद्दे वाढवायला इथे संधी दिसत नाही. १० हा शेवटचा सहमतीचा मुद्दा आहे. त्याहून पुढे जाता येत नाही. म्हणजे विकासाची संधी नाही. म्हणजे मसावि काढा, हे म्हणणे ताबडतोबीने ठीक असले तरी भविष्याच्या दृष्टीने योग्य ठरत नाही.
मग काय करायचे? प्रश्न गहन होतो आहे.
मला एक कल्पना सुचते आहे. करुन तरी बघूया. समजा, आपण ‘लसावि’ व ‘मसावि’ तील शब्दांची सांगड घातली तर! सध्या या शब्दांच्यातील ‘वि’ एक नाही. लसावित तो विभाज्य आहे, तर मसावित तो विभाजक आहे. आपण मसावितला महत्तम व लसावितला विभाज्य एकत्र करुन महत्तम सामाईक विभाज्य (एकूणात त्याचा संक्षेप मसावि असाच होत असला तरी ‘वि म्हणजे विभाज्य; विभाजक नव्हे’ अशी तळटीप देऊन) स्वीकारण्याचा प्रयत्न करायला हवा. पण लसाविच्या चर्चेत आपण पाहिल्याप्रमाणे महत्तम सामाईक विभाज्यांना मर्यादा नाही. मग तो निश्चित कसा करायचा?
झालं. परत अडलो. आता..?
आहे मार्ग. धीर सोडूया नको. लघुतमच्या वरती जेवढे सरकणे आपल्याला आपल्या कुवतीत आहे असे वाटते, तो सामाईक विभाज्य तूर्त पकडावा. तो लघुतम नसेल आणि महत्तमही नसेल. दोन्ही टोके नसतील. व्यवहार्य वाटेल असा हा विभाज्य (उद्दिष्ट) धरावा. त्याला कोणीही ताणू नये. ते पथ्य पाळावे. जोरदार, एकदिलाने काम करावे. पुढे सरकतो आहोत असे वाटले, तर सगळ्यांच्या विवेकाने हे विभाज्य महत्तमच्या दिशेने सरकवावे. असे सरकत सरकत पुढे जावे. आपण या क्रियेला ‘सर्वसाधारण सामाईक विवेक (ससावि)’ असे काहीतरी म्हणूया.
पण मग ‘ससावि’ असे काही गणितात नाही, त्याचे काय करायचे?
अडचण आहे खरी. पण गणिताची चिंता आपण का करायची? आपण गणितात काहीही गडबड करत नाही. लसावि-मसावि म्हणायचे नसल्याने गणितातल्या संकल्पनांची तोडफोड तुम्ही करत आहात, असा आक्षेप आपल्यावर यायचे कारण नाही. आपण म्हणतो आहोत- ससावि. सर्वसाधारण सामाईक विवेक. कितीतरी लांब वाक्यांचे संक्षेप आपल्याकडे केले जातात. त्यातला हा एक. दुसरे, गणितात २ + २ = ४ हे निश्चित असते. समाजशास्त्रात असे क्वचितच होते. तिथे २ + २ = ५ किंवा २ + २ = ३ असे काहीही होऊ शकते. जिवंत माणसांची मने फूटपट्टीने मोजता येत नाहीत. शिवाय अशा अनेक मनांचा संयोग ज्या सामाजिक व्यवहारात होत असतो, त्याच्या निष्पत्तीचा गणिती अंदाज बांधता येत नाही. समाजात अनेक हितसंबंधित शक्ती एकाचवेळी काम करत असतात. त्यांचा परस्परांवर होणारा परिणाम हेही सरळ मोजता येत नाही. आपल्या नियंत्रणात नसलेले काही नैसर्गिक घटकही या प्रक्रियेत भाग घेत असतात. रेशनच्या मोर्च्याला कोठून किती लोक येतील, याची आम्ही जमेल तेवढी बारिक मोजदाद करतो. एक आकडा आमच्याकडे तयार होतो. आणि अचानक पाऊस येतो. रेशन दुकानावर नेमके त्याचवेळी रॉकेल येते किंवा आणले जाते, ट्रेन बंद पडते, वस्तीत कोणाचे तरी मयत होते. दोन संघटक कार्यकर्त्यांचे आपसात भांडण होते व दोघेही न कळवता घरात बसतात. …आमचा आकडा कोसळतो. यातून आम्ही शिकलो. या सगळ्याची सरासरी काढून लोकांचा अंदाज घेऊ लागलो. याउपर काहीही होईल आणि मोर्चा एकदम फ्लॉप होईल, याचीही तयारी ठेवू लागलो. मग मूल्यांकन, त्यातून दुरुस्त्या, नवे अंदाज, अधिक तयारीचा मोर्चा…असा क्रम चालू ठेवतो. हे सगळं गणितात मोजता येत नाही. त्याला विवेकबुद्धी (सामाजिक गतिशास्त्र व तत्वज्ञानाची जाण यात गृहीत आहे) वापरुन अंदाजच घ्यावा लागतो. सरावाने त्यात गती येते, इतकेच. अंदाजाने मीठ-तिखट स्वयंपाकात घेतात, तसे काहीसे हे असते. पण सुगरणीकडूनही कधी कधी आमटी खारट-तिखट होते, तसे चळवळीतही जाणत्या नेतृत्वाचे अंदाज चुकतात.
पुरोगामी चळवळीतील तर सर्वच प्रवाहांचे एकूण ‘अंदाज’ (अंदाजचा हिंदी-उर्दू अर्थही त्यात घ्यावा) गडबडलेले आहेत. अशावेळी त्यांच्यातील व्यापक एकजुटीचे क्रम कसे ठेवायचे, यासाठीचे जाणतेपण अधिकच प्रगल्भ असावे लागेल.
त्यासाठी, सामाजिक-राजकीय चळवळीत गणितातल्या लसावि-मसाविपेक्षा ‘ससावि’ म्हणजेच ‘सर्वसाधारण सामाईक विवेका’वर अधिक विसंबायला हवे, असे मला वाटते.
– सुरेश सावंतsawant.suresh@gmail.com
____________________________________
(साभारः आंदोलन शाश्वत विकासासाठी, डिसेंबर २०१५)

प्रतिक्रांती उंबरठ्यावर!

'भारतात भक्ती किंवा जिला भक्तीचा मार्ग म्हणता येईल तो किंवा विभूतीपूजा ही जगातील इतर कोणत्याही राजकारणात दिसणार नाही, इतक्या मोठ्या प्रमाणात भारतीय राजकारणात दिसते. धर्मातील भक्ती ही आत्म्याच्या मुक्तीचा मार्ग असू शकेल. परंतु राजकारणात भक्ती किंवा व्यक्तिपूजा ही अध:पतन आणि अंतिमत: हुकूमशाहीकडे नेणारा हमखास मार्ग ठरतो.' - डाॅ. बाबासाहेब आंबेडकर
___________________

आज बाबासाहेबच विभूती झाले आहेत. चैत्यभूमी, दीक्षाभूमी ही तीर्थस्थळे झाली आहेत. बाबासाहेबांबद्दलचा आंबेडकरी समुदायाच्या मनातील अपरंपार आदर व कृतज्ञता यांचा हितसंबंधीयांनी आपल्या स्वार्थासाठी वापर केला. करत आहेत. ह्या सरकारचे तर ते मिशनच आहे. बाबासाहेबांच्या स्मारकांत-उत्सवांत त्यांचे विचार दफन करण्याची मोहीम जोरात चालू आहे. समाज त्यास बळी पडतो आहे. ...आणि सजग कार्यकर्ते-बुद्धिवंत हातावर हात धरुन हे पतन निष्क्रीयपणे पाहत आहेत किंवा त्यात चूपचाप सामील होत आहेत. अशा पतनाच्या काळात तडफडून उठत प्रस्थापिताच्या विरोधात विद्रोहाचा एल्गार पुकारणारा आंबेडकरी युवक आता जणू इतिहाजमा झाला आहे. नाही म्हणायला फेसबुक-व्हाॅट्सअपवर तो आरोळ्या देताना कधीकधी दिसतो. आपले कंपूही करतो. या कंपूंत ते परस्परांना आपली भडास ऐकवतात, पुढा-यांना-सरकारला-व्यवस्थेला शिव्या घालतात. अशारीतीने आपल्या रागाचे विरेचन झाले की शांत होतात. पण आपल्या 'कंफर्ट झोन' मधून बाहेर पडून रस्त्यावर उतरत नाहीत. वस्त्यांत जात नाहीत. प्रासंगिक आंदोलने करणारे काही सन्मान्य अपवाद आहेत. तथापि, नियोजनपूर्वक, सातत्याने करावयाच्या संघर्षाची, त्यासाठीच्या संघटनेची पूर्ण वानवा आहे. या स्थितीची एकत्र बसून चिकित्सा करण्याचीही निकड कोणाला भासत नाही.

...रात्र वै-याची-आम्ही निद्रिस्त; प्रतिक्रांती उंबरठ्यावर!

- सुरेश सावंत