Friday, March 11, 2016

काही चर्चाः स्त्री-पुरुष संबंधांची!

प्रेम आणि संभोग यात आधी काय? अर्थात प्रेम. स्त्री-पुरुष संबंधांविषयीच्या जाणिवा सुरु झाल्या झाल्या हे उत्तर माझ्या मनात कोरलं गेलं ते आजपर्यंत. म्हणजे बुद्धी काही वेगळं नमूद करत असली, तरी अंतर्यामी हेच उत्तर ठाम असतं. ज्याच्याशी प्रेम, त्याच्याशीच लग्न आणि लग्नानंतरच संभोग हा क्रमही मनात अढळ असतो. आधी आयुष्यात प्रेम हे एकदाच होतं या मताचा मी होतो. पुढे स्वानुभवातून हे मत बदलले. पण हा क्रम ढळला नाही.

पशू-पक्ष्यांच्यात कुठे असतं असं आधी प्रेम आणि मग संभोग? प्रणयाराधन वगैरे काहींच्यात असतं; पण त्याला माणसांच्यात असतं तसलं प्रेम म्हणणे कठीण आहे. लग्न तर त्यांच्यात नसतंच. जोडीदारही एकच नसतो. नर व मादी एवढंच नातं त्यांच्यात असतं. माणूस हा प्राणी आहे. प्राणी म्हणून त्यालाही हीच लक्षणे लागू होतात. पण विकासक्रमात त्याने काही संकेत, नीतिनियम बनविले आणि तो प्राण्याचा संस्कारित माणूस झाला. आपल्या नर-मादी या प्राणी पातळीवरील प्रेरणांचे त्याने नियमन केले. समाजस्वास्थ्याच्या तत्कालीन निकषांस ते आवश्यक होते.

या संकेत-नीतिनियमांच्या प्रभावाखालील कोणी एकजण सोडून गेलेल्या तिला खुश रहे तू सदा, ये दुआ है मेरी..असा निरोप देत होता. पण त्याचवेळी दुसरा एकजण म्हणत होता, तू अगर मुझको न चाहो तो कोई बात नहीं, किसी और को चाहोगी तो मुश्कील होगी.तर तिसरा तू हां कर या ना कर, तू है मेरी किरण असे बजावत होता.

या तिन्हींमधील पहिला ती सोडून गेली तरी आयुष्यभर तिच्यासाठी देवदास बनायला तयार आहे. तिला तो कोणतीही अट घालत नाही. दुसऱ्याचीही आयुष्यभर एकटे राहण्याची तयारी आहे; पण अट एकच-तिने तसेच राहायला हवे. तिसरा तर त्यालाही तयार नाही. तिची संमती असो अथवा नसो; ती त्याचीच असणार हे त्याने ठरवून टाकले आहे.

हे तिघेही प्राणी पातळीच्या पुढे आहेत. म्हणजे, केवळ मादी म्हणून संभोगासाठी त्यांना कोणतीही स्त्री नको आहे. त्यांना आवड-निवड आहे. त्यांना तिच्याशी लग्न करायचे आहे. म्हणजे तिला जन्माचे जोडीदार करावयाचे आहे. तिच्याशी लग्नानंतरच संभोग करावयाचा आहे. विकासक्रमात एवढी प्रगती त्यांची झाली आहे. पण पहिला सोडला तर उरलेले दोघे स्वतः घेत असलेले हेच निवडीचे स्वातंत्र्य स्त्रीला देत नाहीत.

तिसरा तिला प्राप्त करण्यासाठी काहीही करायला, हिंसक व्हायला तयार आहे. त्याच्या या हिंसकतेला कायदा पाठिंबा देत नाही. तो त्याला अटकाव करतो किंवा शिक्षा देतो. पण कायद्याने दुसऱ्यालाही निवडीचे स्वातंत्र्य द्यायचा संस्कार होतो असे नाही.

विकासाच्या धारेत न सापडल्याने प्राण्यांच्यात गरीब-श्रीमंत, दलित-सवर्ण अशा श्रेणी नाहीत. माणसांच्यात या व अशा असंख्य श्रेणी, भेद आहेत. त्यामुळे वरील तिघांनाही त्यांचे संदर्भ आहेत. पहिल्याला सोडून गेलेली ती, तिला तो आवडला नाही किंवा त्याचे तिला काही खटकले, म्हणूनच सोडून गेली असेल असे नाही. ती जात किंवा आर्थिक किंवा अन्य कोणा श्रेणीने वरची असू शकेल. त्यामुळे तिच्या घरच्यांच्या धाकाने-भीतीने ती मागे सरली असेल.

या श्रेणींच्या, संकेत-नीतिनियमांच्या अधिकृत चौकटीबाहेरही बरेच काही चालत असते. संकेत-कायदा काहीही असला तरी त्यात फरक पडत नाही. या चौकटीबाहेरच्याला मन मानायला तयार नसले, तरी बुद्धीला ते स्वीकारावंच लागतं.

माझ्याही मनात उन्नत-उदात्त भावनांच्या व जगण्याच्या चौकटी होत्या; आहेत. त्यातील काही मोडताना बघताना त्रास झाला; आजही होतो. पण काही मोडल्या जात आहेत, याने बरेही वाटते. आनंदही होतो. समाज केवळ एका व्यक्तीच्या अथवा गटाच्या इच्छेनुसार चालत नाही. अशा अनेकांच्या इच्छा-हितसंबंधांच्या, भौतिक बदलांच्या संघर्षांतून नातेसंबंधांची, नीतिनियमांची जुनी रचना मोडत असते. नवी आकार घेत असते. घरात कुरबूर करत नवं घर करायला नवऱ्याला भाग पाडणाऱ्या सुनेबद्दल सासूची तक्रार असते. पण याच सासूने (सरंजामशाही मोडून शहरी उद्योगांना जन्म देणाऱ्या भांडवलशाही रचनेच्या पार्श्वभूमीवर) भला थोरला एकत्र कुटुंबाचा वाडा निरनिराळी कारणे सांगून नवऱ्याला सोडायला लावलेला असतो, हे ती विसरते. नवऱ्यांची अशी उघड कुरबूर नसली, तरी असे विभक्त होणे त्यांनाही हितकारकच असते. त्यामुळे ते थोडे आढेवेढे घेत किंवा साळसूदपणे बायकोच्या मागे दडून या वेगळे होण्याला पाठिंबाच देत असतात. हा व्यक्तींच्या इच्छाआकांक्षांच्या टकरावाच्या रुपात होणारा व्यवस्थात्मक बदल असतो. याचा अर्थ हे सगळंच वस्तुनिष्ठ, म्हणजे माणसाच्या हाती काहीच नसतं असं नव्हे. असंख्य आत्मनिष्ठांच्या गलबल्यातून जे निरपेक्ष घडताना दिसते, त्याच्या दिशेची जाण असणाऱ्या व्यक्ती अथवा गट त्यात हस्तक्षेप करु शकतात. करत असतात. दिशा पूर्ण बदलता येत नसली, तरी तिच्यातीलच काही वाऱ्यांचा उपयोग करुन आपले शिड त्यांना अनुकूल ठेवता येते व नौकेला गती देता येते. म्हणजेच बदलाची दिशा उपकारक करायचा प्रयत्न करायचा असतो. नाहीच झाली उपकारक तरी तिची हानिकारकता तरी कमी करता येते.

मी प्रेम प्रकरणांत (तथाकथित) आदर्शवादी असलो, तरी माझ्या गावात किंवा मुंबईतील राहत्या वस्तीत स्त्री-पुरुष संबंधांचे जे चोरटे व्यवहार दिसत होते, ते या आदर्शांना धक्का देणारे होते. यात नवरा कामावर गेला की गुपचूप घरात येणारा प्रियकर होता. चुलत बहीण-भाऊ होते. वयात अंतर असलेले होते. जाती-धर्म वेगळे असलेले होते. अशी प्रकरणे उघड झाल्यावर चिडून मारहाणही होत असे. भावकी-गावकीत ही प्रकरणे जाऊन त्यांत न्याय व दंडही होई. काही बायकांना नवरे सोडूनही देत किंवा तीच प्रियकराबरोबर निघून जाई. काही नवरे हे सगळे समजून कानाडोळा करत. त्याच्यासहित संसार चालू ठेवत. मूल कोणाचे हे प्रश्नांकित असले किंवा आपले नाही हे कळले, तरी त्याचा सांभाळ करत. अर्थात, असे पुरुष बहुधा नामर्द संज्ञेला पात्र ठरत. जो बाईला हाकलून देतो, मारतो तो मर्द असतो. या सगळ्यात बाईची अब्रू ही केंद्रवर्ती असते. बाहेरख्याली पुरुषाला दूषणे दिली गेली, तरी समाजाच्या लेखी तो अखेर पुरुष असतो. भांडं तडकतं ते बाईच्या शीलाचं. पुरुषाचं भांडं तांब्याचं असतं. त्याला पोच येतात; पण ते तडकत नाही. स्त्रीची योनिशुचिता महत्वाची; पुरुषाला शिश्नशुचितेची गरज नसते.

जगात लैंगिकतेच्या आदिम प्रेरणेला संस्कृतींनी काळाच्या निरनिराळ्या टप्प्यावर निरनिराळ्या प्रकारे समजून घेतले. खजुराहो किंवा अनेक प्राचीन देवळांतली संभोगशिल्पे याची साक्ष देतात. घुंघट किंवा बुरख्यातच सगळं झाकून ठेवायचं हीच एक सलग संस्कृती नव्हती. सध्या चालू असलेल्या समलिंगी संबंधांच्या मान्य-अमान्यतेची चर्चा ही किती मागास आहे, हे या शिल्पांवरुनही कळते. लैंगिक निवडीचा कल व स्वातंत्र्य ही मानवजातीला नवी गोष्ट नाही. इतिहास ३६० अंशांत माघारी फिरत नसला, तरी त्याला वेडीवाकडे वळणे असतात. जुने प्रगत आज मागास ठरण्याचे हे एक वळण एवढेच.

या मागासपणाला हल्ली जोरदार तडाखे बसू लागले आहेत, हे नक्की. समलिंगी संबंधीय उघडपणे पुढे येऊन झगडा देत आहेत. त्यांच्या बाजूने समाजातील अन्य लोकही ठामपणे उभे राहत आहेत. साहित्य-सिनेमांत हे विषय मांडले जात आहेत. नैतिकतेच्या मुद्द्यावर त्यांना विरोधही होतो. पण त्या विरोधांतूनही ते टिकाव धरत आहेत.

नवी पिढी खूपच मोकळी दिसते आहे. त्यांचा सार्वजनिक ठिकाणचा वावर लिंगनिरपेक्ष म्हणावा, इतका मोकळाढाकळा असतो. जुन्या मानसिकतेतून जर आपण त्यांच्या जोड्या ठरवू लागलो, तर आपली फसगत होईल. पण या मोकळेढाकळेपणाचाच एक भाग म्हणून शारीरिक संबंध हीही बाब त्यांतील अनेकांना सहज वाटते. त्यासाठी प्रेमात असण्याची गरज त्यांना वाटत नाही. परस्परांना बांधून घेण्यात त्यांना स्वारस्य नाही. लग्न ही स्वतंत्र गोष्ट. तिच्याशी आधीच्या या व्यवहाराचा संबंध असेलच असे नाही. कोणी लग्न न करता सहजीवन पत्करतील; तर कोणी लग्न करतील. इन्स्टंट लग्न-इन्स्टंट घटस्फोट हाही या इन्स्टंट व्यवहाराच्या गाड्याचे मागचे अपरिहार्य चाक. मोकळेपणाचे स्वागत करताना नात्यातली ही इन्स्टंटता काळजी वाटायला लावणारी आहे. दुसरी एक काळजी करण्याची बाब म्हणजे पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांची गती अधिक असणे. विषमता, दुय्यम दृष्टिकोण यांची शिकार होत असतानाही गावातील बचतगट, राजकारण यात हिरिरीने उतरणाऱ्या सामान्य स्त्रीपासून आर्थिक-शैक्षणिकदृष्ट्या वरच्या स्तरातील स्त्रीपर्यंत सर्वत्र हा अनुभव येतो. मनासारखा पुरुष जोडीदार मिळत नसल्याने निवडीच्या निकषांशी तडजोड न करणाऱ्या अनेक मुलींची लग्ने लांबणीवर पडताना दिसतात. काही जणी अविवाहित राहणे पत्करतात. पसंत करतात. पुरुषांनी स्त्रियांच्या तुलनेत आपल्याला गतिमान नाही केले, तर हा पेच आणखी वाढेल.

स्त्री-पुरुष समतेची वाट अजूनही बिकट आहे हे खरे. पण शरीरसंबंधातून नैतिकता मोजण्याच्या ढोंगातून नवी पिढी मोकळी होते आहे, त्याचे स्वागतच करायला हवे. पण त्याचवेळी माणूसपणाचे अविभाज्य अंग असलेले स्त्री-पुरुष जोडीदारांमधले तरल प्रेम, परस्पर विश्वास यातूनच शारीरिक मीलनातील समर्पणाचा अत्युच्च आनंद गाठता येतो, याचे त्यांचे भान सुटता कामा नये. आजच्यासारखी कुटुंबव्यवस्था पुढे तशीच राहील, याची खात्री नाही. कारण साधा तर्क-आजच्यासारखी पूर्वी ती नव्हती. मानवी विकासक्रमात तिच्यात बदल होत आलेत. पुढेही होतील. पण ही जी काय नातेसंबंधांची नवी व्यवस्था होईल, ती जबाबदार, निकोप व सुंदर असायलाच हवी, यात दुमत असायचे कारण नाही.

म्हणजेच, प्रेम, लग्न, संभोग यातला क्रम मानवी विकासाच्या आजच्या टप्प्यावर प्रेम व विश्वासासह संभोग असाच राहायला हवा. संभोग लग्नाच्या आधी की नंतर? की लग्नाशिवाय? एकाशीच की अनेकांशी? भिन्नलिंगी की समलिंगी? …हे प्रश्न अर्थातच गौण आहेत.

-    सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com
______________________________________

आंदोलन शाश्वत विकासासाठी, मार्च २०१६

1 comment:

Grameen Vikas said...

श्री सुरेशजी, स्त्री-पुरुष संबंध या विषयाचा आपण संक्षिप्तपणे चांगला आढावा घेतला आहे. या विषयाच्या अनुषंगाने वास्तवात असलेली वास्तवता सत्य असली तरी, आपल्यावर असलेल्या नितीमत्तेच्या नियंत्रणामुळे यानुषंगाने उघडपणे व्हावी तितकी अजूनही चर्चा होत नाही.गेल्या ५० वर्षात समाजाच्या अनेक क्षेत्रात आलेल्या बदलामुळे स्त्री-पुरुष संबंधाचे आधीची बंधने सैल होऊ लागली आहेत, ती टिकवण्याची पण पराकाष्ठा चालूच आहे, याचा केंद्रबिंदु हा यौनीसुचिता हाच राहिलेला आहे, आणि हाच स्त्री दास्यासाठी जास्त कारणीभूत ठरलेला आहे. यौनीसुचिता समूळ नष्ट झाल्याशिवाय आरोग्यदायी स्त्री-पुरुष समानता आणि आनंदी स्री-पुरुष वास्तवात अवतणार नाहीत, हे अंतिम सत्य आहे !