Friday, March 11, 2016

‘राष्ट्र’ ही एक ‘भूमिका’ असते, याची विस्मृती नको


संसदेत स्मृती इराणी महिषासुर-दुर्गेसंबंधातील जवाहरलाल नेहरु विद्यापीठाच्या आवारात लागलेले पत्रक वाचत होत्या त्यावेळी माझ्या मनात राहून राहून येत होते- स्मृती इराणींच्या तावडीतून नामदेव ढसाळ वाचले. कारण ते हयात नाहीत. नाहीतर स्वातंत्र्य हे कुढल्या गाढवीचं नाव आहे?’ असं विचारणाऱ्या ढसाळांचा आताच्या सरकारने कन्हैया केला असता. ती संधी त्यांची हुकली. पण राजा ढाले जिवंत आहेत. नुकतीच त्यांची पंचाहत्तरी झाली. त्यांचा साधनेतील राष्ट्रध्वजासंबंधीच्या उल्लेखाबद्दल गाजलेला लेख मंत्रिमहोदया स्मृती इराणींनी (दुर्गा-महिषासुर पत्रकाप्रमाणे) संसदेत अक्षरशः वाचण्याचा बाणेदारपणा दाखवण्याची संधी जरुर घ्यावी. पूर्वलक्ष्यी प्रभावाने त्यांना राष्ट्रद्रोही म्हणून अटक करावे. कोर्टात नेताना राष्ट्रध्वज हाती घेतलेल्या वकिलांच्या तैनाती फौजेकडून त्यांना बुकलण्यात यावे. अशावेळी भाजपच्या आश्रयाने झालेले व सरळ भाजपाच्या तिकिटावर निवडून आलेले खासदार, झुंजार आंबेडकरी सैनिक अनुक्रमे रामदास आठवले व उदित राज हेही त्या लेखाची नव्या संदर्भात फेरसमीक्षा करतील व इराणींना अनुकूल अर्थ काढतील. ढालेंवरील राष्ट्रद्रोहाचा आरोप सिद्ध करण्यासाठी या दोघांची आंबेडकरी बाण्याची साक्ष महत्वाची ठरेल. अजूनही असे राष्ट्रद्रोही बरेच निघतील. पण ते किरकोळ आहेत. त्यातील एक बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी गांधीजींना तोंडावर सांगितले होते, मला मातृभूमी नाही. पुढे तर त्यांनी रिलडल्स इन हिदुइजममध्ये मर्यादा पुरुषोत्तम रामाबद्दल काहीबाही लिहिले होते. परंतु, बाबासाहेब आंबेडकर संघाला प्रातःस्मरणीय व भाजपला सायं-रात्र-मध्यान्ह सदा सर्वकाळ वंदनीय झाल्याने त्यांच्या देवादिकांवरील लिखाणाचा फेरअर्थ काढण्यासाठी छुप्या व जाहीर समित्या त्यांच्या १२५ व्या जयंतिनिमित्त स्थापन करण्यात येणार आहेत. आल्या आहेत. महात्मा फुलेंनी गणपतीबद्दल काय म्हटले किंवा पेरियारांनी हिंदू देवतांबद्दल काय म्हटले हे राष्ट्रद्रोहात बसवण्याचे कारण नाही. त्यांच्या वंशजांना राजकीय लाभवस्त्रे प्रदान करुन या पितरांचे पापक्षालन करता येऊ शकते. प्रबोधनकारांनी देवळांचा धर्म व धर्माची देवळे मधून हिंदूधर्मावर जे आसूड ओढले, त्याबद्दल हिंदुहृदय सम्राट उपाधी स्वतःप्रत अर्पण करुन त्यांच्या पुत्राने हे पापक्षालन आधीच केले आहे. प्रबोधनकारांचे पौत्रही पितृपंधरवडा पाळून नियमित पिंडदान करत असतातच.

तेव्हा, पुरोगाम्यांनी घाबरुन जायचे कारण नाही. जुन्या, आताच्या सर्वच विद्रोहींना देशद्रोही करायला ते निघालेले नाहीत. ते काही हिटलर नाहीत. एखाद्या कन्हैयासारख्या पोराच्या चुकला म्हणून कानफाटात त्यांनी मारली एवढेच. गरिबाच्या पोरानं नीट शिकावं, नाही ते धंदे करु नयेत यासाठी. त्याच्या काही जोडीदारांनाही त्यांनी समज दिली आहे, ती त्यामुळेच. आपल्या आधीच्या पिढ्यांतील मंडळींनी जो देश-संस्कृती द्रोह केला त्यापासून नव्या पिढीने दूर राहावे, यासाठी ते ही दक्षता घेत आहेत. (दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी या वृद्धांना चुकून गोळ्या लागल्या. एवढ्या मोठ्या देशात असे होतच असते. अर्थात, त्या कोणी मारल्या याचा शोध व त्यांना शिक्षा होणारच आहे.)

म्हणजे, मी काही लिहिले तर तसा मलाही धोका नाही. मी कन्हैयाच्या आधीच्या पिढीतला. नामदेव-राजाच्या नंतरच्या पिढीतला. आणि मी काही त्यांच्यासारखं लिहीत नाही. प्रमाण भाषेत, सदाशिवपेठी वगैरे सभ्यता पाळून लिहिणारा आहे. मी चिंतन म्हणून- खरं म्हणजे काही शंका म्हणून भीत भीत बोट वर करतो एवढेच.

तर माझ्या या काही शंकाः

राष्ट्रप्रेम म्हणजे काय? राष्ट्रभक्ती म्हणजे काय? राष्ट्रवाद म्हणजे काय? या तिन्हींचा अर्थ एकच की त्यात काही फरक आहे?

मला माझ्या राष्ट्राबद्दल प्रेम असायलाच हवे, असे कामाझे राष्ट्र काही गैर वागत असेल, तर मला त्याच्याबद्दल प्रेम का वाटावे? म्हणजे हिटलरप्रमाणे जर ते वंशद्वेष करत असेल, दुसऱ्या देशांवर मुद्दाम, साम्राज्यवादी पद्धतीने आक्रमण करत असेल, तरीही मला त्याच्याविषयी प्रेम असावे?

या प्रश्नावर थबकायला होते. पण, कोणी असा प्रश्न विचारला, तुला तुझ्या आईबद्दल प्रेम आहे का? याला उत्तर हो असेल. पण ती जर वाईट असेल तर? होय. तरीही असेल. आपल्या मुलासाठी वाटेल ते पण सन्मार्गाने कष्ट करणारी आई असते, तसेच चोऱ्या करुन आपल्या लेकराला सुख देण्याचा प्रयत्न करणारीही आई असू शकते. अशा आईबद्दलही मुलाला प्रेम असते. पण फक्त प्रेमच असते. तिच्याबद्दल अभिमान असत नाही. ती त्याच्या नजरेत श्रेष्ठही असत नाही. तिने वाईट काम करु नये, असेच त्याला वाटते. ती चोरी करताना पकडली गेली, तर तिला सोडवायलाही तिचे मूल (मुलगा किंवा मुलगी) प्रयत्न करेल. कारण ती त्याची आई आहे. त्याचे तिच्यावर प्रेम आहे. पण ती श्रेष्ठ बाई नक्की नसते. या उदाहरणात, मुलाच्या जागी आई व आईच्या जागी मुलाला ठेवले, तरीही तेच. आपला मुलगा चोऱ्यामाऱ्या करताना पकडला गेला, तरी आईचा जीव तुटतच असतो. तो चांगला असतो म्हणून नव्हे, तर तो तिचा मुलगा असतो म्हणून. सर्व गुणांनी श्रेष्ठ अशी दुसऱ्याची आई किंवा दुसऱ्याचे मूल असेल, तर तिला/त्याला वस्तुनिष्ठपणे श्रेष्ठ जरुर म्हणता येईल, पण तिच्यावर/त्याच्यावर प्रेम असायला हवे, अशी सक्ती नसते. पूर्वअटही नसते.

देशाच्या बाबत, गावाच्या बाबत असेच असते. मी जिथे जन्माला आलो, त्या गावाबद्दल, तिथल्या निसर्गाबद्दल (तो रुक्ष का असेना) मला एक जिव्हाळा, प्रेम असते. देशाचेही तसेच. माझ्या देशाबद्दल मला प्रेम असते. तो इतर देशांशी चांगला वागत नसेल, तर त्याचे मला वाईट वाटते. त्याने सुधारायला हवे, अशी माझी इच्छा असते. प्रयत्न असतो. पण त्याच्याविषयी अभिमान नसतो. अभिमान तेव्हाच असू शकतो, जेव्हा, माझा देश माझ्या देशातील जनतेच्याच नव्हे; तर जगातील जनतेच्या कल्याणाची मनोकामना करत तिच्या हितासाठी प्रयत्नरत राहील.

या तर्काप्रमाणे माझ्या भारत देशाबद्दल मला प्रेम आहे. ...आणि अभिमान? अर्थातच आहे. सकारण आहे. अखिल मानवाच्या हिताची कामना करणारा सर्वेपि सुखिन सन्तुहा वेदघोष किंवा बुद्धाचे सब्बे सत्ता सुखि होन्तु हे ऊर्जस्वल सुत्त किंवा ज्ञानेश्वरांचे पसायदान, निरीश्वरवादी चार्वाकापासून सम्राट अशोक, सम्राट अकबर ते कबिरापर्यंतचा विचार-संस्कृतीच्या बहुलतेचा वारसा ही मला अभिमानाची बाब आहे.

अशा गुणसंपन्न देशाचा नागरिक या नात्याने मी देशभक्त-राष्ट्रभक्त असणे स्वाभाविक नव्हे काय? -इथे मला अडचण आहे. माणसे देवाची भक्त असतात. त्याला वैज्ञानिक तर्क काही नसतो. ती श्रद्धा असते. ती अंधही असू शकते. जोवर एखाद्याच्या श्रद्धेचा-भक्तीचा दुसऱ्याला त्रास होत नाही, तोवर हे ठीक. पण मी ज्याचा भक्त आहे, तोच सर्वश्रेष्ठ देव किंवा मी ज्याचा भक्त आहे, तोच सर्वश्रेष्ठ देश असे झाले की गडबड होऊ शकते. देव, देश अन् धर्मासाठी प्राण घेतले हातीया पंक्ती कितीही रक्त उचंबळवत असल्या तरी आजच्या आधुनिक इहवादी युगात माझ्या मनात हा प्रश्न आलाच पाहिजे- का? मी प्राण हाती का घ्यावेत? हा देश, देव, धर्म केवळ माझा आहे म्हणून? आपण ज्या अतिरेक्यांशी लढतो, त्यांना यमसदनास पाठवल्याचा आनंद साजरा करतो, ते अतिरेकी त्यांच्या विशिष्ट हेतूसाठी काम करणाऱ्या गटा-समुदाया-देशासाठी शहीदच असतात. म्हणजे भक्ती दोन्हीकडे असते. आपली भक्ती चांगली व दुसऱ्याची वाईट असे कसे असू शकते?

म्हणूनच मी राष्ट्रप्रेमी आहे. त्याला कारण एवढेच हे राष्ट्र माझे आहे. पण मी राष्ट्रभक्त नाही. राष्ट्राभिमानी जरुर आहे. त्याला माझ्या राष्ट्राच्या उन्नत परंपरांचे कारण आहे. राष्ट्रभक्तीत माझे राष्ट्र कसेही वागो, ते मला आदर्श असायलाच हवे, असा आग्रह आहे. त्यातून होणारी कृती ही केवळ भावनिक नाही, तर या भावना दुसऱ्या राष्ट्राची न्याय्य बाजू दुर्लक्षिणाऱ्या, पर्यायाने त्याच्यावर अन्याय करणाऱ्या असू शकतात.

या चर्चेनंतर आणखी एक संकल्पना उभी ठाकते, ती म्हणजे राष्ट्रवाद. राष्ट्र ही संस्था कशी तयार झाली, राष्ट्रवादाचा कसा जन्म झाला याची चर्चा हा एक स्वतंत्र अध्याय आहे. त्या खोलात इथे जात नाही. राष्ट्रवाद याचा मला लागणारा साधा अर्थ असा आहे- ज्यामुळे माझ्या राष्ट्राचा मला अभिमान वाटतो अशा भूमिकांचा समुच्चय म्हणजो आमचा राष्ट्रवाद. माझा देश माझ्या देशातील सर्वांच्या कल्याणासाठी प्रयत्नरत आहे. देशवासीयांतील दुबळ्यांसाठी (स्त्रिया, दलित, आदिवासी इ. समाजविभाग तसेच मागास राहिलेले प्रादेशिक विभाग) ते लवकरात लवकर इतरांच्या बरोबरीने यावेत म्हणून तो खास सवलती ठेवतो. योजना आखतो. अल्पसंख्याकांना सुरक्षित वाटेल याची दक्षता घेतो. देशातील नागरिकांच्या मतांचा (मग ती मते राष्ट्राला कितीही दोष देणारी असो) आदर करतो. राष्ट्राला दोष देणारे मत म्हणजे देशद्रोह असे न मानता त्यांच्याशी संवाद करत राहतो. स्वतःच्या रक्षणासाठी सदैव सज्ज असतो, पण दुसऱ्या देशावर स्वतःहून आक्रमण करत नाही. या सर्व भूमिकांचा समुच्चय म्हणजे आमचा राष्ट्रवाद. आम्ही स्वतंत्र झालो. मात्र अशा नवस्वतंत्र देशांच्या विकासासाठीही अलिप्त राष्ट्रांची संघटना बांधून आम्ही कार्यरत झालो. जागतिक शांततेसाठी प्रयत्न करु लागलो. शेजाऱ्यांशी काही कारणाने झालेल्या तणावाप्रसंगी लगेच युद्धासारखा मार्ग न अवलंबता जास्तीत जास्त चर्चेने उपाय शोधायचा आपण प्रयत्न करत आलो. आमचा हा व्यवहार राष्ट्रवादी व्यवहार आहे. माझा राष्ट्रवाद दुसऱ्या राष्ट्राला हानिकारक नाहीच; उलट त्याच्या उन्नतीची कामना करणारा व त्याला सहाय्य करणारा आहे.

राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्त, राष्ट्रवाद या संकल्पनांची अशी का म्हणून पिसं काढायची? कारण समाजातील हितसंबंधीयांकडून आणि खुद्द संसदेत सरकारकडूनच जेव्हा या तसेच राष्ट्राचा पाया असलेल्या अन्य सांविधानिक मूल्यांच्या अर्थाचा पिसारा व पसारा केला जातो, तेव्हा या पिसांच्या मुळांशी जाणे एक राष्ट्रप्रेमी, राष्ट्राभिमानी व राष्ट्रवादी म्हणून आपले आद्यकर्तव्य आहे. राष्ट्र हा केवळ सीमाबद्ध भूप्रदेश नाही; तर राष्ट्र ही एक भूमिका आहे. चलाख स्मृतीने ती विस्मृतीत ढकलू नये, यासाठी दक्ष राहायलाच हवे.
-          सुरेश सावंत
__________________________________
साभारः मी मराठी लाईव्ह, ११ मार्च २०१६

No comments: