Monday, December 5, 2016

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत रिपब्लिकन पक्ष

मराठा आंदोलनानंतर आंबेडकरी चळवळीत खळबळ, घुसळण सुरु झाली आहे. या घुसळणीतून आंबेडकरी चळवळीला व एकूणच पुरोगामी चळवळीला बळ मिळावे, सम्यक वळण लागावे अशी अनेकांची इच्छा आहे. तशी शक्यताही आहे. अर्थात, त्यासाठी या घुसळणीत सहभागी कार्यकर्त्यांनी आत्मचिकित्सा करणे गरजेचे आहे. केवळ क्रियेला प्रतिक्रिया यात समाधान मानता कामा नये. आपल्या अस्तित्वाची नोंद उमटवणे हेच आंदोलनाचे एकमेव इप्सित समजू नये. आजवरच्या आंबेडकरी चळवळीचे मूल्यांकन व पुढील दिशा यावर गंभीर विचारमंथन होणे गरजेचे आहे. या विचारमंथनात अनेक बाबी येऊ शकतात. तथापि, त्या सगळ्यात प्राथमिक महत्वाची बाब आहे ती बाबासाहेबांना काय अभिप्रेत होते ते समजून घेणे. आत्मचिकित्सेचे निकष, मापदंड काही प्रमाणात त्यातून मिळू शकतात. बाबासाहेबांना जे अभिप्रेत होते त्यातला एक प्रमुख भाग आहे रिपब्लिकन पक्षाची उभारणी. आयुष्याच्या अगदी अखेरीला त्यांनी याबाबत आपले म्हणणे मांडले आहे. रिपब्लिकन पक्षात सहभागी होण्यासंबंधी भारतीय जनतेला आवाहन करणारे हे टिपण ‘खुले पत्र‘ म्हणून ओळखले जाते. ‘प्रबुद्ध भारता’त १९५७ साली ते प्रसिद्ध झाले आहे. तो दादासाहेब रुपवतेंनी इंग्रजीतून मराठीत केलेला अनुवाद आहे. महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन व भाषणे, खंड २०’ मध्येही त्याचा समावेश केलेला आहे. हे पत्र बरेच दीर्घ आहे. ते मुळातूनच वाचणे गरजेचे आहे. त्याचे महत्व अधोरेखित करावे व मला कळीच्या वाटणाऱ्या त्यातील काही मुद्द्यांकडे लक्ष वेधावे यादृष्टीने खालील विवेचन करत आहे.

मूळ पत्राचा अर्थ नीटपणे समजावा यासाठी काही संदर्भ आधी ध्यानात घेऊ.

आपल्या शालेय पाठ्यपुस्तकात व लोकमानसातही बाबासाहेब हे दलितांचे कैवारी व संविधानाचे शिल्पकार अशी मर्यादित ओळख जाणतेअजाणतेपणी असते. ही ओळख अत्यंत अपुरी आहे. त्यांच्या १२५ व्या जयंती निमित्ताने ज्या चर्चा प्रसारमाध्यमांतून झडल्या त्यातून देशउभारणीसाठी बाबासाहेबांनी केलेले विविधांगी चिंतन व हस्तक्षेप सर्वसामान्यांच्या ध्यानात यायला काही प्रमाणात मदत झाली. दलितोद्धार हे परिस्थितीने त्यांच्यावर सोपवलेले प्राधान्याचे काम होते यात शंका नाही. पण एकूण पीडित, कष्टकरी, कामगार, स्त्रिया यांच्या उन्नतीशी, देशातील लोकशाही समृद्ध होण्याशी दलितांची मुक्ती निगडित आहे ही त्यांची धारणा होती. ते खरेखुरे भारतीय होते. मी प्रथम भारतीय आहे व अंतिमतःही भारतीय आहे, या भारतीयत्वाला धर्म, जात, प्रदेश, भाषा या अन्य निष्ठांनी छेद जाता कामा नये, ही त्यांची भूमिका होती. बुद्ध धम्माचा स्वीकार ही दलितांच्या आयुष्यात प्रचंड उलथापालथ घडवणारी, मन व जीवन उन्नत करणारी क्रांती होती हे खरेच. परंतु, भारतातील तसेच जगातील मानवी जीवन मनपरिवर्तन, वैज्ञानिक दृष्टिकोन, बंधुता, लोकशाही, समता या आधारे विकसित व्हावे ही त्यांची मूळ प्रेरणा होती. समस्त भारतीयांचे तसेच अखिल मानवजातीचे कल्याण हा बाबासाहेबांच्या व्यक्तित्वाचा मज्जारज्जू आहे. त्यांच्या प्रासंगिक कृती व भूमिकांकडे काहीजण तुटकपणे पाहून काही निष्कर्ष काढण्याची घाई करतात, त्यांनी हे नीट लक्षात घेणे गरजेचे आहे.

राजकारणाचे एक साधन म्हणून जे राजकीय पक्ष बाबासाहेबांनी स्थापन केले त्यांच्या प्रवासाबाबतही तसेच पाहावे लागते. १९२७ ला चवदार तळ्याच्या सत्याग्रहाद्वारे अस्पृश्यांच्या समतेच्या अधिकाराचे बिगूल फुंकणारे बाबासाहेब १९३६ साली स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना करतात. पक्षाच्या नावातच मजूर ही व्यापक संज्ञा आहे. त्यात विशिष्ट जात अनुस्यूत नाही. या पक्षाच्या जाहिरनाम्यात भूमिहीन, गरीब कुळे, शेतकरी आणि कामगार यांची गाऱ्हाणी व सत्तेवर आल्यास करावयाच्या उपाययोजनांचे आश्वासन आहे. धनंजय कीरकृत आंबेडकर चरित्रात एका इंग्रजी दैनिकाची दिलेली नोंद अशी आहे- ‘जरी आमचे मत राजकीय पक्षांच्या संख्येत वाढ होऊ नये असे असले तरी, आंबेडकरांनी स्थापलेला नवा पक्ष ह्या प्रांतातील जीवन समृद्ध करण्याच्या दृष्टीने नि देशाच्या भवितव्याला वळण लावण्याच्या कामी अत्यंत उपयोगी पडेल.’ १९३७ च्या प्रांतीय निवडणुकांत लढवलेल्या १७ जागांपैकी १४ जागांवर या पक्षाचे उमेदवार निवडून आले. हा मोठाच विजय होता. विशेष म्हणजे त्यात शामराव परूळेकर, भाऊसाहेब राऊत असे अनेक अस्पृश्येतर नेते होते. 

बाबासाहेबांच्या या व्यापक व समग्र परिवर्तनाच्या प्रवासात पेच निर्माण झाला तो १९४२ च्या क्रिप्स योजनेने. क्रिप्स यांनी दुसरे महायुद्ध संपल्यावर भारताच्या नव्या राज्यघटनेसाठी घटनासमिती तयार करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्यात हिंदू व मुसलमानांना स्वतंत्र घटक म्हणून विचारविनिमयात गृहीत धरण्यात आले होते. मात्र अस्पृश्यांचा विचार केलेला नव्हता. बाबासाहेब क्रिप्स यांना भेटले तेव्हा त्यांनी तुम्ही कामगारांचे प्रतिनिधी की दलितांचे असा प्रश्न केला. स्वतंत्र मजूर पक्षामुळे बाबासाहेबांची प्रतिमा कामगार नेता म्हणूनच पुढे आलेली होती. भारताच्या नव्या राज्यघटनेत दलितांच्या उन्नतीसाठी काही उपाययोजना आणावयाच्या असल्या तर तिथे त्यांचा भक्कम प्रतिनिधी असणे गरजेचे होते. कामगार नेता म्हणून त्यांना हा अधिकार मिळत नव्हता. दलितांचा नेता ही ओळख त्यांना असणे गरजेचे झाले. प्रसंग बिकट व वेळेची मर्यादा होती. अशावेळी स्वतंत्र मजूर पक्ष बरखास्त करुन शेड्युल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना १९४२ साली बाबासाहेबांनी केली.

पुढे देशाच्या स्वातंत्र्याचा अखेरचा संग्राम, स्वातंत्र्य, फाळणी, भारतीय संविधानाची निर्मिती हा देशाच्या जीवनातला विलक्षण घडामोडींचा काळ होता. भारतीय संविधानात बाबासाहेबांनी केलेली कामगिरी, त्यांची त्यातील भाषणे त्यांच्या व्यापक व समग्र दृष्टीचा प्रत्यय देतात. खुद्द नेहरु, राजेंद्र प्रसाद तसेच संविधान सभेतील अनेक महनीय नेत्यांनी त्यांची वर्णिलेली महत्ता याची साक्ष आहे.

घटना अमलात आल्यानंतर भारतीय राजकीय जीवनाच्या प्रवासात लोकशाहीच्या रक्षणासाठी प्रबळ विरोधी पक्षाची उणीव त्यांना सतत जाणवत होती. त्यातूनच रिपब्लिकन पक्षाची संकल्पना त्यांच्या मनात रुंजी घालत होती. आजारपणाने जर्जर असतानाही बुद्ध धम्माची दीक्षा, बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाची रचना व रिपब्लिकन पक्षाच्या संकल्पनेचे सूतोवाच करुनच त्यांनी या जगाचा निरोप घेतला. हा निरोप घेताना त्यांनी आदल्या दिवशी लिहिलेली दोन पत्रे त्यांच्या टेबलावर होती. एक आचार्य अत्रे यांना व दुसरे एस. एम. जोशी यांना. हे दोघेही संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील आघाडीचे नेते. या पत्रांत बाबासाहेबांनी त्यांच्या संभाव्य रिपब्लिकन पक्षात त्यांनी सहभागी व्हावे, याचे आवाहन होते. हे दोघेही ब्राम्हण व जोशी तर खास गांधींच्या प्रभावाखालचे. तथापि, नव्या पक्षाच्या नेतृत्वात त्यांच्या समावेशाला यामुळे काही बाधा येते असे बाबासाहेबांना वाटत नसावे.

धम्मदीक्षेच्या समारोहादरम्यान नागपूर मुक्कामी बाबासाहेब आपल्या सहकाऱ्यांना जे म्हणाले त्यातून नव्या पक्षाच्या स्थापनेमागची त्यांची भूमिका स्पष्ट होते. ते म्हणतात, ‘शेड्युल्ड कास्ट फेडरेशनने दलित वर्गात स्वाभिमान व आत्मप्रतिष्ठा निर्माण केली आहे. परंतु, दलित वर्गीयांनी आपल्यामध्ये आणि इतर समाजामध्ये एक मोठी भिंत उभी केली आहे. परिस्थिती अशा थराला आली आहे की, अस्पृश्य वर्गातील उमेदवारांना इतर लोक मते देत नाहीत आणि ते स्वतःसुद्धा दुसऱ्या पक्षातील उमेदवारांना मते देत नाहीत. तेव्हा त्यांनी ज्या लोकांना दलितांच्या गाऱ्हाण्यांविषयी सहानुभूती आहे, त्यांच्या सहाय्याने एक राजकीय पक्ष स्थापावा आणि दुसऱ्या पक्षातील नेत्यांबरोबर काम करण्याचा प्रयत्न करावा. आता परिस्थितीचा आढावा घेण्याची वेळ आली आहे.’

तथापि, बाबासाहेब स्वतः त्यांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्षाची स्थापना करु शकले नाहीत. त्याआधीच त्यांचे महापरिनिर्वाण झाले होते. त्यांच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांनी नंतर १९५७ साली त्याची स्थापना केली. या नेत्यांकडून झालेला या पक्षाचा प्रवास हा अर्थातच बाबासाहेबांना अभिप्रेत नव्हता. त्याविषयी तमाम टीकाटिप्पणी झाली आहे. त्यामुळेच तर पँथरचे बंड या रिपब्लिकन नेत्यांविरोधात झाले. तो प्रवास आपण इथे पाहत नाही. ज्याचा हवाला देत हा प्रवास झाला त्या खुल्या पत्रातील बाबासाहेबांची पक्षसंकल्पना आपण पाहत आहोत. तिच्या परिशीलनाने आजच्या स्थितीत आपल्याला काही वाट सापडते का हे शोधत आहोत.

हे संदर्भ ध्यानात घेतल्यावर आता मूळ पत्राकडे वळू.

या पत्रात (टिपणात) ५ भाग आहेत. ते असेः १) चळवळीला राजकीय पक्षाचे स्वरुप कसे प्राप्त होते २) संसदीय आधुनिक लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी आवश्यक गोष्टी ३) संसदीय राज्यपद्धतीत विरोधी पक्षाची आवश्यकता का असते? ४) पक्ष म्हणजे काय? ५) ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’ची ध्येय व उद्दिष्टे.

पहिल्या भागात इंग्रजांविरोधी लढा देत असताना आधी सुराज्य व मग संपूर्ण स्वातंत्र्य या काँग्रेसच्या उद्दिष्टांत तिच्या स्थापनेपासून स्वातंत्र्य मिळेपर्यंत कसा बदल झाला याचा आढावा घेऊन बाबासाहेब काँग्रेसच्या स्वरुपाची नोंद ‘येथपर्यंतचे काँग्रेसचे स्वरुप हे संसदीय लोकशाही यशस्वी करण्यासाठी उभारलेल्या सैन्यासारखे नसून परकीय सत्तेच्या विरुद्ध युद्ध करण्यासाठी एकत्रित केलेल्या पलटणीसारखे होते’ अशी करतात. पुढे ते म्हणतात, ‘ह्याची कल्पना असल्यामुळेच काँग्रेस ही संस्था बरखास्त करण्याची आणि स्वराज्यातील सरकार चालविण्यासाठी पक्षपद्धतीने बांधलेला नवीन पक्ष उभारण्याची अत्यंत सूज्ञ सूचना श्री. गांधी यांनी केली होती. ...सर्वसाधारणपणे अशी राजनैतिक परंपरा आहे की, शांततेच्या प्रस्थापनेनंतर युद्ध काळात उभारलेले सैन्य बरखास्त करावे लागते. याचे कारणही उघड आहे. लढाईच्या काळात सैन्य भरती करताना योग्य ती पथ्ये पाळलेली नसतात.’ काँग्रेसच्या गेल्या १० वर्षांच्या कारभाराचा अनुभव भूषणवाह नसल्याचे सांगून ते पुढे म्हणतात, ‘श्री. गांधी याच्या सल्ल्याचा विचार गंभीरपणे करण्याची आणि संसदीय लोकशाहीतील विरोधी पक्ष म्हणून काम करील असा पक्ष उभारण्याची वेळ आता आली आहे.’

दुसऱ्या भागात संसदीय लोकशाहीच्या यशस्वीतेसाठीच्या आवश्यक गोष्टींची नोंद करण्याआधी ते लोकशाही व्यवस्थांच्या स्वरुप व उद्दिष्टांच्या जागतिक पातळीवरील उत्क्रांतीचा परिचय करुन देतात. लोकशाहीच्या विविध व्याख्यांचाही आढावा घेतात. तदनंतर ते स्वतःची व्याख्या नोंदवतात. ते म्हणतात, ‘लोकांच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनात क्रांतिकारक बदल रक्तविरहित मार्गांनी घडवून आणणारी शासनपद्धती म्हणजे लोकशाही होय.’

बाबासाहेबांना समाजजीवनात क्रांतिकारक बदल अभिप्रेत आहेत, पण ते रक्तविरहित मार्गांनी. ही त्यांची भूमिका त्यांच्या अन्य लेखन व भाषणांतून सतत व्यक्त झालेली आपल्याला दिसते. सनदशीर लोकशाही मार्गावरची त्यांची निष्ठा अविचल आहे.

लोकशाहीच्या यशसिद्धीसाठी पहिली अट ते नोंदवतात ती म्हणजे समाजव्यवस्थेत विषमता नसली पाहिजे. ते म्हणतात, ‘सर्व हक्क व सत्तेचे केंद्रीकरण ज्यांचे ठायी झाले आहे असा वर्ग एका बाजूला व सर्व प्रकारचे भार वाहण्याचे काम करणारा वर्ग दुसऱ्या बाजूला अशी विभागणी असू नये. अशी विषमता, अशी अन्यायकारक विभागणी व त्यावर आधारलेली समाजरचना यांमध्ये हिंसात्मक क्रांतीची बीजे असतात आणि मग त्यांचे परिमार्जन करणे लोकशाहीला अशक्य होते.’

लोकशाहीच्या यशासाठी ज्या पुढच्या अटी बाबासाहेब नोंदवतात त्यात एक आहे, वैधानिक व कारभारविषयक क्षेत्रांत पाळावयाची समता. ‘कायद्यापुढे सर्व समान’ या तत्त्वाला ते इथे खूप महत्व देतात. त्याचे विवेचन करताना ते देशातील, देशाबाहेरील अनेक उदाहरणे देतात. (या त्यांच्या वैशिष्ट्याचा पुन्हा पुन्हा उल्लेख करण्याची खरे म्हणजे गरज नाही. त्यांचा एकूण दृष्टिकोणच जागतिक आहे. जागतिक पटावर ते भारतातले वास्तव व त्यावरची उपाययोजना तपासत असतात.) इथे सत्तेतल्यांनी आपल्या हितसंबंधीयांवर मेहेरनजर दाखवता कामा नये. सर्वांप्रती समभाव ठेवायला हवा असे त्यांना अपेक्षित आहे. सत्ताधारी पक्षाचे लोक अधिकाऱ्यांना ‘हे बघा, तुम्ही जर आमचे एवढे काम केले नाही तर मंत्र्याला सांगून तुमची दूर बदली करायला लावीन’ असे म्हणू लागले तर ‘राज्यकारभार केवढा अन्यायकारक व गोंधळाचा होईल याची कल्पनाच केलेली बरे!’ असे त्यांना वाटते.

त्यांनी स्वतः व्हाईसरॉयच्या मंत्रिमंडळात PWD खात्याचे मंत्री असतानाचा अनुभव नोंदवला आहे. ते म्हणतात, ‘प्रत्येक व्हाईसरॉयच्या नावाचा कोणता तरी रस्ता किंवा क्लब दिल्लीमध्ये आहे. फक्त लॉर्ड लिनिलिथगो यानेच स्वतःचे नाव कोणत्याही स्थळाला किंवा संस्थेला देवविले नाही. त्यांचा खाजगी चिटणीस माझा मित्र होता. माझ्या अखत्यारित पुष्कळ कामे चाललेली होती. तो मजकडे आला आणि म्हणाला, ‘डॉक्टरसाहेब, लॉर्ड लिनलिथगोंचे नाव कोणत्या तरी संस्थेला किंवा स्थळाला देण्याबाबत तुम्ही काही करु शकणार नाही काय? ’ माझा युरोपियन सेक्रेटरी श्री. प्रायर ह्यास मी म्हटले, ‘..आपण याबतीत काही करु शकणार नाही काय?’ आणि त्याने काय उत्तर दिले? तो म्हणाला, ‘साहेब, आपण अशी कोणतीही गोष्ट करु नये.’ सध्याच्या परिस्थितीत या देशात असे उत्तर मिळणे दुरापास्त आहे. मंत्र्यांच्या मताविरुद्ध बोलणे आज कोणत्याही सेक्रेटरीला शक्य नाही.’ पुढे ते म्हणतात, ‘सरकारचे काम हे धोरण ठरविण्याचे आहे. हस्तक्षेप किंवा पक्षपात करण्याचे नाही. ही बाब मूलभूत स्वरुपाची असून तिच्यापासून आपण आज दूर जात आहोत. तिचा त्याग करीत आहोत.’

ज्यांचे सरकार असेल त्यांनी आपल्या लोकांची व एखाद्या समूहाची मते वळवण्यासाठी तो मानत असलेल्या व्यक्ती-विभूतींची नावे देणे हा आज परिपाठ झाला आहे. आपल्या कामासाठी अधिकाऱ्यांना मंत्र्यांच्या जवळच्यांनी धमकावणे किंवा त्यालाच त्या साखळीचा भाग करणे हेही नित्याचे आहे. रिपब्लिकन पक्षाचा मंत्री झाल्यावर त्या पक्षाचे कार्यकर्तेही हेच करतात, हा आपला अनुभव आहे. त्यांना त्यात काहीही वावगे वाटत नाही. उलट रेशन दुकाने, पेट्रोलपंप मिळवण्यासाठी, छोट्याछोट्या सत्तास्थानांवर जाण्यासाठी, पैसा गोळा करण्यासाठीच तर सत्तेत जायचे असते, ही त्यांची धारणा झाली आहे. ‘आपल्या लोकांची कामे आपण नाही करणार तर कोण?’ असे अश्लाघ्य समर्थनही त्यामागे असते. आपल्या सत्तेचा वापर सबंध दलित समूहाच्या विकासासाठीची धोरणे ठरवण्यासाठी व त्यांची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी करायचा असतो, हे त्यांच्या गावीही नसते. आज शहरात व खेडोपाड्यांतही रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते सत्तेचे दलाल झालेले मोठ्या प्रमाणात आढळतात. इंदू मिलचे स्मारक, बाबासाहेबांचा समुद्रात पुतळा अशा भावनिक मागण्या केल्या की समाज खूष होतो व आपल्या मागे राहतो, हे त्यांना ठाऊक असते. त्यामुळे त्यासाठी मधून मधून आंदोलने केली की सत्तेच्या दलालीच्या दैनंदिन कामाला ते मोकळे होतात. सामान्य लोकही ओळखीने कामे करण्याच्या या रीतीला इलाज-नाईलाजनाने बळी पडलेले आढळतात. एकूण धोरण बदलाच्या लढ्याऐवजी हा शॉर्टकट त्यांना भुरळ घालतो. व्यवस्था बदलण्याऐवजी ‘खुद का देख’ ही प्रवृत्ती एकूणच बळावलेली आहे. बाबासाहेबांच्या भूमिकेनुसार लोकशाहीला हा मोठा धोका आहे.

बाबासाहेब लोकशाही यशस्वी होणासाठी पुढचा मुद्दा मांडतात तो संविधानात्मक नीतीचा. ते म्हणतात, ‘आपली राज्यघटना ही कायदेशीर तरतुदींचा व तत्त्वांचा नुसता सांगाडा आहे. ह्या सांगाड्याला आवश्यक असलेले रक्तमांस संविधानात्मक नीतिमत्तेच्या पालनातच मिळेल.’ अशा नीतिमत्तेचे उदाहरण म्हणून अमेरिकन जनतेला देवासमान असलेले अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष वॉशिंग्टन यांना दुसऱ्यांदा अध्यक्ष होण्याची लोकांनी गळ घातली त्यावेळी ते काय उत्तरले याची नोंद बाबासाहेब पुढे करतात, ‘..आपल्याला वंशपरत्वे चालणारी राजेशाही, वंशपरंपरेने येणारा राजा किंवा हुकूमशहा नको होता म्हणूनच आपण ही घटना बनविली. इंग्लिश राजाशी तुम्ही या हेतूनेच प्रेरित होऊन संबंध तोडले आहेत. मग माझी पूजा करुन मला जर तुम्ही वर्षानुवर्षे अध्यक्ष बनवू लागलात तर तुमच्या तत्त्वांचे काय होईल?’ ..लोकाग्रहास्तव वॉशिंग्टनला दुसऱ्यांदा अध्यक्ष व्हावे लागले. पण जेव्हा तिसऱ्यांदाही त्याला गळ घालण्यासाठी लोक त्याच्याकडे गेले तेव्हा त्याने त्यांना कठोरपणे झिडकारले, अशी माहिती बाबासाहेब पुढे देतात. 

संविधानात्मक नीतीसंबंधातले इंग्लंडमधीलही एक उदाहरण ते देतात. घटनात्मक संकेताप्रमाणे राजाला पंतप्रधानाचा सल्ला इंग्लंडमध्ये ऐकावा लागतो. अन्यथा पंतप्रधान राजाला घालवू शकतो. एका प्रसंगात हुजूर पक्षाच्या पंतप्रधानांचा एक सल्ला राजाने ऐकता कामा नये व त्या प्रश्नावर पंतप्रधानाचा संसदेत पराभव व्हावा अशी मजूर पक्षाची खेळी व्हावी, असा एक विचार पुढे येतो. हुजूर पक्षातली पंतप्रधानांविषयी नाराज असलेली मंडळीही पाठीशी असतात. तथापि, असा पराभव करणे हे गैर असून ज्यायोगे राजाचे अधिकारक्षेत्र वाढेल अशी वर्तणूक आपण करु नये असा सल्ला मजूर पक्षाचेच एक नेते देतात. हा सल्ला ऐकला जातो व प्रतिस्पर्ध्याचा काटा काढण्याची अनैतिक खेळी मजूर पक्षाकडून रद्द केली जाते. या घटनेचे वर्णन करुन ‘..तात्पुरत्या सत्तेच्या विलोभनास बळी पडून पक्षनेत्यांनी आपल्या विरोधकांस मग ते सत्तेवर असोत किंवा विरोधी पक्ष म्हणून काम करत असोत, कैचित पकडण्याचे प्रसंग संविधानाची व लोकशाहीची हानी होऊ नये म्हणून’ कटाक्षाने टाळण्याचा संदेश बाबासाहेब देतात.

लोकशाही यशस्वी होण्यासाठीची पुढची अट नोंदवताना बाबासाहेब म्हणतात, ‘लोकशाहीच्या नावाखाली अल्पसंख्याकांची (अल्पमतवाल्यांची) गळचेपी होता कामा नये. अल्पसंख्याकांना सुरक्षितता वाटली पाहिजे. बहुसंख्याक मंडळी कारभार करत असली तरी आपल्याला इजा पोहोचणार नाही. आपल्यावर अन्याय होणार नाही याची हमी अल्पसंख्याकांना मिळाली पाहिजे.’ हा मुद्दा पुरेसा स्पष्ट आहे. त्याच्या अधिक विवेचनाची इथे गरज नाही. मूळ पत्रात इंग्लंड तसेच भारतातल्या लोकसभेतली काही उदाहरणे बाबासाहेबांनी या मुद्द्याच्या स्पष्टीकरणासाठी दिली आहेत.

लोकशाहीच्या यशसिद्धीसाठी पुढचा मुद्दा बाबासाहेब मांडतात तो नीतिमान समाजव्यवस्थेचा. या मुद्द्याच्या विवेचनात ‘नीतिमत्तेशिवाय राजकारण करता येते’ या समजुतीला ते आक्षेप घेतात. ‘कायदा पाळला जाण्याइतपत सामाजिक नीती समाजात निर्माण झाली असल्याची खात्री कायदे करणाऱ्यांना मिळाली पाहिजे’ असे त्यांना वाटते. प्रा. लास्की यांना उद्धृत करताना ते म्हणतात, ‘लोकशाही राज्यपद्धतीत समष्टीतील नीतिमान जीवन गृहीत धरलेले असते. सामाजिक नीतीच्या अभावी लोकशाही यशस्वी होऊ शकत नाही. ती छिन्नविछिन्न होईल.’

लोकशाही यशस्वी होण्यासाठीच्या अटींतला शेवटचा मुद्दा ते नोंदवतात तो विवेकी लोकमताचा. ते म्हणतात, ‘अन्याय कोणावरही होत असो, अन्याय दिसला रे दिसला की जागृत होऊन उठणारी शक्ती म्हणजे समष्टीची सद्सद्विवेकबुद्धी. सार्वजनिक विवेकबुद्धी याचा अर्थच असा की, जिच्या प्रादुर्भावामुळे समाजातील प्रत्येक माणूस मग तो अन्यायाचा बळी असो वा नसो, अन्यायाच्या परिमार्जनार्थ पीडितांना साथ द्यायला उभा राहतो.’ आपल्याकडे हा प्रश्न गंभीर आहे. ज्या जातीतल्या व्यक्तीवर अन्याय होतो त्या जातीतल्यांनीच त्याविरोधात आवाज उठवायचा ही रीत आपल्या समाजात आपण पाहतो आहोत. ही अत्यंत काळजीची बाब आहे.

या पत्राच्या तिसऱ्या भागात विरोधी पक्षाच्या आवश्यकतेविषयी बाबासाहेब विवेचन करतात. ते म्हणतात, ‘प्रचाराधिष्ठित सरकार व लोकशिक्षणाचा पाया घालणारे सरकार यात महदंतर आहे. प्रचार म्हणजे कोणत्याही गोष्टीची एक बाजू होय. लोकशिक्षणावर आधारलेले सरकार म्हणजे प्रत्येक प्रश्नाच्या दोन्ही बाजूंची सांगोपांग छाननी करुन कारभार करणारे सरकार होय. ज्या प्रश्नावर कायदेमंडळाला निर्णय घ्यायचा असतो त्या प्रश्नाच्या दोन्ही बाजू लोकांपुढे जाणे जरुर आहे. त्यासाठी ओघानेच दोन पक्षांची आवश्यकता असते. एकच पक्ष दोन्ही बाजू निसर्गतःच मांडू शकत नाही. एकपक्षीय कारभार म्हणजे निव्वळ हुकूमशाही होय. हुकूमशाही टाळण्यासाठी दुसऱ्या पक्षाची जरुर आहे. ही मूलभूत बाब आहे.’

पत्राचा चौथा भाग आहे ‘पक्ष म्हणजे काय?’ पुढील निवेदन बाबासाहेबांच्याच शब्दांतः

_______________

पक्ष हा सैन्यासारखा असतो. त्याला खालील बाबींची आवश्यकता असते.

१) सरसेनापतीसारखा पुढारी (नेता)

२) संघटनेत- अ) सभासद ब) मूलभूत योजना क) शिस्त या गोष्टींचा समावेश होतो.

३) ध्येय आणि धोरण, तत्त्वज्ञान

४) कार्यक्रम

५) राजकीय डावपेच व मुत्सद्देगिरी (म्हणजे तारतम्याने कोणती गोष्ट केव्हा व कशी करायची याची योजना)

सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास विशिष्ट ध्येयवादाने प्रेरित होऊन मतदारांनी केलेली संघटना म्हणजे पक्ष होय.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (भारतीय रिपब्लिकन पक्ष) ह्या संस्थेस पक्षाला मान्य असलेल्या तत्त्वज्ञानाच्या व उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी मतदारांची (जनतेची) संघटना करावी लागेल. ही पक्ष संघटना पुढीलप्रमाणे काम करीलः

१) पक्ष स्थापनेसाठी व त्याच्या संघटित वाढीसाठी झटणे; आणि पक्षाचे तत्त्वज्ञान व ध्येयधोरण यांचा प्रचार करणे.

२) पक्षाची तत्त्वे, विचारसरणी याचा प्रचार वृत्तपत्रे, सभा-संमेलने, व्याख्याने, वाङ्मय-लेखन इ. मार्गाने करणे.

३) पक्ष सभासदांच्या वतीने संयुक्त राजकीय चळवळी व राजकीय कृती करण्यासाठी निवडणुका लढविणे.

_______________

आज बहुतेक पक्ष या तिसऱ्या कामातील शेवटचा भाग ‘निवडणुका लढवणे’ हेच प्रामुख्याने करताना आढळतात. रिपब्लिकन पक्षाचा तर कोणताच गट पक्षाचे तत्त्वज्ञान व ध्येयधोरण यांचा प्रचार करताना किंवा पक्षाची तत्त्वे, विचारसरणी यांच्या प्रसारासाठी सभा-संमेलने घेताना आढळत नाही. पक्षाचे नेते अपवादात्मक रीतीने भूमिका मांडताना दिसतात, तीही निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरच. पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनाही ‘तुमच्या पक्षाचे ध्येय, तत्त्वज्ञान व कार्यक्रम काय’ अशी विचारणा केल्यास धड उत्तर मिळत नाही. बाबासाहेबांनी अपेक्षिलेली पक्षरचना व कार्यक्रम याविषयीची आंबेडकरी चळवळीतील स्थिती अगदीच दयनीय व संतापजनक आहे.

या पत्राचा शेवटाचा भाग आहे- 'रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया' ची ध्येय व उद्दिष्टे. बाबासाहेब ती अशी नोंदवतात :

_______________

१) भारतीय घटनेच्या उपोद्घाता (PREAMBLE) मधील ध्येय व उद्दिष्ट साध्य करणे हेच रिपब्लिकन पक्षाचे ध्येय व उद्दिष्ट राहील.

२) हा पक्ष स्वातंत्र्य, समता व बंधुत्व यांच्या प्रस्थापनेसाठी आग्रह धरील आणि एका माणसाकडून दुसऱ्या माणसाची, एका वर्गाकडून दुसऱ्या वर्गाची, किंवा एका राष्ट्राची दुसऱ्या राष्ट्राकडून होणारी पिळवणूक व दडपशाही यांना पायबंद घालील.

३) सर्व भारतीयांना समान न्याय मिळेल; एवढेच नव्हे तर समान न्याय हा प्रत्येक भारतीयाचा हक्क आहे असे मानण्यात येईल. आणि यानुसार जेथे समता नाही तेथे ती आणण्यासाठी पक्ष झटेल व जेथे ती नाकारण्यात येते, तेथे ती राबविण्यासाठी लढा देईल.

४) प्रत्येक व्यक्तीचे सुख हा केंद्रिबदू समजण्यात येईल आणि आपल्या उद्धारास्तव प्रयत्न करण्याची प्रत्येक व्यक्तीस समान संधी मिळेल. शासन संस्था ही, हे ध्येय मिळविण्यासाठी वापरावयाचे साधन होय.

५) इतर देश बांधवांच्या हक्कांचे व शासन संस्थेच्या आवश्यक तेवढ्या अधिकारांचे संरक्षण करून प्रत्येक नागरिकांस धार्मिक, आर्थिक, राजकीय स्वातंत्र्य असले पाहिजे असे हा पक्ष मानील.

६) प्रत्येक भारतीय नागरिकांस समान संधीचा अधिकार असल्याचे हा पक्ष मान्य करील. अर्थात, ज्यांना आत्मोन्नतीसाठी कधीच संधी मिळालेली नसेल त्यांना संधी मिळालेल्या लोकांपेक्षा अग्रक्रम देण्याचे तत्व पक्ष अंगीकारेल.

_______________

घटनेचे शिल्पकार असलेले बाबासाहेब आंबेडकर घटनेचा सरनामा अमलात आणणे हेच आपल्या पक्षाचे ध्येय व उद्दिष्ट ठरवतात, हे अन्वर्थक तर आहेच. तथापि, बाबासाहेबांच्या भारतीयत्वाची ओळख बुलंद करणारीही ही कृती आहे. उद्दिष्टे, स्वरुप किंवा कार्यक्रमात कोठेच दलित वा बौद्धांना प्राधान्य दिलेले आढळत नाही. तो सबंध भारतीयांचा पक्ष आहे. वर म्हटल्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीचे सुख हा तिचा केंद्रिबदू आहे. राजकीय दिशेसंबंधी, त्यासाठीच्या पक्ष या साधनाविषयी इतकी सुस्पष्ट भूमिका व आराखडा बाबासाहेबांनी दिलेला असताना आंबेडकरी चळवळीचे हे असे भजे का व्हावे, याची मराठा आंदोलनानंतर क्रियाशील झालेल्या आंबेडकरी समूहातील तरुणांनी चिकित्सा करणे गरजेचे आहे. याचा अर्थ, त्यासाठीचे केवळ परिसंवाद घेत राहा किंवा रिसर्च पेपर्स वाचत राहा असे नाही. तर जे दोष बाबासाहेबांच्या नंतर आजपर्यंतच्या आंबेडकरी चळवळीत निर्माण झाले व त्यामुळे बाबासाहेबांना अभिप्रेत रिपब्लिकन पक्ष आकारास येऊ शकला नाही, ते दुरुस्त करण्याचे उपाय यातून सापडावेत हा हेतू त्यामागे असावा.

अशी चिकित्सा करुन बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला खराखुरा रिपब्लिकन पक्ष उभारण्यासाठी आंबेडकरी तरुण पुढे येतील का?

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

___________________________________

आंदोलन, डिसेंबर २०१६

No comments: