Friday, January 27, 2017

राष्ट्रवादासंबंधी काही; बरेच काही...


राष्ट्रवादावर लिहायचं ठरवलं तेव्हा वाटलं नव्हतं हा विषय एवढा जटील असेल. फक्त अनुभवावर आधारित लेखन होऊ नये. त्यात काही सैध्दांतिक चिकित्साही असावी, यादृष्टीने संदर्भ शोधायला लागलो. पुस्तकं धुंडाळली, कात्रणं काढली, गूगल केलं, यूटयूब पाहिलं-ऐकलं. काहींशी बोललो. जसजसं खोलात जाऊ लागलो तसतसा रुततच चाललो. गृहीत प्रश्नांच्या पलीकडे अनेक नवे प्रश्न उभे राहू लागले. लेख देण्याची मुदत जवळ आली पण मनात काही संगती लागेना. मी काही व्यासंगी अभ्यासक नाही. कार्यकर्ता म्हणून, फारतर एक विचारी, चौकस कार्यकर्ता म्हणून भोवतालच्या घटनांना प्रतिसाद देण्यासाठी लिहीत असतो. त्यासाठी गरजेनुसार वाचतो. तेवढ्यावर जमून जाते. पण या विषयाचे तसे काही जमत नाही असे लक्षात आले. पेपरची वेळ झाली आणि अभ्यास पुरा नाही, अशी ही स्थिती. हा लेख अजून तयारीने लिहावा, तूर्त हा विषय बदलावा व जमणाऱ्या विषयावर लिहावे, असे एकदा मनात आले. पण मग असेही वाटले, एक कार्यकर्ता, एक सजग नागरिक या नात्याने आपल्याला या विषयावर काहीच म्हणायचे नाही का? ..तर नक्की काही म्हणायचे आहे. ते भलेही सैध्दांतिक नसेल. पुरेसे संदर्भ त्याला नसतील. विषयाची समग्रता नसेल; पण सामान्यांना, माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना पडणारे प्रश्न व त्याबाबतचे समज, अभिप्राय त्यात असतील. ते नोंदवावे. त्यास आपल्यातले जाणते वाचक, तज्ज्ञ प्रतिसाद देतील. ते म्हणणे दुरुस्त करायला, अधिक नेमके करायला मदत करतील. या विषयावर पुढे अधिक तयारीने लिहायला ते सहाय्यभूतच होईल.

ही कबुली दिल्याने मनावरचा भार हलका झाला. एका जोखमीतून सुटका झाली. आता आपल्याला वाटेल ते (वाट्टेल ते नव्हे) लिहायला मी मोकळा आहे.

काही संकल्पना मला जशा आकळल्या तशा प्रथम मांडतो. त्यामुळे पुढचे विवेचन सोपे होईल. व्हावे.

काही संकल्पना

या लेखाच्या तयारीसाठी चर्चा करताना एकाने मला प्रश्न केला, भारत हा देश की राष्ट्र? मी गडबडलो. आपण राष्ट्र व देश हे शब्द समान अर्थाने वापरत असतो. पण हा सरळ प्रश्न नाही, हे माझ्या लक्षात आलं. मग गूगल केलं. अनेक फरक, अनेक मतं पुढे आली. काही तज्ज्ञांच्या भाषणातून 'राज्य' व 'राष्ट्र राज्य' (State d Nation State) या दोन गोष्टी स्वतंत्रपणे मांडल्या जाताना मी ऐकले होते. त्याचाही शोध घेतला. तर तिथेही फरक आढळला. राष्ट्रवाद हा शब्द तर सतत कानावर आदळत असतो. पण त्याचा अर्थ नक्की काय, याबाबत चक्रधरांच्या 'एक हत्ती व चार आंधळे' या दृष्टांताहून स्वैर स्थिती असते. हे आंधळे आपापल्या अनुभवाला प्रामाणिक तरी असतात. त्या सगळ्यांचे अनुभव जोडून एक सलग चित्र बनवणे शक्य होऊ शकते. पण अन्य काहीजण तर पुरता गोंधळ उडवून देतात. उदा. राष्ट्रवादी काँग्रेस. काँग्रेसपासून अलग होतानाची भूमिका क्रमात सोडल्यानंतरही राष्ट्रवादी हे विशेषण त्या पक्षाचे तसेच आहे. त्यावेळी व आज या पक्षाला अभिप्रेत राष्ट्रवाद कोणता? मुलायमसिंगांच्या (किंवा अखिलेशच्या) समाजवादी पक्षातील 'समाजवादी' शब्दासारखेच हे आहे. खरं तर अशी गोंधळ माजवणारी अनेक उदाहरणे सापडतील. हिटलरच्या पार्टीच्या नावातही 'समाजवादी' शब्द समाविष्ट होता. एखाद्याच्या व्यवहारावरून त्याने धारण केलेल्या नावाचा अर्थ लावण्यात मोठी फसगत होऊ शकते. याबाबतची अधिकाधिक दक्षता घेत मला विचारार्ह वाटलेली स्पष्टीकरणे ढोबळपणे देत आहे. अर्थात त्यांविषयीही बरेच वाद आहेत.

देश (Country) - देश म्हणजे काय हे ठरवताना पुढील बाबी पाहिल्या जातात: निश्चित सीमा असलेला भूप्रदेश, कायमस्वरुपी वास्तव्य असलेला समाज, सरकार, अन्य देशांशी संबंध प्रस्थापित करण्याची क्षमता, अंतर्गत दळणवळणाची यंत्रणा, एक चलन, एक शिक्षणव्यवस्था व अन्य देशांकडून मान्यता. 

सीमांचे वाद असू शकतात. अन्य देशांकडून मान्यतेचीही अडचण काही वेळा येते. उदा. तैवान. तैवान म्हणतो आम्ही स्वतंत्र देश आहोत. चीन म्हणतो तो आमचा भाग आहे. इथे तैवानशी स्वतंत्र देश म्हणून संबंध ठेवायचा की नाही हे चीनशी संबंध कसे राखायचे यावर जगातले देश ठरवतात.

राज्य (State) - राज्य या शब्दाचे दोन अर्थ आहेत. एक अर्थ देशातले एक राज्य. उदा. महाराष्ट्र, गुजरात असे. दुसरा अर्थ, खुद्द देश, देशाचे शासन. इंग्रजीत हे दोन अर्थ स्पष्ट करताना देशातले एक राज्य म्हणून उल्लेख करतेवेळी state (s लहान) तर देश म्हणून उल्लेख करताना State (S मोठा) असे लिहितात.

राष्ट्र (Nation) - राष्ट्र म्हणजे स्थिर व भावनिकदृष्टया एकत्व मानणारा परस्परसंबंधित लोकांचा समूह - ज्यांची संस्कृती, भाषा, इतिहास व धर्म एक आहे, ज्यांचे हितसंबंध व आकांक्षा समान आहेत. ही व्याख्या जशीच्या तशी आपल्याला लावली तर कठीण स्थिती होईल. आपल्याकडे भाषा व धर्म अनेक आहेत. ज्याला रुढ अर्थाने एक संस्कृती म्हणू असे आपल्या संस्कृतीचे स्वरुप नाही. मग तरीही ते राष्ट्र कसे? याचा अधिक विचार पुढे करू. 

राष्ट्र व देश एक नव्हे - देश व त्या अर्थाने राज्य हे प्रशासनाशी, प्रादेशिक सीमांशी संबंधित आहे. राष्ट्राला हे लागू नाही. राष्ट्र ही त्या समूहाची मुख्यत: मानसिक व अनुषंगाने सामाजिक, सांस्कृतिक ओळख आहे. 'कुर्द' लोक स्वत:ला राष्ट्र समजतात. ते राहत असलेला कुर्दिस्तान हा प्रदेश इराक, इराण, सिरिया व अर्मेनिया या देशांत पसरलेला आहे.

राष्ट्र राज्य (Nation State) - स्वत:ला मानसिकदृष्ट्या एक राष्ट्र समजणाऱ्या समूहाला जेव्हा स्वत:चा देश किंवा राज्य मिळते तेव्हा ते राष्ट्र राज्य (Nation State) होते. 'राष्ट्र राज्य' ही आधुनिक घटना मानली जाते. सरंजामी राजेशाही साम्राज्यांच्या विरोधातील संघर्षातून ती उदयाला आली.

राष्ट्रवाद (Nationalism) - स्वत:ला राष्ट्र मानणाऱ्या समूहाची एकत्वाची भावना. यात त्या समूहाच्या आकांक्षा (स्वत:च्या उन्नतीच्या, राज्यस्थापनेच्या तसेच आपण इतरांपेक्षा श्रेष्ठ असल्याने इतरांवर कब्जा करण्याच्या) अंतर्भूत असतात.

भारताच्या संदर्भात या संकल्पनांचा विचार कसा करायचा?

भौगोलिकदृष्टया तीन बाजूंनी समुद्राने वेढलेले हे विस्तीर्ण द्वीप. हजारो वर्षांची संस्कृती अंगाखांद्यावर खेळवणारे. काही वेळा याला अशोकासारखे प्रचंड भूमी व्यापणारे चक्रवर्ती सम्राट मिळाले. पण सबंध भारतभर एकच एक राजकीय व्यवस्था वा अंमल होता असे म्हणणे कठीण आहे. अनेक छोट्या मोठ्या राजांच्या अंमलाखाली ही भूमी विभागलेली होती. चांगल्या राजाला दुवा व वाईट राजाबद्दल घृणा यापलीकडे प्रजेला काही खास भूमिका नव्हती. आपल्या स्थानिक अनुभवातून राजनिष्ठा व राजाबद्दल प्रेम असू शकते. पण जनतेच्या हितसंबंधांची दखल घ्यायला ती काही लोकशाही नव्हती. शिवाजीराजांसारखे काही याला मर्यादित अर्थाने अपवाद होते. त्यामुळे अनेक आक्रमणे, राजे बदलणे होत असताना गावगाड्यात काही फरक पडण्याची शक्यता नव्हती. आधुनिक अर्थाने भारत हा एक देश/राज्य होते असे म्हणता येत नाही. तथापि, त्याच्यात एक विलक्षण प्रकारचे सांस्कृतिक सूत्र होते. त्याचा शोध अनेक विचारवंत, इतिहासकार आजही घेत आहेत. ही संस्कृती एकसाची नव्हती. तिच्यात विचारबहुलता होती. सम्राट अशोक किंवा अकबर या थोर राजांचे या विचारबहुल संस्कृतीला जोपासण्यात मोठे योगदान होते. नमुन्यादाखल सम्राट अशोकाच्या गिरनार येथील शिलालेखावरील ही काही विधाने पहा - 'देवांचा प्रिय प्रियदर्शी राजा सर्व संप्रदायांना मान देतो. संन्यासी आणि गृहस्थाश्रमी या दोघांनाही मान देतो. ...स्वत:च्या संप्रदायाची स्तुती न करणे, परसंप्रदायाची अवास्तव निंदा न करणे...अन्य संप्रदायांचा सुध्दा वाजवी सत्कार केलाच पाहिजे...एकमेकांचे धर्म एकमेकांनी ऐकावेत व मानावेत...'

भारतीय संस्कृतीतील एकत्वाबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या 'भारतातील जाती' या प्रबंधात म्हणतात, ''भारतात केवळ भौगोलिक एकताच नव्हे तर या सगळ्यापलीकडे जिच्याबद्दल शंका घेता येणार नाही अशी एक सखोल व खूपच मूलभूत अशी एकता - सांस्कृतिक एकता - या टोकापासून त्या टोकापर्यंत नांदते आहे. तथापि, या एकत्वामुळेच जात ही न आकळणारी एक कठीण समस्या बनली आहे. या एकत्वामुळेच जात संक्रमित होत गेली आहे.'' जातीच्या उद्गमाच्या शोधातूनच ही संक्रमणाची प्रक्रिया शोधता येणार आहे, असे ते पुढे म्हणतात.

हिंदू कट्टरपंथी याच सांस्कृतिक एकत्वासंबंधातील बाबासाहेबांच्या विधानांचा वापर करुन आपल्या हिंदू सांस्कृतिक राष्ट्रवादाची भलामण करतात. राजकीयदृष्टया एक एकक नसतानाही राष्ट्र असू शकते हे आपण वर पाहिले. त्यामुळेच भारतातील हे सांस्कृतिक एकत्व हाच हिंदुराष्ट्राचा मूलाधार आहे, असा संघपरिवार दावा करतो. त्याला बाबासाहेबांचे समर्थन असल्याचा डंका पिटतो. 

खुद्द बाबासाहेब इतरत्र नव्हे तर संविधानसभेत संविधान मंजूर होण्याच्या पूर्वसंध्येला २५ नोव्हेंबर १९४९ रोजी जे ऐतिहासिक भाषण करतात, त्यात म्हणतात -

''मी या मताचा आहे की आपण एक राष्ट्र आहोत यावर विश्वास ठेवणे म्हणजे जे अस्तित्वात नाही ते अस्तित्वात आहे असा समज बाळगण्यासारखे होईल. हजारो जातींमध्ये विभागलेल्या लोकांचे राष्ट्र कसे बनू शकेल? सामाजिक आणि मानसिकदृष्टया अजूनही आम्ही एक राष्ट्र नाही याची आम्हाला जेवढ्या लवकर जाणीव होईल तेवढे ते आमच्या हिताचे ठरेल. त्यानंतरच एक राष्ट्र होण्याच्या गरजेचा आम्ही गांभीर्याने विचार करु शकू. या ध्येयाप्रत पोहोचणे अतिशय कठीण आहे. ...भारतात जाती आहेत. जाती या राष्ट्रविरोधी आहेत. ...त्या समाजजीवनात विभागणी करतात. त्या राष्ट्रविरोधी आहेत, कारण त्या जाती-जातीमध्ये मत्सर व तिरस्काराची भावना निर्माण करतात. आम्हाला वास्तवात जर 'राष्ट्र' व्हायचे असेल तर या सर्व अडथळ्यांवर आम्ही मात केलीच पाहिजे.''

बाबासाहेबांच्या कितीतरी आधी महात्मा फुलेंनीही असाच इशारा दिला होता. ते म्हणतात - ''जातीजातीत वाटलेला आपला समाज आधी एकमय झाला पाहिजे. ते घडेल त्या दिवशी आपल्या देशात लोकांचे राज्य स्थापन झालेले असेल.''

बाबासाहेबांची व फुल्यांची ही अवतरणे भारतीय संस्कृतीची दोन रुपे दाखवतात. दुसरे रुप विरुप आहे. ते दुरुस्त केल्याशिवाय सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या दिशेने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सरळपणे सरकताच येणार नाही. दुसरे म्हणजे, भारतीय संस्कृती ही गंगा-जमनी म्हणजेच विचारबहुल आहे, एकसाची नाही. तिचा सांस्कृतिक राष्ट्रवाद महावीर, बुध्द, अशोक, अकबर, कबीर, नानक अशा अनेक मान्यतांना, पंथांना कवेत घेऊन वाटचाल करेल, हीच त्याची नैसर्गिक परिणती असेल. त्याचीच तर संघाला भीती आहे. ते टाळण्यासाठी संघाची मंडळी भारतीय संस्कृतीची एकत्वाची जाळीदार वीण विस्कटवण्याचा व त्याला एकसाची फॅसिस्ट वळण देण्याची जीवतोड खटपट करत आहेत.

युरोपातली राष्ट्रे सरंजामी गढ्या कोसळवून आकाराला आली. स्वातंत्र्य, लोकशाही, समता, बंधुता ही त्यांच्या राष्ट्रवादाची आधारमूल्ये होती. भांडवलशाहीच्या अस्तित्वाला व विकासाला त्यांची नितांत गरज होती. पुढे याच भांडवली शक्तींनी साम्राज्यवादी रुप धारण केले व एकमेकांचा व जगाचा घास घ्यायला त्या उतावीळ झाल्या. त्यांनी जन्मास घातलेल्या पहिल्या महायुध्दात जर्मनी व इटलीचे लचके तोडले गेले. त्या जखमेतून व अवमानातून हिटलर व मुसोलिनी जन्माला आले. शुध्द आर्यवंशाचा, ज्यूंना गॅसचेंबरमध्ये मारण्याचा व जगाला गुलाम बनविण्यासाठीचा आक्रमक भस्मासुरी राष्ट्रवाद उदयाला आला. स्टॅलिनने त्याला अडवले. जगावरचे संकट टळले. कम्युनिस्टांना म्हणूनच हा राष्ट्रवाद मंजूर नव्हता. 'जगातील कामगारांनो एक व्हा' हा त्यांचा आंतरराष्ट्रवाद होता. 'कम्युनिस्ट इंटरनॅशनल' हे त्यांचे देशोदेशींच्या कम्युनिस्ट चळवळीला मार्गदर्शन करणारे केंद्र होते. पुढे ते संपले. देशोदेशीच्या कम्युनिस्ट चळवळी व तेथील क्रांतीचा कार्यक्रम त्या देशांतील वैशिष्टयांवर आधारित राहील अशी भूमिका स्वीकारली गेली. स्थानिक गरजेतून त्यांतल्या काहींचा एक वेगळा राष्ट्रवाद जन्माला आला. क्युबन जनतेला फिडेल कॅस्ट्रोने केलेले आवाहन व तिची सिध्दता याबाबत भांडवली विचारवंत तेथील राष्ट्रवादाचे नकारात्मक चित्र उभे करतात. चीनचा राष्ट्रवाद हा प्रश्नांकित करणारा आहे खरा. त्याचा नीटसा बोध होत नाही. खरे म्हणजे पटत नाही. मार्क्सवादानुसार मानवजातीला साम्यवादाकडे घेऊन जाताना राष्ट्रीय वैशिष्ट्यांनुसार तात्कालिक डावपेच म्हणून त्या राष्ट्रातील काही क्रम असू शकतात. पण आज देशोदेशीचे कम्युनिस्ट याच रीतीने पावले टाकत आहेत, असे वाटत नाही.

या युरोपियन राष्ट्रांची (रशियासहित) काही महत्वाची वैशिष्ट्ये म्हणजे त्यांचा लहान आकार, धर्म व भाषेची समानता. याचा अर्थ तिथे विविधता अजिबात नव्हती अथवा नाही असे नव्हे. त्यामुळे राष्ट्र या व्याख्येतील धर्म, भाषा, संस्कृती यांची समानता ही वैशिष्ट्ये तिथे लागू होतात. अर्थात, आजही तेथील मूलनिवासी या राष्ट्रांच्या राष्ट्रवादाला आव्हान देताना दिसतात. 

भारताला युरोपियन राष्ट्रवादाच्या मापाने मोजताच येणार नाही. वर पाहिलेले भारतीय संस्कृतीचे भाषा, आहार, पोषाख, निवास, श्रध्दा यांचे विविधतापूर्ण व भिन्न प्रवाहांना सामावणारे समावेशक रुप, सरंजामशाहीच्या पतनासाठीच्या संघर्षासाठी भांडवली शक्तींचे अजून वयात न येणे, जातीव्यवस्थेने मारलेली पाचर अशा स्थितीला युरोपियन संकल्पनेतला राष्ट्रवाद लागू होणे शक्य नव्हते.

मग भारताने स्वत:ला आधुनिक राष्ट्र म्हणवून घेण्याची अथवा त्याच्या राष्ट्रवादाची प्रक्रिया कशी व कधी सुरु झाली?

भारतीय राष्ट्रवादाची घडण

भारतीय राष्ट्रवादाच्या विकासाची सुरुवात इंग्रजांच्या आगमनाने झाली. एक गंमत आहे. ज्या राष्ट्रांनी आपापल्या ठिकाणी लोकशाही, समता आधारित राष्ट्रवाद आणला ती राष्ट्रे जगातील अविकसित देशांना गुलाम करु लागली. त्यांच्या या साम्राज्यवादी, वासाहतिक लुटीच्या राष्ट्रवादाने या गुलाम देशांतील जनतेला राष्ट्र म्हणून संघटित व्हायला, त्यांचा राष्ट्रवाद आकाराला यायला चालना दिली.

ब्रिटिशांचा एकछत्री अंमल, कायदे, राज्यकारभारात आंशिकरित्या सुरू झालेले स्थानिकांचे लोकप्रतिनिधीत्व, शिक्षणाचा प्रसार, जनतेत निर्माण झालेली स्वातंत्र्याची आकांक्षा, त्याविरोधातील आसेतुहिमाचल मोर्चेबांधणी यांमुळे राष्ट्रीय जाणीव वाढण्याची प्रक्रिया गतिमान झाली. राजांचे वर काही का चालेना, आपला गाव बरा-आपण बरे ही जनतेची मन:स्थिती वेगाने बदलू लागली. त्यांचा स्वत:चा हितसंबंध तयार होऊ लागला. मग ते सरकारचे शेतीविषयक, जमीनविषयक धोरण असो की व्यापार उद्योगाच्या संधी असोत की वाढत्या आकांक्षांचे दमन असो. हे सांस्कृतिक एकत्व नव्हते. ते राजकीय एकत्व होते. त्याला आर्थिक पाया होता. भारतीय मने समान हितसंबंधांच्या राष्ट्र या आधुनिक जाणिवेने जोडली जाण्याची क्रिया सुरु झाली, ती भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या निमित्ताने झालेल्या घुसळणीने. भारतीय जनतेच्या मनात मूळ धरू लागलेल्या या राष्ट्रवादाला विविध विचारांचे आयाम मिळू लागले. जहाल-मवाळ हे राजकीय प्रवाह, सामाजिक सुधारकांचा प्रवाह तसेच मध्यम व अतिरेकी सांस्कृतिक राष्ट्रवादी प्रवाह या सगळ्या मुशीत भारतीय मन घडू लागले. विशेषत:, गांधीजींच्या नेतृत्वाखाली पुढे गेलेल्या स्वातंत्र्यचळवळीला भारतीय परंपरेतील सहिष्णू, समावेशक व बहुविधतेचा पाया राहिला, त्याचबरोबर ती सर्व समाजाच्या सहभागाने पुढे गेल्यामुळे स्त्रिया, दलित, बहुजन, अल्पसंख्य अशा समूहांच्या मोठ्या सहभागामुळे तो पाया विस्तारला; बळकट झाला. सत्याग्रह, अहिंसा, स्वावलंबन यांसह गांधीजींच्या सर्व भूमिका-कार्यक्रमांना समतेचा आग्रह जोडला गेला. परिणामी, ब्रिटिश साम्राज्यशाहीविरोधातील भारतीय स्वातंत्र्याचा लढा ही एका विषम, सरंजामी व्यवस्थेकडून समताधिष्ठित लोकशाही व्यवस्थेकडे अशी वाटचाल ठरली. अखेरीस आधुनिक राजकीय व प्रगत सामाजिक मूल्यांच्या पाठीराख्यांच्या नेतृत्वाखाली भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे संविधानात या मूल्यांची बऱ्यापैकी रुजवात होऊ शकली. 

आता भारत अधिकृतपणे 'राष्ट्र राज्य' झाले. तथापि, राष्ट्र बनणे ही एक प्रक्रिया आहे. ती थांबलेली नाही. ती अजून चालू आहे. ही प्रक्रिया पुढे जाण्यासाठी बाबासाहेबांनी दिलेला जातिअंताचा इशारा लक्षात घेणे गरजेचे आहे. त्यांनी त्यांच्या वर उल्लेख केलेल्या भाषणात आर्थिक विषमतेचा मुद्दाही प्रकर्षाने मांडला आहे. त्याला दुर्लक्षून चालणार नाही. स्वातंत्र्य मिळाले तेव्हा दुबळ्या असलेल्या अतिरेकी सांस्कृतिक राष्ट्रवाद्यांनी आता आघाडी घेतली आहे. ज्यांनी देश उभारण्यात मुख्य भूमिका निभावली त्या शक्तींमध्ये पुढील काळात आलेली विकृती या वाढीला मदतनीस ठरली. ही विकृती त्वरेने दूर करणे गरजेचे आहे. या अतिरेकी सांस्कृतिक राष्ट्रवाद्यांनी आज राजकीय सत्ता ताब्यात घेतली आहे. या सत्तेच्या तसेच कडव्या कार्यकर्त्यांच्या सहाय्याने ते जनतेत तिच्या राष्ट्रवादी परंपरेविषयी संभ्रम निर्माण करत आहेत. बहुसंख्याकांची धर्मभावना भडकावून भारतीय राष्ट्रवादाला संकुचित बनवण्याचा त्यांनी डाव टाकला आहे. 'मी प्रथम भारतीय आहे व अंतिमत:ही भारतीय आहे' असे बाबासाहेब म्हणतात. संकीर्ण अस्मितांच्या वर उठून आपली 'भारतीयत्वा'ची ओळख उजागर करण्याच्या त्यांच्या या आवाहनाचे विस्मरण होऊ देता कामा नये.

आज बाबासाहेबांचे भारतीयत्वाचे आवाहन आपण समाजाला पुढे नेणारे मानतो. त्यांनी ज्या काळात ते केले तेव्हाही ते पुरोगामीच होते. पण त्याच्या कितीतरी आधी, भारतीय राष्ट्रवाद आकार घ्यायला सुरुवात झाली त्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात रवींद्रनाथ टागोरांनी या राष्ट्रवाद प्रकरणाविषयी काळजी व्यक्त केली होती. राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीच्या आघाडीच्या नेत्यांशी त्यांनी आपला मतभेद जाहीर केला होता. भारताचे राष्ट्रगीत रचणाऱ्या, भारताविषयी असीम प्रेम असणाऱ्या या महान कवीचा हा मतभेद तितक्याचा तोलाचा होता, हे लक्षात घ्यायला हवे.

इंग्रजांविरोधी लढ्यासाठी जो राष्ट्रवादाचा ज्वर जनतेत आपण तयार करत आहोत, त्याने जनतेच्या मनात परकीयांविषयी दुस्वास, द्वेष यांचे रोपण होते असे त्यांना वाटे. 'राष्ट्रवाद व परकीयांविषयीचा द्वेष यांतील फरकाची रेषा फार सूक्ष्म असते' असे ते म्हणत. त्यांच्या मते ही 'राष्ट्रवादाची गुलामी आहे. राष्ट्रवादाच्या या गुलामीचे बंध तोडून अखिल मानवजातीचे ऐक्य ते अपेक्षितात. ''देशाविषयीचे प्रेम जेव्हा त्याची पूजा करु लागते तेव्हा वाताहत अटळ असते. मी देशाची सेवा करायला तत्पर आहे. पण त्याची पूजा करणे हा मी त्याचा अवमान समजतो.'' हे त्यांच्या १९१६ सालच्या 'द होम अँड द वर्ल्ड' कादंबरीतील नायकाच्या तोंडचे उद्गार आहेत. या नायकाकरवी टागोरच बोलतात असे मानले जाते.

ब्रिटिशविरोधी राष्ट्रवादी संग्रामातील एक अग्रणी नेते व या संग्रामातून तयार झालेल्या भारत देशाचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरु राष्ट्रवादाविषयी काय म्हणतात हे पाहणेही उद्बोधक ठरेल. २० सप्टेंबर १९१५ रोजी काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात ते इशारा देतात-

'पारतंत्र्यात असताना राष्ट्रवाद ही सर्वांना एकवटणारी, ताकद देणारी शक्ती असते. ...नंतर मात्र ती संकुचितवादाकडे जाते. आक्रमकता व आपणच कसे श्रेष्ठ याकडे तिचा प्रवास होतो. प्रभुत्ववाद जन्मास येतो. ...अशाची अखेर सर्वनाशात होते. उदा. जर्मनी, जपान. भारतासारख्या विभिन्न भेद असलेल्या देशात बहुसंख्याक याची शिकार होऊ शकतात.'

किती डोळस व चिकित्सकपणे देश रचणाऱ्या महान मंडळींचा वारसा आपल्याला मिळाला आहे हा! तो कदापि धूसर होऊ देता कामा नये. अलिकडच्या काही प्रसंगांची उजळणी करुन त्यातून उडालेल्या धुरळयाचा वेध घेऊ. हा वेध या वारशाचे स्मरण ठळक करायला मदत करेल.

धुरळ्याचा वेध

चित्रपटगृहामध्ये चित्रपट सुरू होण्याआधी राष्ट्रगीत वाजवले गेलेच पाहिजे, असा एका प्रकरणात अंतरिम आदेश देताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटल्याची घटना ताजी आहे. राष्ट्रीय चिन्हे, गीत यांच्यासंबंधीचा आदर, त्यांचा मान राखणे ही बाब निराळी. पण 'असा मान राखणे हीच खरी राष्ट्रभक्ती' असे पसरवले जाण्याच्या सध्याच्या उन्मादी वातावरणाला हा आदेश पोषकच ठरला आहे. या आदेशाची अंमलबजावणी कशी करायची याची पुरेशी स्पष्टता नसल्याने सिनेमा हॉलमध्ये स्वयंघोषित देशभक्त हा अधिकार आपल्याकडे घेऊन त्यांनी ठरवलेल्या देशद्रोह्यांना मारहाण, थिएटरबाहेर हाकलणे असे उपाय करत आहेत. 

परवा आम्ही 'दंगल' सिनेमा पाहायला गेलो. सिनेमाच्या सुरुवातीच्या राष्ट्रगीताला आम्ही उभे राहिलो. पण नंतर सिनेमाच्या अखेरच्या भागात राष्ट्रकुल स्पर्धेत नायिका सुवर्णपदक जिंकते तेव्हा राष्ट्रगीत वाजवले जाते. हा सिनेमात समाविष्ट असलेला भाग आहे. त्याही वेळी लोक उभे राहिले. आमच्यातलेही काही उभे राहिले. न राहिलेले आम्ही दोन-तीनच होतो. आमचे भाग्य त्यावेळी कोणी स्वयंघोषित देशभक्त तिथे नव्हते.

यासंबंधात कायदा किंवा निर्देश नक्की काय आहेत?

घटनेतील कलम ५१-अ (अ) नुसार घटनेचे पालन करणे, त्यातील आदर्श, संस्था, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर राखणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. घटनेच्या मार्गदर्शक सूत्रांच्या विभागातील हे कलम आहे. त्यावर न्यायालयीन कारवाई होत नाही. १९७१ ला एक कायदा झाला. राष्ट्राचा अवमान रोखण्यासाठीच्या या कायद्याप्रमाणे कोणी जाणीवपूर्वक राष्ट्रगीत वाजवण्याला प्रतिबंध करत असेल किंवा एखादा समुदाय ते म्हणत असेल त्याठिकाणी अडथळा आणत असेल तरच तो शिक्षापात्र गुन्हा होतो. कोणी उभे राहिले नाही वा तोंडी राष्ट्रगीत म्हटले नाही, म्हणून तो गुन्हा होत नाही. ५ जानेवारी २०१५ च्या सरकारी आदेशाप्रमाणे लोकांनी राष्ट्रगीताला उभे राहावे, तथापि सिनेमाचा भाग असलेल्या राष्ट्रगीताला हा आदेश लागू नाही, असे स्पष्टपणे नोंदवले आहे.

वास्तविक सर्वोच्च न्यायालयाचा वरील आदेश त्याच्याच एका जुन्या आदेशाला उलटा फिरवणारा आहे. 'जेनोव्हा विटनेसेस' या धर्मपंथात त्यांच्या पंथाची प्रार्थना सोडल्यास अन्य कोणतीही प्रार्थना म्हणण्यास परवानगी नाही. केरळमधील एका शाळेने या पंथातील मुलांना ती राष्ट्रगीत म्हणत नाहीत म्हणून काढून टाकले. त्याबाबतच्या प्रकरणात निकाल देताना १९८६ साली सर्वोच्च न्यायालयाने त्या मुलांची बाजू घेतली. त्याच्या मते राष्ट्रगीत न म्हणता शांत राहणे याने कोणत्याही कायद्याचे हनन होत नाही. न्यायालय पुढे जी टिप्पणी करते ती खूप महत्वाची आहे. ते नोंदवते- 'आपली परंपरा सहिष्णुता शिकवते. आपले संविधान सहिष्णुता प्रचारते. आपण ती पातळ करु या नको. '

राष्ट्रवादाचा, राष्ट्रभावनेचा जाणीवपूर्वक आपल्या फॅसिस्ट सांस्कृतिक राष्ट्रवादाला पूरक अर्थ लावण्याचे प्रयत्न संघपरिवार आधीपासूनच करतो आहे. आता त्याच्या विचारसरणीचे सरकार आले आहे. ते सरकार म्हणून आपल्या यंत्रणा या कामी वापरत आहे. पोलीस, विद्यापीठ, शिक्षण, इतिहास लेखन, संसद सगळ्या आघाड्यांवर त्याने बेमुर्वत मोर्चे उघडले आहेत.

एकाच संविधानाचा आधार घेऊन आलेली सरकारे व्यवहार वेगळा करतात. त्यामागे त्यांची विचारसरणी असते. याचा प्रत्यय देणाऱ्या माझ्या लहानपणीच्या एक-दोन घटना सांगतो. तो दलित पँथरचा वादळी काळ होता. आमच्या वस्त्या या पँथरच्या डरकाळ्यांनी गाजत होत्या. दलित अत्याचारांच्या विरोधातील आवाज टीपेला जात होता. राष्ट्रगीत, राष्ट्रचिन्हे यांना आव्हान दिले जात होते. १९७२ चा १५ ऑगस्ट हा स्वातंत्र्याचा रौप्यमहोत्सव होता. यावेळच्या एका कवितेत नामदेव ढसाळ म्हणतात - 

'पंधरा ऑॅगस्ट एक संशयास्पद महाकाय भगोष्ठ

स्वातंत्र्य कुठल्या गाढवीचं नाव आहे

...कंचा मूलभूत अर्थ स्वातंत्र्याचा'

राजा ढालेंनी साधनेच्या स्वातंत्र्यदिनाच्या रौप्यमहोत्सवानिमित्तच्या विशेषांकात 'काळा स्वातंत्र्य दिन' असा लेख लिहिला. त्यात त्यांनी राष्ट्रध्वजाबद्दल अत्यंत निरर्गल भाषा वापरली.

या दोन्ही नेत्यांचा आम्हा वस्तीतल्या मुलांवर विलक्षण प्रभाव होता. त्यांच्या भाषणांनी, लेख-कवितांनी आम्ही भारले जात असू. पुढची किमान १० वर्षे मी या भारलेपणातून बाहेर आलो नाही. या काळातला कुठला तरी एक १५ ऑॅगस्ट (बहुधा १९७६) आम्हीही काळा दिन म्हणून पाळला. मी शाळेत झेंडावंदनाला काळी फीत लावून गेलो. पुढे बराच काळ राष्ट्रगीताला उभा राही पण राष्ट्रगीत म्हणत नसे. त्याचे कारणही शिक्षकांना सांगे. ते ऐकून घेत. कोणी माझ्यावर कारवाई केली नाही की शाळेतून काढले नाही.

पँथरच्या त्या काळात अकोल्याची सवर्णांनी गवई बंधूंचे डोळे काढल्याची घटना खूप गाजली. आमच्या गल्लीसमोर गवई बंधूंना आणून एक आक्रमक निषेधाची सभा झाली. राजा ढाले वगैरेंच्या नेतृत्वाखाली इंदिरा गांधींच्या गाडीला आडवे जाण्याचेही आंदोलन झाले.

या काळात राष्ट्रध्वज, राष्ट्रगीतच नव्हे, तर एकूण संसद वगैरेबद्दल खूप असंसदीय, अवमानकारक बोलले जायचे. तथापि, या कार्यकर्त्यांवर, अगदी नामदेव-राजा यांच्या कविता-लेखाचे छापील पुरावे असतानाही त्यांच्यावर सरकारने काही कारवाई केल्याचे किंवा त्यांना राष्ट्रद्रोही म्हटल्याचे स्मरत नाही. एकूण वातावरणात, या मंडळींचा हा आक्रोश सामाजिक विषमतेने जन्मास घातलेल्या एका तीव्रतर वेदनेपोटी आहे, याविषयी बरीचशी सहानुभूती होती, किमान ती समजून घ्यायला हवी अशी भावना होती. समाजाची तसेच सरकारचीही.

शासनकर्त्यांच्या विचारसरणी कशा प्रभाव टाकतात, याचे अमेरिकेतील अलिकडचे एक उदाहरण पाहणे उद्बोधक ठरेल. कॉलिन केपर्निक हा अमेरिकेतील एक सुप्रसिध्द फूटबॉल खेळाडू. स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच्या मैदानातील राष्ट्रगीतावेळी अन्य सहकारी उभे असताना बसून राहिला. 'जो देश काळ्या तसेच गौरेतर नागरिकांवर अन्याय करतो त्याच्या राष्ट्रध्वजाला मी मान देणार नाही. याविषयी निषेध नोंदवणे ही मला खेळापेक्षा अधिक महत्वाची बाब वाटते.' ही त्याची भूमिका होती.

यावर दोन्ही बाजूंनी प्रतिक्रिया उमटल्या. त्यातल्या सध्याच्या व होऊ घातलेल्या अमेरिकन अध्यक्षांच्या प्रतिक्रिया अधिक बोलक्या आहेत. होऊ घातलेले (आता झालेले) अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणतात- 'ही भयानक गोष्ट आहे. त्याने त्याला योग्य असा दुसरा देश शोधावा.' तर मावळते अध्यक्ष बराक ओबामा म्हणतात- 'आपले म्हणणे मांडायला तो त्याचा घटनात्मक अधिकार वापरतो आहे. त्याच्या सचोटीविषयी मला संशय नाही. ज्यांविषयी चर्चा व्हायला हवी अशा वास्तव व वैध प्रश्नांविषयी तो बोलतो आहे. ज्यांचा विचार व्हायला हवा अशा या मुद्द्यांना त्याच्या या कृतीने चालना मिळाली आहे.'

आपल्याकडे मोदी व अमेरिकेत ट्रम्प. देशोदेशी उजव्या शक्तींचे भरात येणे. काय होणार आहे जगाचे व पर्यायाने आपल्या देशाचे? सत्ता व संघटनबळावर, खोट्यानाट्या चलाख्यांनी, धूर्त, निर्दयी कारवायांनी ते राष्ट्रवादाचे कोणते अर्थ लोकांच्या डोक्यात ठासणार आहेत, हे पुरेसे स्पष्ट आहे. प्रश्न आहे आपण काय करायचे हा.

अनेक गोष्टी कराव्या लागतील. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, कायदेशीर अशा विविध आघाड्यांवर मोर्चेबांधणी करावी लागेल. त्यात राष्ट्रवाद, राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती आदींच्या सम्यक अर्थाची जोपासना व त्यांचा प्रचार हे एक महत्वाचे काम राहणार आहे. त्यातील काहींविषयी माझी मते (अर्थात चर्चेसाठी) सांगून हा लेख आटोपता घेतो. सांगण्यासारखे अजून काही काही सुचतेच आहे. पण एकाच लेखात ते सर्व मांडणे म्हणजे वाचकांच्या सहनशीलतेचा अंत पाहणे होईल.

चर्चेसाठी माझी मते

राष्ट्रप्रेम म्हणजे काय? राष्ट्रभक्ती म्हणजे काय? राष्ट्रवाद म्हणजे काय? या तिन्हींचा अर्थ एकच की त्यात काही फरक आहे?

मला माझ्या राष्ट्राबद्दल प्रेम असायलाच हवे, असे का? माझे राष्ट्र काही गैर वागत असेल, तर मला त्याच्याबद्दल प्रेम का वाटावे? म्हणजे हिटलरप्रमाणे जर ते वंशद्वेष करत असेल, दुसऱ्या देशांवर मुद्दाम, साम्राज्यवादी पध्दतीने आक्रमण करत असेल, तरीही मला त्याच्याविषयी प्रेम असावे?

या प्रश्नावर थबकायला होते. पण, कोणी असा प्रश्न विचारला, तुला तुझ्या मुलाबद्दल प्रेम आहे का? याला उत्तर 'हो' असेल. पण तो जर वाईट असेल तर? होय. तरीही असेल. सन्मार्गाने कष्ट करणारा मुलगा असेल, तसेच चोऱ्यामाऱ्या करणाराही मुलगा असेल. अशा मुलाबद्दल त्याच्या आईला, वडिलांना प्रेम असते. पण फक्त प्रेमच असते. त्याच्याबद्दल अभिमान असत नाही. तो त्यांच्या नजरेत श्रेष्ठही असत नाही. त्याने वाईट काम करु नये, असेच त्यांना वाटते. तो चोरी करताना पकडला गेला, तर त्याला सोडवायलाही हे पालक प्रयत्न करतील. कारण तो त्यांचा मुलगा आहे. त्यांचे त्याच्यावर प्रेम आहे. पण तो श्रेष्ठ मुलगा नक्की नसतो. सर्व गुणांनी श्रेष्ठ असे दुसऱ्याचे मूल असेल, तर त्याला वस्तुनिष्ठपणे श्रेष्ठ जरुर म्हणता येईल, पण त्याच्यावर प्रेम असायला हवे, अशी सक्ती नसते. पूर्वअटही नसते.

देशाच्या बाबत, गावाच्या बाबत असेच असते. मी जिथे जन्माला आलो, त्या गावाबद्दल, तिथल्या निसर्गाबद्दल (तो रुक्ष का असेना) मला एक जिव्हाळा, प्रेम असते. देशाचेही तसेच. माझ्या देशाबद्दल मला प्रेम असते. तो इतर देशांशी चांगला वागत नसेल, तर त्याचे मला वाईट वाटते. त्याने सुधारायला हवे, अशी माझी इच्छा असते. प्रयत्न असतो. पण त्याच्याविषयी अभिमान नसतो. अभिमान तेव्हाच असू शकतो, जेव्हा, माझा देश माझ्या देशातील जनतेच्याच नव्हे; तर जगातील जनतेच्या कल्याणाची मनोकामना करत तिच्या हितासाठी प्रयत्नरत राहील.

या तर्काप्रमाणे माझ्या भारत देशाबद्दल मला प्रेम आहे. ...आणि अभिमान? अर्थातच आहे. सकारण आहे. अखिल मानवाच्या हिताची कामना करणारा 'सर्वेपि सुखिन सन्तु' हा वेदघोष किंवा बुध्दाचे 'सब्बे सत्ता सुखि होन्तु' हे ऊर्जस्वल सुत्त किंवा ज्ञानेश्वरांचे पसायदान, निरीश्वरवादी चार्वाकापासून सम्राट अशोक, सम्राट अकबर ते कबिरापर्यंतचा विचार-संस्कृतीच्या बहुलतेचा वारसा ही मला अभिमानाची बाब आहे.

अशा गुणसंपन्न देशाचा नागरिक या नात्याने मी देशभक्त-राष्ट्रभक्त असणे स्वाभाविक नव्हे काय?...इथे मला अडचण आहे. माणसे देवाची भक्त असतात. त्याला वैज्ञानिक तर्क काही नसतो. ती श्रध्दा असते. ती अंधही असू शकते. जोवर एखाद्याच्या श्रध्देचा-भक्तीचा दुसऱ्याला त्रास होत नाही, तोवर हे ठीक. पण मी ज्याचा भक्त आहे, तोच सर्वश्रेष्ठ देव किंवा मी ज्याचा भक्त आहे, तोच सर्वश्रेष्ठ देश असे झाले की गडबड होऊ शकते. 'देव, देश अन् धर्मासाठी प्राण घेतले हाती' या पंक्ती कितीही रक्त उचंबळवत असल्या तरी आजच्या आधुनिक इहवादी युगात माझ्या मनात हा प्रश्न आलाच पाहिजे- ...का? मी प्राण हाती का घ्यावेत? हा देश, देव, धर्म केवळ माझा आहे म्हणून? आपण ज्या अतिरेक्यांशी लढतो, त्यांना यमसदनास पाठवल्याचा आनंद साजरा करतो, ते अतिरेकी त्यांच्या विशिष्ट हेतूसाठी काम करणाऱ्या गटा-समुदाया-देशासाठी शहीदच असतात. म्हणजे भक्ती दोन्हीकडे असते. आपली भक्ती चांगली व दुसऱ्याची वाईट असे कसे असू शकते?

म्हणूनच मी राष्ट्रप्रेमी आहे. त्याला कारण एवढेच हे राष्ट्र माझे आहे. पण मी राष्ट्रभक्त नाही. राष्ट्राभिमानी जरुर आहे. त्याला माझ्या राष्ट्राच्या उन्नत परंपरांचे कारण आहे. राष्ट्रभक्तीत माझे राष्ट्र कसेही वागो, ते मला आदर्श असायलाच हवे, असा आग्रह आहे. त्यातून होणारी कृती ही केवळ भावनिक नाही, तर या भावना दुसऱ्या राष्ट्राची न्याय्य बाजू दुर्लक्षिणाऱ्या, पर्यायाने त्याच्यावर अन्याय करणाऱ्या असू शकतात.

या चर्चेनंतर उभा ठाकतो तो मुद्दा राष्ट्रवादाचा. राष्ट्र ही संस्था कशी तयार झाली, राष्ट्रवादाचा जन्म कसा झाला, त्याचे अर्थ कसे लावले गेले आहेत याची चर्चा आपण काही प्रमाणात वर केली आहे. तथापि व तरीही राष्ट्रवाद याचा आपण घ्यायला हवा असा अर्थ मी मांडू इच्छितो. तो असा - ज्यामुळे माझ्या राष्ट्राचा मला अभिमान वाटतो अशा भूमिकांचा समुच्चय म्हणजे आमचा राष्ट्रवाद. माझा देश माझ्या देशातील सर्वांच्या कल्याणासाठी प्रयत्नरत आहे. देशवासीयांतील दुबळ्यांसाठी (स्त्रिया, दलित, आदिवासी, श्रमिक आदी समाजविभाग तसेच मागास राहिलेले प्रादेशिक विभाग) ते लवकरात लवकर इतरांच्या बरोबरीने यावेत म्हणून तो खास सवलती ठेवतो. योजना आखतो. अल्पसंख्याकांना सुरक्षित वाटेल याची दक्षता घेतो. देशातील नागरिकांच्या मतांचा (मग ती मते राष्ट्राला कितीही दोष देणारी असो) आदर करतो. राष्ट्राला दोष देणारे मत म्हणजे देशद्रोह असे न मानता त्यांच्याशी संवाद करत राहतो. स्वत:च्या रक्षणासाठी सदैव सज्ज असतो, पण दुसऱ्या देशावर स्वत:हून आक्रमण करत नाही. या सर्व भूमिकांचा समुच्चय म्हणजे आमचा राष्ट्रवाद. आम्ही स्वतंत्र झालो. मात्र अशा नवस्वतंत्र देशांच्या विकासासाठीही अलिप्त राष्ट्रांची संघटना बांधून आम्ही कार्यरत झालो. जागतिक शांततेसाठी प्रयत्न करु लागलो. शेजाऱ्यांशी काही कारणाने झालेल्या तणावाप्रसंगी लगेच युध्दासारखा मार्ग न अवलंबता जास्तीत जास्त चर्चेने उपाय शोधायचा आपण प्रयत्न करत आलो. आमचा हा व्यवहार राष्ट्रवादी व्यवहार आहे. माझा राष्ट्रवाद दुसऱ्या राष्ट्राला हानिकारक नाहीच; उलट त्याच्या उन्नतीची कामना करणारा व त्याला सहाय्य करणारा आहे.

...आणि याबरोबरच राष्ट्रवादाची व त्यानिमित्तची कितीही लिहिले तरी अपूर्ण राहणारी ही प्रदीर्घ चर्चा या लेखापुरती इथे थांबवतो.

- सुरेश सावंत

sawant.suresh@gmail.com
_________________________________
आंदोलन, गणतंत्र दिन विशेषांक, २०१७ 

No comments: