Tuesday, September 26, 2017

अरुण साधू व त्यांची सूचना

२५ सप्टेंबर २०१७
अरुण साधूंना शेवटचा निरोप देऊन दुपारी परतलो. देहदान असल्याने हा निरोप अॅम्ब्युलन्सपर्यंतच होता. साधूंची अनेकवेळा भेट होत राहिली तरी ८६-८७ च्या आसपास त्यांच्याशी झालेले बोलणे विशेष स्मरणात राहिले. मी विशी-एकविशीत असेन. आम्ही प्रागतिक विद्यार्थी संघातर्फे आमच्या चेंबूरच्या बुद्धविहारात त्यांचे व्याख्यान ठेवले होते. बौद्धेतर पुरोगामी मंडळींशी संपर्क-संवाद-सहकार्याच्या टप्प्यावर आम्ही नुकतेच आलो होतो.
साधूंनी व्याख्यानानंतर चहा घेतानाच्या गप्पांत एक सूचना मांडली. ते म्हणाले, “ब्राम्हणांत माधुकरी मागून जे शिकले त्यांनी पुढे जाऊन आपल्या समाजातल्या माधुकरी मागणाऱ्या किमान एका मुलाला आधार दिला व त्याचे शिक्षण केले. आज बौद्ध समाजात असे करण्याची गरज व शक्यता तयार झाली आहे. जे गरिबीतून शिकून पुढे आले असे अनेक अधिकारी, प्राध्यापक, वकील आज बौद्ध समाजात आहेत. त्यांनी ब्राम्हणांप्रमाणे आपल्यातल्या एका गरीब मुलाला सहाय्य केले तर तो समाज पुढे यायला खूप मदत होईल.”
त्यांनी फक्त सूचनाच केली असे नाही. त्यांनी स्वतः काही प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. ते पुढे म्हणाले, “तुम्ही मुले वस्तीतल्या विद्यार्थ्यांसाठी काम करता. वार्षिक काही ठराविक आर्थिक मदत करु शकणाऱ्या सुस्थित बौद्धांची आपण यादी करु व त्यांची वस्तीतल्या गरीब गरजू मुलांशी सांगड घालू. मी माझ्या संपर्कातल्या सुस्थित बौद्धांशी संपर्क करतो. तुम्ही तुमच्या करा.”
आम्ही या सूचनेचे पुढे काही केले नाही. असे काम करण्याचे अवधान नसणे याबरोबर इतरही काही कारणे आडवी आली.
साधूंच्या त्या सूचनेला ३२-३३ वर्षे लोटली. बौद्ध समाजाची स्थिती बरीच सुधारली. तरीही चैत्यभूमीवर बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणदिनी व दीक्षाभूमीला धम्मचक्र प्रवर्तन दिनी जो अलोट जनसागर उसळतो, त्यात स्वतःच्या गाडीतून येणारे सफारीधारक व थेट अनवाणी येणारे फाटके असे दोन वर्ग आजही ठळक दिसतात.
...साधूंचे शारीरिक अस्तित्व संपले; पण त्यांच्या सूचनेचे अस्तित्व अजून संपलेले दिसत नाही.

No comments: