Monday, October 2, 2017

आंबेडकरी बौद्धांच्या अस्मिता-जाणिवांतले घोळ

दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिन जवळ आला की आपण काय कमावले-काय गमावले याचा लेखाजोखा मनात सुरु होतो. पूर्वाश्रमीच्या अस्पृश्यांतला प्रामुख्याने महार हा विभाग बाबासाहेब आंबेडकरांच्यासोबत बौद्ध झाला. महारपण सोडणे व बौद्ध होणे या केवळ जाणीवेने त्याच्या चेतनेचा कायापालट झाला. बौद्ध धम्माची विज्ञानाशी सुसंगतता व मानवतेप्रती मैत्री-करुणेचे आवाहन या वैचारिक श्रीमंतीने या समाजातल्या जाणत्या वर्गाला लखलखीत अस्मिता दिली. बाबासाहेबांनी त्यांचे काम केले. धम्मदीक्षेनंतर दीड महिन्यातच त्यांचे महापरिनिर्वाण झाल्याने यापेक्षा अधिक काही करणे अर्थातच शक्य नव्हते. त्यांनी दिलेली चेतना व अस्मिता सम्यक आशयाने समृद्ध करण्याची व अन्य समाजविभागांत संक्रमित करण्याची जबाबदारी त्यांच्यानंतरच्या आंबेडकरी चळवळीचे मुखंडपण स्वीकारणाऱ्यांची होती. त्यांनी ती पार पाडली नाही असेच म्हणावे लागते.

१९५६ च्या धम्मस्वीकारानंतरचा गेल्या साठ वर्षांतला प्रवास काही बारीक अपवाद वगळता उत्तेजक नाही. काहींच्या बौद्ध होण्याच्या अस्मितेला गर्वाची शिंगे फुटली. तर काहींना समाजातील प्रभुत्वशाली संस्कृतीत सामावताना (खरं म्हणजे शरण जाताना) आपल्या बौद्धपणाचाच अडसर वाटू लागला. भाऊ कदम किंवा अन्य गणपती बसवणाऱ्या प्रस्थापित-शरण बौद्धांना गर्ववाले कसे धोपटून काढतात, बहिष्काराच्या धमक्या देऊन माफी मागायला लावतात हे आपण नुकतेच अनुभवले. याविरोधात बाबासाहेबांनीच संविधानात दिलेल्या व्यक्तीच्या उपासना स्वातंत्र्यावरचा हा घाला आहे असे म्हणून गर्ववाल्यांना ‘तालिबानी’ संबोधणारे बौद्ध तसेच अन्य समाजविभागांतले पुरोगामीही आपण पाहिले. या पुरोगाम्यांना चितपट करण्यासाठी खुद्द बाबासाहेबांनीच ‘पंढरी-आळंदी किंवा जेजुरीला किंवा इतर कोणा देवाच्या नादी लागलात तर तुम्हाला वाळीत टाकण्याचा मला हुकूम द्यावा लागेल..’ म्हटल्याचा दाखला काहींनी दिला. असा दाखला देणाऱ्यांत गर्ववाले व पुरोगामी या दोहोंच्याही विरोधात असलेले प्रतिगामी अधिक होते.

या कोलाहलात बौद्ध धम्मस्वीकारावेळी बाबासाहेबांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञा व त्यातील ‘मी गौरी-गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कुठल्याही देवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही’ या प्रतिज्ञेचा वारंवार उल्लेख झाला. तथापि, या प्रतिज्ञांच्या यादीतील महत्वाच्या अन्य काही प्रतिज्ञा दुर्लक्षित राहिल्या. आवाजी वातावरणात तशा त्या नेहमीच राहतात. ११ व्या क्रमांकावरील प्रतिज्ञा ही अशीच नेहमी दुर्लक्षित राहणारी. ‘मी भगवान बुद्धाने सांगितलेल्या अष्टांग मार्गांचा अवलंब करेन’ असे या प्रतिज्ञेत म्हटले आहे. अष्टांग मार्गात ज्या आठ बाबींचा उल्लेख आहे, त्या प्रत्येक शब्दाआधी ‘सम्यक’ अशी संज्ञा येते. या ‘सम्यक’ संज्ञेला बुद्धाच्या विचारांत कळीचे महत्व आहे. सम्यक म्हणजे सर्व बाजूंनी, सारासार विचार करुन ठरवलेले, योग्य, विवेकाचे अधिष्ठान असलेले.

अस्मिता वा वादांच्या तलवारबाजीत या ‘सम्यका’चा बळी जातो. सम्यकाच्या मापाने या घटना मोजल्या तर काही निराळे पदर, वेगळे आयाम व संदर्भ ध्यानी येतात. समाजाच्या समतोल धारणेस ते उपयुक्त असतात.

हे इतके वाचल्यानंतरही अजून भाऊ कदमांच्या मी बाजूने की विरोधात हे काही कळत नाही, असे काही वाचकांना वाटू शकते. त्यांची अधीरता मी समजू शकतो. थोडे थांबा अशी त्यांना विनंती आहे. त्या मुद्द्याकडे मी येणार आहे. लेखाची सुरुवात करताना धम्मचक्र प्रवर्तन दिन जवळ आला की लेखाजोखा मनात सुरु होतो असे जे मी म्हणालो, तो समग्र लेखाजोखाही इथे मी मांडणार नाही. ते एक मोठे व क्रमाक्रमाने करण्याचे कार्य आहे. अलिकडच्या काही घटनांच्या संदर्भाने पुढे येणाऱ्या दोन-तीन मुद्द्यांचीच मी चर्चा करणार आहे. ते मुद्दे या मधल्या वादंगात फार पुढे आले नाहीत किंवा अधोरेखित झाले नाहीत, असे मला वाटते. तेव्हा, ज्यांना धीर असेल त्यांनी थोडे वळण-वळसे माझ्याबरोबर घ्यावेत ही विनंती.

गेल्या आठवड्यात कोकणात गावी गेलो होतो. आमच्या वाडीत एका नातेवाईकाचा पुण्यानुमोदन (मरणोत्तर कार्य) कार्यक्रम होता. आदरांजली वाहताना एका वक्त्याने मृत व्यक्तीच्या चांगल्या गुणांची उजळणी केली तसेच त्याच्या दारुच्या व्यसनाची व त्यामुळे त्याच्या झालेल्या मृत्यूची नोंद घेतली. सध्याची पिढी, तिच्याकडून होणारी आरोग्याची हेळसांड याबद्दल चिंता व्यक्त केली. या वक्त्याच्या भाषणाच्या सुरुवातीच्या स्मरण व अभिवादनात बाबासाहेब, फुले, शिवाजी, शाहू, सावित्रीबाई, माता भीमाई, माता रमाई...अशी महामानवांची बरीच मोठी यादी होती. म्हणजे बौद्धांच्यातला तो सरावलेला वक्ता होता. शेवट मात्र त्याने परमेश्वर मृताच्या आत्म्यास शांती देवो असा केला.

याबद्दल कोणालाच काही वावगे वाटले नाही. नंतरच्या वक्त्यांनी कोणी ईश्वर, आत्मा याला आक्षेप घेतला नाही. मीही माझ्या त्यानंतरच्या भाषणात या वक्त्यांनी व्यसन, आरोग्य याबद्दल जे सांगितले त्याला अनुमोदन दिले. ईश्वर-आत्मा उल्लेखाकडे दुर्लक्ष केले.

माहेरी आलेल्या आमच्या एका नातेवाईक मुलीला तिच्या दोन वर्षांच्या मुलीसह सासरी पोहोचवायला दुसऱ्या दिवशी गेलो. त्यांच्या गावी पोहोचलो. तिच्या या सासरच्या घरात जाताना आम्ही सरळ आत गेलो. पण छोट्या मुलीला घरातल्यांनी बाहेरच थांबवले. भाकरीचा तुकडा किंवा तांदूळ असे काहीतरी व पाणी तिच्यावरुन ओवाळून टाकले व मग तिला आत घेतले. आमच्याकडे याला चाक (म्हणेज दृष्ट) काढणे म्हणतात. लहानपणी मुंबईहून कोकणात गावी गेलो की माझीही अशीच चाक काढली जाई.

या घरात आमचे आदराने आतिथ्य केले गेले. घरात बुद्ध-बाबासाहेब वगळता कुठल्याच देवाचे फोटो नव्हते. आमचा मुलगा याबद्दल कसा दक्ष असतो, असे त्या घरातल्या आमच्या या मुलीच्या सासूबाई सांगत होत्या. त्यांचे पती खूप आजारी आहेत. काहीतरी ‘बाहेरचे’ (देवादिक, भगत) बघावे असे मला वाटते. पण माझा मुलगा कसा त्याला विरोध करतो, हे त्या अभिमानाने सांगत होत्या. मीही कौतुकाने त्यांना प्रतिसाद देऊन ऐकत होतो.

मी माझ्या वयवर्षे १६ ते २० या काळात असतो तर या दोन्ही ठिकाणी गोंधळ घातला असता. श्रद्धांजली वाहणाऱ्या माणसाने ईश्वर, आत्मा यातले आद्याक्षर उच्चारले असते तरी त्याचे भाषण बंद पाडले असते व त्याला बाबासाहेबांनी हेच का शिकवले वगैरेंचा भडिमार करुन अवमानित केले असते. कदाचित आमच्या गावातून ताबडतोब बाहेरही काढले असते. दृष्ट काढण्याच्या प्रसंगात दुसऱ्या गावात असतो तरी त्या चाक काढणाऱ्या बाईंना ‘बौद्ध असूनही तुम्ही अशा अंधश्रद्धा पाळता’ म्हणून फैलावर घेतले असते व त्यांच्या जेवणावर बहिष्कार घालून दारातूनच परतलो असतो. या काळात मी लहान असलो तरी गावोगाव बुद्धधम्मावर प्रवचनेही देत होतो. यात मैत्री, करुणा वगैरे बोलत असे. पण कडवेपणा अधिक होता. असा मी एकटा नव्हतो. आमचा तरुणांचा तसा गटच होता. आमची संघटना होती. तिचे नाव- बौद्ध युवा मंच.

आपला धम्म विज्ञाननिष्ठ आहे, त्यात ईश्वर, आत्मा काही नाही. तेव्हा बौद्धांच्या कार्यक्रमांत त्याबद्दल आपल्या बोलण्यात चुकूनही काही येता कामा नये. बौद्धवाडीत कोणाच्याही घरात देवाचा फोटो असता कामा नये. गळ्यात दोरे-गंडे असता कामा नयेत, घरात मिरच्या-नारळ लटकलेले किंवा मुहूर्तमेढीला दोरे बांधलेले आढळता कामा नयेत. हे गंडे-दोरे, मिरच्या कापायची आम्ही मोहीमच काढली होती. या सगळ्या कापलेल्या वस्तू एका हाऱ्यात (मोठी टोपली) गोळा करुन ताशे वाजवत वाडीच्या बाहेर नेऊन आम्ही त्यांची होळी केली होती. कोणी नवसाला अथवा पिशाच्चाची शांती करण्यासाठी रात्री लपूनछपून वाडीबाहेर जाऊन कोंबडे कापतोय का यावर आम्ही हेरगिरी करत असू. जे सापडतील त्यांना दंड करत असू. ज्याच्या अंगात येईल त्याला पन्नास रुपये दंड ठेवल्याचे मला आठवते. लग्नात हळद, मुंडावळ्या अजिबात असता कामा नयेत. २२ प्रतिज्ञांतल्या १९ व्या प्रतिज्ञेतले ‘मनुष्यमात्राला असमान व नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा मी त्याग करतो’ हे बाबासाहेबांचे शब्द आमच्या मनात जागा फिरवत व ते ‘मनुष्यमात्राला असमान मानणाऱ्या नीच हिंदू धर्माचा’ असे होत. हिंदू धर्माला व देवांना शक्य तेवढ्या ताकदीने आम्ही नीच म्हणत असू. भयंकर घृणा वाटायची हिंदू धर्म व हिंदू देवतांविषयी. गावातले काही झाडांखालचे दगड-देव आम्ही फोडून तोडून टाकले होते. आमच्या आजच्या अवनत अवस्थेला हाच हिंदू धर्म व त्यातील हे देव कारणीभूत आहेत याविषयी मनात राग, चीड, संताप तीव्र होता.

अशा त्या काळात भाऊ कदम यांच्या बौद्ध असतानाही गणपती बसवण्याच्या कृत्याबाबत माझी प्रतिक्रिया काय राहिली असती? ...त्यांचा गणपती इको असो नाहीतर बिनइको असो त्याची त्यांच्या घरात घुसूनच तोडफोड करायची भूमिका घेतली असती. गावी असता तर तोडफोड नक्की. शहरात असल्याने तोडफोड नाही तरी घरी जाऊन प्रत्यक्ष धमकावण्याचा प्रयत्न केला असता. बायकोला वाटले म्हणून, मुलीला वाटले म्हणून, बायको परधर्माची आहे म्हणून तिचे उपासनास्वातंत्र्य राखले पाहिजे वगैरे काहीही माझ्या मनाला शिवले नसते. भाऊ कदम स्वतःला बौद्ध म्हणवत असेल तर हे असेच होणार. त्यांनी स्वतःला महार म्हणून घोषित करावे. मग मला काही प्रश्न नव्हता. बौद्ध असताना असे वागणे मी सहन करु शकलो नसतो. समाजपरिवर्तनाच्या लढ्याला सिद्ध असलेल्या आमच्या बौद्धांच्या फौजेतला एक सैनिक फितूर निघाला, त्यामुळे आमचा लढा कमजोर व्हायची शक्यता आहे, त्यासाठी त्याला धडा शिकवायला हवा, ही भूमिका त्यामागे असती. ‘मजहब खतरे में है’ या भूमिकेशी तिचे साम्य नाही.

(बाबासाहेबांची हिंदू देवतांना भजलात तर वाळीत टाकण्याच्या उद्गारामागे समाजाला त्याच्या दयनीयतेला कारण झालेल्या कर्मकांडातून बाहेर काढून आधुनिक वैज्ञानिक पायावर उभे करावे ही भावना आहे. ते उद्गार पालकत्वाच्या भूमिकेतून आलेले दिसतात. त्यांचा शब्दशः अर्थ घेणे बरोबर होणार नाही. बौद्ध धम्म स्वीकारापूर्वीचे व घटनानिर्मितीनंतरचे ते उद्गार आहेत. घटनेत उपासना स्वातंत्र्य नोंदवलेले बाबासाहेब त्याविरोधात भूमिका घेतील हे संभवत नाही.)

अशावेळी आमचे हे वागणे ‘तालिबानी’ समजायचे का? ...नाही. त्यात कट्टरता आहे. पण त्यामागे हिंदू संस्कृतीने जी हीन वागणूक आम्हाला दिली त्याविषयीची रास्त चीड होती. माणूसपणाचे हक्क शाबित करण्याचा तो एल्गार होता. तालिबानी परधर्म, परमत शत्रू समजतात. सहिष्णू भूमिका घेणारे स्वधर्मीयही त्यांना शत्रूस्थानी असतात. त्यांचे धर्ममत हेच जगात सर्वश्रेष्ठ व तेच टिकले पाहिजे, असे त्यांना वाटते. त्यांचे तत्त्वज्ञानच मूलतत्त्ववादी आहे. आम्हाला हिंदू हा परधर्म असता तर काही प्रश्न नव्हता. आमचे बापजादे तो आपला धर्म मानत होते. या आपला मानलेल्या धर्मानेच त्यांना गुलामीत लोटले होते. उन्नत जीवनासाठी हा नरक संपूर्णतः नष्ट करायला हवा ही आमची भावना होती. ख्रिश्चन व मुस्लिम धर्माबद्दल (त्यांच्यात ईश्वरी शक्तीला मान्यता असली तरी) आम्हाला अडचण नव्हती.

आम्ही पारंपरिक बौद्ध नव्हतो. नाही. बाबासाहेबांनी आम्हाला त्याच्या ओंजळीत घातले. एवढेच नव्हे, तर पारंपरिक बौद्ध धर्मात आलेल्या कर्मकांडापासून वेगळे असे ‘धम्म’ स्वरुप बाबासाहेबांनी आम्हाला दिले. त्यामुळे पारंपरिक बौद्धांचा हिंदू धर्मीयांविषयीचा निरपेक्ष दृष्टिकोण आमचा असणे संभवनीय नाही. सर्वधर्म समभाव हा मुद्दा लक्षात घेता पारंपरिक बौद्ध जसा हिंदू धर्मीयांना प्रतिसाद देतील तसा आम्ही तटस्थपणे देणे कठीण आहे. त्यामुळे दलाई लामा अन्य धर्मीयांशी जसे संबंध ठेवतात तसेच हिंदू धर्माशी ठेवू शकतात. हिंदू देवतांना नमस्कार करु शकतात. त्यांच्या दृष्टीने ती परमत सहिष्णुता किंवा सन्मान आहे. शिवाय एक परदेशी निर्वासित म्हणूनही भारतीय संस्कृतीला मान देण्याचे, तिच्याप्रती कृतज्ञता दर्शवण्याचे ते त्यांचे परराष्ट्र धोरणही आहे.

आम्ही आंबेडकर जयंतीला जातो, मग त्यांनी गणपतीला आले तर काय बिघडले? ...सवर्ण हिंदूंच्या या प्रश्नाला तार्किक उत्तर देता येत नाही. आंबेडकर जयंतीला येणारे हिंदू जरुर आदरास पात्र आहेत. पण त्यांना आंबेडकरांनी किंवा त्यांच्या समुदायाने वाईट वागवलेले नाही. आंबेडकर जयंतीला येणाऱ्यांनी नाही, पण त्यांच्या पूर्वजांनी व त्यांच्या धर्माने आम्हाला नीच मानले आहे. त्यांच्या देवतांच्या दारात आम्हाला कधी उभे केले नाही. त्यामुळे आंबेडकर जयंतीला येणारे हिंदू ज्या सहजतेने येतात, ती सहजतेची भावना आंबेडकरी बौद्धांमध्ये असणे कठीण आहे. जेव्हा हे नीच वागवणुकीचे सगळे संदर्भ पूर्णपणे विस्मरणात जातील त्यावेळी निरपेक्षपणे परस्परांच्या उपासना वा श्रद्धास्थानांना सन्मान देणे घडू शकते.

मी माझ्या जुन्या मनोभूमिकेत असतो तर भाऊ कदमांविषयी कसे वागलो असतो ते वर लिहिले आहे. आज माझ्या त्यावेळच्या भूमिकेतला एक समूह बौद्धांच्यात आहेत. मी त्यातून बाहेर पडलो तरी तो त्यातून निघालेला नाही. त्याची मनःस्थिती मी समजून घेतो. त्याचे समर्थन करत नाही. ते तत्त्वतःच गैर आहे, संविधानविरोधी आहे, असेच आता मला वाटते. असे वागण्याने आपण एकाकी पडतो. कर्मठ, प्रतिगामी आहोत, असाच इतरांचा समज व्हायला कारण ठरतो. आपली भूमिका अन्य समुदायांना पटवू शकत नाही, उलट त्यांच्या मनात आपण अढीच तयार करतो. अशावेळी आपण अधिक जाणतेपणा दाखवून प्रौढपणे वागायला हवे असे मला वाटते. आज जातीयवादाचे-सांप्रदायिकतेचे झोटिंग समाजाला आवळत असताना जे या झोटिंगांच्या विरोधात आहेत, असे सवर्ण हिंदू आपल्यापासून कदापि दूर जाता कामा नयेत, याचीही दक्षता घ्यायला हवी.

आज बौद्ध समाजात अनेक बदल होत आहेत, ते लक्षात घ्यायला हवेत. जातीयता व त्यामुळे होणारे अत्याचार अजून थांबलेले नाहीत. तथापि, शहरात व ग्रामीण भागातही नव्या पिढीत पहिल्यासारखी अस्पृश्यता राहिलेली नाही. सवर्ण हिंदूंच्या तुलनेत बौद्धांचे राहणीमान पहिल्यासारखे सरसकट निम्न पातळीवर आता नाही. त्यात सकारात्मक फरक पडलेला आहे. बौद्धांच्या चळवळींची व प्रबोधनाची अवस्था ढासळलेली आहे. मी ज्या भावनेने जयभीम म्हणेन ती प्रेरणा आमच्या मुलांची नाही. आमच्या आणि त्यांच्या भोगण्यात-पर्यायाने जाणिवांत फरक पडलेला आहे. 

अशावेळी ईश्वर-आत्मा या उल्लेखांविषयी सजग राहण्याची पूर्वीची जाणीव धूसर आहे. एकीकडे बाबासाहेब-बुद्धाच्या प्रतिमांना हार घालायचे व त्याचवेळी अन्य देवांना पूजायचे, हिंदू सण साजरे करायचे हे सहज होते आहे. नवी सरमिसळ एका बाजूला स्वागतशील आहे. पण काहीही गांभीर्य न ठेवता दिशाहिनतेनेही हे होत आहे. असा गांभीर्याचा अभाव वा वैचारिक मुळे विस्मरणात जाणे धोक्याचे आहे. ही मुळे स्मरणात ठेवून त्यांचा विकास करुन प्रगल्भतेने हिंदूंशी साहचर्य-सहयोग करणे हे व्हायला हवे. कोणी गणपतीला बोलावले तर त्याच्याकडे जरुर जावे. अगदी गणपतीला हात जोडणे, सोसायटी-वस्तीतील गणेशोत्सवाच्या आयोजनात सहभागी होणे याचे मी स्वागतच करतो. पण स्वतःच घरात गणपती बसवणे मला मंजूर नाही. एखाद्याची श्रद्धाच असेल तर त्याचा मी आदर करेन. आंतरजातीय लग्नामुळे घरात हिंदू सदस्य असेल व त्याच्या इच्छेखातर गणपती बसवला असेल तर त्याचे मी अभिनंदन करेन. तथापि, आंबेडकरी बौद्धांच्या कार्यक्रमपत्रिकेवरला व्यवस्था बदलाचा लढा पूर्णत्वाला जाऊन एका समान जाणिवेच्या पातळीवर सर्व समाज पोहोचलेला नाही. अशावेळी गंमत म्हणून, पर्यावरणाचा संदेश म्हणून इकोफ्रेंडली गणपती बसवण्यामागे निरागस सहजता असू शकते, असे मला वाटत नाही. प्रतिष्ठित समुदायाने आपल्याला त्यातलेच समजावे म्हणून त्याच्या संस्कृतीचे अनुकरण हा भाग यात मोठा असतो. आपण बौद्ध आहोत हे कोणाला कळू नये, आम्ही पण तुमच्यातलेच आहोत, आपल्या मुलांनाही ती इतरांपेक्षा वेगळी आहेत हे वाटू नये, ती त्या प्रभुत्वशाली संस्कृतीचा भाग व्हावीत हा न्यूनगंड, ही इच्छा यामागे असते. भाऊ कदमांच्या व्यक्तित्वाचा व्यक्तिशः मला परिचय नाही. पण त्या थरातले लोक या न्यूनगंडाची शिकार असतात, याचा मला अनुभव आहे.

भाऊ कदमांसारख्या बौद्धांच्यातील न्यूनगंडाला, त्यांना धमकावून माफी मागायला लावणाऱ्या बौद्धांच्यातल्या जातीय धटिंगणतेला व नव्या पिढीतील आंबेडकरी जाणिवांच्या अभावाला आंबेडकरी चळवळीची आजची अवस्था जबाबदार आहे.

आणि या सगळ्यावरचा इलाज अर्थातच आंबेडकरी चळवळ दुरुस्त करुन तिला सम्यकतेच्या पायावर उभी करणे हाच आहे.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com
___________________________
आंदोलन, ऑक्टोबर २०१७

No comments: