जन्मानंतर हॉस्पिटलमधून घरी आल्यावर घरातल्या ज्या काही बाबी पहिल्यांदा पाहिल्या असतील त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व बुद्ध यांच्या प्रतिमांचा समावेश ठळक असेल. कारण घरातल्या अन्य वस्तूंत त्याच दर्शनी, रंगीत व उठून दिसणाऱ्या होत्या. हे दोघेही महान होते. पण मानव होते. देव नव्हते. त्यांचा काहीएक विचार होता. कार्य होते. त्यामुळे आमचे म्हणजे माझ्या आई-वडिलांचे व त्यांच्या पिढीतील दलित समुदायाचे आयुष्य अंतर्बाह्य बदलले होते. एक अस्मिता, नवचैतन्य जगण्यात आले होते. पण विचार न कळत्या वयात या दोहोंच्या प्रतिमा अन्य मित्रांच्या घरातील देवांप्रमाणेच मला होत्या. त्यात आई-वडिल या दोहोंच्या प्रतिमांना नियमित हार घालायचे, अगरबत्ती, मेणबत्ती लावायचे व त्रिसरण-पंचशील घ्यायचे. मला हात जोडायला व नमस्कार करायला सांगायचे. माझ्या मुलांना सांभाळ अशी करुणा आई भाकायची. त्यामुळे देवांच्या पलीकडे विचारांचा काही भाग या प्रतिमांत आहे, याचा उमज पडणे कठीण होते. आम्ही बौद्ध झालो तरी माझ्या आईच्या अंगात ‘साती आसरा’ यायच्या. मांड भरला जायचा. त्यावेळी साती आसरांची (मोठ्या बायांची) भजने होत. मी त्यात तल्लीन होई. टाळ वाजवी. भजने म्हणत असे. पुढे सप्ताहात कीर्तने ऐकायला आवर्जून जाई. आंबेडकर-बुद्ध जयंती व कीर्तने दोन्ही मला आवडे.
अक्षरओळख व पॅँथरची वावटळ समांतर सुरु झाली. आमची वस्ती गदगदू लागली. धुमसू लागली. सभा-भाषणांतून नवे विचार कानावर पडू लागले. पत्रे-पत्रके-नियत-अनियतकालिके हातात पडू लागली. गल्ली-चौकांत सामाजिक-राजकीय घडामोडींविषयी चर्चा झडू लागल्या. चर्चा करणाऱ्यांच्या घोळक्यात उभे राहून मोठ्या माणसांचे बोलणे ऐकणे हे वेगळेच वाटत होते. चौथीला बाबासाहेब-बुद्धाबद्दल थोडे थोडे वाचायला मिळू लागले व अधिक अधिक समजू लागले. सहावीला वीज चमकावी तसा या वाचनातून निरीश्वरवादाचा साक्षात्कार झाला. हे जग कोणी निर्माण केलेले नसून ते विकसित झालेले आहे. जगात ईश्वर नावाची कोणतीही शक्ती नसून तिच्यावर विसंबणे म्हणजे परावलंबी होणे. अनुभवाला येणाऱ्या व विज्ञानाने सिद्ध होणाऱ्याच बाबींवर विश्वास ठेवायचा. ईश्वर व त्यावर आधारित धर्माने आपला विकास रोखला. आपल्या कैक पिढ्यांवर अस्पृश्यतेचे जिणे लादले. देव-कर्मकांड-उच्चनीचतेचे हिंदूधर्माचे हे जोखड झुगारुन बाबासाहेबांनी नीती व वैज्ञानिकतेवर आधारित बौद्ध धर्म आपल्याला दिला. ज्यात करुणा, मैत्री असे बरेच काही महान आहे. आणि हे महानपण प्रदान करणारा बुद्ध स्वतः माणूस आहे. ...अहाहा! किती भाग्यवान आहोत आपण! इतरांकडे नसलेले असे काही मौलिक वैभव आपल्याला सापडले याची ती प्रचिती रोम न रोम थरारवणारी होती.
या रोमांचित अवस्थेत त्या शालेय जीवनातच सामाजिक हालचाली सुरु झाल्या. अंगात येण्यावरुन, मोठ्या बायांच्या भजनावरुन मुंबईत घरात व गावी गेल्यावर गावात भांडणे सुरु झाली. या भूमिकेने तप्त झालेल्या समविचारी मुलांचे आमचे गट तयार झाले. त्यांनी गावी तसेच मुंबईतील वस्तीत नवे जागरण सुरु केले. फुले, शाहू आदि पुरोगामी विचारांचा मागोवा सुरु झाला. दलितांवरील अत्याचाराचा विरोध म्हणून स्वातंत्र्यदिनावर बहिष्कार, शाळेत गेलोच तर राष्ट्रगीत न म्हणणे, काळ्या फिती लावणे हे भूषणावह वाटू लागले. बुद्धाला आपले केस कापून आलेल्या पैश्यातून खिर देणाऱ्या सुकेशिनीच्या डोक्यावरुन बुद्ध हात फिरवतो व तिच्या पाठीवरुन पुन्हा तिचे सुंदर लांबसडक केस सळसळू लागतात, या आमच्या पुस्तकातील धड्यावरुन मी शाळेत गदारोळ केला. हिंदू देवता चमत्कार करतात. आमचा बुद्ध चमत्कार करत नाही. तेव्हा त्याची यातून बदनामी होते व बौद्ध मुलांवर आपलाही बुद्ध चमत्कार करणारा एकप्रकारे देव आहे, असा संस्कार होतो. हे थांबले पाहिजे. ..वगैरे.
पॅंथरच्या या भराच्या काळात व्हॉल्टेअरची जयंती, पॅंथर हे नाव ज्यावरुन घेतले ती ब्लॅक पॅँथर ही आंतरराष्ट्रीय परिमाणेही मिळाली. पण ज्या वेगाने पॅंथर भरात आली त्याच वेगात तिचे पतनही सुरु झाले. या ढासळण्याचा व आमची मॉडेल्स असलेल्या नेत्यांच्या नैतिक व राजकीय घसरगुंडीचा आमच्यावर विपरित परिणाम होऊ लागला. आमच्या आस्थांवर आघात झाले. त्यातूनच नव्या विचारांचा शोध सुरु झाला. कम्युनिस्ट, समाजवादी, गांधीवादी, उच्चवर्णीय (मुख्यतः ब्राम्हण) यांच्याविषयी तिटकारा व संशय वातावरणात भरगच्च होता. तरीही नेते वा आपल्यातले अन्य कार्यकर्ते सांगतात म्हणून या मंडळींपासून दूर न राहता त्यांना भेटून, त्यांचे साहित्य वाचून स्वतः पारखले पाहिजे असे वाटू लागले. तसे प्रयत्न सुरु झाले.
या क्रमात भाऊ फाटकांची भेट झाली. मी ८ वी ते १० वी जिथे शिकलो त्या चेंबूर हायस्कूलचे ते माजी शिक्षक. मी तिथे जाण्याआधीच ते निवृत्त झालेले. पण त्यांचा उल्लेख व एखादी आठवण कानावर होती. त्यांच्याविषयी वाचलेही होते. त्यामुळे त्यांच्याविषयी उत्सुकता होतीच. मी ज्या मुक्तानंद हायस्कूलमध्ये पुढे शिक्षक झालो, तेथील आमच्या पर्यवेक्षिका रजनी लिमये या भाऊंच्या कन्या. त्यांच्यामार्फत भाऊंची भेट झाली. भाऊ कम्युनिस्ट. त्यामुळे उत्सुकता असली, नवे समजून घेण्याची आस असली तरी संशय होताच. प्रत्यक्ष भेट काही समजुतींना तडा देणारी ठरली. आम्हा आंबेडकरी संस्कारातील मंडळींना सर्वसाधारणपणे उच्चवर्णीय पुरोगाम्यांकडून चुचकारणे, जादाचा आदर व आधारही देणे होते. तसे इथे काहीही नव्हते. (या भेटीचे सविस्तर वर्णन उद्बोधक असले तरी आता विस्तारभयास्तव ते टाळतो.) भाऊंच्या या पहिल्याच भेटीत आपल्या विचारांतल्या रोमँटिकतेचे वस्त्रहरण होते आहे व वस्तुनिष्ठता दृश्यमान होत आहे हे जाणवले. अर्थात पहिल्या भेटीतच संशय फिटला असे काही झाले नाही. तो संपायला वेळ गेला. भाऊंच्या अभ्यासमंडळातून व कामातील सान्निध्यातून बुद्ध, आंबेडकर, गांधी, मार्क्स यांचे ऐतिहासिक योगदान व मतभेदांचे संदर्भ तसेच आजच्या काळातील त्यांची परस्पर पूरकता (समन्वय नव्हे) अधिक उलगडायला मदत झाली. भाऊंमुळेच स्त्री मुक्ती संघटनेची व पुढे लाल निशाण पक्षाची गाठ पडली. आमच्या वस्तीत संघटनेचे काम सुरु झाले. आक्षेप, आरोप, संशय यांचे प्रहार प्रस्थापित विचारांच्या जुन्या-नव्या कार्यकर्त्यांकडून झाले. जवळच्या मित्रांकडूनही काही काळ असहकार व त्यामुळे एकाकीपण वाट्याला आले. ज्यांच्यात काम होते त्या सामान्य लोकांतून हा अनुभव नव्हता. उलट साथ होती. त्यामुळे सावरायला मदत झाली.
‘आपल्या वस्तीत येणाऱ्या स्त्री मुक्ती संघटनेच्या या उच्चवर्णीय मुलींपैकी तुझ्याशी लग्न करुन राहणार आहे का या झोपडपट्टीत कोणी?’ या प्रश्नाला ‘त्या माझ्या सहकारी आहेत. त्या त्यांचा स्तर सोडून आपल्या वस्तीत येत आहेत, याचे आपण स्वागत करायला हवे. लग्न करण्यातूनच त्यांची निष्ठा जोखणे बरोबर नाही.’ असे उत्तर मी देत असे. पुढे यातल्याच एका मुलीबरोबर माझे आंतरजातीय लग्न झाले. ती झोपटपट्टीतच राहिली. तो प्रश्नही संपला. माझ्या डाव्या-पुरोगाम्यांशी असलेल्या सहकार्यातून आमच्या घरात व नातेवाईकांत एक नाराजी होती. तथापि, या आंतरजातीय लग्नाबाबत ‘आपल्यातलीच केली असतीस तर बरं झालं असतं’ एवढेच घरच्यांकडून बोलले गेले. बाकी सगळे उत्तम झाले. पत्नीने तिच्या वागण्यातून त्यांना, नातेवाईकांना, शेजारपाजारच्यांना व गावातल्यांनाही अक्षरशः जिंकून घेतले. आणि त्यामुळे या सगळ्यांशी असलेल्या माझ्या संबंधातही अधिक जवळीक तयार झाली.
तीव्रता तयार झाली ती मी नोकरी सोडून पूर्णवेळ कार्यकर्ता होणार त्यावेळी. मी एम. ए. फर्स्ट क्लास झालो. प्राध्यापक म्हणून नोकरी करुन स्थिर व बरे आयुष्य वाट्याला यायच्या काळात ही अवदसा का आठवली ही वंचनेतच आयुष्य काढलेल्या आई-वडिलांची तडफड होती. नातेवाईक, मित्र, समाजातले कार्यकर्ते यांनाही आपल्यातला एक होतकरू युवक या डाव्यांनी गटवला याची चीड आली होती. पत्नी नोकरी करणार होती, घरच्या जबाबदाऱ्या सोडणार नव्हतो हे आश्वासन त्यांना तसे पचत नव्हते. मी नोकरी सोडली. पूर्णवेळ कार्यकर्ता झालो. पत्नी तिचे शिक्षण पूर्ण करुन दोन वर्षांनी नोकरीला लागली. हा काळ कठीण गेला. पण चळवळीतील सहकाऱ्यांच्या आधाराने तो निभला.
डाव्या-पुरोगामी वर्तुळात वावर, कष्टकऱ्यांच्या तसेच स्त्री-पुरुष समतेच्या सांस्कृतिक चळवळींत सहभाग, अलीकडे संविधानातल्या मूल्यांच्या प्रसाराला प्राधान्य, त्याचवेळी ज्या आंबेडकरी विभागातून आलो त्याच्याशी मुंबईपासून गावच्या भावकीपर्यंत जैव नाते, यासंबंधातल्या विषयांवर लेखन व बोलणे असे काही माझ्याबाबत सांगता येते. जे आजही चालू आहे. अलीकडे विचारांचा मागोवा अधिक घेत असतो. पण तोही व्यवहाराशी नाते जोडत. त्यामुळे ते कळायला मदत होते व उपयोगीही ठरते.
एकूण पुरोगामी-आंबेडकरी चळवळीतले अंतराय संपले नसले तरी देशातील लोकशाही विरोधी, अराजकी, कट्टरपंथी शक्तींच्या चढाईच्या माहोलामुळे डाव्या, पुरोगामी, आंबेडकरी, गांधीवादी विचारांच्या दावेदारांमध्ये संवाद वाढू लागला आहे. त्यात अधिक सौहार्द येणे व एकजुटीच्या व्यवहाराला गती मिळणे यासाठी शक्य ते प्रयत्न हे सध्याचे माझे व्यवधान आहे.
मला जे अनुभवाला आले त्यापासून चळवळीतली पुढची पिढी पूर्ण अनभिज्ञ नाही. तिलाही हे ताणतणाव जाणवतात. तीही जुन्याची वाहक आहे. पण दिशाहिनता व व्हॉट्सअपी-फेसबुकी कृतिहिन बेजबाबदारपणा वाढला आहे.
घरच्या म्हणजे आमच्या मुलांच्या पिढीबद्दल बोलायचे तर मध्यवर्गीय घरात वाढलेली व भोवताली दमदार पुरोगामी चळवळ नसलेल्या काळात वाढलेली ही मुले आमच्यापासून बरीचशी अलिप्त आहेत. त्यांची जगण्याची व्याख्या व उद्दिष्ट आमच्याशी मेळ खात नाही. याला अपवाद असू शकतात. पण सर्वसाधारणपणे असे दिसते. व्यक्तिशः माझ्या घरचे काय? माझा मुलगा झोपडपट्टीत केवळ जन्माला आला. सहा महिन्यांतच आम्ही आधी भाड्याने व नंतर स्वतःच्या सेल्फ कंटेन्ट घरात मिश्र वसाहतीत स्थलांतरित झालो. माझ्या वाट्याला आलेला जवळपास सगळाच बौद्ध सभोवताल, सतत ‘जयभीम’चा उच्चार, जवळ बुद्धविहार, आंबेडकर-बुद्ध जयंतीचा, ६ डिसेंबरचा माहोल माझ्या मुलाला मिळाला नाही. त्यापासून तो पूर्ण अलिप्त वातावरणात वाढला. त्याची शाळाही या वातावरणाचा मागमूस नसलेली. घरातील बाबासाहेब-बुद्धाच्या प्रतिमा, आमचे सार्वजनिक जीवनातले वावरणे, तशा प्रकारचे लोक घरी येणे यामुळे आमच्या विचारांचे जे काही शिंतोडे त्याच्यावर उडाले असतील त्यामुळे तो बाय डिफॉल्ट निरीश्वरवादी-सांप्रदायिकताविरोधी आहे एवढेच. बाकी आमच्या कामा-भूमिकांबाबत त्याला काही औत्सुक्य आहे असे दिसत नाही. असो.
कोवळ्या वयात एका टप्प्यावर जी विचारांची वीज चमकली तिने जगण्याची वाट उजागर केली. पुढे कृतीतून अधिकाधिक परिपोषित होत गेलेल्या विचारांच्या लकाकण्याने अख्खे जीवन लखलखीत झाले.
- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com
(ललकारी, मार्च २०१८)