Thursday, May 10, 2018

ही वृत्ती सार्वत्रिक कधी होईल?

माझ्या एका लेखाला (विवेकाची नाव स्थिर ठेवू) आलेला प्रतिसाद व त्याला मी दिलेले उत्तर स्वतंत्र पोस्ट म्हणून टाकण्याचा हा मोह मी टाळू शकत नाही.
_________

सुधीर कारंडेः

सुरेश जी, नमस्कार, उत्कृष्ट मांडणी आणि समतोल असे लेखन वाटले, मी मूळ संघ विचारांचा असल्यामुळे काही मतांतरे आणि प्रश्न आहेत ते तुम्हाला खाजगीत पाठवतोय, पण इथे तुमच्या लेखन शैलीचा आणि अभ्यासाचा चाहता झालोय, परत तुमचं लेखन वाचायला मिळावे ही इच्छा.

माझे उत्तरः

प्रिय सुधीरजी,

सविनय स्नेह.

मतभेद राखून संवाद ठेवता येतो, अगदी विरोधकाच्या शैलीची प्रशंसा करता येते याचा दाखला असलेले आपले व्यक्तिमत्व हल्ली विरळा आहे. आपल्या या वृत्तीला अभिवादन. कितीही विरोधी मते असली तरी परस्परांविषयी आदर ठेवून ती व्यक्त करणे, विरोधकाला त्याचे मत मांडण्याचा पूर्ण अवसर देणे, कोणत्याही प्रकारे मानसिक वा शारीरिक हिंसेवर न उतरणे, दोन्ही मतांचा स्वीकार-अस्वीकार अखेर जनतेच्या स्वाधीन करणे ही लोकशाही यशस्वी होण्याची पूर्वअट आहे. आपल्याकडे ती बहुधा धाब्यावर बसवली जाते. विरोधी छावणीचे सोडा, आपल्या छावणीतल्याशी होणारा जरासा मतभेदही शत्रुत्व निर्माण करतो असे सार्वत्रिक चित्र दिसते. अशावेळी आपण ज्या उमदेपणाने संघाचे आहात हे मोकळेपणाने सांगून माझ्या शैलीची प्रशंसा करता व संवाद करु इच्छिता हे मला फार विशेष वाटते. खरं म्हणजे सगळेच असे वागले तर विखार किती कमी होईल ! मी संयतपणे मांडण्याचा प्रयत्न करतो. पण ज्याला आम्ही संघपरिवार म्हणतो त्यातील मंडळींची भाषा ऐकल्यावर माझ्याही भाषेत कधी कधी कडवटपणा येतो हे मला कबूल करावे लागेल. तो तसा येऊ न देण्याची दक्षता घेणे गरजेचे आहे हे तुमच्यासारख्यांच्या प्रतिसादाने लक्षात येते. पुन्हा एकदा आपल्याला धन्यवाद.

सदिच्छांसह,
सुरेश सावंत

3 comments:

सम्यक said...

१० मे २०१८

मेसेज बॉक्समधील संवादः

सुधीर कारंडे-

सुरेश जी नमस्कार, मी आधी सांगितल्या प्रमाणे संघ विचारांचा आहे, तरतुम्ही मांडलेलं मत माझ्या बाजूने तसे नकारात्मक राहील , म्हणजे नदीच्या दोन पत्रा सारखं..माझ्या दृष्टिकोनातुन मागच्या सरकारने लोकांना दलित पानाची सवय लावली....तुम्हाला आरक्षण हवाय अन मला ते नकोय, atrocities law तुम्हाला हवाय मला तो नको...पण हा भेद नेहमीच चालत राहील असा मला वाटत....म्हणजे कधीतरी महिला पुढे येतील तर पुरुष मागे राहतील, कधी सवर्ण तर कधी दलित....माझा प्रश्न असा आहे की ह्या सर्वाचं भविष्य काय आहे, जगात असा समतोल असलेले कुठले देश आहेत का,

आणि असेल तर त्याच्या सारखा आपला देश बनायला काय करावे लागेल
कृपया त्रयस्थ बनून उत्तर द्या

मी-

जगात पूर्ण समतोल असा कोणताच देश आज नाही. प्रत्येक देशाचा स्वतःचा म्हणून प्रवास असतो. आधीच्या तुलनेत तो किती पुढे किंवा मागे आला आहे, यावरुन त्याची प्रगती मापावी लागते. माणसे-समूह हितसंबंधांनी बद्ध असतात. म्हणजे मालक-मजूर संबंधात नफा व अधिक योग्य रोजगार यासाठी दोहोत संघर्ष चालूच राहणार. खाजगी मालकीच नसेल तर वेगळी स्थिती तयार होईल. कदाचित त्यात वेगळे ताण तयार होतील. पण तो निखालस पुढचा टप्पा असेल. रशियात असे झाले. त्या प्रयोगात चुका झाल्या. तो समाज ते भोगतो आहे. चीन सावध झाला. त्याने आपल्यात आवश्यक ते बदल केले. याचा अर्थ तेथे सगळे आलबेल व माणसे सुखाच्या परमोच्च स्थितीत आहेत असे नव्हे. तेथील मुलांची प्रतिभा लहानपणीच ओळखून तिची जोपासना करणे हे सरकार स्वतःची जबाबदारी समजते. ऑलिंपिकमध्ये या देशाचे चमकणे हे त्याचे उदाहरण आहे. आपल्याकडे गरीब विभागातील मुलांची प्रतिभा कुजून जाते. ती कोणाच्या लक्षातही येत नाही. साधे उत्तम पोहणे शिकायचे असेल तर गरीब मुलाला स्विमिंग पूल कोठे आहे? खूप पैसे मोजले तरच पोहण्याची संधी मिळते. आपल्याकडे लोकशाही आहे, चीन-रशियात ती तशी नाही. काहींना वाटते हवीय कशाला लोकशाही जर ती माणसाला सुख देत नसेल तर? मी याच्याशी सहमत नाही. लोकशाही हा आजच्या माणूसपणाचा हिस्सा आहे. तो कोणत्याही स्थितीत गमावता कामा नये, ज्याला आपण सुख म्हणतो त्यात माझे म्हणणे मला मोकळेपणाने मांडता येणे या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा समावेश होतो. सुखाची व्याख्या फक्त भौतिक संसाधनांत सीमित ठेवता येत नाही.

माणूस म्हणून सर्वांचे कल्याण झाले पाहिजे, ही भूमिका सर्वाच्या ठायी आली तर मालक-मजूर, स्त्री-पुरुष, दलित-सवर्ण, हिंदू-मुसलमान आदि सर्व ताण विरघळतील. पण मनाच्या या स्थितीला सगळा समाज पोहोचणे हे आज संभवनीय नाही. विशेषतः विविध प्रकारे जीवन असुरक्षित होत असताना, भावनांचे उद्रेक होत असताना समतोलता येणे हे काही व्यक्तींत होऊ शकते. सगळा समाज तसा होणे कठीण असते. म्हणूनच समाजातल्या विविध ताणांचा-विशेषतः भौतिक-निरास करायचा असेल तर शिक्षण, रोजगार, निवास, पाणी, रस्ते, इस्पितळे आदि सुविधा/अधिकार सर्वांना मिळतील, दुबळ्यांप्रती खास लक्ष असेल अशी दिशा सरकारी धोरणाची असणे गरजेचे आहे. ती तशी असावी म्हणून आंदोलने वा राजकीय निवडणुकीतून सत्तापालट हा उपाय असतो. हे उपायही ताणाचे असतात. हे बराच काळ चालणार आहे.

पण आज अन्यायग्रस्त असलेले पुढे अन्यायी होतील असे चक्र हा काही निसर्गनियम नाही. अन्यायग्रस्त विभागातील काही व्यक्ती तशा वागतात, पण सबंध अन्यायग्रस्त समाज पूर्वीच्या अन्यायी समाजावर हुकूमत गाजवून तसाच अन्याय करतो असे चित्र जगात नाही. ब्राम्हणांबद्दल कटवटपणे बोलणारा बहुजन वर्गातील एक विभाग मोकाट वाटतो, हे खरे. पण याचा अर्थ तो समाज ब्राम्हणांवर अन्याय करतो आहे असे म्हणता येत नाही. दलितांतला एखादा कारखानदार होतो. तो सवर्ण कामगाराचे शोषणही करतो. म्हणून सबंध दलित समाज सवर्णांशी ते जसे पूर्वी वागले तसे वागेल हे संभवत नाही. काळे गोऱ्यांवर अन्याय करत आहेत असे सरसकट चित्र नाही. स्त्री-पुरुषांबाबतही तेच. माणूसपणाच्या संघर्षात सगळेच बदलत असतात. हा बदल मुख्यतः पुढे जाणारा असतो. त्याला वळसेही पडतात. पण जगात सर्वसाधारणपणे मानवी समाज पुढे जातानाच दिसतो. अशावेळी जुने शोषित पुढच्या काळात शोषक होतात व हे चक्र असेच चालते याला पुरावा नाही.

विचार-भूमिकांचेही तेच. संवाद याचा अर्थ वकिली नव्हे. वकिलांची बाजू ठरलेली असते. संवादात सत्याचा शोध असतो. नवे मुद्दे विरोधकाकडून आले व ते माझ्या आधीच्या समजाला दुरुस्त करणारे ठरले तर ती मी मोठी मिळकत समजतो. त्याप्रमाणे माझा विचार दुरुस्त करतो. ही प्रक्रिया सगळ्यांनाच प्रगल्भ करणारी ठरु शकते.

असो. बरेच लिहिले. संपर्क-संवादात राहूया.

सदिच्छांसह,
सुरेश सावंत

सम्यक said...

सुधीर कारंडे यांचे उत्तर:

नक्कीच सुरेशजी, माझ्या पण बऱ्याच प्रशांची उत्तरे सापडलीत, आपण नक्की संपर्कात राहूया, अजून बरीच प्रश्न आहेत जी कालांतराने विचारात राहीन, मार्गदर्शन करावे.
संवादात सत्याचा शोध असतो" हे फार महत्वाचे शिकलो.

सम्यक said...

संदीप पेंडसे:

अगदी टोकाचे मतभेद असले तरी संवाद होऊ शकतो. शर्ती म्हटले तर दोनच असतात. एक म्हणजे काही तरी समान चौकट हवी - निदान एकमेकांचे माणूसपण मान्य करण्याची. दुसरी म्हणजे इतर विचारांना अस्तित्वात असण्याची मुभा मान्य करायला हवी. --- वेगळी मते देशद्रोही किंवा शत्रूंच्या पैशावर पोसलेली आहेत असे मानले तर संवाद बंद होतो. तेच दुसऱ्या बाजूने हि खरे आहे. उजवी मते प्रामाणिक आहेत असे मानले तर ती बदलू शकतात हि शक्यता गृहीत धरता येते. पण शेवटी उद्दिष्ट एकच आहे हि चौकट असयला हवी. वरील उदाहरणावरून असे वाटते की हि चौकट आपण दोघे हि मान्य करत आहात. बरे वाटले. पण अनेकदा हि चौकट नसते. मग केवळ तोंडदेखला सभ्यपणा असू शकतो. हल्ली तर तो हि नसतो. अशा परिस्थितीत संवाद होणे अशक्यप्राय होत जाते. माझ्या कॉलेजच्या दिवसात विद्यार्थी परिषद व फेडरेशनच्या कार्यकर्त्यांचा एकमेकांना तीव्र विरोध असायचा पण दोन्ही बाजूंना विरोधक सामाजिक जबाबदारी निभावू पहात आहेत हे हि मनोमन मान्य होते. पुढे हि परिस्थिती बदलली - मग संवादाची जागा मोठ्या प्रमाणात हिंसेने घेतली. परिवर्तन नव्हे शत्रू निर्दालन हे तत्व झाले तर संवाद व औदार्य टिकू शकत नाही.

एक गोष्ट मात्र नक्की - निदान परिवर्तनवादी कार्यकर्त्यांनी मांडणी व भाषा यात पत्थ्ये पाळायला हवीत - औपचारिक सभ्यता म्हणून नाही तर सांस्कृतिक क्रांतीची तयारी म्हणून. शिवराळपणा हा पुरुष सत्तेचा भाग असतो व स्त्रीचा उपमर्द करत असतो म्हणून टाळायला हवा - मध्यमवर्गीय ब्राम्हणी दिखाऊ सभ्यते साठी नव्हे.

मी:

तुम्ही नमूद केलेली चौकट, सांस्कृतिक क्रांतीची तयारी म्हणून मांडणी व भाषेची पथ्ये तसेच शिवराळपणा हा पुरुषी सत्तेचा भाग असतो ही आपल्या प्रतिक्रियेतली सूत्रे खूप मोलाची आहेत. ..दखल घेऊन इतकी सखोल प्रतिक्रिया दिल्याबद्दल आपल्याला मनःपूर्वक धन्यवाद!