Monday, November 5, 2018

पिसाट राष्ट्रवादाचे गारुड आणि त्यावरचा उतारा


राष्ट्रवादाचे गारुड मोठे जबरदस्त आहे. थिएटरमध्ये राष्ट्रगीताला एखादा कोणी उभा राहिला नाही म्हणून त्याच्या कानफाडात वाजवले जाते. ‘वंदे मातरम’ म्हणण्यास कोणी मुसलमान व्यक्तीने नकार दिला तर तिला पाकिस्तानात जा असे बजावले जाते. राष्ट्रीय चिन्हांना, सैनिकांच्या स्मारकाला चुकून कोणाचा पाय लागला तर तेथे उपस्थित असलेला राष्ट्रभक्त त्याच्यावर एवढा संतापतो की चुकणारा गर्भगळीत होऊन जातो. आपण राष्ट्राचा घोर अपमान केला या अपराधभावनेने त्याला मेल्याहून मेल्यासारखे होते. जेएनयू मध्ये राष्ट्रविरोधी घोषणा दिल्याची घटना कन्हैया कुमारचा अजून पाठलाग करत असते. मी तिथे नव्हतो असे वारंवार सांगूनही, त्याला अटक-तुरुंगवास होऊन, सरकार आरोपपत्रच दाखल करु न शकल्याने तो मुक्त झाला तरीही आज माध्यमांतले राष्ट्रवादी पत्रकार त्याला या घटनेवरुन सतत छळत असतात. आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करत असतात. राष्ट्रविरोधी घोषणा देणे, राष्ट्रध्वजाचा अवमान करणेच नव्हे, तर दुर्गेने मारलेल्या महिषासुराची जयंती करणे हाही राष्ट्रद्रोह असतो. याबाबत मंत्रिमहोदया स्मृती इराणी संसदेत दुर्गावतार धारण करुन कशा कडाडल्या होत्या हे आपल्यातल्या अनेकांनी पाहिले आहे. देश अन् देव इथे समानार्थी होतात. बहुसंख्याकांचा धर्म हाच देशाचा धर्म, भारतीय संस्कृती म्हणजेच हिंदू संस्कृती (पर्यायाने अन्य धर्म, संस्कृती दुय्यम) ही धारणा पसरवली जाते. गाय हे राष्ट्रीय दैवत बनते. त्याचे रक्षण हे राष्ट्रकार्य होते. गायीच्या हत्येच्या अफवांनी उत्तेजित होऊन स्वयंघोषित गोरक्षक कथित पाप्यांना यमसदनाला पाठवायला उद्युक्त होतात. ‘देव, देश अन् धर्मासाठी प्राण घेतले हाती’ या गीताने मन उचंबळू लागते. आणि मग जे कोणी देव, देश, धर्म यांच्याविषयीच्या कर्मठ धारणांच्या विरोधात प्रबोधन करु लागतात त्यांचे खरोखरीच प्राण घेतले जातात. राष्ट्राभिमानी पिढी घडवण्यासाठी राष्ट्रवादी सरकार अभ्यासक्रमात त्याप्रमाणे बदल घडवू लागते. त्यांच्यादृष्टीने अराष्ट्रीय असलेल्या मुघलांचे अस्तित्व इतिहासाच्या पुस्तकातून बाद केले जाते. पूरक वाचन म्हणून स्फूर्तिदायी आख्यायिकांनाच इतिहासरुपात सादर केले जाते. वर्तमानातला राष्ट्रवाद तगडा करण्यासाठी राष्ट्रवाद ही संकल्पनाच नसलेला प्राचीन काळ दावणीला बांधला जाते. तो काळ आजच्यापेक्षा प्रगत असल्याच्या थापा बिनदिक्कत मारल्या जातात. पंतप्रधान मोदींनी वैज्ञानिकांच्या परिषदेतच आमच्याकडे प्राचीन काळी प्लॅस्टिक सर्जरीचे तंत्र किती प्रगत होते हे सांगताना गणपतीचा दाखला मोठ्या अभिमानाने दिला. डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत कसा खोटा आहे वगैरे मोदींचे अन्य सहकारी मंत्री तसेच भाजपचे नेते मग बोलत राहतात. तर्क, पुरावा खुंटीवर टांगून, विद्वेष, सूडभावनेच्या चबुतऱ्यावर राष्ट्रवादाची नवउभारणी आज जोरात चालू आहे. 

आपल्या देशाबद्दल अभिमान, प्रेम असणे, त्याच्याविषयी बोलताना मन उचंबळून येणे हे गैर आहे का? देशासाठी सीमेवर लढणाऱ्या जवानांच्या पराक्रमाने उत्तेजित होणे, त्यांच्या हौतात्म्याने भावना अनावर होणे, राष्ट्रगीतानंतर भारतमाता की जय अशी घोषणा देताना ऊर भरुन येणे हे गैर आहे का? त्याने कोणाचे काय नुकसान होते? आपण भारतवासी म्हणून ही राष्ट्रीय भावना मनी बाळगणे आपले कर्तव्य नाही का? 

...यात काही गैर नाही. वैयक्तिक पातळीवर अशा भावना बाळगण्यास प्रत्येक जण मुखत्यार आहे. ते वैयक्तिक वा समान भावनांच्या गटापुरते राहिले असते तर प्रश्न नव्हता. अशा भावना नसणाऱ्यावर वा व्यक्त न करणाऱ्यावर जेव्हा ही मंडळी राष्ट्रवादी बनण्याची दंडेली करतात त्यावेळी प्रश्न येतो. यांचा राष्ट्रवाद राष्ट्रीय चिन्हांच्या वा त्यांनी मानलेल्या प्रतीके-प्रतिमांपुरताच सीमित असतो. त्यापलीकडे याच राष्ट्रात राहणाऱ्या माणसांच्या दुःखदैन्याचे त्यांना काही लागते राहत नाही, हे त्रासदायक आहे. 

कारगिलच्या विजयाचे द्रासला स्मारक आहे. एका लहान मुलाने तेथील वस्तूला औत्सुक्याने पाय लावला. आम्हा पर्यटकांपैकी एक राष्ट्रवादी भारतीय बाई खूप संतापल्या. त्या मुलाला काही कळेना. पण त्याचे आई-वडिल ओशाळले. मुलाला रागावले वगैरे. इथवर येताना ज्या बर्फमय पर्वतरांगा आम्ही पार करत होतो, तेथील रस्ते बॉर्डर रोड पोलीस सांभाळत, दुरुस्त करत असतात. बहुतेकदा ते देखरेख करतात. प्रत्यक्ष काम करणारे मजूर हे झारखंड- बिहारची तरुण मुले असतात. या मुलांच्या एका गटाशी थोडे बोलत राहिलो. कायम बर्फात राहणे, कधी अवलांच, कधी भयानक बोचरे वारे अशा स्थितीत राहणाऱ्या या मुलांना सैनिकांना मिळतात त्या सुविधा नव्हत्या. जेवण, कामाचे तास, पगार यात कमालीचे शोषण होते. यांचे चेहरे, अंग रापलेले. ‘तुम्ही आंघोळ कधी करता?’ असा प्रश्न विचारल्यावर ते सगळेच हसले. त्यातला एक म्हणाला- ‘झारखंडला परत गेल्यावर.’ 

आपले सैनिक हिमालयाच्या अतिउंच शिखरांवर, ऑक्सिजनची कमतरता असलेल्या भागात राहतात, लढतात, हुतात्मा होतात. त्याची जाणीव आपल्याला असलीच पाहिजे. पण त्याचवेळी या झारखंडच्या मुलांची जाणीव ठेवायला काय हरकत आहे? गरिबीमुळे शिक्षण सोडलेल्या, येथील तीव्र हवामानाचा परिचय नसलेल्या, एवढ्या दूर केवळ पोटासाठी आलेल्या, कोणत्याही सेवाशर्ती नसलेले जनावरासमान श्रम करणाऱ्या या झारखंडच्या मुलांकडे पाहून आपण व्यथित का होत नाही? सैनिकांच्या स्मारकाला मुलाचा पाय लागल्याने संतापलेल्या बाईंना झारखंडच्या या भारतीय मुलांकडे कटाक्ष टाकावा असे वाटले नाही. 

हे या बाईंचे वैयक्तिक स्वभाववैशिष्ट्य नव्हे. आपल्या भावनांचे वर्गीकरणच तसे झाले आहे. ‘राष्ट्र’ म्हणजे भूभाग नव्हे तर त्यातील माणसे, त्यांचे कल्याण हे आपल्या राष्ट्रवादाच्या कक्षेत नसतेच. 

‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ या पं. नेहरुंच्या प्रसिद्ध पुस्तकावर आधारित ‘भारत एक खोज’ ही एक जुनी गाजलेली टी. व्ही. मालिका. आता ती यू ट्यूबवर आहे. या मालिकेच्या पहिल्या भागाची सुरुवात. नेहरुंना सभेला घेऊन जाताना लोक ‘भारतमाता की जय’चे नारे देत असतात. सभा सुरु झाल्यावर नेहरु लोकांना विचारतातः 

‘क्या हमारे पहाड़, नदियां, जंगल, जमीन, वन संपदा, खनिज... यही भारत माता है?आप भारत माता की जय का नारा लगाते हैं तो आप हमारे प्राकृतिक संसाधनों की जय ही करते हैं। हिन्दुस्तान एक ख़ूबसूरत औरत नहीं है। नंगे किसान हिन्दुस्तान हैं। वे न तो ख़ूबसूरत हैं, न देखने में अच्छे हैं- क्योंकि ग़रीबी अच्छी चीज़ नहीं है, वह बुरी चीज़ है। इसलिए जब आप 'भारतमाता' की जय कहते हैं- तो याद रखिए कि भारत क्या है, और भारत के लोग निहायत बुरी हालत में हैं- चाहे वे किसान हों, मजदूर हों, खुदरा माल बेचने वाले दूकानदार हों, और चाहे हमारे कुछ नौजवान हों।’ 

‘भारतमाता की जय’ ची घोषणा देणाऱ्या लोकांची भावना विघातक नाही. नेहरु तिचा अनादर न करता तिच्यात नवा आशय भरतात. राष्ट्र म्हणजे काय याची वस्तुनिष्ठ व योग्य जाणीव देतात. 

ज्या राष्ट्रवादाचे गारुड अनेकांना भारुन टाकते, ज्याचे भारुड सतत गायले जाते तो राष्ट्रवाद वास्तविक आहे काय? आपल्या देशाची घटना किंवा कायदा त्याबाबत काय म्हणतो? राष्ट्रघडणीत मोठी जबाबदारी निभावणाऱ्या थोर मंडळींची याबाबत काय भूमिका होती? ..थोडे समजून घेऊ. 

आपल्या कोंडमाऱ्याविरुद्ध सरंजामी राजेशाहीविरोधात जनता उभी राहिली व आपल्या विकासाच्या, आकांक्षांच्या पूर्तीसाठी स्वतः निर्णय घेण्याच्या अवस्थेत ती आली त्या टप्प्यावर राष्ट्रवाद उदयाला आला. अठरा-एकोणीसाव्या शतकात जिथे सरंजामी राजेशाहीविरोधातले संघर्ष सुरु होऊन स्वयंनिर्णयाचा अधिकार जनता मागू लागली त्या युरोपात राष्ट्रवादाचा प्रारंभ झाला. ‘देश’ (Country) हा विशिष्ट सीमांनी बांधलेला भूभाग. त्याच्या संचालनासाठी उभे राहते ते ‘शासन’ (State). अशा सीमांनी निश्चित केलेल्या देशातील अथवा अजून सीमांची निश्चिती झालेली नाही अशा प्रदेशातील जनता समान आकांक्षांनी प्रेरित होते व त्यासाठी एकत्रित खटपट करु लागते तेव्हा ते ‘राष्ट्र’ (Nation) असते. हे राष्ट्र विशिष्ट भूभागात आपले स्वतःचे शासन सुरु करते तेव्हा ते होते ‘राष्ट्र राज्य’ (Nation State). समान आकांक्षा, त्याबाबतच्या संकल्पना, भूमिका यांनी सिद्ध होतो तो ‘राष्ट्रवाद’ (Nationalism). 

युरोपातील राष्ट्रवादी उठाव, प्रयत्न करणारे समूह हे एकतर आकाराने लहान व बरीचशी समान वैशिष्ट्ये असणारे होते. धर्म, भाषा, संस्कृती, पूर्वेतिहास, परंपरा याबाबत त्यांच्या अंतर्गत एकजिनसीपणा होता. आपल्या देशाचे तसे नाही. आर्यावर्त, जम्बुद्विप, हिंदुस्तान अशा विविध नामाभिधानांनी ओळखल्या जाणाऱ्या या अतिविस्तीर्ण भूभागात ढोबळमानाने काही समान सांस्कृतिक सूत्रे असली तरी एक भाषा, एक शासन, एक परंपरा, एक संस्कृती, एक आकांक्षा असे होते असे आढळत नाही. आस्तिक, नास्तिक, अज्ञेयवाद, द्वैत, अद्वैत, शैव, वैष्णव, बौद्ध, जैन, लोकायत अशा विविध मतमतांतरे व पंथांचा इथे वावर. भाषा, वेश, आहार, रुप, चालीरीती, वर्ण, जाती यातील विविधता तर विचारुच नका. ख्रिस्ती, इस्लाम, ज्यू या युरोप-मध्य आशियातील धर्मांसारखी बांधेसूद रचना असलेले धर्म इथे नव्हते. Religion या अर्थात सामावणारी आपल्याकडील धर्मसंकल्पना नव्हती. जाती-वर्ण पक्के असले तरी एकाच घरात विविध संप्रदायांचे लोक व त्यांचे संप्रदायांतर हे सर्रास असायचे. वर राजे बदलायचे पण गावे, तेथील रचना, आस्था तशाच राहायच्या. कित्येकदा वर कोण राजा वा शासक आहे याचे जनतेला सोयरसुतकच नसायचे. एखाद्या चांगल्या राजा वा सम्राटाविषयी कृतज्ञता असायची. पण ती काही स्वतःचे भविष्य स्वतः ठरविण्यासाठीची समान आकांक्षा नव्हे. त्यामुळे युरोपातील राष्ट्र संकल्पना ना पूर्वी वा युरोपातील घडामोडींच्या समांतर आपल्याकडे होती. तिला चालना मिळाली इंग्रजांच्या भारतातील आगमनाने. इंग्रजांच्या शोषणाविरोधातील संघर्ष, त्यांच्यामुळे जे शिक्षण व त्यायोगे युरोपातील मानवी मूल्यांच्या संघर्षाचा इतिहास आपल्याकडे पोहोचला त्यातून आपली राष्ट्रसंकल्पना आकार घेऊ लागली. इंग्रजांपासून देश मुक्त करणे, हा देश आम्हा जनतेच्या ताब्यात असणे, त्याच्या भल्याबुऱ्याचा निर्णय आम्ही करणार ही आसेतू हिमाचल आकांक्षा आता उदयास आली, विकसित झाली. पूर्वी एवढ्या विशाल भूभागातील लोकांची अशी एक आकांक्षा हा प्रकार अस्तित्वात नव्हता. आताची ही आकांक्षा विविध भाषा, रुप, वेश, आहार, धर्म असणाऱ्या लोकांची होती. हा देश आम्ही कसा चालवणार, त्याबाबतची धोरणे काय असतील याबद्दल वेगेवेगळे वैचारिक वाद जन्मास आले. या सर्व मंथनातून ब्रिटिशांपासून मुक्त झालेल्या भारतीय जनतेने सरासरी सहमतीने आपले संविधान बनवले. आता संविधान व त्यातील मूल्ये हा आपल्या राष्ट्रवादाचा गाभा आहे. तो अधिक समृद्ध करण्यासाठीचे प्रयत्न, संघर्ष ही स्वागतार्ह बाब आहे. तथापि, त्यास मागे खेचण्याचे प्रयत्न भारतीय राष्ट्रवादात बसत नाहीत. 

खरे पाहायला गेल्यास राष्ट्रवाद हा शब्द भारतीय संविधानात नाही. राष्ट्रीय प्रतीकांचा (राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत आदि) अवमान झाल्यास शिक्षेची तरतूद आधी नव्हती. शिक्षेची माफक तरतूद असलेला कायदा १९७१ साली झाला. १९७६ च्या घटनादुरुस्तीने कलम ५१ क नुसार या प्रतीकांचा सन्मान करावा हे मूलभूत कर्तव्य मानले गेले. म्हणजेच प्रतीकांच्या प्रति वा राष्ट्राप्रति अनाठायी भक्तिभाव, पावित्र्य संविधानाला अभिप्रेत नाही. उद्देशिकेत नमूद केल्याप्रमाणे या देशातला माणूस-प्रत्येक नागरिक केंद्रवर्ती व त्याच्या सौख्यासाठी न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही उद्दिष्टे साध्य करणे ही भारतीयांची अधिकृत सामायिक आकांक्षा आता आहे. राष्ट्रवाद संकल्पना वापरायची तर उद्देशिकेतील हा संकल्प हाच आपला आताचा राष्ट्रवाद असायला हवा. 

राष्ट्रवादाला प्रतीकांच्या अवमानाच्या पलीकडे जाऊन पाहण्याचा समजदारपणा या आधीच्या राज्यकर्त्यांनी तसेच न्यायालयांनी दाखवलेला दिसतो. १९७२ साली स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवावेळी वाढत्या दलित अत्याचारांच्या विरोधातील प्रतिक्रिया म्हणून राजा ढाले यांनी ‘साधना’ साप्ताहिकात ‘काळा स्वातंत्र्यदिन’ लेख लिहून स्वातंत्र्याची, राष्ट्रध्वजाची अर्वाच्य शब्दांत संभावना केली. तर नामदेव ढसाळांनी थेट ‘स्वातंत्र्य हे कुठच्या गाढवीचं नाव आहे?’ असा आपल्या कवितेतून धारदार सवाल केला. त्या अर्थाने हा राष्ट्रीय चिन्हांचा अवमान असतानाही व १९७१ साली कायदा झाला असतानाही तत्कालीन राज्यकर्त्यांनी काही कारवाई केलेली दिसत नाही. राजा-नामदेवनी असा प्रकार आता केला असता तर त्यांना राष्ट्रद्रोही ठरवून ताबडतोब आत टाकले असते असे त्यांच्या जवळच्यांचे म्हणणे आहे. आपल्या पंथाच्या मान्यतेनुसार राष्ट्रगीत न म्हणणाऱ्या ‘जेनोवा विटनेस’ पंथाच्या मुलांना शाळेतून काढल्याच्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने १९८६ साली मुलांच्या बाजूने निकाल दिला. राष्ट्रगीत न म्हणणे ही कृती घटनेच्या कलम १९ (१) क नुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे असे न्यायालयाने नमूद केले आहे. राष्ट्रगीत वा तत्सम बाबींवरुन राष्ट्रभक्तीचे स्तोम माजवणाऱ्यांना या निकालावेळी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला सल्ला खूप मौलिक आहे. न्यायालय म्हणते- 'आपली परंपरा सहिष्णुता शिकवते. आपले संविधान सहिष्णुता प्रचारते. आपण ती पातळ करुया नको.' 

ब्रिटिशांच्या जोखडातून देश मुक्त करण्याच्या महान संग्रामावेळी जी राष्ट्रभावना चेतवली जात होती ती नकारात्मक वा संकुचित असता कामा नये याची बरीच दक्षता त्यावेळची थोर नेतेमंडळी घेत होती. तरीही अखिल मानवतेच्या सौख्याची कामना करणाऱ्या गुरुदेव टागोरांसारख्यांना त्यात संकीर्णतेची बीजे दिसत होती. त्याबाबत ते सतत इशारा देत असत. इंग्रजांविरोधी लढ्यासाठी जो राष्ट्रवादाचा ज्वर जनतेत आपण तयार करत आहोत, त्याने जनतेच्या मनात परकीयांविषयी द्वेष तयार होतो असे त्यांना वाटे. 'राष्ट्रवाद व परकीयांविषयीचा द्वेष यांतील फरकाची रेषा फार सूक्ष्म असते' असे ते म्हणत. 

राष्ट्रीय स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या आघाडीच्या सेनानींनाही टागोरांच्या मानवतेकडेच अखेर जायचे होते. त्यामुळे ते राष्ट्रवादाच्या ज्वराबद्दल सावध होते. एम. एन. रॉयना राष्ट्रवादात फॅसिझमची बीजे दिसत होती. नेहरुंनी म्हटले आहे- ‘राष्ट्रवाद त्याच्या जागी ठीक. पण तो बेभरवश्याचा मित्र आणि असुरक्षित इतिहासकार आहे. अनेक घडामोडींबाबत तो आपल्याला अंध करतो तसेच काही वेळा सत्याचा विपर्यास करतो. खास करुन आपल्याशी तसेच आपल्या देशाशी त्याचा संबंध असतो तेव्हा.’ 

आपल्या देशाबद्दल प्रेम असावे. ते स्वाभाविक आहे. तथापि, अभिमान तेव्हाच असेल जेव्हा आमचा देश आमची जनता व एकूण मानवता यांच्या उत्थानासाठी प्रतिबद्ध असेल. आपल्या हितासाठी दुसऱ्या देशाला अंकित करणे, दुसऱ्या देशाबद्दल वैरभाव, विद्वेष जनतेत तयार करणे ही अभिमानास्पद बाब नाही. याचा अर्थ आपल्या संरक्षणासाठी सावध असणे वा त्यासाठी नाईलाजाने युद्ध करणे गैर आहे असे नव्हे. युद्ध हा आपद्धर्म आहे. स्थायीभाव वा निर्वैराकडेच जाणारा असावा. देशभक्ती हा फसवा शब्द आहे. प्रेम, अभिमान ठीक. भक्ती प्रकारात तर्क, विवेकाला रजा मिळते. म्हणून देशभक्तीलाही रजा देणे योग्य. आपल्या देशावर व जगावरही निरतिशय प्रेम करावे. त्यातील उन्नत मूल्ये, परंपरा, विचार यांचा अवश्य अभिमान बाळगावा. भारताच्या झिंदाबादसाठी पाकिस्तान मुर्दाबाद असण्याची काही गरज नाही. दोन्ही एकाच वेळी झिंदाबाद असू शकतात. राष्ट्रवादाला भरवश्याचा करायचा तर त्याचा मूलाधार ‘जय हिंद-जय जगत’ हाच असायला हवा. 

‘जय हिंद-जय जगत’ हा आपल्या राष्ट्रवादाचा मूलाधार होण्यासाठी आधी आपले राष्ट्र आपल्याला नीट उभारावे लागेल. आपण राष्ट्र होण्याच्या प्रक्रियेत आहोत. खऱ्या अर्थाने एक राष्ट्र अजून आपण नाही आहोत हे कबूल करावे लागेल. याबाबत महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले मापन व दिलेले इशारे आजही लागू होतात ही आपल्याला अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. 

संविधान मंजूर होण्याच्या पूर्वसंध्येला २५ नोव्हेंबर १९४९ रोजी आपल्या ऐतिहासिक भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात - 

''मी या मताचा आहे की आपण एक राष्ट्र आहोत यावर विश्वास ठेवणे म्हणजे जे अस्तित्वात नाही ते अस्तित्वात आहे असा समज बाळगण्यासारखे होईल. हजारो जातींमध्ये विभागलेल्या लोकांचे राष्ट्र कसे बनू शकेल? सामाजिक आणि मानसिकदृष्टया अजूनही आम्ही एक राष्ट्र नाही याची आम्हाला जेवढ्या लवकर जाणीव होईल तेवढे ते आमच्या हिताचे ठरेल. त्यानंतरच एक राष्ट्र होण्याच्या गरजेचा आम्ही गांभीर्याने विचार करु शकू. या ध्येयाप्रत पोहोचणे अतिशय कठीण आहे. ...भारतात जाती आहेत. जाती या राष्ट्रविरोधी आहेत. ...त्या समाजजीवनात विभागणी करतात. त्या राष्ट्रविरोधी आहेत, कारण त्या जाती-जातीमध्ये मत्सर व तिरस्काराची भावना निर्माण करतात. आम्हाला वास्तवात जर 'राष्ट्र' व्हायचे असेल तर या सर्व अडथळ्यांवर आम्ही मात केलीच पाहिजे.'' 

बाबासाहेबांच्या कितीतरी आधी महात्मा फुलेंनीही असाच इशारा दिला होता. ते सवाल करतात– “…अशा अठरा धान्यांची एकी होऊन चरचरीत कोडबुळे म्हणजे एकमय लोक ‘नेशन’ कसे होऊ शकेल?” पुढे उत्तर देतात- ''जातीजातीत वाटलेला आपला समाज आधी एकमय झाला पाहिजे. ते घडेल त्या दिवशी आपल्या देशात लोकांचे राज्य स्थापन झालेले असेल.'' 

आजच्या पिसाट राष्ट्रवादाचे गारुड उतरवायला हे इशारे मनात मुरवणे व त्यासाठी कार्यरत होणे हा उतारा आहे. 

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

(पुरुष उवाच, दिवाळी २०१८)

No comments: