Friday, November 9, 2018

फॅसिस्ट हिंदुत्वाचे आक्रमण व आंबेडकरी चळवळीकडून अपेक्षा

शीर्षकात हिंदुत्वाचे आक्रमण असे न म्हणता फॅसिस्ट हे विशेषण त्याला मुद्दाम जोडले आहे. ‘हिंदुत्व’ या शब्दाला आजचा संदर्भ आक्रमक, कट्टर, कर्मठ, राजकारणासाठीचे ध्रुवीकरण असा जरी असला व तो त्या अर्थाने वापरलाही जात असला तरी एक शब्द म्हणून या अर्थाला तो संपूर्ण समर्पित करता येत नाही. गांधीजी, त्या आधी विवेकानंद व त्याआधीपासून वारकरी या मंडळींचेही ‘हिंदुत्व’च होते. पण त्याला एक समावेशक, सुधारणावादी आशय आहे. गोरक्षण वा लव्ह जिहादच्या नावाने निरपराधांचे रक्त वाहवणाऱ्या बजरंगी टोळक्यांच्या हातातील भगव्यातून जे भय प्रतीत होते त्याचा वारकऱ्यांच्या भगव्यात लवलेशही नाही. वारकऱ्यांची भगवी पताका दया, क्षमा, शांतीचा उद्घोष करते. हिंदू संत म्हणून जागतिक मंचावर लखलखताना हिंदू परंपरेतील विचारांची उच्चतमता व आचारातील नीचतमता याबद्दल परखड बोलायला विवेकानंदांच्या हिंदुत्वाला अडचण येत नाही. गांधीजींचे ‘सनातन हिंदुत्व’ देवळात वास करत नाही, तर आश्रमात सर्वधर्मीय प्रार्थना करते. परपीडा जाणणारे ते वैष्णव या व्याख्येला अधोरेखित करते. भगव्या रंगाचा संबंध थेट बुद्धापर्यंत जात असला तरी हिंदू हा शब्द त्यावेळी नव्हता. वेदात, उपनिषदांत, भगवतगीता, महाभारत, रामायण आदि कशातच नव्हता. सिंधू प्रदेशातील लोकांना अरबी-फारसी भाषकांनी अर्पण केलेली ती प्रादेशिक ओळख आहे. यथावकाश व पुढे इंग्रज आल्यावर पाश्चात्य धर्मसंकल्पनांच्या संसर्गाने आपल्याकडच्या सांस्कृतिक अभ्युदयेच्छुंच्या प्रयत्नांनी ‘हिंदू’ ही धर्मओळख ठसठशीत झाली. तत्पूर्वी, केवळ संप्रदाय होते. धर्म हा शब्द समाजाची धारणा, कर्तव्य आदि अर्थानेच वापरला जाई. तो ख्रिश्चन, इस्लाम याप्रमाणेच एक धर्म म्हणून वापरला जाणे ही आजची वस्तुस्थिती आहे. तथापि, या धर्मांप्रमाणे एक आराध्य, एक धर्मग्रंध अशी त्याची अंतर्गत रचना व शिस्त नाही हेही खरे आहे. मात्र तरीही हिंदुत्व शब्दाची व्याख्या संघपरिवाराच्या भाषा व व्यवहाराला आंदण देणे हे धोरण म्हणून नव्हे तर वास्तव म्हणूनच गैर आहे. त्यांचा व्यवहार ज्या हिंदुत्वाचा पुकारा करतो त्याचा एक भाग जुन्या विषमतामूलक ब्राम्हणी वर्चस्वाचा आहे तर दुसरा निखालस हिटलरी सांस्कृतिक-राजकीय फॅसिझमशी नाते सांगणारा आहे. म्हणूनच ज्याचा सामना लोकशाहीवादी, समाजवादी, डावे, अन्य पुरोगामी व आंबेडकरवादी यांना करावयाचा आहे ते ‘फॅसिस्ट हिंदुत्व’ होय. 

या ‘फॅसिस्ट हिंदुत्वा’चा मुकाबला हा पुरोगामी-लोकशाहीवादी शक्तींच्या जीवनमरणाचा प्रश्न कसा तयार झाला आहे, याच्या अधिक विवेचनाची गरज नाही. भोवतालचा प्रत्येक क्षण साक्षी आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करताना धाकदपटशा व प्रत्यक्ष खून, प्रसारमाध्यमांना दाम-दंडाने टाचेखाली धरणे, मुजरा करण्यास नकार देणाऱ्या पत्रकारांची गच्छंती, या फॅसिझमच्या विरोधात बोलणाऱ्यांना राष्ट्रद्रोहाच्या खोट्या आरोपांच्या वावटळीत घुसमटवणे, गोरक्षण-लव्ह जिहादच्या नावाने कायदा धाब्यावर बसवून जिवे मारुन जागेवरच न्याय करणे, घोड्यावर बसलेल्या दलिताचा खून, दलितांच्या घोड्यावरुन वरातीला विरोध, सत्ताधाऱ्यांकडून याचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष समर्थन, सहाय्य व आधार, साधू-बैराग्यांचे सत्तास्थानी येणे, राजसत्तेवरील धर्मसत्तेच्या अंकुशाची सेक्युलर व्यवहाराची शपथ घेतलेल्या राज्यकर्त्यांनी भलामण करणे, नागरिकत्वाच्या ओळखीच्या नोंदणी प्रक्रियेत अधिकृतपणे हिंदूंना आपले व मुसलमानांना परके गृहीत धरणे, सत्तास्थानावरुन घ्यावयाच्या निर्णयांत संसदीय लोकशाहीचे संकेत झुगारुन एकाधिकारशाही चालवणे ...ही यादी न संपणारी आहे. रोज तीत भर पडते आहे. 

मोदी, त्यांचे प्रमुख सहकारी मंत्री, भाजपच्या ताब्यातील महाराष्ट्रादी राज्यांचे फडणवीस वगैरे मुख्यमंत्री असे तमाम सत्तेचे सूत्रधार थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. हे नाते त्यांनी तोडलेले नाही. सोडलेले नाही. उलट सत्तेचे प्रतोद हाती घेऊन मोठ्या जलदीने ते संघाच्या ध्येयपूर्तीसाठी झटत आहेत. ही ध्येयपूर्ती संविधान बदलण्याची आहे. संविधान प्रत्यक्ष बदलणे ही प्रक्रिया तातडीने ते करणार नाहीत. पण शब्दांचे अर्थ बदलणे, संविधानाला अभिप्रेत धोरणांविषयी जनतेतील निरक्षरता ध्यानी घेऊन संविधानाला विपरित धोरणे राबवणे हे चालू झाले आहे. बाबासाहेबांच्या १२५ व्या जयंतीच्या निमित्ताने संसदेचे दोन दिवसीय खास अधिवेशन बोलावून राजनाथ सिंगांकरवी धर्मनिरपेक्ष शब्द बाबासाहेबांचा नव्हेच, तो नंतर घुसडला गेला, तो बदलून पंथनिरपेक्ष असावा असा हेतूतः गोंधळ तयार करणे हे त्याचे ठळक उदाहरण. बाबासाहेबांचे विचार त्यांना अभिवादन करुन उलटे फिरवण्यात ते सराईत आहेत. ३७० कलम, मुस्लिम यांविषयीची राष्ट्रीय जाणीवेने केलेली बाबासाहेबांची मांडणी आपल्याला अनुकूल रीतीने सादर करण्याची त्यांची चलाखी वादातीत आहे. ज्या घटनेची शपथ घेऊन हे स्वयंसेवक सत्तेवर आलेत, त्या संविधानाला त्याचा आधार मनुस्मृती नसल्याने ते भारतीय नाही, परकीय आहे असे म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने १९४९ सालीच अव्हेरले होते. राष्ट्रध्वजाला विरोध करताना तिरंग्याचे तीन रंग हे अशुभ आहेत, त्यांचा वाईट मानसशास्त्रीय परिणाम होईल, त्याला कोणी स्वीकारणार नाही..अशी कैक विधाने संघाच्या खातेबुकात लिखित आहेत. खातेबुकातील या नोंदी ना संघाने, ना मोदी-राजनाथ-फडणविशी स्वयंसेवकांनी नाकारल्या आहेत. याचा अर्थ, त्यांच्या परिपूर्तीसाठीच ते सत्तेवर आहेत, हे म्हणणे वावगे ठरणार नाही. कोणी म्हणेल, घटनेची शपथ त्यांनी घेतली, मोदींनी तर संसद प्रवेशाच्या पहिल्या दिवशी संसदेच्या पायरीवर डोके ठेवले त्याचे काय? त्यांना उत्तर एकच- ...नथुरामने गांधीजींचा खून करण्याआधी त्यांना अभिवादन केले होतेच! 

हा धोका परतवणे, फॅसिस्ट हिंदुत्वाचा हा झोटिंग सत्तेवरुन उतरवणे हे ज्या मंडळींनी मतभिन्नतेतून सहमती साधत इहवादी भारतीय संविधान रचले त्या सर्वांचे कर्तव्य आहे. केवळ आंबेडकरी चळवळीचे नाही. हो. हे म्हणणे बरोबर आहे. आणि संविधान रचणारा हा सर्व संविधान परिवार घटना उद्ध्वस्त करु पाहणाऱ्या संघपरिवाराच्या विरोधात एकवटणे हाच त्याला उपाय आहे. तथापि, या एकवटण्याला बळ यायचे असल्यास, हे एकवटणे अधिक चिवट व्हायचे असल्यास त्यातील या घटकांची त्यांच्या अंतर्गत दुरुस्ती होणे अत्यावश्यक आहे. फॅसिस्ट हिंदुत्वाच्या आव्हानाशी आंबेडकरी चळवळीचे नाते व त्याला ती कशी भिडणार आहे, याचा स्वतंत्रपणे वेध घेणे म्हणूनच गरजेचे आहे. 

मुस्लिमांविषयी टीका ज्या ग्रंथात आहे, त्या ‘पाकिस्तान अथवा भारताची फाळणी’ या १९४६ च्या ग्रंथात डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेही नोंदवतात - 'हिंदू राष्ट्र जर खरोखर प्रत्यक्षात आले तर देशासाठी ते एक भयानक संकट असेल यात काही शंका नाही. कारण या हिंदू राष्ट्रामुळे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता धोक्यात येईल. याप्रकारे लोकशाहीशी त्याचा मेळ बसत नाही. वाटेल ती किंमत देऊन हिंदू राष्ट्राला रोखले पाहिजे.' 

१९४७ ची फाळणी, त्यानंतरच्या दंगली, १९४८ चा महात्मा गांधींचा खून या घटना अजून घडायच्या होत्या. संघाचा या घटनांतील सहभाग, चिथावणी यांचे प्रत्यंतर यायचे होते. तथापि, सावरकर, हिंदूमहासभेचे अन्य नेते यांची मांडणी बाबासाहेबांसमोर होतीच. ज्या हिंदू वर्चस्ववादी मंडळींशी त्यांचा संघर्ष चालू होता त्यात या हिंदू संघटनांच्या परिवारातील मंडळी अग्रणी होती. त्यांचे सत्तास्थानी येणे त्यावेळी दृष्टिपथात नव्हते. जेवढे दिसत होते त्यातून काँग्रेसच्या मार्फतच ही मंडळी स्वतंत्र भारतात सत्ता चालवतील एवढीच संभाव्यता होती. अशावेळी बाबासाहेब हिंदू राष्ट्राच्या धोक्याविषयी इशारा देत होते. आज हा धोका प्रत्यक्षात आला आहे. साहजिकच बाबासाहेबांना जाणवलेल्या तीव्रतेच्या कैकपटीने आंबेडकरी चळवळीला या धोक्याची तीव्रता आज जाणवली पाहिजे व त्यास परतवण्याचे सामर्थ्य तिने निर्माण केले पाहिजे. 

हिंदू राष्ट्राच्या संकल्पनेत अन्य धर्मीय अल्पसंख्याक हे दुय्यम मानले आहेत. तद्वत दलित, आदिवासी आदि सामाजिक उतरंडीतले तळचे घटक व्यापक हिंदुत्वाच्या कक्षेत सामावण्याची चलाखी केली तरी उतरंडीतले त्यांचे स्थान अधिकृतपणे तळचेच राहणार आहे. समता हे मूल्य जुनी उतरंड मोडून एका पातळीवरची रचना निर्माण करु पाहते. म्हणून तो शब्द संघपरिवाराला मंजूर नाही. ते ‘समरसता’ हा शब्द योजतात. जुन्या उतरंडीत आपापल्या स्थानावर ‘जैसे थे’ राहून परस्परांशी समरस व्हावे हे त्यांना अभिप्रेत आहे. हे समरसतावादी ज्या चलाख सौजन्यशीलतेने दलित समूहांशी वागतात त्यामुळे अनेकजण त्या जाळ्यात अडकतात. काही जाणतेपणानेही त्यात सामील होतात. कारण त्यांना वैयक्तिक स्वार्थाची आमिषे दिली जातात. समता व समरसता यातील हा मूल्यात्मक भेद समजून उतरंड कायम ठेवू पाहणाऱ्या ‘समरसतेला’ आंबेडकरी चळवळीने निक्षून विरोध करायला हवा व समतेचाच आग्रह धरायला हवा. 

हिंदू राष्ट्राची चलाख पुरस्कर्ती मंडळी बाबासाहेबांना आपल्या उद्दिष्टपूर्तीसाठी वापरत असतात. त्यासाठी त्यांच्या विधानांचा संदर्भ तोडून वापर करत असतात. त्यातील हे एक - “भारतात केवळ भौगोलिक एकताच नव्हे तर या सगळ्यापलीकडे जिच्याबद्दल शंका घेता येणार नाही अशी एक सखोल व खूपच मूलभूत अशी एकता-सांस्कृतिक एकता या टोकापासून त्या टोकापर्यंत नांदते आहे.’ हे विधान ‘भारतातील जाती’ या त्यांच्या प्रंबधातील आहे. याचा अर्थ बाबासाहेबांना जणू ही सांस्कृतिक एकता म्हणजे हिंदू एकताच अभिप्रेत आहे, म्हणजेच या देशात हिंदू हे प्रधान व त्यात अन्य सर्व सामावलेले असा विस्तार ही चलाख मंडळी करतात. ज्या काळात हिंदू वा आजच्या अर्थाने धर्म हा शब्द अस्तित्वात नाही, त्यातून उद्गम पावलेली मतभिन्नतांसहित विविध संप्रदायांचे सहअस्तित्व असलेली विचारबहुल सांस्कृतिक एकता हे भारताचे थोर वैशिष्ट्य आहे. ते ज्यासाठी बाबासाहेब नमूद करतात ते वाक्य त्यांच्या वरील विधानाला जोडून येते. ते आहे – ‘तथापि, या एकत्वामुळेच जात ही न आकळणारी एक कठीण समस्या बनली आहे.’ 

पुढे संविधान सभेत आपल्या गाजलेल्या २५ नोव्हेंबर १९४९ च्या भाषणात ते या जातींमुळेच आपण राष्ट्र कसे बनू शकलेलो नाही, याची कठोर जाणीव करुन देतात. ते म्हणतात – ‘मी या मताचा आहे की आपण एक राष्ट्र आहोत यावर विश्वास ठेवणे म्हणजे जे अस्तित्वात नाही ते अस्तित्वात आहे असा समज बाळगण्यासारखे होईल. हजारो जातींमध्ये विभागलेल्या लोकांचे राष्ट्र कसे बनू शकेल?’ भारत राष्ट्र व्हावे अशीच त्यांची मनीषा आहे. पण ते होण्यासाठी काय अडथळे आहेत त्यांची नोंद करुन हे अडथळे लवकरात लवकर दूर करण्याची अपेक्षा ते भारतीयांकडून करतात. याच भाषणात ते पुढे म्हणतात – ‘भारतात जाती आहेत. जाती या राष्ट्रविरोधी आहेत. ...त्या समाजजीवनात विभागणी करतात. त्या राष्ट्रविरोधी आहेत, कारण त्या जाती-जातीमध्ये मत्सर व तिरस्काराची भावना निर्माण करतात. आम्हाला वास्तवात जर राष्ट्र व्हायचे असेल तर या सर्व अडथळ्यांवर आम्ही मात केलीच पाहिजे.’ 

एक फसगत होण्याची संभावना इथे नोंदवणे अगत्याची आहे. ज्या राष्ट्र संकल्पनेविषयी बाबासाहेब बोलत आहेत, ती राष्ट्र ही संकल्पना आधुनिक आहे. ज्याचा सांस्कृतिक एकता म्हणून बाबासाहेब उल्लेख करतात, तिचा आधुनिक राष्ट्र संकल्पनेशी संबंध नाही. वडाची साल पिंपळाला लावण्याचा उद्योग संघपरिवारातील मंडळी करत असतात. त्यापासून सावध राहायला हवे. इतरांनाही सावध करायला हवे. 

आजची आंबेडकरी चळवळ याबद्दल सावध नाही. तिचे भावनिक असणे हे जुने वैशिष्ट्य आहे. बाबासाहेबांची वस्तुनिष्ठ चिकित्सकता, विभूतिपूजेला नकार हे तिच्या तसे पचनी पडत नव्हतेच. पण आंबेडकरी चळवळीच्या अलीकडच्या निर्नायकी घसरणीच्या काळात तर ही बेसावधता पराकोटीची आहे. बाबासाहेबांची विधाने आपल्या हेतूंसाठी वापरताना त्याचे मेसेज तयार करुन हितसंबंधी मंडळी समाजमाध्यमांत सोडतात. अनेक आंबेडकरी गटांवर ते जोरदार पसरत जातात. शत्रूचे काम आपण आसान करतो हे न कळण्याइतकी समजाची पातळी आंबेडकरी समूहात खाली गेली आहे. आणि आंबेडकरी चळवळीतले जाणते लोक हताश आहेत. ही हताशा जाणत्यांनी सोडून युद्धात उतरायला हवे. युद्ध आधीच सुरु झाले आहे. 

आंबेडकरी चळवळ याचा अर्थ मुख्यतः महार समूहातून बौद्ध झालेल्यांच्या पुढाकाराने व सहभागाने चाललेली चळवळ असे महाराष्ट्रापुरते म्हणणे भाग आहे. ते तसे नसायला हवे. आंबेडकरी विचारांनी प्रेरित सर्व दलित, पीडित तसेच अन्य विभागांतीलही व्यक्तींचा सहभाग असलेली ती असायला हवी होती. आज तसे नाही. यासाठी आणखी उसंत घेऊन चालणार नाही. आपल्या संकुचित अवकाश मर्यादेतून आजच्या आंबेडकरी चळवळीतल्या घटकांनी बाहेर पडायची जल्दी करायला हवी. पूर्वाश्रमीचे महार व आताचे बौद्ध यांच्या निकटची दलित जात म्हणजे मातंग. मातंग समाजाच्या मनात बौद्धांविषयी अंतराय तयार करण्यात संघपरिवार व खुद्द बौद्धांतले कर्मठ यशस्वी झाले आहेत. आम्ही बौद्ध झालो, तुम्ही झाला नाहीत, सवलती फक्त घेता...असे मांगांना हिणवण्याचे काम बौद्धांतल्या कर्मठांकडून झाले आहे. होते आहे. त्यातून मातंग समाज दूर व्हायला मदतच झाली आहे. बौद्धांपेक्षा शिक्षण, आत्मविश्वासाने कमी असलेला हा समूह (आज तुटपुंज्या असल्या तरी ज्या आहेत त्या) दलितांसाठीच्या सवलतींचा, राखीव जागांचा लाभ परिणामकारकपणे मिळवायला कमी पडला. त्यामुळेच त्यातून अनुसूचित जातीअंतर्गत आम्हाला आमची स्वतंत्र टक्केवारी द्या अशी मागणी घेऊन तो पुढे आला आहे. हा रोष बौद्धांवर जातो. तो तसा गेला पाहिजे याचे मुद्दाम प्रयत्नही चालू असतात. आंबेडकरी चळवळीतील बौद्धांनी या प्रश्नाला सहानुभूतीने, समजुतीने हाताळायला हवे. त्यासाठी मातंग समाजाशी दोस्ती, जिव्हाळा वाढवायला हवा. आज सरसंघचालक मोहन भागवत त्यांच्या बैठका घेऊन ‘हो, तुमच्यावर अन्याय झाला आहे, तो दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आता आपले सरकार आहे. शेवटी तुम्ही हिंदूंचाच एक घटक आहात...’ असे म्हणून त्यांना आपल्या बाजूने वळवत आहेत. भीमा-कोरेगाव हल्ल्यांतील आरोपी सूत्रधार मिलिंद एकबोटेंनी लहूजी वस्तादांच्या नावाने संघटना तयार करुन मातंगांना जवळ करण्याचा उपक्रम कधीचा सुरु केला आहे. संभाजी भिडेंच्या समर्थकांत मातंग लक्षणीय आहेत. हा केवळ मातंगांविषयीचाच मुद्दा नाही. अन्य मागास, पीडित जातिगटांशी संबंध जोडून त्यांना आंबेडकरी चळवळीशी जोडण्याचे काम हे फॅसिस्टांशी मुकाबला करण्याच्या सिद्धतेचा महत्वाचा भाग आहे. 

याचा अर्थ केवळ मागास जातींच्या एकजुटीचीच आंबेडकरी चळवळ असेल असे नव्हे. आंबेडकरी चळवळीला नैसर्गिकरित्याच जातीच्या मागासलेपणाचे अंग आहे. त्याचवेळी हे मागास जातसमूह आर्थिक दुर्बलही आहेत. त्यामुळे मागास नसलेल्या जातींतल्या कष्टकऱ्यांशीही तिचे नाते जुळते. हे दुहेरी नाते हे आंबेडकरी समूहाचे वैशिष्ट्य आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीच स्वतंत्र मजूर पक्षाच्या कार्यकाळात ‘जनता’ या आपल्या मुखपत्रात हे वैशिष्ट्य अधोरेखित केले होते. आज आंबेडकरी चळवळीचा जो खोळंबा झाला आहे, त्यावर उपाय व्हायला कळीची अशी ती मांडणी असल्याने ते इथे नोंदवत आहे. 

२२ ऑगस्ट १९३६ च्या अंकातील हे अवतरण य. दि. फडके यांनी आपल्या ‘आंबेडकरी चळवळ’ या पुस्तकात दिले आहे. ते असे – ‘अस्पृश्यतानिवारणाच्या लढ्याचे बाह्य स्वरुप जरी जातिनिष्ठ दिसत असले तरी तत्त्वतः तो लढा आर्थिक आहे हे आम्ही वेळोवेळी आमच्या लेखात सांगितलेले आहे. अस्पृश्यतानिवारणाच्या बाबतीत अस्पृश्य श्रमजीवी जनतेचे हितसंबंध स्पृश्य श्रमजीवी जनतेच्या हितसंबंधांहून वेगळे किंबहुना परस्परविरोधी असल्यामुळे अस्पृश्यवर्गाला आपला लढा स्वतंत्रपणे लढविणे प्राप्त होते. परंतु, आर्थिक लढ्यात स्पृश्य आणि अस्पृश्य शेतकरी कामकरी वर्गांचे हितसंबंध एकजीव आहेत. अस्पृश्य वर्गाला आपला आर्थिक लढा स्पृश्य शेतकरी कामकरी वर्गाच्या सहाय्यावाचून स्वतंत्रपणे लढता येणार नाही. सामाजिक, आर्थिक, राजकीय वगैरे सर्व बाजूंनी गांजलेला अस्पृश्य वर्ग हिंदी श्रमजीविकांच्या लढ्यात पुढारीपण घ्यायला लायक आहे असे आम्ही मागे एकदा म्हटलेले होते.’ 

अण्णाभाऊ साठे आपल्या एका गीतात ‘वर्ण-वर्ग वर्चस्व भेदूनी राख भीमाचे नाव, सांगून गेले आम्हा भीमराव’ असे जे म्हणतात ते अगदी उचित आहे. आंबेडकरी चळवळीने बाबासाहेबांनंतर दादासाहेब गायकवाडांच्या काळात भूमिहिनांच्या सत्याग्रहात दलित-सवर्ण भूमिहिन ‘वर्ग’ म्हणून एकवटण्याची जी भूमिका घेतली होती, ती पुन्हा जोमाने जागविण्याची गरज आहे. 

फॅसिस्ट हिंदुत्वाचे आक्रमण परतवायचे तर दोन पातळ्यांवर काम करावे लागणार आहे. एक, त्यांच्या फॅसिस्ट कारवायांना मिळत असलेला राजकीय सत्तेचा आधार काढून घेण्यासाठी भाजपला राजकीय सत्तेवरुन तातडीने खाली खेचणे. दोन, त्यांनी समाजमनात पेरलेले विष उतरवण्यासाठी लोकांच्या मनाची प्रबोधनाद्वारे मशागत करणे. हे काम लांब पल्ल्याचे आहे. या दोन्ही कामांसाठी आंबेडकरी चळवळीची अन्य पुरोगामी शक्तींशी दोस्ती होणे गरजेचे आहे. या पुरोगामी शक्तींत कम्युनिस्ट, समाजवादी, गांधीवादी, लोकशाहीवादी पक्ष तसेच संघटना येतात. यांतल्या अनेकांशी अनेक मुद्द्यांवर आंबेडकरी चळवळीचे थेट बाबासाहेबांपासून मतभेद आहेत. बाबासाहेबांचा कम्युनिस्ट पक्षाशी वैचारिक मतभेदांसह कष्टकऱ्यांच्या लढ्यात काही वेळा सहकार्य तर निवडणुकांत विरोध राहिला आहे. बाबासाहेबांनी रिपब्लिकन पक्षाची संकल्पना मांडली ती देशातील लोकशाही शाबूत राहण्यासाठी काँग्रेस या प्रबळ सत्ताधारी पक्षासमोर एक सक्षम विरोधी पक्ष उभा राहावा म्हणून. काँग्रेस सत्तेवरुन उतरेल ही नजीकच्या काळातली शक्यता त्यावेळी नव्हती. याचा अर्थ फॅसिस्ट हिंदुत्ववाद्यांशी राजकीय सामना करण्याची क्षितीजावर काहीही चिन्हे नव्हती. अशावेळी काँग्रेस वा कम्युनिस्ट यांच्याशी असलेला राजकीय संघर्ष हा पुढे जाण्यासाठीचा होता. संविधानातील मूल्यांचा अर्थपूर्ण अंमल, संवर्धन वा विकास हा मुद्दा या संघर्षात होता. या शक्तींपासून संविधान वाचवण्याचा प्रश्न नव्हता. आज तो आहे. अशावेळी ज्या शक्तींशी पुढच्या प्रवासाच्या गती, धोरणांविषयी संघर्ष आहे अशा काँग्रेस-कम्युनिस्ट तसेच या दोहोंदरम्यानच्या अनेक लोकशाहीवादी पक्षांसहित या सर्वांच्या सामायिक शत्रूला-फॅसिस्ट हिंदुत्ववाद्यांच्या भाजप या राजकीय साधनाला उखडून फेकणे ही आजची रणनीती असायला हवी. मार्क्स की बुद्ध?, गांधीजी नायक की खलनायक?, अन्यांचा समाजवाद योग्य की बाबासाहेबांचा?..या मुद्द्यांपासून आंबेडकरी चळवळीने तूर्त टाईम प्लीज घ्यायला काय हरकत आहे? या मुद्द्यांचा निकाल लागल्याशिवाय एकत्र येता येणारच नाही अशी काहीही अडचण आज नाही. भाजपला सत्तास्थानावरुन व फॅसिस्ट हिंदुत्वाचे विष लोकांच्या मनातून उतरवल्यानंतर हे मतभेद व संघर्ष हाताळायला खूप अवकाश मिळणार आहे. आपण एकत्र नाही आलो तर सगळेच संपू हे वास्तव आ वासून आपल्यासमोर आज उभे आहे, हे आंबेडकरी चळवळीने ओळखले पाहिजे. 

अनेक मतभेदांसहित देशाची घटना तयार करताना लोक एकत्र होते. सामायिक सहमतीच्या शोधाची ती महान प्रक्रिया होती. ज्यांच्याशी बाबासाहेबांचे तीव्र मतभेद होते अशांशी राष्ट्र व समाजाच्या नवनिर्मितीचा चबुतरा तयार करताना बाबासाहेब सहकार्य-संवाद करत होते. फॅसिझमविरोधी आघाडी उभी करताना बाबासाहेबांचा हा आदर्श आंबेडकरी चळवळीला पुरेसा नाही का? 

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

(अक्षर दिवाळी अंक २०१८) 

No comments: