राजा ढालेंच्या अंत्ययात्रेत मला काहीसे खिन्न व्हायला झाले. ज्या भागावर या राजाचे एकेकाळी अधिराज्य होते, जिथे तो अंबारीतून फिरे, तिथून जाणाऱ्या या अंत्ययात्रेचा बाज आणि सहभाग माझ्या मते राजाला साजेसा नव्हता. बालवयात पाहिलेले असले तरी या राजाच्या वैभवाचा जो अमिट ठसा माझ्या मनावर अजून आहे, त्यामुळे मला ही खिन्नता आली. इतरांना असेच वाटले असेल असे नाही. विशेषतः ज्या नव्या पिढीने राजा ढालेंची कारकीर्द पाहिलेली नाही, त्यांना तर हे कळणेच कठीण आहे. दादरला चैत्यभूमीला आणल्यावर राजा ढालेंचा मृतदेह जिथे ठेवण्यात आला त्या विद्युतदाहिनीच्या मंचावर छोट्या-मोठ्या नेत्यांची जी गर्दी उसळली, आवाहन करुनही कोणी खाली उतरेना हे दृश्य चीड आणणारे होते. आंबेडकरी चळवळीच्या या नेत्यांनी आपल्या कळाहिन, बेशिस्त निर्नायकीचे प्रात्यक्षिक या शेवटच्या निरोपावेळीही घडवले.
कोणताही दिमाख वा कार्यकर्त्यांचा लवाजमा भोवती नसलेला, बसने प्रवास करणारा, ६ डिसेंबरला चैत्यभूमीवर पुस्तकांच्या स्टॉलवर उभा राहून आपले ‘धम्मलिपी’ नियतकालिक विकणारा हा अवलिया आपल्या मस्तीत जगला. मस्तीत गेला. अलीकडची काही दशके हेच दृश्य लोक पाहत आलेत. जुन्याची माहिती नसलेल्यांना राजाच्या महतीचा बोध करुन देणे म्हणूनच गरजेचे आहे.
सत्तरीच्या दशकात ज्या दलित पॅंथरने आंबेडकरी चळवळीतल्या तसेच एकूण व्यवस्थेतल्या प्रस्थापिताला जबरदस्त हादरे दिले त्या दलित पँथरच्या उठावाचा राजा ढाले अनभिषिक्त सेनापती होता. नामदेव ढसाळ, ज. वि. पवार, अरुण कांबळे, भाई संगारे, अर्जुन डांगळे, रामदास आठवले इ. अनेक कमी-अधिक जोरकस नावे दलित पॅंथरच्या घडवणुकीशी संबंधित असली आणि ही संघटना नक्की कोणी स्थापन केली, कोणाच्या डोक्यात प्रथम ही कल्पना आली, कोणी सगळ्यात आधी त्याची वाच्यता केली याबद्दल तमाम वाद व दावे प्रदीर्घ काळ चालू असले तरी विचार, मांडणी, प्रभाव व चारित्र्य याबाबतचे क्रमांक एकच्या नेतृत्वाचे माप राजा ढालेंच्याच पदरी पडते. त्याचबरोबर वैचारिक समर्थने काहीही दिली तरी या संघटनेच्या विघटनाच्या श्रेयातला मोठा वाटाही त्यांनाच जातो.
साठी-सत्तरीच्या दशकांत अमेरिका-युरोप तसेच जगात अन्यत्रही तरुणांचे प्रस्थापिताविरोधात उठाव होत होते. कला, साहित्य, समाजकारण, राजकारण अशी अनेक क्षेत्रे या बंडखोरीने व्यापली होती. अमेरिकेतील वर्णद्वेषाविरोधात लढणाऱ्या काळ्यांच्या अहिंसात्मक आंदोलनाचा टप्पा ओलांडून युद्धास युद्धाने, बंदुकीस बंदुकीने उत्तर देण्याचे सूत्र घेऊन ‘ब्लॅक पॅंथर’ उभी ठाकली. या एकूण जागतिक वातावरणात, त्यातही ब्लॅक पँथरशी संगती साधत महाराष्ट्रात दलित पँथरने दलित अत्याचाराविरोधात रणशिंग फुंकले.
सत्तरीच्या दशकात एकूण देशातच दलितांवरील अत्याचार चरम सीमेला पोहोचले होते. बहिष्कार, खून, बलात्कार, वस्त्या जाळणे हे दलितांबाबत सर्रास होत होते. महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातील बावडा गावात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी दलित तरुणाने अर्ज भरला म्हणून तेथील दलितांवर सवर्णांनी बहिष्कार टाकला. मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील ब्राम्हणगाव येथे सवर्णांच्या विहिरीवर पाणी भरले म्हणून भरदिवसा दोन दलित महिलांना नग्न करुन त्यांची धिंड काढण्यात आली. नागपूरच्या एरणगाव येथील दलित तरुणाला देवीपुढे बळी देण्यात आले. गावात कॉलऱ्याची साथ त्याच्यामुळे पसरली असा त्याच्यावर वहिम होता. ...या घटना हे पॅंथरच्या झेपेची तात्कालिक कारणे होती. बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतरचे रिपब्लिकन नेतृत्व गटातटात विभागून वेगेवगळ्या प्रकारे सत्तेला शरण गेल्याने त्याची ताकद विसविशित झाली होती. या अत्याचाराचा कोणताच प्रतिकार त्यांच्याकडून होत नव्हता. अशा वेळी नवशिक्षित दलित तरुणांतून या नेतृत्वाविरोधात आक्रोश सुरु झाला आणि त्यास बाजूस सारून त्यांनी आंबेडकरी चळवळीचे सुकाणू हातात घेतले. अत्याचार झालेल्या ठिकाणी धावून जाणे, सरकारवर मोर्चे काढणे, रक्त उसळवणारी भाषणे करुन वस्त्या-खेड्यांतील तरुणांना चेतवणे, प्रतिकारास सिद्ध करणे हे पॅंथर्सचे नित्याचे काम सुरु झाले. ‘जयभीम के नारे पे खून बहे तो बहने दो’ या घोषणेने दलित तरुणांचे तनमन धुसमू लागले.
या धुमसण्यास वैचारिक, तर्कशुद्ध, सुस्पष्ट आणि तेवढाच सशक्त आणि कठोर आवाज दिला तो राजा ढाले यांनी. मूळ सांगलीच्या नांद्रे गावचा हा मुलगा ६ व्या वर्षी आपल्या चुलत्यांबरोबर वरळीला शिकायला आला. हुशार आणि तीक्ष्ण बुद्धीच्या या तरुणाने औपचारिक उच्च शिक्षणाच्या पदव्या मिळविण्याबरोबरच वाचनाचा चौफेर व्यासंग केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनंतर (त्यांच्याशी कोणतीही तुलना होऊ शकत नसली तरी) त्या प्रकारचा व्यासंग करणाऱ्यांत राजा ढालेंचा क्रमांक अव्वल लागू शकतो. मराठी साहित्याच्या साचलेपणाच्या विरोधात ज्या साहित्यिक तरुणांनी ‘लघु अनियतकालिकांची’ (लिट्ल मॅगझिन) ची चळवळ सुरु केली, त्यात अशोक शहाणे, दि. पु. चित्रे, भालचंद्र नेमाडे या अनेक जातीय तरुणांबरोबर राजा ढाले पुढाकाराने होते. राजा ढाले कवी होते. चित्रकार होते. विचारवंत होते. नेते होते. या बहुआयामी तरुणाच्या पुढाकाराने मराठी सारस्वताचा मापदंड झालेल्या ‘सत्यकथा’ या मासिकाची लेखी सत्यकथा मांडली गेली, त्याची होळी करण्यात आली. राजा ढालेंचा मराठी साहित्यक्षेत्रात दबदबा तयार झाला.
राजा ढाले, नामदेव ढसाळ, ज. वि. पवार, अर्जुन डांगळे, प्रल्हाद चेंदवणकर ही दलित-आंबेडकरी समूहातील कवी-साहित्यिक मंडळी होती. त्यांच्या कवितांतून दलितांचा प्रस्थापितविरोधी अंगार बाहेर पडत होता. दलितांवरील अत्याचारांविरोधात लढण्यासाठी केवळ लेखन पुरेसे नाही, रस्त्यावरची चळवळ हवी या जाणिवेतून ही मंडळी कार्यकर्ते झाली. या कार्यकर्तेपणातून आलेल्या अनुभवांनी त्यांच्या कविता घडू, फुत्कारु लागल्या. त्या ‘पॅंथर कविता’ झाल्या. राजा ढाले या पॅंथर कवितांची भूमिका मांडताना म्हणतात, ‘या कवितेचा नायक व्यक्ती नसून समाज आहे. समाजमनातील हलकल्लोळ या कवितेतील हेलकावा आणि लय बनतो. समाजातील घडामोड कवितेची घडामोड घडविते. कारण या कवितेची पाळेमुळे जीवनाच्या तळाशी साचलेल्या विषमतेत आणि सांस्कृतिक दुभंगलेपणात खोल रुजली आहेत.’ कवितेच्या निर्मितीचे हे समाजशास्त्रीय विश्लेषण मांडून राजा ढाले त्यांच्या पिढीच्या साहित्याच्या प्रयोजनाची सिद्धता करतात. साहित्याविषयी त्यांनी बरेच लिहिले आहे.
दलित पॅंथरच्या या कवि-कार्यकर्त्यांची भाषा संतप्त, शिवराळ व थेट असे. नामदेव ढसाळांच्या कवितेतून आणि भाषेतून दलित जीवनातील, जगण्यासाठी शरीर विक्रय करणे भाग पडणाऱ्या स्त्रियांच्या सांस्कृतिक विश्वातील प्रतिमा-प्रतीके कोणताही मुलाहिजा न ठेवता व्यक्त होत. त्यांच्या कवितेने मराठी साहित्याला समृद्ध केले आहे. ढसाळांची आंदोलनातील भाषा बेमुर्वत, अस्थानीही असे. राजा ढालेंची भाषा शिवराळ नसे. पण प्रतिपक्षाच्या वर्मावर थेट आघात करुन त्याला जायबंदी करणारी असे. त्यांच्या कृतीही तशाच. कसलीच भाडभीड न ठेवणाऱ्या. निर्भीड आणि औद्धत्यपूर्णही. त्याची काही उदाहरणे दलित पॅंथरच्या उठावाचा महानायक राजा ढालेच का, ते कळण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरतील.
नामदेव ढसाळांच्या ‘गोलपिठा’ कविता संग्रहाचा प्रकाशन समारंभ होता. त्याला नामांकित विदुषी दुर्गाबाई भागवत उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या भाषणात वेश्याव्यवसायाचे समर्थन केले. त्या म्हणाल्या, “घराला ज्याप्रमाणे संडास बाथरुमची गरज असते, त्याचप्रमाणे समाजस्वास्थ्यासाठी समाजाला वेश्याव्यवसायाची गरज आहे. या वेश्यांना समाजाने सामाजिक प्रतिष्ठा द्यायला पाहिजे, कारण ती समाजाची गरज भागवते.”
राजा ढाले आपल्या भाषणात दुर्गाबाईंच्या या वक्तव्याचे त्यांच्या समोरच वाभाडे काढताना काय टोकाला गेले, ते त्यांच्या पुढील विधानांवरुन कळेल. ते म्हणाले, “वेश्यांना सामाजिक प्रतिष्ठा द्या; कारण ती समाजाची गरज भागवते असे म्हणणाऱ्या दुर्गाबाईंना वेश्यांना वेश्याच ठेवायचं आहे. हा त्यांचा ‘पतितोद्धार’ आहे असं ज्यांना वाटतं त्यांनी स्वतःच धंदा का करु नये?”
१५ ऑगस्ट १९७२ ला स्वातंत्र्याच्या रौप्यमहोत्सवानिमित्त ‘साधना’ साप्ताहिकाने काढलेल्या विशेषांकात राजा ढाले यांनी ‘काळा स्वातंत्र्यदिन’ हा लेख लिहिला. वाढत्या दलित अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर देशाच्या स्वातंत्र्याला प्रश्नांकित करणाऱ्या, दलित स्त्रीच्या अब्रूपेक्षा राष्ट्रीय चिन्हांचे पावित्र्य आणि मोल अधिक मानणाऱ्या प्रवृत्तीवर यात आघात केलेले आहेत. ज्यावरुन गदारोळ झाला ती या लेखातील विधाने अशीः
“ब्राम्हणाच्या बाईचा कासोटा ब्राम्हणगावात सोडला जात नाही. सोडला जातो बौद्ध स्त्रीचा. नि याला शिक्षा काय? तर ५० रुपड्या दंड. साला राष्ट्रगीताचा अपमान केला तर ३०० रुपये दंड. सालं राष्ट्रध्वज म्हणजे निव्वळ कापड. विशिष्ट रंगात रंगविलेलं प्रतीक. त्या प्रतीकाचा अपमान झाला तर दंड, नि सोन्ना गावच्या सोन्यासारख्या प्रत्यक्षातील चालत्या-बोलत्या स्त्रीचं पातळ फेडलं तर ५० रु दंड. असला राष्ट्रध्वजाचा अपमान नि राष्ट्रध्वज काय कुणाच्या गांडीत घालायचाय का? राष्ट्र हे लोकांचं बनतं. त्यातल्या लोकांचं दुःख मोठं की प्रतीकाच्या अपमानाचं दुःख मोठं? मोठं काय? आमच्या अब्रूची किंमत एका पातळाएवढ्या किमतीएवढी. या गुन्ह्याला म्हणूनच राष्ट्रध्वजाच्या अपमानाला होणाऱ्या दंडापेक्षा जबर शिक्षा हवी आहे. नपेक्षा लोकांत राष्ट्रप्रेम राहणार आहे काय?”
या लेखावरुन गदारोळ माजला. जनसंघाच्या मंडळींनी पुढाकार घेतला नि मग इतर लोकही त्यात पुढे आले. ‘साधना’ कचेरीवर मोर्चा काढण्यात आला. साधनाच्या विश्वस्तांना जबाबदार धरण्यात आले. पुढे ९ सप्टेंबर १९७२ च्या अंकात एस. एम. जोशी यांनी संपादकीय लिहिले. ‘तेजोभंगाचे पाप आम्ही करणार नाही’ या शीर्षकाच्या या लेखात ते लिहितात- ‘राष्ट्रध्वजाचे प्रचलित समाजव्यवस्थेशी आणि शासनाशी समीकरण बसवण्यामध्ये श्री. ढाले यांच्याकडून चूक होत आहे.’ पण एवढेच लिहून ते थांबत नाहीत. ते ढालेंना दोषी धरणाऱ्या समाजाला सवाल करतात- ‘बहुसंख्य सवर्ण समाजाकडून जी पापे आणि अत्याचार घडत आहेत त्याबद्दल त्यांना जाब कोण विचारणार?’
राजा ढालेंनी लेखातून केलेला सवाल या ७२ सालीच नामदेव ढसाळांनी आपल्या कवितेतून केला आहे. ते म्हणतात- ‘१५ ऑगस्ट एक महाकाय भगोष्ठ/स्वातंत्र्य कुठच्या गाढवीचं नाव आहे?/...कंचा मूलभूत अर्थ स्वातंत्र्याचा?’
या दोहोंनी विचारलेल्या प्रश्नाची भाषा काहींना खटकू शकते. (संत तुकारामांच्या भाषेबद्दलही असा आक्षेप येऊ शकतो. पण तो आताच्या चर्चेचा मुद्दा नाही.) मात्र त्यातल्या मूळ मुद्द्याचे काय? त्या मुद्द्याला स्वीकारुन शेवटी एखाद्या ओळीत भाषेच्या औचित्याबाबतचा अभिप्राय समजू शकतो. पण मुख्य मुद्द्यालाच ज्यांचा विरोध आहे, ते भाषेचे केवळ निमित्त करतात. व्यक्तीला बिनमहत्वाचे मानून राष्ट्रवादाचे पोकळ मनोरे उभारणे हे आज अधिकच तीव्रतेने आपल्याला दिसते. संविधानाच्या उद्देशिकेत व्यक्तीची प्रतिष्ठा ही राष्ट्राची एकता व एकात्मता याच्या आधी आहे. व्यक्तीसाठी राष्ट्र आहे. राष्ट्रासाठी व्यक्ती नव्हे. घटनाकारांनी अधोरेखित केलेला हा मुद्दा, घटनानिर्मितीला विरोध असलेली जी मंडळी आज सत्तेत आहेत, ती धूसर करत आहेत. त्यासाठी राष्ट्रवादाचे भावनिक भ्रमजाल उभे करत आहेत. राष्ट्रीय प्रतीकांच्या अपमानाविषयी मूळ घटनेत तशी काही तरतूद नाही. १९७१ साली त्यासाठीचा कायदा झाला. पण त्याचा फारसा वापर झालेला दिसत नाही. राजा किंवा नामदेव यांच्यावरही काही खूप कठोर कारवाई झाल्याचे दिसत नाही. तत्कालीन सरकारच्या वर्ग-वर्ण चारित्र्याविषयी कितीही तक्रारी असल्या तरी संविधानातील मूल्यांची काही एक चाड किमान त्यांच्या मध्यवर्ती नेतृत्वाला होती. शिवाय समाजात पुरोगामी चळवळीचा पैस मोठा होता. संघप्रवृत्तीचा आजच्यासारखा वरचष्मा तेव्हा नव्हता. याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आधार बंडखोर पॅंथरना मिळाला होता. आज नामदेव किंवा राजा यांनी असेच लिखाण केले असते, तर राष्ट्रद्रोहाच्या आरोपाखाली आत टाकून लवकर जामीन न मिळण्याचे सर्वतोपरी प्रयत्न आजच्या सरकारने केले असते, यात काही शंका नाही.
राजा ढालेंच्या निर्भिडपणाची उदाहरणे आपण पाहत आहोत. आता त्यातील एकच नोंदवतो. अकोला जिल्ह्यातल्या धाकली गावातील पाटलाच्या मुलापासून गवई कुटुंबातील दलित मुलगी गरोदर राहिली. मुलीच्या पालकांनी तिचा पाटलाच्या मुलाने स्वीकार करावा, अशी मागणी केली. त्यामुळे संतप्त झालेल्या पाटलाने या मुलीच्या वडिलांचे व तिच्या चुलत्यांचे डोळेच काढले. १९७४ ची ही घटना. यावर पॅंथरने रान उठवले. १९७५ च्या जानेवारी महिन्यात मुख्यमंत्र्यांबरोबरच्या बैठकीत गवई बंधूंना नुकसानभरपाई म्हणून १००० रु. देऊ केले गेले. त्यावेळी संतप्त झालेल्या राजा ढाले यांनी भर बैठकीत मुख्यमंत्र्यांना सवाल केला- “आपण आपला डोळा दोन हजार रुपयांत द्याल काय?”
ढालेंचे हे वागणे बेमुर्वत होते हे खरे. पण मुर्दाड व्यवस्थेने किमान हलायला तीच उपयुक्त ठरत होती. शिवाय अभावग्रस्त आणि आंबेडकरोत्तर रिपब्लिकन नेत्यांच्या बाबत निराभास झालेल्या समाजात एक नवी चेतना, अस्मिता आणि क्रियाशीलता आणायला पॅंथरांचे हे जहालपण मदतनीस ठरले हे नक्की.
प्रश्न याच्या पुढच्या टप्प्याचा होता. तो अडखळला. चळवळीने पुढचा मुक्काम गाठायच्या आधीच ती फाटाफुटीच्या गर्तेत अडकली. बेमुर्वतखोरी व्यक्तिवादात अडकली आणि सहकाऱ्यांनीच परस्परांचे पंख छाटायला सुरुवात केली. सनातनी आणि प्रस्थापितांना हे नकोच होते. सत्ताधाऱ्यांना यांचा वापर करायचा होता. समाजवादी व डावे यांचा हे स्फुल्लिंग अखेरीस आपल्या उद्दिष्टाकडे नेता येते का हा प्रयत्न होता. ५ जानेवारी १९७४ च्या वरळीच्या सभेत राजा ढालेंवर झालेला हल्ला, त्यांना पोलिसांनी केलेली अटक, त्यानंतर झालेल्या दंगली, त्याच्या निषेधार्थ काढलेला १० जानेवारीचा मोर्चा, त्यावर झालेला हल्ला-हल्ल्याचा प्रतिकार, हल्लेखोरांनी घेतलेला भागवत जाधव या कार्यकर्त्याचा बळी, त्यातून आलेले चळवळीचे विस्कटलेपण, त्याचा फायदा घेऊन प्रस्थापित रिपब्लिकन नेत्यांचा ऐक्याचा प्रयोग... या साऱ्यातून दलित पँथरच्या नेत्यांत संशयकल्लोळ सुरु झाला.
‘जात, धर्म, वर्ण, वर्ग-विरहित, शोषणमुक्त, सुखी, समृद्ध, सुसंस्कृत व विज्ञानी समाजनिर्मितीसाठी दलित-श्रमिक वर्गांची राजसत्ता स्थापन करणे’ हे दलित पॅंथरचे क्रमांक १ चे उद्दिष्ट संशयकल्लोळात घुसमटून गेले. नामदेव ढसाळांनी केलेला पॅंथरचा जाहिरनामा हा मार्क्सवाद्यांच्या प्रभावाखालचा असून यातून ‘नामा’ जाहीर झाला आहे, अशी टीका राजा ढालेंनी केली. पुढे त्यांनी आपल्या उद्दिष्टानुरुप पुढे जायला निकामी ठरलेले साधन म्हणून दलित पॅंथरच बरखास्त केली. ‘मास मुव्हमेंट’ ही नवी संघटना काढली. पॅंथर बरखास्त करणे न पटलेल्यांनी त्याच नावाने काम सुरु ठेवले. या पॅंथरचे पुढे दोन, तीन असे तुकडे होत गेले. खुद्द मास मुव्हमेंट एक राहिली नाही. जी राहिली ती चालली नाही. राजा ढालेंच्या मते पॅंथरमधील वाद हा विचारसरणीचा होता, नेतृत्वाच्या स्पर्धेचा नव्हता. इतरांचे म्हणणे- खुद्द राजा ढालेंनाच त्यांच्या नेतृत्वाला आव्हान देणारे कोणी नको होते. आणीबाणी, जनता पार्टी, वेळोवेळच्या निवडणुका यांत भूमिकांपेक्षा तत्कालीन सोय वा स्वार्थच मुख्य होता, अशी अनेक त्रयस्थांची नोंद आहे.
तथापि, राजा ढाले आपले जीवन जुन्या साधेपणानेच जगत राहिले. बाकी बहुतेक नेत्यांनी विविध तडजोडी केल्या. काही वेळा खोटे समर्थन देऊन तर कधी खुल्या नंगेपणाने. अगदी थेट वैचारिक शत्रूंशीही. आंबेडकरी चळवळ आज दिशाहिनतेच्या भोवऱ्यात गरगरते आहे. सुरुवातीला नोंद केल्याप्रमाणे तिच्यातल्या निर्नायकीपणाचा प्रत्यय खुद्द ढालेंच्या अंत्यविधीवेळीच आला. अशावेळी आपल्या शुद्धतेच्या वा वैचारिक आग्रहाच्या कंगोऱ्यांना घासत, समाजातील अंतर्विरोधांचा ऐतिहासिक दृष्टिकोणाने वेध घेत चळवळीला दिशा देण्याचे काम त्यांनी करावयास हवे होते. त्यांच्या तिशी-पस्तिशीच्या कर्तृत्वाच्या काळानंतरचे दीर्घ आयुष्य त्या कामी आले नाही, असे नाईलाजाने म्हणावे लागते.
पॅंथरच्या नायकत्वानंतरच्या दीर्घ आयुष्यात तसेच त्या आधीही दलित ऐवजी आंबेडकरी प्रेरणेचे साहित्य, नावाच्या आधी ‘श्री.’ ऐवजी आयुष्मान, ‘कै.’ ऐवजी कालकथित, बौद्ध सूक्तांचे मराठीकरण, बौद्ध धर्मातल्या कर्मठ व अवैज्ञानिकतेला नकार अशा कित्येक साहित्य-सांस्कृतिक-धार्मिक क्षेत्रातील संकल्पना-विचारांचे काटेकोर पुनर्निधारण करण्याचे श्रेय राजा ढालेंना जाते. आपल्या मृत्युनंतर बौद्धांच्यात केला जाणारा जलदान वा पुण्यानुमोदन विधी न करण्याबाबत कुटुंबीयांना सूचना देऊन ठेवण्याचे त्यांचे धैर्य आणि मरेपर्यंत नव्या प्रगत दिशेचा शोध घेण्याची त्यांची जिद्द आंबेडकरी समुदायाला निश्चितच अनुकरणीय व प्रेरक ठरणार आहे. या प्रेरणेतून जे त्यांच्याकडून राहिले ते करण्याचा संकल्प आंबेडकरी चळवळीतल्या नव्या पिढीने करणे हीच या पँथरच्या महानायकाला खरी आदरांजली ठरेल.
- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com
(आपलं महानगर, रविवार, २१ जुलै २०१९)