Monday, July 1, 2019

अपनी कमजोरियों से खुद ही लड़ते जाएंगे

मोदींच्या प्रचंड विजयाचा भल्याभल्यांना अंदाज नव्हता. ते सत्तेवर येऊ नयेत अशी अनेक पुरोगाम्यांप्रमाणे माझीही इच्छा होती. पण विरोधकांची स्थिती पाहता काहीतरी जमवाजमव करुन ते सत्तेत येतील ही मनाची तयारीही होती. पण त्यांचा भूकंपासारखा विजय पाहून मीही खचून गेलो. हे दुःख आप्ताच्या मृत्युसारखे; तथापि एकट्याचे नव्हते. शिवाय अधिक व्यापक आयाम त्याला होते. अशा स्थितीत चळवळीतले मित्रवर्य विलास कोळपेंचा ‘हाक मारायला’ आणि श्रीधर पवारचा डॉक्टर म्हणून ‘तब्येतीची काळजी घे’ सांगायला फोन येण्याने मी खो खो हसलो खरा. पण ते गरजेचे होते. परस्परांना हा दिलासा आवश्यकच होता. घरातल्या मृत्युनंतरही काही दिवसांनी माणसे सावरतात. झालेले नुकसान भरुन निघते असे नाही. पण मन हळूहळू स्थिर होते. सरावते. मोदींचा विजयही आता मधूनच वेदनेची कळ आली तरी मनाने बऱ्यापैकी स्वीकारला आहे. हे कशाने झाले, पुढे काय करायचे हा विचार करायला मन तयार झाले आहे.

२०१४ चा मोदींचा विजय हा नव्या आकांक्षांचा, विकासाच्या आश्वासनांचा होता. सत्तेतील गेल्या पाच वर्षांत या आकांक्षांची, विकासाच्या आश्वासनांची अशी काही पूर्तता झालेली नव्हती. उलट पुरेशा तयारीअभावी आलेल्या नोटबंदी-जीएसटीने रोजगार-धंदा संकटात आला. महागाई वाढली. शेतीचे अरिष्ट तीव्र झाले. मुस्लिम-दलितांवरचे हल्ले वाढले. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचे आक्रमण कलावंत, साहित्यिक, बुद्धिवंतांना अत्यवस्थ करुन गेले. तथापि, या कशाचेच प्रतिबिंब निकालात उमटले नाही. झाले ते याच्या उलट. भाजपच्या मतांची टक्केवारी २०१४ ला ३१ टक्के होती ती २०१९ ला ३७ टक्के झाली. काही राज्यांत तर ती पन्नास टक्क्यांच्या जवळ आहे. ज्या दलित-मुस्लिमांना या राजवटीचा सर्वाधिक त्रास झाला त्यापैकी मुस्लिमांतील त्यांच्या मतांची आधीची आणि यावेळची टक्केवारी तेवढीच म्हणजे ८ टक्के राहिली. मात्र दलितांची टक्केवारी २०१४ ला २४ टक्के होती, ती यावेळी २०१९ ला ३४ टक्के झाली. आदिवासींमध्येही भाजपला मिळालेल्या मतांत वाढ झाली आहे. भाजपचा मुख्य आधार शहरी विभाग असा जो समज होता, तो आता गळून पडला आहे. ग्रामीण व शहरी मतांमधील फरक या आधी ९ टक्के होता. तो आता साडेतीन टक्क्यांवर आला आहे. गरिबांमध्ये तसेच तरुणांच्यात भाजपचा पाठिंबा वाढला आहे. आंध्र, तामिळनाडू आणि केरळ वगळता उर्वरित भारतात जिथे नव्हते तिथेही आपले अस्तित्व दाखवायला त्यांनी सुरुवात केली आहे.

हा चमत्कार कसा झाला?

विरोधकांची बेकी. एकत्रित न लढणे. त्यामुळे झालेल्या मतविभागणीचा फायदा भाजपला जरुर मिळाला. परंतु, अनेक ठिकाणी सर्व विरोधक एकत्र आले असते तरी भाजपचा जय ठरलेला होता असे चित्र दिसते. मोदींची कर्तृत्ववान आणि खास करुन पुलवामानंतर झालेली तारणहार प्रतिमा, या प्रतिमेच्या आसपासही नसलेला विरोधकांचा नेता, बहुसंख्याक हिंदूंना हिंदुत्वाचे अपिल, त्यामुळे झालेले ध्रुवीकरण, मुस्लिमांविषयीचा उच्चवर्णीय तसेच दलितांमध्येही असलेला द्वेष, सगळेच प्रश्न लगेच सुटणार नाहीत, गेल्या ७० वर्षांची काँग्रेसने केलेली घाण साफ करायला मोदींना वेळ द्यायला हवा ही भावना आणि हे सगळे कवेत घेणारी मजबूत संघटना, विधिनिषेध बाजूस सारुन केवळ जिंकण्याच्या ईर्ष्येने लढणारे नेतृत्व व त्याला प्रमाणाबाहेर उजळणारे माध्यमांचे सहकार्य... ही काही कारणे मोदींच्या तुफान विजयाची सांगता येतील. अजूनही बरीच असतील. हळू हळू ती उलगडतील. उदा. मतदान यंत्रांचे घोळ, मते कापण्यासाठी विरोधकाच्या जातीचे-पक्षाचे बंडखोर उमेदवार उभे करणे, पैश्यांचा वारेमाप वापर, विरोधी पक्ष फोडून त्यातील बडे नेते दामाची लालुच वा दंडाची भीती दाखवून आपल्या बाजूने वळविणे वगैरे.

पुढे काय करायचे?

सत्तेच्या सहाय्याने पैसा आणि यंत्रणेवरचा जम, संघटनात्मक ताकद अधिकाधिक वाढणार असल्याने भाजपची सत्तेवरची पकड लवकर ढिली होईल ही शक्यता आपण पुरोगामी मंडळींनी मनातून पुसायला हवी. ज्यांनी लोकशाही मार्गाने मोदींना सत्तेवर पाठवले आहे, त्या लोकांमध्येच काही-विशेषतः आर्थिक प्रश्नांवर जोरदार उसळी सुरु झाली तर मोदींचे तख्तही ते खाली खेचू शकतात. तसे होवो अशी इच्छा बाळगूया. पण त्यावर विसंबूया नको. आता ही लढाई लांब पल्ल्याची आहे, स्वातंत्र्य वा सामाजिक सुधारणांच्या ऐतिहासिक चळवळींसारखीही ती असू शकते, असाही सबुरीचा विचार मनात ठेवावा. हे सगळे लवकर झाले तर चांगलेच आहे. पण तयारी दूरवरचीच करायला हवी. लढायांत बळी जातात. आपलेही जातील. ती तयारी आपली नक्की आहे. पण त्यात हाराकिरी नको. भावनावश न होता, असलेल्या शक्तीचा व्यय होऊ न देता, ती जपून, नियोजनपूर्वक वापरत, वाढवत जायला हवी. मोदींना मते देणारी जनता ही आपली जनता आहे. तिच्या मनाचा मागोवा घेत, तिला पटवून मोदींच्या प्रभावातून बाहेर काढावे लागेल. मोदी घटनात्मक लोकशाही मार्गाने सत्तेवर आलेत. त्याच मार्गाने त्यांना उतरवावे लागेल. दुसरा कोणताही आततायी मार्ग आपलाच घात करेल.

हे वाचताना एखाद्या सामान्य वाचकाला एवढी का चिंता हे लोक करत आहेत, असे वाटू शकते. कारण आपण ज्याला फॅसिझम म्हणतो व मोदींच्या रुपाने त्याचे आगमन झाले आहे हे आपले मापन त्याला आकळत नाही. आपल्या सोबतच्या जनसंघटनांतील सामान्य कार्यकर्त्यांनाही ते कळत नाही. आपण बोलतो म्हणून व आपल्यावर त्यांचा विश्वास आहे म्हणून ते काहीतरी भयंकर आहे असे त्यांना वाटते एवढेच. अलीकडे अगदी बौद्ध समाजातील सभांमध्येही सामान्य बाया-पुरुषांना ‘बाबासाहेबांची घटना बदलून ती मनुस्मृतीवर आधारित त्यांना बनवायची आहे’ हे वाक्य त्यांना कळत नाही असे माझ्या अनुभवास येते. मनुस्मृतीची होळी बाबासाहेबांनी केली हे त्यांना कळते. पण ही मनुस्मृती म्हणजे नक्की काय, तिचा घटनेशी संबंध काय हे लक्षात येत नाही. ते नीट समजून सांगितले की त्यांचा प्रतिसाद वेगळा असतो, हे सभेनंतर लोक भेटायला येतात तेव्हा कळते. सरंजामशाही, मूल्ये, अभिव्यक्ती हे सगळे खूप बाळबोधपणे समजवावे लागते.

आपल्या लढ्याचा भाग म्हणून आपण कन्हैया कुमार, जिग्नेश मेवानी वा तत्सम प्रभावी वक्त्यांची भाषणे ठेवतो. त्यांचे व्हिडिओ शेअर करतो. कन्हैयाने मोदीभक्तों को कैसे धो डाला, कैसी उनकी बोलती बंद कर  दी..अशी त्याला शीर्षकेही देतो. या भाषणांनी आपली ऊर्जा वाढते, आपल्याला मुद्दे मिळतात हे खरे. मात्र प्रतिपक्षाचे लोक गारद करुन आपण लोकशाहीतली लढाई जिंकू शकत नाही. राजे-महाराजांच्या सरंजामी लढायांत माणसे बंदिवान करुन राज्य ताब्यात घेतले जायचे. आता मोदींनाही मने काबीज करुन ती मतांत परावर्तीत करावी लागतात. आपल्यालाही प्रतिपक्षातले लोक आपल्या मांडणी-प्रचार-भाषणे व व्यवहाराने आपल्या बाजूला वळवावे लागतील. बोलती बंद करुन ते आपल्या बाजूने येणार नाहीत. युक्तिवादात माणसे निरुत्तर होतात याचा अर्थ त्यांना आपले पटते असे नाही. त्यांचा अवमान होऊन ती विरोधी छावणीकडे अधिक सरकायचीच शक्यता असते. म्हणूनच विरोधकांशीही संवादाचा, त्यांचे म्हणणे अधिकाधिक ऐकून त्यांचा आदर राखून समजुतीने प्रतिवाद करण्याचा मार्ग उपयुक्त ठरतो. अर्थात यात बनचुके व प्रामाणिक यांत फरक करुन बनचुक्यांच्या नादाला न लागणे हे करावेच लागेल. करुणा, मैत्रीच्या मार्गाने संवाद करणारे प्रचारक (भिक्खू) बुद्धाने तयार केले. अशा प्रचारकांचा संघ केला. त्यामुळे त्याचा परिणामही तसा झाला. आपल्यालाही त्याच रीतीचे सम्यक प्रचारक व त्यांचा संघ करावा लागेल. प्रचाराचे मुद्दे, केलेल्या प्रचाराला मिळालेला प्रतिसाद, समोर आलेले नवे प्रश्न व त्यांवर विचार करुन नव्या आकलनानुसार नवी मांडणी यासाठी संघ आवश्यक असतो. सुटे राहून चालत नाही.

एखाद्या मुद्द्यावर आपण निदर्शन वा मेळावा घेतो. त्याला आपलेच लोक हजर असतात. त्यांना माहीत असलेले व पटलेलेच मुद्दे त्यांच्यासमोर मांडतो. ते टाळ्या वाजवतात. आपण खूष होतो. हा फसवा प्रकार आहे. आपल्या धोरण-डावपेचासाठी आपल्याच लोकांची बैठक हे ठीक. पण बाहेरच्या लोकांना काही सांगायचे-आवाहन करायचे असेल तर त्यांच्यापर्यंत जायला हवे. आपल्या कार्यक्रमाची जागा ही तशी हवी. तेथे आपण जे बोलतो त्याचा समोरच्यांना काय अर्थ लागतो याकडे आपले लक्ष हवे. ईव्हीएम मशीन नको हे आंदोलन आवश्यक असू शकते. पण आता ते लगेच करणे व तेवढेच बोलणे यातून तुम्हाला मोदींचा विजय सहन झाला नाही, म्हणून तुम्ही हे करता आहात, असे लोक समजतात व आपल्याकडे दुर्लक्ष करतात. या आंदोलनाचे स्वरुप व त्यातील भाषणे विरोधकांच्या प्रभावाखालील लोक आपल्या बाजूने वळविण्याच्या पद्धतीची असावी लागतील.

आपली भीती काय आहे? – तर मोदी व त्यांचे साथीदार Idea of India धोक्यात आणत आहेत. आपण म्हणतो ही दोन विचारांतली लढाई आहे. मग ही लढाई विचारांनीच करावी लागणार आहे. मग आपला विचार कोणता? ...भारत ही गंगा-जमनी तहजीब आहे. मग या संमिश्र संस्कृतीचा परिचय देणारे कार्यक्रम, चर्चा आयोजित कराव्या लागतील. खुस्रो-कबीर-बुल्लेशहाची सूफी भजने हा आपल्या परंपरेचा भाग आहे. कबिराची भजने गाणारी भजनी मंडळे एकेकाळी माझ्या वस्तीत होती. अशांना शोधून वा नव्याने तयार करुन त्यांना कार्यप्रवण करावे लागेल. आपल्याच संतांचे विचार सांविधानिक मूल्यांशी जोडून मांडणाऱ्या श्यामसुंदर महाराज सोन्नरांसारखे कीर्तनकार तयार करण्याच्या कार्यशाळा घ्यायला लागतील. आपापल्या जातीच्या, धर्माच्या बिनजातिवादी उत्सवांत सहभागी होऊन त्यांत परमताविषयी सहिष्णुता, आदर आणि मानवतेला पोषक मूल्यांची रुजवात करण्याची खटपट करावी लागेल. या मूल्यांचे वहन करणारे चित्रपट दाखवून त्यांवर चर्चा ठेवता येतील. मोदींनी Idea of India धोक्यात आणली असे आकांडतांडव करुन काहीही होणार नाही. तुम्ही मोदींचे शत्रू आहात एवढेच लोकांना कळेल व लोक दूर जातील. मोदी, भाजप, संघ यांचा उद्धार वा उच्चार न करताही Idea of India ची आपली संकल्पना आपल्याला मांडता आली पाहिजे. ती येते असा माझा अनुभव आहे. कोणत्याही माध्यमाच्या कोणत्याही शालेय पुस्तकात संविधानाची उद्देशिका छापलेली असते. तिचा आशय हा Idea of India च आहे. तो मुलांना, शिक्षकांना समजावून सांगण्याचे कार्यक्रम उदंड करता येतात. आम्ही करत असतो. भारत-पाकिस्तान वा काश्मीर प्रश्नावर जो राष्ट्रवादाचा ऊत ही मंडळी काढतात, त्यालाही हलक्या हाताने उद्देशिकेच्या निरुपणात हात घालता येतो. त्यांच्या राष्ट्रवादावर हल्ला करण्याचा प्रभावी मार्ग आपला राष्ट्रवाद शांतपणे रुजवणे हा आहे.

मोदींचा ‘नवा भारत’ गरीब व गरिबांना सहाय्य करणारे अशा दोनच जातींचा असेल असे मोदींनी विजयोत्सवी भाषणात नमूद केले. अनेकांना ते ऐकायला छान वाटले. पण त्यात खूप गुह्ये दडलेली आहेत. गरीब वा दलित का तयार झाले या मूळात जायचे नाही. याला जबाबदार व्यवस्थेबद्दल बोलायचे नाही, अर्थातच वर्ग-वर्ण संघर्ष करायचे नाहीत हे मोदी ज्या विचारपरंपरेचे पाईक आहेत तिचे धोरण आहे. संविधानातील व्यक्तीची प्रतिष्ठा आणि दर्जा व संधीची समानता याला फाटा देऊन आपापल्या पायरीवर सुखाने नांदावे सांगणाऱ्या समरसतेचे ते पूजक आहेत. ती त्यांना आणायची आहे. ही चर्चा कट्टर मोदीसमर्थकांशी करणे व्यर्थ आहे. त्याऐवजी, समान कामाला समान दाम, कायमस्वरुपी काम कंत्राटावर देता नये, शिक्षणाचे खाजगीकरण रोखणे व सर्व मुलांना सर्वतऱ्हेचे शिक्षण मोफत मिळणे या बाबी चर्चेत मध्यवर्ती कराव्यात. लव्ह जिहादच्या चर्चेत लग्न धर्माऐवजी विशेष विवाह कायद्याखाली करुन ज्याने त्याने आपला धर्म पाळावा, हा पर्याय चर्चेला पुढे नेणारा ठरु शकतो. असे विवाह करणाऱ्यांचे सत्कार समारंभ करावेत. या सत्कारांत विवाहसंस्थेला नव्या पायावर उभे करण्याची चर्चा घडवता येईल.

महाराष्ट्रात बौद्ध, उ.प्रदेश, पंजाब आदि राज्यांत जाटव सोडून इतर दलित जातींना आपल्या बाजूने वळविण्यात भाजप यशस्वी ठरला आहे. ओबीसींमध्येही तसेच. यादव सोडून इतर ओबीसी जातींना आपल्या बाजूने त्यांनी घेतले आहे. या दलित वा ओबीसी जाती आरक्षणाच्या समर्थक स्वाभाविकपणेच आहेत. मोदींच्या नया भारतमध्ये आरक्षण बसत नाही. पण आता ते त्याबद्दल थेट काही बोलणार वा करणार नाहीत. ते हळूहळू व न बोलता आरक्षण निष्रभ करु लागतील. सध्या करतच आहेत. या दलित-ओबीसींची जुट आरक्षणाचा प्रश्न नीट समजावून योग्य त्या बदलाची तयारी ठेवत, अंतर्गत फेररचनेची आपणच चर्चा सुरु करत बांधता येऊ शकते. आदिवासींना धर्म नाही ही चर्चा प्राधान्याने करण्यात तूर्त काही हासील होणार नाही. वनवासी कल्याण आश्रम तसेच विश्व हिंदू परिषद यांनी खूप काळापासून आदिवासींत हिंदू धर्म नेला आहे. सामान्य आदिवासींनाही हिंदू असणे हे प्रतिष्ठेचे वाटते. आज देशात आदिवासी ख्रिस्ती, मुस्लीम, बौद्ध आणि हिंदू आहेत. त्यांच्या धर्मावर न जाता त्यांच्या आदिवासी म्हणून असलेल्या खास प्रागतिक सामायिक परंपरांकडे त्यांचे लक्ष वेधणे व त्यांवर त्यांचे सांस्कृतिक जीवन संघटित करण्याची खटपट करायला हवी. आरक्षण तसेच अन्य खास अधिकारांचे रक्षण हाही मुद्दा आहेच. मोदींच्या बाजूने गेलेले हे विभाग त्यांच्यापासून दूर करण्याचा हा एक मार्ग-अर्थात लांबचा आहे.

आपल्या डाव्या-समाजवादी-लोकशाहीवादी मंडळींचे एक महत्वाचे सामर्थ्य आहे, ते म्हणजे जनसंघटना व त्याद्वारे येणारा शोषित-पीडित-कष्टकरी समुदायांशी विपुल संबंध. या संबंधांतून खरेखुरे राष्ट्रीय, मानवतावादी सामाजिक-राजकीय शिक्षण करण्याची संधी आपल्याला आहे. फक्त हे शिक्षण शिबीर वा कार्यशाळांतूनच घ्यायचे यांत सुधारणा करावी लागेल. ते तर करावेच. पण रोजच्या रोज पुढारी कार्यकर्त्याने जनसंघटनांतल्या किमान प्रमुख मंडळींशी सभोवतालच्या घटनांची संवादी चर्चा करत त्यांच्या विचारांना दिशा देण्याची गरज आहे. आर्थिक-भौतिक प्रश्नांसाठी हे लोक आपल्याकडे आणि विचार-राजकारणात विरोधकांकडे ही त्रासदायक स्थिती त्यातूनच बदलू शकते. सामाजिक-राजकीय शिक्षणाशिवाय संसदबाह्य लढ्यांच्या परिणामकारकतेला मर्यादा पडतात हे आपण अनुभवलेच आहे.

समाज टिकायचा असेल तर विद्वेष विसर्जित करावाच लागेल. मोदींच्या दुसऱ्या विजयी माहोलात हा विद्वेषाचा उन्माद वाढणार आहे. एका अभ्यासानुसार भारतात फेसबुकवर जो विद्वेषी मजकूर टाकला जातो त्यातला ३७ टक्के मजकूर मुस्लिमविरोधी असतो. उरलेल्यांत जात आणि लिंग यांबाबत विद्वेषाने लिहिला जाणारा मजकूर प्रत्येकी १३ टक्के आहे. जातीबाबतच्या मजकूरात आरक्षण व आंबेडकर विरोध हा प्रमुख भाग असतो. पायल तडवीचा जीव गेला याबद्दल संवेदना नाही. मात्र ती मुसलमान असून राखीव जागा कशी घेते हा प्रमुख मुद्दा असलेल्या पोस्ट्स फेसबुक-व्हॉट्सअपवर आपण पाहिल्या आहेत. गिरीश कर्नाडांच्या मृत्युबद्दल उपचार म्हणून दुःख व्यक्त करण्याऐवजी निरीश्वरवादी माणसाला श्रद्धांजली कशी वाहता, असा निरर्गल प्रश्न माझ्या पोस्टवर विचारला गेला. हा विखार माणूस नष्ट करणारा आहे. मोदींना मते दिलेले सगळेच लोक या विचाराचे नक्की नसणार. या विखाराविरोधात मानवतेला, विवेकाला, सद्भावाला जागविणाऱ्या आवाहनाला आज मोदींच्या बाजूने असलेले लोकही प्रतिसाद देऊ शकतील. तसा तो मिळवायला हवा. मोदींच्या बाजूचे म्हणून विरोधी छावणीतच त्यांना बंदिस्त करणे टाळले पाहिजे.

आपण ज्यांना आपले साथी वा मित्रशक्ती मानतो त्यांचे योग्य मापन, मतभिन्नता राखूनही त्यांच्याप्रती आदर व सहकार्य करण्याचे प्रयत्न सतत करायला हवेत. आज काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये जे नेते दिसतात त्यात अपवादानेच त्यांची जुनी परंपरा ठाऊक असलेले व ते पाळणारे आढळतील. राजकारण हा धंदा मानून स्वार्थासाठी ते भाजपच्या दारात रांग लावतात हे आपण अनुभवतो आहोत. जे भाजपमध्ये गेले नाहीत, त्यातील अनेकांना आपण काँग्रेसमध्ये राहिलो म्हणून पराभूत झालो असे वाटते. वेळीच भाजपकडे गेलो असतो तर निवडून आलो असतो असे त्यांच्या मनात चाललेले असते. काँग्रेसमध्ये ही गटारगंगा असली तरी राष्ट्रीय स्वातंत्र्याची चळवळ व त्यातून तयार झालेल्या मूल्यांची परंपरा मानणारे लोक देशाच्या कानाकोपऱ्यात आजही आहेत. ते वेगाने विरळ होत आहेत. पण आज आहेत. या लोकांशी संपर्क-संवाद व त्यांना अभिप्रेत काँग्रेस उभी राहणे हा भाजपविरोधी लढ्यातील एक महत्वाचा उपयुक्त टप्पा आहे. काँग्रेसींबद्दल कितीही घृणा वाटली तरी हा टप्पा समजून घेणे हिताचे आहे. कारण काँग्रेसची ही जागा घेणारे दुसरे साधन आज आपल्याजवळ नाही. काँग्रेसशी सहकार्य ही आपली गरज आहे, काँग्रेसींची नाही, हे नीट लक्षात ठेवले पाहिजे.

बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीला ४१ लाख मते या निवडणुकांत मिळाली ही खूप जमेची बाजू आहे. ही मते देणाऱ्यांत मुख्यतः सर्वपक्षीय बौद्ध समाज आहे. कोणत्याही पक्षात आम्ही असू, मात्र यावेळी मत बाळासाहेबांना हा या समाजाचा निश्चय होता. दलितांत एक समूह म्हणून बहुसंख्य असतानाही राजकीय ताकद नगण्य, नेते विकाऊ, पद-पैश्यासाठी लाचार होणारे, एकजुटीत न येणारे यांमुळे अवमानित झालेल्या बौद्धांना ‘वंचित बहुजन आघाडी’ हा आपल्या अस्मितेचा मानबिंदू वाटतो आहे. भाजप व काँग्रेस या दोहोंशी आमचे देणेघेणे नाही, आम्हीच सत्तेच्या दिशेने धाव घेणार अशा मनःस्थितीत सध्या तो आहे. त्यामुळे भाजपला हरवायला काँग्रेसशी सहकार्य हा मुद्दा त्याला कळीचा वाटत नाही. आमच्या अटींवर काँग्रेसने यावे, नाहीतर गेलात उडत असे तो म्हणतो. काँग्रेसला आम्ही मोजतच नाही, आमची लढाई आता भाजपशीच हे बाळासाहेबांचे म्हणणे त्याला पूर्ण पटते. आत्मभानाने स्वावलंबनाकडे वाटचाल या मनःस्थितीचे स्वागत करतानाच फॅसिझम हा आपल्याला सर्वांना गिळंकृत करेल, त्यात काँग्रेसींचे नुकसान कमी व आपले जास्त हा मुद्दा सुटतो आहे, हे नमूद करणे भाग आहे. दुसरे म्हणजे, ज्याची बाळासाहेबांशी मतभिन्नता आहे, मग तो आधीचा त्यांचा मित्र का असेना, तो शत्रू, काँग्रेसचा हस्तक मानण्याची वृत्ती ‘वंचित’ समर्थकांमध्ये बळावते आहे. ती मूल्य म्हणून त्या चळवळीच्या, संघटनेच्या वाढीला धोकादायक आहे. आंबेडकरी तत्त्वज्ञानाशी, संविधानातील विचार-अभिव्यक्ती स्वातंत्र्याशी ही वृत्ती मेळ खात नाही. बाळासाहेबांनी तसेच ‘वंचित’मधल्या जाणत्यांनी ती वेळीच रोखली पाहिजे.

आगामी विधानसभा निवडणुकांत वंचित बहुजन आघाडी स्वतंत्र लढेल हीच शक्यता आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र असतील. पण त्यातले बंडखोरही स्वतंत्रपणे लढतील. बरेचजण भाजपमध्ये जातील किंवा भाजपला सोयीचे ठरेल त्याप्रमाणे वागतील. डाव्या तसेच अन्य लोकशाहीवादी पक्षांची ताकद प्रतीकात्मकच राहील. अर्थात, त्यालाही मोल आहे. ते भाजपविरोधी आघाडीच्या बाजूने नक्की असतील. पण जागावाटपाच्या मुद्दयावर त्यांचे काय होईल ठाऊक नाही. देशभर भाजपविरोधी आघाडी मजबूत व्हावी, असे आपण म्हणत राहू. मनाला मात्र असे होईलच असे नाही, हे समजावत राहू. या युद्धातल्या अजून बऱ्याच लढाया आपण हरणार आहोत, यासाठी मनाची तयारी करुया.

फॅसिझमला हरवणारे खरेखुरे दलित-कष्टकऱ्यांचे राजकीय साधन उभारणे हे नोहाची नौका बांधण्यासारखे आहे. त्यासाठी स्वतःला सिद्ध करण्याची पूर्वअट आपल्याला दुरुस्त करणे ही आहे. ही लढाई आपली आपल्याशी असणार आहे. सोबती जोडत जोडत करावी लागणार आहे.

वर्तमानाशी नाते सांगणारे स्मरणरंजन मला भावते. म्हणूनच लेख लांबला असला तरी ‘हम पंछी एक डाल के’ या खूप जुन्या सिनेमातील ‘एक से दो भले’ या गाजलेल्या गाण्यातील काही पंक्तींनी लेखाचा शेवट करण्याचा मोह आवरत नाही.

अपनी कमजोरियों से खुद ही लड़ते जाएंगे
गाते जायेंगे सभी हम ये बार बार
एक से दो भले, दो से भले चार
मंजिल अपनी दूर है रास्ता करना पार

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com
_____________________

(आंदोलन, जुलै २०१९)

1 comment:

Anonymous said...

Extremely important views. सम्यक मांडणी। सस्नेह।
Shrikant Barhate