Tuesday, July 16, 2019

राजा ढालेः माझ्यातल्या अस्मितेचा आणि असहिष्णुतेचा नायक



राजा गेला! 

माझ्यातल्या दुर्दम्य अस्मितेचे पोषण करणारा नायक गेला. 

पॅंथरच्या जन्मावेळी ७-८ वर्षे वय असलेल्या आमच्या पिढीला बाबासाहेबांच्या विचारांतील विद्रोहाचे प्रात्यक्षिक दिले ते पॅंथरच्या नेत्यांनी. त्यातही राजा-नामदेवने. आणि त्यातही पराकोटीच्या कठोर तत्त्वनिष्ठ राजा ढालेने. सगळे प्रस्थापित संकेत उधळून लावणाऱ्या पॅंथरमध्ये साहेब म्हणण्याची प्रथा प्रारंभी नव्हती. त्यामुळे राजा ढाले, नामदेव ढसाळ, अरुण कांबळे, रामदास आठवले हे त्यांच्या पहिल्या नावानेच लोकमानसात प्रचलित होते, संबोधले जात होते. 

बाबासाहेबांना आमच्या वडिलांनी पाहिले. त्यांना ऐकले. त्यांनी सांगितले म्हणून बौद्ध धम्म घेतला. म्हणून आम्हाला शिकवले. आम्ही बाबासाहेबांना पाहिलेले नाही. त्यांची प्रतिमा घरात, दारात, वस्तीत सर्वत्र. ते देवासमान. आमच्या आधीच्या पिढीला बाबासाहेबांनी माणूस म्हणून उभे केल्यानेच झोपडपट्टीतल्या आमच्या सर्वहारा, वंचित जगण्याला आशय व गती होती. हा आशय व गती मंदावण्याच्या आत दलित पॅंथरच्या डरकाळीने आणि घेतलेल्या झेपेने आमचे तनमन निखारा झाले. ही व्यवस्था उधळून नवे न्याय्य काही स्थापित करायचे हे आपसूक जीवनध्येय झाले. 

काय बदलायचे? आपण कसे व्हायचे? ...याचा माझ्यासमोरचा नमुना राजा ढाले होता. नामदेवचे विद्रोहीपण भावायचे. पण नंतर महत्वाची वाटलेली त्याची भाषा, कवितांतले संदर्भ, वेश्यावस्तीतले कलंदर जगणे कमीपणाचे वाटायचे. जे नासलेले, सडलेले आहे, जो आमचा भूतकाळ आहे त्याची आठवण का जागवायची? ते का पुन्हा रेखाटायचे? ‘बलुतं’ सारख्या आत्मकथनांबद्दलही मला तसेच वाटायचे. राजा त्यातला नव्हता. आपण ‘दलित’ नाही, बौद्ध आहोत. बाबासाहेबांनी आम्हाला दलितपणाच्या दलदलीतून बाहेर काढले आणि बौद्ध ही नवी ओळख दिली. ती घेऊन पुढे जायचे, हे राजाचे म्हणणे एकदम पटायचे. म्हणूनच दलित पॅंथर सोडून राजाने ‘मास मुव्हमेंट’ काढली, त्यावेळी बरे वाटले. दलित शब्द सुटला याचे समाधान वाटले. 

व्यक्तिशः माझ्यावर राजा ढालेचा विलक्षण प्रभाव होता. त्याच्या दिसण्याबरोबर त्याची भाषा, त्याचे अक्षर अप्रतिम होते. त्याच्या अनुकरणाचा मोह स्वाभाविक होता. भौतिक वैभवाची आस बाळगण्याची काहीही शक्यता नसलेल्या त्या काळात भाषा, अक्षर, लिखाण या बिनपैश्याच्या क्षेत्रातल्या वैभवाच्या मागे आम्ही लागलो. वर्षानुवर्षे कोरड्या जमिनीवर पहिल्या सरी पडल्यावर जसे नवे अंकुर सरसरुन उगवतात, तसे हे होते. श आणि ष या दोन्हींतल्या उच्चाराचा बारकावा आपल्याला साधला पाहिजे, याची जीवतोड कोशीस आमची असे. 

नव्या अस्मितेच्या भरणपोषणाची प्रतीके राजाने आम्हाला दिली. २२ प्रतिज्ञांचे कसोशीने पालन, दसरा नव्हे तर १४ ऑक्टोबर दीक्षा दिन, बौद्ध भिक्खूंच्या अवैज्ञानिक विधि-संस्कारांना नकार, पालीतली बौद्ध विधितली सूक्ते मराठीत अनुवादित करणे (शांताराम नांदगावकर यांनी त्याला संगीत देऊन त्याची कॅसेटही निघाली होती.), नावाच्या आधी श्री ऐवजी आयुष्मान लावणे, मृत व्यक्तीच्या नावाआधी कै. ऐवजी कालकथित लावणे ही काही उदाहरणे. 

राजाचा १५ ऑगस्ट १९७२ च्या साधनेतला राष्ट्रध्वजाचा अपमान आणि दलित स्त्रीची अब्रू यात मोठे काय, असा प्रश्न विचारणारा ‘काळा स्वातंत्र्यदिन’ हा लेख आणि त्या लेखातील भाषेने झालेली खळबळ, वेश्या व्यवसायाच्या गरजेचे समर्थन करणाऱ्या दुर्गा भागवतांना भर सभेत ‘मग त्या व्यवसायाची सुरुवात तुमच्यापासून होऊ द्या.’ असे त्याचे सुनावणे, मराठी सारस्वताच्या साचलेपणापणावर प्रहार करुन रुढ संकेतांना धाब्यावर बसवणाऱ्या लघुनियतकालिकांच्या चळवळीतील त्याचे नायकत्व, या मराठी सारस्वताचे पीठ असलेल्या सत्यकथेची होळी या घटनांना मी साक्षी नव्हतो. पण ज्या वातावरणात मी वाढत होतो, तेथे पुढची बरीच वर्षे त्याचे निनाद उमटत होते. राजाचा आमच्या वस्तीत सतत वावर असे. त्याच्या अवतीभवती गराडा करुन मोठ्यांबरोबर आम्ही मुलेही असू. त्यावेळीही या सगळ्या चर्चा कानावर पडत. आमच्यासाठी तो वास्तवातला फॅंटम होता. 

गवई बंधूंचे डोळे काढण्याच्या जातीय अत्याचाराच्या घटनेने आमच्या वस्त्या पेटून उठल्या. निदर्शने, सभांनी ढवळून निघाल्या. माझ्या गल्लीसमोरही पुढे कधीतरी सभा झाली. त्याला राजा ढाले तसेच अन्य नेत्यांसह मंचावर डोळे काढलेले गवई बंधूही होते. या व्यवस्थेला चूड लावण्यासाठी अजून काय साक्षात्कार आम्हाला हवा होता! 

अशा सभा वस्तीत झाल्यावर खूप उशीर झाला की हे नेते तिथेच थांबत. जायला काही साधन नसायचे. मुख्य म्हणजे पैसे नसायचे. वस्तीतच त्यांची जेवणे व्हायची. रात्रभर गप्पा चालायच्या. पहाटे पहिल्या लोकलने ते निघत. ते आमचे, आमच्यातले नेते होते. 

नामदेव ढसाळ कम्युनिस्टांच्या प्रभावाखाली आहे. त्याने काढलेला जाहिरनामा हा पॅंथरचा जाहिरनामा नसून त्यातून ‘नामा’ जाहीर झाला आहे, हे राजाचे विधान मीही अनेकांना ऐकवत असे. त्यावेळ पॅंथरची फूट या भूमिकेवर मला योग्य वाटत होती. बुद्धाची रक्तविहिन क्रांती आणि मार्क्सची रक्तरंजित क्रांती यात श्रेष्ठ काय? अर्थात बुद्धाची रक्तविहिन क्रांती! मग जे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या का असेनात कम्युनिस्टांशी संबंधित असतील, ज्यांच्या कविता-कथेत वा बोलण्यात वर्गीय भाषा येत असेल अशांपासून कमालीची सावधानता मी बाळगत असे. असे लोक अस्तनीतले निखारे असतात, हा माझा समज होता. नामदेवच्या या डावेपणामुळे त्याच्यापासून (व त्याच्या कवितांपासूनही) मी बराच काळ दूर राहिलो. 

आमच्या या फॅंटमच्या मोहजालात मी जवळपास १५ वर्षे होतो. कधीही नमस्ते म्हणायचे नाही. जयभीमच म्हणायचे. मग ते कोणीही असोत. वयाच्या १९ व्या वर्षी मी शिक्षक झालो. विद्यार्थ्यांना, सहकारी शिक्षकांना, ते कोणत्या का समाजाचे असेनात, जयभीमच घालायचा, हे माझे ठरले होते. शाळेत माझ्याकडे संस्थेची अधिकृत पत्रे लिहायचीही जबाबदारी यायची. त्यातही नावाच्या आधी आयुष्यमान आणि जयभीम असायचे. संस्थेची प्रमुख मंडळी समाजवादी होती, म्हणून बहुधा त्यांनी हे खपवून घेतलेले दिसते. मला कोणी असे करण्यापासून रोखले नाही. काही बोललेही नाही. त्यांच्या सहनशीलतेची तेव्हा मला कल्पना येणे शक्य नव्हते. पुरोगामी म्हणवणारे जोवर बौद्ध होत नाहीत, तोवर ते दांभिकच अशी माझी धारणा होती. 

राजाने स्वतः संघटित करण्याची जराही तमा न बाळगलेल्या ढालेपंथाचा मी असा कडवा शिपाई होतो. एकप्रकारे तो माझ्यातल्या असहिष्णुतेचाही नायक होता. पुढे मी बदललो. अतिरेकी पंथ सोडला. नामदेव, डावे यांच्याविषयीच्या भूमिका बदलल्या. कर्मठ, शुद्धिवादी बौद्ध राहिलो नाही. राजा ढालेंच्या विचारविश्वाशी संबंध राहिला नाही. 

तरीही राजा ढाले माझ्यासाठी कायम संदर्भ राहिला. पुढेही राहील. घडणीच्या कोवळ्या वयात जे अस्मितेचे पोषण त्याने केले आणि जी अस्मिता पुढच्या तमाम आयुष्यासाठी, अगदी त्याच्या विचाराच्या विरोधात जाण्यासाठीही उपयुक्त ठरली त्यासाठी, या माझ्या अस्मितेच्या आणि असहिष्णुतेच्या नायकाला-कालकथित राजा ढालेंना अखेरचा जयभीम! 

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

(१६ जुलै २०१९)

No comments: