राजकीय मतभिन्नतेमुळे नवरा आणि बायको वेगवेगळ्या राजकीय पक्षांत आहेत, हे आजही आपल्याला पचत नाही. व्यक्ती म्हणून पती-पत्नींची वेगळी स्वतंत्र मतं असू शकतात, हे तत्त्व म्हणून आपण भले मानत असू. पण ज्याअर्थी ही दोघं वेगळ्या पक्षांत आहेत, त्याअर्थी त्यांच्या वैवाहिक नात्यांत प्रश्न असावेत, अशी शंका आपल्या मनात डोकावत राहतेच. शिवाय नवऱ्याला त्याच्या सगळ्या निर्णयांत साथ करणं हे बायकोचं कर्तव्यच असल्यानं तो ज्या पक्षात आहे, त्यातच बायकोनं असलं पाहिजे हा पुरुषप्रधान संस्कृतीचा संस्कारही आपल्यावर असतो. ७० वर्षांपूर्वी राजकारणात महिलांचा एकूणच वावर अगदी मर्यादित असताना तर हे पचायला खूपच जड होतं.
१९५६ साली आचार्य जे. बी. कृपलानी आणि त्यांचे समाजवादी विचारांचे सहकारी काँग्रेसमधून बाहेर पडून किसान मजूर प्रजा पक्ष स्थापन करतात. आधी त्यांच्यासोबत काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या त्यांच्या पत्नी सुचेता कृपलानी काही काळानं पुन्हा काँग्रेसमध्ये जातात. त्यावरुन संसदेत तसेच बाहेर शेरेबाजी होई. एक मंत्री आचार्य कृपलानींना सभागृहात टोमणा मारतात – ‘अहो, खुद्द यांची बायको त्यांचं ऐकत नाही.’ त्यावर कृपलानी प्रत्युत्तर देतात – ‘आपण आधुनिकतेच्या बाता करतो. पण आपल्या मनात खोलवर जुनाट विचार दडलेले असतात आणि आपलं वर्तनही तसंच असतं. आता सार्वत्रिक प्रौढ मताधिकार मिळाला असताना बायकोनं नवऱ्याचंच अनुसरण करायला हवं या जुन्या मानसिकतेतनं आपण अजूनही बाहेर पडायला तयार नाही.’
पक्षातून बाहेर पडण्याआधी आचार्य कृपलानी काँग्रेसचे महासचिव असतात. सुचेता कृपलानी राजकीय काम करण्याचा निर्णय घेतात, त्यावेळी महासचिव म्हणून नवऱ्याच्या त्या सहाय्यक होऊ शकल्या असत्या. मात्र आचार्य कृपलानींनी तसं होऊ दिलं नाही. त्याचं कारण सांगताना ते म्हणतात – ‘या कामात ती तिची प्रतिभा पूर्णपणे वापरु शकली नसती. तिनं तिच्या पद्धतीनं स्वतःचं जीवन घडवावं, आपली वाढ करावी, अशी माझी इच्छा होती. आणि ती त्यासाठी सक्षम होती.’
अशी स्वतंत्र निर्णय घेण्याची क्षमता असलेली बायको आणि तिच्या निर्णयाला केवळ साथ नव्हे, तर असा निर्णय घेण्याची तिची क्षमता वाढायला संधी देणारा, त्यासाठी तिच्या बाजूनं ठाम उभा राहणारा नवरा याचं आजही आपल्याला अप्रूप वाटतं. काळाच्या पुढं वाटचाल करणारी ही स्वातंत्र्य चळवळीतली माणसं म्हणूनच आजही आपल्यासाठी दीपस्तंभ आहेत.
संविधानसभेतल्या महिला सदस्यांचा आपण परिचय करुन घेत आहोत. त्यातल्या एक सुचेता कृपलानी. आज त्यांची ओळख आपण करुन घेत आहोत.
हरयाणातल्या अंबाला येथे २५ जून १९०८ रोजी सुचेता कृपलानी यांचा जन्म झाला. वडील सुरेंद्रनाथ मजुमदार आणि आई प्रेमबाला. या दोहोंची कुटुंबं ब्राम्हो समाजाशी संबंधित होती. त्यामुळे सुचेताचं घरही ब्राम्हो समाजाच्या अनेक सामाजिक-सांस्कृतिक कार्यक्रमांचं केंद्र होतं. सुचेतासह एकूण नऊ भावंडं. त्यावेळच्या उत्तम गणल्या जाणाऱ्या शिक्षणसंस्थांत त्यांनी शिकावं यावर आईचा कटाक्ष होता. सुचेता आणि तिची बहीण सुलेखा आधी शिमल्याच्या लॉरेटो कॉन्व्हेंट मध्ये आणि नंतर अलाहाबादच्या निवासी शाळेत शिकल्या. त्यानंतर त्यांचं शिक्षण दिल्लीच्या क्वीन मेरी’ज स्कूल मध्ये झालं. या त्यांच्या शाळेत इंग्लंडचा राजपुत्र आठवा एडवर्ड येणार असतो. त्याच्या नियोजित आगमनापूर्वी काही महिने आधी जालियनवाला बाग हत्याकांड झालेलं असतं. भारतीयांच्या मनात त्याबद्दल संताप असतो. अशावेळी या राजपुत्राला मानवंदना देण्याची सुचेता आणि सुलेखाची तयारी नसते. त्या राजपुत्र यायच्या दिवशी गैरहजर राहतात.
जालियनवाला बाग हत्याकांडानंतर गांधीजी असहकार चळवळ सुरु करतात. सुचेताचा चुलत भाऊ धिरेन त्यावेळी बनारस हिंदू विद्यापीठात शिकत असतो. गांधीजींचे सहकारी आचार्य जे. बी. कृपलानी तिथं शिकवत असत. त्यांचा धिरेनवर प्रभाव होता. या धिरेनमार्फत गांधीजींचा विचार सुचेताच्या घरात पोहोचतो. दिल्लीला १९२४ साली या धिरेनमुळेच त्यांना गांधीजींचं दर्शन होतं. स्वातंत्र्य चळवळीत भाग घेण्याची ऊर्मी सुचेताच्या मनात जागी होते, तरी त्यात पडण्याआधी आपण आपला अभ्यास पूर्ण करु असा निर्णय ती घेते. शालांत परीक्षेत तिला सुवर्णपदक आणि शिष्यवृत्ती मिळते.
सुचेताचं कुटुंब लाहोरला स्थलांतरित होतं. तिथं ती महाविद्यालयीन शिक्षण घेते. याच काळात त्यांच्या कुटुंबावर दुःखाचे आघात होतात. बहीण सुलेखा हृदयरोगानं जाते आणि तिच्या जाण्यानं खचलेल्या वडिलांचं पुढच्या दोन वर्षांत निधन होतं. वडिलांच्या जाण्यानं कुटुंबाची आर्थिक स्थितीही ढासळते. पण आई या संकटात डगमगत नाही. मुलांचं शिक्षण काही करुन पूर्ण व्हायला हवं, हा तिचा निश्चय पक्का असतो. मुलांना घेऊन ती दिल्लीला येते. छोटं घर भाड्यानं घेतात. काटकसरीनं राहतात.
लाहोरला पदवीचं शिक्षण पूर्ण केलेली सुचेता इतिहासात पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी दिल्लीच्या सेंट स्टीफन’स कॉलेजमध्ये प्रवेश घेते. वर्गात ती एकटी मुलगी असते. बाकी सगळे मुलगे. टिंगल, अपमान तिच्या वाट्याला येतो. पण परीक्षेत ती अव्वल आल्यानंतर हा त्रास कमी कमी होत जातो. इथं ती दुसरं सुवर्ण पदक मिळवते. १९२७ साली सुचेताचं शिक्षण पूर्ण होतं आणि ती लाहोरला शिक्षिका म्हणून नोकरी करु लागते. ती लाहोरला असतानाच भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु यांना लाहोरच्या सेंट्रल जेलमध्ये फाशी दिलं जातं. लाहोरमधलं वातावरण पेटून उठतं. प्रचंड संख्येच्या मिरवणुकांनी लोक या क्रांतिकारकांच्या अंत्यविधीसाठी येतात. सुचेताच्या मनात स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेण्याची ऊर्मी पुन्हा उसळी घेऊ लागते. पण कुटुंबाची जबाबदारी आड येते. सुचेताला बनारस हिंदू विद्यापीठात प्राध्यापिकेची नोकरी लागते. त्यांच्या कुटुंबाला यामुळे आर्थिक स्थैर्य मिळतं. वर्षभरात कुटुंबातली मंडळीही तिच्यासोबत बनारसला राहायला येतात.
बनारसला सुचेताची आचार्य कृपलानींसोबत ओळख होते. त्यांच्या विचार आणि व्यक्तित्वाचा तिच्यावर प्रभाव पडतो. त्यांच्याशी तिची मैत्री होते. कृपलानी बनारसला आले की तिला भेटत असत. १९३४ च्या भूकंपाचा बिहारला मोठा फटका बसतो. कृपलानींसह अनेक काँग्रेस नेते मदतकार्यासाठी बिहारला येतात. कृपलानींच्या सूचनेनुसार सुचेता विद्यापीठातून रजा घेऊन बिहारला येते. दारिद्र्याचं आणि लोकांच्या अमानवी स्थितीचं तिला इथं दर्शन होतं. इथंच तिचा गांधीजींशीही जवळून संबंध येतो.
आचार्य कृपलानी आणि सुचेताची मैत्री अधिक घट्ट होत जाते. ही मैत्री त्यांना पुरेशी होती. मात्र त्या काळातील लोकांच्या दृष्टीनं अशा मैत्रीला मान्यता नव्हती. म्हणून कृपलानी सुचेताला लग्नासाठी मागणी घालतात. कृपलानींचं वय आणि गांधीवादी साधी राहणी यामुळे सुचेताच्या घरी हे नातं पसंत नव्हतं. तर कृपलानींच्या बहिणीचा या लग्नानं त्यांची प्रतिष्ठा कमी होईल, म्हणून विरोध होता. आश्चर्यकारक विरोध केला तो गांधीजींनी. या लग्नामुळे कृपलानी स्वातंत्र्य चळवळीच्या आपल्या ध्येयापासून विचलित होतील अशी त्यांना भीती वाटत होती.
अखेर सुचेता आणि आचार्य कृपलानी यांचं लग्न ब्राम्हो समाजाच्या पद्धतीनं होतं. एक छोटा स्वागत समारंभ विजयालक्ष्मी पंडित आयोजित करतात. तो अलाहाबादला नेहरु कुटुंबीयांच्या घरी आनंद भवनमध्ये होतो. या विवाहाची नोंदणी करताना जवाहरलाल नेहरु साक्षीदार म्हणून सही करतात. गांधीजी या जोडप्याला आशीर्वाद द्यायला नकार देऊन मी त्यांच्यासाठी फक्त प्रार्थना करेन असं सांगतात. मी या लग्नाला मान्यता देत नाही, असं गांधीजी सरोजिनी नायडूंची कन्या पद्मजा नायडू हिला सांगतात. त्यावर ती त्यांना म्हणते –‘तुमचा काय संबंध? हा त्या दोघांचा मामला आहे. ती दोघंही प्रौढ आहेत.’
यथावकाश सुचेता आणि गांधीजी यांचा समेट होतो. त्यांचं परस्परसहकार्य घट्ट होतं.
सुचेता आणि आचार्य कृपलानी यांचा संसार सुरु होतो. पण पारंपरिक अर्थानं नव्हे. तो मैत्रीच्या पातळीवरच राहतो. आधी एक वर्ष रजा आणि नंतर राजीनामा देऊन सुचेता अलाहाबादला कृपलानींच्याकडे येतात. ते स्वराज भवनमधून चळवळीचं काम करत असतात. तेच या जोडप्याचं घर होतं. स्वराज भवन हे संयुक्त प्रांतातल्या काँग्रेसच्या राजकारणाचं केंद्र असतं.
अलाहाबादला वॉर्ड पातळीवरची कार्यकर्ती म्हणून सुचेतांचं राजकीय काम सुरु होतं. काही काळानं त्या काँग्रेसच्या परराष्ट्र संबंध विभागाची जबाबदारी घेतात. मात्र नंतर या विभागाची जबाबदारी डॉ. राममनोहर लोहियांकडे सोपवली जाते. आज काँग्रेस पक्षात असलेल्या अखिल भारतीय महिला काँग्रेस या विभागाची स्थापना करण्याचं श्रेय सुचेता कृपलानींना जातं. सामाजिक बदलासाठी महिलांच्या राजकीय जाणिवा वाढवणं हे या विभागाचं उद्दिष्टं होतं. सविनय कायदेभंग, वैयक्तिक सत्याग्रह या स्वातंत्र्य चळवळीच्या सर्व लढ्यांत सुचेतांचा पुढाकार असतो. त्यासोबत तुरुंगवासही मिळतो. १९४२ च्या चले जाव चळवळीत सर्व प्रमुख नेत्यांना अटक होते. आचार्य कृपलानीही त्यात असतात. अटकेपासून सटकलेल्यांवर भूमिगत राहून चळवळीचं नेतृत्व करण्याची जबाबदारी येते. भूमिगत राहून रेडिओचं प्रसारण करणाऱ्या गटाचं व्यवस्थापन सुचेता करतात. उषा मेहतांवर रेडिओच्या प्रत्यक्ष प्रसारणाची जबाबदारी असते. रेडिओ प्रसारणाची सतत जागा बदलूनही अखेर उषा मेहतांना पकडलं जातं. चार वर्षांचा तुरुंगवास होतो. वेश बदलून ब्रिटिश पोलिसांना गुंगारा देण्यात सुचेताही फार काळ यशस्वी ठरत नाहीत. बिहारला त्यांना अटक होते. ‘धोकेदायक कैदी’ या श्रेणीत लखनौच्या तुरुंगात त्यांना ठेवलं जातं. १९४५ ला त्यांची सुटका होते.
१९४७ च्या एप्रिल महिन्यात त्या संविधानसभेवर संयुक्त प्रांतातून निवडून जातात. मात्र फाळणीमुळे विस्थापित झालेल्यांच्या पुनर्वसनात व्यग्र राहिल्यानं संविधानसभेच्या कामकाजात पुरेशी भागिदारी त्या करु शकल्या नाहीत. हिंदू कोड बिलाला मात्र त्यांनी जोरदार पाठिंबा दिला. एकरुप नागरी संहितेच्याही त्या समर्थक होत्या.
स्वातंत्र्य मिळाल्यावर १९५२ च्या पहिल्या लोकसभेची निवडणूक सुचेता कृपलानी किसान मजूर प्रजा पक्षातर्फे लढवतात. आचार्य कृपलानींसोबत त्या तेव्हा काँग्रेसमधून मतभेद होऊन बाहेर पडल्या होत्या. ही निवडणूक त्या जिंकतात. पुढे काही काळानं त्या पुन्हा काँग्रेसमध्ये परतात. काँग्रेसच्या महासचिव होतात. १९५७ च्या दुसऱ्या लोकसभेतही त्या निवडून येतात. मात्र नंतर उत्तर प्रदेशचं मंत्रिपद स्वीकारावं लागल्यानंतर त्या लोकसभेचा राजीनामा देतात. ज्येष्ठ नेत्यांनी मंत्रिपदं सोडून पक्षबांधणीत उतरावं या कामराज योजनेनुसार उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री सी. बी. गुप्ता यांनी राजीनामा दिल्यावर त्यांच्या जागी सुचेता कृपलानींना निवडलं जातं. देशातल्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्याचा मान सुचेता कृपलानींना जातो.
पुढच्या काळात त्यांची तब्येत खालावत जाते. पक्षातल्या प्रतिकूल घडामोडींचाही त्यांच्या मनावर परिणाम होतो. १ डिसेंबर १९७४ रोजी सुचेता कृपलानींचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन होतं. त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी त्यांचं रास्त वर्णन करतात – ‘दुर्मीळ धैर्य आणि चारित्र्य असलेली व्यक्ती. त्यांनी भारतीय स्त्रीत्वाचा गौरव वाढवला.’
- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com
________________
मुंबई आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरुन दर मंगळवारी स. ९ वा. प्रसारित होणाऱ्या ‘संविधान सभेतल्या शलाका’ या १६ भागांच्या मालिकेचा हा पंधरावा भाग ४ मार्च २०२५ रोजी प्रसारित झाला. त्याचे हे मूळ टिपण.
________________
No comments:
Post a Comment