भारतीय जनतेला परमआदरणीय असलेल्या महात्मा गांधींना त्यांच्या तोंडावर कोणी ‘मिकी माऊस’ म्हणत असेल, ही कल्पना तरी आपण करु शकतो का? हो, असं म्हणणारी एक व्यक्ती होती. आणि तिला मनमोकळं हसून गांधीजी प्रतिसादही देत असत. ती व्यक्ती म्हणजे सरोजिनी नायडू. सरोजिनी नायडू गांधीजींची इतरही बाबतीत मनमुराद चेष्टा करत. त्यांना विनोदी गोष्टी सांगत. गांधीजी त्यावर खळखळून हसत. चळवळीतले काही ताण मनावर असलेच तर त्यांचा निचरा होण्यात सरोजिनी नायडूंचे विनोद, गोष्टी कामी येत.
आपण शाळेत इतिहास शिकलो, त्यातून सरोजिनी नायडू वगैरे सगळ्या थोर माणसांच्या गंभीर प्रतिमाच आपल्या मनावर कोरल्या गेल्या आहेत. त्यांची थोरवी, त्यांच्या कामाचं गांभीर्य हे खरंच आहे. पण त्यापलीकडचं या माणसांचं मानवीपण सहसा आपल्याला ठाऊक नसतं. आपल्या आईशी लेक कसं वागेल, तसं सरोजिनी नायडूंचं गांधीजींशी वागणं होतं. गांधीजी आणि सरोजिनी नायडूंचं नातं गुरु-शिष्याचं होतं, एवढं सांगून भागत नाही. त्याला आई-लेकीच्या नात्याची उपमा दिली तरच त्यातलं मनीचं गुज व्यक्त करणारं मोकळं मैत्र ध्यानात येतं.
स्वातंत्र्य चळवळीतल्या विविध टप्प्यांवर कायम सोबत असलेली ही गुरु-शिष्येची जोडी आहे. दांडी यात्रेच्या छायाचित्रात गांधीजींबरोबर सरोजिनी नायडू दिसतात. डॉ. आंबेडकर आणि गांधीजींच्यात येरवड्याच्या तुरुंगात झालेल्या पुणे करारावेळी त्या गांधीजींच्या सोबत दिसतात. अनेक बैठकांत गांधीजींच्या आसपास त्या आढळतात.
गांधीजींनीही त्यांना एक नाव दिलं. पण ते विनोदी नव्हतं. सरोजिनी नायडूंचं रास्त वर्णन करणारं होतं. ते म्हणजे – नाईटिंगल ऑफ इंडिया. म्हणजेच भारताची कोकिळा किंवा भारत कोकिळा.
त्या गायिका या अर्थानं कोकिळा नव्हत्या. सरोजिनी नायडूंच्या कवितांतलं माधुर्य, अंतर्गत लय आणि त्यातला उन्नत आशय, मातृभूमीचं प्रेम यामुळे त्या ‘भारताची कोकिळा’ बनल्या.
१३ वर्षांच्या सरोजिनीनं १३०० ओळींची कविता लिहिली. प्रेरणा काय? तर डॉक्टरांनी तिला आजारी असल्यानं पूर्ण आराम कर. पुस्तकाला हात लावू नकोस, असं सांगितलं म्हणून. डॉक्टरांना धडा शिकवायला स्वतःला त्रास करुन तिनं ही प्रदीर्घ कविता लिहिली.
अशी ही बंडखोरी संविधानसभेतल्या महिलांचा स्थायीभावच दिसतो. वैयक्तिक नात्यांपासून सार्वजनिक जीवनापर्यंत सर्वत्र ती आढळते. सरोजिनी नायडू यांच्यात ज्येष्ठ. इतर महिलांपेक्षा ह्या अधिक प्रसिद्ध. संविधानसभेत त्या होत्या. पण त्यांची मुख्य ओळख स्वातंत्र्य चळवळीतल्या थोर नेत्या अशीच आहे. त्यांच्याविषयी आज आपण अधिक जाणून घेणार आहोत.
सरोजिनी नायडू यांचा जन्म १३ फेब्रुवारी १८७९ रोजी आजच्या तेलंगणा राज्यातल्या हैदराबाद येथे झाला. त्यांचं मूळ नाव सरोजिनी चट्टोपाध्याय. अघोरनाथ चट्टोपाध्याय हे नामांकित विद्वान त्यांचे वडील. ते त्यावेळी निजाम महाविद्यालयाचे प्राचार्य होते. सामाजिक सुधारणा आणि स्त्रियांच्या शिक्षणाचे ते पुरस्कर्ते होते. सरोजिनींच्या आई वरदा सुंदरी बंगाली गीतकार, गायिका आणि नर्तक होत्या.
सरोजिनी आणि तिच्या भावंडांना इंग्रजी आणि फ्रेंच भाषा शिकवायला घरी शिक्षिका यायच्या. नंतर सरोजिनीला मद्रासला म्हणजे आजच्या चेन्नईला शिक्षणासाठी पाठवण्यात आलं. मद्रास विद्यापीठाच्या मॅट्रिकच्या परीक्षेत सरोजिनी सर्वप्रथम आली. पुढची तीन वर्षं आजारपणामुळं हैद्राबादला आपल्या घरीच तिला राहावं लागलं. सुधारकांचं घर म्हणून या काळात अनेक लोकांची त्यांच्या घरी ये-जा होती. त्यांतच डॉ. गोविंदराजुलू नायडू या तरुणाशी तिची भेट झाली. इंग्लंडच्या एडिनबर्ग विद्यापीठातून तो नुकताच डॉक्टर होऊन आला होता. पुढच्या काही भेटींत आयुष्याचे जोडीदार व्हायचं सरोजिनी आणि या गोविंदराजुलूनं नक्की केलं. सरोजिनीचं घर सुधारकांचं असलं तरी या नात्याला घरच्यांचा विरोध होता. मुख्य कारण दोघांच्या जाती वेगळ्या होत्या. पण सरोजिनी निर्णयाला ठाम होती. याच दरम्यान सरोजिनीनं लिहिलेल्या एका पर्शियन नाटकावर खुश होऊन हैद्राबादच्या निजामानं परदेशी शिक्षणासाठी तिला शिष्यवृत्ती दिली. परदेशी जाण्याची सरोजिनीची तयारी नव्हती. मात्र काही करुन तिला बाहेर पाठवण्यात घरच्यांच्या मनात दोन उद्देश होते. एक म्हणजे, तिचे उच्च शिक्षण होईल. आणि दुसरे म्हणजे त्यामुळे ती गोविंदराजुलूपासून दूर होईल.
नाराजीनंच सरोजिनी इंग्लंडला जाते. तिथं किंग्ज कॉलेज, लंडन आणि नंतर गर्टन कॉलेज, केंब्रिज या जागतिक दर्जाच्या शिक्षणसंस्थांत ती शिकते. पण परीक्षा न देताच भारतात परतते. पदवी नसली तरी हा अनुभव तिला व्यापक जगाचं भान येण्यास उपयुक्त ठरला. तिच्या कवितेला अधिक परिपक्वता यायला मदत झाली. इंग्लंडमध्ये भेटलेल्या कवी आणि समीक्षक एडमंड गोसे यांनी तिच्या कवितेत ‘वैयक्तिकतेचा अभाव’ असल्याची परखड टीका करुन तिला सल्ला दिला – ‘तुझ्या देशासंबंधीच्या तुझ्या अस्सल दृष्टीतून पुन्हा सुरुवात कर.’ यानंतर सरोजिनीच्या कवितांचा बाजच बदलला. तिनं तिचा पहिला कवितासंग्रह ‘द गोल्डन थ्रेशहोल्ड’ गोसे या आपल्या टीकाकारालाच अर्पण केला.
१८९८ ला भारतात परतल्यावर ती आणि गोविंदराजुलू ‘विशेष विवाह कायदा १८७२’ खाली लग्न करतात. गंमत म्हणजे यांच्या लग्नाला पाठिंबा नसलेल्या तिच्या वडिलांनीच हैद्राबादमध्ये हा कायदा लागू व्हावा म्हणून प्रयत्न केले होते.
कवयित्री म्हणून सरोजिनी नायडूंची ख्याती वाढली होती. कवितेसोबतच त्यांनी सामाजिक कामाला आरंभ केला. देशभरच्या विविध चर्चागटांत त्या भाग घ्यायला लागल्या. त्यांच्या स्वतःच्या भूमिका, मते तयार होऊ लागली. महिलांचं उत्थान हा त्यांच्या कामाचा प्रमुख भाग झाला. महिलांच्या मेळाव्यांत त्या बोलू लागल्या. ‘एकटेपणातनं बाहेर पडा. काम करा. स्वतःचं जीवन घडवा’ असं त्यांना आवाहन करु लागल्या. १९०३ साली मद्रासमधल्या एका महाविद्यालयात व्याख्यान देताना त्यांनी विद्यार्थ्यांना प्रदेश, धर्म आणि राष्ट्रीयता यांच्या संकुचित सीमेच्या पार जाण्याचं आवाहन केलं. केवळ आपल्यापुरतं पाहण्यानं, केवळ आपल्या देशाचं हित पाहण्यानं आपण आहोत तिथंच थांबू. सबंध जगाच्या उद्धाराचा ध्यास घेण्यानंच आपल्या राष्ट्राचा आणि आपलाही विकास होणार आहे. आम्ही भारतीय आहोत यावरच न थांबता आपण जगाचे नागरिक आहोत, ही उन्नत भावना आपल्या मनात जागवली पाहिजे, ही सरोजिनी नायडूंच्या मांडणीची सूत्रं होती. रवींद्रनाथ टागोरांनी संकुचित राष्ट्रवादावर आपल्या साहित्यातून कोरडे ओढले होते. आपला राष्ट्राभिमान दुसऱ्या राष्ट्राच्या निंदेवर आधारलेला असता कामा नये, अशी भूमिका टागोरांच्या एका कादंबरीतला नायक मांडतो. त्याच्याशी सरोजिनी नायडू यांचं साधर्म्य जाणवतं.
सरोजिनी नायडू भारतमातेबद्दल भरभरुन बोलल्या आहेत. कवितेतनं तसंच भाषणातनं. त्यांचं मातृभूमीवरचं प्रेम यत्किंचितही कमी नाही. मात्र हे प्रेम जगातल्या सगळ्या देशांवर, सबंध मानवजातीवर प्रेम करण्याच्या आड येत नाही. हिंदू-मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून त्या जिनांकडं पाहत होत्या. जिना त्यांचे स्वातंत्र्य चळवळीतले मित्र होते. मात्र नंतर जिनांची भूमिका बदलते. फाळणीचा आग्रह धरुन भारत-पाक दोन देश घडवण्यात ते यशस्वी होतात. जिनांविषयीच्या या भ्रमनिरासानं आणि मातृभूमीचे असे तुकडे पडल्यानं सरोजिनी नायडू खूप व्यथित होतात. तरीही या दोन देशांतल्या जनतेच्या सुखाची एकसारखीच कामना करतात.
१९०६ साली भारतीय सामाजिक परिषदेत सरोजिनी नायडूंचं व्याख्यान होतं. तिथं त्यांची गोपाळ कृष्ण गोखलेंशी भेट होते. त्यांच्या बऱ्याच चर्चा होतात. त्यानंतर गोखले सरोजिनींची गांधीजींशी भेट घालून देतात. पुढे गांधीजी आणि सरोजिनींचं एकत्रित काम सुरु होतं. ते शेवटपर्यंत. १९२५ मध्ये कानपूर येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या ४० व्या अधिवेशनाचं त्यांना अध्यक्ष बनवलं जातं. राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचं अध्यक्षपद भूषविणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला होत्या.
असहकार चळवळ, होमरूल आंदोलन, मिठाचा सत्याग्रह अशा अनेक आंदोलनांत सरोजिनी नायडूंनी भाग घेतला. यात त्यांना ५ वेळा तुरुंगवास झाला. अॅनी बेझंट आणि इतरांसोबत त्यांनी भारतीय महिला संघाची स्थापना केली. संविधानसभेतल्या तसेच राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चळवळीतल्या इतरही अनेक महिलांना जोडण्याचं काम सरोजिनी नायडू यांनी केलं. गांधीजींप्रमाणेच नवे लोक जोडणं आणि त्यांना चळवळीत क्रियाशील करणं यात त्यांना गती होती.
स्त्रियांच्या मताधिकाराचा मुद्दा त्यांनी सतत लावून धरला. स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीचं स्थान सर्वत्र असायला हवं, याबद्दल त्या आग्रही असत. १९१८ च्या काँग्रेसच्या विजापूर अधिवेशनात त्या आपल्या भाषणात म्हणतात – ‘नागरिकत्वाच्या अधिकारांची चर्चा करताना Man (म्हणजे पुरुष) शब्दासोबत woman (म्हणजे स्त्रिया) हा शब्द असायलाच हवा.’ याच वर्षी मुंबई काँग्रेसच्या अधिवेशनात त्या एक ठराव संमत करुन घेतात. ‘पुरुषांसाठी निश्चित केलेली सर्व तऱ्हेची पात्रता ज्या स्त्रियांच्यात असेल, त्यांना केवळ लैंगिक कारणानं (म्हणजे त्या स्त्रिया आहेत म्हणून) अपात्र ठरवता कामा नये.’ – असा तो ठराव असतो. तो संमत झाल्यावर अन्य प्रांतांतल्या काँग्रेस संघटनांतही त्याचं अनुकरण केलं जातं.
विनाचौकशी तुरुंगात टाकणाऱ्या १९१९ च्या रौलेट कायद्याविरोधात गांधीजी सत्याग्रहाची हाक देतात. आंदोलनाचा हा प्रकार सनदशीर नाही, असं एक मत व्यक्त होतं. त्यावेळी सरोजिनी नायडू जुलुमी कायदे करणाऱ्या सरकारशी लढण्याच्या सत्याग्रह या अस्त्राची बाजू लोकांना नीट समजावून सांगतात. जालियनावाला बाग हत्याकांडाविरोधात त्या ब्रिटिश संसदेत जाऊन ब्रिटिश सरकारचे वाभाडे काढतात. या हत्याकांडाच्या निषेधार्थ सरकारनं दिलेला नाईटहूड किताब टागोर परत करतात. गांधीजी आणि सरोजिनी नायडूही आपले पुरस्कार परत करतात. सरोजिनी नायडू यांनी परत केलेला कैसर-ए-हिंद हा पुरस्कार हैद्राबाद पूरप्रसंगी केलेल्या मदतकार्यासाठी १९०८ साली त्यांना मिळाला होता.
चळवळीच्या कामानिमित्त सरोजिनी नायडूंना बराच काळ घराबाहेर राहावं लागे. त्यांच्या या कामाला त्यांचे पती गोविंदराजुलू यांची पूर्ण साथ होती. तरीही प्रश्न उठायचे. त्या अशांना म्हणत – ‘माझं घर, माझा नवरा आणि माझी मुलं यांची मला पूर्वी होती तेवढीच काळजी आता आहे. माझं सार्वजनिक कार्य या काळजीच्या आड येत नाही, हे त्यांना ठाऊक आहे. ते आणि मी आमच्यात रस दाखवणाऱ्या तुम्हा मंडळींचे आभारी आहोत.’
१९४६ साली सरोजिनी नायडूंची संविधानसभेवर बिहार प्रांतातून निवड होते. फाळणी, राष्ट्रध्वज तसेच इतरही महत्वाच्या मुद्द्यांवरील चर्चेत त्या भाग घेतात. मात्र थोड्याच काळात त्यांची उत्तर प्रदेशच्या राज्यपालपदी नेमणूक होते. हे पद स्वीकारायला त्या प्रारंभी राजी नसतात. कर्तव्यापोटी अखेर त्या ते स्वीकारतात. त्यांचे त्यावेळचे उद्गार आहेत – ‘तुम्ही जंगली पक्षाला पिंजऱ्यात बंद करत आहात.’
सरोजिनी नायडूंचं २ मार्च १९४९ रोजी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन होतं. ज्या स्वातंत्र्यासाठी त्या लढल्या, ते स्वातंत्र्य त्यांनी पाहिलं. मात्र स्वतंत्र देशाचं संविधान पूर्ण होण्याआधीच त्या हे जग सोडतात. सरोजिनी नायडूंसारख्यांच्या विचार आणि कृतीनंच संविधानाची पायाभूत मूल्यं रचली गेली याबद्दल भारतीय नागरिक म्हणून आपण कायम त्यांचे ऋणी राहू.
- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com
_________________
मुंबई आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरुन दर मंगळवारी स. ९ वा. प्रसारित होणाऱ्या ‘संविधान सभेतल्या शलाका’ या १६ भागांच्या मालिकेचा हा चौदावा भाग २५ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रसारित झाला. त्याचे हे मूळ टिपण.
No comments:
Post a Comment