Thursday, February 22, 2018

सामाजिक न्याय, आरक्षण व आजचे संदर्भ


जात-धर्मांच्या अस्मितांचे संघर्ष हा जुनाच मुद्दा असला तरी आज त्यांचे धुमसणे चिंता वाढवणारे आहे. एकीकडे प्रचलित आरक्षणाबद्दल अनेक गैरसमज व आकस असतानाच मराठा, जाट, पटेल या मध्यम जातींनी आरक्षणाच्या मागणीने सरकारला जेरबंद केले आहे. दलित, आदिवासी व ओबीसी हे आरक्षणप्राप्त घटक त्यामुळे अस्वस्थ झाले आहेत. ओबीसींना तर आपल्यातलाच वाटा हे घेणार नाहीत ना, अशी साधार भीती वाटू लागली आहे. आरक्षित जागा प्रत्यक्षात किती आहेत, त्यांचा लाभ आज आरक्षणास पात्र विभागांना कितपत मिळतो आहे, नवे आरक्षण आल्यास त्याचा नक्की फायदा कसा होणार आहे, याबद्दल आरक्षण मागणारे विभाग फारसा विचार करताना दिसत नाहीत. त्यांच्या प्रश्नांची खरी उत्तरे ज्या व्यवस्थेत व सरकारी धोरणांत दडलेली आहेत, ती शोधण्याचा प्रयास न करता भलतीच भुई धोपटली जाते आहे. जातीचे जुने आधार वेगाने नष्ट होताना विषमतेच्या दऱ्या रुंदावणाऱ्या विकासक्रमाचा भुलभुलैया व राजकीय हितसंबंध जातींचे वाळू घातलेले तण टवटवीत करत आहेत. हा दिशाहिन गोंधळ व यादवी अजून कोणत्या थराला जाणार हे आज सांगता येणे कठीण आहे. या दिशाहिन माहोलाला आपण विवेकशील मंडळी पूर्ण सुरळीत करु शकतो असा दावा करणेही मुश्किल आहे. पण या गोंधळातले काही गुंते सोडवण्याचा, किमान त्यासाठीचा संवाद करण्याचा प्रयत्न आपण नक्की करु शकतो. आरक्षणाबाबतची खालील चर्चा ही त्या दिशेने केलेली एक खटपट आहे. सामान्य लोक डोळ्यांसमोर धरुन केलेली ही परिचयात्मक चर्चा आहे. 

आरक्षणाचा संबंध आपल्या संविधानातील ‘सामाजिक न्याय’ या उद्देशिकेतील संकल्पनेशी येतो. आपण आपल्या नागरिकांना ज्या बाबी देण्याचा संकल्प केला त्यातील एक आहे सामाजिक न्याय. हजारो वर्षे ज्या समाजविभागांना रुढींच्या-धर्माच्या नावाखाली समान दर्जा व संधीपासून, माणूसपणापासून व परिणामी विकासापासून वंचित ठेवले त्या समाजविभागांना आपण घटनेद्वारे न्याय देण्याची घोषणा केली आहे. 

हे सामाजिकदृष्ट्या पीडित-वंचित विभाग कोणते? 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्याला आज हिंदू म्हणून ओळखले जाते, तथापि, जे भारतीय उपखंडाचेच वैशिष्ट्य आहे त्या वर्ण-जातिव्यस्थेचे वर्णन करताना दोन रुपके वापरली आहेत. एक जिना नसलेल्या इमारतीचे व दुसरे मडक्यांच्या उतरंडीचे. त्यांच्या मते आपली जातिव्यवस्था ही जिना नसलेली इमारत आहे. एका जातीचा माणूस त्याची कितीही इच्छा असली तरी दुसऱ्या जातीचा होऊ शकत नाही. ना तो तथाकथित खालच्या जातीत जाऊ शकत, ना तो त्याच्या वरच्या जातीत जाऊ शकत. ज्या मजल्यावर (म्हणजे जातीत) तो जन्माला आला त्या जातीतच त्याला आजन्म राहाणे भाग असते. या जाती भले कधीकाळी व्यवसायावरुन पडल्या असतील. तथापि, पुढे माणसांना हवा तो व्यवसाय स्वीकारण्याची व त्याप्रमाणे जात बदलण्याची मुभा राहिली नाही. बाबासाहेब ही स्थिती अगदी योग्य प्रकारे शब्दबद्ध करतात. ते म्हणतात- ‘जात ही श्रमाची नव्हे, तर श्रमिकांची विभागणी आहे.’ 

बाबासाहेब दुसरे रुपक योजतात मडक्यांच्या उतरंडीचे. या मडक्यांच्या उतरंडीत ब्राम्हण, क्षत्रिय. वैश्य, शूद्र असे थर आहेत. या प्रत्येक थरात दोन थर आहेत. एक पुरुषाचा व दुसरा स्त्रीचा. सर्व थरांत स्त्रीचे स्थान पुरुषाच्या खाली आहे. सर्व जातींनी स्त्रीला दुय्यम ठरविले आहे. ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र या चार वर्णांतील लोकांना ‘सवर्ण’ म्हणतात. कारण त्यांना वर्ण आहे. दलित, आदिवासी, भटके हे विभाग ‘अवर्ण’ आहेत. कारण त्यांना वर्ण नाही. सवर्ण हे गावात राहतात. तर अवर्ण हे गावाच्या बाहेर. यापैकी दलित हे अस्पृश्य म्हणजे ज्यांना स्पर्श करायचा नसतो असे. तर सवर्णांना परस्परांचा स्पर्श चालतो. सवर्णांतल्या चार वर्णांतही दोन भाग आहेत. पहिल्या तीन वर्णांना (ब्राम्हण, क्षत्रिय व वैश्य) शिक्षणाचा अधिकार तर शूद्र या चौथ्या वर्णाला तो अधिकार नाही. पहिल्या त्रैवर्णिकांतील स्त्रियांनाही तो नाही. त्रैवर्णिकांतल्या स्त्रिया या त्या अर्थाने शूद्रात मोडतात. काय रुढी आहे पहा. ब्राम्हण स्त्रीच्या उदरातून जन्माला आलेला मुलगा ब्राम्हण, तर त्याच उदरातून जन्माला आलेली मुलगी मात्र शूद्र. खुद्द ब्राम्हणाला जन्म घालणारी माताही शूद्रच. मनुवादी व्यवस्था म्हणतात ती ही. 

मनूने संस्कृत ऐकले तर, उच्चारले तर ज्या शिक्षा सांगितल्या आहेत, त्या शूद्रांना. म्हणजे आजच्या ओबीसी जातींना. अनेकदा ओबीसींना वाटते मनुस्मृती बाबासाहेब आंबेडकरांनी जाळली म्हणजे तिचा संबंध फक्त दलितांशी असेल. त्यांचा हा गैरसमज आहे. महात्मा फुले अस्पृश्यांना अतिशूद्र म्हणतात. धर्मरुढींची खास सवलत, राखीव लाभ असलेल्या त्रैवर्णिकांपासूनचा वेगळेपणा अधोरेखित करताना व धर्मानेच या लाभांपासून वंचित ठेवलेले शूद्र तसेच अतिशूद्र यांचा हितसंबंध एकत्रित करताना महात्मा फुले त्यांना शूद्रातिशूद्र असे म्हणतात. सामाजिक सुधारकांकडून स्त्रिया, शूद्र, अतिशूद्र, आदिवासी, भटके, विमुक्त जाती असे जे रांगेत बोलले जाते ते विभाग म्हणजे हजारो वर्षे साधन-संपत्ती, सामाजिक-सांस्कृतिक अधिकार व मानवी प्रतिष्ठा यांपासून धर्माच्या नावानेच जाणीवपूर्वक वेगळे, वंचित ठेवले गेलेले लोक. त्यांच्या आजच्या अवस्थेला ते स्वतः नव्हे तर हा दुजाभाव करणारी संस्कृती, समाजव्यवस्था जबाबदार आहे. म्हणजेच ज्या जातींना साधन-संपत्ती व प्रतिष्ठा मिळाली त्यालाही हा व्यवस्थेचा दुजाभावच कारण आहे. साहजिकच मागास, दुबळ्या जाती व स्त्रिया यांना विकासात हिस्सा व न्याय द्यायचा तर ही व्यवस्थाच बदलणे गरजेचे आहे. त्या विभागांतील व्यक्तींच्या वैयक्तिक प्रयत्नांवर सोडून चालणार नाही. समाजातील त्यांच्याप्रतीचा मानसिक दुजाभाव लक्षात घेता त्यांच्यासाठी काही खास सवलती, राखीव लाभांची व्यवस्था करावी लागणार. यालाच सामाजिक न्याय म्हणतात. 

राखीव जागांबाबतची भूमिका व प्रयत्नांचा इतिहास 

या सामाजिक न्यायाबद्दल, राखीव जागांबाबतच्या भूमिकेबद्दल पहिली मांडणी केली ती महात्मा जोतिराव फुले यांनी. ते आपल्या अखंडात म्हणतात- 

‘मानव सारिखे निर्मिके निर्मिले| कमी नाही केले कोणी एक| 

कमी जास्ती बुद्धी मानवा वोपिली| कोणा नाही दिली पिढीजादा|’ 

मानवाच्या बुद्धीत फरक असू शकतो. पण वंशपरंपरेने विशिष्ट घराण्याला, जातीला बुद्धीचा मक्ता दिलेला नाही. तसेच मानव म्हणून सर्वांची प्रतिष्ठा, दर्जा एक आहे असे महात्मा फुले बजावतात. ज्या व्यवस्थेने हा दर्जा कमीजादा केला त्या व्यवस्थेला बदलण्याचा ते मार्ग सांगतात. तो असा- 

‘जातजातीच्या संख्याप्रमाण कामें नेमा ती| खरी ही न्यायाची रिति| 

नेमा गुरु अन्य जातीचे| नमुने सात्विक ज्ञानाचे| 

निवळ माळ्या कुणब्याचे|दुसरे महारमांगांचे|’ 

आजही उच्चवर्णीयांचे वर्चस्व अनेक क्षेत्रांत आहे. पण महात्मा फुलेंच्या काळात ते शतप्रतिशत होते. सर्व अधिकारपदे, वृत्तपत्रे, सरकारी नोकऱ्या, शिक्षक सगळीकडे मुख्यतः ब्राम्हण. अन्य जातींचे कुठे अस्तित्वच नाही. म्हणून जातीच्या संख्येप्रमाणे कामे नेमा, तीच न्यायाची खरी रीत आहे, असे जोतिराव सांगतात. एकजातीय तेही पांढरपेशा ब्राम्हण शिक्षकांकडून मिळणारे ज्ञान हे पढिकच असणार. त्याला प्रत्यक्ष कामातील अनुभवाचा व कौशल्याचा आधार काय? यासाठी जे प्रत्यक्ष काम करणारे विभाग, जाती आहेत, त्यांतून गुरु नेमा. त्यांचे तेज काही वेगळेच असेल असे फुले नोंदवतात. आधुनिक शिक्षणशास्त्राचे मर्मच तर ते इथे सांगतात. 

महात्मा फुले राखीव जागांचा वैचारिक आधार तयार करतात. पण त्या प्रत्यक्षात आणायला ते काही राज्यकर्ते नव्हते. ते काम एका राजाने केले. तो राजा छ. शाहू महाराज. महात्मा फुल्यांचा वैचारिक वारसदार असलेल्या या राजाने आपल्या संस्थानात २६ जुलै १९०२ रोजी राखीव जागांची अंमलबजावणी केली. ५० टक्के जागा ब्राम्हण, प्रभू व शेणवी या उच्च जाती वगळून इतरांसाठी ठेवल्या. पुढे त्यांचे प्रमाण वाढवले. याचबरोबर दलित, बहुजनांच्या विकासासाठी वसतिगृहे आदि अनेक उपक्रम त्यांनी राबवले. 

इंग्रजांनी एतद्देशीय चळवळींच्या परिणामी तसेच त्यांच्या राजकीय हितसंबंधांचा भाग म्हणून अनेक प्रांतांत विविध प्रकारे स्वतंत्र तसेच राखीव राजकीय प्रतिनिधीत्वाची पद्धत सुरु केली. ज्यांनी राज्यघटनेत या तरतुदींना पक्केपणाने स्थापित केले त्या घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यात स्वातंत्र्यपूर्वकाळात १९३२ साली झालेला पुणे करार हा राजकीय राखीव जागांच्या इतिहासातला एक महत्वाचा टप्पा आहे. 

स्वतंत्र भारतातील राखीव जागांच्या तरतुदी 

धर्म व संस्कृती यांमुळे ज्यांच्या वाट्याला कमीअधिक तीव्रतेचा मागासपणा आला त्यातील प्रमुख विभाग दलित, आदिवासी व ओबीसी असले तरी संविधानाची रचना चालू असताना राखीव जागा मिळाल्या त्या दलित व आदिवासी या घटकांना. याचे एक कारण म्हणजे या दोन विभागांच्या मागासपणाबद्दल कोणतेही दुमत नव्हते. त्यांच्यासाठी विशेष तरतुदी करण्यासाठीची सहमतीही होती. शिवाय दलित व आदिवासींत कोणत्या जाती वा जमाती येतात याच्या याद्या इंग्रजांच्या काळातच (१९३५ साली) तयार झालेल्या होत्या. अस्पृश्य जातींच्या यादीतील जातींना ‘अनुसूचित जाती’ व आदिवासी जमातींच्या यादीतील जमातींना ‘अनुसूचित जमाती’ असे तांत्रिक संबोधन आहे. या दोन्ही घटकांना त्यांच्या संख्येच्या टक्केवारीप्रमाणे नोकरी, शिक्षण व राजकीय प्रतिनिधीत्वात राखीव जागा देण्यात आल्या. आज केंद्रात या राखीव जागा अनुसूचित जातींना (म्हणजे दलितांना) १५ टक्के व अनुसूचित जमातींना (म्हणजे आदिवासींना) ७.५ टक्के आहेत. राज्यांमध्ये त्या राज्यांतील त्यांच्या लोकसंख्येच्या टक्केवारीप्रमाणे आहेत. त्यामुळे ते आकडे वेगवेगळे आहेत. 

ओबीसी म्हणजे अन्य मागासवर्गीयांचे काय? 

शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या विभागांच्या विकासासाठीच्या शिफारशी करण्यासाठी आयोग नेमण्याची तरतूद कलम ३४० नुसार घटनेत करण्यात आली. त्याप्रमाणे पहिला आयोग १९५३ साली काकासाहेब कालेलकरांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आला. या आयोगाने केलेल्या शिफारशींच्या विरोधी मत खुद्द अध्यक्षांनीच अहवाल सादर करताना दिल्याने त्याची कोणतीही अंमलबजावणी झाली नाही. देश स्वतंत्र होऊन जेमतेम ६ वर्षे झाली होती. धार्मिक आधारावर देशाची फाळणी झाली होती. तो तणाव अजून विरलेला नव्हता. अशावेळी अन्य मागासवर्गीयांसाठी विशेष तरतुदी करण्याने त्यात जातीय ताणाची भर पडेल असे भय तत्कालीन सरकारला वाटत होते. दलित-आदिवासींबाबत जशी सहमती होती. तशी या मुद्द्यावर नव्हती. शिवाय हा विभाग दलित-आदिवासींइतका मागास म्हणजे बहिष्कृत नव्हता. तो सवर्ण होता. त्यांच्या विकासासाठी स्वतंत्र पावले उचलण्याऐवजी एकूण राष्ट्रउभारणीच्या क्रमात जी विकासाची पावले गरिबांना केंद्रवर्ती ठेवून घेतली जातील त्यात त्यांचाही विकास होईल अशी राज्यकर्त्यांची भावना होती. त्यामुळे हा अहवाल बासनात गुंडाळला गेला. त्यानंतर दीर्घ काळाने १९७८ ला मंडल आयोग नेमण्यात आला. या अहवालातील राखीव जागांच्या शिफारशी १९९० साली व्ही. पी. सिंगांच्या नेतृत्वाखालील सरकारने स्वीकारल्या. त्याविरोधात आंदोलने झाली. जातीय ताण तयार झाला. अखेर १९९३ पासून ओबीसींच्या राखीव जागांची अंमलबजावणी सुरु झाली. 

ओबीसींच्या राखीव जागांसाठी ज्या अडचणी होत्या त्यात कोणत्या जाती यात मोडतात हे कसे ठरवायचे ही एक प्रमुख अडचण होती. नियमित होणाऱ्या जनगणनेत अनुसूचित जाती व जमातींची संख्या नोंदवली जाते. तथापि, अन्य जातींची नोंद होत नाही. आपल्या देशातील जातींची शेवटची गणना १९३१ साली इंग्रजांच्या काळात झाली होती. या जुन्या गणनेचाच आधार मंडल आयोगाला घ्यावा लागला. खूप मागणीनंतर २०११ साली स्वतंत्र भारतात प्रथम जातींची गणना करण्यात आली. ‘सामाजिक, आर्थिक व जातींची गणना’ असे तिला म्हटले गेले. प्रत्येक जातीची सामाजिक-आर्थिक प्रगतीची अन्य जातींशी तुलनात्मक अवस्था त्यातून कळणार आहे. त्याचे विश्लेषण अजून अधिकृतपणे बाहेर आलेले नाही. म्हणजेच, आज ज्या ओबीसींना राखीव जागा मिळत आहेत, त्यांचा आधार १९३१ इतका जुना आहे. नवा आधार मिळाल्यावर जुन्या यादीतील कोणत्या जाती पुढे गेल्या, कोणत्या अजून मागे आहेत हे समजू शकेल. परंतु, त्यामुळे नव्या वादाला सामोरे जावे लागेल. ज्या जातींचा विकास झाला असेल, त्यांना राखीव जागांतून बाहेर पडावे लागेल. हे फक्त ओबीसींपुरते न राहता दलित-आदिवासींतील काही जातींबाबतही हा प्रश्न उभा राहू शकतो. निवडणुकांतले जातींचे महत्व लक्षात घेता बाहेर निघणाऱ्या जातींचा रोष ओढवून घ्यायची तयारी सरकारची तसेच विरोधकांचीही आहे का हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे जातीच्या गणनेचे आकडे जाहीर न होणे हे बहुधा सर्वच प्रस्थापित पक्षांना सोयीचे आहे. 

ओबीसींच्या राखीव जागांना क्रिमी लेयरची अट आहे. दलित-आदिवासींना ती नाही. आज ओबीसींना मिळालेल्या राखीव जागा शिक्षण व नोकरीत सरसकट आहेत. तथापि, राजकीय प्रतिनिधीत्वातील राखीव जागा दलित-आदिवासींप्रमाणे सर्व स्तरांवर नाहीत. त्या फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांत आहेत. लोकसभा व विधानसभांत नाहीत. शिवाय त्या त्यांच्या संख्येच्या टक्केवारीप्रमाणे नाहीत. मंडल आयोगाने ओबीसींची लोकसंख्या ५२ टक्के धरली होती. परंतु, घटनात्मक तरतुदींचा अर्थ लावताना तसेच बाबासाहेबांच्या घटनाकार म्हणून संविधान सभेतील भाषणाला अधोरेखित करुन सर्वोच्च न्यायालयाने एकूण राखीव जागा ५० टक्क्यांपेक्षा अधिक असता कामा नये असा निर्वाळा दिल्याने ओबीसींच्या वाट्याला २७ टक्केच राखीव जागा आल्या. दलितांच्या १५ टक्के + आदिवासींच्या ७.५ टक्के + ओबीसींच्या २७ टक्के = ४९.५ टक्के. अशारीतीने ५० टक्क्यांच्या आत राखीव जागांचे गणित बसवण्यात आले. काही राज्यांत आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडली गेली आहे. ज्या राज्यातील अनु. जाती व जमातींची लोकसंख्याच जास्त आहे, त्यांना न्यायालयाने याबाबत सूट दिली आहे. तर काही राज्यांचे खटले न्यायालयात चालू आहेत. 

मराठा, जाट, पटेलांचे काय? 

महाराष्ट्रात मराठा, हरियाणात जाट व गुजरातमध्ये पटेल या मध्यम जातीगटातल्या, राजकीय ताकद असलेल्या जाती आहेत. शेती तसेच अन्य व्यवसाय व साधनसंपदा असलेले हे विभाग आहेत. एकेकाळी व आजही त्यातले बरेच लोक दलित-आदिवासी व ओबीसींच्या आरक्षणाच्या विरोधात बोलणारे व उभे राहणारे आहेत. ही मंडळी आरक्षण का मागू लागली आहेत? 

एकूण सर्वच विभागांच्या आकांक्षा वाढत आहेत. या वाढत्या आकांक्षांची पूर्तता मात्र सर्वांच्या वाट्याला समान येत नाही. मराठा असो की जाट की पटेल या तिन्ही जातींत-खरं म्हणजे सर्वच जातींत वेगाने स्तरीकरण होते आहे. म्हणजे एका जातीतले लोक सर्वसाधारणपणे एका आर्थिक गटातले असे आता नाही. त्यांच्यात अति सधन, सधन, मध्यम, कनिष्ठ व गरीब असे अनेक स्तर पडले आहेत. शेतीच्या अरिष्टाने शेतीवरच अवलंबून असलेल्यांची अवस्था अधिकच बिकट झाली आहे. जमिनीचे पिढीगणिक तुकडे पडून त्यातील अनेक अल्पभूधारक होत आहेत. शिक्षणाचे बाजारीकरण झाल्याने ते महागले आहे. त्यामुळे अनेक पालक कर्जबाजारी होऊन मुलांना शिकवत आहेत. तर अनेकांना तेही शक्य नसल्याने शिक्षण सोडत आहेत. सरकारी नोकऱ्या प्रचंड कमी झाल्या आहेत. त्याचवेळी जुनी सरंजामी मिजास मात्र त्या प्रमाणात कमी झालेली नाही. राखीव जागा व सवलतींचा लाभ घेऊन पुढे गेलेल्या त्याच गावातील दलित कुटुंबांची आर्थिक स्थिती सुधारताना दिसते. तसेच पूर्वीप्रमाणे दबून न राहता ताठ मानेने वावरतात हेही दिसते. त्यातल्याच काहींच्या या वरिष्ठ जातींतल्या मुली प्रेमात पडतात व खूप विरोधानंतरही त्यातल्या काहींची आंतरजातीय लग्नेही होताना दिसतात. दलितांत जे स्तर पडले आहेत, त्यातील वरच्या स्तराकडेच व आत्मबल आलेल्या कुटुंबांकडेच ही वरिष्ठ जातीची मंडळी पाहतात. जणू सर्वच दलित आमच्या पुढे गेले आहेत व त्याला कारण आरक्षण व सवलती आहेत असा सोयीचा निष्कर्ष काढून मोकळे होतात. वास्तविक राष्ट्रीय वा राज्य स्तरावरची प्रगतीची आकडेवारी पाहिली तर आजही जुनी उतरंड तशीच दिसते. सामाजिक दृष्ट्या जो विभाग ज्या स्तरावर त्याच स्तराची त्याची आर्थिक स्थिती आढळते. आजही आर्थिक बाबतीत आदिवासी तळाला, त्याच्यावर दलित, त्याच्यावर ओबीसी, त्याच्यावर मराठा, जाट, पटेल, राजपूत या मध्यम जाती व त्यांच्यावर ब्राम्हण समकक्ष जाती असाच पिरॅमिड दिसतो. तळच्या श्रेणीतील जातींमधील काही प्रगत कुटुंबे पाहून ती सबंध जात प्रगत झाली असा निष्कर्ष काढल्याने वरच्या श्रेणीतील आर्थिकदृष्ट्या कमकुवत वा अडचणीत आलेल्या लोकांचा जळफळाट होतो. मुख्यतः याच जातींतील असलेल्या राज्यकर्त्यांचे धोरण, त्रासदायक विषमतेला जन्म देणारा विकासक्रम या बाबींकडे त्यांचे दुर्लक्ष होते. स्वजातीय राज्यकर्त्यांनाही आपल्याकडे हा मोर्चा न वळता सोयीस्करपणे दलितांकडे वळला तर हवेच असते. प्रारंभीची मागणी येते या दलितांचे आरक्षण काढून घ्या व गुणवत्तेवर प्रवेश द्या. पुढच्या टप्प्यात ती होते आरक्षणाला आर्थिक निकष लावा व तिसऱ्या टप्प्यात होते आम्हाला आरक्षण द्या. मराठा, जाट व पटेल या तिन्हींचे बाबतीत हेच टप्पे दिसतात. 

सरकारे या आरक्षणाची ग्वाही देतात. काहीवेळा मंजूर करतात. पण ते न्यायालयात अडकते. मात्र सत्ताधारी पक्ष आम्ही तर दिले होते, न्यायालय देत नाही याला आमचा इलाज नाही. पण आम्ही प्रयत्नरत आहोत असे सांगत राहतात. स्वतःवरचा रोष टाळणे व मतांच्या बेगमीसाठी त्या समाजविभागांना झुलवणे चालू ठेवतात. या समाजविभागांतील राजकीय नेतेही हेच बहाणे करतात. मराठा, जाट व पटेल या तिन्ही विभागांना-विशेषतः त्यातील करिअर करु पाहणाऱ्या युवक-युवतींना हे आरक्षण मिळणे कठीण आहे, हे नीटपणे सांगणे व वास्तव स्वीकारावयास लावणे गरजेचे आहे. पुढील फसगत व त्यातून येणारा उद्रेक टाळायचा असेल तर हे करणे अगदी निकडीचे आहे. 

घटनेच्या १५ व्या कलमाप्रमाणे ज्या विभागासाठी आरक्षण लागू करावयाचे त्याचे शैक्षणिक व सामाजिक मागासलेपण सिद्ध होणे गरजेचे आहे. शैक्षणिक मागासलेपण भले सिद्ध झाले तरी सामाजिक मागासलेपण कसे सिद्ध होणार? हे तिन्ही विभाग सामाजिकदृष्ट्या वरच्या श्रेणीत आहेत. खालच्यांच्या वाट्याला आलेला सामाजिक अवहेलनेचा अनुभव त्यांच्या गाठीशी नाही. बरे हे दोन्ही मंजूर झाले तरी एकूण राखीव जागांची ५० टक्क्यांची अट आड येणारच. ती शिथिल व्हायची व अपवाद करायचा तर त्या गरजेची निकड म्हणजेच त्या जातीच्या मागासलेपणाची तीव्रता न्यायालय तपासणारच. सार्वजनिक नोकऱ्यांतील समान संधीसाठीचे कलम १६ मागास वर्गांसाठी आरक्षणाला अनुमती देते. हे मागासपण आर्थिकही असू शकते, असा अर्थ काही तज्ज्ञ लावतात. मात्र हा आर्थिक निकष फक्त त्या जातीलाच लागू होणार नाही. तर तो सर्वच जातींना लागू होईल. कारण तो वर्ग आहे. म्हणजे आपल्याकडे फक्त मराठ्यांनाच आर्थिक निकषावर नोकऱ्या मिळतील असे नव्हे, तर सर्वच जातींतल्या आर्थिक दुर्बलांना ते लागू होईल. आता इथे अजून एक वांधा आहे. नोकऱ्यांतील आरक्षणाला पात्र होण्यासाठी या वर्गाला त्या नोकरीच्या क्षेत्रात आपले पुरेसे प्रतिनिधीत्व नाही हे सिद्ध करावे लागेल. ही अडथळ्यांची शर्यत मराठा आरक्षणाबाबत महाराष्ट्रात राणे कमिटीच्या अहवालापासून फडणवीसांच्या भरघोस आश्वासनापर्यंत अनुभवतो आहोत. मराठ्यांतील काही विभागांना कुणबी म्हणून यापूर्वीच ओबीसी आरक्षण मिळाले आहे. आताही त्याच धर्तीवर मराठ्यांतील काही विभागांना कुणबी म्हणून आरक्षण मिळू शकते, असा काहींचा होरा आहे. एकतर अशी मराठ्याचे कुणबी व्हायची तयारी हवी. समजा ती झाली तरी आजचे कुणबी वा एकूण ओबीसी आपल्यात वाटेकरी होऊ देतील काय? त्यांनी आधीच मोर्चे काढून या शक्यतेला तीव्र विरोध केला आहे. 

धनगरांना महाराष्ट्रात ‘भटका समाज (क)’ या श्रेणीत ३.५ टक्के राखीव जागा आज आहेत. त्यांना आदिवासींत वाटा हवा आहे. त्यासाठीचा अभ्यास सरकार करते आहे. तथापि, आदिवासींतून त्यांच्या अशारीतीने वाटेकरी व्हायला विरोध आहे. 

आरक्षणाच्या लाभाची आजची स्थिती 

ज्यांना आरक्षण लागू आहे, त्या जातींतल्या एका विभागाला जरुर लाभ झाला. त्या व्यक्तींच्या पुढे जाण्याने इतरांना प्रेरणा मिळायलाही मदत झाली. पण त्या सबंध विभागाचे इतरांच्या बरोबरीने येणे अजून झालेले नाही. त्यासाठी त्याला आरक्षणाबरोबरच अन्य सहाय्याचीही गरज आहे. अलीकडे ते अन्य सहाय्य सोडाच असलेले आरक्षणही निरर्थक होत आहे. आरक्षण सरकारी वा निमसरकारी नोकऱ्यांत असते. आज या नोकऱ्याच कमी झाल्या आहेत. तिथे खाजगीकरण-कंत्राटीकरण आले आहे. मराठा आरक्षणाची जोरदार बाजू घेणारे मुख्यमंत्री फडणवीस खुद्द आपल्या कार्यालयात विशेष अधिकाऱ्यांची भरती कंत्राटावर करत आहेत. आज देशात एकूण नोकऱ्यांत केवळ ३ टक्के दलित सामावले गेले आहेत. हे प्रमाण अजून कमी होईल असा तज्ज्ञांचा कयास आहे. ज्या दलितांना राखीव जागांपायी सरकारी जावई म्हणून हिणवले जाते त्यांची ही गत असेल, तर इतरांची काय कथा? मराठा समाजाला समजा उद्या आरक्षण लागू झाले तरी प्रत्यक्षात त्याला किती नोकऱ्या मिळणार आहेत, हे यावरुन स्पष्ट व्हावे. 

खरा उपाय 

याला उपाय परस्परांविरोधी लढणे वा मोर्च्याला प्रतिमोर्च्याने उत्तर देणे वा दुबळ्यांना आपल्या जुन्या सरंजामी खानदानीपणाचा धाक दाखवणे-त्यांच्यावर हल्ले करणे हा नाही. याला उपाय सर्व पीडितांनी एकत्र येऊन आपल्या या स्थितीला कारण सरकारी धोरणे व व्यवस्था बदलण्याचा संघर्ष गतिमान करणे. आरक्षण कशासाठी? तर संसाधनांच्या न्याय्य वाटपासाठी. मग ह्या संसाधनांचा न्याय्य हिस्सा मिळण्यासाठी आरक्षण हा एकच मार्ग आहे का? अर्थातच नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी दादासाहेब गायकवाड यांनी देशातल्या सर्वजातीय भूमिहिनांचा सत्याग्रह छेडला होता. या आंदोलनात लाखो लोक तुरुंगात गेले. भूमिहिनांना जमीन हा संसाधनांच्या न्याय्य वाटपाचाच मुद्दा होता. असे मुद्दे अनेक आहेत. उदा. कामगारांना वाऱ्यावर सोडणारे कंत्राटीकरण, न परवडणारे विनाअनुदानित शिक्षण, घरांचे प्रश्न, सार्वजनिक वाहतूक इ. इ. या सर्व प्रश्नांवर योग्य त्या प्रबोधनाबरोबर व्यापक एकजुटीचे लढेच समाजातील जातीय ताण कमी करतील व परस्पर विश्वास आणि भ्रातृ-भगिनीभाव वाढीस लावतील. 

असलेले आरक्षण अधिक न्याय्य करणे 

जवाहरलाल नेहरु विद्यापीठात प्रवेशावेळी एक वेगळी पद्धत वापरली जाते. तेथील १०० टक्के प्रवेशांना दोन निकष लावले जातात. एक लिंगाचा व दुसरा प्रदेशाचा. प्रवेश घेणारी स्त्री असेल तर तिला विशिष्ट जादा गुण दिले जातात. तसेच प्रवेश घेणारी व्यक्ती मागास जिल्ह्यांतील असेल तर तिलाही अधिकचे गुण मिळतात. यामुळेच उच्चवर्णीय असलेल्या तथापि, बिहारच्या मागास जिल्ह्यातून आलेल्या गरीब कन्हैयाला इथे प्रवेश मिळू शकतो. आरक्षित जागांनाही प्रदेश व लिंगाचे हे निकष अतिरिक्तरित्या लागू आहेत. त्यामुळे मुंबईतील दलित विद्यार्थ्याऐवजी चंद्रपूरमधील दलित विद्यार्थ्याला प्रवेश मिळण्याची शक्यता तयार होते. ही पद्धत आणखी सुस्पष्ट व शास्त्रीय करुन सार्वत्रिक करण्याची मागणी करायला हवी. त्यामुळे त्या त्या आरक्षित वर्गातले पुढे गेलेले लोकच ते आरक्षण लाटतात या आरोपाला उत्तर मिळेल तसेच खुल्या वर्गातील गरीब व मागास भागातील विद्यार्थ्यांनाही न्याय मिळण्याची शक्यता वाढेल. सर्व जातीत मुली मागे राहतात, त्यावरही या पद्धतीने उपाय करता येईल. 

आरक्षणाच्या या मुद्द्याची खूपच विस्ताराने चर्चा आपण केली. ती सोपी करण्याच्या प्रयत्नामुळेही हा विस्तार झाला. आरक्षण हा मुद्दाच संवेदनशील आहे. तो एवढ्या चर्चेने संपणार नाही. याउपरही कोणाला काही शंका असल्यास, काही वेगळे म्हणायचे असल्यास वा माझ्या वरील मांडणीत काही दुरुस्ती सुचवायची असल्यास वा काही भर घालायची असल्यास खाली दिलेल्या ईमेल आयडीवर तसे जरुर कळवावे. ही चर्चा अधिक पुढे नेण्यास व नेटकी करण्यास त्याची मदतच होईल. 

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

____________________________ 

राष्ट्र सेवा दल पत्रिका, जाने-फेब्रु २०१८

Saturday, February 10, 2018

निवडणूक व्यवस्थेचे नायक


गांधी-आंबेडकर तणावांची, विशेषत: पुणे करारावेळच्या (१९३२) त्यांच्यातल्या ताणांची सर्वसाधारण कल्पना आपल्याला असते. स्वतंत्र मतदारसंघाला गांधीजींचा कडवा विरोध, डॉ. आंबेडकरांचे ताणून धरणे व अखेर गाधीजींच्या प्राणांतिक उपोषणाने त्या दोघांत झालेल्या समझोत्यानुसार राखीव जागांवर झालेली सहमती, त्यानंतर आजही त्यावर उपस्थित केले जाणारे प्रश्नचिन्ह.. या साऱ्याशी आपण परिचित असतो. सामाजिक, राजकीय, वैचारिक विश्वांत या ऐतिहासिक व्यक्तींच्या नावे माजणारे रण तर आपला वर्तमानच आहे. मात्र या सगळ्यांत या दोहोंना नक्की काय म्हणायचे होते, त्यांच्यातील मतभेदांच्या मुद्दय़ांची त्यांची समर्थने काय होती, तडजोडीला ते का व कोणत्या बाबींवर तयार झाले याविषयीचे वस्तुनिष्ठ बारकावे आपल्याला ठाऊक असतातच असे नाही. साहजिकच त्यांच्यासंबंधीची मापने बहुधा आपापल्या सामाजिक स्थानांवरून वा जी निवडक माहिती आपल्यापर्यंत पोहोचते त्यावरून आपण करत असतो. फार कमी विद्वान आपल्याला या तपशिलांची साद्यंत नोंद देतात. भारतीय प्रशासन सेवेतले उच्चपदस्थ अधिकारी व अभ्यासक राजा सेखर वुंडरू हे त्यांत मोडतात. अलीकडेच प्रकाशित झालेल्या त्यांच्या ‘आंबेडकर, गांधी अ‍ॅण्ड पटेल : द मेकिंग ऑफ इंडियाज् इलेक्टोरल सिस्टीम’ या ग्रंथाद्वारे हा सगळा तपशील आपल्यासमोर तत्कालीन संदर्भासह ते उलगडत नेतात.

हा ग्रंथ आहे भारतीय निवडणूक व्यवस्था कशी उत्क्रांत झाली, तिच्या घडणीतले घटक व या घटकांच्या दृष्टीने तिची परिणामकारकता काय याचा ऐतिहासिक पट मांडणारा. अर्थात, यातले मुख्य घटक डॉ. आंबेडकर, महात्मा गांधी व सरदार वल्लभभाई पटेल हे असल्याने त्यांच्या भूमिकांचे विवेचन हा या ग्रंथाचा गाभा राहिला आहे. डॉ. आंबेडकर आणि म. गांधी यांच्याबरोबरच सरदार पटेल हे या घडणीतले एक मुख्य नायक आहेत याची बहुधा आपल्याला कल्पना नसते. या ग्रंथातून सार्वजनिक चर्चाविश्वात फारसे नसलेले पटेलांचे अनेक नवे पैलू आपल्याला समजतात. नवभारताचे सूत्रधार नेहरू या घडणीत तसे जवळपास नाहीत व पटेलांनंतर येतात तेही मर्यादित भूमिकेत, ही नवीन माहिती आपल्याला इथे कळते.

आज आपल्यासमोर असलेली निवडणूक व्यवस्था व तिच्या बऱ्यावाईटपणाबद्दल चर्चा होत असते. भारत स्वतंत्र झाल्यानंतर जन्मलेल्या पिढीला मुद्दामहून तपास केला तरच कळते, की आज आपल्या प्रत्येकाला असलेला प्रौढ मताधिकार एके काळी तसा नव्हता. आपल्यावर ब्रिटिशांचे राज्य होते म्हणून नव्हे, तर जगातील स्वतंत्र व प्रगत देशांतही सरसकट सर्वाना मतदान करण्याचा अधिकार नव्हता. आपल्यावर राज्य करणाऱ्या ब्रिटिशांच्या देशात- इंग्लंडमध्ये १९२८ साली स्त्रियांना मताधिकार मिळाला, तर अमेरिकेत गौरेतर व स्त्रियांना तो १९६५ साली मिळाला. हे अधिकार या घटकांना आंदोलन करून मिळवावे लागले. या देशांत, तसेच आपल्या देशात ब्रिटिशांनी जी मर्यादित निवडणूक प्रक्रिया सुरू केली त्यात करदाते व जमीनमालक अशा अटींची पूर्तता करणाऱ्यांनाच मताधिकार होता. अमेरिकेत गरीब गोऱ्यांनाही तो नव्हता. आपल्याला मात्र तो संविधानाबरोबरच मिळाला.

राजा सेखर वुंडरू यांनी पुस्तकात या बाबींची नोंद घेऊन त्याचे मुख्य श्रेय डॉ. आंबेडकरांना दिले आहे. ते घटनाकार झाले म्हणून नव्हे (वास्तविक घटना समितीत आले तेव्हाही बाबासाहेबांना आपल्यावर घटना लिहिण्याची प्रमुख जबाबदारी येणार याची काहीही कल्पना नव्हती), तर मानवाच्या मतदानाच्या मूलभूत अधिकाराची मागणी ते थेट १९१९ सालापासून जमेल त्या व्यासपीठांवरून लावून धरताना दिसतात. डॉ. आंबेडकरांच्या या सर्व प्रयत्नांचा व त्यांच्या मागणीचा तपशीलवार आढावा या पुस्तकात घेतलेला आहे. ‘एक माणूस जो सार्वत्रिक प्रौढ मताधिकाराच्या मागणीने ब्रिटिशांना सतत अडचणीत आणत होता तो म्हणजे डॉ. आंबेडकर’ असे पहिल्याच प्रकरणात लेखकाने नोंदवले आहे. प्रौढ स्त्री-पुरुष, मग ते कोणत्याही जातीचे, धर्माचे, वंशाचे, आर्थिक स्तरातले, शिकलेले- न शिकलेले असोत, त्यांना मताचा अधिकार मिळालाच पाहिजे यासाठी डॉ. आंबेडकरांनी चिवट झुंज दिलेली आहे. १९२८ ला सायमन कमिशनसमोर दिलेल्या साक्षीत निरक्षरांना मताचा अधिकार नको म्हणणाऱ्यांच्या विरोधात डॉ. आंबेडकरांनी केलेल्या युक्तिवादाची लेखकाने दिलेली ही नोंद पाहा : ‘मला (डॉ. आंबेडकर) वाटते प्रत्येक माणसाला त्याला काय हवे हे समजण्याइतके शहाणपण असते. साक्षरतेमुळे यात फार काही फरक पडतो असे नव्हे. माणूस निरक्षर असू शकतो; तरीही तो खूप बुद्धिवान असू शकतो.’

पुढे संविधान तयार होतानाही डॉ. आंबेडकरांना ही बाजू लावून धरावी लागत होती. सर्व स्त्री-पुरुषांना प्रौढ मताधिकार मिळाला. पण तो मूलभूत अधिकार म्हणून घटनेत स्वीकारला गेला नाही. विविध कारणांनी तो अडवला गेला. या अडवण्यात वल्लभभाई पटेल मुख्य होते. संस्थाने त्यास नकार देतील, असे त्यांचे म्हणणे होते. मात्र अखेर खूप प्रयासाने प्रौढ मताधिकार घटनेत नोंदवला गेला. पण तो मूलभूत अधिकार आजही नाही. त्यामुळेच अलीकडे हरयाणा व राजस्थानात पंचायत निवडणुकांमध्ये शिक्षण व स्वच्छतागृहांची अट लादली जाऊ शकली, याकडे लेखक आपले लक्ष वेधतात.

भारतातील स्वातंत्र्य आंदोलनाच्या रेटय़ामुळे राजकीय सुधारणांचे हप्ते देण्यास ब्रिटिशांनी सुरुवात केली. मुस्लीम, शीख, अँग्लो इंडियन, भारतीय ख्रिश्चन, युरोपियन आदींसाठी स्वतंत्र मतदारसंघ दिले गेले. डॉ. आंबेडकरांनीही दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली. गोलमेज परिषदांत (१९३०-३१) व अन्य पातळ्यांवर तिचा पाठपुरावा केला. गांधीजींनी या मागणीला कडाडून विरोध केला. स्वतंत्र मतदारसंघ म्हणजे ज्या विभागासाठी तो असेल त्याचाच उमेदवार व तेच मतदान करणारे. अन्य समाजविभागांना तिथे उभे राहण्याचा वा मतदान करण्याचा अधिकार नाही. अस्पृश्यांची उन्नती होण्यासाठी त्यांना राजकीय अधिकार मिळणे आवश्यक आहे व तो अधिकार त्यांनी निवडलेले खास त्यांचे प्रतिनिधी असल्याशिवाय मिळणे कठीण आहे, असे डॉ. आंबेडकरांना वाटत होते.

तर गांधीजींना हिंदू समाजात गावोगावी यामुळे उभी फूट पडेल अशी भीती वाटत होती. मुसलमानांना व शिखांना स्वतंत्र मतदारसंघ असायला गांधीजींची हरकत नव्हती. मात्र दलितांना तो अधिकार द्यायला गांधीजी तयार नव्हते. गांधीजींच्या या दुहेरी भूमिकेवर डॉ. आंबेडकरांनी घणाघाती हल्ला चढवला. गोलमेज परिषदेत डॉ. आंबेडकरांची सरशी झाली. ब्रिटिशांनी डॉ. आंबेडकरांची मागणी मान्य केली. तथापि, परस्पर चर्चेतून तडजोडीचा प्रस्ताव आणण्यासही मुभा ठेवली. गांधीजींनी येरवडय़ाला आमरण उपोषण केले. त्या वेळी झालेल्या तडजोडीत दलितांना कोणताही वेगळा अधिकार देण्याच्या विरोधात असलेले गांधीजी व स्वतंत्र मतदारसंघावर अढळ असलेले डॉ. आंबेडकर काही पावले मागे आले व दलितांसाठी संयुक्त मतदारसंघात राखीव जागांवर तडजोड झाली.

या राखीव जागांवरच्या निवडणुकीत मतदानाच्या दोन पायऱ्या होत्या. प्राथमिक पायरीत चार उमेदवार दलितांच्या मतदानातूनच निवडले जाणार व या चार जणांपैकी एक सर्वसाधारण मतदानातून निवडला जाणार. इथे दलितांच्या निवडीचा अधिकार काही प्रमाणात राहील व इतर समाजवर्गही त्यात सहभागी होतील, असा मेळ घातला गेला. परंतु याप्रमाणे झालेल्या १९३७ व १९४६ च्या निवडणुकांतून दलितांचे खरेखुरे प्रतिनिधी निवडून यायला मदत झाली नाही, असे विश्लेषण डॉ. आंबेडकरांनी केले. दलितांनी निवडलेल्या चार उमेदवारांतील सर्वात कमी पसंतीचा उमेदवार सवर्णाच्या बहुमताने निवडून येतो व दलितांनी सर्वाधिक मतांनी प्राथमिक फेरीत निवडलेला उमेदवार पडतो, याची आकडेवारी त्यांनी या विश्लेषणातून मांडली. यासाठी दोन फेऱ्यांची मतदानाची पद्धत बंद करून निवडून येण्यासाठी दलितांची २५ टक्के मते मिळणे अनिवार्य करावे, अशी सूचना डॉ. आंबेडकरांनी गांधीजींना केली. परंतु ही मागल्या दाराने स्वतंत्र मतदारसंघ आणण्याची चाल आहे, असे म्हणून गांधीजींनी ती अमान्य केली. हा सगळा क्रम, दोघांतील संवाद, वर्तमानपत्रांचे तत्कालीन अभिप्राय, आपापल्या बाजू स्पष्ट करण्यासाठीच्या भेटीगाठी यांचे बरेच तपशील लेखकाने दिले आहेत. असे संगतवार तपशील हे या पुस्तकाचे वैशिष्टय़ मानावे लागेल. त्यामुळे प्रत्येकाची बाजू सखोलपणे समजायला मदत होते.

पुणे करारावेळी सरदार पटेल येरवडय़ाला गांधीजींबरोबर होते. पण ते या चर्चेत कुठेही सहभागी झाले नाहीत. मात्र १९४६ साली कॅबिनेट मिशनने संविधान तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली, त्या वेळी पटेलांची भूमिका कळीची राहिली. गांधीहत्येनंतर तर तेच सूत्रधार झाले. संविधान सभेच्या अल्पसंख्याकांसाठीच्या सल्लागार समितीचे ते प्रमुख होते. पुणे करारामुळे माघारी घेतलेला दलितांसाठीच्या स्वतंत्र मतदारसंघाचा मुद्दा डॉ. आंबेडकर विविध पातळ्यांवर मांडतच होते. तो त्यांनी घटनानिर्मितीच्या प्रक्रियेतही मांडला. मात्र पटेलांनी तो उडवून लावला. त्यांच्या पक्षाचे जे दलित सदस्य या मुद्दय़ाला पाठिंबा देत होते, त्यांनाही त्यांनी गप्प केले. गांधीजींशी डॉ. आंबेडकर ज्या पद्धतीने वागले त्याची चीड पटेलांच्या मनात होती, असे लेखकाचे मत आहे. पटेलांनी मुसलमान, शीख आदी सर्वाचेच स्वतंत्र मतदारसंघ रद्द केले. दलितांना स्वतंत्र सोडाच, पण राखीव जागा द्यायलाही त्यांनी नकार दिला. डॉ. आंबेडकरांनी घटना समितीतून बाहेर पडण्याचा इशारा दिल्याने व त्यांच्याकरवी घटनेचा मसुदा अंतिम पातळीवर आलेला असल्याने त्यांचे जाणे परवडणारे नव्हते म्हणून पटेल नमले व दलितांना राखीव जागा द्यायला तयार झाले, असा लेखकाचा युक्तिवाद आहे.

घटनेने दिलेल्या राजकीय राखीव जागांचा आजवरचा अनुभव पाहता दलितांना त्यांचे न्याय्य प्रतिनिधित्व मिळालेले नाही, असा लेखकाचा निर्वाळा आहे. त्यासाठी डॉ. आंबेडकरांनी मांडलेल्या उपायांचा अवलंब करावा लागेल; त्याची सुरुवात दलितांच्या विशिष्ट मतांची अट असलेली राखीव जागेची पद्धत लागू करण्याने होऊ शकते, असे लेखक पुस्तकाच्या शेवटी नमूद करतो.

गांधी, पटेल, काँग्रेस व आंबेडकर यांच्या संबंधांचे आकलन होण्यासाठी लेखक मागचे-पुढचे अनेक संदर्भ या पुस्तकात देतात. बंगालमधून घटना समितीवर डॉ. आंबेडकरांच्या निवडीची प्रक्रिया विस्ताराने सांगितली आहे. परंतु डॉ. आंबेडकरांची घटना समितीवर काँग्रेसच्या साहाय्याने झालेली फेरनिवड, त्यांचे मसुदा समितीचे अध्यक्ष होणे हा एक महत्त्वाचा संदर्भ यात राहून गेलेला आहे. तसेच सायमन कमिशनसमोरच्या साक्षीत स्वतंत्र मतदारसंघाच्या मर्यादा सांगणाऱ्या डॉ. आंबेडकरांच्या निवेदनाचा उल्लेखही इथे नाही. या त्यांच्या निवेदनाचे व त्यानंतरच्या त्यांच्या बदललेल्या भूमिकेचे नाते उलगडणे त्यामुळे उद्बोधक ठरले असते.

- सुरेश सावंत

sawant.suresh@gmail.com
___________

‘आंबेडकर, गांधी अ‍ॅण्ड पटेल : द मेकिंग ऑफ इंडियाज् इलेक्टोरल सिस्टीम’

लेखक : राजा सेखर वुंडरू

प्रकाशक : ब्लूम्सबरी

पृष्ठे : १७८, किंमत : ४९९ रुपये
___________

(लोकसत्ता, १० फेब्रुवारी २०१८)

https://www.loksatta.com/athour-mapia-news/ambedkar-gandhi-and-patel-the-making-of-indias-electoral-system-1629545/

Thursday, February 1, 2018

'भीमा-कोरेगाव' …निव्वळ बाकी काय?


२ व ३ जानेवारीच्या मुंबईतील घडामोडींत मी काही प्रमाणात प्रत्यक्ष वा आसपास होतो. पण भीमा-कोरेगाव, शनिवारवाड्यावरील एल्गार परिषद यांना इच्छा असूनही घरच्या काही अडचणींमुळे जाऊ शकलो नाही. आमच्या संविधान संवर्धन समितीच्या कार्यकर्त्यांनी एक खास बसच केली होती. या आमच्या सहकाऱ्यांनी ३१ डिसेंबरला वढू गावात संभाजी महाराज व गोविंद गायकवाड यांच्या समाध्यांना भेट दिली. तिथून एल्गार परिषदेला आले. तिथून काही मुंबईस परतले. तर काही जण दुसऱ्या दिवशी १ जानेवारीला भीमा-कोरेगावला गेले. भीमा-कोरेगावला गेलेले प्रत्यक्ष हल्ल्यात सापडले. वढूला आधल्या दिवशी गेलेल्यांना गावात ताण जाणवत होता. पण असे होईल याचा अंदाज आला नाही.

हल्ल्यात सापडलेल्यांचे अनुभव ऐकताना हा हल्ला व्यवस्थित पूर्वतयारीने झालेला होता हे अगदी स्पष्ट होत होते. आमचा एक सहकारी गेली काही वर्षे नियमितपणे १ जानेवारीला तिथे जातो. त्याला हा अनुभव अगदीच अनपेक्षित होता. नेहमी तिथे रस्त्याच्या बाजूला विक्रेते असत. आजूबाजूच्या घरातले लोक पाणी देत. सहकार्य करत. यावेळी मात्र विक्रेते नव्हते. बाजूच्या रस्त्यालगतच्या घरांत लोक नव्हते. अचानक दगडफेक सुरु झाल्यावर गाड्या थांबल्या. ही मंडळी दगडफेक करणाऱ्यांच्या मागे धावली. १८-२० वर्षे वयोगटातली मुले गल्लीतून पळत होती. घराच्या गच्च्यांवर दगड साठवलेत असे यांच्या लक्षात आले. गाड्या तिथेच सोडून हे लोक चालत निघाले. नंतर या सोडलेल्या गाड्यांची तोडफोड झाली. भगवे झेंडे घेऊन तरुण मुलांचे गट ही तोडफोड करत होते. गाड्यांवरचे पंचशीलचे ध्वज काढून त्यांनीच काचा फोडत होते. लोकांना काठ्यांनी बडवत होते. ..या दृश्याचे प्रत्यक्ष साक्षी आहेत. तसेच व्हिडिओ क्लिप्सही आहेत.

याची प्रतिक्रिया २ तारखेला राज्यात विविध ठिकाणी उमटली. आंबेडकरी समूहाने दुकाने बंद करणे, रास्ता रोको, रेल रोको वगैरे. त्यात पोलिसांशी झटापट, तोडफोड हेही आले. हे सगळे उत्स्फूर्त होते. प्रकाश आंबेडकरांनी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले व दुसऱ्या दिवशी ३ जानेवारीला महाराष्ट्र बंद झाला. हा बंद बऱ्याच प्रमाणात शांतपणे झाला. पण काही ठिकाणी त्याला हिंसक वळण लागले.

मुख्यतः चेंबूर-ट्रॉम्बे परिसरातील आम्ही मंडळी या काळात व त्यानंतर वारंवार बसत होतो. आढावा घेत होतो. आपण नक्की काय करायचे ते ठरवत होतो. हे जे ठरले त्याप्रमाणे ज्यांच्यावर केसेस टाकल्या गेल्या आहेत, पोलिसांच्या मारहाणीत ज्यांना जबर मार बसल्याने रुग्णालयात दाखल व्हावे लागले आहेत, ज्या तरुण मुलांची मनःस्थिती बिघडली आहे, अशांना भेटून दिलासा देणे, शक्य ते सहाय्य करणे, मिळवून देणे यात हे कार्यकर्ते सध्या व्यग्र आहेत.

२६ नोव्हेंबरच्या देवनार ते चैत्यभूमी संविधान जागर यात्रेच्या क्रमात संयत, सम्यक, व्यापक भूमिका रुजवण्याचा जो बऱ्यापैकी यशस्वी प्रयत्न आम्ही केला व त्यानंतर पुढील बांधाबांध वस्त्यांत सुरु करण्याच्या खटपटीला लागलो त्याला भीमा-कोरेगावच्या या घडामोडींनी तडाखा बसला आहे. एकतर तरुणांची धरकपकड, कोर्टकचेऱ्या यामुळे त्याबाबत काही करणे, किमान विचारपूस करणे हे आता प्राधान्याचे काम झाले आहे. ‘आपल्या समाजा’ला हे असे वागवले जाते, इतर कोणी मदतीला येत नाही ही भावना सध्या प्रखर आहे. अशावेळी व्यापक एकजुटीचा आमचा प्रचार ऐकायला स्वाभाविकपणे मर्यादा पडत आहेत. त्यात आपण बंद यशस्वी करुन दाखवला, महाराष्ट्र बंद करण्याची आपली ताकद इतरांना यामुळे कळली याचा एक अभिमानही आंबेडकरी समाजमनात उचंबळून आला आहे.

हे खरे आहे की दीर्घ काळाने आंबेडकरी समुदायाला ही आपली ताकद दिसली आहे. गटातटात विखुरले जाणे, स्वतःच्या ताकदीने मिळालेले राजकीय प्रतिनिधीत्व नाही, सत्ताधाऱ्यांनी आपल्यातल्या वरपासून खालपर्यंतच्या नेत्यांना विकत घेणे, मराठा आंदोलनाने आरक्षण व अॅट्रॉसिटी अॅक्टबद्दल प्रश्न उपस्थित करणे, आपल्यावर झालेल्या अत्याचाराला न्याय मिळण्यात दुजाभाव होणे व त्याचवेळी वाढत्या आकांक्षांच्या पूर्तीत आड येणारी तीव्र आर्थिक विषमता आणि या सगळ्यात आपले राजकारण म्हणजे नेमके काय याची स्पष्टता नसणे यामुळे जी असुरक्षितता, विसविशितपणा आला होता त्याला या बंदतून व्यक्त झालेल्या ताकदीने दिलासा मिळाला आहे. आम्हीही काहीतरी आहोत ही भावना आंबेडकरी समुदायाला आजतरी संतोष देणारी आहे.

ज्यांच्या मुलांना पोलिसांनी बेदम मारले, १५ दिवस अटकेत ठेवले त्यातील काही पालकांचा या विजयी भावनेला अपवाद असू शकेल. पण सर्वसाधारण आंबेडकरी समुदायाला आम्हीही कोणी आहोत ही दाखवण्याची संधी मिळाली हे खरे. ज्यांच्या मुलांना मारहाण झाली, अटक झाली त्या आया रडताना पाहणे हे त्रासदायक होते. काहींना नोकऱ्यांचे कॉल आलेले आहेत. काहींचे उच्चशिक्षण सुरु आहे. झाले आहे. ते आपले भविष्य लवकर उजळणार अशा अपेक्षेत होते. केसेस पडल्याने ते एकदम असुरक्षित झाले आहेत.

यावेळी एक बाब फार आश्वासक होती. आंबेडकरी समुदायातून वकिलांची फौज कायदेशीर लढा लढवायला या मुलांच्या मागे उभी राहिली. फुकट. कर्तव्य भावनेने. ज्यांना रुग्णालयात दाखल केले होते व बराच खर्च आला होता, अशांना वस्तीने पैसे उभे करुन सहाय्य केले. याआधीच्या घटनांत हे अटक झालेले, जखमी झालेले कार्यकर्ते एकाकी पडत. कुटुंबीय व जवळचे मित्र यांनाच त्यांचा भार उचलावा लागे. चळवळ, समाज अथवा संघटना यांचे सहाय्य अपवादाने मिळे. समाज आपल्या साथीला आहे ही यावेळची भावना त्यांना नक्की आश्वस्त करणारी आहे. 

जामीन मिळाल्यावर ऑर्थर रोड जेलमधून सुटलेल्या तरुणांचे बाहेर जमलेल्या लोकांनी स्वागत केले. त्यामुळे या तरुणांच्या मुद्रांवर सुटकेचा आनंद व आपण समाजासाठी (जातीसाठी) काही मोठे काम केले अशी भावना झळकत होती. या सुटलेल्या मुलांतील एकजण मात्र या सगळ्यापासून अलिप्त व चिंताक्रांत होता. आमचा तेथे असलेला या कायदेशीर बाबींत सहाय्य करणारा कार्यकर्ता त्या मुलाला व त्याच्या पालकांना भेटला. त्या मुलाला वाटत होते आता माझे करिअर संपले. केसेस पडल्याने मला नोकरी मिळणार नाही. मुलाच्या या मनःस्थितीने पालकही चिंतित होते. आमच्या या कार्यकर्त्यालाही त्या मुलाची मनःस्थिती गंभीर, आपल्या जीवाचे तो काही बरेवाईट करुन घेऊ शकेल अशी वाटली. आपण त्याला त्याच्या घरी जावून भेटावे व त्याच्याशी बोलून त्याला आधार द्यावा, अशी आमच्या या सहकाऱ्याने आम्हाला सूचना केली. आम्ही लगोलग गेलो. वस्तीतले चहाच्या टपरीच्या आकाराचे क्षेत्रफळ असलेले घर. त्यात हे अख्खे कुटुंब राहते. तो सध्या बीएससी करतो आहे. चळवळीचा याआधीचा काहीही अनुभव नाही. आपल्या लोकांच्या एका वस्तीवर इतर लोकांनी हल्ला केला आहे, असा व्हॉट्सअप मेसेज आल्याने मित्रांबरोबर तो तेथे धावला. पालकांच्या मते त्याने काहीही केले नाही. तो उभा होता आणि पोलिसांनी त्याला पकडला. त्याचे वडिल म्हणत होते, याला आम्ही कधी एक फटकाही दिला नाही आणि अशा या मुलाला पोलिसांनी बेदम मारला. कधी घराबाहेर तो राहिला नाही. आणि आता जेलमध्ये १५ दिवस त्याला काढावे लागले. त्याच्या मनावर याचा काय परिणाम झाला असेल?

आम्ही समजावले. या केसेसने नोकरी धोक्यात येत नाही. त्या आपण काढून घेण्याचा प्रयत्न करु. आम्ही आमची उदाहरणे दिली. आमच्यावर कशा केसेस पडल्या. आम्ही कसे त्यातून बाहेर निघालो. तू गुन्हेगार नाहीस. चळवळीसाठी आत गेलास वगैरे. तो थोडा हुशारला. घरच्यांनाही बरे वाटले. आमच्या सहकाऱ्याची त्याच्यावर नजर आहे. अशी भेदरलेली मुले अनेक आहेत असे आमच्या अन्य सहकाऱ्यांचे म्हणणे आहे. परत कधी असे आंदोलनात उतरायचे नाही, अशा प्रतिक्रिया त्यांच्या आहेत. त्यांना याचरीतीने भेटण्याचा व संपर्कात राहण्याचा प्रयत्न हे सहकारी करत आहेत.

आम्हाला अनेक त्रुटींसहित का होईना एक चळवळीचे-त्यागपूर्वक लढणाऱ्यांचे वातावरण व व्यवस्था परिवर्तनाची दिशा व्यक्त करणारे चर्चाविश्व वस्तीतच मिळाले. आता त्याची पूर्ण बोंब आहे. दिशाहिनतेच्या या वावटळीत या नव्या मुलांचे तारू कसे सावरणार? त्यांना काय दिशा मिळणार? …कठीण आहे. त्यांना सोडवायला पारंपरिक स्वार्थाचे-पैश्याचे राजकारण करणारी विविध पक्षांत असणारी ‘जातीची’ मंडळीही जोरात होती. त्यांचे ऋण या मुलांच्यावर राहणार (त्यापायी त्यांचा वापर होणार) त्याचे काय?

भीमा-कोरेगावचा हल्ला नियोजित होता. पण २ आणि ३ तारखेला जे प्रतिक्रियात्मक आंदोलन झाले ते बिननियोजनाचे व निर्नायकी होते. मी माझ्या पूर्वीच्या वस्तीत ३ तारखेला संध्याकाळी गेलो. त्या भागातल्या जुन्या-जाणत्या कार्यकर्त्यांची बैठक चालू होती. एक पोलीस अधिकारीही होते. त्यांच्या बोलण्यावरुन ते बौद्ध होते हे लक्षात आले. त्यांच्याकडे त्या भागाची जबाबदारी होती. त्यांच्या बोलण्यावरुन त्या दिवशी काय घडले त्याचा अंदाज आला. आपण काहीतरी करायला हवे म्हणून जाणती मंडळी जमली. पण तेवढ्यात तरुणांच्या एका गटाने पुढाकार घेतला व तो घोषणा देत रास्ता रोकोसाठी निघाला. ही जाणती मंडळी त्यांच्या मागे. त्या गटाने रास्ता रोको करताना गाड्यांची तोडफोड, पोलिसांवर चालून जाणे असे प्रकार केले. पोलिसांनी मग लाठीमार केला. त्यात म्हाताऱ्या महिलांनाही खाली पडून दुखापत झाली. या पोलीस अधिकाऱ्याचे म्हणणे होते, तुम्ही शांतपणे रास्ता रोको केला असतात तर आम्ही काही करणार नव्हतो. उलट लोकांचा उद्रेक अशा रीतीने शांत व्हावा असाच आमचा प्रयत्न असतो. पण तुम्ही पोलिसांवरच हात उचललात, तोडफोड केलीत तर आम्हाला केसेस टाकाव्याच लागतात. तो तरुण मुलांचा बेबंद गट तुमच्या नियंत्रणात नसताना तुम्ही त्यांना सोबत करायचीच नव्हती. तो अधिकारी वाचणारा, माहितगार व समजदार होता. त्याने बाबासाहेबांच्या चवदार तळ्याच्या, काळाराम मंदिराच्या आंदोलनाची उदाहरणे दिली. बाबासाहेबांनी कधी आंदोलन नियंत्रणाबाहेर जाऊ दिले नाही. या आंदोलकांवर हल्ले झाले. पण त्यांनी आपल्या अनुयायांना प्रतिहल्ला करु दिला नाही.

२ व ३ तारखेला रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांच्यात असे बेबंद गट अनेक ठिकाणी होते. सगळेच तसे नव्हते. पण जे होते त्यांचा व्यवहार अराजकी होता. दुसऱ्या समाजाचे नाव गुंफून गलिच्छ शिव्या वाहणाऱ्या घोषणा दिल्या गेल्या. त्याने त्या समाजविभागातले लोक संतापले. यावेळचे आपले आंदोलन नक्की कोणाविरोधी आहे याचे डावपेचात्मक तारतम्य न ठेवता सरकार, मराठा समाज, भाजपबरोबर शिवसेना असे ज्याच्याज्याच्याबद्ल मनात राग असेल त्या सर्वांना एकाचवेळी ठोकणे झाले. शिवसेनेची शाखा, बॅनर तोडण्याचा आततायीपणा कशासाठी? त्यातून शिवसैनिक चिडले. त्यांनी यांच्यावर प्रतिहल्ला केला. पण शिवसेनेच्या वरच्या नेतृत्वाने बौद्ध विरुद्ध शिवसेना असे वाढू दिले नाही. भाजपलाच याचा फटका बसला पाहिजे ही समजदारी त्यांनी दाखवली. एका विभागात प्राबल्याने असलेल्या आगरी समाजाची दुकाने-गाड्या फोडल्या गेल्या. त्यांनी दुसऱ्या दिवशी चार तारखेला बौद्धांना चोपले. जयभीमवाल्यांना त्यांच्या पद्धतीच्या शिव्या परत केल्या. आता आगरी हे ओबीसी. त्यांच्याविरोधात जाण्यात काय राजकीय शहाणपण होते? तो तणाव एवढा होता की अन्य भागात विजयी मुद्रेत असलेला बौद्ध समाज तिथे असुरक्षित झाला. तिथे राहणाऱ्या आमच्या एका कार्यकर्त्याला आपण बौद्ध आहोत हे कळल्यावर काय होईल या भितीने आपल्या मोटारसायकलवरचे अशोकचक्र ठेवू की नको असा प्रश्न पडल्याचे त्याने आम्हाला मोकळेपणाने सांगितले.

आंबेडकरी याचा अर्थ मुख्यतः बौद्ध. गावात एकटीदुकटी घरे असलेले बौद्ध शहरात मात्र एकगठ्ठा वस्तीत बऱ्या संख्येने असतात. ही संख्या व एकत्र राहण्यामुळे त्यांच्या आंदोलनाची कृती प्रभावी होते. पण हीच बाब गावात शक्य नसते. तेथील बौद्धांना नमते घ्यावे लागते. अन्यथा गावच सोडावे लागते. अन्य अल्प संख्येच्या समूहांना तर शहरातही आपला आवाज उठवता येत नाही. कातकरी समाजावर समजा असा अन्याय झाला असता तर तो महाराष्ट्र बंद करु शकला असता? त्याला पाठिंबा देण्यासाठी बौद्ध समाज ‘समाज’ म्हणून (काही व्यक्ती, संघटना नव्हे) रस्त्यावर उतरला असता? आपल्याहून पीडित असलेल्या या समाजाला आपण आधार द्यायला हवा, ही बाबासाहेबांना अभिप्रेत भावना त्याने दाखवली असती?

संघ, भाजप, मोदी, पेशवाई यांना जोरदार ठोकणारी भाषणे कोणीही करो, बौद्धांच्या सभेत त्याला तुफान प्रतिसाद मिळतो. या सभा शहरात होतात. तिथे बौद्ध मंडळी शेकडो-हजारोंच्या संख्येने जमतात. ही भाषणे करणाऱ्या पुरोगाम्याला त्यामुळे वाटले की आता आपल्याला समाजात व्यापक पाठिंबा मिळतो आहे. आता संघमुक्त भारत आपण लीलया करणार. तर ती फसगत होईल. त्याची व बौद्ध समाजाचीही. या भाषणांना बौद्ध समाजाचा किंवा मुस्लिम समाजाचा प्रतिसाद मिळणारच. संघपरिवाराला विरोध हे त्याचे ठरले आहे. त्याला पुरोगाम्यांच्या भाषणाने अनुमोदन मिळाले एवढेच. हे विभाग या भाषणांनी नव्या विचाराला प्रवृत्त झाले असे नव्हे. जे समाजघटक अशा विचारांशी सहमत नाहीत किंवा काठावर आहेत, अशांच्यात जाऊन त्यांचे प्रबोधन करण्याचा, त्यांना आपले म्हणणे पटविण्याचा आपला कार्यक्रम व शैली काय राहणार? एल्गार परिषदेत जिग्नेश मेवाणीने मोदींना ललकारणे व नागपूरात जाऊन आव्हान देण्याचे जाहीर करणे हे कोणाच्या ताकदीवर? ..बौद्धांच्या? …नाही जमणार. अन्य विभाग सहमत व्हायला लागतील. बौद्धांची एकत्रित सभेतली ताकद कितीही मोठी असली तरी संसदीय निवडणुकांत मतदारसंघनिहाय ते अल्पच असतात. बौद्ध वस्तीत सगळे बौद्ध एकत्र झाले तर (तेही कठीण असते) समाजाचा नगरसेवक निवडून येऊ शकेल. पण केवळ बौद्धांच्या ताकदीवर आमदार निवडून येणे कठीण. अन्य समाजविभागांच्या हितसंबंधांची मोट बांधावीच लागते. जिग्नेश मेवाणींना त्यांच्या मतदारसंघात याचा चांगला अनुभव आला आहे.

भीमा-कोरेगाव अन्य समाजाच्या दृष्टीने बौद्धांचे एक तीर्थक्षेत्र होते. प्रत्येक समाजाचे असे असते. त्याला कोणाची आडकाठी नव्हती. १ जानेवारी शौर्यदिन म्हणण्यालाही जाणते व करामतखोर प्रतिगामी वगळता अन्यांना तशी अडचण नव्हती. वढू गावातल्यांनाही नव्हती. भिडे-एकबोटे मंडळींना नक्की होती. त्यांच्या भूमिका, भाषणे पाहता, त्यांच्या संघटनाची रीत पाहता ते या विरोधात खात्रीने होते. पेशवाईला कमी लेखणे त्यांना मंजूर नाही. त्यांनी प्रत्यक्ष कारस्थान काय केले हे कधी उजेडात येईल ठाऊक नाही. पण त्यांच्या या सांस्कृतिक वर्चस्ववादाच्या भूमिकेने संभाजी महाराजांना कट्टर हिंदुत्ववादाचा मानबिंदू व त्यायोगे वर्णवर्चस्वाचे प्रतीक करण्यात ते यशस्वी ठरले. त्यामुळे संभाजी महाराज या मराठ्याचा अंत्यसंस्कार करायला महाराने पुढे येणे या मांडणीला सवर्ण मराठा समाजातून, ओबीसींतून विरोध उभा करणे सोपे झाले. त्यात गेली २ वर्षे मराठा आंदोलनाने (ते कितीही शिस्तबद्ध व शांततामय असले तरी) बौद्धांच्याबद्दल आरक्षण व अॅट्रॉसिटी अॅक्टच्या मुद्द्यांमुळे दुस्वास तयार झाला होता. आमच्या मुलींना जाळ्यात ओढणाऱ्यांचा कोणी ‘सैराट’ केला तर ते अगदीच गैर नाही ही भावना काहींच्यात घट्ट व्हायलाही त्यातून मदत झाली. जी मुले गल्ल्यांतून भीमा-कोरेगावला दगड मारायला पुढे येत होती, त्यांच्या मनात आमच्या बहिणींना पळवणारे, आरक्षणामुळे आमच्या शिक्षणाच्या संधी हिसकावणारे ते हे बौद्ध अशी चीड असायची शक्यता आहे. वढू गावातील गोविंद महार-संभाजी महाराज यांच्या संबंधाचा फलक लावण्यातून जो ताण तयार झाला, त्यातून गोविंद महाराच्या समाधीचे छप्पर तोडणे, त्याविरोधात बौद्धांकडून अॅट्रॉसिटी अॅक्टखाली खटले दाखल करणे व त्यापायी संभाजी महाराजांच्या समाधीला भीमा-कोरेगावला १ जानेवारीला जमणाऱ्या बौद्ध मंडळींकडून धोका होऊ शकतो अशी आवई ठोकून त्या दिवशी जमावबंदी करावी असा वढू ग्रामपंचायतीने ठराव पोलिसांना देणे ही तात्कालिक जळती काडी होती. वाळक्या गवताच्या गंजी तर आधीपासूनच साठल्या होत्या. 

बौद्ध, मराठा किंवा ओबीसी वा अन्य कोणी जे निम्न आर्थिक थरात आहेत त्यांचे शिक्षण, नोकरी हे प्रश्न व्यवस्थात्मक आहेत हे त्यांना समजावून सांगण्याची काही खास मोहीम आंबेडकरी वा पुरोगामी चळवळीने घेतली असे झाले नाही. हे यापुढे तरी करावेच लागेल. तोच याच्या शमनाचा टिकाऊ मार्ग आहे. एकबोटे-भिडे यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. पण केवळ तेवढ्याने प्रश्न सुटणार नाही.

बौद्ध समाजाने आपण जे मांडतो त्याचे अन्य समाजाला अर्थ काय लागतात, याचा विचार करायला हवा. आपले म्हणणे इतरांना पटवावे लागेल. ते त्यांनी स्वतःच समजून बौद्धांशी समजुतदारपणे वागावे अशी अपेक्षा करणे वाजवी नाही. दलित-शूद्रांना नाडणाऱ्या पेशवाईचा अंत करणारा म्हणून शौर्यदिन हे बौद्धांच्या मनात असले तरी अन्य समाजाला (शूद्र असणाऱ्या ओबीसींनाही) ‘तुम्ही इंग्रजांना फितूर झालात’ हा हितशत्रूंनी प्रचारलेला अर्थ अधिक पटतो. हा महारांचा शौर्यदिन आहे-त्यात तुम्हा मांगा-चांभारांचे काय, अशा चकव्यात बौद्धेतर दलितांना अडकवले जाते. नवपेशवाई म्हणताना तुम्हाला आम्हा ब्राम्हणांना कमी लेखायचे असते, असे आजच्या ब्राम्हणांना वाटते. भिडे-एकबोटे किंवा संघपरिवाराचा त्यांच्या भूमिकांचा प्रचार-तोही समाजाच्या सर्व विभागांत, विविध मार्गांनी हा नित्यधर्म आहे. आम्ही प्रसंगाने, तेही केवळ जाहीर सभांत व आमच्यातच बोलतो.

भीमा-कोरेगाव प्रकरणातील आपल्या हस्तक्षेपांचा हिशेब कोणत्याही पद्धतीने केला तरी निव्वळ बाकी काय याचे उत्तर तेच येईल. ते प्रांजळपणे स्वीकारण्यातच भले आहे. आपण महाराष्ट्र बंद केला याचा अर्थ महाराष्ट्राला आपला मुद्दा पटला अशा भ्रमात राहू नये. मुद्दा पटवण्याचे तसेच सामायिक प्रश्नांवर आंदोलन उभारण्याचे खास व सतत प्रयास करावे लागतील. या प्रयासांचा अंतिम मुक्काम काय? तर तथागत गौतम बुद्धाच्या ‘सब्बे सत्ता सुखी होन्तु’ या घोषात अपेक्षिलेला, सर्वतऱ्हेचा अन्याय दूर होऊन, परस्परांतील विद्वेष वितळून एक निरामय समाज निर्माण होणे हाच आहे...हे कायम स्मरणात हवे.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com
_________________________________

आंदोलन, फेब्रुवारी २०१८

Sunday, January 14, 2018

माझी ओळख-माझी घडण

संक्षिप्त परिचयः 


सुरेश सावंत 

जन्‍मः १४ जानेवारी १९६५, मुंबई. 

शिक्षणः एम. ए. (मराठी) 

१९८४ ते १९८९ - शिक्षक म्हणून नोकरी 

१९८९ पासून पूर्णवेळ कार्यकर्ता 

आंबेडकरी तसेच स्त्रिया, कष्टकऱ्यांच्यात काम करणाऱ्या अनेक पुरोगामी संघटना व चळवळींत सहभाग. उदा. प्रागतिक विद्यार्थी संघ, बौद्ध युवा मंच, स्त्री मुक्ती संघटना, रेशनिंग कृती समिती, अन्न अधिकार अभियान, सम्यक संवाद, संविधान संवर्धन समिती इ. 

सहभाग असलेल्या चळवळीसंबंधी तसेच अन्य सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय विषयांसंबधी लेखन व भाषणे. 

अक्षर प्रकाशनातर्फे ‘गुंता व उकल’ हा लेखसंग्रह प्रसिद्ध. 

____ 

ईमेलःsawant.suresh@gmail.com ; मोबाईल क्र.9892865937 

ब्लॉगः www.sureshsawant.blogspot.com 

फेसबुक खातेः https://www.facebook.com/suresh.sawant65 

पत्ताः ३०४, कृष्णा अपार्टमेंट, सेक्टर १२ ए, कोपरखैरणे, नवी मुंबई - ४००७०९. 

_____________


विस्तृत परिचयः 

मुंबईत चेंबूरच्‍या लेबर कॅम्‍पशेजारच्‍या पी.एल. लोखंडे मार्गावरील झोपडपट्टीत बौद्ध कुटुंबात माझा जन्‍म झाला. हा परिसर बाबासाहेब आंबेडकरांच्‍या चळवळीच्‍या काही बालेकिल्‍ल्‍यांपैकी एक. बाबासाहेबांच्‍या इथे सभा झालेल्‍या. दलित पँथरची चळवळ जोरात होती त्‍यावेळी मी ९-१० वर्षांचा असेन. त्‍या झंझावातात आमच्‍या वयाची मुलेही घुसळून निघत होती. 'जयभीम के नारे पे-खून बहे तो बहने दो...' घोषणा सुरु झाल्‍या की रोम न् रोम शहारुन उठायचा. सगळं वातावरणच भारुन टाकणारं होतं. राजा ढालेंच्‍या 'साधने'तील लेखातील राष्‍ट्रध्‍वजासंबंधीच्‍या उल्‍लेखाचा आणि नामदेव ढसाळांच्‍या 'स्‍वातंत्र्य कुठच्‍या गाढवीचं नाव आहे' या कवितेचा इतका व बराच काळ प्रभाव होता, की गवई बंधूंच्या हत्येनंतर मी शाळेत स्‍वातंत्र्य दिनाला काळी फीत लावून गेलो आहे. कितीतरी काळ राष्‍ट्रगीत म्‍हणायला मी नकार देत असे. नवीन समज आल्‍यावर हा प्रकार मी थांबवला. पुढे पँथरच्‍या चिरफळ्या झाल्‍या. प्रारंभ राजा-नामदेवच्‍या वैचारिक भूमिकांतल्‍या मतभेदाने झाला. त्‍या मतभेदालाही एक उंची होती. मात्र मतभेदाची जागा नेत्‍यांच्‍या अहंतांनी, वैयक्तिक महत्‍त्‍वाकांक्षांनी व पुढे स्‍वार्थाने व परिणामी संधिसाधूपणाने घेतल्‍यानंतर आंबेडकरी चळवळीची दारुण वाताहत झाली. मी १५-१६ वर्षांचा होईपर्यंत पँथरची रया पार गेली होती. 

या पार्श्‍वभूमीवर बुद्धाच्‍या 'अत्‍त दीप भव' म्‍हणजेच 'स्‍वयंप्रकाशित व्‍हा', स्‍वतःचा उद्धार स्‍वतःच करा, या तत्‍त्‍वाने 'प्रागतिक विद्यार्थी संघ' या संस्‍थेची १९८० साली स्‍थापना करुन आम्‍ही वस्‍तीत शैक्षणिक उपक्रम सुरु केले. आम्‍हा कार्यकर्त्‍यांत माझ्यासह बहुसंख्‍य १० वीचे तर काहीजण कॉलेजला जाणारे विद्यार्थी होते. यात अल्‍प प्रमाणात बौद्धेतर मुलेही होती. घरात अभ्‍यासाला जागा नाही, वीज नाही, घरात कोणी शिकलेले नाही. यावर उपाय म्‍हणून 'बुद्धविहारात' आम्‍ही एकत्रित अभ्‍यास करत होतो, आमच्‍यापेक्षा कमी इयत्‍तांच्‍या मुलांचे वर्ग घेत होतो. व्‍याख्‍यानमाला आयोजित करत होतो. या परस्‍परसहाय्याच्‍या उपक्रमाने आम्‍ही शिक्षणात बऱ्यापैकी यश संपादन केले. 'फूल होता है पहले बाग का, बाद में डाली का' या कवी नीरज यांच्‍या आमच्‍या हिंदीच्‍या पाठ्यपुस्‍तकातील कवितेच्‍या पंक्‍ती डोळ्यासमोर होत्‍या. व्‍यक्तिगत विकास हा समाजाच्‍या विकासात अंतर्भूत असतो, हे तत्‍त्‍व डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बुद्ध, फुले यांच्‍याविषयी जे वाचत-ऐकत होतो, त्‍यातून आमच्‍या मनावर बिंबले होतेच. 

७७ टक्‍के गुणांनी एस.एस.सी. पास झालो. वस्‍तीत पहिला आलो. एवढे गुण मिळविणाराही वस्‍तीत आतापर्यंत मीच होतो. पण पुढे शिकणे अवघड होते. मी लवकर कमवायला लागणे आवश्‍यक होते. वडील व आई दोघेही वयस्‍क. त्‍यात सतत आजारी असायचे. छोटा भाऊ प्राथमिक शाळेत शिकत होता. वडील गिरणी कामगार. आजारपणाने रजेवर होते. पुढच्‍या दीड-दोन वर्षात निवृत्‍त होणार होते. त्‍यांच्‍या रजेच्‍या काळातच दत्‍ता सामंतांचा अजूनही न संपलेला संप सुरु झाला आणि वर्षभरात संपकाळातच ते निवृत्‍त झाले. आता तर घरी कमावणारे कोणीच नव्‍हते. ११ वीला प्रवेश घेतला होता. पण भौ‍तिक-भावनिक अस्‍वस्‍थतेत नियमितपणे कॉलेजला गेलो नाही. नापास झालो. पुढे डी. एड. केले. ती २ वर्षे अनेकांच्‍या, मुख्‍यतः शिक्षकांच्‍या मदतीवर काढली. (हे सर्व शिक्षक उच्‍चवर्णीय होते.) १९ व्‍या वर्षी नोकरीला लागलो. रस्‍त्‍यावर येऊ घातलेले घर थोडक्‍यात वाचले. 

या दरम्यान आधुनिक व वैज्ञानिक दृष्टिकोण देणाऱ्या व आमचे जीवन आमूलाग्र बदलणाऱ्या बौद्ध धम्माचा प्रचार-प्रसार हीही माझ्या कामाची एक महत्वाची आघाडी राहिली. गावी कोकणात आम्ही ‘बौद्ध युवा मंच‘ या नावाची संघटना केली आणि अंधश्रद्धा व जुनाट रुढींविरुद्ध अनेक मोहिमा घेतल्या. बौद्धांतील प्रस्थापित कर्मठतेविरुद्धही संघर्ष छेडले. 

शिक्षक म्‍हणून आधी पार्ल्‍याला माधवराव भागवत हायस्कूल व नंतर चेंबूरला स्‍वामी मुक्‍तानंद हायस्‍कूल (वसंतराव खानोलकरांची शाळा) येथे नोकरी केली. प्रागति‍क विद्यार्थी संघ, शाळेतील अन्‍य उपक्रम इ. काम चालू असतानाच शाळेतील पर्यवेक्षिका रजनी लिमये यांच्‍यामुळे त्‍यांचे वडील लाल निशाण पक्षाचे कार्यकर्ते, स्वातंत्र्य सैनिक, माजी शिक्षक आमदार भाऊ फाटक यांच्‍याशी संपर्क आला. त्‍यांच्‍यामुळे स्‍त्री मुक्‍ती संघटनेत व पुढे लाल निशाण पक्षात कार्यरत झालो. 

'संपर्क आला....कार्यरत झालो' या वरील ओळींतला प्रवास सहज नव्‍हता. भाऊ भेटले नसते, तर हा प्रवास बहुधा झालाच नसता. म्‍हणजे कम्‍युनिस्‍ट चळवळीत नसतो आलो. बुद्ध-फुले-आंबेडकरी चळवळीच्‍या परिसरात दीनदुबळ्यांच्‍या उत्‍कर्षासाठी आयुष्‍य वेचणे हे शालेय जीवनातच ठरले होते. त्‍यामुळे त्‍या कामात मी पूर्णवेळ कार्यकर्ता होण्‍याची शक्‍यता होतीच. समाजवादी, गांधीवादी व कम्‍युनिस्‍ट यांपासून सावध राहावे आणि त्‍यातही ते जर ब्राम्‍हण असले तर त्‍यांच्‍या वाऱ्यालाही उभे राहू नये, असा संस्‍कार व सामाजिक दहशतीच्‍या वातावरणात मी वाढलो होतो. आंबेडकरी चळवळीचे होत असलेले पतन व या दहशतीच्‍या अध्‍वर्यूंची नैतिक वाताहत अन्‍य पुरोगामी प्रवाह समजून घेण्‍याची निकड तयार करत होते. तथापि, ही दहशत मोडून त्‍यांच्‍याशी संग करण्‍याइतपत ती निकड तीव्र नव्‍हती. या स्थितीत भाऊंना भेटलो. नवे समजून घेणे; खरे म्‍हणजे अदमास घेणे-तपासणे हा हेतू या भेटीत अधिक होता. ही भेट व पुढील प्रक्रिया रोचक आहे. पण विस्‍तारभयास्‍तव अधिक लिहीत नाही. एवढेच सांगतो, भाऊंनी आधी साने गुरुजी, स्‍वातंत्र्य चळवळ व शेवटी मार्क्‍सवाद सांगितला. मी कोरा नव्‍हतो. काहीएक राजकीय-सामाजिक जाण असलेला, व्‍यवहार करत असलेला कार्यकर्ता होतो. भाऊंच्‍या या अभ्‍यासमंडळांनी मनात अनेक संघर्ष उभे केले. या संघर्षांतून जो समज तयार झाला, त्‍यामुळे माझ्या मूळ आराध्‍यांना - बुद्ध, बाबासाहेब आंबेडकर यांना - धक्‍का तर लागला नाहीच, उलट त्‍यांच्‍या प्रतिमा, त्‍यांचे योगदान माझ्या मनात अधिक रेखीव झाले. त्‍या सर्वांना एक व्‍यापक संदर्भचौकट प्राप्‍त झाली. या विश्‍वाचा कोणीही निर्माता वा नियंता नसून ते विकसित झाले आहे व होत राहणार हा भौति‍कवाद बुद्धामुळे शालेय जीवनातच उमजला होता. परंतु, विरोधविकासवादाची संकल्‍पना, ऐतिहासिक दृष्टिकोण भाऊंनी सांगितलेल्‍या मार्क्‍सवादातून मिळाला. पुढच्‍या सर्व चिंतन, विश्‍लेषण व चळवळीतल्‍या व्‍यवहाराला याचे खूप सहाय्य झाले. आंबेडकरी कार्यकर्त्‍यांच्‍यात, आंबेडकरी वस्‍तीत राहत असताना त्‍याच वस्‍तीत नव्‍या जाणिवेने व डाव्‍या ओळखीने व्‍यवहार करणे हे संघर्षाचे, सोबती-सहकाऱ्यांशी अंतराय तयार करणारे होते. आंबेडकरी चळवळीतून डाव्‍या चळवळीकडे यापूर्वी जे आले त्‍यांचाही कमीअधिक तीव्रतेने हाच अनुभव राहिला आहे. त्‍यांनी जे सहन केले ते मलाही करणे भाग होते. ते मी केले. सोबत्‍यांशी-वस्‍तीशी संपूर्णतः तुटून न जाता तिथेच रुतून राहायला व विस्‍तार पावायला बुद्ध-बाबासाहेबांमुळे मिळालेली व्यवस्‍थाबदलाची जाज्‍ज्‍वल्‍य आकांक्षा, भाऊंकडून मिळालेला नवीन दृष्टिकोण आणि या दरम्‍यानच्‍या माझ्या मनातील सूक्ष्‍मातिसूक्ष्‍म तरंगांना हेरुन त्‍यांचा निरास करणारा भाऊंचा अत्‍यंत संवेदनक्षम प्रतिसाद व आधार मदतनीस ठरला. 

शिक्षक म्‍हणून नोकरी करत असतानाच मी मराठी विषयात बीए व एमए केले. एम.ए.ला प्रथम वर्ग मिळाला. मुंबई विद्यापीठातील माझ्या नामवंत शिक्षकांचा मी राज्‍यात अथवा राज्‍याबाहेरच्‍या विद्यापीठांत-किमानपक्षी महाविद्यालयांत लेक्‍चरर व्‍हावे, असा आग्रह होता. पण तो नम्रपणे नाकारला. चळवळीत पूर्णवेळ काम करायचे होते. याच दरम्‍यान, चळवळीतल्‍या कार्यकर्तीशीच माझा आंतरजातीय (आंतरधर्मीय) विवाह झाला. माझे दलितपण व झोपडपट्टीत राहणे यामुळे विरोध वगैरे नित्‍याचे सोपस्‍कार अर्थातच पार पाडावे लागले. आम्‍ही दोघेही पूर्णवेळ कार्यकर्ते होण्‍याच्‍या लायकीचे होतो, तरीही माझे सामाजिक स्‍थान व इतर काही घटक लक्षात घेता, पूर्णवेळ कार्यकर्तेपण माझ्या वाट्याला आले. लग्‍न झाले तेव्‍हा पत्‍नी शिकत होती. मी पूर्णवेळ कार्यकर्ता झाल्‍यानंतर पुढे दोन वर्षांनी तिने नोकरी सुरु केली. हा दरम्‍यानचा काळ जिकीरीचा होता. घरच्‍यांना, वस्‍तीतल्‍या मित्रांना, नातेवाईकांना हे अजिबात रुचले नव्‍हते. मात्र, भाऊ व भाऊंच्‍या अभ्‍यासमंडळांतून जोडल्‍या गेलेल्‍या माझ्या सहकाऱ्यांच्‍या भक्‍कम आधाराने हा काळही तरुन गेला. आमच्‍या या सहकाऱ्यांची लग्‍नेही चळवळीत झालेली व त्‍यांच्‍यातही दोघांपैकी एक पूर्णवेळ कार्यकर्ता अशीच रचना होती. एखाद-दोन वर्षे मागे-पुढे असे आम्‍ही पूर्णवेळ कार्यकर्ते झालो होतो. 

पहिली जबाबदारी मिळाली ती स्वातंत्र्य सैनिक नागनाथ नायकवडी यांच्‍या पुढाकाराने वाळव्‍यातून सुरु होणाऱ्या साप्‍ताहिकाचे ‘कार्यकारी संपादक’ म्हणून काम पाहण्‍याची. लाल निशाण पक्षाचे एस. के. लिमये, यशवंतराव चव्‍हाण व दत्‍ता देशमुख यांना नागनाथअण्‍णा व वाळवेकर मंडळी खूपच मानत. हुतात्‍मा किसन अहीर सहकारी साखर कारखान्‍याची मान्‍यता मिळविण्‍यात दत्‍तांचे तर मोठे सहाय्य झाले होते. वयाच्‍या २५ व्‍या वर्षी लग्‍न, त्‍याच वर्षी एम.ए., त्‍याच वर्षी फुलटायमर व त्‍याच वर्षी वाळव्‍यात गेलो. वाळवेकरांना माझी काहीही ओळख नव्‍हती. माझे पत्रकारितेतलेही काही कर्तृत्‍व नव्‍हते. मी 'दत्‍तांचा माणूस' हीच माझी त्‍यांना पुरेशी असलेली ओळख होती. दत्‍तांचा माणूस व माझी क्षमता या पलीकडच्‍या काही कारणांनी हा प्रयोग काही जमला नाही. पुरोगामी चळवळीचे मुखपत्र व्हावे अशी अपेक्षा असलेल्या या साप्ताहिकाचे काम अल्पकाळातच सोडून मला मुंबईस परतावे लागले. त्‍यानंतर काही काळ साक्षरता चळवळ व ट्रेड युनियन आणि पुढे प्रदीर्घ काळ रेशनच्‍या चळवळीत सक्रीय राहिलो. अन्‍य सामाजिक-सांस्‍कृतिक कामांशी संबंध होताच. भाऊंशी संबंध आलेल्‍या आम्‍हा मंडळींना जाणीवपूर्वक वस्‍तीपातळीच्‍या कामाशी जोडणे हे भाऊंचे खास वैशिष्‍ट्य होते. ट्रेन युनियन एके ट्रेड युनियन न करता आम्‍ही समाजाच्‍या विविध अंगांशी संवादी राहावे, असा त्‍यांचा आग्रह व खटपट असे. 

ज्‍या रेशनच्‍या चळवळीशी माझा प्रदीर्घ संबंध राहिला तिच्‍याविषयी थोडेसे अधिक सांगायला हवे. १९८८ च्‍या सुमारास ‘रेशनिंग कृती समिती’ स्‍था‍पन झाली. ही समिती म्‍हणजे एक संघटना नाही. अनेक संस्‍था, संघटना, मंडळे यांची ती समन्‍वय समिती आहे. प्रारंभी मुंबई व क्रमात राज्‍यातील अन्‍य भागातील संघटनाही तिच्‍याशी जोडल्‍या गेल्‍या. आज राज्‍यात अनेक ठिकाणी ती सक्रीय असली तरी मुंबई हाच तिचा मुख्‍य आधार राहिला आहे. रेशनचा अधिकार सर्व गरजवंतांपर्यंत पोहोचावा यासाठी त्‍यांची जागृती, त्‍यांना संघटित करणे व प्रशासन-शासनाशी नव्‍या नियमांसाठी-धोरणांसाठी व त्‍यांच्‍या अंमलबजावणीसाठी संघर्ष असे तिचे काम राहिले आहे. या संघर्षादरम्‍यान रेशन नीट मिळावे यासाठीचे नवे नियम, ज्‍यांच्‍याकडे त्‍यांच्‍या अस्तित्‍वाचा काहीही कागदोपत्री पुरावा नाही, असे असं‍घटित कामगार, फुटपाथवर राहणारे, परित्‍यक्‍ता, हिजडे, वेश्‍याव्‍यवसाय करणाऱ्या स्त्रिया अशा दुबळ्या विभागांना रेशनकार्डे सुलभरित्‍या मिळावीत यासाठीचे नवे आदेश इ. अनेक बाबी मिळविण्‍यात आल्‍या. पुढे देश पातळीवरच्‍या ‘राईट टू फूड कँपेन’चा एक भाग म्‍हणून राज्‍य पातळीवर अन्‍नाच्‍या अधिकारासाठी जी 'अन्‍न अधिकार अभियान' नावाने आघाडी सुरु झाली, त्‍यास प्रारंभीचा आधार रेशनिंग कृती समितीच्‍या या कामामुळे प्राप्‍त झाला. 

विविध मतप्रवाह असणाऱ्या संघटनांना सामावून घेऊन त्‍यांची व्‍यापक एकजूट सांभाळत १९८८ पासून आजवर टिकून राहणे हे रेशनिंग कृती समितीचे वैशिष्‍ट्य आहे. रेशनच्‍या प्रश्‍नावर आमचे मतभेद आहेत वा नेतृत्‍वाचे परस्‍परांत जमत नाही, म्‍हणून दोन किंवा तीन आघाड्या झाल्‍या नाहीत. रेशनच्‍या प्रश्नावर रेशनिंग कृती समिती व अधिक व्‍यापक अन्‍न अधिकाराच्‍या प्रश्‍नावर रेशनिंग कृती समितीच्‍या समावेशासहित अन्‍न अधिकार अभियान, ही रचना इतर राज्‍यांच्‍या तुलनेत महाराष्‍ट्राचे वैशिष्‍ट्य राहिले आहे. हे वैशिष्‍ट्य तयार करण्‍यात, जोपासण्‍यात आम्‍हा भाऊंशी संबधित लाल निशाण पक्षाच्‍या कार्यकर्त्‍यांचे आटोकाट प्रयत्न राहिले आहेत, हे आत्‍मस्‍तुतीचा दोष पत्‍करुनही सांगणे भाग आहे. अन्‍यथा वस्‍तुस्थितीचे वर्णन प्रामाणिक राहणार नाही. व्‍यक्‍तीचे यथोचित महत्‍व अधोरेखित करत असतानाच 'व्‍यक्‍ती जावो, संघ माझा कायदा' या लाल निशाण पक्षाच्‍या शिकवणुकीवर आम्‍ही ठाम राहिलो. जनसंघटना पक्षनिरपेक्षच असल्‍या पाहिजेत, तेथील निर्णय हे 'पॉलिटब्‍युरोने' नव्‍हे, तर त्‍या जनसंघटनेच्‍या सदस्‍यांनी खरोखरच्‍या लोकशाहीने घ्‍यायचे असतात, हे तत्‍त्‍व आम्‍ही कसोशीने पाळले. केवळ पुढारपणाचे शहाणपण नव्‍हे, तर सर्वसामान्‍य कार्यकर्त्‍यांच्‍या 'किमान समजावर आधारित सामायिक सहमतीचे तत्‍त्‍व' प्रश्‍नाधारित व्‍यापक आघाडीच्‍या निर्णयप्रक्रियेचा मूलाधार राहायला हवा, याबाबत आम्‍ही आग्रही होतो. खुद्द पक्षातील अन्‍य कॉम्रेड्सशीही या व्‍यवहाराबाबत संघर्षाच्‍या वेळा आल्‍या. रेशनिंग कृती समितीला लाल निशाण पक्षाचे प्रत्‍यक्ष अप्रत्‍यक्ष खूप सहाय्य झाले, पक्षाचे कार्यालय, अन्‍य साधने मुक्‍तपणे रेशनिंग कृती समितीने वापरली. पण आम्‍ही पक्षकार्यकर्त्‍यांनी तिला पक्षाची आघाडी होऊ दिली नाही. 

रेशनिंग कृती समितीच्‍या स्‍थापनेपासून तिच्‍याशी माझा संबंध असला तरी प्रारंभी मिलिंद रानडे प्रामुख्‍याने तिचे काम पाहत होते. १९९४ पासून मी मुख्‍य जबाबदारी स्‍वीकारली. मिलिंद रानडे अन्‍य कामांत व्‍यग्र झाले. २००९ ला (सुमारे १५ वर्षांनी) मी तिची पूर्णवेळ जबाबदारी सोडली. सुकाणू समितीचा निमंत्रित सदस्‍य म्‍हणून सल्‍लामसलतीत असतो. बैठका-मोर्च्यांत असतो. महत्वाची आंदोलने वा कार्यक्रम असले तर अधिक लक्ष घालतो. 

सतत घोड्यावर बसल्‍यासारखे जनसंघटनेच्या दैनंदिन कामात अखंड बुडून राहावे लागत असल्‍याने काही करावयाच्‍या बाबी राहून गेल्‍या होत्‍या. त्‍यात वाचन-लिखाणाबरोबरच काही अन्‍य क्षेत्रांचा समावेश होतो. ते मी सुरु केले. या दरम्यान राजकीय क्षेत्रात मोठी उलथापालथ होऊन मोदी-म्हणजेच संघाचे सरकार प्रचंड बहुमताने सत्तेवर आले. राजकीय वरदहस्ताने आत्मविश्वास दुणावलेल्या सांप्रदायिक फॅसिस्ट शक्ती मोकाट सुटल्या. संविधानाच्या चौकटीला हादरे बसू लागले. हा अनुभव आम्हाला नवीन नव्हता. गोध्राचा परिचय होताच. त्याचबरोबर कितीतरी आधी ९२-९३ ला बाबरीच्या विध्वंसनासाठी झालेली रथयात्रा व तदनंतरच्या दंगलींनी आम्हाला चांगलेच हादरवले होते. त्यावेळी आम्ही ‘राष्ट्रीय एकता समिती’ ही सर्व पुरोगामी, लोकशाही शक्तींना एकत्रित करुन संघटना उभी केली होती. फॅसिस्ट शक्तींच्या विरोधात वस्त्यावस्त्यांत प्रबोधन व दंगलीनंतर पुनर्वसनाचे काम यात अन्य सर्व कामे सोडून आम्हाला उतरावे लागले होते. तथापि, त्यात सहभागी पुरोगामी मंडळी पुढच्या काळात निवडणुकादी राजकीय व्यवधानांमुळे सक्रीय राहिली नाहीत. आम्ही बरीच वर्षे हे काम चालू ठेवले. पण यथावकाश आमच्याकडूनही हे काम थांबले. २०१४ च्या मोदींच्या राज्यारोहणानंतर त्या कामाचे खंडित होणे तीव्रतेने जाणवले. 

मात्र आता राष्ट्रीय एकता समिती व तिचा त्यावेळचा अधिकार राहिलेला नव्हता. त्यात पुढाकाराने असलेले आम्ही आता जनसंघटनांच्या व्यवधानात अडकलो होतो. राजकीय कार्यकर्ते असलो तरी हा राजकीय संघर्ष अंगावर घेण्यासाठीची संघटनात्मक ताकद व प्रेरणा यांत विशविशितपणा आला होता. एकूणच पुरोगामी चळवळीची ती स्थिती होती. अशावेळी मी जिथे वाढलो त्या चेंबूर परिसरातील मुख्यतः आंबेडकरी चळवळीशी संबंधित कार्यकर्त्यांचा सहभाग असलेल्या ‘संविधान संवर्धन समिती’स आम्ही चालना दिली. विविध रिपब्लिकन गटांत विभागलेले कार्यकर्ते वैयक्तिक पातळीवर इथे एकत्र होते, ही जमेची बाब. ही संघटना तशी नऊ-दहा वर्षांपूर्वीची. पण आता संविधान धोक्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर ती अधिक सक्रीय झाली आहे. संविधानातील मूल्यांचा प्रचार-प्रसार, त्यासाठी शिबिरे, वस्त्यांत बैठका, विविध निमित्ताने दिवस साजरे करुन चर्चा-परिसंवाद घेणे, यात्रा असे उपक्रम सुरु आहेत. आंबेडकरी समूहाला विविध पुरोगामी शक्तींशी एकजुटीत आणण्याची खटपटही चालू असते. या कामात सध्या मी अधिक व्यग्र आहे. समविचारी संघटनांच्या सहकार्याने शाळा-कॉलेज तसेच वस्त्यांत होणाऱ्या संविधानातील मूल्यांच्या प्रचाराची सत्रे घेण्यात सहभाग घेत असतो. 

‘आंदोलन’ मासिकात सदर तसेच अन्य काही अंक, वर्तमानपत्रांतून प्रासंगिक लेखन चालू आहे. यांपैकीच काही निवडक लेखांचे ‘गुंता आणि उकल’ हे पुस्तक ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या अक्षर प्रकाशनातर्फे अलीकडेच प्रकाशित झाले आहे. 

‘सम्यक संवाद’ या समविचारी कार्यकर्त्यांच्या गटातर्फे चालविण्यात येणाऱ्या फिल्म क्लब, online नित्यकालिक, त्याचे फेसबुकपेज यात भागिदारी करत असतो. समाजमाध्यमांचा वापरही निवडक पद्धतीने करत असतो. 

एकूण पुरोगामी चळवळीची पडझड हे आज मोठे आव्‍हान आहे. हे आव्हान तसेच संविधानाची चौकट उध्वस्त करु पाहणाऱ्या फॅसिस्ट शक्तींचा मुकाबला करण्यासाठी पुरोगामी शक्तींची व्यापक एकजूट, मतभेदांसह सहमतीच्या मुद्द्यावर एकत्र येण्यासाठीच्या शक्यता हाच हल्ली माझ्या मांडणीचा व कृतीचा मुख्य आशय राहिला आहे. 

- सुरेश सावंत

(१ डिसेंबर २०२०)

Tuesday, January 9, 2018

जिग्नेश मेवाणीच्या विजयाचा बोध


गुजरातच्या वडगाम मतदारसंघातून जिग्नेश मेवाणी भरघोस मताधिक्याने निवडून आला. जिग्नेशचे या नेत्रदीपक यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन. देशातील अनेकांचे लक्ष या मतदारसंघाकडे होते. गाईंना मारुन वाहून नेत आहेत या संशयावरुन वर्षभरापूर्वी तथाकथित गोरक्षकांनी दलित तरुणांना उनात अमानुष मारहाण केली होती. त्यातून जो दलितांचा उद्रेक झाला त्याचे नेतृत्व जिग्नेश मेवाणी या ३५ वर्षांच्या डाव्या-पुरोगामी चळवळीशी संबंधित कायद्याचा पदवीधर असलेल्या उच्चशिक्षित तरुणाने केले होते. त्यातूनच तो प्रकाशझोतात आला. कन्हैयावरचे सरकारी दमनचक्र, रोहित वेमुलाची आत्महत्या यांनी गरम झालेल्या माहोलात जिग्नेश नव्या दलित उठावाचा चेहरा झाला. त्याच्या या आंदोलनाला एकूणच संघपरिवाराच्या कारवायांनी अस्वस्थ असलेल्या देशभरच्या पुरोगामी, डाव्या व आंबेडकरी विचारांच्या बुद्धिजीवी-कार्यकर्त्यांनी साथ दिली. त्याच्या निवडणुकीच्या प्रचारातही केरळ, दिल्ली, कर्नाटक, बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र अशा अनेक राज्यातून पुरोगामी विद्यार्थी, कार्यकर्ते, अभ्यासक सामील झाले होते. देशातील संघपरिवाराच्या उन्मादाला व मोदींच्या चढाईला अटकाव करण्यासाठीच्या राजकीय लढ्याचा एक भाग या प्रेरणेने व जिद्दीने ही मंडळी जिग्नेशला त्याच्या प्रचारात साथ करत होती.

जिग्नेशच्या यशाने या सर्व पुरोगामी वर्तुळात जल्लोष होणे अगदी स्वाभाविक होते. आंबेडकरी चळवळीची जन्मभूमी व एकेकाळची आधारभूमी असलेल्या महाराष्ट्रातील आंबेडकरी विभागाला तर याचे विशेष अप्रूप आहे. आज आंबेडकरी-रिपब्लिकन चळवळीतील शतखंडिततेने राजकीयदृष्ट्या दुबळेपणा अनुभवणाऱ्या युवकांना मेवाणीचे हे यश ऊर्जा देणारे वाटते. अर्थात, मेवाणीची डाव्या-पुरोगाम्यांसोबतची सलगी व त्याचे ‘जयभीम’सोबत ‘लाल सलाम’ म्हणणे न रुचणारेही अजून आहेत. त्यांच्या निकषांप्रमाणे तो ‘शुद्ध आंबेडकरवादी’ नसल्याने त्यांनी या यशाबद्दल थोडे आखडते घेत अभिनंदन केले आहे. डाव्या-पुरोगामी वर्तुळातील काहींना त्याच्या या यशात अखिल भारतीय दलितांचा नेता उदयाला येत असल्याचे दिसू लागले आहे.

जिग्नेश मेवाणीमध्ये असा दलितांचा राष्ट्रीय पातळीवरील नेता होण्याची नक्कीच क्षमता आहे. एवढेच नाही, तर दलितांमध्ये आपला आधार तयार करुन त्यांच्यासहित अन्य कष्टकरी, शोषित, पीडित समूहांना तो एकवटू शकतो अशी ताकदही त्याच्यात आहे. तळच्या विभागांतला वावर, त्यांच्या प्रश्नाची जाण, ती मांडण्याचे व त्याभोवती जनमत संघटित करण्याचे कौशल्य, केवळ ‘दलितां’विषयी बोलतो तोच दलितांचा खरा कैवारी या घेऱ्यात अडकून न राहता समग्र व्यवस्था परिवर्तनाबाबतची समज हे सगळे काही जिग्नेशमध्ये आहे. (अर्थात, अभिनिवेशी टाळ्याखाऊ भाषणांच्या सापळ्यात न अडकता आपल्या ताकदीचे योग्य मापन करुन पाय जमिनीवर ठाम राहतील याची दक्षता ही पूर्वअट मात्र त्यासाठी नक्की आहे.) ...आणि असा कार्यकर्ता आता विधानसभेत आमदार असणार आहे. रस्त्यावरच्या आंदोलनात सक्रिय राहून त्याबाबतचा आवाज तो आता विधानसभेत उठवत राहणार आहे. त्याची विरोधकांना धारेवर धरण्याची शैली लक्षात घेता तो विधानसभा गाजवणार हे नक्की. मतदारसंघातील विकासाच्या कामांतून पैसा गोळा करणे हा लोकप्रतिनिधींचा तसा प्रचलित व्यवहार असतो. याबाबत मनस्वी चीड व त्या विरोधात असलेला जिग्नेश आहे. तो आपल्या मतदारसंघात विकासाची उत्तम कामे करेल. एक आदर्श आमदार म्हणून तो काही काळातच नावाजला जाईल, याबद्दल मला खात्री आहे.

हे सगळे लक्षात घेत असताना या मापनाला वस्तुनिष्ठता यायची असली तर किंवा थोडे सावधान राहायचे असले तर किंवा पुढील दिशा अथवा रणनीती अधिक स्पष्ट व्हायची असेल तर जिग्नेशच्या विजयाच्या प्रक्रियेतील काही बाबींची नीट नोंद घेणे गरजेचे आहे. जिग्नेशच्या निवडणुकीतील यशाच्या स्वरुपाबद्दल बोलताना, लिहिताना आंबेडकरी तसेच अन्य पुरोगामी मंडळींकडून त्या बाबी नोंदवायच्या राहून गेल्या आहेत किंवा पुरेशा अधोरेखित केल्या गेल्या नाहीत असे मला वाटते.

जिग्नेशच्या उमेदवारीने आनंद झालेल्या व त्याला आपल्याकडून शक्य ती मदत-किमान नैतिक पाठिंबा द्यावा म्हणून देशभरातून गेलेल्या पुरोगामी कार्यकर्त्यांत आम्हा मुंबईहून गेलेल्या काहींचा समावेश होता. आम्ही तिथे आठ दिवस होतो. या काळात जे प्रत्यक्ष पाहून-ऐकून ध्यानात आले त्याची नोंद पुढे करत आहे.

जिग्नेश मेवाणीचे या मतदारसंघात संघटन असावे, म्हणूनच त्याने या मतदारसंघाची निवड केली असणार व राज्य तसेच देश पातळीवरील दलितांना सकारात्मक संदेश जावा म्हणून काँग्रेसने ही जागा त्याला सोडली असणार असा या मतदारसंघात जाण्यापूर्वी व गेल्यानंतर पुढचे काही दिवस माझा समज होता. हळूहळू हा समज दुरुस्त होत गेला. काँग्रेसने ही जागा जिग्नेशला सोडली त्याचे कारण एकूण दलितांमध्ये अनुकूल संदेश जावा, हे बरोबर होते. पण जिग्नेशचे त्या भागात संघटन असणार हा माझा समज बरोबर नव्हता. त्याचे कर्तृत्व ज्या उना घटनेमुळे समाजासमोर आले ते उना वडगामपासून ३०० किलोमीटर दूर आहे. त्याचा परिणाम इथे झालेला नाही. त्याचे कोणतेही संघटन इथे नाही. तो या मतदारसंघाला अपरिचित होता. राहुल गांधींच्या नजीक असलेल्या त्याच्या मित्रांच्या सहाय्याने ही जागा जिग्नेशला सुटली. जिग्नेश अपक्ष म्हणून उभा राहिला. काँग्रेसने त्याला पाठिंबा दिला.

अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. तो सुरक्षित मतदारसंघ आहे. एक अपवाद वगळता आतापर्यंत तिथे कायम काँग्रेसचाच उमेदवार निवडून आला आहे. तिथले काँग्रेसचे समर्थक ही बाब आम्हाला अभिमानाने सांगत होते. जो एक अपवाद झाला, तोही आम्ही आमच्या उमेदवाराला धडा शिकवायला म्हणून तसे केले असेही ते म्हणाले. हा मतदारसंघ मुस्लिम बहुल आहे. त्यांच्यानंतर दलितांची संख्या. मग राजपूत, ठाकोर, चौधरी या जाती. मुस्लिम-दलित, मुख्यतः मुस्लिम ज्याला मते देतील तो निवडून येतो.

काँग्रेसने ही जागा जिग्नेशचा त्या मतदारसंघात स्वतःचा काहीही आधार नसताना सोडली त्यामागे त्यांचे हिशेब नक्की होते. पण ती सोडताना तू आमच्या पंजा निशाणीवर उभा राहा, असा आग्रह धरल्याचे दिसत नाही. दुसरा युवा नेता ठाकोर समाजाचा अल्पेश निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये सामील झाला व पंजा निशाणीवर उभा राहिला. जिग्नेश अपक्ष होता. त्याची निशाणी होती शिलाई मशीन. पंजा ऐवजी शिलाई मशीन हे लोकांपर्यंत पोहोचवणे जिकिरीचे होते. ते काँग्रेसने केले.

दलित नेत्याला जागा सोडायची व नंतर त्याला वाऱ्यावर सोडायचे, काँग्रेसच्या आधीच्या लोकप्रतिनिधीने किंवा अन्य निष्ठावंताने बंड करायचे व ती जागा येनकेनप्रकारेण जिंकून स्वतःकडे ठेवायची, असा अनुभव इथे आला नाही. जिग्नेशसाठी मणिलाल वाघेला या आपल्या तेथील आमदाराला काँग्रेसने तेथून हलवला व त्याला दुसऱ्या मतदारसंघातून उभे केले. वाघेला त्या मतदारसंघात पडले व तेथून भाजपचा उमेदवार विजयी झाला. रुढ भाषेत बोलायचे तर जिग्नेशच्या विजयासाठी आपल्या एका आमदाराचा काँग्रेसने बळी दिला. नाही म्हणायला काँग्रेसच्या एका जुन्या मंत्र्याचा मुलगा बंडखोर म्हणून अपक्ष उभा होता. जिग्नेशची दलित मते खाण्यासाठी त्याला भाजपनेच करोडो रुपये देऊन उभे राहायला प्रवृत्त केले होते, असा तेथील काँग्रेस कार्यकर्त्यांचा आरोप होता. अजूनही काहीजण उभे होते. ते सगळे जोरात आपटले. एकदा भाजप कार्यालयातील मंडळींशी बोलण्याची संधी मिळाली. त्यांच्या दृष्टीनेही हा काँग्रेसचाच मतदारसंघ होता. परंतु, जिग्नेशचे या मतदारसंघाबाहेरचे असणे, पंजा निशाणी नसणे व स्थानिक दलित अपक्षांच्यातील मतविभागणी यांमुळे आम्ही विजयी होऊ असे त्यांचे मापन होते. तथापि, तसे झाले नाही. काँग्रेसने मनापासून जिग्नेशची साथ केली. त्याच्या शिलाई मशीनवर पंजाचे वर्चस्व न लादता ही साथ केली. त्याच्या स्वतंत्रपणाची बूज राखली.

गोध्राच्या पार्श्वभूमीवर झालेल्या २००२ च्या गुजरात विधानसभा निवडणुकांमध्ये आम्ही असेच काँग्रेसच्या प्रचारासाठी गुजरातमध्ये गेलो होतो. अहमदाबादमधील मोदींच्या मणिनगर मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार आम्ही करत होतो. त्यावेळी तिथे व अन्यत्रही प्रचारासाठी पैसे देऊन रोजाने माणसे आणली जात होती, असे चित्र होते. हे चित्र आपल्याकडेही आहे. ते तसे सार्वत्रिक आहे. जिग्नेशच्या मतदारसंघात असे अजिबात दिसले नाही. एकतर जिग्नेश फाटका माणूस. त्याच्याकडे द्यायला काही नाही. बाहेरून आलेले पुरोगामी मित्र आपापल्या खर्चाने आलेले. त्यांपैकी काहींनी मदत गोळा करुन दिली. पण ती लाक्षणिक होती. निवडणुका लढवण्याचा अनुभव असलेल्या वा त्या प्रक्रियेत जवळून सहभागी झालेल्यांना अशी निडवणूक लढवण्याचा किती खर्च येतो याची कल्पना असेल. हा प्रचंड खर्च उभा करणे हे जिग्नेशच्या व त्याच्या मित्रांच्या अर्थातच आवाक्यातले नव्हते. स्थानिक लोक आपापल्या ऐपतीप्रमाणे जिग्नेशला मदत करत होते. कोणी गाडी दिली. कोणी अन्य स्वरुपात मदत केली. स्थानिक सभा तर तिथले लोकच लावत होते. खुद्द राहुल गांधी यांनी खास जिग्नेशसाठी त्याच्या मतदारसंघात सभा घेतली.

जिग्नेशच्या सभांना लोक उत्स्फूर्तपणे जमत. आरोळ्या, घोषणा, टाळ्यांनी सभा दणाणून टाकत. अनेक ठिकाणी जिग्नेशला खांद्यावर घेऊन वाजत गाजत मिरवणुकीने सभास्थळी नेत. ज्याचा आधी काहीही परिचय नाही, ज्या माणसाने याआधी त्यांच्या मतदारसंघात काही काम केलेले नाही अशावर लोक एवढे फिदा का होतात, हे मला कळत नव्हते. अंदाज लावला तो एवढाच. एकतर हा काँग्रेसचा सुरक्षित मतदारसंघ. बहुसंख्य काँग्रेसला मानणारे. शिवाय मुस्लिम जास्त. या मुस्लिमांमध्ये मोदींना तीव्र विरोध. भाजपला हरवणे ही त्यांनी आपल्या अस्तित्वाची लढाई मानली होती. शिवाय उमेदवार लाखात एक होता. एखाद्या यशस्वी आंतरजातीय लग्नात जसे ‘असा वर आपल्या जातीत शोधून सापडला नसता’ असे नवऱ्या मुलाचे कौतुक करतात, तसे काहीसे इथे होते. काँग्रेसने दिलेले उमेदवार या लोकांनी अनुभवले होते. त्यांच्या तुलनेत जिग्नेश हा शंभर नंबरी सरस होता. असा माणूस काँग्रेसने दिला यावर ते खूप खूष होते. जिग्नेशला सर्वार्थाने उचलून धरणाऱ्या गटाशी याबाबत एकदा बोलताना आम्ही विचारले, ‘असा उत्तम क्वालिटीचा जिग्नेश स्वतःच्या ताकदीवर अपक्ष म्हणून उभा राहिला असता व त्याला काँग्रेसने पाठिंबा नसता दिला तर..?’ त्यावर क्षणाचीही उसंत न घेता त्यांचे उत्तर होते- ‘जिग्नेशचे डिपॉझिट गेले असते.’

जिग्नेशचा विजय काँग्रेसच्या खांद्यावर झाला आहे. त्याच्या व्यक्तित्वाने या विजयाला शोभा आणली आहे. मात्र आपल्या आंबेडकरी, पुरोगामी, डाव्यांच्या ताकदीवर तो निवडून आलेला नाही. तेव्हा त्याचा विजय हा आपला विजय असे मानताना आपण डाव्या-पुरोगामी-आंबेडकरी मंडळींनी हे वास्तव लक्षात घेणे गरजेचे आहे. या वास्तवात न रुजणाऱ्या अजून काही बाबी आहेत. त्या तडजोडी आहेत. त्या मूलभूत नाहीत. पण त्या मर्यादा आहेत हेही ध्यानात घ्यायला हवे. ज्या उनामुळे जिग्नेश उदयाला आला त्या उनाचा तो आपल्या प्रचारात उल्लेख करत नव्हता. कारण सवर्ण समाजात अॅट्रॉसिटी अॅक्टची भीती. जशी आपल्याकडे आहे तशी. त्याचा दुरुपयोग होतो वगैरे. राजपूत वगैरे मंडळींशी बोलताना ती आम्हालाही जाणवली. त्यामुळे त्यांना आश्वस्त करण्यासाठी ‘मी भाजपच्या २२ वर्षांच्या गुजरातवरील अॅट्रॉसिटीच्या विरोधात लढायला आलो आहे’ असे जिग्नेश वारंवार भाषणातून बोलायचा. ‘जयभीम-लाल सलाम’ या त्याच्या आवडत्या व अभिमानाच्या अभिवादनाला तो इथे कटाक्षाने टाळायचा. दलित विभागांतील सभेत व राहुल गांधींच्या सभेतच त्याने जयभीम म्हटल्याचे मला आढळले. लाल सलाम तर अजिबातच नाही. जयभीम म्हटले की सवर्ण दुखावणार व लाल सलाम तर राष्ट्रदोहाच्या आरोपाला आमंत्रण ठरणार. त्यामुळे ही तडजोड त्याला करावी लागत होती. कन्हैयाला प्रचाराला येऊ नको हे सांगण्यामागेही ही भीती होती. कन्हैया तर राष्ट्रद्रोहाचा जिताजागता नमुना. भाजपच्या हातात कोलित नको, ही दक्षता त्यामागे होती.

पण अशा दक्षता, अशा तडजोडी आपल्याला कराव्या लागतात याचाच अर्थ ज्या विभागांनी आपल्याला निवडून द्यावे असे आपल्याला वाटते त्यांची तशी वैचारिक तयारी आपण केलेली नाही. ज्या विभागाची ती आहे (समजा दलित विभाग..तेही मर्यादित अर्थाने. कारण त्यांतही भाजपला मोठा आधार आहे.) त्याच्या ताकदीवर फक्त आपण निवडून येणार नाही. शेतमजूर, अंगणवाडी सेविका वा अन्य असंघटित कामगार यांच्या युनियन्स केल्याने समजा त्यांनी मिठाला जागून आपली सर्वच्या सर्व मते (वास्तवात त्यातही मोठी मतविभागणी होते. पण समजा..) आपल्या नेत्याला द्यायची ठरवले तरी अन्य विभागांची साथ मिळाल्याशिवाय निवडून येणे कठीण असते. त्यासाठी मतदारसंघातील विविध समाजविभागांच्या भावनिक तसेच अन्य हितसंबंधांचा मेळ घालावा लागतो. काँग्रेसची मंडळी तत्त्वाचा पीळ दाखवत नाहीत. त्यांना ती अडचण नाही. पण ज्या पुरोगाम्यांना-आंबेडकरवाद्यांना तो पीळ आहे, तो तसाच ठेवून सर्व विभागांच्या हितसंबंधांचा मेळ घालता येणे शक्य नाही का? ते शक्य केल्याशिवाय संसदीय निवडणुकांत आपण तगू शकणार नाही. इतर वेळी ज्या दिमाखात जिग्नेश जयभीम-लाल सलाम म्हणतो तसे म्हणत आणि उनाच्या दलितांचा आक्रोश संयतपणे मांडत, आपली संघटनात्मक ताकद विविध समाजविभागांत तयार करत हा तसेच अन्य जिग्नेश पुढची निवडणूक मोकळेपणाने व स्वबळावर लढतील यासाठी आपण काय करु शकतो?

जिग्नेशचे दिल खोलकर अभिनंदन करत असताना हा प्रश्न विसरु नको हा बोध जिग्नेशच्या विजयानेच मला दिला आहे.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

__________________________________

आंदोलन, जानेवारी २०१८

Friday, December 15, 2017

धर्म, श्रध्दा व मानवाचे उन्नयन


हातात मोबाईल, खांद्याला उंची पर्स; मात्र पायात चपला नाहीत. हे दृश्य रस्त्यात, स्टेशनवर जागोजाग या नवरात्रात आपण पाहिलं आहे. दरवर्षीच पाहतो हे. पूर्वी हातात मोबाईल नसायचे, कमरेत जीन्स नसायची. साडी, सलवार-कुर्ता असायचा. साधने, वेष बदलला. त्यात अधिक प्रगती, आधुनिकता आली. पण मनावरचा रुढींचा प्रभाव जुनाच राहिला. जीवनाला वेग आला. त्या वेगाशी जुळवताना आधुनिक साधनांचा वापर वाढला. त्यात प्रत्यक्ष पूजेला बसण्याचा वेळ वाचवण्यासाठी संगणकाच्या सहाय्याने पूजा सांगण्याचेही प्रकार लोक अवलंबतात, असे ऐकले आहे. एवढंच कशाला, कुठेतरी एक अनुभव वाचला होता. एका म्हातारीचा अंत्यविधी सुरु होता. भटाचे विधी चालले होते. त्याच्यासमोर लॅपटॉप होता. त्या लॅपटॉपवर स्काईपवर म्हातारीचा अमेरिकेतला मुलगा होता. हातातल्या महत्वाच्या एंगेजमेंटस सोडून तातडीने - तेही हजारो किलोमीटरवरुन - आईच्या अंत्यविधीला वेळेवर पोहोचणे त्याला शक्य नव्हते. म्हणून तो या मार्गाने सहभागी झाला. भटालाही काही प्रॉब्लेम नव्हता. भट भारी लवचिक असतात. अलिकडे भटही यजमानाच्या अपेक्षेप्रमाणे तासाची, मिनिटांची पूजा सांगतात. सगळी पॅकेजेस त्यांच्याकडे उपलब्ध असतात. दक्षिणेत तडजोड नसली म्हणजे झाले.

कोणी म्हणेल ही धर्माची चेष्टा आहे. कोणी म्हणेल हे आधुनिक जगाबरोबर बदलणे आहे. दोन्ही असू शकते. पण यात धर्माचा एक भाग विसरला जातो, जो अनेक थोर संतांनी सतत प्रतिपादला आहे. तो म्हणजे, ईशशक्ती चराचरात व्यापलेली आहे. तिचे स्मरण, तिच्याशी तादात्म्यता साधणे हाच धर्म आहे. त्या शक्तीशी काही मागायचे नसते. अनवाणी राहून वा अन्य एखादे व्रत करुन भौतिक जगातील समृध्दीची कामना करायचा सौदा करायचा नसतो. उलट परमशक्तीला समर्पित व्हायचे असते.

इथेच श्रध्दा व अंधश्रध्दा यांच्या सीमारेषा ठळक होतात. हा सौदा व त्याप्रीत्यर्थ करावयाचे कर्मकांड ही अंधश्रध्दा आहे. एखादा निर्मिक कल्पून त्याच्याप्रती समर्पित होणे ही श्रध्दा आहे. अंधश्रध्दा असो वा श्रध्दा दोहोंना विज्ञानाचा, तर्काचा पाठिंबा नाही. देव, निर्मिक यांचे अस्तित्व किंवा त्याची कृपा विज्ञानाने सिध्द होत नाही. म्हणून काही जण निरीश्वरवादी, नास्तिक असतात. त्यांना अशी श्रध्दा बाळगणे, देवापुढे हात जोडणे हेही मंजूर नसते. काहीजण ईश्वर असेल वा नसेल, आज त्याची प्रचिती येत नाही, जीवन वा सृष्टीच्या घडामोडींत त्याचे अस्तित्व दिसत नाही, सबब त्याची चर्चा करण्यात वेळ घालवणे हेच निरर्थक आहे, असे मानतात. या गटातल्यांना अज्ञेयवादी म्हणतात.

संत तुकाराम, महात्मा फुले, गाडगेमहाराज ही निर्मिकाला मानणारी, त्याच्या प्रति श्रध्दा बाळगणारी पण अंधश्रध्देवर तुटून पडणारी मंडळी. त्यांची सश्रध्दता वैज्ञानिकतेत भले बसत नसेल पण मनुष्यजातीला पुढे नेणारी आहे. नाशिकला गोदावरीत उभे राहून स्वर्गवासी पितरांना ओंजळीत पाणी घेऊन अर्घ्य देणाऱ्यांच्या शेजारी गाडगेबाबा उभे राहतात. स्वत:ही तसेच खापरात पाणी भरुन ओतत राहतात. अर्ध्य देणाऱ्या शेजारच्या इसमाला त्यांची ही कृती चमत्कारिक वाटून 'तुम्ही हे काय करत आहात?' असे तो विचारतो. गाडगेबाबा उत्तर देतात, 'माझ्या अमरावतीच्या शेताला पाणी घालतो आहे.' प्रश्नकर्ता हसू लागतो. 'हा काय वेडपटपणा! शेकडो किलोमीटरवरच्या शेताला असे कसे पाणी पोहोचेल?' उत्तरादाखल गाडगेबाबांचा प्रतिप्रश्न असतो, 'अमरावतीपेक्षा दूर असलेल्या स्वर्गातील पितरांना जर तुमचे हे अर्ध्य पोहोचते तर माझ्या शेताला का नाही पोहोचणार?'

'गोपाळा गोपाळा-देवकीनंदन गोपाळा' असे कीर्तन करत गाडगेबाबा माणसांना माणूसपणाच्या धरतीवर उतरवण्यासाठी आयुष्यभर झटले. महात्मा फुले निर्मिकाला मानूनही कर्मकांड पसरविणाऱ्या, सत्यनारायणासारखा स्वत:चे उखळ पांढरे करण्यासाठीचा विधी प्रचारणाऱ्या ब्राह्मणांचे कसब उघडे करण्याचा सत्यशोधकी जागर करत राहिले. तथागत बुध्द अज्ञेयवादी. ईश्वराच्या अस्तित्वाच्या चर्चेत पडत नाहीत. जन्म व मृत्यू या दोन बिंदूंच्या दरम्यानचे माणसाचे जीवन सुखी कसे होईल हे त्यांचे लक्ष्य होते. त्यामुळे बौध्द धर्मात ईश्वराच्या जागी त्यांनी 'नीती'ची प्रस्थापना केली. डॉ.आंबेडकर 'बुध्द आणि त्याचा धम्म' या आपल्या ग्रंथात म्हणतात, 'माणूस आणि माणसाचे माणसाशी असलेले या जगातील नाते हा बुध्दाच्या धम्माचा केंद्रबिंदू होय.'

गांधीजी हे देखील तुकाराम, फुले, गाडगेबाबा यांच्या पंक्तीत बसतात. मात्र गांधीजी धर्माचा स्वत:चा अर्थ लावतात व तो समाजात रुजवण्याचा प्रयत्न करतात. 'ज्या धर्मात अस्पृश्यता आहे तो हिंदुधर्म माझा नाही' हे, अस्पृश्यता पाळणाऱ्या समाजाला स्वत:ला हिंदू म्हणवून घेत ते सांगतात. ते कधीही कुठल्याही देवळात गेलेले नाहीत. त्यांच्या हस्ते एकाच देवळाचे उद्घाटन झाले ते भारतमातेच्या आणि त्यातही भारतमातेची मूर्तीही नाही. काशीविश्वेश्वराच्या मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या कस्तुरबा आणि महादेवभाईंना ते, 'तिथे दर्शन घेण्याऐवजी तुम्ही सत्याग्रह करून मेला असतात तर मला आनंद झाला असता' म्हणून फटकारतात. 'मी सनातनी हिंदू आहे' असे ते म्हणतात तेव्हा धर्माचे शुद्ध स्वरुप त्यांना अपेक्षित असते, कर्मकांडांनी भ्रष्ट झालेले नव्हे.

आपण पाहिले हे लोक श्रध्दावान, धार्मिक आहेत. त्यांचा समाजाला पुढे न्यायला खूप उपयोग झाला आहे. त्यांची धार्मिकता मनुष्यजातीला पोषकच ठरली आहे. त्यामुळे मुळात धार्मिकताच वाईट असे म्हणता येत नाही. निरीश्वरवाद हा विज्ञानवाद आहे. त्याचेही स्वागतच असायला हवे. या विचारांची मंडळी धर्म मानत नसतील, तरी हरकत नाही. पण ते जर सर्वसामान्यांच्या श्रध्दांवर, धर्मावर केवळ कर्कश्य कोरडेच ओढत राहिले, तर त्यातून काही साध्य होत नाही. त्यांना अपेक्षित माणसे बदलत नाहीत. उलट ती तुटतात. हे निरीश्वरवादी माणसाचे माणसाशी असलेले नाते अधिक सुंदर करायला काय करतात, कोणती नीतीतत्वे प्रचारतात हेच त्यांच्या कार्याचे मापदंड राहणार आहेत. ते देवाला मानत नाहीत, हे नीतीमूल्य नाही. ती त्यांची धारणा आहे. धारणा नव्हे, तर नीतीमूल्य व त्याचा प्रसार माणसे बदलतो, हे निरीश्वरवाद्यांनी लक्षात घेणे गरजेचे आहे.

अंधश्रध्दांचा तर माणसाचे माणूसपण वाढविण्यासाठी काहीच उपयोग होत नाही. नऊ दिवस अनवाणी फिरा, उपवास करा, सिध्दिविनायकाला दहा किलोमीटर रांग लावा यातून स्वत:ला माणसे कष्टवतील, त्यातून पुण्यप्राप्तीचे कृतक समाधान मिळवतील एवढेच. दारु प्याल्यावर येणारी आभासी सुखद झिंग व ही कृतक पुण्यप्राप्तीची झिंग एकाच कुळातली. दारुची झिंग सकाळी उतरते तरी. अंधश्रध्देची ही झिंग अशी उतरत नाही. विवेकवादी विचारांची जोपासना हाच त्यावरचा उतारा असतो.

पण ही मंडळी जोवर इतरांना आपल्या अंधश्रध्दांचा त्रास देत नाहीत तोवर त्यांना ती पाळायचा संविधानाने अधिकार दिलेला आहे. निरीश्वरवादी, श्रध्दावादी, अज्ञेयवादी व दुसऱ्याला त्रास न देणारे अंधश्रध्दावादी यांना आपल्या आस्था, विचार जपण्याचे, आचरणाचे व प्रचारण्याचे स्वातंत्र्य भारतीय घटनेने दिलेले आहे. तथापि, देशाचा कारभार धार्मिकतेवर चालणार नाही, भौतिकवादच त्याचा पाया राहील.

भारतीय संविधानाने धर्म व त्याची उपासना हा व्यक्तीला दिलेला अधिकार आहे. धर्माला किंवा धर्माच्या ठेकेदारांना स्वातंत्र्य दिलेले नाही. म्हणूनच मशिदीवरचे भोंगे असोत की दहीहंडीची उंची असो, यावर नागरिकांच्या वैयक्तिक वा सार्वजनिक हितासाठी सरकार बंधन आणू शकते. मुस्लिम किंवा हिंदू धर्माचे मुखंड सरकार आमच्या धर्मात ढवळाढवळ करत आहे, असे म्हणू शकत नाही. शनि-शिंगणापूर असो की हाजीअली दर्गा, जिथे-जिथे पुरुषांना प्रवेश आहे, तिथे-तिथे महिलांना प्रवेश द्यावाच लागेल असा आदेश म्हणूनच न्यायालय देते. न्यायालयाच्या या आदेशाला न मानणे, आमच्या धार्मिक बाबी आम्हीच ठरवणार तसेच आमचाच धर्म सर्वश्रेष्ठ व त्याचाच स्वीकार सर्वांनी करायला हवा यासाठी हट्टाग्रही राहून भल्याबुऱ्या मार्गांचा, हिंसेचा, दहशतीचा वापर करणे याला धर्मांधता असे म्हणतात. धार्मिकता व धर्मांधता यात मूलभूत फरक आहे. धर्मांधता माणसाचे माणसाशी असलेले नाते समृध्द करत नाहीच. उलट ते नासवते. वैरभावी करते. धार्मिकता अशी नकारात्मक नसते. ती हे नाते वृध्दिंगत करु शकते. किमान नासवत तरी नाही.

धर्मांधता ही धर्माबद्दलच्या चुकीच्या समजुतीतून येते. तथापि, धर्माचा वापर आपल्या राजकीय वा अन्य सत्ता-स्वार्थासाठी करणे हा निराळा प्रकार आहे. पाकिस्तानचे जनक मोहम्मद अली जिना हे वैयक्तिक पातळीवर अजिबात धार्मिक नव्हते. इस्लामला मंजूर नसलेल्या अनेक गोष्टी व्यक्तिगत पातळीवर ते करत. तथापि, सत्ताकारणासाठी त्यांनी इस्लामी भावनेला भडकावले. धर्म हा राष्ट्राचा पाया मानला. हिंदू व मुसलमान ही दोन राष्ट्रे आहेत, हा त्यांनी सिध्दांत मांडला. हाच सिध्दांत सावरकरांनीही मांडला. मुस्लिम व हिंदू या धर्मांतल्या कट्टरतावादाचा हा धर्मबाह्य राजकारणाचा, सत्ताकारणाचा आयाम समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. या धार्मिक कट्टरतावादाचा धर्माशी काहीही संबंध नाही. लालकृष्ण अडवाणींनी राममंदिरासाठी रथयात्रा काढली व पुढे बाबरी मशीद कोसळवल्यानंतर जी हिंदू-मुस्लिम दंगल झाली, जी मुंबईत बाळासाहेब ठाकरेंनी आपल्या प्रक्षोभक उद्गारांनी अधिकच भडकवली या मागे केवळ आणि केवळ सत्तेचे राजकारण होते. गोध्रा येथील ट्रेनमधला व त्यानंतरचा तसेच अलिकडे मुजफ्फरनगर असो की दादरी असो, या सर्व ठिकाणचा हिंसाचार याचा पाया धर्म नसून सत्ताकारण आहे. पाकिस्तानशी होणाऱ्या संघर्षाला किंवा काश्मीरमधील उद्रेकांना दोन्ही देशांतील हितसंबंधी धर्माची फोडणी द्यायचा प्रयत्न म्हणूनच करत असतात.

धर्मांधांपासून तसेच सत्तेसाठी धर्माला वापरणाऱ्या या चलाखांपासून लोकांना सतत सावध करत राहावे लागेल. तथापि, एक लक्षात घ्यायला हवे. भौतिक प्रगतीबरोबर माणसे आपोआप प्रगत होत नाहीत. त्यासाठी मनांची मशागत समांतरपणे करत राहावी लागते.या मशागतीचा एक भाग धर्म, धार्मिकता, श्रध्दा, अंधश्रध्दा, अज्ञेयवाद, निरीश्वरवाद व संविधानाचा त्यांच्याप्रतीचा दृष्टिकोन यांच्या स्पष्टतेचे प्रबोधन हा असेल.

- सुरेश सावंत, 

Tuesday, December 5, 2017

संविधान जागर यात्रेच्या निमित्ताने

_________________________________

२६ नोव्हेंबरच्या संविधान जागर यात्रेची तयारी चालू असताना अगदी घाईत, मासिक सदरासाठी लेख देण्याची मुदत संपत असताना, खाली दिलेला लेख मी लिहिला. या यात्रेला लोक किती जमतील याबद्दल त्यात मी शंका नोंदवली होती. ती शंका पूर्णपणे गैरलागू ठरली. इतका भरघोस प्रतिसाद मिळेल हे अनपेक्षित होते. किती लोक आले हे मी मोजू शकलो नाही. पण इतरांकडून आलेले आकडे पाच ते वीस हजार या दरम्यानचे आहेत. त्यामुळे सहमतीचा आकडा नक्की करणे आज तरी कठीण आहे. काहीही असो. हजारांत लोक आले खरे. रस्त्यावर तिची दोन टोके गाठणे आम्हा संयोजकांना अशक्य झाले. नियोजनाची बारीक तयारी केली होती तरी या संख्येमुळे आमची नियंत्रणाची यंत्रणा काही बाबतींत कोलमडून पडली. पण लोकच सूज्ञपणा दाखवत होते. यात्रेत चालताना वाटेत मला अनेक पुरुष, महिला, मुली भेटून तुम्ही आमच्याकडे आला होतात, याची ओळख व नोंद देत होत्या. याचा अर्थ, आम्ही कोणतीही वाहनांची सोय केलेली नसतानाही लोक उत्स्फूर्तपणे त्यांची त्यांची व्यवस्था करुन आले होते. आपण श्रम करावे आणि ते सर्व सार्थकी लागावे हा माझ्याबाबतीत तरी या यात्रेनिमित्ताने आलेला हा दुर्मीळ अनुभव होता.

वस्त्यांत यात्रेच्या आधीच्या दोन दिवसांत लोकांच्या उत्साहाचा तसा अंदाज येत होता. पण तो एवढा असेल असे वाटले नव्हते. सण असल्यासारखी ही यात्रा लोकांनी वाजत, नाचत गाजवली. लोक ११ किलोमीटर कसे चालतील हा प्रश्न तर मला यात्रा ठरली त्या दिवसापासून सतावत होता. पण लोक चालले. गाड्यांचा आधार कमी लोकांनी घेतला. शिवाय सगळ्यांना गाड्या मिळणेही शक्य नव्हते. लोक दमलेत असेही दिसले नाही. वाटेत नियोजित तसेच उत्स्फूर्त आहार व पाणीवाटपाचे स्टॉल लागले होते. तिथेही लोकांची झुंबड उडाली वा ती व्यवस्था कोसळली असे झाले नाही. लोकांचा जथा अंतःप्रेरणेने चालतच होता. चैत्यभूमी हेच त्याचे लक्ष्य होते.

वस्त्यांतील लोकांबरोबरच अनेक पुरोगामी संघटना, राजकीय पक्षांचे नेते-कार्यकर्ते, साहित्य-कलाक्षेत्रातील नामवंत, विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यापैकी कोणालाही औपचारिक निमंत्रण दिलेले नव्हते. सर्वसाधारणपणे केलेल्या आवाहनाला आत्मीयतेने त्यांनी हा प्रतिसाद दिला होता.

या यात्रेला विविध प्रकारचे सहाय्य करणारे शेकडो लोक आहेत. त्यातले काही ठाऊक आहेत. तर असंख्यांची काहीही नोंद नाही वा त्यांनी कोणी अशा नोंदींची अपेक्षाही केली नाही. आता यात्रा संपल्यावर लोकांच्या भेटी होतात त्यावेळी कोणी कोणी काय केले ते काही प्रमाणात कळते आहे. त्यामुळेच आमच्या काही सहकाऱ्यांनी लिहिलेल्या पोस्ट्समध्ये जेव्हा काही नावे आली, त्यावेळी अनेकांनी त्यांना इतर खूप नावे सुचवली. शेवटी सगळ्यांच्या सहाय्याची अशी जाहीर नोंद घेणे अशक्य आहे, अशा निष्कर्षाला आम्ही आलो.

यात्रेत बहुसंख्या आंबेडकरी समूहाची होती. तथापि, अन्य समाजविभागही लक्षणीय संख्येने होते. पुरोगामी परिवारातल्या आंबेडकरी, डावे, गांधीवादी, समाजवादी आदि सर्वांचा संयोजनापासूनच समान अधिकार असलेली ही यात्रा होती. यात्रा केवळ आंबेडकरी समुदायाची व इतर पुरोगामी मंडळी पाहुणे वा हितचिंतक असे तिचे स्वरुप नव्हते. तसा जाणीवपूर्वक प्रयत्न केलेला होता. म्हणूनच यात्रेत फक्त तिरंगा असेल, अन्य पक्ष वा धार्मिक गटाचे झेंडे नसतील, बॅनर मात्र प्रत्येकजण आणू शकतो, असे ठरवण्यात आले होते. कोणा नवख्या सहभागींचा बारीकसा अपवाद वगळता झेंड्याची ही शिस्त बव्हंशी पाळली गेली. आपल्यात अनेक मतभेद असतानाही संविधानातल्या मूल्यांचे रक्षण या सामायिक मुद्द्यावर सगळा संविधान परिवार एकवटला पाहिजे हे जे आम्ही सतत बोलत असतो, त्याचा नमुना या यात्रेच्या मर्यादेत आम्हाला पाहता आला.

यात्रा ज्या प्रमाणात मोठी होती त्या प्रमाणात प्रसारमाध्यमांनी तिची दखल घेतली नाही. आमच्या काही कार्यकर्त्यांना त्याचा खूप रागही आला आहे. अशी दखल त्यांनी घेतली असती तर अन्य भागांतील लोकांपर्यंत ही घटना पोहोचायला खूप मदत झाली असती हे खरे. पण जे प्रत्यक्ष सहभागी होते त्यांना आत्मबलाचा जो प्रत्यय आला तो आलाच. प्रसारमाध्यमांचे दुर्लक्ष त्याला रोखू शकले नाही.

आता लोकांचे आभार मानायला संघटक-कार्यकर्ते वस्त्यांत हिंडताना लोक खूप अपेक्षा व्यक्त करत आहेत. त्याचे दडपण येते आहे. पुढे काय करायचे, कसे करायचे हे मोठे आव्हान आहे. यात्रेची तयारी, सहभाग, स्वरुप व परिणाम आदिंचा बारकाईने धांडोळा तसेच या अशा भरघोस प्रतिसादाच्या कारणांचा शोध नीटपणे घेणे गरजेचे आहे. अनेकांनी आपापले फोटो व वृत्तांत खूप शेअर केले आहेत. ते सर्व संकलित करुन एक नेटका अहवाल तयार होणे आवश्यक आहे. हे कसे, कधी होणार ठाऊक नाही. पण हे सर्व अनुभव, निरीक्षणे नीट संकलित झाली तर या आव्हानाला भिडण्यासाठीच्या दिशादिग्दर्शनाला त्याची नक्कीच मदत होऊ शकेल.
- सुरेश सावंत
_________________________________

संविधान यात्रेच्या तयारीची खूप घाई सुरु आहे. आता तर तीन दिवसच राहिलेत. कशीतरी आजची संध्याकाळ लेख लिहायला काढली होती. लेख लिहायला सुरुवात करणार एवढ्यात फोन आला- “सभेला येताय ना?” एक सहकारी कार्यकर्ता वस्तीतून बोलत होता. वस्त्यांत प्रचार बैठका रोजच्याप्रमाणे आजही होत्या. पण मी कोणाला हो सांगितलेले नव्हते. मात्र या सहकाऱ्याच्या मते स्थानिक मंडळींनी मी येणार हे गृहीत धरुनच बैठक लावली होती. तो म्हणत होता- “लाऊड स्पीकर, खुर्च्या हा सगळा खर्च त्यांनी केला आहे. आपले इतर सहकारी आहेत. पण तुम्ही नाही आलात तर ते लोक नाराज होतील. उशीर झाला तरी तुम्ही या. आम्ही तोपर्यंत गाणी वगैरे सुरु करतो.”

मी माझी अडचण सांगण्याचा प्रयत्न केला. त्याने ती ऐकली. मग म्हणाला- “ठीक आहे. आम्ही करतो बैठक. पण तुम्ही आला असतात तर बरे झाले असते.” त्याच्या मनातील नाराजी स्पष्ट कळत होती. मी क्षणभर विचार केला. जेव्हा कधी परतू त्यानंतर अख्खी रात्र असेल लेख लिहायला. पण आता आपल्याला लोक बोलावत आहेत तर जायलाच पाहिजे. आणि मी गेलो.

सभा उत्तम झाली. म्हणजे रुढ अर्थाने लोक फार नव्हते. शे-सव्वाशेच्या घरात. पण सभा संघटित करणारी तरुण मंडळी होती. त्यांचा उत्साह दांडगा होता. त्यांनी लोकांना घरी जाऊन जाऊन आणले होते. या मंडळींनी आमच्या इतर सभा ऐकल्या होत्या. त्यातील मुद्दे लोकांना बोलावताना ते सांगत होते. माईकवर आवाहन करत होते. त्यानंतर जमलेली माणसे शांतपणे दोन तास आम्हाला ऐकत होती. सभा संपल्यावर काही पुरुष-महिला-तरुण भेटायला आले. खूप छान सांगितलेत, ऐकतच राहावेसे वाटत होते वगैरे अभिप्राय त्यांनी दिला.

सभेला आल्याचे सार्थक झाल्याचे सुखद तरंग मनात उमटले. वास्तविक आम्ही लोकांकडे जाऊन गाणी म्हणून लोकांना जमवून भाषण करणारे लोक. आज आम्हाला लोक स्वतःहून बोलावतात यातील आनंद काही निराळाच आहे. आपण लोकांना हवेसे वाटतो ही भावना खूपच प्रेरक व ऊर्जा देणारी आहे.

सभेनंतरच्या या प्रशंसेत ‘तुम्ही संयत बोलता, लोकांना समजेल असे बोलता’ असे जे अभिप्राय हल्ली येतात, हे वैशिष्ट्य काही नवे नाही. माझी ही शैली थोड्याफार फरकाने जुनीच आहे. आशयसूत्रही जुने. तपशील काही नवे असतात. पण हल्ली मिळतो तसा प्रतिसाद पूर्वी नव्हता. याचा अर्थ, शैली व आशयसूत्र जुने असले तरी भोवतालचा संदर्भ बदलला आहे. या बदललेल्या संदर्भामुळे लोकांना हे आशयसूत्र व शैली भावू लागली आहे. हे सगळे खूप आश्वासक आहे.

सभा याचा अर्थ हजार-पाचशे लोक नव्हे. ते क्वचित असतात. लोक कमीच. त्यातही तरुण दुर्मीळ. बहुतेक मध्यमयीन व वयस्क. पण जे जमतात ते शांतपणे ऐकत बसतात. प्रसारमाध्यमांतून जे त्यांच्यापर्यंत पोहोचते वा त्यांच्यावर आदळत असते, त्यातून त्यांना जे मिळत वा आकळत नाही ते त्यांना या भाषणांतून मिळते असे लक्षात आले आहे. व्हॉट्सअप, फेसबुक, वृत्तपत्रे, टीव्ही आदि माध्यमांची भरमार असली तरी थेट माणसाने माणसाला भेटून बोलायचे याला अजून पर्याय नाही, हे जाणवते.

संविधानातील मूल्यांच्या प्रचार-प्रसारासाठी आम्ही वस्त्यांतून हिंडत होतोच. पण संविधान दिनी २६ नोव्हेंबरला अनेक संघटना एकत्र येऊन मुंबईत ‘संविधान जागर यात्रा’ काढायचे सुमारे अडिच महिन्यांपूर्वी ठरले. त्यानंतर ह्या प्रचार-प्रसाराला अधिक गती आली. पहिल्यांदा आम्हीच लोकांत जाऊन ओळखी काढून बोलायचो. नंतर आधीच्या बैठकांत आमचे ऐकलेले लोक अन्य ठिकाणी बैठका लावू लागले. मग रोजच बैठका-सभा सुरु झाल्या. आम्हाला घरी पोहोचायला मध्यरात्र होते. खूप थकायला होते. पण ते शारीरिकदृष्ट्या. मन खूप उल्हसित असते.

सभांची संख्या व सभेतील संपर्कात आलेले लोक यांची गणना खूप मोठी होईल. पण हे सगळे लोक यात्रेला येतील का? नाही. सगळे नाही येणार. पण काही नक्की येतील. ते किती हे सांगता येत नाही. निश्चित येणाऱ्यांची कार्यकर्त्यांनी दिलेली संख्या काही हजारांत जाते. पण एवढ्या संख्येने लोक येतील का याबद्दल मला शंका आहे. न आलेल्यांच्या शुभेच्छा राहतील याची खात्री आहे. शंकेचे कारण आमचा हा प्रचार तसा वाऱ्यावरचा आहे. अजून वस्त्यांत आमची संघटनात्मक बांधणी झालेली नाही. आमचे मनुष्यबळ हुकमी नाही. जे यात्रेला येतो म्हणालेत त्यांना स्मरण देऊन त्या दिवशी बाहेर काढणे, त्यांना वाहनांची सुविधा करुन देणे हे आमच्या आवाक्यातले नाही. लोकांची प्रेरणा व स्थानिक संघटकांचे प्रयत्न यावर सोडून द्यावे लागत आहे. शिवाय ही यात्रा थोडीथोडकी नव्हे, तर ११ किलोमीटर लांब असणार आहे. देवनार पांजरापोळ येथील छ. शिवाजी महाराजांचा पुतळा ते चैत्यभूमी, दादर. तीही दुपारी. उन्हात. मुख्यतः चालायचे आहे. दमल्यावर वाहनात बसायची मुभा आहे. पण तेवढी वाहने असली तर. ही अडचण आमच्या संघटनेची, म्हणजे संविधान संवर्धन समितीची. ज्या संघटनांकडे साधने आहेत, हुकमी मनुष्यबळ आहे, ते किती आहे व किती लोकांना ते बाहेर काढणार आहेत, याचा अजूनही अंदाज नाही.

मध्यंतरी या यात्रेच्या तयारीचा भाग म्हणून मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, दादर येथे एक परिसंवाद झाला. डॉ. गणेश देवी, तिस्ता सेटलवाड, कुमार केतकर त्याला होते. त्यावेळी खूप लोक जमले होते. फेसबुक, व्हॉट्सअपवर व्यक्त झालेल्या प्रतिक्रियांत कित्येक वर्षांत मुंबई मराठीचा हॉल असा ओसंडून वाहिलेला पाहिला नव्हता, असे अनेकांनी म्हटले. पण इथे आलेले लोक सायंकाळी सावलीत खुर्च्यांवर बसले होते वा उभे होते. हे सगळेच्या सगळे उन्हात रस्त्यावर चालायला उतरतील असे नव्हे.

यात्रेला जेवढे येतील तेवढे येतील. ते जास्त आले तर खूप छान होईल. पण कमी आले तरी वाईट वाटण्याचा प्रश्न नाही. वस्त्यांतले वर वर्णन केलेले वातावरण, आमच्या बैठकांना मिळणारा प्रतिसाद आश्वासक भवितव्याकडेच निर्देश करत आहे. त्याचे मोल मोठे आहे.

पूर्वी या वस्त्यांत, मुख्यतः बौद्ध वस्त्यांत पुरोगामी विचारांच्या कार्यकर्त्याना खूप प्रश्नांना सामोरे जावे लागे. हे प्रश्न खूपसे हेतूंवर संशय घेणारे असत. ते जाणूनबुजूनही असत. हल्ली असे प्रश्न करणारे लोक वस्त्यांत क्वचित दिसतात. त्यांचा मध्यमवर्गात प्रवेश झाल्याने त्यांची वसतिस्थाने बदलली आहेत. त्यामुळे त्यांचे शब्दच्छल करणारी, हेत्वारोप करणारी शेरेबाजी ज्या प्रमाणात समाजमाध्यमांवर दिसते, तेवढी वस्त्यांत दिसत नाही. अर्थात, आम्हाला याचा अनुभव अगदी आलाच नाही, असे नाही. पण जो आला तोही बऱ्या स्थितीतल्या वसाहतीत.

याच्या उलट पूर्वी जेवढे चळवळीविषयी, आंबेडकरी, पुरोगामी विचारांविषयी जाणतेपण असायचे तेही लयाला गेलेले आढळते.

यात्रेच्या तयारीच्या या काळातच नवरात्रोत्सव होता. अनेक मंडपांतच आमच्या बैठका झाल्या. देवी बसवणारी वस्त्यांतील तरुण मुले आमचा आदर करत. दांडियाची सुरुवात व्हायच्या आधी त्यांचा मंच व माईक वापरायला देत. बैठकीला बसत. शेवटी यात्रेत आम्ही येणार आहोत, असे आश्वासन देत. एके ठिकाणी एक आयोजक तरुण म्हणाला, “सर, बिनधास्त बोला. आपलेच लोक आहेत.”

आपलेच म्हणजे बौद्ध. या मुलांना कोणतेही वैषम्य वाटत नव्हते, कोणताही अपराधीभाव त्यांच्यात नव्हता. जशी आंबेडकर जयंती तसा देवीचा उत्सव. तसाच गणपती. बाबासाहेबांबद्दल कणभरही कमी अभिमान नाही. तसेच गणपती-देवीबद्दलही काही वावडे नाही. एकदम समभाव.

मी राहत होतो त्या वस्तीतल्या मंडपातही अशीच बैठक झाली. तोच अनुभव...आपले लोक वगैरे. या वस्तीत आमचे एक पँथरचे नेते बौद्ध असतानाही होळी वगैरे कोणी रचली तर ती उद्धस्त करायचे. गणपती बसवायची तर कुणाची हिंमतच नव्हती. आम्ही मुले त्यांच्यासोबत असू. त्यांचे हे ‘अँग्री यंग मॅन’ असणे आम्हाला विलक्षण भावायचे. आमचे ते आदर्श होते. या जुन्या आठवणी एका बाजूला मनात उसळून येत होत्या अन् माझ्या त्याच वस्तीत देवीच्या मूर्तीच्या साक्षीने मी तरुण मुलांना संविधानातील मूल्ये समजावून सांगत होतो.

ही स्थिती त्रासदायक आहे हे खरे. भौतिक विकासक्रमात आमच्या पुढे असलेली ही पिढी पुरोगामी वैचारिक जाणीवेच्या बाबतीत कितीतरी मागे राहिली आहे. पण याला जबाबदार कोण? आम्ही एकेकाळी वस्तीत राहणारे सजग लोक. दरम्यान आंबेडकरी चळवळ विदीर्ण-विशीर्ण झाली हे खरे. पण आम्ही वस्ती सोडल्यानंतर वस्तीशी व चळवळीशीही संबंध तोडले किंवा तुटले हेही खरे. ते जाणीवपूर्वक सांधायचे आम्ही काहीच प्रयत्न केले नाहीत. आमचे नाकर्तेपण आमच्यापुढे या मुलांच्या रुपाने दत्त म्हणून आता उभे ठाकले आहे.

हे आव्हान समोर आहे. पण आधी वर्णन केलेली आश्वासकताही आहे. आमचे स्वागत होते आहे. लोक शांतपणे समजून ऐकायचा प्रयत्न करतात. म्हणजेच या यात्रेच्या प्रचाराच्या निमित्ताने तयार झालेल्या संपर्कांना यात्रेनंतरही आम्ही जिवंत ठेवू शकलो, त्यांच्याशी संपर्क-संवादात सातत्य ठेवू शकलो तर ही स्थिती काही अंशी नक्कीच बदलू शकते.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

_______________________________

आंदोलन, डिसेंबर २०१७